सोनेरी प्रवासाच्या चंदेरी आठवणी कालनिर्णय नाबाद 50

ही गोष्ट आहे एका अशा दिनदर्शिकेची जी जगभरात विकत घेतली जाते आणि फक्त भिंतीवरच न राहता अनेकांच्या भावजीवनाचा हिस्सा बनली आहे…
ही गोष्ट आहे एका अशा दिनदर्शिकेची जी एकूण दोन-चार नाही तर तब्बल सात भाषांमध्ये छापली जाते…
ही गोष्ट आहे एका अशा दिनदर्शिकेची जिच्या एकाच भाषेतल्या चार वेगवेगळ्या प्रादेशिक आवृत्त्या छापल्या जातात…
ही गोष्ट आहे एका अशा दिनदर्शिकेची जी शास्त्रार्थ तिथी, वार, नक्षत्र, करण, योग याबरोबरच साहित्य-विज्ञान-आहार-व्यायाम-आरोग्य यासाठीही आवर्जून विकत घेतली जाते…
ही गोष्ट आहे तीन पिढ्यांनी चालवलेल्या आणि तीन पिढ्यांनी आपलं मानलेल्या एका अशा दिनदर्शिकेची जी आता महाराष्ट्राचे मानचिन्ह बनली आहे…
ही गोष्ट आहे ज्योतिर्भास्कर जयंतराव साळगांवकर यांच्या दूरदृष्टीतून अवतरलेल्या आणि केवळ मुंबई वा महाराष्ट्रातच नव्हे तर जगभरातल्या मराठी घरांची ओळख ठरलेल्या ‘कालनिर्णय’ची!


उद्यमशिलतेत मराठी माणूस कमी पडतो, अशी हाकाटी कायम दिली जाते. मात्र अनेक मराठी उद्योजकांनी अत्यंत परिश्रमाने, जिद्दीने, प्रामाणिकपणे आकाशाला गवसणी घातली आहे. ‘दिनदर्शिका’ म्हटलं की ‘कालनिर्णय’ असा ‘ठसा’ उमटविणार्‍या ज्योतिर्भास्कर जयंत साळगांवकर यांच्या दिव्यत्वाची प्रचिती अनेकांनी घेतली आहे. अफाट जनसंपर्क, सद्गुणांवरील श्रद्धा, श्रमाला प्रतिष्ठा देण्याचा स्वभावगुण, नसानसात भिनलेला चांगुलपणा आणि अविरत कष्ट करण्याची तयारी यामुळे त्यांनी जगभर आपला लौकिक निर्माण केला आहे. साळगांवकर यांची दुसरी आणि तिसरी पिढीही हा वारसा नेकीने चालवत आहे. ‘घेतले व्रत हे न आम्ही अंधतेने’ हे या कुटुंबाने सातत्याने दाखवून दिले आहे. ‘भिंतीवरी कालनिर्णय असावे’ अशी साद घालत चेतवलेला हा नंदादीप गेली पन्नास वर्षे अव्यातपणे तेवत आहे. एक मराठी माणूस आपला ‘ब्रॅन्ड’ जगभर कसा पोचवू शकतो याची मूर्तिमंत प्रेरणा म्हणजे ‘कालनिर्णय’ची वाटचाल आहे. ‘कालनिर्णय’च्या पन्नाशीनिमित्त जयेंद्र जयंत साळगांवकर यांनी घेतलेला हा आढावा दिशादर्शक आहे. ‘कालनिर्णय’ची देदीप्यमान वाटचाल अशीच वर्धिष्णु होत राहो, याच ‘चपराक परिवारा’तर्फे त्यांना मनःपूर्वक शुभेच्छा! – संपादक

भाग्य थोर म्हणून मी या गोष्टीचा एक भाग आहे आणि कालनिर्णयच्या गेल्या पन्नास वर्षांच्या प्रवासाचा एक सहभागी साक्षीदार आहे. साळगांवकरांच्या घरात जन्माला आल्यानेच मला हे भाग्य लाभले आणि माझ्या वडिलांनी मला लहान वयातच कालनिर्णयच्या कामात जोडून घेतल्याने आज कालनिर्णयचा सुवर्णमहोत्सव साजरा करताना मी अभिमानाने, आनंदाने आणि कृतार्थतेने ही गोष्ट तुम्हाला सांगत आहे. कालनिर्णयची गोष्ट जरी 1972 सालापासून सुरू होत असली तरी या कल्पिताहून अद्भूत सत्यकथेचा उपोद्घात मात्र त्या आधी काही वर्षे लिहिला गेला होता. माझ्या वडिलांनी त्यांच्या आयुष्यात अनेक चढउतार पाहिले.

‘शब्दकोडी’ या एकेकाळी तुफान लोकप्रिय झालेल्या संकल्पनेवर प्रभुत्व असलेल्या माझ्या वडिलांना जयंतराव साळगांवकरांना त्या कोड्यांनी जसे प्रसिद्धीचे शिखर दाखवले होते तसेच अपयशाचा नीचतम तळही दाखवला. उद्योगामध्ये जे मोठे आर्थिक नुकसान सोसावे लागले त्यानंतरच्या काळात व्यंकटेश पै आणि शिरिष पै यांच्याशी स्नेह असल्याने ते आचार्य अत्र्यांच्या दै. ‘मराठा’मध्ये मित्रत्वाच्या नात्याने काही काम करत होते. त्याशिवाय ते ‘निर्णयसागर’ या त्याकाळात प्रसिद्ध असलेल्या दिनदर्शिकेसाठी भविष्य लिहित होतेच. ज्योतिषशास्त्र आणि पंचागाचा त्यांचा गाढा अभ्यास होता. त्यामुळेच त्यांच्या डोक्यात एक नवी संकल्पना आली. सर्वसामान्य लोकांना संकष्टीचा चंद्रोदय कधी होणार इथपासून ते लग्नाची बोलणी करायला किंवा नवीन वाहन घ्यायला कोणता दिवस शुभ आहे हे पाहण्यापर्यंत पंचांगाची गरज भासत असते मात्र सगळ्यांनाच ते बघता येत नाही. मग कोणाकडे तरी जाऊन या गोष्टींची माहिती घ्यायची तर त्या माणसाला काही दक्षिणा द्यायला हवी. इतकं करून त्याने नीट नाही पाहिलं, त्याचं गणित चुकलं तर काय? याची धाकधूक असायची ती वेगळीच. मग लोकांच्या घराघरातल्या भिंतींवर जे लटकत असतं त्याच कॅलेंडरमध्ये इंग्रजी तारखा आणि आपलं पंचांग याचा मेळ घालून एक सर्वांगीण उपयुक्त अशी दिनदर्शिका तयार केली तर? शिवाय पंचांग, तारखा आणि दिनविशेष देताना प्रत्येक महिन्याच्या मागच्या पानावर काही उपयुक्त मजकूर, ललित लेख, आरोग्यविषयक सल्ला देता आला तर आपोआपच त्या दिनदर्शिकेचं मूल्य वर्धन होईल आणि लोकांना ते अतिशय उपयुक्त वाटेल. आज पन्नास वर्षांनंतर ‘कालनिर्णय’च्या जन्माकडे वळून बघताना मला वाटतं की भिंतीवरच्या दिनदर्शिकेच्या मागच्या पानाला पुढच्या-दर्शनी पानाइतकंच महत्त्व प्राप्त करून द्यायची कल्पना सुचणं हाच तो ‘क्षण’ होता, ज्याने इतिहास घडवला.

माझ्या वडिलांना – जयंतराव साळगावकरांना एक भन्नाट कल्पना तर सुचली होती पण नुसती कल्पना सुचून चालत नाही, ती प्रत्यक्षात आणायला खिशाचा ‘अर्थ’पूर्ण आधारही असावा लागतो. तेव्हा माझ्या वडिलांची आर्थिक अवस्था अगदी बिकट होती मात्र त्यांनी जोडलेली माणसं हीच त्यांची खरी संपत्ती होती. त्यामुळे मुंबईतील भाजीपाल्याचे एक ठोक व्यापारी मुकुंद ठकोजी पाटील हे त्यांना मदत करायला पुढे झाले. ‘जयंतराव म्हणजे एकदम प्रामाणिक आणि खातरीचा माणूस, त्याला मदत केली तर ती वाया नक्की जाणार नाही’ या विश्वासानेच मुकुंदराव पाटलांनी माझ्या बाबांना नवीन धंद्याला मदत म्हणून दहा हजार रूपये दिले. बघा हं, तेव्हा म्हणजे 1972 साली सोन्याचा भाव होता तोळ्याला रू.202. तेव्हाचे दहा हजार म्हणजे किती मोठी रक्कम होती! तर पाटलांकडून सुरूवातीचे भांडवल मिळाले आणि माझ्या वडिलांनी 1973 साली त्यांच्या अभिनव संकल्पनेतील दिनदर्शिका छापून बाजारात आणायचे ठरवले. त्याच वेळी माझ्या आईला स्वप्नात श्री गणेशाचा दृष्टांत झाला आणि तिने सांगितले की या नवीन उद्योगाचं नाव गणपतीच ठेवा म्हणजे नक्की यश मिळेल. मग त्यानुसार माझ्या वडिलांनी ‘सुमंगल पब्लिशिंग कंपनी’ या नावाने कंपनी सुरू केली आणि नव्या दिनदर्शिकेचं नाव ठरलं ‘कालनिर्णय!’ तेव्हा हा निर्णय आमच्या सगळ्यांच्या ‘उद्या’वर किती मोठा परिणाम करणार आहे याची तशी कोणालाच कल्पना नव्हती. मी तर तेव्हा अवघा तेरा वर्षांचा होतो. त्यामुळे नवीन कंपनी म्हणजे काय? आपण दिनदर्शिका छापणार म्हणजे नेमकं काय करणार? याची तितकी व्यवहारी जाणीवही मला नव्हती. दै. मराठाच्या कार्यालयाच्याच इमारतीत तळमजल्यावर एक प्रेस होता. तिथे बाबांनी कालनिर्णय छापायला दिले. नवीन संकल्पना, नवीन दिनदर्शिका, बाजारात काय आणि किती प्रतिसाद मिळेल याचा अंदाज नव्हता म्हणून पहिल्यांदा पाच हजार प्रती छापून विक्रीला पाठवल्या. त्याची पण गंमतच… सुरूवातीला दुकानदार म्हणायचे ‘हे नवीन आहे, माहीत नाही विकलं जाईल का? त्यामुळे आम्ही आधी पैसे देणार नाही. जर विकलं गेलं तरच पैसे.’

मग आमच्या वडिलांनी एक युक्ती केली. ज्या एरियात, जिथल्या दुकानांमध्ये कालनिर्णय ठेवलं नव्हतं तिथे ते आधी आपली माणसं पाठवायचे आणि ‘कालनिर्णय आहे का?’ ‘कालनिर्णय द्या’ अशी मागणी ती माणसे त्या दुकानदाराकडे करायची. दर दोन दिवसांनी वेगवेगळ्या लोकांना त्या विभागात आधी पाठवायचे आणि मग कालनिर्णय घेऊन जायचे. आता ग्राहकांकडून चौकशी होते म्हणजे भरपूर मागणी असणार या कल्पनेनं दुकानदार कालनिर्णय ठेवायला लगेच तयार व्हायचे. ही युक्ती फार दिवस वापरावी लागली नाही कारण कालनिर्णयच्या आगळ्यावेगळ्या स्वरूपामुळे बघता बघता या नव्या आणि उपयुक्त दिनदर्शिकेची जाहिरात ग्राहकांनीच केली आणि पहिली पाच हजारांची आवृत्ती बघता बघता संपली. मग पुन्हा पाच हजार प्रती छापून त्या बाजारात नेल्या तर त्याही संपल्या पण नंतरच्या प्रती मात्र वेळेअभावी छापणं शक्य नव्हतं. एव्हाना जानेवारी महिना अर्धा अधिक संपत आला होता. त्यामुळे आणखी प्रती नाही छापल्या पण पहिल्याच वर्षी नव्या दिनदर्शिकेला मिळालेला प्रतिसाद अगदी उत्साहवर्धक होता. मग पुढच्या वर्षी म्हणजे 1974चं कालनिर्णय जे 1973च्या अखेरीसच बाजारात आणलं. त्याच्या तब्बल 35000 प्रती छापल्या आणि त्या अगदी धडाक्यात खपल्या.
मात्र या सुरूवातीच्या काळात कालनिर्णय छापणं सोपं नव्हतं. एकतर तेव्हा डिजिटल तंत्रज्ञान आलेलं नव्हतं की टाईप सेटींग कॉम्प्युटरवर होत नव्हतं. अक्षरशः अक्षरांचे खिळे जुळवून मजकुराची पाने तयार केली जात. त्यातही ती ‘मिरर इमेज’ म्हणजे बरोब्बर उलट जुळवलेली असायची. म्हणजे त्यांचा ठसा सुलट उमटायचा. अशा जुळवलेल्या मजकुराचे मुद्रित शोधनही किचकट असायचे. मी नंतर म्हणजे 1975 मध्ये आर्किटेक्चर कॉलेजला जायला लागलो आणि तेव्हापासून कालनिर्णयच्या कामात खर्‍या अर्थाने सहभागी होऊ लागलो. तेव्हापासून मी ‘कालनिर्णय’ची पाने बांधतो. तेव्हा कालनिर्णयचे पुढचे पान म्हणजे त्यातील पंचांग, शास्त्रार्थ व मागील बाजूचे ज्योतिष हा भाग आमचे वडील बघायचे आणि मी भावाबरोबर मागच्या पानाची जुळणी करायचो. वडिलांच्या पश्चात कालनिर्णयच्या पुढच्या पानाची जबाबदारी माझ्याकडे आली. तोपर्यंत माझाही ज्योतिष आणि पंचांगाचा अभ्यास झाला होता. त्यामुळे आता कालनिर्णयच्या पुढच्या पानाचे काम मी आणि कालनिर्णयचे पंचांग कार्यालयाचे श्री. करंदीकर असे दोघे मिळून बघतो पण आता तंत्रज्ञानाच्या सुविधांमुळे हे पान लावणे अगदीच सोपे झाले आहे. मला आजही ते पूर्वीचे दिवस आठवतात. तेव्हा आर्टवर्क हे कट-पेस्ट करून बनायचे. दर महिन्याच्या पानाचे आर्टवर्क या पद्धतीने बनवायचे म्हणजे फार व्याप असायचा पण आम्ही तो सगळा व्याप मनापासून करायचो. तेव्हा छापायच्या मजकुराच्या ‘गॅली’ बनायच्या. पुढच्या पानावर जो शास्त्रार्थ असतो त्याची एक लांबसडक कॉलमची गॅली यायची. मग त्यातल्या एकेक तारखेचा मजकूर कापून तो त्या तारखेखाली चिकटवावा लागायचा. तेव्हा आमच्याकडे विश्राम धुरी म्हणून आमच्या गावावरून घरच्या पडेल त्या कामात मदतीसाठी म्हणून आणलेला मुलगा होता. तो कालनिर्णयच्या ऑफिसातही पडेल त्या कामात मदत करायचा. मी त्याच्या मदतीने ही चिकटवाचिकटवी करायचो पण हे कट-पेस्ट करून केलेलं आर्टवर्क प्रोसेसिंगला गेल्यावर माझ्या छातीत धडधड सुरू व्हायची कारण प्रोसेसिंग करताना चिकटवलेला एक जरी शास्त्रार्थ पडला तर ती चूक ‘साळगांवकरांच्या कालनिर्णयला’ परवडणारी नव्हती. तर अशाप्रकारे पानाची पॉझिटिव्ह-निगेटिव्ह बनली की मग छपाईचे पान तयार व्हायचे. मग पुन्हा बारकाईने ते तपासायचे आणि फायनली ओके असेल तरच प्रिंटिंगला पाठवायचे. ही सगळी प्रक्रिया जशी वेळखाऊ होती तशीच जोखिमेचीही होती. कुठल्याही टप्प्यावर जराही बेपर्वाई झाली किंवा नजरचूक जरी झाली तरी कालनिर्णयचं नाव डागाळलं गेलं असतं.

कालनिर्णयच्या सुरूवातीचं सगळं आर्टवर्क ‘स्व. कमल शेडगे’ करायचे. सुमंगल पब्लिकेशन्सचा लोगो असलेला ‘सूर्य’ आणि ‘कालनिर्णय ’ ही अक्षरे आधी त्यांनी केलेलीच आम्ही वापरत असू. 1981च्या दरम्यान मी वडिलांबरोबर शेडगेंकडे गेलो होतो तेव्हा कशावरून तरी शेडगे आणि माझ्या वडिलांमध्ये वादावादी झाली. त्यात मला वडिलांचा अपमान होतोय असं वाटलं आणि मी अतिशय उद्विग्न झालो. तिकडून घरी परत येत असताना मी वडिलांना म्हणालो ‘ते काही नाही, आता आपण आपलं स्वतःच आर्ट डिपार्टमेंट सुरू करूयात. किती दिवस बाहेरच्या आर्टिस्टवर अवलंबून राहायचं?’

मग मी लगेच कामाला लागलो. आमचं काम करायला लागणार होते तसे दोन-तीन ले-आऊट आर्टिस्ट शोधले. जोडीला धुरी होताच आणि कालनिर्णयचं स्वतःचं डिझाइनिंग डिपार्टमेंट सुरू झालं. मग मी स्वतः त्यात लक्ष घालून आमचा लोगो, लेटरिंग हे अधिक रेखीव केलं आणि आम्ही लोगो रजिस्ट्रेशनही करून घेतलं. एव्हाना कालनिर्णयची नाममुद्रा जनमानसावर उमटू लागली होती. त्यामुळे आमचा खप वाढू लागला होता. त्याला पुरं पडण्यासाठी आम्हाला तीन तीन मुद्रणालयांमधून आमचं काम करून घ्यावं लागत होतं. त्या सगळ्या वेगवेगळ्या प्रेसमध्ये त्यांची नेहमीची छपाईची कामे असायची. आमचं काम साधारण वर्षाच्या अंतिम टप्प्यावर यायचं. त्यामुळे प्रेसवाले नेहमी त्यांची रोजची कामे झाल्यावर रात्री उशिरा आमचं काम लावायचे. त्या सगळ्यांना आमची एकच अट असायची, मशिनला लागायच्या आधी फॉर्म आम्हाला दाखवलाच पाहिजे. आम्ही बघून ओके दिल्याशिवाय आमचा जॉब सुरूच करायचा नाही. मग रात्री-बेरात्री, भल्या पहाटे असा कधीही प्रेसवरून फोन यायचा की ‘आता तुमचं काम सुरू करायचं आहे तर येऊन तपासून जा.’

ती जबाबदारी असायची माझ्यावर! मग काय, जायचो मी बोलावलं की आणि पानं तपासून त्यावर सही करून यायचो पण तेव्हा इतके सगळे कष्ट घेतले म्हणूनच ‘कालनिर्णय’ ब्रँड सशक्त आणि विश्वासार्ह बनला.

त्या काळात मुंबईत कांदिवलीला ‘उषा ऑफसेट प्रिंटर्स’ हा फार मोठा प्रेस होता. त्यांच्याकडे आमची मोठी क्वांटिटी सहज छापली जायची. ‘टाइम्स ऑफ इंडिया’चं ‘माधुरी’ हे रंगीत सिनेपाक्षिकही तिथेच छपाईला यायचं, असा त्यांच्या कामाचा दर्जा होता. एका वर्षी नेमक्या आमच्या कामाचा सिझन असतानाच निवडणुका लागल्या आणि सगळ्याच प्रेसवाल्यांचे भाव वधारले. निवडणुका म्हणजे काय दामदुप्पट भावाने छापण्याची संधीच. प्रचारासाठी लागणारं साहित्य पोस्टर्स, हँडबिल्स, बुकलेट्स सगळंच अर्जंट आणि भाव म्हणाल तो! मग काय, या छापखान्याने आमचा सुरू केलेला जॉब खाली उतरवला आणि आम्हाला निरोप पाठवला की निवडणुकांचं अर्जंट काम आहे त्यामुळे तुमचं काम आठवडाभर होणार नाही. हे कळल्यावर आमच्या सगळ्यांच्या तळपायाची आग मस्तकात गेली पण त्या प्रेसवाल्यावर संतापून काही उपयोग नव्हता. आता ठरलेल्या वेळेत अपेक्षित दर्जाची छपाई कशी आणि कुठून करायची हा मोठाच प्रश्न आमच्यासमोर उभा होता. जर ठरलेल्या वेळेनुसार छपाई झाली नाही तर कालनिर्णय बाजारात उशिरा येईल ज्यामुळे आमचे नाव तर खराब होईलच पण विक्रीवरही परिणाम होईल. त्यामुळे आता आयत्या वेळी छपाई कशी करून घ्यायची या विचाराने आम्ही आधी गर्भगळीतच झालो पण घाबरून, चिडून समस्या सुटणार नव्हती. मग एकामागून एक मुद्रणालयांना विचारायला सुरूवात केली आणि ज्यांच्याविषयी खातरी वाटली अशांना थोडं थोडं काम वाटून दिलं. वेगवेगळ्या प्रेसकडे काम गेल्याने पुरवठ्यावर थोडा परिणाम झालाच शिवाय सगळ्यांना या परिस्थितीचा ताण सहन करावा लागला. मात्र या प्रसंगानंतर आमचं ठरलं की आता साळगांवकरांनी छपाईसाठी स्वतःचे मुद्रणालय सुरू करायलाच हवे. त्यामुळे दुसर्‍यांवर विसंबून राहावे लागणार नाही आणि दर्जा-वेळेच्या बाबतीत तडजोड करावी लागणार नाही.

स्वतःचा प्रेस सुरू करायचा म्हटल्यावर त्यासाठी जागा शोधणं आलं. बरं आम्हाला ही जागा मुंबईतच हवी होती. त्यामुळे शोधाशोध सुरू झाली आणि कळलं की अंधेरीच्या एम.आय.डी.सी.मध्ये काही प्लॉट्स विक्रीला काढले आहेत. मग माझा भाऊ जयानंद आमचा मित्र हेमंत कोळवणकर यांच्याबरोबर जाऊन योग्य ती जागा शोधून आला. त्याला ती जागा बरी वाटली म्हणून नंतर मी त्याच्याबरोबर जाऊन पाहून आलो. मलाही ती जागा पसंत पडली. मात्र आमचा थोरला भाऊ जयराज याचं मत वेगळं पडलं. तो म्हणाला ‘अरे तिथे सगळं जंगल आहे, तिकडे कुठे प्रेस उभारायचा? ती काही सोयीची नाही जागा.’

पण मी समजावलं की, ‘कुठलीही जमीन विकसित होण्याआधी खडकाळ नाही तर जंगलाने भरलेली अशीच असते. जेव्हा तिचा वापर सुरू होतो, तिथे काही उभं राहतं तेव्हा हळूहळू सगळ्या सोयी, सुविधा तयार होतात. मग त्या जागेचं रूपच पालटून जातं. त्यामुळे हा प्लॉट आपण घ्यायलाच हवा.’

माझ्या वडिलांचंही त्या जागेबद्दल अनुकूल मत होतंच. मग जयराजचा विरोधही शमला. आता तो प्लॉट मिळवायचा तर त्यासाठी फक्त रितसर अर्ज करून पुरणार नव्हतं. कोणाच्या तरी मार्फत ते काम होईल याची खातरी करून घ्यावी लागणार होती. त्याकाळी महाराष्ट्राचे उद्योग मंत्री जवाहरलाल दर्डा होते. त्यांच्या शब्दानं काम होईल असं कळलं पण दर्डांकडे आमची ओळख नव्हती. मग त्यांच्याकडे आमच्यासाठी कोण शब्द टाकणार? त्यावेळी आमचे वडील ‘लोकसत्ता’मध्ये शब्दकोडी खात्यात नोकरी करत होते. तेव्हापासूनची त्यांची स्व. विद्याधर गोखलेंशी मैत्री होती. आता गोखले लोकसत्ताचे संपादक होते आणि त्यांची दर्डाजींशी चांगली ओळख होती. मग विद्याधरजी माझ्या वडिलांना-जयवंतरावांना दर्डाजींकडे घेऊन गेले. दर्डाजींना कालनिर्णय माहीत होतं पण त्याचे साळगांवकर कोण हे माहीत नव्हतं. विद्याधरजींनी कामाचं स्वरूप सांगितलं तर दर्डाजींनी लगेच आपल्या सचिवाला बोलावून एम.आय.डी.सी.मध्ये सूचना द्यायला सांगितली आणि खरोखरच आम्हाला हवा असलेला प्लॉट मिळाला. त्या प्लॉटची किंमत तेव्हा रू.2,81,000/- इतकी होती. त्या काळात म्हणजे 1981 मध्ये एकदम इतकी रक्कम गोळा करणं आम्हाला जरा जडच गेलं परंतु हीच व्यवसायाची वृद्धी करण्याची संधी आहे हे ओळखून आम्ही ती रक्कम जमवली आणि तो प्लॉट ताब्यात घेतला.

प्लॉट तर ताब्यात आला आता पुढचा टप्पा म्हणजे प्रेसचं बांधकाम. तो टप्पा अधिकच कठीण होता. एक तर प्लॉट घेताना आमच्याकडे साठवलेली गंगाजळी वापरून झालेली होती. त्यामुळे इमारत बांधायला पैशांची चणचण होतीच. त्यात त्या काळात सिमेंटचा तुटवडा होता आणि वेळेवर सिमेंट न मिळाल्याने रखडलेले अनेक प्रकल्प आम्ही पाहत होतो. यातील आर्थिक अडचण दूर झाली ती बँक ऑफ महाराष्ट्रने कर्ज दिल्यामुळे. मात्र आता कर्ज घेतलेलं असल्यानं बांधकाम लवकरात लवकर पूर्ण करून प्रेसचं काम सुरू करायला हवं याची जाणीव आम्हाला झाली. तेव्हा शासनाकडून परमिट देऊन सिमेंटचा कोटा दिला जात असे. सुदैवाने तत्कालीन मुख्यमंत्री ए. आर. अंतुलेजी यांच्याशी माझ्या वडिलांचे स्नेहसंबंध होते. त्यामुळे हे परमिट आम्हाला मिळणं सोपं गेलं. त्या काळात वरळीमध्ये शासनाचं स्मॉल स्केल इंडस्ट्रीजचं कार्यालय होतं. तिथून सिमेंटचा कोटा दिला जात असे. तिथे श्री. विठाळकर हे मुख्य अधिकारी होते. त्यांना कालनिर्णयबद्दल ममत्व होतं. त्यामुळे मग ते अनेकदा थोडा त्यांच्या अधिकाराचा फायदा घेऊन आम्हाला प्राधान्याने कोटा मंजूर करत असत. अशी मदत होत असल्याने आता लवकरच आपला स्वतःचा प्रेस बांधून पूर्ण होईल आणि कालनिर्णय स्वतःच्या मालकीच्या प्रेसमध्ये छापले जाईल अशी स्वप्ने आम्ही सगळेच पाहत होतो पण काही महिन्यात माझ्या लक्षात आलं की ज्या गतीनं सिमेंट मिळत आहे त्या गतीनं काम काही होत नाहीये. उलट कामाची गती जरा रेंगाळल्यासारखीच वाटत होती. मी माझी शंका माझ्या भावाला जयानंदला बोलून दाखवली.
आम्ही दोघांनी शोध घ्यायचं ठरवलं. आमच्या साईटला वेगवेगळ्या वेळी जाऊन भेट दिली. तिथल्या आजूबाजूच्या वस्तीमधील काही कामगारांशी आणि कोपर्‍यावरच्या पानवाल्याशी बोललो तेव्हा लक्षात आलं की ज्याला आम्ही बांधकामाचं कंत्राट दिलं आहे तोच लबाडी करत होता. आमच्या सरकारदरबारी असलेल्या कॉन्टॅक्ट्समुळे आम्हाला लवकर सिमेंट उपलब्ध होत होतं आणि हा कॉन्ट्रॅक्टर त्यातलं 30-40 टक्के सिमेंट परस्पर दामदुप्पट भावाने विकत होता. त्याला आमचं बांधकाम करण्यात तसा काहीच रस नव्हता. मात्र आमच्याकडे येणारं सिमेंट असं परस्पर ब्लॅकने विकून आयती मलई खायला मिळत होती म्हणून तो आमच्याशी गोड बोलून आणि अदबीने वागून काम चालवत होता. तसा आमचा एक खासगी रखवालदार आम्ही आमच्या साईटवर नेमलेला होता. रात्री उशिरा सगळीकडे सामसूम झाल्यावर कंत्राटदाराचे लोक येऊन आमच्या सिमेंटच्या साठ्यातील पोती गुपचुप घेऊन जातात अशी खबर आम्हाला लागली. आमचा प्लॉट एका छोटेखानी टेकडीच्या वरच्या भागात होता. इतर प्लॉट्सची बांधकामे तेव्हा सुरू झालेलीच नव्हती. खाली जवळपास ‘शांती नगर’ ही बसक्या घरांची वसाहत होती. तिथल्या काही स्थानिकांकडून आम्हाला या सिमेंट चोरीची खातरीशीर माहिती मिळाली. मग मी आणि थोरला भाऊ जयानंदने आमच्या साठ्यातलं चोरलेलं सिमेंट टेम्पोमधून कुठल्या बांधकाम साईटवर नेलं जातं याची वित्तंबातमी काढली. आता आमच्या कंत्राटदाराची चोरी रंगेहाथ पकडण्यासाठी आम्ही त्या काळातलं एक स्टिंग ऑपरेशनच केलं. मी बरोबरच्या झोळीत एक छोटासा टेपरेकॉर्डर घेऊन, मोटारसायकलवर जयानंदच्या मागे बसलो आणि आम्ही जिथे आमचं (चोरलेलं) सिमेंट ठेवलं होतं त्या बांधकाम साईटवर थडकलो. तिथल्या माणसाकडे ‘आम्हाला सिमेंट हवंय’ अशी बतावणी करून बोलणं केलं. ते सगळं बोलणं माझ्या झोळीतल्या टेपरेकॉर्डवर रेकॉर्ड करून घेतलं. हा सज्जड पुरावा घेऊन मग आम्ही आमच्या कंत्राटदाराला धरलं. आमच्याकडे रेकॉर्डेड संवाद असल्याने त्याला काही नाकारता येईना. पोलिसात देण्याची भीती घातली तेव्हा त्याने आमचं केलेलं नुकसान भरून द्यायची तयारी दाखवली. त्याच्याकडून भरपाई घेऊन आम्ही त्याला बदलून पार्ल्याला राहणार्‍या श्री. साने यांना काम दिलं. नंतर मात्र झपाट्यानं आमचं काम पूर्ण झालं. इमारत बांधून झाल्यावर लगेच आम्ही आमची मशिनरी आणून तिकडे इन्स्टॉल केली. कालनिर्णयच्या या प्रेसचं भाग्य म्हणजे इमारतीचे काम सुरू असताना बँक ऑफ महाराष्ट्रचे महाव्यवस्थापक पटवर्धनसाहेब तर काम बघायला येऊन गेलेच परंतु महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्व पु. ल. देशपांडे सुनिताबाईंसह कौतुकानं साळगांवकरांच्या प्रेसचं काम बघायला आले होते.
तर इमारत पूर्ण झाली. त्यात सगळी मशिनरीही लागली पण तरीही कालनिर्णयच्या छपाईचं काम काही सुरू होईना. का…? तर कोणत्याही छापखान्याचा प्राणवायू म्हणजे इलेक्ट्रिसिटी! विद्युत प्रवाहाचा आवश्यक त्या प्रमाणात आणि खंड न पडता पुरवठा असेल तर छापखान्यातील यंत्रे धडाडणार ना? पण आमच्या प्रेसला तोच होत नव्हता. म्हणजे दिवे-पंखे चालू होतील असा सप्लाय होता पण प्रेसची मशिनरी चालवण्यासाठी लागणारा विद्युत पुरवठा मात्र सुरू झालेला नव्हता. अंधेरी एम.आय.डी.सी.मधील वीज पुरवठा बॉम्बे सबर्बन इलेक्ट्रिसिटी सप्लाय कंपनीकडून होत असे. त्या कंपनीने आम्हाला सांगितलं की ‘तुम्हाला हवाय तसा वीज पुरवठा करण्यासाठी तुमच्या इथे सब स्टेशन बांधावे लागेल कारण तुमच्या आसपासच्या कोणत्याच प्लॉटवर विद्युत पुरवठा दिला जात नाहीये.’

आता यातली गोम अशी होती की आमच्या आसपासचे बहुतेक सगळे प्लॉट्स हे सरकार दरबारी ओळख असलेल्या धेंडांनी इन्व्हेस्टमेंट म्हणून घेऊन ठेवले होते. त्यांना स्वतःला तिथे काहीच सुरू करायचे नव्हते. आणखी काही वर्षांनी जागेचे भाव वाढल्यावर ते विकून फायदा मिळवायचा होता. त्यामुळे त्या कोणालाच सध्या तिथे विजेची गरज भासत नव्हती. बरं आमचा अर्ज आलेला असला तरीही आम्ही नडलेले आहोत हे पाहून बी.एस.इ.एस.मधल्या लोकांना आमच्याकडून मलिदा खायची हाव सुटली होती. त्यांनी तशी त्यांची मागणी आडून आडून सांगितली देखील मात्र त्यांना कोणत्याही परिस्थितीत असे पैसे खायला द्यायचे नाहीत हा आमच्या वडिलांचा निश्चय होता. या सगळ्यामुळे आम्हाला विद्युत पुरवठा होत नव्हता. त्यावर उपाय म्हणून आमच्या भूखंडामागे ‘अवधूत इंडस्ट्रिज’ म्हणून युनिट होते, त्या युनिटचे मालक श्री. परळीकर यांच्याशी आम्ही बोलणं केलं. त्यांनी त्यांच्याकडून सप्लाय द्यायचं मान्य केलं. अवधूतचं काम रोज साधारण दुपारी चार वाजता संपायचं. मग आम्ही त्यांच्याकडून सप्लाय घ्यायचो आणि आमचं काम सुरू करायचो ते दुसर्‍या दिवशी सकाळी सातपर्यंत. अशाप्रकारे त्यांच्याकडच्या वीज पुरवठ्यावर आमची प्रेस चालवायचो पण हे असं किती दिवस चालणार? आम्हाला आमचा हक्काचा वीज पुरवठा व्हायलाच हवा होता पण बी.एस.इ.एस. मधल्या झारीतल्या शुक्राचार्यांचा बंदोबस्त कसा करायचा ते कळत नव्हतं. त्याचवेळी आमच्या घरी माझ्या आईची एक लहानपणीची मैत्रीण – विनिता सामंत ही जेवायला आली होती. तेव्हा आम्ही सगळेच या नव्या प्रेसचं काम मार्गी लावण्याच्या विवंचनेत होतो त्यामुळे घरी कोण येतंय-जातंय याकडे माझं फारसं लक्ष नसायचं. तर नेमका मी घरी जेवायला होतो. जेवताना विनिता मावशीने विचारलं की ‘काय रे जयेंद्र, सध्या काय चाललंय तुझं?’

मग काय, मी आमची ‘नवीन प्रेसची कथा आणि बी. एस. इ. एस.च्या अडवणुकीची व्यथा’ सांगितली. त्यावर त्या म्हणाल्या ‘होय का? एक काम कर तू उद्या सकाळी 10.30 वाजता घाटकोपर, पंतनगरला ये माझ्या घरी. आपण जाऊया बी. एस. इ. एस.च्या कार्यालयात.’

मला अचानक परमेश्वर प्रसन्न झाल्यासारखं वाटलं. फायरब्रँड कामगार नेते डॉ. दत्ता सामंत यांच्या पत्नी विनिता सामंत या देखील चळवळीत सक्रिय होत्या, तितक्याच धडाकेबाज होत्या आणि त्या आमदारही होत्या. त्यांच्याकडे आमची केस गेली आहे म्हणजे आता काळजीच मिटली हे मी ओळखलं. तसंच झालं. दुसर्‍या दिवशी मी विनिता मावशीबरोबर बी. एस .इ. एस.च्या ऑफिसमध्ये गेलो. त्यांना आलेलं पाहिल्यावर त्यांना ओळखणारे अनेक जण उठून उभे राहिले. ‘काय काम काढलंत?’ म्हणून विचारायला आले पण तिकडे दुर्लक्ष करुन त्या ऑफिसच्या मध्यभागी जाऊन उभ्या राहिल्या आणि त्यांनी आपल्या तोंडाचा पट्टा सुरू केला. ‘हा जयेंद्र साळगांवकर, माझ्या मैत्रिणीचा मुलगा. याचा अंधेरी एम.आय.डी.सी.मध्ये प्रेस आहे. तुमचे लोक विनाकारण याची अडवणूक करत आहेत. जर सात दिवसात यांना सबस्टेशन बांधून सप्लाय दिला नाहीत ना तर माझ्याशी गाठ आहे हे लक्षात ठेवा.’
विनिता मावशीच्या या दरडावण्याचा योग्य तो परिणाम झाला. दुसर्‍याच दिवशी दोन-तीन ट्रक भरून सामान आणि माणसं आली. त्यांनी जलद गतीने काम करून पाच दिवसांच्या आत सबस्टेशन उभारून सुरूही करून दिलं. अखेर मार्गातले सगळे अडथळे दूर होऊन आमचा, साळगांवकरांचा, कालनिर्णयचा स्वतःचा प्रेस स्वतःच्या हक्काच्या विद्युत पुरवठ्यावर सुरू झाला. प्रेस सुरू करताना घडलेला सगळा घटनाक्रम मी आठवतो. आलेल्या अडचणी आणि मिळालेली मदत मी पाहतो तेव्हा ‘जर तुमचे इरादे नेक असतील तर परमेश्वर तुमच्या पाठीशी आहे याची खातरी बाळगा’ या वचनावरची माझी श्रद्धा दृढ होत जाते.

आमचा स्वतःचा प्रेस सुरू झाल्यानंतर ‘कालनिर्णय’चं काम अधिक शिस्तबद्ध, वेळापत्रकानुसार आणि अधिक अचूक होऊ लागलं. मात्र जानेवारीमध्ये कालनिर्णयच्या छपाईचा शेवटचा लॉट करून झाला की मग पुढे सहा-सात महिन्यांची गॅप असे. ‘कालनिर्णयच्या छपाईनंतर काय करायचं?’ हा प्रश्न मात्र आम्हाला कधी पडलाच नाही. कालनिर्णयमुळे आमची जी इमेज तयार झालेली होती, त्या जोरावर आमच्याकडे कामे चालत येत असत. राज्य शासनाच्या पाठ्यपुस्तक मंडळाकडे आम्ही अर्ज केला आणि त्यांचे मोठे काम आम्हाला सहज मिळाले. शालेय अभ्यासक्रमातले विषय आणि त्याची मराठी, हिंदी, इंग्रजी, गुजराथी अशा वेगवेगळ्या भाषांमधली पुस्तकं याचं गणित मांडलं तर हे काम किती मोठं होतं ते कळेल. माननीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यांशी आमचे घरगुती संबंध होते. त्यामुळे बाळासाहेबांनी ‘सामना’ वर्तमानपत्र सुरू केलं तेव्हा पहिली काही वर्षे (सामनाचा स्वतःचा प्रेस सुरू होईपर्यंत) ते कालनिर्णयच्याच प्रेसमध्येच छापले जात होते. दै. लोकसत्ता, दै. महाराष्ट्र टाइम्स ही वर्तमानपत्रे, त्यांच्या पुरवण्या देखील काही वर्षे आमच्या प्रेसमध्ये छापल्या जात असत. साप्ताहिक लोकप्रभा (जे नुकतेच अचानक बंद करण्यात आले!) जेव्हा ऐन भरात होते तेव्हा त्याच्या आठवड्याला 85000 प्रती विकल्या जायच्या आणि त्या कालनिर्णयच्याच मुद्रणालयात छापल्या जात असत. मी सतत कालनिर्णयचा प्रेस असा उल्लेख करत असलो तरी त्या आमच्या प्रेसचं नाव ‘सुमंगल आर्टेक’ असं आहे. मधल्या काळात तंत्रज्ञान आणखी पुढे गेलं. गॅली, लेटर प्रेस हे मागे पडलं आणि डिजिटल फोटो टाइप सेटिंग सुरू झालं.

सुरूवातीला या नव्या तंत्रज्ञानात एक मोठी उणीव होती. टाईप करताना चुकलेला शब्द प्रिंट होताना दुरूस्त करणं मोठं जिकिरीचं असे. त्यासाठी मजकुरातला चुकलेला शब्द कापून तिथे सुधारित शब्द चिकटवावा लागे. हे किचकट काम तेव्हा वरळीच्या ‘स्पेड्स’ या कंपनीत करून मिळे. या बदलत्या तंत्रज्ञानाचा विस्तार आणि आवाका बघून आम्ही आमचं युनिट आणखी अद्ययावत करण्याचा निर्णय घेतला आणि कॉम्प्युटर्स विकत घेऊन त्यावर कालनिर्णयचं डी. टी. पी. खातं सुरू केलं. या नव्या तंत्रज्ञानामुळे कट-पेस्ट ,पॉझिटिव्ह-निगेटिव्ह ही प्रक्रिया संपली पण आजही त्या जुन्या दिवसांची आणि तेव्हा घेतलेल्या परिश्रमांची आठवण आली की नकळत मनाला एक हुरहुर लागते. कालनिर्णयच्या सुरूवातीच्या दिवसातील म्हणजे जेव्हा वेगवेगळ्या प्रेसमध्ये छापून कालनिर्णयचे गठ्ठे आमच्याकडे दादरच्या ऑफिसवर यायचे तेव्हाची एक आठवण अशीच मनाला हळवं करते. हे असे छापलेल्या कालनिर्णयचे गठ्ठे आमच्या ऑफिसवर आले की ते उतरवून घ्यायला फार माणसं नसायची. मग आम्ही भावंडेच साखळी करून उभे राहायचो आणि झेलून गठ्ठे उतरवायचो. असे ते गठ्ठे झेलताना कालनिर्णयची वरची ती पत्र्याची पट्टी हमखास हातात खुपत असे आणि कातडी सोलली जायची. त्यातून रक्तही यायचे पण आम्हाला त्याचे काही वाटत नसे. आपल्या कालनिर्णयचं काम म्हणून आम्ही ते उत्साहाने, आनंदात करायचो.

1976 च्या दरम्यान एक जर्मन पर्यटक भारतात आला होता. तो भारतभर फिरला आणि या भटकंतीत त्याला जो भारत दिसला त्याबद्दल त्याने लेखन केलं. त्यात त्याने एका गोष्टीचा आवर्जून फोटोच छापला होता आणि त्यावर टिप्पणी केली होती की ‘भारतातील वेगवेगळ्या शहरांमधील अनेक घरांमध्ये मला ‘ही’ गोष्ट समान आढळली.’
‘ती’ समान गोष्ट होती ‘कालनिर्णय’.
अतिशय मोठ्या प्रमाणावर आणि समाजाच्या सगळ्या स्तरांवर पोहोचलेलं कालनिर्णय पाहून त्याला वाटलेलं आश्चर्य त्यानं कालनिर्णयचा फोटो छापून व्यक्त केलं होतं. 1973 मध्ये सुरू झालेल्या कालनिर्णयचा अवघ्या तीन वर्षातला प्रसार, तो ही एका परदेशी व्यक्तिनं टिपलेला, हेच सांगत होता की कालनिर्णय सर्वात लोकप्रिय दिनदर्शिका आहे. गेल्या पन्नास वर्षांमध्ये कालनिर्णयने आपली लोकप्रियता वेगवेगळ्या कसोट्यांवर कायम सिद्ध केली आहे. पूर्वी माझ्या वडिलांना आणि आता मलाही अनेकदा एक प्रश्न नेहमी विचारला जातो की ‘कालनिर्णयच्या यशाचं रहस्य नेमकं कशात दडलेलं आहे?’
या प्रश्नाचं उत्तर म्हटलं तर अगदी सोपं आहे की ‘अत्यंत अभिनव, अनोख्या, नावीन्यपूर्ण कल्पनेत कालनिर्णयच यश सामावलेलं आहे.’

पण मग अशा अभिनव कल्पना अनेकांना सुचतात. काहीजण त्या प्रत्यक्षातही आणून बघतात. तरीही असं यश मिळतंच असं नाही. खरंतर नाहीच मिळत. मग आम्ही साळगांवकर ज्या पंचांगाचा आणि ज्योतिषाचा अभ्यास करत आलो आहोत त्याचा आधार घेऊन सांगायचं तर ‘कालनिर्णयची कल्पना जयंतराव साळगांवकरांना एका अशा क्षणी सुचली जेव्हा त्यांच्या कुंडलीतले सगळे शुभ ग्रह उच्चीचे होते.’

यावर कदाचित कोणाला वाटेल की हे फारच ‘डिप्लोमॅटिक’ उत्तर झालं पण मला काय म्हणायचंय ते नीट समजून घ्या. मी आमच्या वडिलांच्या कुंडलीतले शुभ ग्रह म्हणतोय, ते ज्योतिषाच्या पत्रिकेतील नाही तर माझ्या वडिलांनी त्यांच्या स्निग्ध स्वभावाने, आपुलकीच्या वागण्याने आणि स्नेहमय संबंधांनी ज्यांच्या ज्यांच्याशी जिव्हाळ्याचं नातं जोडलं होतं अशा दिग्गज कलाकार, साहित्यिकांविषयी मी बोलतो आहे. ‘जोडोनिया धन उत्तम व्यवहारे, उदास विचारे वेंच करी’ हाच माझ्या वडिलांचा बाणा होता. त्यामुळे जयंतरावांनी नेहमीच अनेक सांस्कृतिक, साहित्यिक उपक्रमांना, कार्यक्रमांना सहकार्य दिलं. त्यामुळे अनेक लेखक, संपादक, चित्रकार, यांच्याशी त्यांचे मैत्रीचे संबंध होते. हे सगळे संबंध कालनिर्णय सुरू केल्यावर उपयोगाला आले. अच्युत बर्वेंसारखा जाहिरातींच्या जगातला दीर्घ अनुभव असलेला माणूस असो किंवा अरूण टिकेकरांसारखा साक्षेपी संपादक, गोविंदराव तळवलकरांसारखा व्यासंगी संपादक असो, कुसुमाग्रज, पु. ल., शांताबाई शेळके, जयवंत दळवी असे साहित्यिक असोत किंवा भीष्मराज बाम, सदाशिव निंबाळकर, विठ्ठल प्रभू, दत्तप्रसाद दाभोलकर अशी आपापल्या क्षेत्रातील कर्तृत्वसंपन्न लेखक व्यक्तिमत्व असोत… ही सगळी माणसं माझ्या वडिलांनी त्यांच्या प्रेमाने कमावलेली होती आणि म्हणूनच दिनदर्शिकेच्या मागच्या पानावर लिहायला हे सगळे तयार झाले आणि त्यामुळेच ‘कालनिर्णय’ हे ‘कालनिर्णय’ बनलं.

सर्वसाधारणपणे कोणत्याही दिनदर्शिकेचा उपयोग तारीख, तिथी वगैरे बघण्यापुरता असतो. त्यात कालनिर्णयच्या पूर्वी तर दिनदर्शिकेच्या मागच्या पानाला काही किंमतच नव्हती. ती किंमत कालनिर्णयने प्राप्त करून दिली. सुरूवातीला या मागच्या पानांवर लोकांना उपयोगी पडेल असा म्हणजेच-स्वयंपाक घरातील काही सूचना, हे करून पाहा, पाककला – असा मजकूर द्यायचा अशी कल्पना होती. या उपयुक्ततेला थोडी विरंगुळ्याची जोड द्यावी म्हणून मग काही ललित, विनोदी लेखही द्यायला सुरूवात झाली आणि हा मजकूर लिहिणार्‍या लेखकांमुळे कालनिर्णयच्या मागच्या पानाला पुढच्या पानाइतकंच महत्त्व प्राप्त झालं. त्यामुळे कालनिर्णयचं यश हे असं ‘जमून’ आलेलं यश आहे. एक नक्की हा जमून आलेला फॉर्म्युला इतका तगडा होता आणि त्यातील आवश्यक घटकांचं प्रमाण पुढेही कायम राखण्यात आम्ही यशस्वी झाल्यानेच कालनिर्णयचा ‘फॉर्म’ गेली पन्नास वर्षे टिकलेला पाहायला मिळतो.

मराठी साहित्याचा इतिहास बघितला तर पन्नास वर्षे सातत्याने सुरू राहिलेल्या नियतकालिकांची संख्या अगदीच कमी आढळेल. मात्र साहित्याची पाठराखण घेऊन वाटचाल करणारे कालनिर्णय ‘नॉट आऊट पन्नास’ म्हणून पुढे जात आहे ते जयंतरावांशी असलेल्या मैत्रीपूर्ण संबंधांमुळेच!

कालनिर्णयच्या मागच्या पानावर वि. वा. शिरवाडकर, पु. ल. देशपांडे, शांता शेळके, जयवंत दळवी, गंगाधर गाडगीळ, व. पु. काळे, अशोक नायगांवकर अशा मोठमोठ्या साहित्यिकांनी भरभरून लेखन केलं आणि कालनिर्णयच्या मागच्या पानाला एक साहित्यिक दर्जा प्राप्त झाला. मंगला बर्वे यांच्या संसाराबाबतच्या टिप्स असोत किंवा कमला सोहनी यांच्या आहाराबाबतच्या सूचना असोत कालनिर्णयच्या मागच्या पानावर जणू विविध उपयुक्त माहितीचे संमेलनच भरलेलं पाहायला मिळतं. मला आठवतंय एकदा माझ्या समोरच पु.लं.ना कोणीतरी (आता कोणी ते नाव सांगत नाही!) विचारलं की ‘काय भाई, तुम्ही आता कालनिर्णयच्या मागे पण लिहिता? एकदम दिनदर्शिकेच्या मागे काय लिहायला लागलात?’
त्या व्यक्तिचा हेटाळणीचा सूर ओळखून पु. ल. शांतपणे म्हणाले, ‘कालनिर्णयच्या मागे का लिहित माहितेय का? तुम्हाला पेरू माहीत असेल ना? नाही, मी फळाबद्दल नाही बोलत. पेरू जसं फळ आहे तसाच तो दक्षिण अमेरिकेतला देशही आहे. तर त्या पेरू देशात जे मराठी लोक राहातात ना त्यांच्या घरी सुद्धा कालनिर्णयच असतं. म्हणून मी कालनिर्णयच्या मागच्या पानावर लिहितो कारण माझं लिखाण जगभरातल्या मराठी माणसांपर्यंत जातं.’


कालनिर्णयच्या मागच्या पानावरील याच साहित्याचे संकलन-संपादन करुन ‘कालनिर्णय निवडक’ हा संग्रह प्रकाशित करण्यात आला. दिनदर्शिकेतील मजकूरांचा संग्रह हा देखील आणखी एक विक्रम म्हणावा लागेल. कालनिर्णयचे चाहते मला वेगवेगळ्या क्षेत्रात नेहमी भेटत आले आहेत. पूर्वी एकदा काँग्रेसचे नेते स्व. मुरली देवरा मला एका कार्यक्रमात भेटले तेव्हा म्हणाले होते की ‘अरे जयेंद्र तुमचं कालनिर्णय माझ्या घरात आणि ऑफिसात तर असतंच पण माझ्या बाथरूममध्येही असतं. कधी कधी काय होतं की बाथरूममध्ये असताना कोणाचा तरी अर्जंट फोन येतो. त्याला माझी एखादी तारीख हवी असते. मग तिथेच बघून सांगता यावं म्हणून एक कालनिर्णय मी तिकडेसुद्धा लावून ठेवलं आहे.’
आपले माजी केंद्रिय पर्यावरण मंत्री सुहासजी जावडेकर यांनी तर मला सांगितलं की ‘अहो साळगांवकर, माझ्याकडे गेल्या पंचवीस वर्षांची कालनिर्णय जपून ठेवलेली आहेत.’
मला कळेना की त्यांनी गेल्या 25 वर्षातली कालनिर्णय का जपली आहेत! तर ते म्हणाले ‘अहो त्यावर माझे सगळे दौरे, सभा, कुठल्या विषयावर सभा-परिसंवाद झाले त्याच्या नोंदी तसेच सार्वजनिक कार्यक्रमांच्या नोंदी आहेत. एखाद्या संदर्भ डायरीप्रमाणे वेळोवेळी रेफरन्सेस मिळतात मला त्यातून म्हणून जपून ठेवली आहेत…’

गेल्या पन्नास वर्षांमध्ये कालनिर्णयने नक्कीच मोठी मजल मारली आहे. एका प्रादेशिक भाषेत सुरू झालेल्या दिनदर्शिकेचा हा प्रवास खरोखरच थक्क करणारा आहे. मराठी कालनिर्णयला यश मिळाल्यानंतर आम्ही हिंदी, इंग्रजी, गुजराथी कालनिर्णयच्या आवृत्त्या सुरू केल्या. मुंबईसारख्या बहुभाषिक शहराची ती गरज होती. त्या आवृत्यांना तर उत्तम प्रतिसाद मिळालाच परंतु कन्नड, तेलगू, तमिळ भाषकांकडूनही कालनिर्णयची – त्यांच्या भाषेतल्या कालनिर्णयची मागणी सुरू झाली. मग ती पूर्ण करणं क्रमप्राप्तच होतं पण त्यामुळेच आम्ही महाराष्ट्राबाहेर पोहोचलो. या बहुभाषिक आवृत्त्यामध्ये आम्ही काही काळ बंगाली आणि मल्याळम भाषेतील कालनिर्णयही काढत होतो. म्हणजे तेव्हा एकाचवेळी मराठी, इंग्रजी, हिंदी, गुजराथी, कन्नड, तेलगू, तमिळ, बंगाली, मल्याळम अशा नऊ भारतीय भाषांमध्ये कालनिर्णय प्रकाशित होत होते. हा खरोखरच जागतिक विक्रम आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मराठीखेरिज अन्य सगळ्या भाषांमधील कालनिर्णय हे मराठी कालनिर्णयची अनुवादित रूपे नाहीत तर त्या त्या संस्कृतीप्रमाणे आवृत्त्या तयार करण्यात येतात आणि मागील पानावरील साहित्य हे त्या त्या भाषेतील साहित्यिकांकडून लिहून घेतलेले असते. एका वर्षी या नऊ भाषांमधील कालनिर्णयाच्या प्रकाशनाचा मोठा सोहळा करण्याचं आम्ही ठरवलं. या नऊ कालनिर्णयांचे प्रकाशन करण्यासाठी माझ्या वडिलांनी हिंदीमधले ख्यातनाम साहित्यिक, धर्मयुगचे संपादक पद्मश्री स्व. धर्मवीर भारती यांना आमंत्रित केले. त्यांच्या हस्ते हा प्रकाशन सोहळा वरळी येथील नेहरू सेंटरमध्ये झाला. खरंतर धर्मवीर भारती हे तसे कुठल्याच अशा कार्यक्रमांना जात नसत पण आमच्या वडिलांशी त्यांचे असलेले घनिष्ठ संबंध आणि ‘कालनिर्णय’वरील त्यांचे प्रेम यामुळेच त्यांनी आमच्या या कार्यक्रमाला येण्याचं मान्य केलं. या निमित्ताने सलग नऊ दिवस, नऊ राज्यांची लोककला सादर करणारे कर्यक्रम नेहरू सेंटरच्या सहयोगाने करण्यात आले. नवव्या दिवशी नऊ भाषांमधील कालनिर्णयांचा प्रकाशन सोहळा झाला. या कार्यक्रमाला धर्मवीर भारती आले. त्यामागचं त्यांनी आम्हाला सांगितलेलं कारण असं होतं की ‘कालनिर्णयचे साळगावकर सगळा शास्त्रार्थ अभ्यासपूर्वक सांगतात पण ते कधीही कोणत्याही व्रतवैकल्याचा पुरस्कार करत नाहीत. व्रतांचे अवडंबर माजवून त्यातून स्वतःचा आर्थिक लाभ साधत नाहीत.’

सध्या कालनिर्णय मराठी, हिंदी, इंग्रजी, गुजराथी, तेलगू, कन्नड, तमिळ भाषेतही छापलं जातं. मला वाटतं हा देखील एक विक्रमच असावा. या सगळ्या आवृत्त्यांबरोबरच महाराष्ट्रासाठी देखील आम्हाला चार वेगवेगळ्या आवृत्त्या कराव्या लागतात. शहरांचे भौगोलिक स्थान बदलते, अक्षांश-रेखांश बदलतात त्याप्रमाणे सूर्योदयाची वेळ, चंद्रोदयाची वेळ थोडी थोडी बदलते. मग कालनिर्णयमध्ये शास्त्रार्थ अचूक असायलाच हवा म्हणून आम्ही नागपूर, मध्य महाराष्ट्र, कोकण आणि मुंबई अशा मराठी कालनिर्णयच्या वेगवेगळ्या आवृत्त्या प्रकाशित करायला सुरूवात केली. त्याचबरोबर दृष्टीहिनांसाठी कालनिर्णयची खास ‘ब्रेल’ आवृतीही आम्ही काढत होतो.
कालनिर्णयची सुरूवात झाली ती घरात, त्यातही स्वयंपाकघरातील भिंतीवर लावायची दिनदर्शिका पंचांग म्हणून! कारण तोपर्यंतच्या कॅलेंडर्सचा उपयोग तसाच केला जात होता. घरातल्या महिलेला संकष्टी कधी आहे, एकादशी कधी आहे हे कळावे, दुधवाल्याचा नाही तर कामवाल्या बाईचा खाडा लिहिता यावा इतकाच मर्यादित उपयोग केला जात असे कारण त्या सगळ्या कॅलेंडर्सचा आवाका तितकाच होता पण कालनिर्णयने मात्र आरंभापासून आपलं अस्तित्व एक परिपूर्ण दिनदर्शिका पंचांग म्हणूनच ग्राहकांच्या मनावर ठसवलं होतं. त्यामुळेच कालनिर्णय फक्त स्वयंपाकघरातील भिंतीपुरतं मर्यादित राहिलं नाही. कालनिर्णयच्या घराबाहेर रूळलेल्या, लोकप्रिय झालेल्या आवृत्त्या म्हणजे ‘कार कालनिर्णय’ आणि ‘ऑफिस कालनिर्णय’. या दोन्ही आवृत्त्या कशा जन्माला आल्या त्याची कथाही रंगतदार आहे. ते बहुदा 97 साल असावं. तेव्हा माझा थोरला भाऊ जयानंद याची मारूती 118 एन इ ही कार होती. तो आपल्या कारमध्ये कालनिर्णयचे लहान आकाराचे प्रिंटआऊट काढून आरशाखाली टांगायचा. त्यावर त्याच्या वैयक्तिक नोंदी असायच्या. आठवणीसाठी तारखांना खुणा केलेल्या असायच्या. ते पाहून मला वाटलं की जयानंद जसा कालनिर्णयचा उपयोग करतो आहे तसा अनेकांना होऊ शकेल. मी आमच्या कुटुंबात ही कल्पना मांडली की आपण कालनिर्णयची ‘कार’ आवृत्ती सुरू करुयात, तिलाही नक्की उत्तम प्रतिसाद मिळेल पण का कोण जाणे अन्य कोणालाच माझी ही कल्पना तितकीशी पटली नाही. त्यामुळे अशी छोट्या आकाराची कालनिर्णय आवृत्ती छापायला अनुकुलता दर्शविली नाही पण माझा माझ्या कल्पनेवर आणि त्याहीपेक्षा कालनिर्णयच्या उपयुक्ततेवर जास्त विश्वास होता. मी माझ्या एका मित्राला सहज ही कल्पना बोलून दाखवली. तो नेमका प्रिंटिंग प्रेसवाला होता. त्याला ही कल्पना इतकी आवडली की त्याने ट्रायलसाठी म्हणून मला हव्या त्या छोट्या आकाराची 5000 कार कालनिर्णय चक्क मोफत छापून दिली. मग मीही चंग बांधला की कार कालनिर्णय लोकांपर्यंत पोहोचवायचंच.
दुसर्‍या दिवशीपासून मी घरातून निघताना सोबत कार कालनिर्णयचा एक गठ्ठा घेऊनच निघत असे. दर सिग्नलला थांबलेल्या टॅक्सीवाल्यांना, कारवाल्यांना, ओळखीच्या लोकांना एक एक कार कालनिर्णय देत असे. अनेकांनी तिथेच त्या स्पेशल आवृत्तीचं कौतुकही केलं. नंतर पुढच्या वर्षीपासून ‘कार कालनिर्णय’च्या ऑर्डर्स यायला सुरूवात झाली.विक्रेत्यांकडूनच विचारणा आली की ‘अहो गेल्या वर्षी तुम्ही ते कारमध्ये लावायचं छोटं कालनिर्णय काढलं होतं ना? ते आम्हाला का दिलं नाहीत? यावेळी ते हवंय.’

मग काय! त्या वर्षी साधारण पंधरा हजार कार कालनिर्णय छापली आणि सगळी हातोहात खपली. हळूहळू त्यांची मागणी वाढतच गेली कारण फक्त कारमध्येच नव्हे तर बायकांच्या हँडपर्स किंवा ऑफिसबॅगमध्येही ते आरामात मावते. विशेषतः किटी पार्टीजना महिलांना कार कालनिर्णय याच कारणासाठी सोयीचे पडते. पुढच्या मिटींगची, पार्टीची तारीख ठरवण्यासाठी हाताशी पटकन कालनिर्णय असेल तर लगेच ठरवता येते. आता जरी कालनिर्णयचे अ‍ॅप आलेले असले तरीही आजही कार कालनिर्णयची उपयुक्तता आणि म्हणून मागणीही कमी झालेली नाही. त्यावर वैयक्तिक नोंदी करणे सोपे आणि सोयीचे असल्याने लोक तेच वापरताना दिसतात. म्हणून तर आता कार कालनिर्णयच्या काही लाख प्रती छापाव्या लागतात. शिवाय मराठी बरोबरच हिंदी, इंग्रजी, गुजराथी आवृत्याही निघतात. आजही कोणत्याही शहरात मी टॅक्सित बसलो आणि ड्रायव्हरच्या समोरच्या आरशाखाली कार कालनिर्णय लटकताना पाहिलं की मला अतीव आनंद आणि समाधान मिळते.

नेहमीच्या आकारापेक्षा लहान आकाराची कालनिर्णयची कार आवृत्ती जशी लोकप्रिय आहे तशीच नेहमीच्या आकारापेक्षा दुपटीहून मोठ्या आकाराची ‘ऑफिस कालनिर्णय आवृत्ती’ देखील लोकप्रिय आहे. या ऑफिस आवृत्तीचा जन्मही असाच जयानंदच्या एका कल्पनेतून झाला आहे. विक्रेत्यांच्या स्टॉलवर कालनिर्णय उपलब्ध आहे हे दूरवरूनच ग्राहकांना कळावे म्हणून जयानंदने एक शक्कल लढवली. त्याने कालनिर्णयच्या जानेवारी महिन्याचे पान मोठ्या म्हणजे जवळपास अडीच पट आकारात छापून ते विक्रेत्यांना द्यायला सुरूवात केली. स्टॉलवर लटकवलेलं असं मोठ्ठ कालनिर्णयचं पान पाहून ग्राहकांना लांबूनच कळायचं आणि अनेकांना आठवणही व्हायची की आपल्याला कालनिर्णय घ्यायचं आहे पण नंतर ग्राहकांनीच विचारायला सुरूवात केली की ‘असं मोठ्या आकाराचं, बारा महिन्यांचं कालनिर्णयच मिळेल का? ऑफिसमध्ये लावायला हवंय’ विक्रेत्यांनी ही मागणी आमच्या कानावर घातली आणि मग ‘ऑफिस कालनिर्णय’चा जन्म झाला. जाहिरातींसाठी म्हणून जी संकल्पना वापरली होती, त्यातून एका आगळ्या आकाराच्या आवृत्तीचा उगम झाला आणि कालनिर्णयची उपयुक्तता आणखी अधोरेखित झाली. आता आम्ही ही ‘ऑफिस कालनिर्णय’ आवृत्ती दोन भाषांमध्ये छापतो. अनेक कंपन्या, बँका, न्यायालयांमध्ये तुम्हाला ही मोठी ऑफिस आवृत्ती हमखास बघायला मिळेल.

एक आवर्जून सांगायची बाब म्हणजे मराठी आणि हिंदी आवृत्तीमधला फरक हा फक्त भाषेचाच नसतो तर महिन्यांचा असतो. हिंदी भाषिक पट्ट्यामध्ये जी कालगणना केली जाते ती महाराष्ट्रापेक्षा वेगळी असते. आपल्याकडे मराठी कालगणनेमध्ये महिना हा अमावास्येला संपतो तर हिंदी भाषिक पट्ट्यात महिना हा पौर्णिमांत असतो. म्हणजे पौर्णिमेला संपतो. साहजिकच त्यांचे आणि आपले बरेचसे सण जरी सारखे असले तरी महिने वेगवेगळ्या दिवशी सुरू होतात. अनेकांना याची कल्पना नसते आणि मग भलताच गोंधळ उडतो. एकदा आमची हिंदी आवृत्ती जेव्हा नवीन होती तेव्हा असा गोंधळ उडाला होता. एका ग्राहकाने चुकून मराठी ऐवजी हिंदी कालनिर्णय विकत घेतलं आणि त्यातील महिने बघताना त्यांचा काही मेळ बसेना. त्यामुळे आपण विकत आणलेलं कालनिर्णयच चुकीचं आहे आणि आपली फसवणूक झाली आहे असा ग्रह त्यांनी करून घेतला. मग कुठून तरी माझा फोन नंबर मिळवून त्यांनी फोन केला. तेव्हा मोबाईल नव्हते. फोन माझ्या घरचा होता. तो माझ्या मुलीने उचलला. या गृहस्थाने तिला फोनवरच सुनवायला सुरूवात केली की ‘तुम्ही ग्राहकांना फसवता, चुकीचं कॅलेंडर छापून विकताय. मी वकील आहे, मी तुमच्यावर केस टाकेन’ वगैरे वगैरे.

माझी मुलगी बिचारी या सरबत्तीने घाबरली. तिने सांगितलं की ‘बाबा आत्ता घरी नाहीत, तुमचा नंबर देऊन ठेवा, आले की त्यांना फोन करायला सांगते.’
मग मी आल्यावर तिने मला सगळा प्रकार सांगितला. माझ्या लगेच लक्षात आलं की काय घोटाळा आहे तो. मी त्या वकील महाशयांना फोन केला आणि विचारलं की ‘साहेब तुमच्या कालनिर्णयवर महिन्याचं नाव ‘जानेवारी’ असं आहे का ‘जनवरी’ असं आहे ते बघून सांगाल का?’
त्यांनी बघितलं आणि सांगितलं की ‘जनवरी’ आहे. वर म्हणाले ‘बघा म्हणजे तिथे पण तुम्ही चूक केलीय.’
मी त्यांना अडवलं आणि सांगितलं, ‘साहेब चूक तर तुमच्याकडून झाली आहे. तुम्ही चुकून मराठीऐवजी हिंदी कालनिर्णय विकत घेतलं आहे आणि त्यामुळे त्यातली माहिती चुकीची वाटतेय.’
मग त्यांना मराठी पंचांग आणि हिंदी पंचांग यातील फरक समजावून सांगितला. तसं त्यांच्या लक्षात आलं की दुकानदाराने दिलेलं कालनिर्णय हिंदी का मराठी हे न तपासताच ते घेऊन आले होते. कालनिर्णय चुकीचं नव्हतं पण ते त्यांच्यासाठी बनलंच नव्हतं. काय घोटाळा झालाय हे कळल्यावर ते वरमले आणि फोन ठेवताना त्यांनी चक्क माझी माफी ही मागितली. दिनदर्शिकेवर दिलेला शास्त्रार्थ थोडा त्रोटक असतो, सर्वसामान्यांच्या उपयोगाची माहिती फक्त त्यात दिलेली असते पण अनेकांना अधिक तपशील हवे असतात. 1989च्या दरम्यान श्री. विद्याधर करंदीकर हे कालनिर्णयशी जोडले गेले. कालनिर्णय पंचागासाठी ते काम बघतात. आता त्यांची ओळख कालनिर्णयचे करंदीकर अशीच आहे.
कालनिर्णयच्या कार किंवा ऑफिससारख्या वेगवेगळ्या आकाराच्या आवृत्या जशा आम्ही केल्या, त्याचबरोबर वेगवेगळ्या भाषेतही कालनिर्णय नेलं. तसंच बदलत्या काळाची पावलं ओळखून आम्ही कालनिर्णय डिजिटल जगातही नेलं आहे. कालनिर्णयचं अ‍ॅप आता अनेक जण वापरतात. मात्र हे माध्यमांतर सोपं नव्हतं. 2011 मध्ये आम्ही नव्या काळाला अनुसरून डिजिटल स्वरूपात कालनिर्णय उपलब्ध करून द्यायचं ठरवलं. कालनिर्णयचं अ‍ॅप बनवून ते ग्राहकांसाठी उपलब्ध करून देताना सुरूवातीला ते फक्त अ‍ॅपल फोनसाठी बनवण्याचा निर्णय घेण्यात आला. तेव्हा एका अमेरिकन डॉलरचा दर 50-55 भारतीय रूपये इतका होता. मग कालनिर्णयच्या अ‍ॅपची किंमत पण तेवढीच ठेवण्यात आली पण आम्हाला अपेक्षित होता तितका प्रतिसाद काही मिळाला नाही. जेमतेम पाच हजारसुद्धा डाउनलोड झाले नाहीत. लाखांच्या घरात विकल्या जाणार्‍या कालनिर्णय अ‍ॅपला इतका अल्प प्रतिसाद? तर तेव्हा आमच्या प्रतिस्पर्धी कॅलेंडरने त्यांचं अ‍ॅप मोफत डाउनलोड पद्धतीने उपलब्ध करून दिलं होतं. साहजिकच मोफतला जास्त प्रतिसाद मिळाला आणि त्यांनी काही लाखाचा टप्पा पार केला. मी माझ्या मोठ्या भावाशी याबाबत चर्चा केली की ‘असं का झालं असावं? त्यांना जर मोफत अ‍ॅप द्यायला परवडतंय तर आपल्याला का परवडत नाही?’
त्यावर त्याने त्यात काही तांत्रिक, काही आर्थिक अडचणी असल्याचं मला सांगितलं. अडचणी म्हटलं की मला जरा जोरच येतो. आजपर्यंत इतके अडथळे, अडचणी पार करत करत तर हा टप्पा गाठला आहे. मी त्याला सांगितलं की ‘जर मला कालनिर्णयच्या अ‍ॅपचं स्वामित्व देत असशील तर मी या अडचणी दूर करून कालनिर्णयला डिजिटल जगातही त्याचं स्थान मिळवून देईन.’
त्याने मला अ‍ॅपचं स्वामित्व दिलं. मग मी माझ्या मुलाच्या समर्थच्या मदतीने त्यावर काम सुरू केलं. मोठी अडचण ही होती की आधीचे कालनिर्णय अ‍ॅपचे डाउनलोड नगण्य असल्याने आम्हाला जाहिराती मिळेनात आणि जाहिरातींचा आधार नसेल तर फ्री डाउनलोड ठेवायला परवडणार नाही! पण एका मित्राच्या मदतीने ‘ओरा’ या ज्वेलर्स कंपनीची मोठी जाहिरात मिळवली आणि आम्हाला 2014चं कालनिर्णय अ‍ॅप फ्री टू डाउनलोड देता आलं. त्यामुळे मग मुद्रित कालनिर्णयप्रमाणेच डिजिटल कालनिर्णयनेही लाखाचा टप्पा ओलांडला आणि नव्या जगातही कालनिर्णयची नाममुद्रा उमटली. त्यानंतर आता कालनिर्णय अ‍ॅप फ्री टू डाउनलोड तत्त्वावर, चार भाषांमध्ये उपलब्ध आहे आणि जगभरातील लोक त्याचा लाभ घेतात. आता कालनिर्णयच्या डाउनलोडस्चा आकडा 1 कोटी 40 लाखांच्या वर गेला आहे. वर्तमानपत्रात याची बातमीही झळकली होती. कालनिर्णयचा हा नवा प्रवास माझ्या मुलाच्या समर्थच्या मदतीनेच शक्य झाला. मुख्य म्हणजे कालनिर्णय अ‍ॅप आल्यावरही मुद्रित कालनिर्णयच्या खपावर त्याचा काहीही परिणाम झालेला नाही. एक तर दोन्हीची उपयुक्तता वेगवेगळी आहे. ग्राहक आपापल्या गरजेप्रमाणे हवी ती आवृत्ती वापरतात. ज्यांच्या मोबाईलमध्ये कालनिर्णय अ‍ॅप आहे त्यांच्या घरातल्या भिंतीवरचं कालनिर्णयचं स्थान अबाधित आहेच. त्यामुळे मी आणि समर्थ आम्ही दोघेही याबाबतीत अशी खातरी बाळगून आहोत की कालनिर्णयचं ते स्थान कधीही ढळणार नाही.

आता एखादं उत्पादन लोकप्रिय झालेलं आहे का? हे कसं ओळखायचं? तर जेव्हा त्या उत्पादनाची नक्कल बाजारात येते, डुप्लिकेट माल विक्रीला येतो तेव्हा समजायचं की ते उत्पादन नक्कीच भरपूर लोकप्रिय आहे. या निकषावर तर कालनिर्णयने लोकप्रियतेचे सगळे मापदंड ओलांडले आहेत. पहिल्या काही वर्षांमध्येच कालनिर्णयचा खप पाहून महाराष्ट्रातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये कालनिर्णयची नक्कल व्हायला सुरूवात झाली. म्हणजे कालनिर्णयसारखी रंगसंगती वापरायची, पुढच्या पानाचं डिझाईन अगदी कालनिर्णयसारखं करायचं. इतकंच नव्हे तर पानामागे मजकूरही त्याच धर्तीचा पण वेगळ्या लोकांकडून लिहून द्यायचा असे प्रकार सुरू झाले. आता शेवटी अस्सल ते अस्सल आणि नक्कल ती नक्कल! कितीही आव आणला तरी अस्सल कालनिर्णयची सर कशी येईल! शिवाय आम्ही आमच्याकडून खबरदारी घेऊ लागलो. सगळ्या पानांना एकत्र बांधणारी जी पत्र्याची पट्टी असते तिच्यावरच आम्ही ‘कालनिर्णय’असं छापून घेतलं. शिवाय पानं पलटण्यासाठी रेडिमेड भोक द्यायला सुरूवात केली. कालनिर्णय अडकवण्यासाठी जी रिबीन वापरली जायची ती वेगळ्या प्रकारची बनवून घेऊ लागलो पण आम्हाला सर्वात मोठा त्रास झाला तो ‘डुप्लिकेट छपाई’ करून विकणार्‍यांकडून. आता जशी लोकप्रिय पुस्तके ऑफसेट झेरॉक्स करून निम्म्या किंमतीला सिग्नलवर विकायला येतात तशा ‘कालनिर्णय’च्या पायरेटेड कॉपीज मार्केटमध्ये अवतरल्या. मग मात्र आम्ही पोलिसात तक्रार करून या डुप्लिकेट कॉपी बनवणार्‍यांचा माग काढला तर दिल्लीमधून त्या येत असल्याचं लक्षात आलं. मग कायदेशीर कारवाई करून त्यांना पायबंद घातला. पुढे आम्ही कालनिर्णयची वेबसाइट तयार केली तर तिच्याही बोगस आवृत्त्या निघाल्या. या प्रकारालाही आम्ही आळा घातला.
कालनिर्णयने या सगळ्याला टक्कर देऊन आपलं स्थान अबाधित का राखलं आहे? तर आम्ही आमचं ग्राहककेंद्री धोरण कधीही बदललं नाही. कालनिर्णयची लोकप्रियता पाहून आमच्याकडे जाहिरातीचे, को-ब्रँडिंगचे वेगवेगळे प्रस्ताव येत असतात. मात्र आम्ही कायम त्यातून मिळणार्‍या फायद्यापेक्षा आमच्या ग्राहकांचा विचार आधी करतो. काही वर्षांपूर्वीची गोष्ट. ‘बिग बझार’चे किशोर बियानी यांची माझी चांगली ओळख आहे. त्यांची मुलगी मला भेटायला आमच्या ऑफिसला आली. तिने कालनिर्णय आणि बिग बझारच्या टाय-अपची एक कल्पना मांडली. बिग बझारचा दर आठवड्यात बुधवारी मोठा सेल असतो तर तिला त्याचसंदर्भात कालनिर्णयबरोबर अ‍ॅड कॅम्पेन करायची होती. कालनिर्णयच्या प्रत्येक महिन्यातले सगळे मंगळवार तिला हवे होते. दर मंगळवारी तारखेच्या चौकोनात ‘बिग बझार’ हे छापून लोकांना उद्याच्या-म्हणजे बुधवारच्या सेलची आठवण करून द्यायची अशी कल्पना होती. त्यासाठी तिने वर्षाचे बावन्न मंगळवार बुक करायचे म्हणून आम्हाला बावन्न लाखांची ऑफर दिली. मी तिला सांगितले की ‘आमच्या धोरणानुसार जाहिराती या डेट पॅड म्हणजे तारखांचा भाग सोडूनच आम्ही घेतो. आमच्या ग्राहकांसाठी तारखेचा चौकोन अतिशय महत्त्वाचा असतो. तिथे जाहिरात छापून आम्ही ग्राहकाला नाराज करणार नाही.’
त्यावर तिने तिची ऑफर वाढवत वाढवत 75 लाखांपर्यंत नेली मात्र मीही ठामपणेच तिला सांगितलं की ‘केवळ जास्त पैसे मिळतात म्हणून आम्ही आमचं धोरण बदलणार नाही कारण ते आमच्या ग्राहकांशी निगडित आहे.’
शेवटी नाईलाजाने ती परत गेली.

कालनिर्णयच्या या प्रवासातील एका टप्प्याचा मला आवर्जून उल्लेख करावासा वाटतो. माझ्या वडिलांना सदैव सांस्कृतिक-साहित्यिक क्षेत्राबद्दल जिव्हाळा वाटत असे. त्यातूनच या क्षेत्रातील प्रतिभावंताचा, उभरत्या कलाकारांचा, ज्येष्ठांचा गौरव करावा म्हणून आम्ही 1997 साली ‘कालनिर्णय सन्मान संध्या’ हा पुरस्कारांचा कार्यक्रम सुरू केला. तेव्हा एखाद्या दिनदर्शिकेने असा उपक्रम सुरू करावा हाच चर्चेचा विषय ठरला होता. मात्र पुरस्कारांची घसघशीत रक्कम, कार्यक्रमाचा खर्च आणि मिळणारा प्रतिसाद याचं गणित जमेना. आम्ही दूरदर्शनवरून या कार्यक्रमाचं प्रसारण झालं तर जाहिरातदार मिळतील म्हणून प्रयत्न केले पण ‘तुमच्या कार्यक्रमात ‘कालनिर्णय’ शब्द सातत्याने दिसतो म्हणून आम्ही तो दाखवू शकत नाही’ असं कारण देऊन दूरदर्शनने आमचा प्रस्ताव फेटाळला. कार्यक्रमाची आर्थिक घडी बसवणं कठीण गेल्यानं नाईलाजानं आम्हाला तो उपक्रम बंद करावा लागला. मात्र कालनिर्णयच्याच माध्यमातून सुरू झालेला एक उपक्रम असा आहे जो गेली 29 वर्षे म्हणजे 1993 पासून सातत्यानं सुरू आहे. हा उपक्रम म्हणजे शालेय विद्यार्थ्यांसाठीची ‘मनाचे श्लोक’ पाठांतर स्पर्धा. सुरूवातीला आम्ही मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून महापालिकेच्या शाळांमधून हा उपक्रम सुरू केला आणि आता यात खाजगी शाळाही सहभागी होतात. शालेय विद्यार्थ्यांनी मनाचे श्लोक पाठ करायचे आणि म्हणून दाखवायचे. त्यातील उत्तम सादरीकरणाला पारितोषिके दिली जातात असे याचे स्वरुप आहे. हा उपक्रम आम्ही अखंडपणे सुरू ठेवला याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे.
या वर्षी ‘कालनिर्णय’ने पन्नास वर्षांचा प्रवास पूर्ण केला. त्यानिमित्ताने हा आठवणींचा पट मला उलगडावासा वाटला. ज्यांनी ‘कालनिर्णय’ जन्माला घातलं ते आमचे वडील जयंतराव साळगांवकर आपल्या या तुफान लोकप्रिय आणि अतिशय उपयुक्त ठरलेल्या अपत्याची पन्नाशी पाहायला या जगात नाहीत. मात्र त्यांनी घालून दिलेल्या दंडकांचे पालन करत आणि त्यांनी आखून दिलेल्या मार्गावरूनच आम्ही हा प्रवास पुढे सुरू ठेवला आहे. कालनिर्णयची आर्थिक उलाढाल फार प्रचंड नाही पण त्या तुलनेनं कालनिर्णयने बाजारात मिळवलेली पत आणि ग्राहकांच्या मनात आणि जगात मिळवलेलं स्थान मात्र फारच मोठं आहे. एका प्रादेशिक भाषेत सुरू झालेली दिनदर्शिका आज जागतिक स्तरावर पोहोचली आहे.

एक आमच्या अभिमानाची आणि आनंदाची बाब म्हणून सांगतो जगभरातील महाराष्ट्र मंडळात जेव्हा जेव्हा नाटक सादर केलं जातं तेव्हा तेव्हा नाटकातलं घर मराठी आहे हे दाखवायला सेटवर कालनिर्णय टांगलेलं असतंच. इतकंच कशाला हिंदी सिनेमा, वेब सिरीजमध्येही जेव्हा चाळीतलं, ब्लॉकमधलं – मुंबईतलं, भारतीय घर दाखवायचं असतं तेव्हा तिथेही कालनिर्णय टांगलेलं पाहायला मिळतं. एकापरीने खरोखरच कालनिर्णय ही महाराष्ट्राची ओळख ठरलं आहे आणि आम्हा साळगांवकरांना त्याचा सविनय अभिमान आहे. आम्हा सगळ्या भावंडांच्या हयातीत ‘कालनिर्णय’चा सुवर्ण महोत्सव होत आहे ही आमच्यासाठी खरोखरच समाधानाची गोष्ट आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे कुठल्याही व्यवसायातील यशाचं श्रेय हे कोणा एकट्या-दुकट्याचं नसतं. आपल्याला वेळोवळी समजून घेणारे आपल्या घरचे, व्यवसायातील आपले कुटुंब सदस्य, सहकारी, आपले कर्मचारी आणि पदोपदी भेडसावणार्‍या अडचणींत सद्भावनेने मदतीसाठी उभे राहत असलेले सर्जजण, यामुळेच यशाचं उत्तुंग शिखर गाठता येतं. ‘कालनिर्णय’ च्या यशात या सगळ्यांचा सहभाग आहे, असंच मी मनोमन मानतो.

आता साळगांवकरांची तिसरी पिढीही कालनिर्णयशी जोडली गेली आहे. वाढलेला व्याप नव्या तंत्रज्ञानाच्या मदतीनं आधुनिक पद्धतीनं सांभाळण्यासाठी ती सज्ज आहे. पुढे कालनिर्णयचा अमृतमहोत्सव होईल तेव्हा काय किंवा आणखी पुढे शतक महोत्सव होईल तेव्हा काय आम्ही असू-नसू पण साळगांवकरांचं ‘कालनिर्णय’ नक्की असेल आणि तेव्हाही ते आजच्याच स्थानावर असेल याची मला खातरी वाटते.

– जयेंद्र साळगांवकर

संचालक-कालनिर्णय

संपर्क – 9820225889

पूर्वप्रसिद्धी – साहित्य ‘चपराक’ दिवाळी अंक २०२२

‘चपराक’ मासिकाचे सभासद होण्यासाठी संपर्क 7057292092

 

चपराक

पुणे शहरातून ‘साहित्य चपराक’ हे मासिक आणि ‘चपराक प्रकाशन’ ही उत्तमोत्तम पुस्तके प्रकाशित करणारी ग्रंथ प्रकाशन संस्था चालविण्यात येते. ‘साहित्य चपराक’ मासिकाचा अंक दरमहा 10 तारखेला प्रकाशित होतो. आपले साहित्य पाठविण्यासाठी, ‘चपराक’मध्ये जाहिराती देण्यासाठी आणि नवनवीन पुस्तकांच्या माहितीसाठी संपर्क - घनश्याम पाटील, संपादक 'चपराक'.
व्हाट्सऍप क्रमांक - ८७६७९४१८५०
Email - Chaprak Email ID

One Thought to “सोनेरी प्रवासाच्या चंदेरी आठवणी कालनिर्णय नाबाद 50”

  1. Vijay Gokhale

    एक मराठी माणुस आपल्या कुटुंबीयांसह यशाचे उत्तुंग शिखर गाठू शकतो ह्याची ही अद्भुत थक्क करणारी विलक्षण रोमांचकारी कथा आहे निवेदन सुंदर भाषा ओघवती आणि रसाळ, कुठेही मीपणाचा लवलेश नाही असेच यश ह्यापुढेही जयेंद्र साळगावकर व त्यांच्या कुटुंबियांना लाभो ही प्रार्थना कालनिर्णयने आता भांडवली बाजारातून भांडवल उभे करून व्यवसा वृद्धिंगत करावा व एक नवीन मापदंड तयार करावा

तुमची प्रतिक्रिया जरूर कळवा

हे ही अवश्य वाचा