एकमेवाद्वितीय

मराठी माणूस जागतिक स्तरावर जाऊ शकतो, हे ज्या थोडक्या लोकांनी सिद्ध केलं त्यातलं एक महत्त्वाचं नाव म्हणजे गानसम्राज्ञी लता मंगेशकर. ‘आकाशात देव आहेत आणि पृथ्वीवर लताचा स्वर आहे’ असं त्यांच्याबाबत म्हटलं जातं. लतादीदींचं व्यक्तिमत्त्व, राहणीमान अत्यंत साधं होतं. भक्तीगीतं, भावगीतापासून ते उडत्या चालीच्या गाण्यापर्यंत त्यांनी त्यांचं कौशल्य दाखवलं. त्यांच्या व्यक्मितत्त्वाचं वेगळेपण म्हणजे त्या ज्या नायिकेसाठी गायच्या तिच्यासोबत त्यांचा आवाज जुळायचा. ‘ज्यांच्यासाठी गायचं त्यांच्यासाठीच हा आवाज योग्य आहे’ अशी किमया चित्रपटक्षेत्रात आजवर दोघांनीच घडवून दाखवली. पहिले होते किशोरकुमार आणि दुसर्‍या लतादीदी!

लता दीदी, गायक किशोर कुमार

एक अलौकिक आणि दैवी सामर्थ्य असलेली ही गायिका होती. त्यांनी सगळ्यात मोठी गोष्ट कोणती केली असेल तर त्यांचं मराठीपण शेवटपर्यंत जपलं. गोव्यातल्या मंगेशीच्या भक्त असलेल्या या घराण्यानं आपलं मूळ कधीच सोडलं नाही. मास्टर दीनानाथांना राजर्षि छत्रपती शाहू महाराजांनी केलेली मदत, नाटकाच्या क्षेत्रातील दीनानाथांचं कार्य आणि त्या प्रतिकूल परिस्थितीत कोल्हापूरच्या राजघराण्याचा डोक्यावर असलेला आशीर्वाद लतादीदी कधी विसरल्या नाहीत. सगळं व्यवस्थित चाललेलं असताना वडिलांच्या स्मृती जपाव्यात म्हणून त्यांनी पुण्यात दीनानाथ मंगेशकर रूग्णालय सुरू केलं. सर्व स्तरातल्या लोकांना सर्वोत्कृष्ट वैद्यकिय सेवा मिळावी यावर त्यांचा कटाक्ष असायचा. हे सामाजिक भान ठेवणार्‍या दीदी त्यामुळंच इतरांपेक्षा वेगळ्या ठरतात.

भालजी पेंढारकरांपासून अनेक दिग्दर्शकांसोबत त्यांनी काम केलं. शांतारामबापू अनुभवले आणि राज कपूर यांच्यासोबतही त्यांनी काम केलं. दीदींनी आत्मचरित्र लिहिलं असतं किंवा कुणी त्यांच्याकडून जाणून घेऊन हे सगळं शब्दबद्ध केलं असतं तर भारतीय चित्रपटसृष्टीचा तो सगळ्यात मोठा इतिहास झाला असता. लता मंगेशकर हे फक्त एक नाव नव्हतं तर ते एक मोठं व्यासपीठ होतं. जगात कुठंही असलेला भारतीय माणूस कधीही गात असेल तर त्याच्या ओठावर एक तरी गाणं दीदींनी गायलेलंच असतं. ‘ए मेरे वतन के लोगो’ हे गाणं दीदी गात असताना आपल्या जुन्या सहकार्‍यांच्या आठवणीनं देशाचे तेव्हाचे पंतप्रधान असलेले पंडित जवाहरलाल नेहरू अक्षरशः रडत होते. ही आर्तता दीदींच्या गायकीत होती.

भालजी पेंढारकर, लता दीदी

लतादीदींनी गायनक्षेत्र समृद्ध करतानाच सार्वजनिक जीवनात साधेपणानं वावरता येऊ शकतं हे कृतीतून सिद्ध केलं. थोड्याफार यशानं हुरळून गेलेले आणि स्ततःचा अवकाशातला सातवा स्वर आहे अशा आविर्भावात वावरणारे, जगणारे आजचे गायक-गायिका बघितल्या, त्यांचे फॅशनेबल कपडे बघितले की दीदी खर्‍याअर्थानं मराठीपण जगल्या हे दिसून येतं. त्यांनी राजकारणात थेट सहभाग घेतला नाही पण त्यांना चांगल्या-वाईटाची जाण होती. सामाजिक, राजकीय जीवनात जो कोणी कलेची आवड जोपासतो त्यांच्याशी दीदींचे स्नेहाचे संबंध होते. बाळासाहेब ठाकरे, शरद पवार यांच्यापासून ते नरेंद्र मोदी यांच्यापर्यंत सर्वांशी त्यांचा घरोबा होता. पंडित अटलबिहारी वाजपेयी यांनाही त्यांच्या गायकीचं आकर्षण होतं.

लता दीदी, अटल बिहारी वाजपेयी

दीनानाथासारख्या एका अभिनयसम्राटाची मुलगी असलेल्या दीदींनी गायनात स्वतःला सिद्ध केलं आणि ते करताना त्या कधीही राजकारणाच्या आहारी गेल्या नाहीत. त्यांच्या गायकीनं भारतीय संगीत समृद्ध केलं. ज्याच्या गायकीच्या कोणत्याही रेकॉर्डस्, कॅसेट, सीडीज नाहीत तो अकबराच्या दरबारातला तानसेन हा भारतातला सर्वश्रेष्ठ गायक मानला जातो. त्यानंतर गायनक्षेत्रात जागतिक पातळीवर दंतकथा म्हणून कुणाचं नाव घ्यायचं झालं तर त्या लतादीदी एकमेवाद्वितीय आहेत.
दीदींनी गायनातून स्वतःचं घराणं स्थापन केलं. स्वतः मोठं होत असतानाच त्यांनी आपल्या भावंडांनाही पुढे आणलं. पंडित हृदयनाथ मंगेशकर, आशा भोसले, उषा मंगेशकर ही सगळी भावंडं एकाचवेळी मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीत गात होती. सर्वाधिक विलक्षण गुणवत्ता असलेल्या लतादीदींनी स्वतःचं अढळ असं स्थान निर्माण केलं. त्यांच्या गायकीचं सर्वात मोठं वैशिष्ट्य कोणतं असेल तर ते म्हणजे प्रत्येक सामान्य माणसाला त्यांचा स्वर स्वतःचा वाटला. माजघरापासून ते स्वयंपाकघरापर्यंत आणि समोरच्या ओसरीपासून ते परसूपर्यंत जगणार्‍या, राहणार्‍या मराठी माणसाला दीदींचा स्वर आपला वाटला. आजच्या फ्लॅट संस्कृतीत, बंगल्यात, लॉजवर आणि हॉलिडे होम्समध्ये सुद्धा दीदींचा सूर सहजी आपला वाटतो. त्यांनी गायलेली विविध प्रकारातील गाणी लोकांना त्यांच्या सुख-दुःखात आपलीशी वाटली. अशा पद्धतीतली गायकीतली विविधता जपणं आणि इतकी वर्षे त्यात सातत्य राखणं हे सोपं काम नव्हतं. त्यासाठी प्रचंड मेहनत आणि तपश्चर्या लागते. दीदी अशा तपस्वी होत्या.

एका नामवंत गायकानं त्याच्या मुलाखतीत सांगितलं होतं की पुढच्या जन्मात मला गायक व्हायला अजिबात आवडणार नाही. लोणचं खायचं नाही, दही खायचं नाही, ताक प्यायचं नाही, ज्यानं घसा धरतो-बसतो ते सगळं वर्ज्य करायचं, घशावर परिणाम होऊ नये म्हणून नियमित मिठाच्या पाण्याच्या गुळण्या करायच्या, नियमित रियाज करायचा असं एक शिस्तबद्ध आयुष्य जगायचं हे मला निदान पुढच्या जन्मात तरी नको! स्वतःवर अशी अनेक बंधनं लादून घेतल्याशिवाय गायनदेवता प्रयन्न होत नाही. आपलं संपूर्ण आयुष्य अशा समर्पित भावनेनं जगत दीदींनी मायावी चित्रनगरीवर आवाजाच्या माध्यमातून अधिराज्य गाजवलं.

खरंतर मास्टर दीनानाथांच्या मुलीकडं वैयक्तिक गुणवत्तेशिवाय दुसरं काहीही नव्हतं. त्यांची शिफारस करणारं या क्षेत्रात कोणी नव्हतं किंवा त्यांचा कुणी गॉडफादरही नव्हता. त्यांच्यासाठी धडपडणारं किंवा यांना संधी मिळावी म्हणून मुद्दाम चित्रपटनिर्मिती करणारंही कुणी नव्हतं. उदरनिर्वाहाचं एक मोठं संकट समोर ठेवून या क्षेत्रात त्या आपल्या भावंडासह उतरल्या आणि अद्वितीय, अलौकिक असं यश संपादित केलं. भारतीय चित्रपटसृष्टीचा इतिहास जेव्हा लिहिला जाईल तेव्हा गायनाच्या क्षेत्रातील सर्वात मोठी सम्राज्ञी म्हणून दीदींचं नाव सुवर्णाक्षरात कोरलं जाईल. जगात असा एकही भारतीय माणूस नसेल ज्यांना दीदींचं गाणं माहीत नसेल. असं असाधारण कर्तृत्व असूनही पाय जमिनीवर ठेवणं हेही त्या करत राहिल्या. दीदींच्या वैयक्तिक गोष्टी त्यांनी कधी प्रसिद्ध केल्या नाहीत पण त्यांना हिंदुत्त्वाबद्दल असणारं आकर्षण आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावरील त्यांचं प्रेम हे फारसं कधी लपून राहिलं नाही. सावरकरांच्या कविता दीदींनी त्यांच्या सुमधूर आवाजात चिरंतन केल्या.

Lata mangeshkar

दीदी कमी बोलतात, फटकून वागतात, लक्ष देत नाहीत, ज्युनिअर कलावंतांवर त्या अन्याय करतात, त्यांना संधी देत नाहीत असे असंख्य आरोप त्यांच्यावर झाले. मात्र त्यांनी यावर बोलणं टाळलं. ‘आता सगळं मिळाल्यावर तुम्ही थांबत का नाही? त्याशिवाय नवीन कलाकारांना वाटा कशा मिळतील?’ या प्रश्नावर मात्र त्यांनी मार्मिक भाष्य केलं होतं. त्या म्हणाल्या, ‘जेव्हा आम्ही या क्षेत्रात नव्यानं धडपडत होतो तेव्हा आमच्यासाठी कोण बाजूला झालं? आम्ही आमच्या कर्तृत्वावर पुढे आलो. जे कोणी आमच्यापेक्षा जास्त परिश्रम घेतील ते आपोआप आमच्यापेक्षा पुढे जातील. त्यांची गुणवत्ता सर्वश्रेष्ठ ठरली तर आम्ही आपोआप मागे पडू…’

केवळ गाणं हे आपल्या आयुष्याचं एकमेव ध्येय ठरलेल्या लतादीदी भारतरत्न झाल्या. स्वतःच्या सुरांनी त्यांनी गाण्याचे शब्द अजरामर केले. दीदींचे सूर कोणाचे शब्द घेऊन अवतिर्ण झाले तर ते शब्द अजरामर होऊ शकतात हा नवा साक्षात्कार त्यांनी घडवला. शब्द महत्त्वाचे असतात आणि ते माणसाच्या मनाला अज्ञात प्रदेशात नेऊन सोडतात, असं म्हणतात पण शब्दांना जर दीदींचा सूर मिळाला तर ते शब्द माणसाला स्वर्गलोकी नेऊन पोचवू शकतात हे दीदींचं गाणं ऐकणार्‍या प्रत्येकाला मान्य करावंच लागेल.

अमिताभ बच्चन यांच्याबाबत म्हटलं जातं की हा ‘वन मॅन फिल्म इंडस्ट्री’ आहे. तशा लतादीदी या चित्रपटसृष्टीतील आणि भारताच्या गायनक्षेत्रातील ‘वन वूमन म्युझिक इंडस्ट्री’ होत्या. आजच्या पिढीतील तरूणाईच्या आजोबापासून ते त्यांच्या मुलांपर्यंत सर्वांनाच भुरळ घालणार्‍या आणि या सर्वांचे जगणे समृद्ध करणार्‍या या महान तपस्वी गायिकेस भावपूर्ण आदरांजली!

– घनश्याम पाटील
7057292092

पूर्वप्रसिद्धी – पुण्यनगरी सोमवार, दि.७ फेब्रुवारी २०२२

चपराक

पुणे शहरातून ‘साहित्य चपराक’ हे मासिक आणि ‘चपराक प्रकाशन’ ही उत्तमोत्तम पुस्तके प्रकाशित करणारी ग्रंथ प्रकाशन संस्था चालविण्यात येते. ‘साहित्य चपराक’ मासिकाचा अंक दरमहा 10 तारखेला प्रकाशित होतो. आपले साहित्य पाठविण्यासाठी, ‘चपराक’मध्ये जाहिराती देण्यासाठी आणि नवनवीन पुस्तकांच्या माहितीसाठी संपर्क - घनश्याम पाटील, संपादक 'चपराक'.
व्हाट्सऍप क्रमांक - ८७६७९४१८५०
Email - Chaprak Email ID

5 Thoughts to “एकमेवाद्वितीय”

 1. जयंत कुलकर्णी

  घनश्याम पाटील सर… लतादीदींबद्दल फारच सुंदर शब्दात तुम्ही व्यक्त झाला आहात. जागतिक पटलावर भारताचे नाव कोरणाऱ्या “एकमेवाद्वितीय” अतिशय साध्या, सामान्य माणसाच्या आयुष्यात आदराचे स्थान प्राप्त केलेल्या, सामाजिक जाणीव असणाऱ्या, फिल्म इंडस्ट्रीवर आपल्या कर्तृत्वाने अधिराज्य गाजवलेल्या गानसम्राज्ञी लतादीदीना भावपूर्ण आदरांजली!! असा स्वर पुन्हा होणे नाही!!

 2. Rakesh Shantilal Shete

  उत्तम श्रद्धांजली!

  1. Anil Patil.

   Far sundar ani marmik ..

 3. Vinod panchbhai

  खूप सुंदर लेख

 4. Nagesh S Shewalkar

  बारीकसारीक गोष्टींची नोंद घेतली आहे. हे केवळ भरपूर वाचन आणि दांडगी स्मरणशक्ती यामुळेच होऊ शकते. लेख खूप आवडला.

तुमची प्रतिक्रिया जरूर कळवा

हे ही अवश्य वाचा