सराव थांबला, साक्षात्कार हुकला…

Share this post on:

आजूबाजूच्या घटना निराश करत असताना, यश हूल देऊन दूर जात असताना, कष्टाने रचलेले इमले डोळ्यादेखत जमीनदोस्त होत असतानादेखील ज्याच्या वागण्यातून सकारात्मकता झळकते त्याला लोकं आज वेडा, स्वप्नाळू म्हणतात, पण उद्या त्याचीच एक यशस्वी माणूस म्हणून उदाहरणं देतात.

सकारात्मक बुद्धीचा व्यक्ती एखाद्या घटनेला फक्त आपल्या भूमिकेपुरते, कर्तव्यापुरते महत्व देतो तिचा बाऊ करत नाही. कारण प्रक्षेपित वस्तुस्थिती आणि सत्य यातला फरक त्याला माहीत असतो. स्वतःच्या आकलन शक्तिमधून, निरीक्षणातून , एखाद्या अनुभवातून किंवा तीव्र जाणिवेतून तो फरक त्याला कळलेला असतो. पडद्यावरची हलती चित्रे बहुरंगी, बहुढंगी असतात पण त्याचा स्रोत एकच प्रकाश असतो हे तो सतत ध्यानात ठेवतो. खेळ सुरू असताना त्याच्या मनात उठणारे विविध भाव पाण्यात निर्माण होणाऱ्या बुडबुड्याप्रमाणे उठून लगेच फुटतात, कारण आतील प्रकाशमय वातावरणाचा दाब त्यांना सहन होत नाही.

परिस्थितीने पाय तोडले तरी सरपटत , सरकत पुढे जाणारा तो. त्याचे हे पुढे जाणे म्हणजे इतरांसाठी आश्चर्य पण त्याच्यासाठी वैचारिक सरावाने निर्माण केलेली एक कष्टविरहीत सवय असते. ध्येयाच्या अगदी जवळ असताना नशिबाचा साप डसून, जरी तो पहिल्या पायरीवर आला तरी त्याला त्याची हीच सवय तारून नेते.त्याला ठाम विश्वास असतो की कुठल्याही जखमेवरचे औषध आणि कुठल्याही रोगावरची लस केवळ एकच ‘मनोबल’.

खरंच हेच तर पुस्तकात लिहिलंय, पूर्वजांनी सांगितलंय, संत महात्म्यांनी अनुभवलंय आणि इतिहासाने सिद्ध देखील केलंय , पूर्वानुभवातून आपल्याला देखील याचा साक्षात्कार झालेलाच असतो पण जेव्हा प्रक्षेपित वस्तुस्थिती फणा काढून वर येते तेंव्हा भीतीने आपल्याला या ज्ञानाचा विसर पडतो. करणार तर काय ? दिवसागणिक चोवीस तास जर ‘काय होत आहे’ हेच मनावर बिंबवलं जात असेल तर ‘काय करू शकतो’ याचा विसर पडणारच, हो ना?

आपण त्या देशाचे नागरिक आहोत जिथे ज्ञान, विज्ञान आणि आत्मज्ञानाचा अविष्कार झाला. इथल्या ज्ञानावर पुस्तकं लिहून देशाविदेशातील लेखक मोठे झाले आणि ती वाचून जगात अनेक महान आणि मोठ्या व्यक्ती घडल्या.

‘आपण ज्या गोष्टीकडे जास्त लक्ष देतो जिचा पाठपुरावा करतो ती मोठी होत जाते’ ; ‘फक्त कार्य म्हणजे कर्म नव्हे तर विचार देखील कर्म आहे’ ; ‘प्रत्येक कर्म बीज आहे’ ; ‘जसे बीज तशी फळे’ ही खरं तर भारत देशाची मूळ शिकवण, ती आम्हा भारतीयांच्या वागण्या बोलण्यात, व्यवहारात, सहज रुजायला हवी, दिसायला हवी. ‘यथा शिक्षक तथा विद्यार्थी’ , मग भारत तर विश्वाचा शिक्षक आहे तो कसा असायला हवा ? देश नागरिकांनी बनतो मग ते कसे असायला हवेत ? इथला प्रत्येक घटक, संस्था , माध्यमे, व्यापार, व्यवहार कसा असायला हवा?

असे म्हणतात की कुठलीही सत्ता, साधन संपत्ती नसलेल्या एका भारतीय साधूला जगज्जेता साम्राज्यवादी सिकंदराचे भय नव्हते. सिकंदरने जग जिंकले पण त्या साधूने सिकंदरला! त्याच्याशी बोलताना साधूच्या डोळ्यात भीतीचा लवलेश देखील नव्हता. त्या साधूच्या ज्ञानाने, विवेकाने त्या परप्रांतीय घुसखोर सिकंदाराच्या अहंकारावर मात केली.

या काळात मनुष्य मूल्यांच्या आधारावर कमी तर भीतीच्या आधारावर जास्त संसार हाकतो आहे. भीती प्रसिद्धीचे , प्रसाराचे , प्रचाराचे आणि मुख्यतः व्यापाराचे माध्यम व्हावे ही सर्वात मोठी शोकांतिका आहे. मानवी मूल्यांचे सर्वात मोठे अपयश आहे.

सावली गळे पायात
सूर्यबिंब पडता माथी
ज्ञानाचा अभावच भीती!
भीतीचा ऱ्हासच मुक्ती!

हे आत्मज्ञानी तत्वज्ञान आपल्याला कठिणतम परिस्थितीत तारून नेऊ शकते. फक्त आवश्यकता आहे ती निस्वार्थ, निर्मळ, निःशंक सरावाची.

सराव थांबला.. साक्षात्कार हुकला..


– ज्योती घनश्याम पाटील

संपर्क : ८४३१७५४०२९
पूर्वप्रसिध्दी – दै. संचार ६ फेब्रुवारी २०२२

Share this post on:

Author: चपराक

पुणे शहरातून ‘साहित्य चपराक’ हे मासिक आणि ‘चपराक प्रकाशन’ ही उत्तमोत्तम पुस्तके प्रकाशित करणारी ग्रंथ प्रकाशन संस्था चालविण्यात येते. ‘साहित्य चपराक’ मासिकाचा अंक दरमहा 10 तारखेला प्रकाशित होतो. आपले साहित्य पाठविण्यासाठी, ‘चपराक’मध्ये जाहिराती देण्यासाठी आणि नवनवीन पुस्तकांच्या माहितीसाठी संपर्क - घनश्याम पाटील, संपादक 'चपराक'.
व्हाट्सऍप क्रमांक - ८७६७९४१८५०
Email -

View all posts by चपराक >

3 Comments

  1. सुंदर लेख. कुठलीही भीती ज्यामुळे माणसाची प्रगती खुंटते ती वाईटच. जगज्जेत्या सिकंदराची गोष्ट मनाला भावली.

  2. व्वाह!
    ज्योतीताई, खूप छान, अभ्यासपूर्ण व्यक्त झाला आहात.
    अभिनंदन!

तुमची प्रतिक्रिया जरूर कळवा

error: Content is protected !!