महाराष्ट्राची लोकसंख्या ही बारा कोटीहून अधिक आहे. जगभरात दहा कोटीहून अधिक मराठी भाषिक आहेत. जगात सर्वाधिक बोलल्या जाणार्या दहा भाषांत मराठी आहे. मराठी भाषेचा इतिहास हा हजार ते बारा वर्षांचा आहे, अशा गोष्टी आम्ही अभिमानाने सांगतो! मात्र केवळ साहित्यनिर्मितीला ‘व्यवसाय’ मानून जगता येईल अशी आजही परिस्थिती नाही. गेल्या दीडशे वर्षात ज्यांनी ज्यांनी मराठी साहित्यनिर्मिती केली त्या सर्वांनी आपला चरितार्थासाठीचा व्यवसाय वेगळा ठेवलाय आणि त्यांचं लेखन त्यांचा छंद म्हणून जोपासला आहे.
मराठी साहित्याच्या क्षेत्रात विशेषतः आधुनिक गद्य लेखनाला सुरूवात झाल्यानंतर ते आजअखेर केवळ साहित्यावर उपजिविका चालविणारे अत्यंत अल्प लेखक होऊन गेले. ज्यांनी मराठी साहित्यावर उपजिविका चालविली त्यांची आर्थिक परिस्थिती फार संपन्न होती असं दिसून येत नाही. गो. नी. दांडेकर, सुहास शिरवळकर, व्यंकटेश माडगूळकर ही यातल्या काही निवडक लोकांची नावं आहेत. यांच्या साहित्यनिर्मितीचं मूल्य किती आणि कसं होतं यापेक्षा मराठी साहित्यातले हे सारस्वत मराठी जनतेनं आणि माय मराठीच्या अन्य भक्तांनी कसे सांभाळले हे बघणं गरजेचं आहे.
रस्त्यावर कविता विकायला बसणार्या कवी मनमोहन नातू यांची अवस्था समाजात हास्यास्पद झाली. कारण कविता ही विकता येऊ शकते आणि कविता ही विकत घ्यायची असते याचं भान मराठी वाचकांना आणि कवितेवर प्रेम करणार्या रसिकांना नाही. अनेक वर्ष मराठी भाषेत शिकून पदवीधर झालेल्या मराठी विद्यार्थ्यांच्या मुलाखती बघा. ‘तुम्ही कोण होणार?’ या प्रश्नाचं उत्तर देताना ‘आयएस, आयपीएस, डॉक्टर, अभियंता, वकील, अन्य शासकीय अधिकारी’ अशी त्यांची उत्तरं असतात. ‘मी मराठी लेखक किंवा मराठी कवी होणार’ असं सांगायचं धाडस कोणीही करत नाही. वर्तमानपत्रात, फेसबुकवर, समाजमाध्यमात जाहिराती येतात, ‘शेअर मार्केट शिका आणि अल्पावधित लक्षाधीश व्हा,’ ज्या दिवशी ‘मराठी साहित्यनिर्मिती करायला शिका आणि कोट्यधीश व्हा’ अशा जाहिराती येतील त्या दिवशी मराठी साहित्य समृद्ध होण्याची परंपरा सुरू होईल. असं काही होईल याची यत्किचिंतही शक्यता पुढच्या पन्नास वर्षात दिसत नाही.
मराठीत ऐतिहासिक कादंबर्या लिहिणारे असू देत किंवा विनोदी साहित्य लिहिणारे विनोदवीर असू देत! कुणाला उदरनिर्वाहासाठी पत्रकारिता करावी लागते, कुणाला शाळेत शिक्षक, प्राध्यापक म्हणून काम करावं लागतं, कुणाला जिल्हाधिकारी म्हणून काम करावं लागतं किंवा कुणाला थेट आरबीआयचा गव्हर्नर व्हावं लागतं. कुणी शेती करतं, कुणी बँकेत खर्डेघाशी करतं आणि उरलेला वेळ साहित्यनिर्मितीत घालवतं. ‘शंभर टक्के वेळ साहित्यनिर्मितीत घालवेल आणि मी चार्टर विमानानं फिरू शकेल’ अशी परिस्थिती साहित्यात निर्माण करणं ही मराठी भाषिकांची जबाबदारी आहे. एखादा लेखक मरण पावला की तो कसा दारिद्य्रात जगला, कसा मेला आणि त्याच्या आयुष्याची कशी वाताहत झाली? तरी त्यानं मराठी साहित्य कसं समृद्ध केलं यावर श्रद्धांजलीच्या सभा घ्यायच्या, भाषणं घ्यायची, त्याचा एखादा पुतळा उभा करायचा आणि आम्ही किती सांस्कृतिक समृद्ध आणि विकसित लोक आहोत म्हणून स्वतःचं कौतुक करून घ्यायचं हा प्रकार आता बदलला पाहिजे. हिंदी साहित्यात डॉ. राहत इंदौरी, मुनव्वर राणा, कुमार विश्वास अशा कवींनी कोट्यवधी रूपयांचा साहित्यिक व्यवहार केला. मराठी लेखक-कवींना असं भाग्य कधी मिळणार?
एखादं पुस्तक लिहिलं आणि तो प्रकाशकाकडं गेला तर ‘आता प्रकाशनाच्या क्षेत्रात काही राहिलं नाही, पुस्तक कोणी खरेदी करत नाही, वाचन राहिलं नाही’ असं सांगून त्या लेखकाला नाउमेद करण्याचं काम सातत्यानं केलं जातं. पुलंनी म्हटलं आहे की ‘प्रकाशनाच्या क्षेत्रात काही सुटत नाही असं म्हणणारे नव्वद टक्के प्रकाशक मला आजूबाजूला दिसतात; फक्त या प्रकाशकांची पोटं मात्र सुटतात. बाकी काही सुटत नाही आणि याचं कोडं मला काही सुटत नाही.’ यासाठी मराठी प्रकाशनविश्वाला दोषी धरण्यातही काही अर्थ नाही. हजार-दोन हजार, पाच हजार प्रती यापुढे मराठी साहित्याची झेप नाही. एखाद्या खड्डेवाडीत, मांजरेवाडीत, आडगावात कवीसंमेलन घ्यायचं आणि मागे बोर्ड लावायचा, ‘अ. भा. मराठी कवी संमेलन…’ हे आधी बंद झालं पाहिजे. कवीची कविता ऐकण्यासाठी पुढे निदान लाख-दीड लाख श्रोते हवेत. प्रत्येक निवडणुकीत भूमिका बदलणार्या, प्रत्येक पाच वर्षांनी वेगळ्या पक्षात जाणार्या राजकीय नेत्यांची भाषणं ऐकायला जर पन्नास-पन्नास हजार लोक गोळा होत असतील तर मराठी कवीच्या कविता ऐकायला यायला काय हरकत आहे? दोन कवडीच्या राजकारण्यांना जर तुम्ही इतकी किंमत देत असाल तर कोट्यवधींची साहित्यसंपदा निर्माण करणार्या लेखकांना, कवींना, प्रकाशकांना संपन्न स्थान देणार आहात की नाही?
पूर्वी लेखक आणि कवींना मान मिळायचा, धन मिळायचं नाही. आता मानही राहिला नाही आणि धनही राहिलं नाही अशी अत्यंत दुरावस्ता झालीय. ग्रामीण भागात प्राथमिक शाळेत शिकवणारा शिक्षक हाच तिथला मोठा साहित्यिक असतो. लोकांच्या लग्नपत्रिका लिहून देण्यापासून ते अभिनंदानाच्या फलकापर्यंत, गणेश उत्सवाच्या सजावटीपर्यंत तोच सगळं लिहित असतो. असले ‘होतकरू’ लेखक हेच गेली शंभर वर्षे मराठी साहित्यात ‘निर्मिती’ करत आहेत. क्लास वनची, सर्वोच्च गुणवत्ता ही आयएस, आयपीएस होण्यासाठी निघून जाते. त्याच योग्यतेची गुणवत्ता असलेले लोक परदेशात निघून जातात. त्यापेक्षा अधिक गुणवत्ता असलेले किंवा थोडीफार कमी गुणवत्ता असलेले लोक उद्योग आणि व्यापारात जातात. त्यापेक्षा थोडी कमी गुणवत्ता असलेले लोक राजकारण करतात आणि त्यात स्वतःला काही मिळवता येईल का? याचा प्रयत्न करतात! आणि फारशी प्रतिभा नसणारी, सुमार बुद्धिची माणसं शेवटी साहित्यनिर्मितीकडे वळतात. कारण तिथं काही मिळतच नाही. शेवटी पुढे काहीतरी मिळणार असेल तर चांगली निर्मिती होऊ शकते हे व्यावसायिक वास्तव आम्ही स्वीकारलं पाहिजे.
लेखकांनी आणि कवींनी त्यागी वृत्तींनी लेखन करावं, समाज बदलावा हे आपण त्यांना किती काळ सांगणार आहोत? लेखकांनी ‘लेखण्या मोडा आणि बंदुका हातात घ्या’ असं लेखकांनाच सांगत सुटायचं? अन्य कोणी काही करायचंच नाही? हे बंद झालं पाहिजे. लेखक आणि कवींना सामाजिक प्रतिष्ठा आणि सन्मान मिळायला हवा अशा पद्धतीची ग्रंथव्यवहारात अर्थार्जन करणारी व्यवस्था उभी राहत नाही तोपर्यंत मराठी साहित्यात चांगली गुणवत्ता असणारे लेखक आणि कवी निर्माण होणार नाहीत. प्रचंड परिश्रम करून चांगल्या कादंबर्या लिहिणारे इंग्रजी साहित्यात अनेक लेखक आहेत. त्यांच्याकडं दारिद्य्रात लेखन सुरू केल्यावर ‘हॅरी पॉटर’सारखं एखादं परिकथेचं पुस्तक गाजलं तरी ती लेखिका एखाद्या सम्राज्ञीसारखी जगू शकते इतका इंग्रजी साहित्यातला ग्रंथव्यवहार श्रीमंत आणि समृद्ध आहे. चार कादंबर्या ‘बेस्ट सेलर’ ठरल्या तर तिकडचा लेखक एखाद्या राष्ट्राध्यक्षासारखी जीवनशैली ठेवू शकतो. इथं मराठी साहित्य संमेलनाचा अध्यक्ष सुद्धा एसटी बसनं प्रवास करत असतो. कुठंतरी रस्त्याच्या कडेला उभा राहून वडापाव खातो. त्याला ‘सेलिब्रिटी’ म्हणून किंमत नाही. त्याच्याकडं कुणाचंच लक्ष नसतं आणि त्याचं अर्थकारणही फारसं समृद्ध नसतं.
मराठी भाषा ही समृद्ध आहे, मराठी माणसं दिलदार आहेत आणि ही माती नवनिर्मिती करणारी, नवउन्मेषशाली आहे ही सगळी पुस्तकातली वाक्यं झालीत. वास्तवात आणि प्रत्यक्षात यातली कोणतीही आणि कसलीही लक्षणं आपल्याला दिसत नाहीत. मराठी भाषा समृद्ध व्हावी, एकविसाव्या शतकातल्या आव्हानाला तोंड द्यावं असं वाटत असेल आणि एखादं नोबेल पारितोषिक माय मराठीच्या पदरात पडावं असं वाटत असेल तर मराठी ग्रंथव्यवहाराचं अर्थकारण बदललं पाहिजे. लेखक-कवींना भरघोस पैसा देणारी अर्थव्यवस्था साहित्यात यायला हवी. हे सगळं निर्माण करण्याची जबाबदारी मराठीवर प्रेम करणार्या प्रत्येकाची आहे.
नुसतीच दरवर्षी पाच-दहा हजार पुस्तकं छापून, ती वितरित करून आपल्याला चांगले दिवस येणार नाहीत. मराठी भाषेला चांगले दिवस यावेत असं वाटत असेल तर मराठी भाषेत साहित्यनिर्मिती करणार्यांना आर्थिक संपन्नता लाभेल यासाठीची सक्षम व्यवस्था तयार झाली पाहिजे. दोन मराठी कादंबर्या लिहिल्या आणि त्या लोकप्रिय झाल्या तर तो कादंबरीकार आयुष्यभर समृद्ध जीवन जगू शकला पाहिजे. तसं झालं तर मराठी ही फक्त महाराष्ट्राची बोलीभाषा राहणार नाही तर जी जागतिक भाषा होईल.
मराठीवर प्रेम करणारे असंख्य लोक आहेत. आमचा इतिहास गौरवशाली आहे. ज्या भाषेत संतश्रेष्ठ ज्ञानेश्वरांनी आणि जगदगुरू श्री संत तुकाराम महाराजांनी लेखन केलं, जी भाषा छत्रपती शिवाजीमहाराज आणि परमपराक्रमी छत्रपती संभाजीमहाराज बोलत होते ती भाषा आणि त्या भाषेचा वारसा सांभाळणारे आम्ही नक्की समृद्ध आहोत. फक्त आमची मानसिकता बदलली पाहिजे. विसाव्या शतकापर्यंत तर वृत्तपत्र वाचायचं तर ग्रंथालयात जाऊन किंवा शेजार्यांकडून मागून या मानसिकतेत मराठी माणसानं वाचन केलंय. प्रत्येक घरात ग्रंथालय असलं पाहिजे, शे-पाचशे पुस्तकं असायला हवीत आणि ती सगळी विकतच घ्यायला हवीत अशी मानसिकता जोपर्यंत मराठी माणसाची होत नाही तोपयर्र्ंत लेखकांना मोठं स्थान कधी मिळणार नाही.
आज प्रसिद्धीची माध्यमं बदलत आहेत. समाजमाध्यमांच्या सहकार्यानं लेखक आणि कवी अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचू शकतात. प्रसिद्धीच्या क्षेत्रात अनेक नव्या गोष्टी येत आलेल्या आहेत. कविता, कथा, लेख, निबंध, कादंबरी हे साहित्यप्रकार लिखित पुस्तकाबरोबरच यूट्यूबच्या माध्यमातून, ऑडिओच्या माध्यमातून पोहोचवले जाऊ शकतात आणि त्यांना वाचकांबरोबरच श्रोते, प्रेक्षकही मिळतात हे दिसून येतेय. हे सगळं लेखकांपर्यंत कसं पोहोचवायचं, लेखक कसे शोधायचे आणि शोधलेल्या लेखकांनी ताजमहाल तयार केले तर ते मराठीच्या बाजारात आणून विकायचे कसे या संदर्भात काही धोरणं राज्यकर्त्यांनी ठरवायला हवीत. स्वतःच्या मुलांना इंग्रजी माध्यमांच्या शाळेत घालणारे आणि इंग्रजी बोलणार्या मुलांना मोडकंतोडकं मराठीत बोलायला लावणारे महाराष्ट्राचे बहुतांश राजकारणी हे मायमराठीचे शत्रू आहेत. त्यांना स्वतःची सत्ता आणि मुलांचा उत्कर्ष याशिवाय कशाशीही काहीही देणेघेणे नाही. अशा धनदांडग्या मराठी माणसांमुळं मराठी साहित्य फारसं सुधारत नाही आणि सुधारणारही नाही.
प्रत्येक समाजाची एक संस्कृती असते. तशी मराठी समाजाचीही एक संस्कृती आहे. मराठी समाज हा लढवय्या आहे. त्याला राजकारणावर बोलायला, नाटक करायला-नाटक बघायला, त्यावर चर्चा करायला आवडतं. तसंच मराठी माणसाला साहित्यावर प्रेम करायला आवडलं पाहिजे. साहित्याचा आस्वाद घेण्याची क्षमता असणारी नवी पिढी सर्वत्र तयार झाली पाहिजे. चांगलं साहित्य निर्माण केलं आणि ते लोकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचलं गेलं तर त्या साहित्याच्या निर्मितीतून, त्याचा आस्वाद घेण्यातून चांगले नागरिक बनू शकतात. ‘एखाद्या राष्ट्राचं भवितव्य काय आहे हे जर कोणाला समजून घ्यायचं असेल तर त्या राष्ट्रातल्या युवकांच्या ओठावर कोणाची गाणी आहेत हे मला सांगा, मी तुम्हाला राष्ट्राचं भवितव्य सांगतो’ असं खलिल जिब्रान म्हणत असत. दुर्दैवानं मराठी युवकांच्या तोंडात मराठी गाणी नाहीत. इंग्रजी किंवा हिंदी गाणी त्यांच्या ओठावर आहेत. मराठी युवकांच्या ओठावर जेव्हा मराठी गाणी येतील तेव्हा मायमराठीचा उत्कर्ष खर्याअर्थाने सुरू होईल. एखाद्या मराठी पुस्तकाची एक लाख प्रतींची आवृत्ती सहज निघाली पाहिजे आणि ती पहिल्या चार दिवसात संपली पाहिजे. अशाप्रकारचा ग्रंथव्यवहार मराठीत निर्माण करायचा असेल तर मराठी उद्योजक आणि राजकारणी यांनी त्यात प्रभावी भूमिका घ्यायला हवी. गावागावातील पेठांत पहिली चार दुकानं जेव्हा पुस्तकाची निघतील तेव्हा हा ग्रंथ व्यवहार बदलला जाईल.
मराठीत लेखन करायचं म्हणजे भिकेचे डोहाळे, मराठी कवी म्हणजे अगदी टाकाऊ माणूस! त्याच्याकडे समाजानं लक्षही देऊ नये अशी अनेकांची समजूत होते. तुम्ही समाजात फिरता. एखादा ग्रामसेवक किंवा तलाठ्याच्या चेहर्यावर जो टर्रेबाज भाव असतो, तहसीलदार किंवा प्रांत अधिकार्याच्या चेहर्यावर जो रूबाब असतो, एखाद्या पोलिसाच्या चेहर्यावर जी मग्रूरी असते तसे भाव आणि तशी संपन्नता कधी कुठल्या मराठी कवीच्या किंवा साहित्य संमेलनाच्या माजी अध्यक्षांच्या चेहर्यावर तरी दिसते का हो?
दरवर्षी आपण अनेक लग्न सोहळ्यांना जातो. त्यात आमदारांचे, खासदारांचे, पंचायत समिती सदस्यापासून ते ग्रामपंचायतीच्या सदस्यांपर्यंत सर्वांचेच सत्कार होतात. अशावेळी कधी कुणाचा कवी आहे म्हणून सत्कार होतो का? नाही करत! हे आमचं सामाजिक वास्तव आहे. ही वस्तुस्थिती आहे. गावागावातील जत्रांत तमाशा कोणता आणायचा, नाटक कोणतं आणायचं याची चर्चा होते पण कवी संमेलन घ्यावं, चार लेखकांची भाषणं ठेवावीत असं लोकांना वाटत नाही. त्या लायकीचे कवी आणि लेखक आजच्या पिढीत नाहीत हे दुर्दैवानं मान्य केलं तरी याला सुरूवात केली आणि इथं अर्थकारण साधतंय हे लक्षात आलं तर मेडिकलला जाणारी, इंजिनिअरींगला जाणारी, अधिकारी होणारी मुलं तो उद्योग सोडून इथं चांगले पैसे मिळत आहेत म्हणून चांगली निर्मिती करायला इकडं येतील. अशी व्यवस्था उभी करण्याची जबाबदारी कोणाची? राजकारणी, उद्योजक आणि इथल्या प्रत्येक सामान्य मराठी माणसाची ही जबाबदारी आहे.
जगात दिवसरात्र बोलली जाणारी भाषा म्हणून मराठीचा उल्लेख करावा लागेल. रात्री बारा-वाजता आपला दिवस संपतो तेव्हा अमेरिकेत-न्यूयॉर्कला कुठंतरी दिवस सुरू होतो. आपल्याकडे रात्री अकरा वाजले असतील तर त्याच वेळी इतर कोणत्या देशात सकाळचे सहा वाजलेले असतात. तिकडं त्यावेळी कोणीतरी मुलगा कार्यालयातून घरी येतो आणि त्याच्या मोबाईलवर गीतरामायण लावतो. स्वयंवर झाले सीतेचे… चोवीस तास वाजली जाणारी, बोलली जाणारी आपली मराठी भाषा आहे.
वैयक्तिक गुणवत्तेचा विचार केला तर जगातील सर्वश्रेष्ठ गायिका मराठी आहे. जगातील सर्वश्रेष्ठ फलंदाज मराठी जगताने जगाला दिलेत. मग ते गावसकर असोत किंवा तेंडुलकर! आधुनिक युगातले राजकारणातले सर्व ‘चाणक्य’ महाराष्ट्रातले आहेत आणि प्रत्येक पक्षात असे दोन-चार चाणक्य आहेतच! म्हणजे गुणवत्तेच्या बाबत मराठी माणूस कुठेच कमी पडत नाही हे सांगायचंय. मग गुणवत्तेच्या बाबत इतर क्षेत्रात कमी न पडणारा मराठी माणूस साहित्यक्षेत्रात आपल्या मुलांना घालायला तयार नाही, याचं कारण तिथं काही मिळत नाही. एखाद्या कवीचा कवितासंग्रह आला आणि तो श्रीमंत झाला असं सहसा होत नाही. किंबहुना एखाद्या पूर्णवेळ कवीशी कोणती मुलगी लग्न करायला तयार होणार नाही आणि कोणी तयार झालंच तर तिच्या घरचे हे ठरलेले लग्न मोडल्याशिवाय गप्प बसणार नाहीत. ‘मी कवी म्हणून माझी उपजिविका चालवेल’ असं जर कोणी सांगितलं तर घरातले त्याला ठाण्याला, येरवड्याला, किमानपक्षी मिरजेला वेड्यांच्या हॉस्पिटलात नेल्याशिवाय राहणार नाहीत. हे आमच्या आयुष्यातील वास्तव आहे.
‘दिसामाजी काहीतरी लिहावे । प्रसंगी अखंडित वाचित जावे’ असं समर्थांनी सांगितलं. मात्र रोज लिहिणार्यांची आणि पुस्तक हातात धरणार्यांची संख्या कमी होऊन व्हॉटसअॅप युनिव्हर्सिटीचे सदस्य वाढताहेत. अशावेळी समर्थ ग्रंथसंग्रह वाढला, पुढच्या पिढीत चांगले लेखक-कवी तयार झाले तर मराठी साहित्य समृद्ध होईल. मराठीत सध्या चालणार्या वेगवेगळ्या वाहिन्यांवरच्या मालिका बघा. या मालिका लिहिणार्या लेखकांचा मेंदू कवठीत नसून गुडघ्यातून खाली घोट्यात गेलाय असं वाटावं इतक्या सुमार दर्जाचं ते लेखन करत असतात. मराठी साहित्याची अवस्था किती दयनीय आणि शोचनीय आहे ते हे बघितल्यावर कळते. अतिशय चांगलं, दर्जेदार लिहिलेलं निर्मात्यांनाही चालत नाही. कारण मराठी साहित्याचा दर्जाच तितका ढासळलाय. असे भिकेचे डोहाळे दूर करण्यासाठी प्रत्येक पिढीत चार-दोन जण जन्माला येतात आणि मराठी भाषेत काही भर घालून पुढे जातात पण मराठी माणसाचं सांस्कृतिक जीवन, वैभव हे ठराविक उंचीच्या पुढे जात नाही. मराठीत आमच्या धार्मिक पुस्तकानंतर सर्वाधिक खपणारं पुस्तक कोणतं तर कमलाबाई ओगल्यांचं स्वयंपाकावर लिहिलेलं पुस्तक. ‘उपयोगिता’ बघण्याची मराठी माणसाला सवय आहे. त्या गोष्टीचा उपयोग असेल तरच ते घ्यायचं. चांगलं साहित्य वाचलं तर जीवन समृद्ध होतं, पुढची पिढी गुणवान जन्माला येते आणि आपल्या आजूबाजूचं वातारवण समृद्ध राहू शकतं हे मराठी माणसाला शिकवण्याची वेळ आलीय.
हे कोणी शिकवायचं, हे बदल कसे घडवायचे याबाबतचे काही मूलभूत प्रश्न पुढे उभे राहतात. हा बदल करण्याची जबाबदारी समाजातल्या कुण्या एका घटकाची नाही. ‘मी मराठी आहे’ याचा मला अभिमान वाटतो, माय मराठी ही समृद्ध भाषा आहे असं ज्या-ज्या माणसाला वाटतं, जो जो मराठी भाषेवर मनापासून प्रेम करतो त्या सर्वांची ही जबाबदारी आहे. चार पैसे साठवायचे आणि सोनं खरेदी करायचं हा महिलांना असलेला छंद चार पैसे साठवून पुस्तकं खरेदी करायची यात बदलायला हवा. असं झालं तर समाजाची सांस्कृतिक उंची वाढेल. दोन मराठी माणसं एकमेकांना भेटली तर ‘तुमच्याकडं कोण आमदार आहे?’ याची चर्चा करतात. वैयक्तिक ओळख झाल्यावर ‘तुझी जमीन किती आणि तुझं घर कसंय?’ याची विचारपूस करतात. दोन मराठी माणसं एकत्र आल्यावर त्यांनी चर्चा केली पाहिजे की ‘तुझ्याकडं पुस्तकं किती आहेत? तुझ्याकडं लायब्ररी कशी आहे? माझ्या लायब्ररीत गोडसे भटजींच्या ‘माझा प्रवास’ची दुसरी आवृत्ती आहे तर ती तुझ्याकडं आहे का?’ त्यावर त्यानं सांगावं की ‘माझ्याकडं दुसरी नाही, सतरावी आवृत्ती आहे…’ अशा चर्चा जेव्हा सुरू होतील आणि साहित्याचा आस्वाद घेण्याची वृत्ती गावागावात माणसाच्या मनात निर्माण होईल तेव्हा आपण योग्य रस्त्याने जात असू! ज्या गोष्टी ‘हव्याशा’ वाटतात त्या गावागावात उपलब्ध होत आहेत पण ज्या गोष्टी ‘गरजे’च्या आहेत त्या सगळीकडे पोहोचायला हव्यात.
आपल्या बाजूनं बोलणारे, लिहिणारे, आपली स्तुती करणारे लेखक-कलावंत आपल्या भोवताली बसवायचे आणि त्यांना चार पुरस्कार, महामंडळं द्यायची हा प्रकार राजकारण्यांनी थांबवला पाहिजे. त्यांच्या या वागण्यानं भाषा समृद्ध होत नाही. लाभ पदरात पाडून घेणारी सुमार बुद्धिची माणसं राजकारण्यांनी दूर ठेवायला हवीत. मराठी भाषेचं वैभव वाढवायचं असेल, भविष्यात ती अधिक सामर्थ्यशाली करायची असेल तर भाषेच्या निर्मितीकडं गुणवान माणसं यायला हवीत. ती इकडं यायला हवी असतील तर त्यांना अधिकाधिक पैसा द्यायला हवा. तो उभा करून देणं हे राजकारण्याचं कर्तव्य आहे.
छत्रपती शिवाजीमहाराजांना आणखी दहा वर्षांचं आयुष्य लाभलं असतं तर भारताची राष्ट्रभाषा मराठी झाली असती. पानिपताची लढाई मराठ्यांनी जिंकली असती तर भारताची राष्ट्रभाषा मराठी झाली असती. माधवराव पेशव्यांना टीबी झाला नसता, 1857 चं स्वातंत्र्यसमर मराठ्यांनी जिंकलं असतं तरी भारताची राष्ट्रभाषा मराठी झाली असती. चार वेळा राजकीय अपयशामुळं आपली भाषा राष्ट्रभाषा झाली नाही. भविष्यात हा योग आमच्यासाठी कधीच येणार नाही असं म्हणण्याचंही कारण नाही. महाराष्ट्रात मराठी भाषा बोलण्याची लाज बाळगणारी एक पिढी निर्माण होतेय. ‘मला आणि माझ्या मुलांना मराठी येत नाही’ असं सांगण्यात अभिमान बाळगणारी एक पिढी आता पन्नाशीच्या पुढे जाऊ लागली आहे. या पिढीच्या नाकर्तेपणामुळं माय मराठी मागे गेलीय.
प्रतिकूल परिस्थिती असताना संत ज्ञानेश्वरांनी जागतिक दर्जाचं साहित्य निर्माण केलं. आर्थिक परिस्थिती बिकट असताना आणि सर्व बाजूंनी संकटांचे पहाड असताना संत तुकारामांची कविता जगातल्या सर्वश्रेष्ठ कवितेमध्ये जाऊन बसते ही उदाहरणं आजच्या काळात देऊन उपयोगाची नाहीत. कारण शतकात एखादेच संत ज्ञानेश्वर किंवा जगदगुरू तुकाराम महाराज जन्माला येतात. त्यामुळं व्यवस्था बदलत नाही. व्यवस्था बदलायची असेल तर व्यवस्थेत आणि सामान्य माणसाच्या आयुष्यात बदल करायला हवेत. मुलगी लग्न होऊन सासरी जाताना भांडी दिली जातात पण पुस्तके किती देतात? जितक्या रकमेची भांडी द्याल त्याच्या दुप्पट रकमेची पुस्तके द्यायला हवीत. खरंतर भांडी प्रत्येकाच्या घरी असतात त्यामुळे ती दिली नाहीत तरी चालेल पण पुस्तकं द्यायला हवीत. निदान लेकीला दिलेली सर्वोत्तम पुस्तके वाचण्याचा मोह न आवरल्याने सासूबाई सुनेशी भांडत बसणार नाही.
चांगली गुणवान माणसं म्हणतील की माझं आयुष्य साहित्यनिर्मितीत घालवायचं असं वातावरण निर्माण व्हायला हवं. हे दिवास्वप्न वाटलं तरी एक दिवस वास्तवात यायला हवं.
दरवर्षी मराठी साहित्य संमेलनं होतात. गणेशोत्सवासारखं त्याचं स्वरूप झालंय. या संमेलनाचा अध्यक्ष बाप्पासारखा असतो. प्रतिष्ठापना करायची आणि तीन दिवसांनी लगेचच विसर्जन करायचं यापलीकडे काही नसतं. मजा घेणारे, नाचणारे, मिरवणारे यांचं भलतंच चाललेलं असतं. संमेलनात हेच तर सुरू आहे. संमेलनांना होणारा खर्च, इथं येणारी मंडळी बघितली तर एक गोष्ट लक्षात येते की माय मराठीवर लोकांचं अत्यंतिक प्रेम आहे. मराठी असल्याचा अभिमान प्रत्येक माणसाच्या नसानसात, धमन्यांत, शिरांत आणि अंतःकरणात ओतप्रोत भरलाय. हा सगळा अभिमान कधीतरी अर्थकारण सुधारणारा व्हावा. त्यासाठी वातावरण निर्माण करणं, हा विचार लोकांपर्यंत नेणं आणि तशी व्यवस्था उभी करणं गरजेचं आहे. राज्य साहित्य संस्कृती मंडळ नवीन लेखकांना अनुदान देतं. लेखकांना अनुदान देण्यापेक्षा त्याच्या पुस्तकाच्या एकेक लाख प्रती काढा आणि त्याला योग्य ते मानधन द्या! नाहीतर राजकारण्यांनी बुडवलेल्या बँकांना तुम्ही पाच-पाचशे कोटी रूपये अनुदान देत आहातच! उद्योपतींची साठ लाख कोटींची कर्जं सहज माफ केली जाताहेत. असे पैसे लेखक आणि कवींना वाटले तर काय बिघडलं? शिक्षक-प्राध्यापकांनी आपल्या जीवनातल्या फावल्या वेळेत साहित्यनिर्मिती केलीय. आपल्या जीवनातला महत्त्वाचा वेळ जाणीवपूर्वक साहित्यनिर्मितीत घालवणारी पिढी निर्माण करणारी व्यवस्था तयार करणं हे आपल्यापुढील मोठं आव्हान आहे. साहित्य संमेलन हा त्यासाठीचा आखाडा आहे. यातून चार चांगले पैलवान भविष्यात निर्माण झाले पाहिजेत. याच्या कडेकडेनं फिरणार्या आणि चार कुस्त्या बघून घरी जाणार्या रसिकांचं चार दिवसाचंं मराठी भाषेचं प्रेम उफाळून येतं. मराठी भाषेवरचं आपलं प्रेम घरात, दुकानान, बाजारात दिसलं पाहिजे. मराठी असल्याचा अभिमान बाळगावा असा गौरवशाली इतिहास आम्हाला आमच्या पूर्वजांनी दिलाय. असं गौरवशाली साहित्य आमच्या असंख्य लेखक-कवींनी आम्हाला दिलंय. ती पंरपरा अधिक चांगल्या पद्धतीनं पुढे न्यायची असेल आणि जागतिक साहित्यात मराठीचं स्थान अजरामर करायचं असेल तर आमच्या मराठी साहित्य निर्मितीचं अर्थकारण बदलावं लागेल. नवे लेखक आणि कवी घडवायचे असतील तर सामर्थ्यशाली उद्योजकांनी प्रकाशनक्षेत्रात यायला हवं. मार्केट उभं रहायला हवं. ‘चपराक’सारख्या संस्था त्या दृष्टीनं जे प्रयत्न करत आहेत ते त्यामुळंच महत्त्वाचं आहे. भविष्यात या प्रयत्नांना व्यापक स्वरूप येऊन मराठी भाषा, साहित्य, संस्कृती, समीक्षेची दालनं अधिक समृद्ध, व्यापक होतील याच शुभेच्छा देतो.
उमेश सणस, वाई
संपर्क – ९८२२६३९११०
मासिक ‘साहित्य चपराक’ डिसेंबर 2021, पान क्र. ७
सणससर तुमचा हा लेख फारच आवडला. मी निवृत्ती घेऊन केवळ आणि केवळ चांगली साहित्य निर्मिती करुन आयुष्यातील पुढचा प्रवास करायचे ठरवले आहे. अर्थात त्यासाठी मला चपराक व घनश्याम दादा मदत करताहेत. माझा इथून पुढील उदरनिर्वाह माझ्या साहित्य संपदेवर करण्याचा मानस आहे व तो चपराकच्या सहकार्याने नक्कीच सफल होणार आहे ह्यात शंकाच नाही. खूप वर्षे माझ्या डोक्यात हा विचार घोळत होता. चार पाच पुस्ताकेही हौसेपोटी झाली होती. परंतू चपराकच्या घनश्याम दादांची भेट झाली आणि मला योग्य ती दिशा मिळाली. लवकरच ह्याची प्रचिती येईल अशी खातरी आहे. मला तुम्ही मांडलेले विचार भावलेत व त्यानुसार मी मार्गक्रमण करतो आहे हे सांगावेसे वाटले. तुमच्या व वाचकांच्या शुभेच्छा तर आहेतच पाठीशी. पण चपराकची व घनश्याम दादांचीही मजबूत साथ आहे माझ्या ह्या संकल्पास.
जोपर्यंत भारतीय, मराठी परंपरागत संस्कृतीचा संस्कार मुलांवर पालक आणि शिक्षक यांच्या कडून नियमित आणि प्रभावीपणे होत नाही , जोपर्यंत साहित्य शहरी, ग्रामीण, दलीत, विद्रोही असे विभाजित,भंजित स्वरुपात प्रकटत राहील, जोपर्यंत वाचनसंस्कृती बहीष्कृत, दुर्लक्षित असेल तोपर्यंत मराठीच काय अन्य अनेक भारतीय साहित्यिक उपेक्षित, उपाशीच राहतील हे दुर्दैवी सत्य आहे !
खूप सुंदर लेख… वास्तव मांडलंय!
अहो मराठीवाले काका, आधी तुमच्या लेखातले अमराठी शब्द बाहेर काढा की, नंतर मोठमोठ्या गप्पा करा! “तुझ्याकडं लायब्ररी कशी आहे?” नव्हे तर “तुझ्याकडं ग्रंथालय/ ग्रंथसंग्रह कसा आहे?” अशी वाक्यरचना पाहिजे महोदय.