पेचक

pechak

 माझ्या आईचे, मुंबईच्या मावशीचे, चमकदार केस अगदी गुडघ्याच्या खाली पोचतील इतके लांबसडक होते. आईने पुण्यात या मुलीला कसं सांभाळून घेतलं असेल ते तीच जाणे! पण आई मुंबईला आमच्याकडे आली की पहिल्याच दिवशी आजी तिला समोर बसवून, तिच्या केसांवर नानाविध उपचार करून, तिला उवा-मुक्त करीत बसायची, हे आजही माझ्या स्मरणात आहे.

फक्त एका संस्कृत भाषेमध्ये ज्या कीटकाला – आपालि, लोमकिट, केशकीट, केशट, उत्कुण, वारकीर, लोमयूक, वेणिवेधनी, सूक्ष्मषट्चरण, पक्ष्मयूका आणि अशी अजून कितीतरी नावं आहेत तो कीटक मानवाच्या किती ‘जवळचा’ असेल याचा अंदाज सहज बांधता येईल. लेखाच्या शीर्षकात वापरलेलं ‘पेचक’ हे सुद्धा यातलंच एक नाव आहे. मराठी भाषा खूप समृद्ध असली तरी आपण या कीटकाला ‘ऊ’ या एकाक्षरी नावानेच जास्त ओळखतो आणि हे अक्षर साधं उच्चारलं तरी डोकं जरासं खाजवावंस वाटून जातं.

ऊ हा उष्ण रुधिरायुक्त प्राण्यांच्या केसांमध्ये आढळून येणारा, साडेपाच दशलक्ष वर्षे जुना, संधिपाद संघातील परावलंबी अन् परजीवी कीटक आहे. मानवाच्या डोक्यावर दिसणारी ऊ ही पेडिक्युलिडी कुळातील कीटक असून तिचं शास्त्रीय नाव ‘पेडिक्युलस ह्यूमॅनस कॅपिटीस’ असं आहे. माणसांप्रमाणे माकडं, कुत्रे, मांजरं, शेळ्या, घोडे, डुकरं, उंदीर, खारी, हत्ती यांच्यावर, तसंच सील, वॉलरस इत्यादी सागरी सस्तन प्राण्यांवरही उवा आढळतात. काही प्रकारच्या उवा, पक्षी आणि पाण्यातल्या माशांवरही सापडतात. पक्ष्यांवर आढळणार्‍या उवा, मॅलोफॅगा गणामध्ये तर इतर सस्तन प्राण्यांवरील उवा, सायफंक्युलेटा किंवा अ‍ॅनोप्ल्यूरा गणात धरल्या जातात. माणसांच्या शरीरावर तीन जातींच्या उवा आढळतात. एक आपण डोक्यावर पाहतो ती कॅपिटीस ऊ, दुसरी कॉर्पोरिस म्हणजे अंगावर वावरणारी घातक ऊ आणि तिसरी, काख आणि जांघेमधल्या केसांच्या आधाराने जगणारी, थिरस प्युबिस नामक थिरीडी कुळातली, ‘खेकडी ऊ!’

कीटक वर्गात असूनही परमेश्वराने उवांना पंख दिलेले नाहीत आणि याबद्दल आपण खरंच त्याचे आभार मानायला हवेत. त्यांना डासांसारखे पंख असते तर आज पृथ्वीवर फक्त कहर माजलेला असता. ऊ केवळ थेट संपर्कामुळेच एका जागेवरून दुसर्‍या नव्या जागी जाते. ‘डोक्याला डोके भिडते जिथे, उवांना नवे घर मिळते तिथे,’ ही पूर्वी मोठ्या प्रमाणावर छापली/ दाखवली जाणारी एका ऊ-नाशक तेलाची जाहिरात अनेकांनी पाहिलेली असेलच! पूर्ण काळ माणसाच्या अंगावर राहूनच स्वतःचं संपूर्ण जीवनचक्र पार पाडणारा ह्यूमॅनस कॅपिटीस हा निसर्गातला कदाचित एकमेव रक्तपिपासू कीटक असेल. जन्म घ्यायचा तो केसांपाशी, रक्त पिऊन मोठं व्हायचं डोक्यावरच, प्रजनन, परसाकडे जाणं (!), सगळं तिथेच करायचं आणि एक दिवस त्या डोक्यावरच मस्तपैकी मरुन पडायचं!

या पेचकांची लांबी तीळांसारखी म्हणजे 2 ते 3.5 मिमी. असते. आकारही तसाच चपटका आणि रंग साधारणपणे राखाडी-पांढर्‍या छटेमध्ये असतो. तिचं डोकं फारच छोटं असलं तरी त्यावर दोन डोळे, दोन नांग्या आणि सूक्ष्म सुईसारखी, फक्त हवी तेव्हाच आत-बाहेर होणारी, मुखांगं असतात. ती झुरळांसारखीच, उदरभागाच्या दोन्ही बाजूस असलेल्या छिद्रांमधून श्वासोच्छवास करते. तिला पायाच्या तीन बळकट जोड्या असतात पण पाय ताकदवान असले तरी ऊ काही केल्या उडी मात्र मारू शकत नाही. तिच्या प्रत्येक पायाच्या शेवटी मस्त अणकुचीदार आकड्यासारखं नख आणि अंगठ्यासारखा भाग असतो. ऊ साधी डोक्यावर चालत गेली तरी हे ‘उवास्त्र’ आपल्या डोक्यावर टोचलं जातं आणि माणूस डोकं खाजवू लागतो. नख्यांचे पेच वापरून ती आपल्या डोक्याच्या त्वचेला/केसाला घट्ट पकडून ठेवते आणि म्हणून तिला ‘पेचक’ हे नाव दिलं गेलेलं आहे! पण ही नखं तिला फक्त आधार पकडण्यासाठीची मदत करतात आणि त्यांचा तोटा म्हणजे गुळगुळीत पृष्ठभागांवर बिचारी ऊ अगदीच कशीबशी चालू शकते. पूर्ण वाढ झालेली ऊ दर पाच तासांनी आपल्या तीक्ष्ण सुईसारख्या मुखांगांनी भक्ष्याचं रक्त शोषून पिते. ढेकणाच्या लाळेसारखं वेदनाशामक उवांकडे नसल्याने तिने दिलेलं ‘इंजेक्शन’ भलतं वेदनादायी असतं. रक्त प्रवाही ठेवण्यासाठी लागणारा घटक मात्र लाळेत असतो आणि तो अल्प मात्रेत टोचलाही जातो परंतु त्या दंशाने त्वचेची भयानक जळजळ होते. चावा घेतलेला भाग लालसर होऊन तिथे दुखू लागतं. उवांचं पोट लहान असल्याने एका चाव्यातच तिची त्या वेळेची भूक भागते, इतकीच काय ती एकमेव अल्प दिलासादायक गोष्ट!

अंगावर जगणार्‍या उवांद्वारे टायफस नावाच्या तापाचा प्रसार होतो. दुसर्‍या महायुद्धात संपूर्ण युरोपभर आणि नात्झी ज्यू छावण्यांमध्ये या ज्वराने उच्छाद मांडलेला होता. हजारो ज्यू, जीवघेण्या टायफसची शिकार झालेले होते. या कारणास्तव नंतरच्या काळात छळछावण्यांमध्ये दाखल होणार्‍या कैद्यांची प्रवेशाआधी मुंडणं करून त्यांचं सामान आणि कपडेलत्तेही जप्त केले जायचे. उवांमध्ये जिवाणू आणि विषाणू या दोन्हींचे काही गुणधर्म असणारे रिकेटि्सया नामक सूक्ष्मजीवसुद्धा आढळतात. उवा केवळ चावल्यानेच नाही तर त्वचेवर चिरडल्या गेल्यानेही ज्वरप्रसार होतो. त्यांची विष्ठा देखील ज्वरकारक असते. लोकांची घमासान गर्दी, एकूणातील अस्वच्छता, सामायिक पद्धतीने वापरले जाणारे कपडे, अंथरूण-पांघरुणं, उशा, टोप्या, मफलर, कंगवे यांद्वारे उवांचा प्रसार फार झपाट्यात होतो. हल्लीच्या जगात या अंगावरच्या उवा मुख्यत्वे रस्त्यांवर राहणारे गरीब, सरकारी वा निमसरकारी निवार्‍यांमध्ये वस्तीस असणारे वयस्क आणि झोपडपट्ट्यांसारख्या वस्त्यांमधून आढळतात. जी माणसं अस्वच्छ राहतात, दिवसचे दिवस अंघोळी करीत नाहीत, अंगावरचे कपडे बदलत नाहीत त्यांना या उवांचा नक्की त्रास होतो. डोक्यावरच्या उवा ती जागा सोडून सहसा दुसरीकडे दिसत नाहीत पण या ‘अंगीउवा’ कपडे आणि अंथरूणांवर हमखास रेंगाळताना दिसतात किंबहुना त्या फक्त रक्तप्राशनाच्या वेळीच तेवढ्या माणसाच्या अंगावर चढतात. सतत खराखरा अंग खाजवणारे लोक हे या उवांच्या प्राथमिक संसर्गाचं एक लक्षण म्हणता येऊ शकेल. यांच्या चाव्यांमुळे अंगाला अमर्यादित स्वरूपाची खाज सुटते. फार खाजवल्याने त्वचा काळसर आणि जाड होऊन पुढे त्यावर जखमा आणि जखमांमुळे अन्य जिवाणूजन्य आजार होतात.

कॅपिटीस आणि कॉर्पोरिस उवांपेक्षा प्यूबिस अर्थात खेकडी ऊ सर्वार्थाने वेगळी असते. त्यांची शरीररचनाही खेकड्यांसारखी अर्धवर्तुळाकार म्हणजेच बाकीच्या दोन जातींपेक्षा पूर्णतः निराळी असते. त्या नुसत्या डोळ्यांनी दिसून येत नाहीत. या उवांना राठ केस आवडतात. त्यामुळे त्यांचा आढळ खास करून जांघांमध्ये, काखेत किंवा दाढी मिश्यांमध्ये दिसतो. या उवांचा संसर्ग प्रामुख्याने लैंगिक संबंधांमधून होतो. फार क्वचित कपडे वा अंथरूणांमुळे सुद्धा खेकडी पसरू शकते. लहान मुलांच्या भुवया किंवा पापण्यांवर जर या उवा सापडल्या तर ती मुलं कुठल्यातरी लैंगिक अत्याचाराची शिकार असू शकतात. जननेंद्रियांना येणारी अविरत खाज हे या उवांचं प्रमुख लक्षण आहे. या उवा अंगावर आढळल्या तर डॉक्टरमंडळी बरेचदा त्या व्यक्तिस बाकीच्या लैंगिक गुप्तरोगांची तपासणी करायला सांगू शकतात.

या सर्व उवांची अंडी लांबट आणि पिवळसर पांढरी असून उवांच्या जातींनुसार ती अंगावरच्या विविध भागांमधल्या केसांच्या मुळांजवळ एका प्रोटीनसारख्या डिंकाने चिकटवलेली असतात. याच अंड्यांना लिखा असंही म्हणतात. डोक्यावरच्या केसातली मादी ऊ, रोज तीन ते चार आणि एका महिन्यांत (आयुष्य तितकंच असतं) साधारणतः दीडशे अंडी घालते. सुमारे आठवड्याभरात अंडी उबतात आणि त्यातून लहान उवा बाहेर पडतात. तीन वेळा बाह्य त्वचेचा त्याग करून पुढील दोन ते तीन आठवड्यांत त्यांची वाढ पूर्ण होते आणि त्यानंतर केवळ दहा तासांच्या आत त्या प्रजननयोग्य होतात. याचाच दुसरा अर्थ, उवांची पैदास फार वेगाने होत असते.

डोक्यावरची ऊ राहण्यासाठी आणि लपण्यासाठी त्यातल्या त्यात अंधारी जागा पसंत करते. डोक्यावर प्रकाश पडला तर घाईघाईने आडोसा शोधू लागते. ऊ तिच्या लिखा चिकटवण्यासाठी दोन्ही कानांची केसांकडची बाजू आणि मानेची घळ आवडीने वापरते. तिथे जागा नसेल तर मात्र ती मिळेल तिथे अंडी चिकटवत सुटते. टक्कल पडलेल्या व्यक्ती तशा सुरक्षित वाटत असल्या तरी अशा लोकांच्या डोळ्यांवरच्या पापण्या वा भुवयांवर उवा आढळून येतात. केसांवरून काढलेली ऊ एका दिवसांत मरते पण या लिखा मानवी शरीराबाहेर तब्बल दहा दिवस जिवंत राहू शकतात. माकडांसारखे प्राणी म्हणूनच एकमेकांच्या अंगांवरच्या उवा/लिखा काढून खाऊन टाकताना दिसतात. डोक्यावरच्या कॅपिटीस उवा कुठल्याही अन्य रोगाच्या वाहक नसतात. डोकं खाजवल्याने तिथे होणार्‍या जखमा किंवा त्यातून होणारा जिवाणू संसर्ग ही वेगळी बाब आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे या उवा होऊन गेल्याने आपलं शरीर अंगावर वाढणार्‍या खेकडी उवांना दूर कसं ठेवायचं यासाठी प्रशिक्षित होऊन जातं आणि टायफस किंवा रिकेटी तापापासून आपलं संरक्षण होऊ शकतं. काही संशोधकांनी उंदरांवर उवांचा प्रयोग करून असा अंदाज बांधलाय की ऊ काही प्रकारचे इम्युनो-सप्रेसिव्ह प्रभाव पाडण्यास सक्षम असते. ती शक्यतो थेट लाळेतून मानवी शरीरामध्ये काही पदार्थ/स्राव सोडते, जे प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे जिवाणू किंवा इतर रोगजनकांमुळे पसरणार्‍या रोगांना आडकाठी करू शकतात. बिघडलेली रोगप्रतिकारक शक्ती पुन्हा तंदुरुस्त करण्यासाठी आपली एकप्रकारे मदत करू शकतात. या संशोधनाचे ठोस निकाल अद्याप हाती यायचे आहेत.

सर्व प्रकारच्या उवांचं मुख्य लक्षण म्हणजे त्या चावलेल्या जागी येणारी असह्य खाज! समाजात वावरताना प्रमाणाबाहेर डोकं/अंग खाजवावं लागणं फार लाजिरवाणं असतं. त्यामुळे अस्वस्थता वाढीस लागते. उवांच्या चाव्यांमुळे कुठल्याही गोष्टीवर किंवा कामामध्ये लक्ष न लागणं ही समस्याही मागे लागते. रात्रीच्या झोपेचं खोबरं होऊन निद्रानाशाचा रोग जडू पाहतो. अशी व्यक्ती मानसिक संतुलन गमावून बसते. सतत खाजवण्यामुळे त्या जागची त्वचा शुष्क होऊन त्यावर सूक्ष्म भेगा पडतात आणि अन्य जिवाणूंना शरीरात प्रवेश करण्यासाठी आयतं उघडं द्वार मिळतं. उवांचा संसर्ग बर्‍याच वर्षांपासूनचा असेल तर केस गळतीसुद्धा होऊ शकते. अर्थात ही सर्व उपरोक्त लक्षणं फक्त जुनाट होत गेलेल्या ऊ संसर्गांमध्येच दिसून येतात पण म्हणूनच एक जरी ऊ समोर दिसली तरी तातडीने त्यावर उपाय योजणं हे फार गरजेचं असतं.

घनदाट केशसंभार असलेल्या स्त्रियांचा ऊ हा फार मोठा शत्रू आहे. अशा दाट केसांमुळे उवा खासकरून स्त्रीवर्गावर फार जीव लावून असतात. केस धुण्यात आळशीपणा करणारी माणसं आणि बाईमाणसं, दोन्हींवर त्यांची सारखीच प्रीती जडते. लहान मुलांवर तर त्या निरतिशय प्रेम करतात. मुलांच्या शाळांमुळे त्यांचा प्रसार घरोघरी होण्यास फार मोठी मदत होत असते आणि हे फक्त आपल्याकडेच होतं असतं असं नाही, तर आजच्या घडीला ही जगभरातली एक महादुर्दैवी कहाणी झालेली आहे. परदेशातल्या काही शाळांमध्ये तर लहान मुलांचे केस फणीने विंचरण्याचा एक खास कार्यक्रमच दररोजच्या वेळापत्रकात राखीव ठेवलेला असतो.

उवा, लिखा मारण्यासाठी अनेक घरगुती उपचार करता येतात. घरामध्ये निर्जंतुकीकरणासाठी अनेक नैसर्गिक गोष्टी उपलब्ध असतात. त्यांचा वापर करून आपण सहजपणे केसांमधल्या उवा कायमच्या नष्ट करू शकतो. खोबरेल तेलामध्ये देवासमोरचा कर्पूर मिसळून, ते तेल कोमट करून, केसांना लावता येतं. सीताफळाच्या बियांचं वस्त्रगाळ चूर्ण, नारळाच्या तेलात कालवून तेही वापरता येतं. टी ट्री ऑइल, निलगीरी अथवा निंबोणीचं तेल हे सुद्धा उवांवर आणि लिखांवरदेखील फार गुणकारी पडतं. कांद्याचा रस केसांवर थापून तासभर केस झाकून ठेवून धुतले की डोकं साफ होतं. लसूण वाटून, लिंबाच्या रसात मिसळून केलेलं द्रव्य उवा मारतं. बेकिंग सोडा वापरूनदेखील आपण डोईवरच्या उवा-लिखा कमी करू शकतो. मात्र यांमधला कुठलाही उपाय केल्यानंतर केस विंचरण्यासाठी आपल्याकडे बारीक दात्यांची फणी असणं अत्यंत जरूरीचं आहे. केस धुतल्यानंतर ही खास फणी वापरून मेलेल्या उवा विंचरून-विंचरून काढाव्या लागतात. काढलेल्या उवा सरळ टॉयलेटमध्ये फ्लश करून नष्ट कराव्या लागतात.

इजिप्तच्या तीन हजार वर्षांहून जुन्या आणि सुप्रसिद्ध शवपेट्यांमध्ये, केस विंचरून उवा काढायच्या सोन्याच्या फण्या सापडलेल्या आहेत. मिस्रदेशीच्या राज्यकर्त्यांच्या केसांवर उवा राज्य करीत होत्या याचे जनुकीय पुरावेही मिळालेले आहेत. काही ‘ममीज’च्या डोक्यांवर तब्बल चारशेंहून जास्त उवा ‘ममीफाय’ झालेल्या सापडल्या आहेत. हे असंख्य इजिप्शियन राजे आणि राण्या टक्कल करून का घ्यायचे याचं उत्तर आज आपल्याला मिळालेलं आहे. पेरू देशातल्या प्राचीन थडग्यांमध्ये आढळलेल्या ममीजच्या जनुकीय चाचण्यांमध्ये तर युरोपियन उवांचे अंश सापडलेले आहेत. लोभी स्पॅनिश आक्रमणांमधून नव्या जगाने जुन्या जगात असंख्य रोग पसरवले होते, त्यात आता उवांचाही समावेश झालेला आहे.

खूप प्रयत्न करूनही सुरूच असलेला उवांचा प्रसार ही अनेक देशांची/ लोकवस्त्यांची मोठी डोकेदुखी होऊन बसलेली आहे. आज एकट्या अमेरिकेतच सुमारे एक ते सव्वा करोड लोक दरवर्षी उवांवरचे औषधोपचार करून घेत असतात. इंग्लंडमधल्या 2/3 शाळकरी मुलांना प्राथमिक शिक्षण संपवून बाहेर पडायच्या आधीच उवांचा सामना करावा लागलेला असतो. डेन्मार्क, फ्रान्स, स्वीडन, आयर्लंड, इस्रायल, ऑस्ट्रेलिया अशा प्रगत देशांमधली परिस्थितीही फारशी वेगळी नाही. आपल्याकडेही उवा मारायची औषधं हातोहात खपत असतात पण कुठलंही रसायनयुक्त औषध अंगावर वापरण्याआधी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेणं अत्यंत गरजेचं आहे, हे कृपया विसरू नका.

असो! उवांना नैसर्गिक शत्रू असा एकही नाही. त्यामुळे बाकी कुणी काही म्हणो पण स्वतःच्या डोक्याची आणि संपूर्ण शरीराची काळजी घेणं, वारंवार नीटनेटकी स्वच्छता राखणं हाच या रक्तपिपासू उवांना दूर ठेवायचा एकमेव रामबाण उपाय आहे हे आणि हेच एकमात्र सत्य आहे!

सिद्धार्थ अकोलकर 9822075211
मासिक ‘साहित्य चपराक’ मार्च 2022

चपराक

पुणे शहरातून ‘साहित्य चपराक’ हे मासिक आणि ‘चपराक प्रकाशन’ ही उत्तमोत्तम पुस्तके प्रकाशित करणारी ग्रंथ प्रकाशन संस्था चालविण्यात येते. ‘साहित्य चपराक’ मासिकाचा अंक दरमहा 10 तारखेला प्रकाशित होतो. आपले साहित्य पाठविण्यासाठी, ‘चपराक’मध्ये जाहिराती देण्यासाठी आणि नवनवीन पुस्तकांच्या माहितीसाठी संपर्क - घनश्याम पाटील, संपादक 'चपराक'.
व्हाट्सऍप क्रमांक - ८७६७९४१८५०
Email - Chaprak Email ID

One Thought to “पेचक”

  1. Pradnya Karandikar

    एवढ्याशा ऊ वेची अजब गजब माहिती पहिल्यांदाच कळली.लहानपणी आया मुलींवर लक्ष ठेवूनच असायच्या हात सारखा सारखा डोक्याकडे जातोय दिसलच की फणी घेऊन बसायच्या ..आमचे बहिणींचे केस ही आठवड्यतून दोन वेळा सोड्याने आई धुवायची ऊवा होऊच नाही म्हणून तेल रोज चोपडायचं लेखात म्हटल्याप्रमाणे गुळगुळीत पृष्ठभागावर त्यांना चालता येत नाही..खूपच माहितीपूर्ण लेख वाचतानाध डोकं खाजवावस होत होतं किळसवाणे वाटायचे ऊवा होणं पण लेखकाला सलाम केवढी माहिती दिली जी खरंच सामान्यतः कुणाला नसते…शेअर केल्याबद्दल धन्यवाद …चपराकमधून विविध विषयावरा प्रकाश टाकून वाचकांच्या पर्यंत खूप माहिती पोहचवली जाते…वाखाणण्यासारखं आहे..आभार

तुमची प्रतिक्रिया जरूर कळवा

हे ही अवश्य वाचा