सारंग गोसावी-एक विलक्षण व्यक्तिमत्व 

काश्मीर हा प्रत्येक भारतीयाच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. भारताचे नंदनवन संबोधल्या जाणार्‍या या राज्याविषयी बालपणापासूनच भलतंच कुतूहल आणि आकर्षण वाटायचं. हिमशिखरांनी वेढलेल्या पर्वतराजी, डोंगरावरून वाहणार्‍या खळाळत्या नद्या, सूचिपर्णी वृक्षांची दाट झाडी, मनोहारी फुलांनी बहरलेले विस्तीर्ण बगीचे, तलाव, विहरणारे शिकारे, हाऊसबोट, सफरचंदांनी लगडलेल्या बागा आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे अशा या नंदनवनात राहणारे आमचे काश्मिरी बांधव! जन्माला आल्यावर एकदा तरी ह्या नंदनवनाला आवर्जून भेट द्यावी असे वाटायचे. आजवर कधीही काश्मीरबद्दल आकर्षण तर कमी झालं नाहीच पण धुमसत्या काश्मीरबद्दल ऐकल्यावर मात्र वाटलं, ‘हाच का तो आपला स्वर्ग? आपलं नंदनवन? कोणाची नजर तर लागली नाही ना आपल्या या नंदनवनाला?’ एकदा साखर परिषदेच्या वेळी काश्मीर दर्शनाचा योग आला आणि डोळ्याचे पारणे फिटले. खरंच काश्मीरचं वर्णन केल्याप्रमाणे यथार्थ दर्शन घडत होतं. पहेलगाम, श्रीनगर, सोनमर्ग, गुलमर्ग रस्त्याने जाताना वाटेत लागणारी छोटी-छोटी गावं, तेथील सुकामेवा, सफरचंद आणि केशर विकणारे विक्रेते पाहून तर काय घेऊ अन् काय न घेऊ अशी परिस्थिती झालेली!

काश्मीर अस्थिर असतानाही तेथील जनजीवन मात्र सुरळीत सुरू होतं. पर्यटक येत होते. तेथील निसर्गाच्या सानिध्यात पर्यटनाचा आनंद घेत होते. खरेदी करत होते. तेथील रहिवासी अगत्यानं पर्यटकांचीमेहमाननवाजीकरत होते. मीडियामध्ये दाखवत असलेला आक्रोश, अतिरेकी हल्ले याचा मागमूसही जाणवत नव्हता. कदाचित ही परिस्थिती भारतपाकिस्तान सीमेवर असावी, असं वाटत होतं. बाकी जनजीवन सामान्य होतं. सगळे आपल्या रोजीरोटीच्या व्यापात मश्गुल होते. पर्यटक हेच त्यांचे दाता होते. त्यांना आवश्यक ती सेवा दिल्याशिवाय त्यांच्या घराची चूल पेटणार नव्हती. अशा भागात आपले सैनिक डोळ्यात तेल घालून मातृभूमीच्या रक्षणासाठी कसा पहारा देत असतील, थंडी, वारा, पाऊस, कोसळणारी हिमशिखरं याची पर्वा करता जगत असतील आणि भीतीच्या सावटाखाली सदैव जगणारी तेथील जनता कशी काय या संकटांचा सामना करत असेल? मनात असंख्य प्रश्न उभे राहत होते. अस्वस्थता जाणवत होती. देशाचं नंदनवन म्हणविणार्या या राज्याची ही काय दुर्दशा झाली आहे, याचं वास्तव बेचैन करीत होतं पण तेथे जे पाहिले, जे अनुभवलं याच्या व्यतिरिक्त दुसरं काही समाधानकारक तिथं घडत आहे का नाही याचा मागोवा घेण्याचा प्रयत्न केला तेव्हा  लक्षात आलं की, केवळ भारत सरकारच नव्हे तर इतरही काही समाजसेवी संस्था तेथील परिस्थिती हाताळण्याचा प्रयत्न करीत होते. मानवतेच्या भावनेतून तेथील रहिवाशांचं जीवन सुकर बनविण्याच्या प्रयत्नात होते. त्यांचे प्रयत्न छोटेछोटेच होते पण त्यामागील भावना विशाल होत्या. धर्म, जात यांचा विचारही त्यांच्या डोक्यात शिरत नव्हता. उलट त्यांचं जीवन अधिक सुरक्षित, आत्मनिर्भर करण्याचा त्यांचा प्रयत्न होता. भारताचा एक सुजाण नागरिक म्हणून खारीचा वाटा उचलण्याचा त्यांचा ठाम निर्णय होता. अशातलंच एक व्यक्तिमत्त्व म्हणजे सारंग गोसावी! त्यांची आणि माझी ओळख झाली ती माझी मैत्रीण आणि कॉसमॉस बँकेत ऑफिसर पदावर कार्यरत असणार्या सुनीती जोशी यांच्या माध्यमातून आणि ह्या झपाटलेल्या कर्मयोग्याचा जीवनपट उलगडत गेला. तसे सारंग गोसावी हे अस्सल पुणेकर! तीनचार पिढ्यांपूर्वी त्यांचे पूर्वज बीडहून पुण्यात स्थायिक झालेले! त्यामुळे सारंग यांचं शालेय शिक्षण पुण्यातील ज्ञानप्रबोधिनी आणि लक्ष्मणराव आपटे विद्यालयात झालं. त्यानंतर त्यांनी फर्ग्युसन ज्युनिअर कॉलेजमध्ये बारावीचं शिक्षण पूर्ण केल्यावर पुण्यातीलच श्री शिवाजी महाराज इंजिनिअर कॉलेजमध्ये मेकॅनिकल इंजिनिअरचं शिक्षण पूर्ण केलं. आज ते झेन्सॉफ या आयटी कंपनीमध्ये कार्यरत आहेत. ज्ञानप्रबोधिनीमध्ये शिक्षण घेताना त्यांना वार्षिक स्नेहसंमेलनाच्या दिवशी एक पारितोषिक मिळालं. या कार्यक्रमाचे मुख्य पाहुणे जनरल पाटणकर यांच्या हस्ते बक्षीस स्वीकारताना जनरल पाटणकर म्हणाले, ‘‘सारंगसारख्या मुलांनी काश्मीरमध्ये यायला पाहिजे.’’ 

ते त्यावेळी काश्मीर खोर्याचे आर्मी प्रमुख म्हणून काम करत होते. बक्षिसाच्या आनंदापेक्षाही जनरल पाटणकर; आपल्या आर्मी प्रमुखांनी दिलेली कौतुकाची थाप आणि त्यांनी केलेलं आवाहन सारंग यांना अधिक भावलं. मनात विचारांची गर्दी झाली. लहान वयातच एका आर्मी ऑफिसरनं भावी पिढीसाठी दिलेली साद सारंग यांना आव्हानात्मक वाटली. त्यांनी दाखवलेला सार्थ विश्वास पूर्णत्वास नेण्याचा त्यांनी संकल्प केला पण वय लहान होतं. अजून शालेय शिक्षणदेखील पूर्ण झालेलं नव्हतं.

काश्मीरमधील परिस्थिती सर्वजण जाणून होते. अशावेळी महाराष्ट्रातून इतक्या दूर काश्मीरला जाण्यासाठी घरून परवानगी मिळणं जवळजवळ अशक्यप्राय गोष्ट होती पण जनरल पाटणकरांनी व्यक्त केलेले विचार स्वस्थ बसू देत नव्हते.कसंही करून  काश्मीरला जायचंच, हा प्रण सारंगनं केला होता. म्हणून मित्रांबरोबर गोव्याला जायचा बहाणा करून सारंगनं थेट काश्मीर गाठलं. जनरल पाटणकरांची भेट घेतली. पाटणकरसाहेबानी सारंगला आसपासचा परिसर दाखवला आणि मग कोणाचीही मदत घेता भारताचा एक नागरिक म्हणून सारंगनं काश्मीर, तेथील भौगोलिक परिस्थिती, जनजीवन आपल्या दृष्टिकोनातून पहावं, अशी इच्छा व्यक्त केली. सारंगनं तेथील परिस्थितीचा अंदाज घेतला. तेव्हा त्यांच्या हे लक्षात आलं की, येथे पर्यटकांच्या येण्यावरच रहिवाशांचं पोट अवलंबून आहे. भरपूर वनसंपदा असली तरी डोंगराळ प्रदेश असल्यामुळं येथे शेती फारशी होत नाही. नेहमीच बर्फवृष्टी होत असल्यानं दळणवळणाची साधनं देखील अपुरी आहेत. त्यामुळं इंडस्ट्रीदेखील हाताच्या बोटावर मोजण्याइतक्याच उपलब्ध आहेत. येथील लोकांना पुरेसा रोजगार मिळत नाही. फक्त सफरचंद, केशर आणि सुकामेवा यांचं येथे उत्पादन होतं. बाकी सर्व पर्यटकांच्या भरोशावर! डोंगराळ प्रदेश असल्यामुळं पशूपालन हा येथील प्रमुख व्यवसाय. शेळ्या, मेंढ्या यांच्यापासून मिळणार्या लोकरीपासून येथे गरम कपड्याचा व्यापार होऊ शकतो. कशिदाकारीचा व्यवसाय देखील होऊ शकतो. लहान वयातही आपण काश्मीरसाठी, तेथे राहणार्या बांधवांसाठी काय करू शकतो याचे विचार सारंगच्या मनात घोळत होते. पुढे मोठे होऊन आपलं कार्यस्थळ म्हणून त्यांनी काश्मीरची निवड करून ठेवली. येथूनच भविष्यातील कार्याची नांदी झाली. काश्मीरनं त्यांना झपाटून टाकलं. ते काश्मीर आणि काश्मिरी बांधवांच्या प्रेमात पडले

एव्हाना तेथील आर्मीशी त्यांचे सौहार्दपूर्ण संबंध निर्माण झाले होते. त्यांच्याकडून संपूर्ण सहयोग आणि सुरक्षेची हमी मिळाली होती. आता फक्त गड जिंकायचा होता. काश्मिरी बांधवांमध्ये आपल्याबद्दल विश्वास निर्माण करायचा होता. त्यांचं प्रेम मिळवायचं होतं आणि सातत्यानं त्यांच्या संपर्कात रहायला हवं होतं. त्यासाठी काश्मीरवार्या करणं गरजेचं होतं. शिवाय यासाठी एक टीम बनवणं आवश्यक होतं

सारंगनी शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केलं. ते जॉबही करत होते. आता त्यांचा समकालीन आणि समविचारी मित्रमैत्रिणींचा ग्रुप तयार झाला होता. प्रत्येकाच्या मनात काही तरी समाजोपयोगी  काम करण्याची उर्मी दाटून आली होती. त्यावेळी पथप्रदर्शकाची भूमिका सारंगनं वठवली आणिअसीम फाउंडेशनची स्थापना झाली. एकाच विचारांच्या, एकाच ध्येयासाठी कटिबद्ध झालेल्या या तरूण पिढीचं सळसळतं रक्त झपाटल्यासारखं कामाला  लागलं. त्यांचा तो उत्साह पाहून इंडियन आर्मीनेही त्यांना मदतीचा हात देऊ केला.

तत्पूर्वी 2001 पासूनच या ध्येयवेड्या माणसानं ठरवून टाकलं होतं की, वर्षातून किमान तीनदा तरी काश्मीरला जायचंच आणि सुट्टी घेऊन त्यांच्या काश्मीर वार्या सुरू झाल्या. सर्वप्रथम त्यांना काश्मीर समजून घ्यायचं होतं. काश्मीरमधील कोणत्याही एका गावाहून बसप्रवास सुरू केल्यावर ते सहप्रवाशांशी संवाद साधायचे. तेथील सामाजिक, भौगोलिक, शैक्षणिक परिस्थितीचा अंदाज घ्यायचे. त्यांचे दैनंदिन जीवन जवळून निरिक्षण करायचे. तेेथील सामान्य जनता किती साधी, सरळ, भोळी आहे हे त्यांच्या लक्षात येत गेलं. त्यांना राजकीय गोष्टीत फारसं स्वारस्य नव्हतं तर एकच अपेक्षा होती ती म्हणजे साधं, सुरक्षित, समाधानी आयुष्य! शिक्षण, रोजीरोटीची शाश्वती! किमान नागरी सुविधा हव्या होत्या. शांत, समाधानी आयुष्य हवं होतं आणि त्यासाठी या प्रदेशाचा विकास होणं गरजेचं होतं. सहप्रवाशांशी संवाद साधताना सारंग यांना या गोष्टी उलगडत गेल्या. परिचय नसताना देखील मैत्र जुळत गेले. शेवटच्या बस थांब्यावर उतरल्यावर सारंग तेथील गावकरी, विद्यार्थी यांच्याशी मैत्रीपूर्ण संबंध निर्माण करून त्यांच्या गरजा लक्षात घेऊ लागले. त्यांच्या लक्षात आलं की, येथील कामाची व्याप्ती मोठी आहे. हे काम एकट्याच्या आवाक्याबाहेरील आहे. त्यासाठी अनेक हातांची गरज लागणार आहे अन्साथी हाथ बढानाह्याचा प्रत्यय त्यांना आपल्या समविचारी सहकार्यांच्या पुढाकारानं प्रत्ययास आला. कामाची दिशा, ध्येय निश्चित झालं आणि असीम फाउंडेशनच्या माध्यमातून कार्याला सुरूवात झाली. आधीची अनेक वर्षे तेथील लोकांशी ओळख, मैत्र फुलले होतेच. जनसंपर्क वाढला होता. त्यामुळं अनेक स्तरावर काम करण्याच्या संधी समोर येत होत्या.

2002 मध्ये काश्मीर खोर्यातील अशांत परिस्थितीच्या पार्श्वभूमिवर सुरू झालेला माणसं शोधण्याचा हा प्रवास सारंगला अनेक ठिकाणी घेऊन गेला, जेथे माणुसकीचा झरा अखंड वाहत होता. आपुलकीचे निर्व्याज बंध होते. कैक हळवे कोपरे होते. निरागस आणि निरपेक्ष मैत्रीची असोशी होती. म्हणूनच सारंगचे सूर काश्मीरमधील जनतेशी जुळत गेले. या प्रवासात काश्मिरी बांधवांनी दाखवलेली आपुलकी, प्रेम, माया, जिव्हाळा, काळजी माणसाला माणसाशी जोडण्याचा दुवा ठरली. काही माणसे अलवारपणे आपल्या आयुष्यात येतात आणि आपल्याही नकळत आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनून जातात. अशीच ही माणसं सारंग यांच्या जीवनात आली. सारंगनं देखील पुढाकार घेऊन त्यांच्याशी मैत्रीचा हात वाढविला आणि एका अतूट नात्याचा उदय झाला. त्यानंतर सारंगनं आयटीमधील जॉब सोडून एमबीएला प्रवेश घेतला. व्यवस्थापन क्षेत्रातील या ज्ञानाचा उपयोग पुढं असीमच्या कामासाठी खूप झाला. साधारणतः 2007 मध्ये सारंगनं जुने संगणक दुरूस्त करून काश्मीरला नेले. बीचबिहार येथे जावेद टाक यांच्यासोबत संगणक केंद्र स्थापन करून काश्मिरी तरूणांना  संगणकाचं प्रशिक्षण देण्यास सुरूवात केली. ही काळाची गरज तर होतीच पण तेथील तरूणाई एकविसाव्या शतकात देखील ह्या विकासापासून, ह्या आविष्कारापासून कोसो दूर होती. त्यांची ती असोशी, इच्छा आणि गरज सारंगनं काही अंशी पूर्ण केली. कोणतंही काम पूर्ण ताकदीनं जरी सुरू केलं तरी समस्या ह्या येतातच. संगणक केंद्रात शिकवताना तेथील वीज पुरवठा खंडित होणं ही नित्याचीच समस्या होती. त्यामुळं प्रशिक्षणात व्यत्यय येत होता. त्यावेळीईदीम्हणून काही रक्कम जनरेटरसाठी द्यावी, असं आवाहन त्यानं केलं. त्याला उदंड प्रतिसाद मिळाला. वर्गणीतून मिळालेल्या पैशातून जनरेटर विकत घेतलं. तो हे आपल्या भल्यासाठीच करतोय, आपल्यासाठी तळमळीनं झटतोय, इतक्या दूर येऊन आपली निरपेक्ष सेवा करतोय म्हणून त्यांचा सारंगवर अतूट विश्वास बसला. या उदंड प्रतिसादानंतर उल्हासित होऊन पुढे तरूणासाठी व्यक्तिमत्त्व विकास शिबिरे, युथ क्लब, क्रिकेट सामने आयोजित करण्यात आले आणि विकासाची गंगा वाहू लागली.

2010 मध्ये काश्मीरमधील स्थानिक गरजांची प्राथमिकता ओळखून विकासाच्या दिशेनं घेऊन जाण्याचं उद्दिष्ट्य असीमनं ठेवलं. युवा पिढी विश्वासानं सारंग आणि असीमकडे पाहू लागली. 2012 मध्ये असीमनं आपलं लक्ष लडाखकडे केंद्रित केलं. असीमचे कार्यकर्ते तेथील शिक्षक, विद्यार्थ्यांना भेटले. त्यांच्या गरजा, प्राथमिकता जाणून घेतल्या आणि त्या दृष्टिनं विचार करून अभ्यास दौरे, शिबिरे, प्रशिक्षण केंद्रे सुरू केली. त्यांची पालकत्वाची जबाबदारी घेऊन त्यांना पुण्यात शिकायला आणलं. आता ती संख्या दहावर पोहोचली आहे तसंच 2016 मध्ये काश्मीर खोर्यातील परिस्थिती गंभीर बनल्यावर विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून 15-20 दिवसांच्याशॉर्ट टर्म स्कुलिंगची अभिनव संकल्पना राबवून असीमच्या कार्यकर्त्यांनी अपूर्व धाडस दाखवलं. लडाखमध्येसायन्स पार्कउभे करण्याची संकल्पना समोर ठेवल्यावर तेथील जनतेनं दिलेला प्रतिसाद अभूतपूर्व असाच होता. यावरून हेच लक्षात येत होतं, काश्मिरी बांधवांच्या बर्याच गरजा होत्या, ज्या त्यांना हव्या होत्या पण त्या पूर्णत्वास जात नव्हत्या. सारंगच्या टीमनं त्यांच्यासमोर ठेवलेले उपक्रम, योजना, पर्याय त्यांना हव्याहव्याशा वाटत होत्या म्हणूनच सायन्स पार्कसाठी जागा उपलब्ध करून देण्यापासून त्यांनी सर्वतोपरी सहकार्य दिलं.

तुम्ही जेथे राहता तेथे उपलब्ध असलेल्या रिसोर्सचा उपयोग करून तुम्ही अनेक उद्योग, व्यापार सुरू करू शकता पण म्हणतात ना, ‘पिकते तेथे विकले जात नाही!’ हा विचार फोल ठरवत सारंगनं काश्मीरमधील अक्रोड, सफरचंद या उपलब्ध पदार्थांवर प्रक्रिया करून बेकरी पदार्थ करण्याचं ठरवलं. ही कल्पना सारंगनं प्रत्यक्षात उतरवून सहकारी तत्त्वावर सफरचंदाची बिस्किटं, कॅरामल युक्त अक्रोडाच्या कुकीज बनविण्याचा उपक्रम तेथील स्थानिकांना हाताशी धरून, त्यांना प्रशिक्षित करून यशस्वीरित्या राबवून दाखवला. आज अशा जवळजवळ तेरा बेकर्या तेथे उत्पादन करीत असून त्यामुळं स्थानिकांना रोजगार तर मिळाला आहेच पण दुर्गम भागात ताजे, सकस पदार्थ देखील उपलब्ध झाले आहेत. तेथील आर्मी आणि सामान्यजन देखील त्यांचे ग्राहक आहेत. असा दूरदृष्टीपणा, व्यवसायाचं नियोजन आणि त्यातून होणारी आर्थिक आवक हे काश्मिरी बांधवांसाठी सत्यात उतरलेल्या स्वप्नासारखंच भासतं. या बेकर्या तेथील महिला सक्षमपणे चालवत आहेत. खरंतर कष्टाला मग त्या महिला असोत, तरूणाई असो, कोणीच घाबरत नाही पण त्यांना पथप्रदर्शक बनून कोणीतरी उद्युक्त करण्याची गरज असते. असीमची टीम हेच कार्य करून तेथील जनतेला आत्मनिर्भर करण्याचा प्रयत्न करीत आहे. उरी हल्ल्याच्या वेळी काश्मीरमधील वातावरण गंभीर आणि जनता भयभीत झाली होती. अशावेळी तेथील निरागस जनतेला मानसिक आधार देणं, सोबत करणं, आपुलकीचा ओलावा देणं गरजेचं होतं. त्यांच्या मनातील भीती घालवायला पाहिजे होती. त्यासाठी खेळीमेळीचं वातावरण निर्माण व्हायला हवं होतं. असीमच्या कार्यकर्त्यांनीउरी प्रीमियर लीगच्या माध्यमातून पुण्यामध्ये एक मैत्री सामना आयोजित केला. त्या सामन्यासाठी क्रीडा पत्रकार सुनंदन लेले उपस्थित तर होतेच पण संघाला शुभेच्छा देण्यासाठी सचिन तेंडुलकर यांनीही व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारा संपर्क साधला. या सामन्यामुळे झालेली सुरूवात नंतर सांबा, आसामचा फुलबॉल संघ पुण्यात येणं, अनंतनागमधून महिला क्रिकेट संघानं पुण्याचा दौरा करणं असा विस्तारत गेला. अजूनही ताबारेषेजवळील गावात वीज पोहोचलेली नाही. शत्रूच्या नजीकच्या गावात राहताना सदैव दहशतीखाली वावरणार्या या लोकांना दिलासा देण्यासाठी आणि त्यांची गरज भागविण्यासाठी असीम आणि भारतीय सैन्याच्या एकत्रित प्रयत्नातून सौर ऊर्जेवर चालणारे दिवे गगरहिल आणि जाबरी या गावात बसविले आहेत. प्रत्येक घराला समान वीजपुरवठा व्हावा म्हणून पॉवर लिमीटर बसविण्यात आला आहे. अशा कित्येक संकल्पना या तरूण आणि सामाजिक जबाबदारीचं भान असलेल्या कर्मयोग्यामध्ये आहेत. आधुनिक जगात वावरत असताना एक भारतीय नागरिक म्हणून सजग नागरिकत्वाची भूमिका ते अतिशय कटिबद्धरित्या पार पाडतात. व्यवस्थापनाचं ज्ञान असल्यामुळं कोणताही प्रोजेक्ट उभारताना कच्चा माल, मालाची प्रत, बाजारपेठ हे सर्व लक्षात घेऊनच ते त्या क्षेत्रात आत्मविश्वासानं कार्यरत आहेत.   

काश्मीर हीच कर्मभूमी मानून, तेथील समाजाच्या गरजा ओळखून त्यांना आर्थिक आत्मनिर्भर करणं, योग्य ती वाट दाखवणं, त्यांना त्या मार्गावर चालण्यास प्रेरित करणं ही कामं करणारी मंडळी या कलियुगातही आपल्याला सारंग आणि टीमच्या रूपात भेटतात. केवळ त्यांची आर्थिक स्थिती सुधारणं हेच उद्दिष्ट मानता जाती, धर्म, पंथ यातील भेदाभेद मानता मानवतेच्या दृष्टिकोनातून प्रेम, आपुलकी देणं, त्यांच्यात आपल्याच इतर बांधवांबद्दल विश्वास निर्माण करणं, त्यांच्यातील सुरक्षेची भावना दृढ करणं ही महत्त्वाची कार्ये असीमच्या माध्यमातून निरंतर चालू आहेत. पुण्याजवळ भोर या गावात आपल्या शूरवीर आणि देशासाठी तळहातावर शीर घेऊन लढणार्या जवानांच्या स्मृतीप्रित्यर्थ जनरल नरवणे राष्ट्रीय एकात्मता उद्यान उभारणीचं कार्य देखील चालू आहे. सीमेवर लढणार्या आपल्या रक्षणकर्त्यांना ही त्यांच्या शौर्यासाठी, त्यागासाठी सलामीच ठरणार आहे

सारंग, असीम आणि भारतीय सेनेचे संबंध अतिशय जिव्हाळ्याचे आहेत. एकमेकांना समर्थ साथ देत, एकमेकांकडून कधीकधी मौलिक सल्ले घेऊन त्यांची वाटचाल सुरू आहे. अशाप्रकारे भारतीय सैन्यातील एका उच्चपदस्थ ऑफिसरनं केलेल्या आवाहनामुळं प्रेरित होऊन सारंग गोसावी यांनी आपल्या जीवनात अभिनव असा रस्ता शोधला. मीडिया अथवा इतर कोणत्याही अफवांना न जुमानता आपल्या बांधवांवर विश्वास ठेवला, त्यांना प्रेमानं आपलंस केलं, त्यांना अडी-अडचणीत मदतीचा हात दिला, त्यांचं भलं चिंतलं. त्यामुळंच सारंग यांना पलीकडून चांगलाच प्रतिसाद मिळाला. कोणत्याही प्रकारचे पूर्वग्रहदूषित विचार मनात न आणता केवळ मानवधर्माचा पुरस्कार करून सारंग पुढे जात राहिले. प्रत्येक ठिकाणी सुष्ट-दुष्ट प्रवृत्ती संपर्कात येतात. त्यातील नीरक्षीर वेचून त्याज्य ते त्यागण्याची आणि चांगलं ते बघण्याचा  दृष्टिकोन सारंग यांनी जोपासला. त्यांना सर्व जगच चांगलं दिसू लागलं. काश्मीरसारख्या अशांत, असुरक्षित राज्यात जाऊन तेथील बांधवाना त्यांनी जगायला शिकवलं, सकारात्मक दृष्टिकोनानं बघायला शिकवलं. अतिशय नम्र, प्रसिद्धीपराङ्मुख असलेल्या सारंग यांना सारं जगच  सुंदर दिसतं. ते कोणत्याही क्षेत्रातील व्यक्तिवर टीकाटिपणी करीत बसत नाहीत. ठरवलेल्या उद्दिष्टाप्रत पोहोचण्यासाठी ते शांतपणे, गाजावाजा करता काम करत राहतात. ते करीत असलेले महान कार्य जगाला माहीत व्हायला हवं कारण देशाच्या, समाजाच्या कल्याणासाठी आपल्याला असे लाखो, करोडो सारंग हवे आहेत. म्हणूनच सारंगबद्दल लिहायचा हा छोटासा प्रयत्न! सारंग आणि असीमच्या टीमला भविष्यातील विधायक कार्यासाठी खूप खूप शुभेच्छा!

शब्दांकन – चंद्रलेखा बेलसरे

पूर्वप्रसिद्धी – साहित्य ‘चपराक’ दिवाळी अंक २०२२

‘चपराक’ मासिकाचे सभासद होण्यासाठी संपर्क 7057292092

 

चपराक

पुणे शहरातून ‘साहित्य चपराक’ हे मासिक आणि ‘चपराक प्रकाशन’ ही उत्तमोत्तम पुस्तके प्रकाशित करणारी ग्रंथ प्रकाशन संस्था चालविण्यात येते. ‘साहित्य चपराक’ मासिकाचा अंक दरमहा 10 तारखेला प्रकाशित होतो. आपले साहित्य पाठविण्यासाठी, ‘चपराक’मध्ये जाहिराती देण्यासाठी आणि नवनवीन पुस्तकांच्या माहितीसाठी संपर्क - घनश्याम पाटील, संपादक 'चपराक'.
व्हाट्सऍप क्रमांक - ८७६७९४१८५०
Email - Chaprak Email ID

तुमची प्रतिक्रिया जरूर कळवा

हे ही अवश्य वाचा