सावळ्या ढगाची गुंडाळी

गेली दोन दिवस झाले सारखा पाऊस कोसळतोय. थांबायचं नाव घेत नाही. त्याचा नाद वातावरणात भरून राहिलाय. काळ्याभोर ढगांचे पुंजकेच्या पुंजके पुढे सरकत आहेत. पाऊसधारात धरित्री न्हाऊन निघत आहे. सगळंच जणू पावसानं भारून टाकलं आहे. कुणी घराच्या बाहेर पडत नाही. घराबाहेर पडून करणार काय?

माधव घराच्या व्हरांड्यात बसून कोसळणारा पाऊस पाहत होता. अंगावर उबदार शाल लपेटलेली होती. हातात वाचण्यासाठी घेतलेलं पुस्तक तसंच होतं. पुस्तकाच्या एका पानातून मोरपीस डोकावत होतं. आरामखुर्चीत बसून पाऊसधारा पाहण्यात तो तल्लीन झाला होता. पाऊस खूप आवडायचा त्याला! त्या स्फटिकासारख्या जलधारा त्याचं मन मोहरून टाकायचा. पाऊस अनेकानेक आशा-आकांक्षाचे प्रतीक आहे यावर त्याची ठाम निष्ठा होती. म्हणूनच तो तासन्तास या कोसळणार्‍या जलधाराचं सोवळं रूप बघण्यात स्वतःला हरवून जायचा. आजही या पावसाने तो मोहित झाला होता. पाऊस पाहता-पाहता त्याने हलकेच आपली मान मागे टेकली. डोळे मिटून घेतले. तो तसाच कितीतरी वेळ बसून राहिला हरवल्यासारखा! एवढ्यात समोर ठेवलेला त्याचा मोबाईल वाजला. नंबर अनोळखी होता. अशावेळी कुणाचा असेल फोन? असू दे, नकोच आता घ्यायला कुणाचाही असला तरी! त्याने फोन उचलला नाही. तो तसाच बसून राहिला. पुन्हा फोन वाजला. त्याने अनिच्छेने फोन घेतला.

‘‘हॅलो, कसा आहेस?’’
पलीकडून स्वतःचा एकेरी उल्लेख ऐकून त्याला आश्चर्य वाटलं. हल्ली त्याला एवढ्या आपुलकीने कुणी एकेरी हाक मारत नव्हतं. तो त्या पंचक्रोशीतील एक प्रतिष्ठित व्यक्ती होता. आपल्या सरपंचपदाच्या कारकीर्दीत त्याने स्वतःच्याच नव्हे तर आजूबाजूच्या अनेक गावांचा विकास घडवून आणला होता. कितीतरी योजना गावात आणल्या होत्या. गावागावातील लोकांना एकत्र आणून या योजना त्यांना समजून दिल्या होत्या. जलसंधारण, पाणी अडवा, पाणी जिरवा, तंटामुक्त गाव, तक्रार निवारण केंद्रे, बचत गट, गावचावडी वाचन उपक्रम, साक्षरता अभियान यासारख्या अनेक उपक्रमातून अनेक गावांचा कायापालट घडवून आणण्यात त्याचा मोठा सहभाग होता. गाव तिथे जंगल आणि हरित गावे या त्याच्या उपक्रमाची राज्य पातळीवर दखल घेतली गेली होती. त्यामुळे हल्ली कुणीही त्याचा एकेरी उल्लेख करत नसे.
‘‘कसा आहेस?’’
अरे, कोण असेल ही? माझा एकेरी उल्लेख करतेय!
कुणीही असले तरी तो आवाज त्याला खूप जवळचा वाटला. त्या मधुर गोड आवाजाने त्याच्या हृदयाच्या तारा कंपित झाल्या. तो नकळत क्षणभर पुलकित झाला. कुणीतरी खूप जवळचं बोलतंय असं त्याला वाटलं.
पण कोण असेल ही?
एकेरी बोलतेय म्हणजे खूप जवळची असणार कोणीतरी! त्याचा असा एकेरी उल्लेख करणारी माणसं त्याला खूप आवडायची. त्याला ती आपली वाटायची.
अशी माणसं काळजाची असतात. हा आवाज तर पार काळजात खोल कुठेतरी दडून बसल्यासारखा वाटतोय. तो स्वतःशीच पुटपुटला.
त्याने आपल्या स्मृतीला खूप ताण दिला; पण त्याला काही आठवले नाही. मोबाईल कानाला लावून तो विचारात गढून गेला.
‘‘कसा आहेस माधव?’’
त्या आवाजात कातरता होती. कंठातला कंप स्पष्टपणे जाणवत होता.
‘‘मी ठीक आहे! पण माफ करा, मी ओळखलं नाही तुम्हाला’’ तो बोलून गेला.
‘‘नाही ओळखलं ना? होतं असं! कदाचित आवाजात बदल झालाय. असं होतं अरे! माणसं बदलतात, त्यांचा पत्ता बदलतो. कधी-कधी त्यांच्यासाठी असलेलं जगही बदलतं, माधव!’’ ती बाष्परूद्ध कंठाने बोलत होती.
तिचं असं बोलणं त्याला पक्ष्यांच्या सायंकालीन मलूल सुरावटीसारखं वाटलं.
‘‘एक सांगू का? सारीच गणितं सुटत नसतात अरे! सारीच कोडी उलगडत नसतात. पटावरच्या सार्‍याच सोंगट्या आपल्या मनासारख्या पडतात काय? त्या सोंगट्या आणि आपण काय असतो माहिती आहे? असते ते फक्त खेळणे! नियतीच्या हातातले, तिने खेळवायचे आणि आपण खेळायचे.’’
तिचा आवाज पाऊसधारांनी ओलाचिंब झाल्यासारखा वाटत होता.
‘‘खरंय तुमचं.’’ तो नकळत बोलला.
आपलं खूप जवळचं कुणीतरी आपल्याशी बोलतंय असं त्याला वाटलं.
‘‘खरंच नियती खूप क्रूर असते हो, एखाद्या श्वापदासारखी! आपण असतो शिकार आणि ती असते शिकारी. कधी शिकार करते कळतच नाही!’’
आपण हे का बोलतोय हे कळायच्या आधीच तो बोलून गेला.
‘‘हो ना; पण या खेळात अनेक कडूगोड आठवणी मागे ठेवते ती नियतीच!’’ तिचा तसाच कातर आवाज.
‘‘माधव, तुझ्या मनात कधी आठवणींचे तरंग उठतात का? बर्फावरून घसरत जावे तसे तुझे मन कधी घसरते का रे? कधी आठवणींचा वणवा तुझ्या मनभर भडकतो का?’’
तिच्या या प्रश्नांनी माधव व्यथित झाला.
आठवणी डंख मारतात. त्या वेदना देतात. त्या कुणाला सांगता येत नाहीत. दाखवता येत नाहीत. आठवणी छळतात खूप! तो अगतिक झाला.
एक धूसर करड्या रंगाचे पाखरू आपले पंख फडफडत व्हरांड्यात येऊन बसले.
‘‘नको एवढा व्यथित होऊस! अरे, एवढी अगतिकता बरी नाही. जावू दे, आईबाबा कसे आहेत? मुले काय करतात तुझी?’’ तिने विषयाला वेगळे वळण दिले.
‘‘आईबाबा राहिले नाहीत या जगात! आधी बाबा गेले आणि पाठोपाठ आईही! मुले आहेत. मुलगा मेडिकलच्या दुसर्‍या वर्षाला आहे. मुलगी अकरावीत शिकते. पत्नी घरीच असते. घराचा सारा व्याप, मळ्यातील कामे, देणेघेणे, काय नी काय? सारी कामे तीच पाहते.’’
एखाद्या मऊ मुलायम कातडी वेष्टनाचं पुस्तक उघडून वाचावं तसं माधव बोलला.
‘‘अरे व्वा! छान आहे की! सुखी आहेस तू.’’
ती असे म्हणताच तो क्षणभर शांत झाला. त्याचवेळी व्हरांड्यात बसलेले ते धूसर करड्या रंगाचे पाखरू उडाले.
‘‘हो सुखी आहे. सर्वांसाठी हा माधव सुखी आहे. हा वरवरचा आनंद सर्वांनाच दिसतो; पण आतली रूतलेली ठणकणारी वेदना कुणालाच दिसत नाही. आतलं मन समजून उमजून घेणारं कुणी भेटलं नाही. खरंच तू आतून सुखी आहेस का? असं कुणीच विचारत नाही. मनाचा वेध घेणारी, निर्मळ मनाची एकच होती, तीही सोडून गेली. पंचवीस वर्षाचा काळ लोटला तिला जाऊन. त्यानंतर एवढ्या वर्षात मनातलं जाणणारं कुणी भेटलं नाही. हृदयाला स्पर्श करण्याचं तिचं सामर्थ्य कुणालाच लाभलं नाही.’’
‘‘नशिबाच्या धाग्याची गाठ कुणालाच बांधता येत नाही अरे! ती जेवढी बांधावी तेवढीच सैल होत जाते. धागे विस्कटतात. गुंता होतो. ते विस्कटलेपण गाठीत बांधता येत नाही. गुंता सुटत नाही.’’
तिचा दाटलेला आवाज माधवला जाणवला.
‘‘का सैल होतात या गाठी? गाठी सैल होतात पण वेदनेचा पीळ कायम राहतो. काळजाला काचतो. तिचं ते गोड हसू म्हणजे वार्‍याची मंद झुळूक वाटायची. ती बोलायची हळू आवाजात. तरुण मुलींनी मोठ्याने बोलू नये हे तिला कोण शिकवले होते कोण जाणे. वयाच्या अवघ्या विसाव्या वर्षी तिच्या विचारात किती प्रगल्भता होती काय सांगू? माझा केवळ चेहरा पाहून ती वाचायची माझ्या आतला कल्लोळ! सुखदुःखाची सखी होती ती! जेमतेम दोन-तीन वर्षांचा सहवास; पण अनंत जन्माची सोबतीण होऊन गेली ती! अंतरीचे सारे गूज फक्त तिच्या जवळच उलगडले! ती गेल्यावर पुन्हा कधीच कुणाजवळ गुज बोलता आलं नाही. बोललो नाही.’’
त्या मुलायम कातडी वेष्टनातील पुस्तकाचे पानच तो वाचत होता.
ती गेल्यापासून उत्कटपणे कुणी हा हात हातात घेतला नाही. आस्थेने कुणी सुखदुःख विचारलं नाही. भरल्या घरातील एकटेपणा खायला उठतो. ती नेहमी म्हणायची ‘घर मोठं असावं. भरलेलं असावं. एकमेकात गुंफलेलं असावं. त्यात साचलेपण नसावं. ते खळाळणारं वाहतं असलं पाहिजे.’
‘‘खरं सांगू का तुम्हाला! घर मोठं आहे पण एकमेकात गुंफलेलं नाही हो! खळाळणारंही नाही. आता नेहमी वाटतं ती असती तर हा प्रवाह वाहता राहिला असता! पण आयुष्यात जर-तरला काहीच महत्त्व नसतं. जे आहे तेच स्वीकारावं लागतं बस्स!’’
त्याचे डोळे ओले झाले.
‘‘एक बोलू का? कदाचित हीच अवस्था तिची देखील झाली असेल तर! कुणी सांगावं नियतीने दोघांचा डाव सारखाच मांडला असेल तर? म्हणून सांगते एवढं उदास होऊन कसं चालेल अरे?’’
ती कातर आवाजात बोलली.
‘‘तुम्हाला खरं सांगतो, तिची आठवण मनातून जात नाही. म्हणून माझं मन व्यभिचारी नक्कीच नाही हो! माझ्या मनात तिची आठवण असली तरी मी माझ्या पत्नीचा कधीच दुस्वास केला नाही. तिला आपलंसं केलं. तिचे सुखदुःख जाणलं. ती सुखी रहावी म्हणून पूर्ण प्रयत्न केले पण…’’
त्याच्या डोळ्यातलं आभाळ गळू लागलं. त्याचवेळी बाहेरचा पाऊस थांबला. फिक्कट सावळ्या रंगाची ढगाची एक गुंडाळी पुढे सरकली. गार वारा सुटला. झाडाच्या पानावरुन पाणी टपटपत खाली पडू लागलं.
‘‘जगण्यावर श्रद्धा ठेव. काट्याचं बोचण  फुलालाही सुटलं नाही. सांभाळ!’’
एवढं बोलून पलीकडून फोन बंद झाला. माधव तसाच खुर्चीवर बसून राहिला.
एका अनोळखी व्यक्तिबरोबर आपण हे सारे कसे बोलून गेलो हे त्याचे त्यालाच कळेना.
काही वेळ गेला आणि पुन्हा फोन वाजला. तोच नंबर होता. माधवने मंतरल्यागत फोन हाती घेतला.
‘‘हॅलो! माधव.’’
‘‘जा, घरात जा. असा बाहेर बसू नकोस. पावसाळी हवा बाधते तुला. आजारी पडशील. उठ जा घरात, उठ.’’
फोन बंद झाला. माधव ताडकन उठून उभा राहिला. त्याला सारे सारे उलगडले. आवाजाचे तरंग हृदयाच्या आरपार गेले. ओळख पटली तसा त्याने परत फोन लावला. पलीकडून फोन बंद झाला होता. कधीच सुरू न होण्यासाठी!
पुन्हा पाऊस सुरू झाला. अवघं अवकाश ओलंचिंब करत बरसत राहिला.

– माधव गिर

संपर्क ८९७५८७८८०९

( श्री. माधव गिर हे पेशाने शिक्षक असून ‘साहित्य चपराक’ मासिकाचे उपसंपादक आहेत. त्यांचे ‘नवं तांबडं फुटेल’ आणि ‘शेतीबाडी’ हे कवितासंग्रह ‘चपराक’ने प्रकाशित केले आहेत. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात त्यांनी निमंत्रितांच्या काव्यसंमेलनात कविता सादर केली आहे. एक यशस्वी सूत्रसंचालक अशीही त्यांची ओळख आहे. लवकरच त्यांची संत मुक्ताबाईंच्या जीवन आणि चरित्रावरील कादंबरी प्रकाशित होत आहे.)

पूर्व प्रसिद्धी : ‘मासिक साहित्य चपराक’, मार्च २०२२

चपराक

पुणे शहरातून ‘साहित्य चपराक’ हे मासिक आणि ‘चपराक प्रकाशन’ ही उत्तमोत्तम पुस्तके प्रकाशित करणारी ग्रंथ प्रकाशन संस्था चालविण्यात येते. ‘साहित्य चपराक’ मासिकाचा अंक दरमहा 10 तारखेला प्रकाशित होतो. आपले साहित्य पाठविण्यासाठी, ‘चपराक’मध्ये जाहिराती देण्यासाठी आणि नवनवीन पुस्तकांच्या माहितीसाठी संपर्क - घनश्याम पाटील, संपादक 'चपराक'.
व्हाट्सऍप क्रमांक - ८७६७९४१८५०
Email - Chaprak Email ID

7 Thoughts to “सावळ्या ढगाची गुंडाळी”

  1. Vinod s. Panchbhai

    खूपच भावस्पर्शी कथा!

    1. Madhav

      धन्यवाद!!

  2. रविंद्र कामठे

    गिरसर अप्रतिम कथा 👌🏻🙏

  3. जयंत कुलकर्णी

    उत्कंठावर्धक कथा.

  4. Madhav

    धन्यवाद!!

  5. Ramesh machhindra wagh

    अप्रतिम कथा. भावली

तुमची प्रतिक्रिया जरूर कळवा

हे ही अवश्य वाचा