भाषणांची पन्नास वर्षे!

Share this post on:

संयुक्त महाराष्ट्र चळवळीचा तो काळ होता. सातार्‍यात क्रांतीसिंह नाना पाटील, आचार्य प्रल्हाद केशव अत्रे यांची घणाघाती भाषणे गांधी मैदानावर ऐकायला मिळत. शाळेत कवी गिरीश, शाहीर अमर शेख यांच्यासारखे थोर कवी, शाहीर ऐकायला मिळाले. तेव्हापासून मनात यायचं ‘आपणही वक्ता व्हायचं’. परंतु आपली फजिती झाली तर काय? या भीतीने प्रत्यक्ष भाषण देणं किंवा स्वतंत्र कार्यक्रम करणं पुढं ढकललं जात होतं. त्यामुळे शाळेत काही भाषणाचं धाडस केलं नाही.

गाभुळलेल्या चिंचा!

सातारच्या छत्रपती शिवाजी महाविद्यालयात वार्षीक स्नेहसंमेलनात कार्यक्रम सादर करणारे विद्यार्थी हिरो व्हायचे. वर्षभर भाव खायचे. हे पहिल्या वर्षात पाहिलं आणि दुसर्‍या वर्षी आपणही व्यासपीठावरून कार्यक्रम सादर करायचाच हा निश्चय केला. कवीवर्य मंगेश पाडगावकरांच्या वात्रटिका सादर करायचं ठरवलं. एकानेच सादर करताना काही विसरलं, फजिती झाली तर काय करायचं या विचारानं पाच जणांचा चमू केला. एकानंतर दुसर्‍यानं अशा चार-चार ओळींच्या वात्रटिका सादर करायच्या ठरवलं. प्राचार्य उनउने सरांची परवानगी मागितली. ‘वात्रटिका’ हा शब्द ऐकून ते म्हणाले, ‘‘हे असलं काही करू नका.’’ त्यावर मी त्यांना ‘‘एखादा साहित्यिक कार्यक्रम बसवतो’’ असं सांगितलं. मित्रांना सराव चालू ठेवायला सांगितला. प्राचार्यांचा नकार सांगितलाच नाही. चार दिवसांनी पुन्हा प्राचार्यांना भेटलो व ‘गाभुळलेल्या चिंचा’ हा कार्यक्रम बसविल्याचं सांगितलं. त्यांनी थोडंसं तोंड आंबट केलं; पण करा म्हटले. मी त्याच कार्यक्रमाचं केवळ नाव बदलून संमती मिळवली.

आम्ही पाचही जणांनी भरपूर सराव केला. कार्यक्रमाच्या वेळी विविध प्रकारचे पोशाख केले. चार-चार ओळींच्या कवितांचे छोटे-छोटे कागद जवळ ठेवले. ऐनवेळी विसरलंच तर त्याचा उपयोग व्हावा हा उद्देश होता. मैदानावर भलामोठा रंगमंच तयार केला होता. समोर दोन हजाराहून अधिक विद्यार्थी (आणि विद्यार्थीनीही) होते. विद्यार्थीनींच्या पुढे फजिती झाली तर सारं कॉलेजलाईफ बाद होणार होतं. प्रचंड दबाव होता; पण मी सारी शक्ती एकवटून पहिली वात्रटिका सादर केली –

तिरप्या तिच्या नजरेवरी
बेहद्द आहे खूश मी
आज पण कळले मला
ती ऐसेच पाहते नेहमी

प्रचंड हशा आणि टाळ्यांनी सकारात्मक प्रतिसाद मिळाला. दुसर्‍याने वात्रटिका सादर केली –

मराठीचे मास्तर
कविता करू लागले
म्हणून म्हणतात त्यांचे
लग्नसुद्धा मोडले.

पुन्हा हशा आणि टाळ्या! तिसर्‍याने सादरीकरण केले –

इंग्रजीच्या मास्तरांना
खूपच शब्द येतात
कारण ते उशाखाली
डिक्शनरी घेऊन झोपतात.

कार्यक्रम खूपच रंगला. विंगेत आल्यावर आम्ही मित्रांनी एकमेकांना मिठ्या मारल्या. त्या दिवशीच ठरवलं, कार्यक्रम असो वा भाषण; आता माघार घेणे नाही.

आपल्याला आत्तापर्यंत भीती कशाची वाटत होती? फजितीची! आपण चांगली तयारी केली तर फजितीचा प्रश्नच नाही. ‘वीथ प्लॅनिंग वी गेट सक्सेस, विदाऊट प्लॅनिंग वी सी द कॉन्सीक्वेन्स.’

प्राचार्य शिवाजीराव भोसलेकन्याकुमारी येथे स्वामी विवेकानंदांचे भव्य स्मारक उभे करण्याची योजना आखली होती. त्यासाठी निधी संकलनासाठी सातारा जिल्हा समीतीची स्थापना करणार होते. या कार्याच्या विचारासाठी फलटणचे प्राचार्य शिवाजीराव भोसले यांचं व्याख्यान सातारच्या पाठक हॉलमध्ये आयोजित केलं होतं. भरपूर प्रचार केला होता. समारंभाला प्रचंड गर्दी झाली होती. कार्यक्रम ठरल्यावेळी सुरू केला. मी भरपूर तयारी करून प्रास्ताविक केले. प्राचार्यांचं व्याख्यान खूपच प्रभावी झालं. कार्यक्रम झाल्यावर गप्पा मारताना प्राचार्य मला म्हणाले, ‘‘तू कार्यक्रमाचं आयोजन अप्रतिम केलंस, प्रास्ताविकही चांगलं केलंस. स्वामी विवेकानंद स्मारक समितीच्या अध्यक्षा छत्रपती सुमित्राराजे भोसले राणीसाहेब आहेत. मी कार्याध्यक्ष आहे. तू सचिव हो!’’ मी हे काम आनंदानं स्वीकारलं. संपूर्ण सातारा जिल्ह्यात प्राचार्यांची व्याख्याने आयोजित केली. मी प्रास्ताविक करायचो किंवा निधीसंबंधी निवेदन करायचो. त्यामुळे मला मोठ्या सभेसमोर बोलायला उभं रहायची संधी मिळाली. सभेच्या गर्दीची भीती नाहीशी झाली. प्राचार्यांच्या व्याख्यानानंतर स्वामी विवेकानंदांचं चित्र असलेले कार्ड आम्ही एक रूपयाला विकायचो. निधी संकलन करायचो. अशा तर्‍हेने सातारा जिल्ह्यातून आम्ही सुमारे एक लाख रूपयाचा निधी गोळा केला. प्राचार्यांची भाषणे जवळून ऐकून लाखमोलाचं मार्गदर्शन लाभलं!

गोवावीर मोहन रानडे

गोवामुक्ती आंदोलनात भाग घेतलेले मोहन रानडे आणि मस्कारनेस हे दोघे पोर्तुगालमध्ये तुरूंगात होते. गोवा स्वतंत्र होऊनही त्यांची सुटका झाली नव्हती. त्यांच्या सुटकेसाठी जनआंदोलन करावयाचे ठरले होते. त्यासाठी महाराष्ट्र भूषण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे आणि संगीतकार सुधीर फडके यांनी पुण्यामध्ये मेळावा भरवला होता. त्यासाठी मी सातार्‍याहून आलो होतो. गावोगावी जाऊन जनजागृती करण्याचे त्यांनी आवाहन केले. मी भारावून गेलो होतो. सातार्‍यात परतल्यावर पाच सहा मित्रांना घेऊन गावोगावी फिरलो. सायकलवरून जवळच्या खेड्यात जायचं. ग्रामपंचायतीजवळ लोक गोळा करायचे. त्यांच्यापुढं आवेशात भाषण द्यायचं. ‘मोहन रानडे आणि मस्कारनेस यांची सुटका झालीच पाहिजे’ अशा घोषणा द्यायच्या. तोच आशय प्रत्येक भाषणात मांडायचा. त्यामुळे वक्तृत्व कलेचा चांगलाच सराव झाला. आमच्या सातारातल्या खेड्यात भाषणं देऊन पोर्तुगाल सरकारवर काय परिणाम होणार? असं काहीवेळा मनात यायचं; पण खरंच काही दिवसात त्यांची सुटका झाली. सातार्‍यात आम्ही मोहन रानडे यांचा गांधी मैदानावर दहा हजारावर लोकांच्या उपस्थितीत भव्य सत्कार केला.

एखादी मोहीम हाती घेऊन त्याच्या प्रचाराची भाषणे देत सुटणे हे वक्तृत्व सुधारण्यास खूपच उपयुक्त ठरते असा माझा अनुभव आहे.

इंग्रजीत भाषणे

बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये नोकरीस लागलो. ट्रेनिंग कॉलेजचा प्राचार्य झालो. त्यामुळे क्लार्कपासून ते एक्झीक्युटिवपर्यंत सार्‍यांना इंग्रजीमधून शिकवू लागलो. त्याचा उपयोग कॉर्पोरेट जगतात व्याख्याने देताना झाला. पुण्यात यशदा संस्थेत भाभा अणुशक्ती केंद्रातील अधिकार्‍यांना ‘वर्क अँड लाईफ’ या विषयावर चाळीसच्यावर व्याख्याने दिली.

व्याख्यानमालातून आमंत्रणे

महाराष्ट्र आणि बाहेरील राज्यातील शेकडो व्याख्यानमालातून व्याख्याने दिली. ‘विनोद एक व्याख्यान’, ‘असे वक्ते अशा सभा’, ‘चला जगू या आनंदाने’, ‘आनंदाचं पासबुक’, ‘यशस्वी जीवनाची वाटचाल’ या विषयांना मागणी जोरदार होती. बँक ऑफ महाराष्ट्राची हिरक महोत्सवी वाटचाल या विषयावर पुण्याच्या वसंत व्याख्यानमालेत बँकेचे अध्यक्ष शांताराम कामत यांच्याबरोबर मीही वक्ता होतो. जबलपूर महाराष्ट्र मंडळात सलग तीन दिवस व्याख्याने दिली. निपाणी येथील सोलापूरकर यांच्या मंदिरातही सलग तीन दिवस व्याख्याने दिली. एकदा सोलापूर येथे रोटरीची पाच जिल्ह्यांची कॉन्फरन्स होती. नागपूरचे न्यायाधीश प्रमुख पाहुणे होते. ते येत नसल्याचे कळल्यावर रोटरी पदाधिकारी रात्री १० वाजता माझ्याकडे आले व ‘सकाळी 9 वाजता व्याख्यानाला या’ म्हणाले. ठरलेला विषय होता ‘समाज सुधारण्याची नवी दिशा’. त्याच विषयावर मी बोललो. ते व्याख्यान श्रोत्यांना फारच भावले. सभागृहातील प्रतिसाद ऐकून बाहेर उभे असलेले ड्रायव्हरसुद्धा सभागृहात आले. व्याख्यानानंतर अन्य रोटरी क्लबची व्याख्यानाची आमंत्रणे आली. ती मी वर्षभरात पुरी केली. अनेक व्याख्यानांच्या वेळी उपस्थित असणारे नामवंत कलाकार अशोक सराफ, वर्षा उसगावकर, सूर्यकांत, बाबा कदम, जगदीश खेबुडकर, रणजित देसाई, शांता शेळके, द. मा. मिरासदार अशांनी व्याख्यानांना दाद दिली.

द्विपात्री कार्यक्रम

माझी सौ. – गीता भुर्के हिने 35 नाटकातून कामे केली. तीन चित्रपटातून भूमिका केल्या. अभिनयाची अनेक पारितोषिके पटकावली. तेव्हा तिचा अभिनय व माझे वक्तृत्व असा मिलाफ करून आम्ही द्वीपात्री साहित्यिक कार्यक्रम सुरू केले. ‘खुमासदार अत्रे’ हा कार्यक्रम ती दिल्ली येथे यशवंतराव चव्हाण स्मृती महोत्सवात कॉन्स्टीट्यूशन क्लब येथे खासदारांच्या उपस्थितीत झाला. ‘पु. ल. एक आनंदयात्रा’ कार्यक्रमास त्यांचे कुटुंबीय उपस्थित होते. या कार्यक्रमाचे कौतुक मंगला गोडबोले यांनी ‘लोकसत्ते’मध्ये लेख लिहून केले. 83 व्या अ. भा. मराठी साहित्य संमेलनाचे स्वागत म्हणून पुण्यातील एस. एम. जोशी सभागृहात सात माजी संमेलनाध्यक्षांवर सात दिवस कार्यक्रम केले. सर्व कार्यक्रम वेळेवर होत. सर्व आसने प्रेक्षकांनी भरलेली असत. शेवटच्या दिवशी श्रोत्यांनी उत्स्फुर्तपणे सार्‍यांना लाडू वाटले. आमचा सत्कार केला. आमच्या द्वीपात्री कार्यक्रमाची दखल ई टीव्ही, उल्फा टीव्ही यांनीही घेतली. अ. भा. मराठी साहित्य संमेलनात पाच वेळा वक्ता म्हणून सहभाग घेतला.

पन्नास वर्षांची वाटचाल

या व्याख्याने आणि कार्यक्रमाला सुरूवात होऊन पन्नास वर्षे झाली. तीन हजारच्यावर व्याख्याने दिली. दोनशेवर पुरस्कार मिळाले. श्रोत्यांचा प्रतिसाद हाच खरा पुरस्कार! तो नेहमीच श्रेष्ठ वाटत आला. वाटचाल चालूच आहे.

– प्राचार्य श्याम भुर्के
गंगातारा, 917/7, गणेशवाडी, डेक्कन जिमखाना, पुणे
9422033500

पूर्वप्रसिद्धी – मासिक साहित्य चपराक, दिवाळी अंक 2016

Share this post on:

Author: चपराक

पुणे शहरातून ‘साहित्य चपराक’ हे मासिक आणि ‘चपराक प्रकाशन’ ही उत्तमोत्तम पुस्तके प्रकाशित करणारी ग्रंथ प्रकाशन संस्था चालविण्यात येते. ‘साहित्य चपराक’ मासिकाचा अंक दरमहा 10 तारखेला प्रकाशित होतो. आपले साहित्य पाठविण्यासाठी, ‘चपराक’मध्ये जाहिराती देण्यासाठी आणि नवनवीन पुस्तकांच्या माहितीसाठी संपर्क - घनश्याम पाटील, संपादक 'चपराक'.
व्हाट्सऍप क्रमांक - ८७६७९४१८५०
Email -

View all posts by चपराक >

तुमची प्रतिक्रिया जरूर कळवा

error: Content is protected !!