सहा फुटापेक्षा जास्त उंच, गव्हाळ रंग, शुभ्र केस, भारदस्त खाकी पोशाख, रूबाबदार चाल, चेहर्यावर करारी भाव असणारे सोलापूरचे पोलीस आयुक्त हरिश बैजल त्यांच्या गाडीतून उतरून चालत समोर आले तेव्हा दडपून जायला झालं. वेळ कमी आहे आणि मुलांशी बरंच बोलायचं आहे…असं म्हणत ते थेट सभागृहात पोहोचले. विद्यार्थ्यांच्या डोळ्यात बैजल सरांविषयीचं कुतूहल आणि ऐकण्याची उत्सुकता स्पष्ट दिसत होती.
सरांविषयी बरंच ऐकलं, वाचलं होतं. मुलाखत घ्यायची म्हणून अजून खोदून माहिती काढली होती. मुलाखतीच्या सुरूवातीच्या प्रश्नात तुम्ही खाकी पोशाखाकडे कसे वळलात? अर्थात पोलीस अधिकारी व्हावं हे कधी वाटलं? या प्रश्नाचं उत्तर देताना लहानपणी डॉ. लक्ष्मण प्रसाद कुकडे…इतकंच ते बोलले आणि एक मोठी शांतता पसरली. काही सेकंदात लक्षात आलं की त्यांचे डोळे पाण्यानं डबडबलेले होते आणि आवंढा गिळून ते पुढं बोलण्याचा प्रयत्न करत होते. ते बोलायला लागले, हे अश्रू कृतज्ञतेचे आहेत. लहानपणी डॉ. कुकडे यांनी आईवडिलांना सांगितलं की या मुलाचं भविष्य उज्ज्वल आहे. याला उत्तम शिक्षण मिळावं म्हणून बोर्डिंगला घाला आणि या एका निर्णयानं माझं आयुष्यच बदललं.
पुढे ते म्हणाले की पुढे पुढे असे गुरू भेटत गेले की आयुष्याकडं पाहण्याची दृष्टी मला मिळाली. माझे विचार, मला आयुष्यात काय काम करायचं आहे हे स्पष्ट झालं आणि त्यानुसार अनेक उपक्रम राबवत मी काम करतो आहे. आता मी काही दिवसात निवृत्त होईन पण माझं हे काम अखंड सुरू राहील. खाकीची ओढ म्हणाल तर लहानपणापासून ती माझ्यात पेरली गेली होती कारण शाळेचा गणवेशच खाकी होता.
बैजल सरांनी त्यांच्या कार्यकाळात अनेक नवे उपक्रम राबवले. त्यापैकी गाजलेला एक उपक्रम म्हणजे नो हॉर्न डे जो त्यांनी मुंबईत राबवला. हा उपक्रम यशस्वी करण्यात अमिताभ बच्चन यांनीही पुढाकार घेतला होता आणि जनतेचं प्रबोधनही केलं होतं. ध्वनी प्रदूषणाचे दुष्परिणाम समजावत बैजल सरांनी मुलांना उभं रहायला सांगितलं. मुलांना हात पुढे करून शपथ घ्यायला लावली की – मी आयुष्यात कधीही विनाकारण हॉर्न वाजवणार नाही.
ध्वनी प्रदूषणासोबतच वायू प्रदूषण रोखण्यासाठी सायकलीच्या वापरावरही ते बोलले. कॉलेजची सुरूवात म्हणजे आधी गाडी पाहिजे, असा हट्ट करणार्या विद्यार्थ्यांना त्यांनी त्यांच्या सायकल मोहिमेत सामील व्हायचं आमंत्रण दिलं. बैजल सर अनेक वर्षांपासून नाशिक ते पंढरपूर सायकलीने वारी करतात. यात आज घडीला तीन हजार लोक त्यांच्या सोबत जोडले गेले आहेत. हे सांगत असताना एका महत्त्वाच्या मुद्याकडे वळत ते म्हणाले, सायकलीच्या या उपक्रमात मी स्त्रियांवर जास्त फोकस केला. एक स्त्री यात सहभागी होते तेव्हा आपोआप तिची मुलंही यात सहभागी होतात. एका स्त्रीचा सहभाग म्हणजे पर्यायानं कुटुंबाचा सहभाग ठरतो.
याबरोबरच त्यांनी एक छोटी पण महत्त्वाची बाब सांगितली की आपण साठच्या स्पीडने गाडी चालवतो तेव्हा कुठं आजूबाजूचं जग पाहतो पण सायकल चालवताना आपण भोवतालचा अवकाश पाहतो, अनुभवतो. शिवाय सायकल चालवणार्यांना गाडीवाले, कारवाले, रिक्षावाले येता-जाता ओरडत असतात, बोलत असतात. यातून आपल्यात विनम्रता टिकून राहण्यासही मदतच होते. केवळ पुस्तकी ज्ञानातून आपण घडत नसतो तर आजूबाजूचा परिसर, माणसं वाचता आली तरच आपण घडत जातो, समृद्ध होत जातो.
बैजल सरांचा सोलापूरातला पहिलाच दिवस होता आणि लक्ष्मी शिंदे नावाच्या दोन्ही हातांनी दिव्यांग असणार्या मुलीकडून सरांनी राखी बांधून घेतली. तिला बहिणीचा मान दिला. तसंच इथल्या तृतीयपंथियांनी सन्मानानं आयुष्य जगावं म्हणून त्यांना पेट्रोल पंपावर काम करण्याची संधी दिली. याविषयी बोलताना ते म्हणाले की तृतीयपंथीय जसे त्यांच्या रूपासाठी कारणीभूत नाहीत तसेच आपल्या रूपात आपलं काही योगदान नाही. आपल्याला ते जन्मतः मिळालेलं आहे. आपण ते मिळवलेलं नाही. त्यामुळं तृतीयपंथीयांचा अपमान करण्याचा किंवा त्यांना नाकारण्याचा आपल्याला अधिकार नाही. आपण स्वतःला पूर्ण पुरूष किंवा पूर्ण स्त्री समजत असू तर ते तेव्हाच पूर्ण आणि अर्थपूर्ण म्हणता येईल जेव्हा इतरांनाही समानतेची आणि सन्मानाची वागणूक देऊ.
तृतीयपंथियांबरोबरच गरजू महिलांना आत्मनिर्भर करण्यासाठी त्यांनी अनेक शिलाई मशीन आणि शिवणकाम त्यांना मिळवून दिलं. रोजगाराची निर्मिती केली. स्त्री सक्षमीकरणातूनच देश सुदृढ होतो हे पुन्हा एकदा त्यांनी विद्यार्थ्यांपुढे ठाशीवपणे मांडलं.
माणसाने माणसाशी माणसासम वागणे ही प्रार्थना आपण कायम म्हणतो पण बैजल सर ही प्रार्थना त्यांच्या कामातून जगायला शिकवतात आणि केवळ माणूसच नाही तर प्रत्येक प्राणीमात्रांशी माणुसकीचं त्यांचं वागणं खूप काही शिकवतं.
आपल्या ड्यूटीपलीकडं जात त्यांनी आयुक्त बंगल्यात अनेक पक्षी पाळले आहेत. या पक्षीसंग्रहालयाचं उद्घाटन त्यांनी पतंगाचा मांजा कापून केलं. मांज्यानं किंवा कुठल्या अपघातात दुखापत झालेल्या पक्ष्यांना ते इथं घेऊन येतात. त्यांचं औषधपाणी करतात आणि ते बरे झाले की त्यांना पुन्हा निसर्गात सोडतात. विशेष म्हणजे या पक्ष्यांना पाहण्यासाठी पहिल्यांदाच आयुक्त बंगला हा सर्वांसाठी खुला ठेवण्यात आला आहे. आत्तापर्यंत सहा हजार विद्यार्थी तिथं येऊन गेले आहेत.
याविषयी बोलताना ते म्हणाले की लहान मुलं पक्षी बघायला येतात, त्यांच्या हातात आम्ही पक्ष्यांचं खाद्य देतो. ते खायला तो पक्षी मुलांच्या हातावर येऊन बसतो. एखाद्या अनोळखी व्यक्तिवर पूर्ण विश्वास टाकून ते पक्षी आपल्या हातावर बसतात. बिनधास्त दाणे खातात आणि उडून जातात. ही गोष्ट अनुभवण्याची आहे. हा अनुभव या मुलांचं आयुष्य बदलून टाकेल याची खातरी आहे. यावेळी मुलं पाहतात की पतंगाच्या मांज्यानं पक्ष्याला कशी जखम झालीय! त्याला किती त्रास होतोय… तेव्हा पुढे कधीही ते पक्ष्यांना त्रास देण्याचं धाडसच करणार नाहीत. यातून आणखी एक महत्त्वाची गोष्ट साधण्याचा प्रयत्न असा की पोलिसांविषयी विनाकारण दहशत निर्माण केली जाते. विशेष करून लहान मुलांना आई म्हणत असते की – अभ्यास कर नाही तर पोलीस घेऊन जातील, जेवण कर नाहीतर पोलीस घेऊन जातील! यामुळे विनाकारण पोलीस लांबचे वाटतात. पक्षी संग्रहालयात मात्र पक्ष्यांबरोबर पोलिसांचा वावरही ते अनुभवतात तेव्हा त्यांचं मत बदलायला मदत होते. संग्रहालयातून बाहेर पडताना या चिमुकल्यांना पोलिसांविषयी विचारलं तर ते म्हणतात, हे आमचे मित्र आहेत.’ पोलीस मित्र वाटणं, त्यांच्याशी मित्रत्वाचं नातं निर्माण होणं आज अतिशय गरजेचं आहे. यातून हे साधण्याचा माझा एक प्रामाणिक प्रयत्न आहे.
विद्यार्थ्यांना जगाकडं पाहण्याची एक वेगळी दृष्टी देत असतानाच त्यांनी सजग नागरिक म्हणून घडणार्या विद्यार्थ्यांना आपले अधिकार आणि कर्तव्यांविषयी देखील मोलाचं मार्गदर्शन केलं. युनायटेड नेशन्समधील त्यांचा एक अनुभव त्यांनी सांगितला. एकदा तिथं सरकारी गाडीतून वर्दीत असताना रस्ता ओलांडून पुढे जाताना चुकून गाडी झेब्रा क्रॉसिंगवरून गेली. तेव्हा झेब्रा क्रॉसिंगवरून चालत जाणार्या एका तरूणानं सरकारी गाडीवर मूठ मारली आणि तो म्हणाला, धिस इज माय एरिया… म्हणजे ते आपल्या अधिकाराविषयी किती जागरूक आहेत, किती सजग आहेत… आपणही आपल्या अधिकाराविषयी असं सजग व्हायला हवं. आपल्यात मनोधैर्य नाही. तसंच कर्तव्याविषयी बोलायचं झालं तर टाटा मोटर्समधल्या एका ट्रक चालकाचं उदाहरण देत ते म्हणाले की तो चालक इतक्या तन्मयतेनं त्याच्या ट्रकची काळजी घ्यायचा, मनापासून काम करायचा की त्याला तो ट्रक बक्षीस म्हणून देण्यात आला. म्हणजे आपण करत असलेल्या कामाविषयी पूर्ण समर्पित असणं हेच आपलं मुख्य कर्तव्य आहे. आपण घडताना आपले आदर्श निश्चित असायला हवेत. अब्राहम लिंकन माझे आदर्श आहेत. त्यांचं आयुष्य आणि संघर्ष आपल्याला आपल्या जगण्याच्या वाटा स्वच्छपणे दाखवतात आणि पुढे नेतात.
ते म्हणाले, जसे आयुष्यात आदर्श महत्त्वाचे असतात तसं कलेचं स्थानही खूप महत्त्वाचं असतं. मी लहानपणी सतार, गिटार आणि पेटी वाजवायचो. कलेची साधना म्हणजे ध्यानधारणाच. जेव्हा जेव्हा शक्य होतं तेव्हा तेव्हा मी शास्त्रीय गायन, नाटक आवर्जून ऐकतो, पाहतो. या कलांचा आस्वाद ऊर्जा बहाल करते. हा माझ्यासाठी मोठा रिचार्ज असतो.
सर आता सेवानिवृत्त होत आहेत पण त्यांचं अखंड काम सुरूच आहे. त्यांनी गतिमंद मुलांसाठी शाळा काढली आहे. त्यांच्यासाठी ते सातत्यानं धडपडत असतात. या शाळेसाठी पैसा उभा करत असताना ते म्हणतात, अमिताभ बच्चनपासून अनेकांनी त्यांना मदत केली. आपल्या निस्वार्थ कामातूनच शब्दाला वजन प्राप्त होतं. त्याचा उपयोग मी त्या विशेष बालकांसाठी करतोय.
जितकी त्यांची उंची त्याहीपेक्षा जास्त उंची गाठणारं, आभाळाएवढं काम आणि तरीही जमिनीशी घट्ट असणारे त्यांचे पाय…दिव्यांग, तृतीयपंथीय, गरजू महिला, वेश्या, विशेष बालक याबरोबरच पक्षी, पर्यावरण यासाठी अविरत नव्या कल्पना राबवत सतत सक्रिय असणारे एक सामाजिक कार्यकर्ते, पोलिसांची भीती नाही तर त्यांच्याशी मैत्री निर्माण व्हावी अशी तळमळ असणारे खरे लोकसेवक, ध्वनी प्रदूषण कमी व्हावं म्हणून झटणारे, नाशिक ते पंढरपूर सायकलीनं वारी करणारे पर्यावरणप्रेमी वारकरी, कलेचा आणि कलावंतांचा सन्मान करणारे एक रसिक, आवाजातली जरब आणि त्याला असणारी ओलाव्याची किनार सांभाळणारं संवेदनशील असं सर्वार्थानं मोठं व्यक्तिमत्त्व म्हणजे हरिश बैजल सर. सोलापूरच्या दयानंद कला व शास्त्र महाविद्यालयाच्या हिंदी विभागामार्फत या मुलाखतीचं आयोजन करण्यात आलं होतं आणि मला ही मुलाखत घ्यायची संधी मिळाली हे माझं भाग्य आणि माझ्या जडणघडणीतला एक महत्त्वाचा टप्पा आहे असं मी नक्की म्हणेन.
तिथं उपस्थित असणार्या विद्यार्थ्यांचे बोलके डोळे सांगत होते की बैजल सर आणि त्यांचे विचार मुलांच्या मनात झिरपत आहेत. नवी पेरणी होत आहे आणि या जमिनीवर कोंब फुटेल तेव्हा ते नवं अस्तित्व घेऊन फुलेल, समाजाला नवी दिशा मिळेल.
– प्रा. ममता बोल्ली – सोलापूर
9422744006
पूर्वप्रसिद्धी – मासिक ‘साहित्य चपराक’ जून २०२२
मासिकाचे सभासद होण्यासाठी संपर्क ७०५७२९२०९२