कुजबुज, हेटाळणी, कुचेष्टा, प्रखर विरोध प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे वाळीत टाकणं… ही सगळी चढती भांजणी आहे एखादी प्रथा किंवा परंपरा नाकारताना समाजाकडून येणार्या प्रतिक्रियांची.
ह्या सगळ्या विरोधाची पूर्ण कल्पना असली तरीही कधी ना कधी एखादी परंपरा नाकारावी, एखाद्या प्रथेला विरोध करावा, असं अनेक जणांना मनापासून वाटतं. काही जण हे धाडस करतात पण अनेकांना हा नकार प्रत्यक्ष कृतीत आणणं अवघड जातं. त्यामागे कितीतरी वेगवेगळी कारणं असतात. धर्माचा, देवाचा, कुटुंबीयांचा, समाजाचा, स्वतःच्या मनाचा-विचारांचा दबाव-भीती यामागे असते! पण तरीही… तरीही का नाकाराव्याशा वाटतात काही प्रथा? काही परंपरा?
मुळात माणूस कालबद्ध रीतीने हजारो वर्षे उत्क्रांत होत होत आजच्या टप्प्यावर पोहोचला आहे आणि तो आजही उत्क्रांत होत असेल. ह्या दीर्घ प्रवासात त्याच्या मेंदूचा जसजसा विकास होत गेला तसतशी त्याची बौद्धिक, सांस्कृतिक प्रेरणा बळकट होऊ लागली. यातूनच समाजरचना, कुटुंबव्यवस्था अस्तित्वात आली. ह्या कुटुंबाला, समाजाला एकसंध ठेवण्यासाठी, वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी, शिस्तबद्ध जीवनपद्धतीसाठी काही नियम बनवले गेले. त्या-त्या काळाच्या गरजेप्रमाणे आणि काही धारणा, मिथके, समजुती ह्यांच्या मिश्रणातून काही प्रथा-परंपरा अस्तित्वात आल्या तर काही केवळ आनंदासाठी, मनोरंजनासाठी निर्माण झाल्या.
काळ पुढे सरकत गेला तशा काही गोष्टी कालबाह्य, निरर्थक वाटू लागल्या पण त्याचा पगडा समाजमनावर इतका जबरदस्त होता-आहे की हे जोखड खांद्यांवरून सहजासहजी उतरवणं आपल्याला आजही जड जातं. आज एकविसाव्या शतकात आल्यावर आपण मागे वळून पाहिलं तर अनेक चुकीच्या परंपरा-प्रथांचा आपण त्याग केला आहे, हे देखील अभिमानाने नमूद करावे लागेल विशेषतः पुरोगामी अशा आपल्या महाराष्ट्रात. उदाहरणच द्यायचं झालं तर अगदी दीडशे दोनशे वर्षांपूर्वीपर्यंत अस्तित्वात असलेली सतीची प्रथा, बालविवाह, जरठ-कुमारी विवाह, केशवपन, अस्पृश्यता पाळणे किंवा काही समाजांमध्ये अस्तित्वात असलेली कौमार्य चाचणी ह्या आणि ह्याच्या सारख्या अन्य काही प्रथा आज पाळल्या जात नाहीत. असतील तरी अगदी कमी प्रमाणात आणि लपून छपून. स्त्रियांना शिक्षणाचे स्वातंत्र्य, विधवाविवाहाला मान्यता, तिच्या अर्थार्जनाला पाठींबा अशा काही बाबी आपल्या समाजात बर्याच प्रमाणात स्वीकारल्या जात आहेत. काही वेळा मनातून पटत नसलं तरी वरकरणी पटवून घेतलं जातंय पण बदल नक्की होतोय.
पण तरी आजही अनेक प्रथा-परंपरा अशा आहेत की ज्या आपण नाकारणं फार गरजेचे आहे. अशा परंपरा निभावणं पुरूष आणि स्त्रिया ह्या दोघांनाही खूप त्रासदायक ठरतं जेव्हा त्यांना त्या स्वीकारणं मनातून पटत नसतं! पण तरीही पूर्वीप्रमाणेच आजही जास्त करून स्त्रियाच ह्यात अडकलेल्या दिसतात.
जगाच्या पाठीवर कुठेही गेलं तरी साधारणपणे पुरूष ह्या परंपरांच्या बेड्यांमधून तुलनेने लवकर मुक्त होतात. त्याचं कारण बहुतेक प्रथा, जबाबदार्या पार पडण्याचं कामही परंपरेनं स्त्रियांवरच सोपवलेलं आहे. शिवाय युगानुयुगांची पुरूषप्रधान व्यवस्था स्त्रियांना ह्या ना त्या प्रकारच्या बंधनात अडकवून ठेवते. अनेक पुरुष आणि स्त्रिया ह्या प्रथा-परंपरा पाळताना, आपण हे का करतो आहोत? असा प्रश्न स्वतःला किंवा समाजाला विचारत नाहीत. कधी-कधी त्यावर फारसा विचारही न करता केवळ असं करायचं असतं, असं धर्मात, शास्त्रात सांगितलं आहे म्हणून करत राहतात.
मग अशा कोणत्या प्रथा आहेत किंवा वेगवेगळ्या समाजांमध्ये, कुटुंबांमध्ये पाळल्या जाणार्या परंपरा आहेत ज्या आपल्याला नाकाराव्या असं वाटू शकतं? किंवा खरं तर आपण त्या नाकारायलाच पाहिजेत?
मला कळायला लागल्यापासून काही गोष्टी मला मुळीच पटायच्या नाहीत. अगदी राग यायचा. त्या म्हणजे हळदीकुंकू समारंभ, सवाष्ण जेवू घालणे, स्त्रियांना मासिक धर्माच्या चार दिवसांत अस्पर्श ठरवणं आणि इतरही अनेक. त्यातल्या काही प्रथांवर मी माझी मतं मांडते आहे.
आमच्या घरी हळदीकुंकू आणि सवाष्ण भोजन ह्या दोन्ही गोष्टींना फाटा दिलेला होता पण चार दिवसांच सोवळं ओवळं कडक नसलं तरी ‘देवाला शिवू नको मुद्दाम’ ह्या प्रकारचं होतं. अर्थात मी ते कधी पाळलं नाही आणि घरच्यांनी विशेषतः आईने खूप पाठींबा दिला नाही तरी विरोधही केला नाही.
आपण विधवा स्त्रियांच्या बाबतीत विचार केला तर पूर्वीइतके अपमानास्पद, लाचार जीवन आज त्यांच्या वाट्याला येत नाही पण पूर्वीच्या काही परंपरा अजूनही पाळल्या जातातच. एखादी स्त्री विधवा असेल तर तिच्या दुःखातून तिने बाहेर यावं म्हणून तिला मदत करणं हे समाज म्हणून आपलं कर्तव्य आहे पण उलट प्रत्येक तथाकथित महत्त्वपूर्ण आणि विशेषतः धार्मिक समारंभात तिला आजही वगळलं जातं हे फार खेदजनक आहे. लग्न, डोहाळजेवण, बारसं किंवा गौरीगणपतीसारखे सण ह्यात आजही ह्या स्त्रियांना वगळले जाते. समाजाला त्या स्त्रीच्या दुःखाबद्दल सहानुभूती नक्की असते पण आजही अपशकुन होईल ह्या अनाठायी भीतीमुळे त्यांना न बोलून बाजूला ठेवलं जातं आणि ह्या स्त्रिया देखील उगीच काही झालं तर आपल्यावर खापर फुटायला नको म्हणून दूर राहणंच पसंत करतात. एक प्रगल्भ, संवेदनशील समाज म्हणून आपण सर्वांनीच ह्या प्रथा बंद व्हाव्या म्हणून विशेष प्रयत्न, प्रबोधन केले पाहिजे.
जी गोष्ट विधवा स्त्रियांची तीच निःसंतान स्त्रियांची. डोहाळजेवण, बारसं यांसारख्या कार्यक्रमात आजही काही ठिकाणी त्यांना वगळलं जातं. लहानग्या बाळाला आवर्जून त्यांच्याकडे दिलं जात नाही. टोमणे मारले जातात. पूर्वी तर केवळ स्त्री अपत्यांना जन्म देणार्या स्त्रियांना पण अशी अवहेलनेची वागणूक मिळायची. तिच्या पतीवर देखील नकळत वंशाला दिवा देण्याचे सामाजिक दडपण असायचे. नंतरच्या काळात कुटुंबनियोजनाचे महत्त्व, त्याचा प्रचार-प्रसार होऊ लागला. लोकांना कुटुंबनियोजनाचे महत्त्व पटू लागले. ती काळाची गरजही होती पण ह्यातूनच स्त्रीभ्रूण हत्येचे निंदनीय आणि आपणा सर्वांना कलंकित करणारे प्रकारही घडायला सुरूवात झाली आणि दुर्दैवाने आजही असे प्रकार घडत आहेत. का करतो आपण मुलगाच हवा म्हणून अट्टहास? मोक्ष मिळावा ह्या कल्पनेतून? आपली संपत्ती दुसर्या घरात जाऊ नये म्हणून? की धर्माचा, अंधश्रद्धेचा पगडा?
तरीही आजच्या आधुनिक काळात दोन किंवा एकच मुलगी असलेले अनेक पालक आपण पाहतो पण मुलगी सासरी गेली की तिने आपले कष्ट, आपला पैसा, आपला वेळ केवळ सासरच्यांसाठीच खर्च करायचा ही परंपरा आजही अनेक ठिकाणी उघडपणे पाळली जाते तर कधी आधुनिकतेच्या मुखवट्याआडून तेच सुचवलं जातं.
अर्थात आजही आपल्याकडे अशी कितीतरी कुटुंब आहेत जिथे मुलगा-मुलगी दोघेही एकमेकांच्या पालकांची व्यवस्थित काळजी घेतात. सासरची मंडळीदेखील मोकळेपणानं ह्या निर्णयाला पाठींबा देतात. हा आधुनिक मतप्रवाह समाजात अधिक प्रसारित होणं मात्र फार गरजेचे आहे.
स्त्रीच्या मासिक धर्माच्या चार दिवसांच्या काळात तिला अपवित्र समजणे, अस्पर्श ठरवणे ही अजून एक प्रथा… कदाचित अगदी प्राचीन काळी स्वच्छता, स्त्रीला ह्या काळात आवश्यक असलेली विश्रांतीची गरज, तिला अशा प्रसंगी संकोच वाटू नये, अशा अनेक कारणांनी तिची ह्या दिवसांत घरातच स्वतंत्र ठिकाणी व्यवस्था केली जात असेल पण पुढे-पुढे तिला या काळात अगदी तिने काहीतरी पाप केलं असल्यासारखी वागणूक दिली जाऊ लागली. देवाची पूजा, धार्मिक कार्यात सहभागावर बंदी आली. अगदी तिची सावली पण अंगावर पडू दिली जात नसे. नुकत्या वयात आलेल्या मुली तर ह्या भडिमाराने कोमेजूनच जात. देवपूजा आणि धार्मिक कार्यात सहभागी होण्यावर बंदी आजही बहुतेक ठिकाणी पाळली जाते. खरं तर वैज्ञानिकदृष्ट्या ही एक नैसर्गिक आणि संपूर्ण समाज जीवनाचा विचार करता अत्यंत महत्त्वाची घटना. ‘ऋतुप्राप्ती’खेरीज वंशसातत्य कसे टिकणार? हे सगळं कळत असूनही अंधश्रद्धेपायी किंवा धर्माच्या भीतीने आजही ह्या चार दिवसांत स्त्रीला देवधर्मापासून दूर ठेवले जाते. मूळ उद्देश जो तिला विश्रांती मिळायला हवी तो केव्हाच लोप पावला आहे. ती घरातली कामे करते, नोकरी व्यवसाय करते. त्यातून तिची चार दिवस सुटका नसते. उलट अनेक स्त्रिया सणवार व्यवस्थित पार पडावे म्हणून पाळी पुढे ढकलण्यासाठी वारंवार गोळ्या घेतात, जे त्यांच्या आरोग्यासाठी अतिशय घातक आहे. अनेक स्त्रिया पुढे ह्याचे गंभीर शारीरिक परिणाम भोगत असतात. जर सर्वांनी आणि विशेषतः स्त्रियांनी ही अनाठायी भीती मनातून काढून टाकली तर ह्या चार दिवसांत आपण नित्य पूजा, सण समारंभात सहजतेने सहभागी होऊ शकतो. अर्थात ह्यासाठी घरातील अन्य घटकांचे सहकार्य मिळणे खूप गरजेचे आहे. ते नसेल तर कदाचित ज्यांना हा विचार पटतो आहे त्या स्त्रिया देखील वादाला कारण नको म्हणून ही प्रथा चालू ठेवणे पसंत करतील.
कदाचित मासिक पाळी संबंधातले माझे विचार काही जणांना पटणार नाहीत. त्यावर टीका सुद्धा होईल! पण चुकीच्या धारणांवर आधारलेल्या, माणसाचे स्वातंत्र्य हिरावून घेणार्या, त्याला कमी लेखणार्या प्रथा आपण ठामपणे नाकारायलाच हव्यात.
लेखाच्या सुरूवातीला म्हणाले तसं एखादी परंपरा आपण मोडतो, प्रथा नाकारतो तेव्हा त्याला विरोध होतोच. जगाच्या पाठीवर अशी अनेक उदाहरणे आहेत! पण समाजातील द्रष्ट्या विचारावंतांनी वेळोवेळी ठोस भूमिका घेतल्या, समाजाचा विरोध पत्करला तेव्हा आज आपण अनेक बाबतीत प्रगती करू शकलो आहोत, चुकीच्या प्रथांचा त्याग करू शकलो आहोत.
अस्पृश्यता निवारणासाठी झटणारे, चवदार तळ्याचा सत्याग्रह घडवणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर, पंढरीच्या विठ्ठल मंदिराचे दरवाजे सर्वांसाठी खुले व्हावे म्हणून उपोषण करणारे साने गुरुजी, स्त्री-पुरुष समानतेचा पुरस्कार करणारे, केशवपन आणि त्यासारख्या अनेक अनिष्ट प्रथांना कडाडून विरोध करणारे, स्त्री शिक्षणासाठी सर्वस्व अर्पण करणारे महात्मा जोतिबा व सावित्रीबाई फुले तसेच स्त्री शिक्षणासाठी आणि त्यांना स्वयंपूर्ण बनवण्यासाठी झटणारे धोंडो केशव कर्वे, रमाबाई रानडे, बालविवाहाला विरोध करणारे आणि विधवा विवाहाचा पुरस्कार करणारे आगरकर, सतीची प्रथा बंद करण्यासाठी अथक प्रयत्न करणारे राजा राम मोहन रॉय, कुटुंबनियोजनाचे महत्त्व समाजाला पटवण्यासाठी झटणारे र. धों. कर्वे, स्त्री-पुरूष समानतेवर परखड भाष्य करणारे ‘स्त्री-पुरूष तुलना’ हे पुस्तक लिहिणार्या ताराबाई शिंदे, परदेशात जाऊन जिद्दीने वैद्यकीय अभ्यासक्रम पूर्ण करणार्या पहिल्या महिला डॉक्टर आनंदीबाई जोशी, पतीने केलेल्या अन्यायाविरुद्ध न्यायालयाचे दरवाजे ठोठावणार्या पहिल्या प्रॅक्टिसिंग डॉक्टर डॉ. रखमाबाई राऊत… अशी कितीतरी उदाहरणे आहेत. आपला समाज अंधश्रद्धा, अज्ञान यांच्या विळख्यात सापडलेला असताना देखील अतिशय विपरित परिस्थितीत ह्या महनीय व्यक्तिंनी आपले समाजसुधारणेचे कार्य नेटाने चालू ठेवले. चुकीच्या प्रथा-परंपरा तोडताना त्यांना किती विरोध झाला, त्रास सहन करावा लागला हे सर्वश्रुतच आहे.
त्या तुलनेत आज आपण एका आश्वासक वळणावर आहोत. बर्याच सुधारणा आपल्या समाजात झाल्या आहेत. पूर्वीच्या तुलनेत स्त्रिया स्वतंत्र झाल्या आहेत. त्यामुळे अशा काही प्रथा-परंपरा आपण पुढे येऊन धाडसाने नाकारल्या पाहिजेत. आज काही जणांनी त्या नाकारल्याही असतील पण त्या मोठ्या प्रमाणात संपूर्ण समाजाने स्वीकाराव्या यासाठी त्या मागची कारणमीमांसा समाजाला व्यवस्थित समजावून सांगितली पाहिजे, वैचारिक आदान प्रदान झाले पाहिजे आणि मुख्य म्हणजे आपण स्वतः ह्यामागचं कारण समजून घेऊन स्वीकारलं पाहिजे.
आज अशा काही प्रथा-परंपरा नाकारताना आपल्याला होणार्या विरोधाची धार नक्कीच कमी असेल, अशा आशादायक विश्वासावर चला पुढे जाऊया… अनिष्ट प्रथा-परंपरा नाकारूया!
– मृणालिनी कानिटकर-जोशी
९९६०३९२९२३
‘साहित्य चपराक’ दिवाळी विशेषांक २०२१
पृष्ठ क्र. २१०
‘चपराक प्रकाशन’च्या वाचनीय आणि दर्जेदार पुस्तकासाठी आणि ‘चपराक’चे सभासद होण्यासाठी संपर्क – ७०५७२९२०९२
आपल्या लेखाला अनुसरून मला असं म्हणावसं वाटतं की आता ज्या थोड्या सुधारणा बाकी आहेत त्यासाठी स्वतः स्त्रियांनीच पुढाकार घ्यायला हवा. आणखीन एक गोष्ट एका स्त्रीनेच दुसऱ्या स्त्रीला समजून घ्यायला हवं. एक सासुच जेव्हा आपल्या सूनेकडून आपण लिहिलेल्या अपेक्षित सुधारणा नाकारते, तेव्हा सुधारणा घडण्याचे मार्ग बंद होतात. सासू स्वतः स्त्री असून सुनेकडून वंशाला दिवा मागते (मुलगा). किंवा वरदक्षिणेची अपेक्षा करते तेव्हा सर्व मार्ग बंद होतात!