वर्डस्वर्थ, यिट्स, शेक्सपिअर आणि मी

एकेकाळी वर्डस्वर्थ, डब्ल्यू. बी. यिट्स… या दिग्गजांच्या शब्दांनी मी भारावलो होतो. त्यांच्या कवितांनी मी आणि माझी कविता अक्षरश: वेडावलो होतो. त्यांच्या इंग्रजी कवितांबरोबरच मला इंग्रजी नाटकांनीही अंतर्बाह्य बदलवलं. त्यात अर्थातच विल्यम शेक्सपिअर प्रचंड भावला. साहित्य वाचण्याची गोडी माझ्यात मातृभाषेमुळंच निर्माण झाली खरी पण साहित्यजाणिवा समृद्ध करण्यासाठी आणि सारा दृष्टिकोन बदलण्यासाठी इंग्रजी साहित्यानं माझ्यावर गारूड केलं…

मागच्या वर्षाच्या ऑक्टोबरमध्ये, म्हणजे सारं काही सुरळीत असताना, लॉकडाऊन नसताना पुण्यातल्या विमाननगरच्या एका भागात गेलो होतो. तिथं ‘साईश एंटरप्रायजेस’ हे दुर्मीळ आणि सेकंडहँड पुस्तकं मिळण्याचं छोटंसं दुकान आहे. अतिशय छोट्याशा जागेत असलं तरी या दुकानात जगभरातले अनेक नामांकित लेखक, कवी वास्तव्याला आहेत. त्यातल्या काही पुस्तकांवर नजर पडली अन् त्यांनी माझं बोट धरून थेट महाविद्यालयीन जीवनाचीच आठवण करून दिली; कारण त्यातली काही मंडळी मला सर्वांत आधी तिथंच भेटली होती. कोण होती ही मंडळी? शेक्सपिअर, वर्डस्वर्थ, यिट्स, मिल्टन, सिल्विया यासह जगभरातल्या साहित्यरसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवलेली अनेकानेक नावं. त्यातल्या अनेकांशी माझाही परिचय झाला होता तो कॉलेजच्या लायब्ररीतच. वास्तविक सर्वसाधारणपणे इंग्रजी साहित्याकडं माणूस ओढला जातो तो वृत्तपत्रांतल्या इंग्रजीतून. मग त्याला नाटकं आवडू लागतात, कालांतरानं कादंबर्‍या आणि मग इतर साहित्य! पण माझं नेमकं उलटं झालं. महाविद्यालयीन जीवनात अभ्यासाला इंग्रजी साहित्य निवडलं असलं तरी मी गद्याऐवजी पद्याकडं आधी आकर्षित झालो. त्याचं कारणही तसंच होतं.

कवितेच्या रूपानं माझी शब्दांशी संगत फार लवकर म्हणजे बालपणीच जडली होती. मी माझ्या पद्धतीनं कविता करू लागलो होतो. पुढं कुसुमाग्रज, यशवंत, केशवसुत, विंदा, बहिणाबाई या मराठीतल्या दिग्गज माणसांनी शब्दांशी मैत्री कशी करावी हे शिकवलं. शब्दांना आपल्या अंगाखांद्यावर कसं खेळवावं, त्यांचे लाड कसे करावेत हे सांगितलं. उघड्या-बोडक्या डोंगरांशी अन् आपले पाय घट्ट रोवून धरणार्‍या मातीशी कसं प्रामाणिक राहावं हे दाखवून दिलं पण तरीही खरं सांगू, माझं त्यावेळी शब्दांशी ज्याला प्रेम म्हणावं असं काही सूत जुळलेलं नव्हतं. एखाद्याशी आपली मैत्री असावी, फार फार तर घट्ट नातं असावं… एवढंच काय ते आमच्यात त्यावेळी होतं. खास ओढ नव्हती, प्रेम तर खूप पुढची गोष्ट… का कोण जाणे पण हे प्रेम जुळायला महाविद्यालयीन जीवनच उजाडावं लागलं. वास्तविक एखाद्या तरुणीवर प्रेम करण्याचं ते वय! पण आम्ही मात्र जखडलो गेलो शब्दांच्या बाहुपाशात. या महाविद्यालयीन जीवनात माणूस प्रेमात का पडत असावा माहितीय? त्याच्या आतली ऊर्मी, अस्वस्थता, भावना नव्यानं कुणीतरी समजून घ्याव्यात असं त्याला वाटत असतं. घरी माणसं असतात पण असं आतून अस्वस्थ होणं तो नव्यानं अनुभवत असतो. हा प्रचंड नव्या सृजनाचा काळ असतो. कदाचित हे समजून घेणं घरच्यांना शक्य होणार नाही असं समजून माणूस नवा आधार शोधू लागतो. या शोधात काहींना आजन्म प्रेम करणारा मित्र भेटतो, काहींना जन्मभर साथ देणारी प्रेयसी भेटते, काहींना काहीच न भेटल्यानं आयुष्यच वाया जातं. मला शब्द भेटले. तेही जगभरातल्या प्रतिभावंतांचे शब्द. वेड लावणारे शब्द. मला माझ्यावरच प्रेम करायला शिकवणारे शब्द.

इंग्रजी साहित्याचा (लिटरेचर) अभ्यास करताना विल्यम वर्डस्वर्थ, डब्ल्यू. बी. यिट्स, जॉन मिल्टन यांनी माझं बोट हातात धरून कवितेच्या अनोख्या जगाची सैर घडवली. मुळात बालपणापासूनच कवितेशी नाळ जोडली गेली असल्यानं इंग्रजी कविता वाचताना फार भारी वाटायचं. साहजिकच मराठी कवितांवरून उठून मन बसलं ते इंग्रजी कवितांवर. तेव्हा कवितेनं अक्षरश: वेड लावलं. एखादी प्रेयसी भेटली असती तर मी तिच्याशी जे जे बोललो असतो, ते ते मी शब्दांशी बोलू लागलो. त्या काळात कोण कोण भेटलं नाही म्हणून सांगू? …पी. बी. शेले, सिल्विया प्लाथ, रूडयार्ड किपलिंग, रॉबर्ट बर्नस्, रॉबर्ट फ्रॉस्ट, ऑस्कर वाइल्ड, जॉन किट्स, टी. एस. ईलियट, सॅम्युअल टेलर, विल्यम ब्लेक ही मंडळी मनापासून भावली. अरे आपल्या वेदना, भावना यांना कशा कळतात, हे कसं काय लिहू शकतात इतकं मनातलं… असं वाटायचं. अभ्यासक्रमाला असो वा नसो! त्यांच्या कविता वाचण्याचा मग मी सपाटाच लावला. प्रत्येकाचे शक्य होतील तितके कवितासंग्रह वाचण्याचा मी प्रयत्न करू लागलो. काही कविता कळायच्या नाहीत. मी मूळचा मराठी भाषिक असल्यानं खूप अलंकारिक इंग्रजी डोक्यावरून जायचं. मग प्राध्यापकांकडून ते समजावून घ्यायचो. तो अर्थ कळल्यावर त्या कवितेतली गोडी अधिक वाढायची. साहजिकच त्यानंतर माझा कवितेकडं पाहण्याचा दृष्टिकोनच बदलला. कधीकधी मी त्याच तंद्रीत असायचो. अभ्यासक्रमाच्या पुस्तकांकडंही दुर्लक्ष व्हायचं. या कवितेच्या प्रेमात माझा त्यावेळचा अभ्यासक्रम जसा होरपळून गेला तसाच नोकरीला लागल्यावर पत्रकारितेच्या निखार्‍यात कविता होरपळून गेली. खरं तर पत्रकारितेच्या कवचकुंडलांत कविता अधिक बहरायला हवी होती पण तसं झालं नाही. या क्षेत्रात हळूहळू तिला श्वास घेता आला इतकंच. या काळात कुणाचीच कविता माझ्या सोबत नव्हती. विविध वृत्तपत्रांत पत्रकारिता करताना वेळोवेळी मनात उमटणार्‍या स्वत:च्या भावना मी मांडत गेलो. त्यामुळं कवितेला कसाबसा श्वास घेता आला आणि ती जिवंत राहिली.

मला कवितेच्या अंतराळात असंख्य माणसं भेटली असली तरी मराठीत कुसुमाग्रज आणि विंदा तर इंग्रजीत वर्डस्वर्थ आणि यिट्स यांनी माझं कविताविश्व समृद्ध केलं. इंग्रजी साहित्याचा मुकुटमणी असलेल्या विल्यम शेक्सपिअरनं मला अंतर्बाह्य ढवळून काढलं पण कवितेपेक्षा त्याचं नाटक जास्त भावलं मला. त्याच्या नाटकांकडं कवितेनंतर येणारच आहे मी! या शेक्सपिअरखालोखाल इंग्रजी साहित्यात कुणाचं नाव घेतलं जात असेल तर ते रोमँटिक कवितेचा अध्वर्यू मानल्या गेलेल्या वर्डस्वर्थचं. पाचशेपेक्षा अधिक सुनीतं (sonnets) लिहिणार्‍या वर्डस्वर्थची शैली आणि कवितेतल्या त्याच्या प्रतिमांनी माझ्यावर गारूड केलं. माणसाचं जगणं सुंदर बनवणार्‍या कवितांतून तो भेटत गेला. खरं तर त्याचा काळ दोनशे वर्षांपूर्वीचा पण आजही त्याच्या कविता काळाच्या कसोटीवर खर्‍या उतरतात. मनाला भावतच नाहीत तर उभारीही देतात.
‘लंडन १८०२’ या कवितेत तो म्हणतो,

Oh! Raise us up, Return to us again;
And give us manners, Virtue, Freedom, Power

खरं तर वर्डस्वर्थ सुरुवातीला कट्टरपंथी होता. रूढी-परंपरांना मानणारा होता. प्रतिगामी होता! पण त्याची ही विचारधारा वयानुसार गळून पडली. त्याच्या कवितांनी नवोन्मेष जागवला. त्याच त्या नियमांच्या चौकटीत राहून रचली जाणारी कविता त्याला मान्य नव्हती. त्यानं छंदोबद्ध कवितांच्या बांधलेपणावर हल्ला चढवला आणि स्वत:ची मुक्तछंदातली कविता लोकप्रिय केली. मनातून बाहेर पडणार्‍या भावना साध्या आणि सरळ शब्दांत मांडल्या जाव्यात ही त्याची धारणा होती. त्याची हीच धारणा आणि त्यातून व्यक्त होणारा वर्डस्वर्थ मग मनात रूतून बसला. कदाचित यामुळंच तो जगभरातल्या साहित्यरसिकांनाही भावला असावा. त्याचा शब्द न् शब्द सहजतेतून आला आणि भावना जेव्हा सहज व्यक्त होतात तेव्हा त्या कुणालाही भावतात. कवीनं हेच करायला हवं, हे मला वर्डस्वर्थनं पटवून दिलं.

कवी विलियम वर्डस् वर्थ

The Prelude या कवितेतल्या त्याच्या चार ओळी फारच सुंदर आहेत…
I had Melancholy thoughts
A strangeness in my Mind,
A feeling that I was not for that hour,
Nor for that place.

त्याच्या कवितेतल्या संवादी शैलीनंही मला भुरळ घातली. आपण एखाद्या व्यक्तिशी किंवा कधीच बोलू न शकणार्‍या अदृश्याशी किंवा अगदी दिसणार्‍या एखाद्या निर्जीव वस्तूशीही सहज बोलू शकतो, संवाद साधू शकतो हे वर्डस्वर्थनं दाखवून दिलं. त्यानं ते कवितेतून मांडलं. त्याची Tintern Abbey ही अशीच एक सुंदर कविता आहे. त्यात तो म्हणतो,

How oft, In Spirit, have I turned to thee,
O Sylvan Wye! Thou wanderer thro’ the woods,
How often has my spirit turned to thee!

कितीतरी कविता… वर्डस्वर्थच्या कवितांचं सारं जगच सुंदर आहे. खरं तर १८१८ पर्यंत वर्डस्वर्थनं परंपरांचं समर्थन केलं पण त्याच्या कवितांतूनते फारसं डोकावलं नाही. कवितांतून त्यानं रोमँटिक भावनांना उद्गार दिले त्याबरोबरच वास्तवातल्या वेदना मांडण्याचाही प्रयत्न केला. या सहज व्यक्त होण्याच्या त्याच्या शब्दांनी १८१२ मध्ये मात्र रसिक घायाळ झाले. त्याच्या दोन मुलांच्या मृत्युलाही त्यानं जेव्हा कवितेतून जाब विचारला तेव्हा साहित्यविश्वाला काय बोलावं समजेना. हे वाचल्यावर इतकी तटस्थता, इतकी सरलता शिकवणारा कवी माझ्यालेखी साहित्यातला हिरो बनला. वर्डस्वर्थला पुढे १८४३ मध्ये ब्रिटनचा राजकवी म्हणून गौरवण्यात आलं. हा सन्मान त्याच्याकडं या जगाचा निरोप घेईपर्यंत कायम होता. ऐंशी वर्षांच्या आयुष्यात वर्डस्वर्थ नावाप्रमाणेच शब्दांची अतुलनीय सेवा करून गेला. त्याच्या निधनानंतर त्याच्या काही कविता काही प्रकाशकांनी एकत्र येऊन प्रकाशित केल्या. त्यांना ‘ल्यूसी पोएम्स’ म्हटलं जातं.
त्यातल्या एका कवितेत तो म्हणतो,

My horse moved on; hoof after hoof
He raised, and never stopped :
When down behind the cottage roof,
At once, the bright moon dropped.

वर्डस्वर्थप्रमाणेच दुसर्‍या एका प्रतिभावान विल्यमच्या मी प्रेमात आहे. हा दुसरा विल्यम म्हणजेच विल्यम बटलर यिट्स. यानं मला रोमँटिक जगातून वास्तवात येण्याचं भान दिलं. आयरिश नाटककार, कवी, संवाद लेखक आणि विसाव्या शतकातल्या इंग्रजी साहित्यातलं एक ठळक नाव असलेला यिट्स आयरिश राजकारणातही होता. त्यानं तिथं दोन टर्म संसद सदस्य म्हणून काम केलं. त्यामुळंच त्याच्या लेखनातून वास्तववादी चित्रण उतरलं. मानवी सुख-दु:खांबरोबरच भोवतालचं भानही त्याच्या लेखणीत दिसलं. पुढं त्याला साहित्यातलं नोबेलही मिळालं पण त्याआधीच जगभरातल्या साहित्यरसिकांच्या गळ्यातला तो ताईत बनला होता. त्याची तेव्हा अभ्यासलेली ‘द सॉरो ऑफ लव’ कविता आजही मनात घर करून आहे.

The quarrel of the sparrows in the eaves,
The full round moon and the star-laden sky,
And the loud song of the ever-singing leaves,
Had hid away earth’s old and weary cry.

विलियम यिट्स

कला आणि राजकारणाचा घनिष्ठ संबंध आहे, असा यिट्सला दुर्दम्य विश्वास होता. साहजिकच त्यानं त्याच्या लिखाणाचा वापर आयरिश राजकारणाबद्दलचा दृष्टिकोन व्यक्त करण्यासाठी केला. त्यातून त्यानं वाचकांना आयरिश सांस्कृतिक इतिहासाबद्दलही शिकवलं. लहानपणापासूनच यिट्सला आयर्लंड आणि त्याच्या राष्ट्रीय प्रतिमांविषयी कुतूहल होतं. ब्रिटिशांच्या राजवटीनं आयरिश राजकारणावर आणि सामाजिक जीवनावर नकारात्मक परिणाम झाल्याचं त्याला मनोमन वाटे. त्यामुळं ब्रिटिश राजवटीनं दडपलेला साहित्यिक इतिहास आपल्या कवितेतून, नाटकांतून उलगडण्याचा त्याचा प्रारंभिक प्रयत्न होता. त्याच्या याच लेखनामुळं आणि सुरुवातीला ब्रिटिशांविषयी माझ्याही मनात असलेल्या प्रचंड द्वेषामुळं यिट्स आपल्याच भावना मांडतो आहे, असं वाटून गेलं. त्याच्या सुरुवातीच्या कविता ओडिस या आयर्लंडच्या ग्रामीण भागातील सौंदर्यावरच्या होत्या. तिथल्या गूढतेचं मर्म आणि वास्तव त्यानं उलगडलं. या कविता म्हणजे ओईसिन आणि कुचुलिन यांच्यासह मिथक आणि पौराणिक आकृत्यांचे उद्बोधक संदर्भ आहेत. कालांतराने यिट्स आयरिश राजकारणात अधिक गुंतला. मात्र याचा त्याला आणि त्याच्या कवितेला फायदाच झाला. त्याची कविता सर्वदूर पोहोचली. आयरिश नॅशनल थिएटर, आयरिश लिटररी सोसायटी, आयरिश रिपब्लिकन ब्रदरहूड आणि मॉड गॉन यांच्यातील संबंधांमुळे त्याच्या कविता अधिकाधिक राजकीय वास्तववादाकडे झुकल्या. पहिल्या जागतिक महायुद्धात आयर्लंडने घेतलेल्या सहभागाबद्दल यिट्सने असंख्य कविता लिहिल्या. या निर्णयावर तुटून पडताना त्यानं १९१९ मध्ये ­An Irish Airman Foresees His Death नावाची कविता लिहिली. एक आयरिश एअरमन त्याच्या मृत्युची प्रतीक्षा करतोय, असा त्याचा या मागचा भाव होता.Meditation in Time of War ही १९२१ मध्ये आलेली त्याची कविता आयरिश सैनिकांचं मनोज्ञ वर्णन करणारी होती. त्याची Irish nationalists and political activists ही कविताही प्रचंड गाजली. त्याच्या या कविता वाचल्या की मन अस्वस्थ होतं. त्या काळी मांडलेल्या या वास्तवातून त्यानं कवितेतून आपण समाजाचं प्रतिनिधित्व करू शकतो, समाजाचा आवाज बनू शकतो ही धारणा जगभरातल्या कवींमध्ये दृढ केली. कदाचित बंडाचं निशाण रोवू पाहणार्‍या, समाजातली धग बनू पाहणार्‍या कवींना म्हणूनच यिट्स आपला वाटला. शंभर वर्षांनंतर अजूनही वाटतो. कोणतीही कला राजकीय घमासान घडवू शकते हा त्याचा दृढ विश्वास होता. केवळ या विश्वासावरच तो थांबला नाही तर त्यानं ते सिद्धही करून दाखवलं. कवितेतून राजकीय धोरणांवर टीका-टिप्पणी करायला हवी हे सांगताना तो अनेकदा लेखणीतून, कवितेतून राजकारणावर बरसलाही. यिट्स असंतोषाचा जनक झाला, जगभरातल्या कवींचा प्रेरणादायी स्रोत झाला. कविता ही अस्वस्थतेला वाट करून देणारी एक उत्कृष्ट प्रतिभा आहे हे सांगणारा, तसं सिद्ध करणारा यिट्स म्हणूनच मला आजही तितकाच भावतो. वेड लावतो. साहित्य काय देतं? तर ते प्रतिकूल परिस्थितीतही जगण्याचं बळ देतं! परिस्थितीवर मात करण्यासाठी बंड करा, आवाज उठवा हा मंत्र यिट्स देऊ पाहतो.

An Irish Airman Foresees His Death कवितेत तो म्हणतो,

I know that I shall meet my fate
Somewhere among the clouds above;
Those that I fight I do not hate,
Those that I guard I do not love;
My country is Kiltartan Cross,
My countrymen Kiltartan’s poor,
No likely end could bring them loss
Or leave them happier than before.

यिट्सच्या गूढपणाबद्दलच्या लिखाणातून एक अद्वितीय तत्त्वज्ञान प्रणाली विकसित झाली होती. यिट्सला त्याच्या आयुष्याच्या सुरुवातीच्या काळात ख्रिश्चन धर्माविषयी फारशी आस्था नव्हती. मात्र पौराणिक कथा, थिओसोफी, अध्यात्मवाद आणि तत्त्वज्ञान यांचा आजीवन अभ्यास करण्यासाठी, तसंच या सार्‍याचा माणुसकीशी कसा संवाद साधला गेला याबद्दल जाणून घेण्यासाठी अखेर तो त्याकडं आकृष्ट झाला! पण त्याबरोबरच ऐतिहासिकदृष्ट्या निश्चित केलेली अपरिहार्यता तो मानतो. ती त्याच्या कवितांमध्ये, विशेषत: मानवी आणि दैवी संवादांच्या घटनांच्या वर्णनांत दिसते.

यिट्सनं खरं तर रोमँटिक कवी म्हणून आपली साहित्यिक कारकीर्द सुरू केली होती. मात्र, कालांतरानं आधुनिकतावादी, वास्तववादी कवी म्हणून त्याचं लेखन समोर येऊ लागलं. त्यानं कविता लिहायला सुरूवात केली तेव्हा त्याच्या कवितांमध्ये एक गीतात्मक, रोमँटिक शैली होती. प्रेम, तीव्र इच्छा, निराशा आदी भावभावनांचा त्याच्या कवितांवर पगडा दिसायचा. कालांतरानं या कवितांमध्ये उत्क्रांती आली. अर्थात त्याला अनेक कारणं होती. मॉड गॉना या स्रीबरोबरच्या निराशाजनक प्रेमसंबंधांमुळे त्याचा प्रणयावरचा, प्रेमावरचा विश्वास उडाला होता. त्याच्या मनातला रोमँटिक आदर्शवाद गळून पडला होता आणि आयरिश लोकांच्या समस्या, त्यांच्या वेदना त्याला अधिक जवळच्या वाटू लागल्या होत्या. पुढं राजकारणातल्या त्याच्या प्रवेशामुळे त्या अधिक टोकदार झाल्या. त्याच्या या स्थित्यंतरातून प्रकटलेली कविता अधिक बोलकी झाली. त्यानं समकालीन राजकारणात गुंतल्यावर आक्रमकपणे कविसंमेलनांतून साहित्यिक परंपरेला आव्हान दिलं. कविता फक्त भाविक आणि सुंदर असावी, ही धारणा त्यानं ठोसपणे नाकारली. या प्रभावांमुळं त्याची कविता अधिक गडद, धक्कादायक आणि अधिक आक्रमक झाली.

त्याच्या politics या कवितेत तो म्हणतो,

How can I, that girl standing there,
My attention fix
On Roman or on Russian
Or on Spanish politics,
Yet here’s a travelled man that knows
What he talks about,
And there’s a politician
That has both read and thought,
And maybe what they say is true
Of war and war’s alarms,
But O that I were young again
And held her in my arms.

बदललेला यिट्स शब्दाशब्दांतून नव्याने भेटत गेला आणि नेमका हाच यिट्स भावत गेला. त्याच्या इतर कोणत्याही तत्त्वज्ञानापेक्षा त्याचं सहज, सुंदर लेखन आणि त्यातून व्यक्त होणारी सामान्यांविषयीची तळमळ आपल्याला हलवून टाकते. त्याच्या या वास्तववादी कविता वाचतच राहाव्या वाटतात. माझंही तेच झालं.

अर्थात या दोन मंडळींखेरीजही अनेकांनी मला भरभरून दिलं. पी. बी. शेले, सिल्विया प्लाथ यांनी कवितेवर प्रेम करायला शिकवलं, तर रूडयार्ड किपलिंग, रॉबर्ट बर्नस्, रॉबर्ट फ्रॉस्ट यांनी शब्द कुठे नि कसे वापरावेत याची अनूभुती दिली. ऑस्कर वाइल्ड, जॉन किट्स, टी. एस. ईलियट, सॅम्युएल टेलर, विल्यम ब्लेक यांना वाचताना तर मला प्रत्येकवेळी नवा अर्थ गवसला आहे. वास्तविक, कविता वाचताना त्याचा निखळ आनंद मिळायला हवा पण का कोण जाणे या कवींचं लेखन वाचताना निखळ आनंद तर मिळतोच पण त्याही पुढं जाऊन त्यांच्या काही कविता मला आतून का हलवतात हे मला अजूनही न उलगडलेलं कोडं आहे.

शायलॉक आणि आम्ही

इंग्रजी कवितांबरोबरच मला इंग्रजी नाटकांनीही अंतर्बाह्य बदलवलं. त्यात अर्थातच विल्यम शेक्सपिअर प्रचंड भावला कारण त्यानं केवळ कथानक सापडलंय म्हणून नाटक लिहिलं असं मला कधीच, कुठेच वाटलं नाही. त्याची कथानकं म्हणजे नाटक नाहीच तर त्या आपल्या सभोवताली आजही वावरणार्‍या काही प्रवृत्तीच आहेत की काय, असंच मला नेहमी वाटत आलं आहे. त्यामुळंच अरे, हा बघ शायलॉक, हा बसॅनिओ, हा तर ब्रुटस्, आणि हा लिअर तर नव्हे… महाभारतातल्या प्रवृत्ती आपल्याला आजही जशा आपल्या भोवताली आढळतात, अगदी तशीच शेक्सपिअरची ही सारी पात्रं माझ्या भोवती घुटमळतात की काय असं मला वाटतं. या लेखात आता हे सारं उलगडत बसणं शक्य नाही पण त्याच्या एका नाटकाशी माझी वेगळीच नाळ जोडली गेल्यानं त्याचं कथानक नेहमीच समोर फेर धरून नाचत असतं.
‘द मर्चंट ऑफ व्हेनिस’ हे ते नाटक. इंग्रजी साहित्य (लिटरेचर) घेऊन एम ए करत असताना आम्हाला अभ्यासाला हे नाटक होतं. त्यावेळी ते अभ्यासलं आणि त्यानंतर त्याची अनेकदा पारायणं झाली. साधारणत: शोकांतिकांसाठी माहीर असलेल्या विल्यम शेक्सपिअरची ही विनोदी सुखांतिका आहे. केवळ अभ्यासाला होतं म्हणून नाही, तर त्यातील एका प्रवेशावर आम्ही अभिनयही केला असल्यानं हे नाटक चिरकाळ स्मरणात राहिलं अन् राहिलही. शेक्सपिअरचं लेखन पहिल्यांदा वाचताना सहज समजत नाही आणि आम्ही तर त्यावेळी विद्यार्थीच असल्यानं बर्‍याच अंशी ते डोक्यावरूनच गेलं होतं. मात्र,आमचे शिक्षक प्रा.दीपक बोरगावे सरांनी ते अतिशय उत्कृष्ट शैलीत शिकवलं होतं. कदाचित त्यामुळंही या नाटकाचा पगडा सतत माझ्या स्मृतींवरआहे. बोरगावे सरांनीच आमच्या एमएच्या दुसर्‍या वर्षाच्या सेंड ऑफला यातील एक प्रवेश सादर करण्याची कल्पना सुचवली होती. ही कल्पना साकारण्याची जबाबदारी आमच्याच मित्र-मैत्रिणींच्या ग्रुपवर येऊन पडली होती. पडली होती, म्हणण्यापेक्षा अधिक उत्साही असल्यानं आम्हीच ती घेतली होती. त्यातला कुठला प्रवेश सादर करता येईल, इथपासून ते पात्रं निवडण्यापर्यंतची सारी लढाई आम्हाला लढायची होती. शेवटी दोन-चार दिवसांनी या नाटकातला तो ड्युक ऑफ व्हेनिस समोरचा कोर्टातला प्रवेश साकारावा असं आमचं ठरलं आणि सरांचाही त्याला ग्रीन सिग्नल मिळाला. त्यातल्या प्रमुख व्यक्तिरेखा होत्या, शायलॉक आणि अँटोनियो. त्यातला शायलॉक मी साकारला होता. ही या नाटकातली नकारात्मक भूमिका आहे पण तीच मुख्य असल्यानं ती मीच साकारावी असं ठरलं. इतर पात्रं नेमकी कुणी साकारली होती, ते फारसं आठवत नाही आता पण सार्‍यांनीच ड्यूक, बसॅनियो, ग्रॅशियानो, सॅलेरियो, क्लर्क या पुरुष व्यक्तिरेखा आणि पोर्शिआ, नेरिसा या स्री व्यक्तिरेखांना योग्य न्याय देण्याचं काम केलं. सर्वांनीच अगदी चपखल वेशभूषा करून ते झोकात सादर केलं होतं. किमान त्या दिवशी तरी आम्ही ब्रिटन किंवा अमेरिकेतल्या ओपेराविश्वात वावरत होतो जणू कारण कार्यक्रम संपल्यावरही काहीजण बराचवेळ त्याच वेशभूषेत होते. अर्थात तो काळच भन्नाट असतो.

वास्तविक, हे नाटक म्हणजे मित्रासाठी स्वत:च्या शरीराचं मांसही सावकाराला कापून द्यायला तयार झालेल्या मित्राची कहाणी आहे. आणखीही बरेचसे कंगोरे त्याला आहेत. त्यातले संवादही मनाला भिडणारे आहेत. ते केवळ दोन पात्रांतले संवाद नाहीत, तर संवाद साधताना वापरलेल्या शब्दांत आयुष्यातलं तत्त्वज्ञान बारकाईनं उलगडून दाखवण्याची किमया शेक्सपिअरनं लीलया साधली आहे. त्याची हॅम्लेट, किंग लिअर ही नाटकं तर जगप्रसिद्ध झालीच पण रोमिओ अँड ज्युलियट, टिमॉन ऑफ अथेन्स, ज्युलियस सिझर, मॅक्बेथ, ऑथेल्लो, अँटनी अँड क्लिओपात्रा या नाटकांनीही जगभरातल्या रंगमंचावर राज्य केलं. यावरून एक लक्षात येईल की शेक्सपिअरच्या सुखांतिकांपेक्षाही त्याच्या शोकांतिका रसिकांना अधिक भावल्या. कदाचित या आणि अशा अनेक कसबांमुळंच शेक्सपिअर जगभरातलं शब्दविश्व व्यापूनही दोन अंगुळं शिल्लक राहतोच.

शेक्सपिअरबरोबरच जॉर्ज बर्नार्ड शॉ, आर्थर मिलर, ऑस्कर वाइल्ड, सॅम्युअल बेकेट, टेनिसी विल्यम्स यांच्या नाटकांनीही माझ्यातली इंग्रजी साहित्यातली गोडी वाढवली. या सार्‍यांच्या नाटकांबद्दल पुन्हा कधीतरी लिहीनच पण पुन्हा एकदा सांगावंसं वाटेल ते म्हणजे साहित्य वाचण्याची गोडी कदाचित आपल्या मातृभाषेतून निर्माण होऊ शकेलही, किंबहुना ती होतेही. मात्र, आपल्या साहित्यजाणिवा समृद्ध करण्यासाठी आणि सारा दृष्टिकोन बदलण्यासाठी इंग्रजी साहित्य तुम्हाला अधिक मदत करतं. इंग्रजीला वाघिणीचं दूध म्हणतात! ते पिण्याचा प्रयत्न मी केला. अजूनही करतोच आहे. या अभ्यासात या दुधाची चव प्रत्येक वेळी नव्यानं समजतेय. एक मात्र नक्की, आईच्या दुधानं (मराठीनं) उभं रहायला, बागडायला शिकवलं असलं तरी या वाघिणीच्या दुधानं वेगळ्या धाटणीनं जगायला शिकवलंय!

– उत्तमकुमार इंदोरे, पुणे
संपर्क ९०११०१७७३५
(लेखक कवी, पत्रकार व इंग्रजी साहित्याचे अभ्यासक आहेत)

पूर्वप्रसिद्धी – ‘साहित्य चपराक’ दिवाळी विशेषांक २०२१
पृष्ठ क्र. २६३

‘चपराक प्रकाशन’च्या वाचनीय आणि दर्जेदार पुस्तकासाठी आणि ‘चपराक’चे सभासद होण्यासाठी संपर्क – ७०५७२९२०९२

चपराक

पुणे शहरातून ‘साहित्य चपराक’ हे मासिक आणि ‘चपराक प्रकाशन’ ही उत्तमोत्तम पुस्तके प्रकाशित करणारी ग्रंथ प्रकाशन संस्था चालविण्यात येते. ‘साहित्य चपराक’ मासिकाचा अंक दरमहा 10 तारखेला प्रकाशित होतो. आपले साहित्य पाठविण्यासाठी, ‘चपराक’मध्ये जाहिराती देण्यासाठी आणि नवनवीन पुस्तकांच्या माहितीसाठी संपर्क - घनश्याम पाटील, संपादक 'चपराक'.
व्हाट्सऍप क्रमांक - ८७६७९४१८५०
Email - Chaprak Email ID

तुमची प्रतिक्रिया जरूर कळवा

हे ही अवश्य वाचा