मुडदा बशिवला मेल्याचा!

 

कुणाच्याही मृत्युची अपेक्षा ठेवणं वाईटच! त्याचं समर्थन नाही होऊ शकत! मात्र एखादा माणूस अतिरेक करत असेल, एखाद्याला तो जमिनीचा भार वाटत असेल, त्याच्यामुळं एखाद्याचं वैयक्तिक किंवा समाजाचं मोठं नुकसान होत असेल तर मो मेला पाहिजे असं अनेकांना वाटतं. त्याच्या अशा ‘वाटण्या’नं समोरचा मरणार नसतो. तरीही अनेकजण तळतळाट देतात. समोरचा संपला पाहिजे अशी इच्छा व्यक्त करतात. काही वेळा हे वैयक्तिक शत्रुत्वातून घडतं, काहीवेळी व्यापक समाजहिताच्या विचारानं होतं. मग त्यासाठी काहीवेळा कटकारस्थानं रचली जातात, हल्ले होतात. खून पडतात. शत्रू मेला पाहिजे म्हणून पूर्वीच्या काळी तर घनघोर लढायाही झाल्या आहेत. समोरचा ‘मेलाच पाहिजे’ या ध्येयानं नको नको ते केलं जातं. असं सगळं असूनही आपण साळसूदपणे म्हणतो की एखाद्याचं मरण चिंतणं ही आमची संस्कृती नाही. आमची संस्कृती फक्त मरण चिंतण्याचीच नाही तर दुर्जनांच्या नाशासाठी प्रसंगी सर्वस्वाचा त्याग करून शस्त्र हातात घेण्याचीही आहे.

केतकी चितळे नावाच्या एका अभिनेत्रीने एका कवीची एक रचना समाजमाध्यमांवर सामायिक केली. खरंतर त्या रचनेला कविता म्हणता येणार नाही. मात्र त्यात एका पवाराचं वय ऐंशी झालंय, आता त्यानं इथला कारभार उरकावा, नरक त्याची वाट पाहत आहे अशा आशयाची मांडणी केली. ज्याच्यावर कविता लिहिलीय त्याची लाळ गळतेय, तो समर्थांचे माप काढतो, त्याला ब्राह्मणांचा मत्सर आहे, त्याचं तोंड वाकडं झालंय, तो लबाडांचा लबाड आहे अशी मांडणी केलीय. या वर्णनावरून ही कविता ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यावर असल्याचं सांगितलं गेलं आणि केतकी चितळेवर अनेक गुन्हे दाखल केले गेले. हे प्रकरण इतक्यावरच थांबलं नाही तर केतकीला न्यायालयात नेलं गेलं आणि तिला पोलीस कोठडीही झाली. अपस्मार हा दुर्मीळ आजार असलेल्या केतकीनं न्यायालयात वकील न घेता स्वतःची बाजू स्वतः मांडली आणि समाजमाध्यमांवरील ती कविता काढून टाकण्यासही नकार दिला. केतकीच्या या अघोरी धाडसानंतर अनेकांनी तिच्यावर वाटेल तशी शेरेबाजी केली. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी सर्व मर्यादा, सर्व पातळी सोडत तिच्यावर तोंडसुख घेतलं. ‘ती बुधवार पेठेतील रंडी आहे’, ‘तिला नागवं करून ठोका’ इथंपासून ते इथं मांडता येणार नाही अशा बिभत्स भाषेत तिच्यावर टीका करण्यात आली. तिनं तिचा रोष व्यक्त करताना ठेवलेली अपेक्षा अतिशय सौम्य वाटावी इतकी विकृती अनेकांनी दाखवली. ‘कुणाचाही मृत्यू चिंतणं ही आपली संस्कृती नाही’ हे वाक्य रेटून नेत केतकीला ट्रोल करण्यात आलं.
‘मृत्यू चिंतू नये’ असं म्हटलं जात असताना मला आचार्य अत्रे यांचे काही प्रसंग आठवले. त्यात त्यांनी समोरच्याचा ‘मृत्यू’ चिंतला आहे, तोही जाहीरपणे! तरीही मला किंवा पत्रकारितेतल्या कुणालाही अत्रेसाहेब कधीही ‘विकृत’ वगैरे वाटले नाहीत. उलट आम्हा पत्रकारांचे ते आदर्श आहेत. शंकरराव देव यांचा संयुक्त महाराष्ट्राला विरोध होता. त्यावेळचा त्यांचा गाजलेला लेख होता, ‘शंकर देवा, सोडून देवा, नरेंद्र देवा का नेले?’ याचा अर्थ एखादा चांगला माणूस गेला तर त्याऐवजी त्याला वाईट वाटणारा दुसरा माणूस का जात नाही? असं वाटणं ही मानवी वृत्ती आहे.
अत्रेसाहेबांच्या आणखी एका लेखाचं शीर्षक होतं, ‘अठरा वर्षाचा थेरडा.’ त्यात ते अशा आशयाचं लिहितात, ‘‘हे शीर्षक वाचून वाचकांना कदाचित आश्चर्य वाटेल. अठरा वर्षाचा ‘थेरडा’ कसा असू शकतो? मात्र हे घडू शकते! आपल्या भारतात तर नक्की घडू शकते. नरराक्षस मोरारजी देसाई या ७२ वर्षीय थेरड्याचा आज अठरावा वाढदिवस आहे. म्हणजे मोरारजी यांची जन्मतारीख २९ फेब्रुवारी (लिप इयर) असल्याने चार वर्षात ते एकदाच वाढदिवस साजरा करतात. आज ७२व्या जन्मदिनी ते त्यांचा अठरावा वाढदिवस साजरा करत आहेत. १०६ आंदोलकांवर गोळीबार करण्याचे आदेश देणारा हा माणुस शतायुषी व्हावा अशी अभद्र अपेक्षा मी ठेवणार नाही. त्यातही ते शतायुषी झालेच तर त्यांची ती ‘गद्धे पंचविशी’ असेल. मी देवाला विनंती करेन की पृथ्वीवरची ही घाण लवकरात लवकर तुझ्याकडे बोलव आणि त्यापासून आम्हाला सोडव…’’
अनेकांना आचार्य अत्रे एखाद्या खोडकर मुलासारखे निष्पाप वाटतात. ‘कर्‍हेचे पाणी’चे खंड सोडा पण त्यांचं ‘मी कसा झालो?’ हे एक पुस्तक जरी कोणी वाचलं तरी ते त्यांच्या प्रेमात पडतील. संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या या सेनानीचे महाराष्ट्रावर शब्दशः ऋण आहेत. त्यांनी मोरारजी देसाई यांच्यावर एक उत्कृष्ट ब्लॅक जोक केला होता. त्यावेळी सौदी अरेबियाचे राजे भारतात आले होते. त्यांची एक बातमी प्रसिद्ध झाली होती. चंदीगड येथे ते कारमधून फिरत असताना त्यांच्या गाडीखाली कोंबडी सापडली. त्यांनी कोंबडीच्या मालकाला दोनशे रुपये दिले. त्यानंतर आचार्य अत्रे गोष्ट तयार करतात. – ‘‘राजे मुंबईला आले आणि त्यांना मोरारजी विमानातून मुंबई दाखवायला फिरू लागले. विमानात राजे, मोरारजी आणि वैमानिक होता. विमान जेव्हा धारावीच्या झोपडपट्टीवरून फिरू लागले तेव्हा राजे गरिबांचा कळवळा येऊन दोन्ही हाताने पैसे खाली फेकू लागले. मोरारजींनी विचारले, ‘‘हे काय करताय?’’ तर त्यावर ते म्हणाले की ‘‘मला धारावीचे लोक खूश व्हायला पाहिजेत असे वाटते.’’ त्यांचं बोलणं ऐकणारा वैमानिक मध्येच म्हणाला, ‘‘तुम्हाला फक्त धारावीचेच काय संपूर्ण महाराष्ट्रातील लोक खूश व्हावे असे वाटत असेल तर पैशाच्याऐवजी या मोरारजीला खाली फेका…’’मर्यादापुरूषोत्तम प्रभू श्रीरामचंद्रांनी रावणाचा वध केला. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजलखानाचा कोथळा बाहेर काढला. या आणि अशा कोणत्याही घटनेला धार्मिक किनार नव्हती. दुर्जनांचा नाश हे प्रभू श्रीरामांचं ध्येय होतं. जो स्वराज्याच्या विरोधात आला त्याच्या खांडोळ्या करायच्या हे मावळ्यांना पक्कं ठाऊक होतं. यापैकी कुणालाही ‘शत्रूचं मरण चिंतणं ही आपली संस्कृती नाही’ असं वाटलं नाही. नथुराम गोडसे या माणसानं महात्मा गांधी यांच्यासारख्या अहिंसेच्या पुजार्‍याला मारलं. अशा घटनांचं कधीही समर्थन होऊ शकणार नाही. नरराक्षस मोरारजी देसाई याच्यासारखा क्रूरकर्मा काळाच्या आड जावा असं मात्र आचार्य अत्रे यांच्यासारख्या संवेदनशील आणि सुहृद माणसाला वाटणं स्वाभाविक आहे. कुणाला काय वाटतं किंवा वाटावं हा आपल्याकडं गुन्हा नाही मात्र कायदा हातात घेऊन त्याची अंमलबजावणी करणं, कुणावर हल्ला करणं, हल्ला करण्यास चिथावणी देणं हा गंभीर गुन्हा आहे. गांधी हत्येनंतर नथुराम गोडसेला फाशी झाली. त्यावेळी जो जनक्षोभ उसळल्याचं दाखवलं गेलं आणि ब्राह्मण समाजाला पळता भुई थोडी करण्यात आली तो गुन्हा होता. यांच्या म्हणण्यानुसार केतकीनं शरद पवार यांच्यासारख्या नेत्याच्या मृत्युची अपेक्षा करण्याचा गुन्हा केला असला तरी त्यानंतर पवारांचे बगलबच्चे आणि सत्ताधारी पक्षाचे अनेक समर्थक जो अश्लाघ्यपणा करत आहेत तो मुळीच समर्थनीय नाही. चितळे-भावे या आडनावांचा आधार घेत पुन्हा एकदा ब्राह्मणांना खलनायक दाखवायचा उद्योग सुरू आहे.
गेल्या आठवड्यातच शरद पवार यांनी आपल्या भाषणात एक कविता सादर केली. त्यात त्यांनी हिंदू मंदिरांचा संदर्भ देत ‘साल्यांनो, मी तुमच्या देवांचा बाप’ वगैरे भाषा केली. मूळ कवितेत नसलेल्या या ओळी त्यांनी बिनधास्तपणे वापरून आपण ‘हिंदुंचे बाप’ असल्याचं अप्रत्यक्षपणे सांगितलं. पवारांच्या या क्रियेच्या प्रतिक्रिया उमटणं स्वाभाविक होतं आणि केतकीनं शेअर केलेली ही कविताही अशीच प्रतिक्रियावादी होती. शिवसेना नेत्यांनीही ‘मुंबईचा एकच बाप आहे आणि तो म्हणजे शिवसेना’ असं सांगितलं. त्याला उत्तर देताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, ‘मुंबईचा, महाराष्ट्राचा बाप एकच आहे आणि ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज.’
मुंबईचे, राज्याचे, अगदी देवाचेही स्वयंघोषित ‘बाप’ व्हायला निघालेल्या शरदमियाँविषयी, उद्धव यांच्याविषयी सामान्य माणसाला जिव्हाळा वाटण्याचं काय कारण? मग केतकी चितळेनं अशी कविता समाजमाध्यमावर सामायिक केली तर ती गुन्हेगार कशी? सत्ताधारी पक्षातील अनेक नेत्यांवर भ्रष्टाचार, अपहरण, विनयभंग, बलात्कार असे गंभीर आरोप आहेत. त्यांच्याकडं दुर्लक्ष करत एखाद्या आजारी अभिनेत्रीला पोलीस कोठडी देण्याचा पराक्रम मायबाप सरकारनं केला आहे. तिच्यापेक्षा कितीतरी टोकाच्या प्रतिक्रिया इथल्या अनेक सामान्य माणसांच्या आहेत. जोपर्यंत तुम्ही तिकडे दुर्लक्ष कराल तोपर्यंत यांनी तुमच्या पक्षांचं सरण रचलेलं असेल.
शरद पवार काय किंवा नरेंद्र मोदी काय कुणाच्याही मृत्युची अपेक्षा कोणीही सहजासहजी बाळगणार नाही. लोक ज्या परिस्थितीतून जात आहेत ते पाहता टोकाचा संताप निर्माण होतो. २०११ साली शरद पवार केंद्रीय कृषीमंत्री असताना पंजाबच्या अरविंदर सिंग या तरूणानं त्यांना जाहीरपणे कानाखाली वाजवली होती. त्या थपडेचा आवाज जगभर घुमला. पवारांनी महात्मा गांधींच्या आविर्भावात आपण त्याला माफ करत असल्याचं सांगितलं. मात्र पुढं त्याचं काय झालं? त्याच्यावर गुन्हे नोंदवल्यानंतर त्याला घर सोडून कुठं पळून जावं लागलं, त्याची, त्याच्या कुटुंबाची काय अवस्था झाली हे सर्वश्रुत आहे. सूडाच्या भावनेनं पेटलेल्या आपल्या राजकारण्यांच्या नादी लागणं हाच मोठा गुन्हा झालाय. एखाद्या संपादकाला त्याच्या घरून उचलणं, कंगना रानौतसारख्या अभिनेत्रीला त्रास देऊन ‘उखाड दिया’ म्हणत मिजास करणं, साधूंची हत्या होऊनही मौन बाळगणं, केतकीला अटक करणं हे सगळं काय आहे? त्याउलट बलात्काराच्या आरोपातील नेत्याला पदोन्नती मिळतेय. आपल्या सुनेचा हुंड्यासाठी छळ करणारी महिला आघाडीची प्रमुख होतेय. कहर म्हणजे महाराष्ट्र आपली जहागीर आहे अशा आविर्भावात यांची सर्व विधानं असतात. यांच्याविरूद्ध काही केलं, बोललं की तो राजद्रोह ठरतो. यांच्याविरूद्ध व्यक्त झालं की तो महाराष्ट्राचा अपमान ठरतो. कुणाच्याही विधानानं महाराष्ट्राचा अपमान व्हावा इतका महाराष्ट्र लेचापेचा नाही. घटनेनं जर प्रत्येकाला आपले विचार मांडण्याचा अधिकार दिलाय तर त्याचं स्वातंत्र्य जपायलाच हवं. ‘विचारांची लढाई विचारांनीच लढायला हवी’ असं तुणतुणं कायम वाजवत असताना त्यातील सोयीस्करपणा बाजूला सारायला हवा.
एकीकडं केतकी चितळेवर कारवाई होत असताना दुसरीकडं पुण्यात भाजपचे कोशाध्यक्ष असलेल्या प्रा. विनायक आंबेकर यांच्यावर काहींनी हल्ला केला. त्यांच्या कार्यालयात जाऊन त्यांना मारहाण करण्यात आली. पुण्यातील राष्ट्रवादीचे नेते अंकुश काकडे हे याचे सूत्रधार असल्याचा आरोप आंबेकरांनी केला आहे. या सगळ्या प्रकाराचं सीसीटीव्ही फुटेज व्हायरल झालं आहे. त्यांना मारहाण करताना कार्यकर्ते दिसतात. मात्र त्यांना अटक करण्याची धमक प्रशासनाला दाखवता आली नाही. राष्ट्रवादी विद्यार्थी संघटनेचा पश्चिम महाराष्ट्राचा अध्यक्ष असलेल्या सुहास विजय कदम नावाच्या व्यक्तिने तर आपल्या पक्षाच्या लेटरहेडवर अधिकृत पत्रक काढून आवाहन केले आहे की शरद पवार यांच्याविरूद्ध बोलणार्‍या कोणत्याही व्यक्तिला शोधा आणि घरी जाऊन झोडा… हे सगळं उघड होत असताना सत्ताधारी शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे नेते हजार किलो मूग गिळून गप्प आहेत. राष्ट्रवादीच्याच दिलीप वळसे पाटील यांच्याकडं गृहमंत्रीपद असूनही त्यांनी खाल्ल्या मिठाला जागत इकडं दुर्लक्ष केलं आहे.

कोणी काही मत मांडतंय म्हणून जर त्याला घरी जाऊन ठोकणार असाल तर मग कायदा काय करेल? याला ‘विचारांची लढाई विचारानं’ लढणं म्हणतात का? शरद पवार यांच्यासारख्या नेत्याचं मूल्यमापन करताना त्यांची हजारो चांगली कामं सांगता येतील. देशाच्या, राज्याच्या भल्यासाठी जे निर्णय घेतले त्यांची जंत्री इथं मावणार नाही. मात्र टोकाचा जातीयवाद, ब्राह्मणद्वेष, सत्तेसाठी वाटेल तशा तडजोडी, खंजीर खुपसणं, आपली मतं आणि भूमिका सतत बदलणं, अनेकांना त्यांच्या आयुष्यातून उठवणं, सहकार क्षेत्राचं वाटोळं करणं हे सारं कोण नाकारणार? त्यामुळं पवार यांच्यासारख्या नेत्यांना जसे देव मानणारे आहेत तसंच त्यांना पाण्यात पाहणारेही आहेत. केवळ चार व्हिडिओतून त्यांच्या धूर्तपणावर प्रहार केले म्हणून आमच्याविरूद्ध थेट ‘शरद पवारांच्या हत्येचा कट आणि ठाकरे सरकार उलथवून लावायचा प्रयत्न’ म्हणून पोलिसांकडं तक्रारी दिल्या गेल्या. असं सगळं असताना केतकी चितळे हे फक्त एक प्रातिनिधिक उदाहरण आहे. अनेकांच्या मनात असा रोष आहे आणि या धनाढ्यांविरूद्ध आपण काहीच करू शकत नाही ही हतबलतेची भावनाही!
आपल्या प्रत्येकाला कर्माचा सिद्धांत मान्य करायला हवा. लोक त्यांच्या त्यांच्या नजरेतून बोलत राहतात. त्यांच्या बोलण्यानं कुणाचंही चांगलं किंवा वाईट होणार नाही. राज्यासमोर, देशासमोर अनेक गंभीर समस्या असताना तिकडं दुर्लक्ष करत नको ते वाद आणि वितंडवाद निर्माण करण्यात अर्थ नाही. ज्याचं त्याचं कर्म ज्याच्या त्याच्या पदरात पडो, इतकीच नैसर्गिक अपेक्षा. बाकी कुणाच्या मृत्युची वाट पाहणं किंवा कोणी ‘मसीहा’ जन्माला येईल म्हणून आस लावून बसणं हे दोन्ही खुळेपणाचं. महाराष्ट्रात गेल्या काही काळापासून जे राजकारण सुरू आहे त्याचे पडसाद भविष्यात दीर्घकाळ पडतील. शरद पवार असोत किंवा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, ते सतत म्हणतात की केंद्र सरकार त्यांच्यासोबत सूडाचं राजकारण करत आहे. त्यातून हे सगळं उद्भवत आहे. ‘सूड’ कोणाचा उगवतात? एखाद्यानं पूर्वी कुणाचं काही नुकसान केलं असेल, कुणाला त्रास दिला असेल, कुणाचं अहित केलं असेल तर त्याचा. पवार-ठाकरे यांच्या म्हणण्यानुसार केंद्र सरकार किंवा मोदी त्यांचा ‘सूड’ उगवत असतील तर यांनी आधी कोणते कर्म किंवा दुष्कर्म करून ठेवलं आहे ते पडताळून पहायला हवं.

या सगळ्यात सामान्य माणसाचं आणि राज्याचं जे नुकसान होत आहे ते अतोनात आहे. शह-काटशहाचं राजकारण करताना, कुरघोड्या करताना आपण कोणत्या दिशेनं जात आहोत याचा गंभीरपणे विचार झालाच पाहिजे. दहा-बारा वर्षांपूर्वी शरद पवारांना जेव्हा कॅन्सरचं निदान झालं तेव्हा त्यांच्या डॉक्टरांनी सहा महिन्यात राहिलेली सर्व कामं उरका, असं सांगितलं होतं. बालगंधर्व रंगमंदिर येथे झालेल्या साप्ताहिक ‘सकाळ’च्या वर्धापनदिन समारंभात याविषयी खुद्द पवारांनीच सांगितलं होतं की माझी इच्छाशक्ती इतकी मजबूत होती की मी त्या डॉक्टरला सांगितलं, माझी चिंता करू नकोस. तू अजून तरूण आहेस. तू तुझी काळजी घे. तुला पोहोचवल्याशिवाय मी जाणार नाही… त्यानंतर ज्या गुटख्याच्या सवयीमुळं त्यांना तोंडाचा कर्करोग झाला त्या गुटख्यावर त्यांनी बंदी आणली. आपला आहार, व्यायाम याचं काटेकोर नियोजन केलं. म्हणूनच आजही ते खणखणीत आहेत. केतकी चितळेनं काहीही म्हणो, ते शतायुषी व्हावेत असंच आम्हाला वाटतं. खेड्यापाड्यात आजही आपल्या उनाड मुलाला रागवताना त्याची आई म्हणते, मुडदा बशिवला मेल्याचा! केतकी चितळेच्या भावनाही अशाच मातृहृदयानं समजावून घ्याव्यात आणि अरविंदरसिंहसारखं तिच्याकडं दुर्लक्ष करावं. हे शक्य होईल असं वाटत नसतानाही सर्वात्मकतेचा आपला संस्कार स्मरून पवारांच्या निरोगी आयुष्यासाठी शुभचिंतन करतो.

– घनश्याम पाटील
संपादक, ‘चपराक’, पुणे
7057292092

चपराक

पुणे शहरातून ‘साहित्य चपराक’ हे मासिक आणि ‘चपराक प्रकाशन’ ही उत्तमोत्तम पुस्तके प्रकाशित करणारी ग्रंथ प्रकाशन संस्था चालविण्यात येते. ‘साहित्य चपराक’ मासिकाचा अंक दरमहा 10 तारखेला प्रकाशित होतो. आपले साहित्य पाठविण्यासाठी, ‘चपराक’मध्ये जाहिराती देण्यासाठी आणि नवनवीन पुस्तकांच्या माहितीसाठी संपर्क - घनश्याम पाटील, संपादक 'चपराक'.
व्हाट्सऍप क्रमांक - ८७६७९४१८५०
Email - Chaprak Email ID

13 Thoughts to “मुडदा बशिवला मेल्याचा!”

  1. Nagesh Shewalkar

    घनश्यामजी,
    अत्यंत अभ्यासपूर्ण, वैचारिक असा लेख आहे. प्रत्येक मुद्दा सोदाहरण लिहिला आहे. खूप आवडला.

  2. Prof. Baba Borade

    लेखाला अनेक कंगोरे आहेत. सामान्य माणूस घडलेल्या घटनेचा सर्वच बाजुंनी विचार करत नाही. त्याला ते जमत नाही. आपल्या लेखामुळे अनेक संदर्भ उलगडतात. त्यामुळे लेख दिशादर्शक आहे.

  3. R K Adkar

    हे आवश्यक होते! कोणीतरी त्या केतकी च्या पाठीशी उभे राहिले पाहिजे! आपण. मांडलेल्या रास्त आणि व्यवहार्य तरीही सडेतोड भुमिकेबद्दल अभिनंदन ! तिची पोलीस कोठडी रद्द होण्यासाठी हायकोर्टाने स्वतः होऊन दखल घेतली पाहिजे !

    1. Siddheshwar tapkir

      केतकीच्या पाठीशी उभं राहणं म्हणजे तिने जी गरळ ओकली आहे त्याला समर्थन देण आहे. हे आपणास मान्य आहे का?

      1. shamsunder

        दुसर्याच दिवशि मुख्यमंत्र्यांनि माजि मुख्यमंत्र्याबद्दल शारिरिक टिका केलि सोमैय्याला तोतर्या म्हणाले तेव्हा तुम्हि डोळे का मिटुन घेता भाटगिरि का करता खर बोलायचि हिम्मत ठेवा ना

  4. जयंत कुलकर्णी

    अभ्यासपूर्ण लेख. उदाहरणांनी लेख आशय यूक्त झाला आहे.

  5. बाबासाहेब भोरकडे

    अगदी खरंय.. जाणत्या राजाने जनतेच्या श्रद्धेची हात घातला तरी जनतेनी काहीच व्यक्त व्हायला नको..ही अपेक्षा चुकीची आहे..मुडदा बसवीला त्याचा..मुलाच्याही चुका विशाल मनाने पराव साहेबांनी पदरात घ्यायला हव्यात.. त्यामुळे त्यांचे मोठेपण सिद्ध होणार आहे.. महाराष्ट्र मुक्ती संग्रामात..पुलं,दादा कोंडके, प्रबोधनकार यांच्या भाषणाने महाराष्ट्र ढवळून निघाला.‌त्यात केलेलली चिखलफेक.. सुंदर लेखन

  6. Siddheshwar tapkir

    एकांगी, अभिजन वर्गाची चाटूगिरी करण्यासाठी लेखणी झीझवली आहे. श्री पवार यांच्या आजारपनावर खालच्या स्तरावरील टीका एक टीनपाट अभीनेत्री करते आणि तिची वकिली तुम्ही टुकार लेखाने करताय.
    तीच आजारपण दिसत मन श्री पवार यांचा कॅन्सर दिसत नाही का?
    अत्यंत सुमार, एकांगी लेख.
    स्वतः ला अत्रे समाजतायेत. संपादक महाशय तुम्ही गोदी मीडियातील टुकार पत्रकार आहात.
    आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. चार दोन पद किंवा साहित्य संमेलणाचं अध्यक्षपद यासाठी स्वतःचा आत्मा विकू नका. अजूनही वेळ आहे.

  7. Vinod panchbhai

    सडेतोड आणि सुस्पष्ट लेखन!

  8. Jagdeesh Naik

    अतिशय सुरेख लेख, केवळ एका ठिकाणचा उल्लेख खटकला “गांधी सारखा अहिंसेचा पुढारी” अत्यंत चुकीचं वाक्य आहे. गांधी ह्या ईसमामुळे आपण आज या गर्तेत आहोत.

  9. राज

    अप्रतिम

  10. रमेश वाघ

    सर्वांसुंदर

  11. Pradnya Karandikar

    जबरदस्त लेख…

तुमची प्रतिक्रिया जरूर कळवा

हे ही अवश्य वाचा