चार किमी पोहणे, १८० किमी सायकलिंग आणि त्यानंतर ४२.२ किमी पळणे असा क्रम तुम्हाला कोणी दिला आणि कसलीही विश्रांती न घेता ठरलेल्या वेळेत हे सगळं पूर्ण करायला सांगितलं तर तुम्ही काय कराल? ‘आयर्न मॅन’ नावाची अशी एक स्पर्धा असते आणि त्यात हा विक्रम करावा लागतो. इतकं सगळं केल्यावर तुम्हाला पोलादी पुरूष म्हणून मान्यता मिळते. वयाच्या पस्तीशीनंतर या स्पर्धेविषयी कळल्यानंतर कठोर परिश्रम घेत एकदा नव्हे तर ऑस्ट्रेलिया आणि जर्मनी अशा दोन देशात झालेल्या या स्पर्धेत दोनवेळा यश मिळवणारे अलौकिक व्यक्तिमत्त्व म्हणजे निफाड तालुक्यातील पिंपळगाव बसवंत येथील डॉ. अरूण गचाले! बालरोगतज्ज्ञ असलेल्या डॉ. गचाले यांचा हा कठीण प्रवास नाशिकच्या सिद्धहस्त लेखिका सुरेखा बोर्हाडे यांनी शब्दबद्ध केलाय आणि ‘डॉक्टर ते आयर्नमॅन’ या पुस्तकाच्या माध्यमातून ‘चपराक प्रकाशन’ने तो प्रभावीपणे वाचकांसमोर आणलाय.
शरीर आणि मनाची कणखरता असल्याशिवाय असे अचाट धाडस करता येणार नाही. म्हणूनच जगातील सर्वात कठीण स्पर्धा म्हणून आयर्न मॅनकडे बघितले जाते. फक्त नाशिकच्याच नाही तर देशाच्याही लौकिकात भर घालणारी अशी कामगिरी यशस्वीरित्या पार पाडत डॉ. गचाले यांनी नाशिकला ‘आयर्न मॅन सिटी’ बनवण्याचे व्यापक आणि उदात्त ध्येय डोळ्यांसमोर ठेवले आहे. म्हणूनच आजच्या तरूणाईपुढे आदर्शांचा मानदंड उभ्या करणार्या या बुलंद माणसाचे हे प्रेरक चरित्र प्रत्येकाने वाचायला हवे. हे पुस्तक वाचून स्विमिंग, सायकलिंग आणि रनिंग या तीन इव्हेंटची तयारी जे कोणी करतील ते करोत मात्र आपल्या आरोग्याच्या, व्यायामाच्या जागृतीसाठी प्रत्येकाने हा संघर्ष समजून घेणे गरजेचे आहे. तसे झाले तरी या पुस्तकाचे सार्थक झाले असे म्हणावे लागेल.
आपल्या मातीतल्या लोकांनी जगात भारताचा झेंडा असा उंचावत ठेवणे ही प्रत्येकासाठी अभिमानास्पद बाब आहे. हे ईप्सित साध्य करताना डॉ. अरूण गचाले यांनी जो संघर्ष केला तो वाचताना अंगावर अक्षरशः शहारे येतात. वैद्यकीय व्यवसायात सगळे सुरळीत सुरू असताना वयाच्या पस्तीशीनंतर या स्पर्धेकडे वळणे आणि त्यात असे यश मिळवणे हे काम सोपे नाही. महाराष्ट्र राज्याचे अॅडिशनल डीजीपी डॉ. रवींद्रकुमार सिंघल यांच्यापासून प्रेरणा घेत आयर्न मॅन व्हायचेच असा निश्चय केलेल्या डॉ. गचाले यांचे मनोधैर्य अफाट आहे. त्यांचे गुरू मुस्तफा आणि चैतन्य वेल्हाळ यांनी त्यांच्याकडून योग्य तो सराव करून घेतला. त्याचे फलित म्हणजेच या कठीण स्पर्धेतले त्यांचे यश आहे. पुस्तकाच्या लेखिका सुरेखा बोर्हाडे याबाबत लिहितात, ही क्रीडाप्रकार पूर्ण करणारी व्यक्ती जीवनात येणार्या कोणत्याही मोठ्या संकटांना किंवा अवघड गोष्टींना नक्कीच यशस्वीपणे तोंड देऊ शकते. कवचकुंडले परिधान केलेला समर्थ योद्धा म्हणजे आयर्न मॅन योद्धा असं म्हटलं तर वावगं ठरू नये. ही कवचकुंडले मात्र या खेळाडूस जन्मतःच मिळालेली नसून ती त्याने अपार कष्टाने, मेहनतीने आणि मनाच्या सक्षमतेने मिळवलेली असतात. डॉ. अरूण गचाले यांचे आयर्न मॅन स्पर्धेच्या तयारीसाठीचा सराव, प्रत्यक्ष स्पर्धेच्या काळातील अनुभव आणि हा क्रीडा प्रकार आपल्याकडे वाढावा यासाठीचे कार्य वाखाणण्याजोगे आहे.
या पुस्तकात डॉ. गचाले यांचे बालपण, वैद्यकीय शिक्षण, डॉक्टर म्हणून केलेले आणि करत असलेले कार्य आणि आयर्न मॅन स्पर्धेचा ध्यास घेऊन त्यात मिळवलेले यश असे सारे काही आले आहे. घरात कसलीही पार्श्वभूमी नसताना त्यांनी जे देदीप्यमान यश मिळवले ते म्हणूनच कौतुकास पात्र ठरते. डॉ. गचाले यांच्या महाविद्यालयीन ग्रुपमध्ये असलेल्या आताच्या केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारतीताई पवार, सिनिअर लिव्हर ट्रान्सप्लान्ट सर्जन अशोक थोरात, डॉ, नितीन साठे, लातूरच्या शासकीय मेडिकल कॉलेजचे डीन उमेश लाड, तमिळनाडू राज्याच्या वैद्यकीय सचिव डॉ. शुभांगी बाविस्कर, नाशिक महानगरपालिकेचे प्रमुख वैद्यकीय अधिकारी बापूसाहेब नागरगोजे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दावल साळवे अशा अनेकांची माहिती हे पुस्तक वाचताना मिळते. डॉ. गचाले यांच्या सहचारिणी डॉ. मानसी यांचीही मोलाची साथ हे पुस्तक वाचताना कळते.
जर्मनीच्या स्पर्धेसाठी जाताना डॉ. गचाले यांच्या मुलीने, मृण्मयीने त्यांना सांगितले होते की, ऑस्ट्रेलियाचा इव्हेंट तुम्ही चार मिनिटे राखून जिंकला होता. आता हा इव्हेंट त्याहीपेक्षा लवकर संपवा. कारण शेवटच्या क्षणांमध्ये, शेवटच्या टप्प्यावर आम्हालाही खूप टेंशन येते.
खरेतर शेवटचा टप्पा पूर्ण करणे सर्वात कठीण आणि जिकिरीचे असते. मात्र त्यांनी मुलीला शब्द दिला आणि तो पूर्णही केला. जेव्हा शरीर थकलेले होते, पाऊल उचलणेही जड झाले होते तेव्हा हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मरण केले आणि अंगात नवे चैतन्य निर्माण झाले असे डॉ. गचाले सांगतात. या स्पर्धेतील यशानंतर भारतातील महत्त्वाच्या माध्यमांनी त्यांची योग्य ती दखल घेतली आणि आयर्न मॅनविषयी अनेकांना माहिती झाली. ‘करना है, कुछ करके दिखाना है’ या पठडीतल्या डॉक्टरांनी देशाच्या लौकिकात भर घातली आहे. या पुस्तकाच्या माध्यमातून त्यांचे चरित्र आणि चारित्र्य वाचकांसमोर आले आहे.
‘हा पळण्यासाठी पिंपळगाव बसवंतहून नाशिकला जातो’ असं म्हणणार्यांपुढे त्यांनी एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे. एका जिगरबाज खेळाडूची यशोगाथा समजून घेण्यासाठी हे पुस्तक नक्की वाचायला हवे. डॉक्टरांची अथक मेहनत आणि सुरेखा बोर्हाडे यांनी त्याचे केलेले मनोहारी शब्दांकन यामुळे हा ग्रंथ दिशादर्शक झाला आहे.
घनश्याम पाटील
७०५७२९२०९२
पूर्वप्रसिद्धी – ‘अक्षरयात्रा’ दैनिक पुण्य नगरी १ मे २०२२