महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेनंतर राज्याच्या प्रत्येक भागात वेगवेगळी राजकीय घराणी निर्माण झाली. प्रत्येक जिल्ह्यात किमान दोन-तीन घराणी स्थिरावलेली दिसतात. या घराण्यांनी कोणताही राजकीय अभिनिवेष किंवा कोणतीही विचारधारा आदर्शवत माणून वाटचाल केली नाही. आपल्या सोयीनुसार यातील बहुतेकांनी सातत्यानं पक्षांतर केलं. ते वेगवेगळ्या पक्षात गेले, स्थिरावले, आपल्या भूमिका आणि विचार बदलले. येनकेनप्रकारेण सत्तेत कसं राहता येईल याचं कसब त्यांना अवगत आहे.
काँग्रेस पक्षाचा विचार करता आमच्या विलासराव देशमुखांचं घराणं, शंकरराव चव्हाण, सुशीलकुमार शिंदे, पतंगराव कदमांचं घराणं काँग्रेसमध्ये स्थिरावलेलं दिसतं. शिवाजीराव पाटील निलंगेकर, डॉ. पद्मसिंह पाटील आदींच्या वारसांनी पक्ष बदलून आपलं बस्तान बसवलं. राष्ट्रवादीत पक्षाध्यक्ष शरद पवार, त्यांची मुलगी सुप्रिया, पुतण्या अजित, नातू रोहित कार्यरत आहेत. राजारामबापू पाटील यांचे वारस जयंत पाटील, दत्तात्रेय गोविंदराव वळसे पाटील यांचे चिरंजीव दिलीप वळसे पाटील असे अनेकजण सक्रिय आहेत. आर. आर. पाटील यांच्यासारख्या चारित्र्यसंपन्न नेत्याच्या मुलालाही ठरवून पुढे आणलं गेलं. हे सगळं करताना त्यांची खरंच काही योग्यता आहे की नाही हे कोणीही पाहत नाही.
भाजपचा विचार करता गंगाधरपंत फडणवीस यांचे सुपूत्र देवेंद्रजी, गोपीनाथराव मुंडे यांच्या कन्या पंकजा आणि प्रीतम, पुतणे धनंजय, प्रमोद महाजन यांची मुलगी पूनम असे सगळे सक्रिय आहेत. नगरच्या विखे पाटील घराण्यानंही राज्याच्या राजकारणात योगदान दिलं. काँग्रेस, शिवसेना, भाजप अशा सगळ्या पक्षात फेरफटका मारणार्या या घराण्यानं आपलं राजकीय वर्तुळ पूर्ण केलं. शिवसेनेत बाळासाहेब ठाकरे यांनी जाहीरपणे सांगितलं की, माझ्या उद्धवकडे लक्ष द्या, आदित्यला सांभाळा. आता उद्धवजी मुख्यमंत्री आहेत आणि त्यांचे चिरंजीव आदित्य राज्य मंत्रीमंडळातील सर्वात तरूण चेहरा म्हणून पुढे आलेत. शिवसेनेतून बाहेर पडलेले छगन भुजबळ, नारायण राणे, राज ठाकरे यांनीही आपापला संसार थाटलाय. या सर्व नेत्यांचे वारसदारही राजकारणात सक्रिय झाले आहेत.
ही फक्त आपण काही प्रातिनिधिक उदाहरणं बघितली. महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यात अशी राजकीय घराणी आहेत. ही मंडळी त्या-त्या जिल्ह्यातल्या जिल्हा बँका ताब्यात ठेवतात. साखर कारखाने, सहकारी संस्था, शिक्षण संस्था ताब्यात ठेवून आपल्या वारसदारांकडे सुपूर्त करतात. त्या त्या घराण्यांचे भक्त आपापल्या नेत्यांची तळी उचलतात. त्यांचे झेंडे डोक्यावर घेऊन नाचतात. या घराण्यांना महाराष्ट्रातील सामान्य माणसांशी, त्यांच्या दुःखाशी, त्यांच्या वेदनेशी काहीही देणेघेणे नाही. यांना महाराष्ट्राच्या उत्थानासाठी काहीच करायचं नाही. अनेकांच्या दुसर्या, तिसर्या, चौथ्या पिढ्या राजकारणात सक्रिय असूनही त्यांच्या मतदारसंघातील अडचणी तशाच आहेत. ‘स्वार्थ’ या एकाच शब्दात त्याचा मतितार्थ आणि अन्वयार्थ आहे. जे मिळेल ते मला, माझ्या कुटुंबाला, माझ्या घराण्याला पाहिजे अशी त्यांची भावना असते.
‘वुई द पिपल’ ही राज्यघटनेची सुरूवात हे कधीच विसरले आहेत. त्यांच्याकडे इतकी सत्ता ताब्यात आहे की ‘हू द पिपल?’ असंच अप्रत्यक्षपणे विचारत असतात. बेरोजगारांना रोजगार मिळावा, शेतकरी जगवावा, गरीब मुलांनी शिकून पुढे जावं, आपल्याकडं परप्रांतियांचे किती लोंढे येत आहेत याच्याशी त्यांना काहीच कर्तव्य नाही. ‘हर नेता की अंतिम इच्छा, मेरे बाद मेरा बच्चा’ इतकंच त्यांना ठाऊक आहे. अजितदादा जेव्हा पक्षात फुल फॉर्ममध्ये होते आणि राहुल गांधी यांना काँग्रेसचा अध्यक्ष करायची तयारी सुरू होती तेव्हा शरद पवार म्हणाले, ‘आमच्या पक्षात अजून सुप्रियाला अध्यक्ष करायची वेळ आली नाही.’ त्यांच्या तोंडात त्यावेळी आर. आर. पाटील, जयंत पाटील किंवा कार्यक्षम असलेले पुतणे अजितदादा पवार आले नाहीत. त्यांनी उदाहरण देतानाही सुप्रिया सुळे यांचंच नाव घेतलं. या सगळ्याचा अर्थच तो आहे.या सर्वपक्षिय नेत्यांची दुसरी पिढी उदरनिर्वाहासाठी म्हणून काही करतेय असं चित्र दिसत नाही. सत्तेतून पैसा आणि पैशासाठी पुन्हा सत्ता असंच त्यांचं वर्तन दिसतं. गंमत म्हणजे ही राजकीय घराणी एकमेकांची नातलग आहेत. पै-पाहुणे म्हणून त्यांनी त्यांचीच निवड केलीय. हे सगळेजण एकमेकांना सावरतात, आधार देतात, मदत करतात आणि सत्ता त्यांच्याकडेच कशी राहील ते बघतात. मुंडे, देशमुख, चव्हाण आणि निलंगेकर यांच्याशिवाय मराठवाडा नाहीच का? गरीब कुटुंबातून आलेला एखादा कार्यकर्ता आमदार सोडा पण ग्रामपंचायतीचा सदस्यही व्हायचं स्वप्न बघू शकत नाही. हे समाजवास्तव दुर्लक्षित करता येण्यासारखं नाही. महाराष्ट्रातील कोणत्याही पक्षातील नेत्यांच्या वारसांचा कोणत्याही आंदोलनाशी, चळवळीशी थेट संबंध नाही. शेतकरी आंदोलन झालं, अण्णा हजारेंचं लोकपाल आंदोलन झालं मात्र या सगळ्यांपासून अशा नेत्यांचे वारस कित्येक फूट दूर दिसतात. दूर असलेले हे सर्वजण आता संस्थानिक झालेत. सरदार वल्लभभाई पटेल यांनी सगळी संस्थानं खालसा केली तेव्हा भारत एकसंघ झाला. आता या घराण्यांची संस्थानं खालसा करून मोडीत काढली तरच महाराष्ट्राचं चित्र बदलू शकेल. सामान्य माणूस मुख्य प्रवाहात यायचा असेल तर हे झालंच पाहिजे.
या घराण्यांकडे लोक अपरिहार्यता म्हणून जातात. एखादा प्रतिभावंत कवी-लेखक असलेला प्राचार्य असेल तर त्याला त्याच्या संस्थापक असलेल्या बिनडोक राजकारण्याच्या वळचणीला जाऊन थांबावं लागतं. एखाद्या चांगल्या संपादकाला अशा नेत्यांच्या पुरवण्यांचं संपादन करावं लागतं. हा प्रकार थांबला पाहिजे. या राजकीय घराण्यांनी महाराष्ट्रातल्या सामान्य माणसांच्या स्वप्नांची प्रतारणा केली आहे. निवडून येण्यासाठी जे काही करावे लागते ते ही मंडळी करतात. त्यात ते वाकबगार असतात. प्रत्येक जिल्ह्यातील आणि प्रत्येक पक्षातील नेत्यांशी कार्यशैली याबाबत सारखीच दिसते. यशवंतराव चव्हाण यांनी त्यांचा शरद पवार हा वैचारिक वारस पुढे आणला. त्यांचंच अनुकरण करावं असं मात्र पवारांना किंवा अन्य कुणाला वाटत नाही.
पूर्वी मराठी माणसांना दोन गोष्टींचं भयंकर वेड आणि आकर्षण होतं. एक नाटक आणि दुसरं म्हणजे राजकारण! मध्यमवर्गीय, कनिष्ट मध्यमवर्गीय, उच्चभ्रू लोकांनाही नाटकं पहायला, राजकारणावर चर्चा करायला, त्यात सहभागी व्हायला आवडायचं. नवशिक्षित तरूण पिढी मात्र भारतात, महाराष्ट्रात रहायला धजावत नाही. राजकारणाबद्दल कमालीचा तिरस्कार निर्माण झालेली ही मंडळी देश सोडून विदेशातही स्थिरावत आहेत. हे चित्र निर्माण होण्यास ही घराणेशाही कारणीभूत आहे. इथली अशी गुणवत्ता मोठ्या संख्येनं बाहेर जात असताना या घराण्यांना मात्र विलक्षण आनंद होतो. आपल्याला स्पर्धक राहत नाही आणि इथे आपलीच मनमानी चालेल हे यामागचं कारण असतं. विठ्ठलराव विखेंच्या कोणत्या मुलावर अन्याय झाला, मुंडे घराण्यात पंकजाताई, प्रीतमताई की धनुभाऊ अशा कुणावर अन्याय झाला यावरच कार्यकर्त्यांच्या चर्चा रंगतात. तिथं काम करणारे आणखीही कुणी आहेत याच्याशी त्यांचं सोयरसुतक नसतं. म्हणून या प्रत्येक घराण्यातील वारसांनी एक विलक्षण हिटलरशाही संस्कृती निर्माण केलीय.
महत्त्वाच्या संस्था ताब्यात घेणं, प्रत्येक गोष्ट पैशात तोलणं आणि सामान्य माणसाला खेळवत सत्ता ताब्यात ठेवणं हेच आजवर यांनी दाखवून दिलंय. मराठी माणसाच्या हक्कासाठी म्हणून स्थापन झालेल्या शिवसेनेत नेत्याच्या मुलाला उमेदवारी मिळाली की मतदारसंघातील गुजरात्यांचे प्राबल्य पाहून ‘केम छो वरळी’चे फलक लागतात. अशावेळी आपणच आपल्या विचारधारेशी प्रतारणा करतोय, असं यांना वाटत नाही. स्थानिक प्रशासनाला हाताशी धरून सुखाशिन आयुष्य जगणार्या अशा घराण्यांना सामान्य माणूस फक्त मतदानापुरता लागतो. म्हणूनच त्यांना नेस्तनाबूत करण्यासाठी सामान्य माणसाने आता पुढाकार घ्यायला हवा. सामान्य माणसांतूनच पुन्हा एखादे यशवंतराव चव्हाण, एखादे शरद पवार किंवा एखादे राज ठाकरे जन्माला येणं ही काळाची गरज आहे. त्यासाठी या सर्वपक्षिय नेत्यांच्या कार्यपद्धतीचा अभ्यास केला पाहिजे. अशा ‘होपलेस’ घराण्यांना नाकारणं नकारात्मक वाटत असलं तरी भविष्यातील महाराष्ट्राचा विचार करता हे अत्यंत गरजेचं आहे.
– घनश्याम पाटील
७०५७२९२०९२
पूर्वप्रसिद्धी – दै. पुण्यनगरी ८ मे २०२२
सहकार संस्था बंद झाल्या की घरानेशाही मुळापासुन आपोआप बंद होईल
#BitterReality
वास्तव
नाकर्ते घराणे नाकारा..हा अतिशय परखड व राजकीय विश्लेषणात्मक लेख..कायम याच घराण्यांनी का राजकारण करायचे कारण राजकारणातून येणारे घबाड सांभाळून पुढे खुर्चीची लालसा टिकवून ठेवायची व कार्यकर्त्यांनी फक्त सतरंज्या उतरायच्या हे कुठे तरी थांबवण्याची ताकद मतदारात आहे..ती किमया करायला हवी.