‘‘शरद पवार यांनी वसंतदादा पाटील यांच्या पाठीत खंजीर खुपसल्याची चर्चा गेली अनेक वर्षे महाराष्ट्रात रंगत आहे. आमच्या पिढीला त्याविषयी फारसे काही माहीत नसल्याने पवार साहेबांनीच त्यावर भाष्य करणारी ‘खंजीर’ नावाची राजकीय कादंबरी लिहिल्यास ती वाचकप्रिय ठरेल आणि त्या कादंबरीला मराठीतला ‘ज्ञानपीठ’ही मिळेल,’’ असे मी एका लेखात लिहिले होते. हाच धागा पकडत अभियांत्रिकी शाखेच्या दुसर्या वर्गात शिकत असलेल्या एका विद्यार्थ्याने मला दूरध्वनी केला. तो म्हणाला, ‘‘दादा, मला हे माहीत आहे की तुम्ही कधीही खोटे लिहित नाही. मात्र पवार साहेबांनी खरेच वसंतदादा पाटलांचा ‘मर्डर’ केलाय का हो?’’
अज्ञानापोटी झालेल्या त्याच्या गैरसमजाबद्दल हसावे की रडावे हेच आम्हाला कळत नव्हते. मराठी माणसाविषयी सातत्याने कोकलणार्यांना मराठी भाषा, मराठी संस्कृती या दृष्टिने इथल्या व्यवस्थेने दिलेली ही चपराकच होती. ‘खंजीर खुपसणे म्हणजे ‘मर्डर’ करणे’ हे पक्के ठाऊक असणार्या एका महाविद्यालयीन युवकाला मराठी भाषेचे ज्ञान देणे यासारखे आव्हानात्मक काम दुसरे कोणते असू शकते काय?
गलेलठ्ठ पगार घेऊन शाळा-महाविद्यालयातून आजची ही पिढी बरबाद केली जात आहे. भाषेचे गर्भितार्थ, उपहास, व्यंग्य, अर्थच्छटा हे सारे त्यांच्या डोक्यावरून जाते. विशेषतः ग्रामीण जीवनाचा परिचय नसल्यानेही अनेक घोटाळे होतात. कृषी संस्कृतीशी तर या पिढीला काहीच देणेघेणे नाही. नांगरणी, पेरणी, कोळपणी, खुरपणी, बैलगाडी, कासरा, जू, रान, पिकं, धसकटं, वाफे, धार या व अशा गोष्टी तर त्यांच्या गावीही नसतात. ‘खुरप्याच्या तोंडी पिकाचं अमृत असतं’ असं मी म्हणालो तर मित्रानं लगबगीनं विचारलं, ‘हा खुरपं नावाचा प्राणी आपल्याला कसा मिळवता येईल?’ मुंबईत मध्यंतरी ‘दूध कोठून येते?’ या प्रश्नाचे उत्तर एका विद्यार्थ्याने ‘दुधवाल्या भैय्याकडून’ असे दिले होते. गाय, म्हैस, शेळी याविषयी ऐकून घेण्यासही तो तयार नव्हता.
सध्या अनेक कुटुंबात पालकच पाल्याशी व्यवस्थित बोलत नाहीत. मराठी, हिंदी, इंग्रजी आणि काही ठिकाणी अन्य भाषेचेही शब्द बोलण्यात सररासपणे वापरले जातात. त्याचे गांभिर्य कुणाच्या गावीही नसते. मग भाषाशुद्धी कशी होईल? महानायक अमिताभ बच्चन यांच्याकडे बघा. ते हिंदीत बोलताना फक्त हिंदीतच बोलतात. इंग्रजीत बोलताना अस्खलीत इंग्रजीतच बोलतात. त्यांच्या बोलण्यात भाषेची सरमिसळ नसते. भेसळ तर नसतेच नसते! म्हणूनच त्यांनी असंख्य लोकांवर मोहिनी घातली. त्यांचा आवाज, त्यांची भाषा हीच त्यांची ओळख आहे. मराठीच्या नावावर राजकारण करणार्यांनी त्यांचा हा एवढा एक गुण जरी आत्मसात केला तरी खूप काही साध्य होईल.
सध्या शहरीच नव्हे तर ग्रामीण भागातही बहुसंख्य पालक आपल्या पाल्याला इंग्रजी माध्यमाच्या शाळेत घालण्यासाठी धडपडत असतात. त्यासाठी वाटेल तितका निधी द्यायचीही त्यांची तयारी असते. ‘इंग्रजी ही ज्ञानभाषा आहे’ आणि ‘इंग्रजी ही जागतिक भाषा आहे’ या दोन ‘अंधश्रद्धा’तून मानसिकदृष्ट्या खचलेले लोक इंग्रजीचे स्तोम अकारण माजवतात. मातृभाषेत शिक्षण न झाल्याने या मुलांची प्रगती खुंटते. त्यांना ना धड इंग्रजी भाषा आत्मसात करणे जमते ना मराठीतला गोडवा कळतो! बरे, हे ध्यानात येईपर्यंत वेळ निघून गेलेली असते. आपापल्या मातृभाषेत शिक्षण घेतलेल्या मुलांनीच यशाचे नवनवे मानदंड तयार करत विक्रम नोंदवले आहेत. मराठीतच काय, अन्य कोणत्याही भाषेत ही वस्तुस्थिती कोणीही नाकारू शकणार नाही.
इतर जातींचा, इतर धर्मांचा तसेच इतर भाषेचा द्वेष करू नकात! मात्र आपली मातृभाषा तरी धडपणे बोलणार की नाही? मध्यंतरी कोणीतरी सांगितले होते, ‘तुम्ही मला ‘आई’ म्हणणारा एक इंग्रज दाखवा; मी तुम्हाला ‘मम्मी’ म्हणणारे लाखो हिंदुस्थानी दाखवेन!’ ही वस्तुस्थिती आहे. विदेशी भाषा आणि संस्कृतीच्या माध्यमातून आपल्या पायातील शृंखला आणखी मजबूत झाल्या आहेत. इंग्रजांनी आपल्या देशावर दीडशे वर्षे राज्य केले तरीही आम्ही सुधारायला तयार नाही.
मराठी भाषेला इंग्रजीपासून धोका आहेच आहे; पण त्याहून अधिक धोका हिंदीपासून आहे. आपण सहजपणे बोलतानाही हिंदीचा आधार घेतो. ज्या गोष्टीची लाज वाटायला हवी ती गोष्ट आम्ही अभिमानाने करतो. खरे तर या अर्धवट शहाण्यांना हिंदीही व्यवस्थित येत नाही. प्रशासकीय कामकाजातली हिंदी भाषा कळणारे कितीजण आहेत? चित्रपटाच्या माध्यमातून दाखवली जाणारी भाषा, हिंदी भाषा म्हणून खपवली जाते. मात्र त्या भाषेत अन्य भाषिक शब्दांचाच भरणा अधिक असतो. मध्यंतरी एकदा एका हिंदी सिनेमाचे कथानक वाचल्यानंतर एका हिंदी अभिनेत्रीने सांगितले होते की, ‘‘मी इंग्रजी सिनेमात काम करणार नाही…’’ या चित्रपटात खरेच निम्मे संवाद इंग्रजीत असतात, हिंदुस्तानातल्या विविध प्रांतातले काही शब्द घुसडले जातात आणि हिंदी या नावाखाली ते आमच्यावर लादले जातात.
पुण्यातल्या एक विदुषी अनेक साहित्यिक व्यासपीठावर दिसतात. ‘अमुक लेखकाची मुलगी आणि अमुकची आई’ अशीच त्यांची सर्वत्र ओळख करून दिली जाते. प्रत्यक्षात त्या कोण आहेत, हे महत्त्वाचे असताना अशा गोष्टींचाच उहापोह केला जातो. त्यांचा परिचय करून देताना बर्याचवेळा ‘सुप्रसिद्ध महिला लेखिका’ असाच भाषाप्रयोग केला जातो आणि पुणेकरही निमूटपणे ऐकून घेतात. लेखिका म्हटल्यावर त्या महिला आहेत याचे तुणतुणे का वाजवावे लागते? ‘गोल सर्कल’, ‘पिवळे पितांबर’, ‘गाईचे गोमूत्र’, ‘लेडिज बायका’, ‘चुकीची मिस्टेक झाली’, ‘काल रात्री माझी नाईट होती’ असे काही शब्दप्रयोगही सररासपणे ऐकायला मिळत आहेत.
भाषा संपली तर संस्कृती संपेल आणि संस्कृती संपली तर राष्ट्र बेचिराख होईल, याचा गांभिर्याने विचार करण्याची वेळ आली आहे. भाषा शुद्धीकरणाची आणि भाषा संपन्नतेची चळवळ राबवण्याच्या दृष्टिने प्रत्येकाने आता मराठी भाषेत बोलण्याबाबत आग्रही रहायला हवे. एकवेळ इतर भाषेतले शब्द आपल्या भाषेत ‘मिसळले’ले परवडले; पण हे लोक भाषेतही ‘भेसळ’ करतात. ‘मिसळ’लेल्या शब्दांना किमान काही चव तरी असते पण ‘भेसळ’ केल्याने मराठीचे आरोग्य धोक्यात आले आहे. अगदी साधे उदाहरण घ्या! आपल्या देशातल्या दहा टक्के लोकांना तरी हिंदी भाषा व्यवस्थित बोलता येते का? सध्या प्रचलित असलेली हिंदी भाषा ही नवनव्या टुकार सिनेमांची देण आहे. शासकीय कामकाजातली किंवा हिंदी साहित्यातली हिंदी भाषा कळणारे किती मराठी लोक आहेत? अशा भेसळीमुळे आपणच आपल्या मातृभाषेचा गळा घोटत आहोत.
मध्यंतरी प्रा. मानसी रांझेकर यांनी एक मुद्दा मांडला होता. त्या इंग्रजी विषयाच्या प्राध्यापक होत्या पण मराठी भाषेवरील त्यांचे प्रभुत्वही विस्मयकारक आहे. त्या म्हणतात, ‘‘अनेक नामवंत महाविद्यालयातील कला शाखा बंद पडत चालल्या आहेत. प्रत्येकाला वाटते की आपण डॉक्टर, अभियंता व्हावे, आयटीत जाऊन ‘ऐटित’ जगावे. मात्र परिस्थिती त्याउलट आहे. देशाचे नेतृत्व करणारे बहुतेक महत्त्वाचे नेते कला शाखेतून जातात. वैचारिक प्रतिनिधित्व करणारे पत्रकार, साहित्यिक, वकील, शिक्षक, प्राध्यापक हेही कला शाखेतूनच जातात. मराठी भाषेतून शिक्षण घेतलेल्या या सर्व क्षेत्रातील लोकाचे भवितव्य उज्ज्वल आहे. शिवाय आज शिक्षक, प्राध्यापक, वकील, पत्रकार यांचे आर्थिक उत्पन्नही चांगले आहे. असे असूनही मराठी भाषेकडे, कला शाखेकडे वळण्याचा कल कमी होत चाललाय ही चिंतेची बाब आहे.’’
अनेक वर्षाच्या ज्ञानार्जनातून आणि समाजाच्या तटस्थ निरिक्षणातून मांडलेले त्यांचे हे विचार दुधखुळ्या पालकांना आणि कर्मदरिद्री सरकारला कळू नयेत, याचे आश्चर्य वाटते.
दरवर्षी मराठी राजभाषा दिन ‘साजरा’ करण्याची ‘परंपरा’ चालू ठेवण्यापेक्षा जर आपण भाषेच्या समृद्धीसाठी किमान मराठीत बोलणे, लिहिणे सुरू केले तरी मोठे परिवर्तन घडेल. कौतुक करताना आणि शिव्या घालतानाही आपल्या मातृभाषेचाच आधार घेतला तर भाषा प्रवाही राहिल आणि आपल्या व्यक्तिमत्त्वाची छाप उमटेल.
– घनश्याम पाटील
७०५७२९२०९२
पूर्वप्रसिध्दी – दै. पुण्यनगरी दि. २७ फेब्रुवारी २०२२
बरोबर. शेवटी जो उपाय तुम्ही सांगितलेला आहे, त्याची दैनंदिन अंमलबजावणी व्हायला हवी🙏
इतर भाषा मराठीत न मिसळता मराठी बोलता येणे, लिहिता येणे हीच आजच्या मराठी भाषा दिनाच्या निमित्ताने महत्वाची गोष्ट होईल. पाटील सर म्हणतात त्याप्रमाणे आईला ममी न म्हणता “आई” म्हणून हाक मारणे ही सुद्धा आजच्या दिनी महत्वाची गोष्ट ठरेल! लेख आवडला.
मर्मावर बोट ठेवणारा लेख…