लाल पाणी

Share this post on:

दोघी मैतरणी
दोघी यकाच जीवाच्या
यक फांदी यक फूल
दोघी यकाच रूपाच्या

दोघी मैतरणी
यक आभाळ गोंदून
वाटच्या गा वाटसरा
डोळे जाशी का मोडून?

दोघी मैतरणी
दोघी पाणिया निघाल्या
गेल्या पाण्याच्या व्हऊन
नाही घरी परतल्या…

सुली मुकी झाली. म्हणजे ती बोलतच नव्हती असं नाही; ती गावाबाहेरच्या विहिरीवर तासनतास बसायची. विहिरीच्या तळाशी काहीतरी बोलायची! पण तिचं बोलणं हे फक्त तिलाच ऐकू येणारं! हातात सुंदर पाचूच्या खड्यांनी मढवलेला नक्षीदार कुंकवाचा करंडा. तो तिच्यापासून जसा कुणी हिसकावून घेणार होतं. त्याला साडीच्या पदराआड लपवायची. साडीच्या पदराच्या चिंध्या झालेल्या. त्या चिरगुटातून तो करंडा मुद्दामच चमकून उठायचा. मात्र करंडा लपवल्याचं समाधान तिच्यापासून कुणी हिसकावून घेत नव्हतं. सुली सकाळ-संध्याकाळ विहिरीच्या काठावरच बसून असायची. तिचा हा नित्यक्रम कधीच चुकला नाही..
ती काय बोलत होती विहिरीच्या तळाशी?
असं काय पुरून ठेवलं होतं विहिरीच्या तळात?
ही गोष्ट मी सांगतोय; म्हणजे मला ते ठाऊकय.
सुली अन् रुख्मी या दोन जिवलग मैत्रिणींची ही गोष्ट..

सुली आणि रुख्मीच्या मैत्रीची हकीकत ही अगदी भातुकलीच्या वयापासून सुरू होते. तरी मी तुम्हाला सांगणार आहे ती त्यांच्या आठवीच्या वर्गापासून. तर झालं असं की उन्हाळ्याची सुट्टी नुकतीच संपून शाळा सुरू झाल्या होत्या. शाळेचा पहिलाच दिवस. प्रार्थना संपते न संपते तोच विद्यार्थ्यांचा लोंढा सुटतो. बेंच पकडण्यासाठीची धावाधाव. लोटालोट. सुली सगळ्यांना गचालत वर्गाच्या तोंडाशी येऊन आपल्याला हवी ती बेंच पकडते. तिच्या शेजारी बर्‍यापैकी तब्बेतीची संगी येऊन बसते. सुली तिला दरडावून म्हणते,
‘‘ये उठय जाडे म्हसे, रुख्मीसाठी जागा धरलीय म्या!’’
‘‘बसू दे की!’’ आपलं बारदानी पिशवीचं दफ्तर छातीशी धरत संगी म्हणाली.
‘‘बरीच आली गं म्हणे बसू दे की! उठायचं म्हण्जे उठायचं! तुला ह्या सुलीचा कनका ठावं न्हायी!’’
तेवढ्यात रुख्मी येते. सुली तिचा हात धरत म्हणते,
‘‘ये बस गं रुख्मे इडं!’’
‘‘ती पाह्य नं हलनानं बाई!’’ रुख्मी दफ्तर सांभाळत म्हणाली.
‘‘ये उठती का ठेऊ गुद्दा!’’ संगीला दम देत सुली म्हणाली.
संगीला उठण्याशिवाय गत्यंतर नव्हतं. ती उठली अन् मागच्या बेंचवर जाऊन बसली पण तीही थोडीच शांत राहणार! आपला राग तिनं व्यक्त केलाच.
‘‘घुबडवानाचं, महा अंगाला जशी घाण लागीय, यवढा तुला वास येवून र्‍हायलाय. रुख्मीलाच तेवढं मध लटकलंय?’’
‘‘हा येवूनच र्‍हायलाय वास, रुख्मे नाक दाब बाई!’’ सुली काही मागे हटायला गेली का? तिने तिची गंमत घेतलीच.
‘‘तुम्चीच मैत्रीय नवलपरी, तशाच चालल्या जीवाच्या!’’ संगीचा राग आणखीनच फुरफुरला.
‘‘न्हायी त काय!’’ दुसर्‍या एका झिपर्‍या पोरीने नाक उडवीत आपली सहमती दर्शवली.
‘‘रुख्मीनं जीव देला त तू बी देशील, नाह गं?’’
‘‘देईलच बरं का!’’
‘‘तिच्या काय तोंडी लागून र्‍हायलीय!’’ रुख्मी दप्तरातून पुस्तक काढत म्हणाली.
संगी तिच्या शेजारच्या अन् पुढच्या दोन पोरीच्या कानात खुसपुसली. त्या चौघीही रुख्मीकडे पाहून खिदळल्या. सुलीचा राग मग सातव्या आस्मानावर. तिने उठून संगीच्या झिट्या धरल्या. पाठीत गुद्या लगावल्या. रूख्मीने सोडासोड करू पाहिली पण सुली कशाची ऐकते? ती तर बेफाम झालेली! तिनं तर संगीचा गळाच धरला.
‘‘सुले, तिचा गळा सोड. मरंल नं ती!’’ रूख्मी तिला बाजूला ओढत म्हणाली.
‘‘संगे, पुन्हा का रूख्मीला कायी येडवाकडं बोल्ली त तुला जीत्ती सोडणार न्हायी. न्हायी त सुली हे नाव सांगणार न्हायी!’’
शिक्षक वर्गात आले म्हणून संगी थोडक्यात बचावली. अन्यथा तिची काही खैर नव्हती. शिक्षकाने छडी टेबलावर आपटत आज्ञा केली, ‘‘बेशिस्त कुठल्या? दोन म्हणायच्या आत उभं रहायचं!’’
त्या सगळ्या गपगुमान उभ्या राहिल्या. प्रत्येकीच्या हातावर दोन दोन छड्यांचा मार पडला. सुलीने तो मार सहन केला मात्र जेव्हा रुख्मीच्या हातावर छड्या बसणार तेव्हा तिचे हात मागे करत सुली म्हणाली, ‘‘सर, तिची कायीबी चुकी न्हायी, म्हणून तिच्या वाटच्या छड्या मला द्या!’’
‘‘ती कायी तुजी बहीणबिहीन लागू गेली का? तिच्या वाटचा मार तू खायला!’’
‘‘तुमाला न्हायी कळायचं सर!’’
यामुळे तर शिक्षक आणखीनच चिडले.
‘‘तिच्या वाटचा मार खायची भारी हौसय नं तुला!’’ त्यांच्यात असेल तेवढी शक्ती एकवटून चार छड्या तिच्या हातावर दिल्या.
रुख्मीच्या वाटच्या छड्या खातांना सुलीच्या डोळ्यात वेदनेचा एक टिपूस नाही!
रुख्मीच्या डोळ्यातून मात्र आसवे टपकली!!
सुलीच्या रूख्मीच्या मैत्रीचे दाखले किती आणि काय द्यायचे? दरदिवस आपल्या पानावर त्यांच्या मैत्रीची हकीकत नोंदवत होता. नंतर नंतर दिवसालाही वाटलं असेल लिहायचं तरी किती? त्यालाही थकायला झालं अन् तो गपगुमान फक्त पाहत बसला.
सुली अन् रुख्मी नेहमी रानशेण्या वेचायला रानात जायच्या. त्या दिवशी निघाल्या. रुख्मी टोपलं घेऊन सुलीच्या दाराशी येऊन उभी राहिली. सुलीही त्याच तयारीत होती. तिची शोधाशोध सुरू होती. रुख्मी म्हणते,
‘‘तूह त लई हेपलचापल चाल्तं बाई. माहे डोळे घेते का उसने, ते टोपलं पाह्य तिड पडलंय!’’
‘‘अगं चुंबळ शोधून र्‍हायलेय!’’
‘‘तू त आंधळीचंय बाई, ती काय गवर्‍याच्या करूडाजवळ!’’
‘‘म्या तं यीडं ठिवली व्हती. तिडं कुनी ठिवली!’’
‘‘ठिवली असंल तुह्या नवर्‍यानं!’’
‘‘नवर्‍याची काय हिंमत यका बुक्कीत पाणी मागंल!’’
‘‘ये बाई लग्नं झालं काय तुझं?’’
‘‘ये पळय तिकडे!’’
‘‘म्हंजे लग्न न्हायी करायचं का तुला?’’
‘‘तुला काय आलं ग ह्ये मधीच लग्नाचं? जर तसं कायी झालंच तर आपलं लग्न यकाच दिशी अन यकाच मांडवात व्हइल!’’
‘‘म्हणजे माला कलवरी म्हनून न्हायी येऊ द्यायचं तुला!’’
‘‘ये मनचंदे उद्याचं उद्या, तिकडं रानशेण्या आपली वाट पहात असतील!’’
दोघींनी डोक्यावर टोपले घेतले अन् सरासर पावलं उचलत निघणार तोच त्यांच्या कानावर हाक आली. दोघीही थबकतात अन् मागे वळून पाहतात,
‘‘अय माला येउद्या ना गं!’’ झिपर्‍या सावरत मिरी म्हणाली.
‘‘अय कुडं निंगाली दवंडी पिटित?’’
‘‘तुम्च्या बरोबर येऊन र्‍हायलेय.’’
‘‘कुडं?’’
‘‘रानशेण्या गोळा करायला न कुडं!’’
‘‘लगेच मागं फिरायचं!’’
‘‘येवदे नं पण आस का म्या तुला इतकी भारी रिबीन देली. त्याचं कायी न्हायी?’’
सुलीने डोक्याला बांधलेली रिबीन खसकन सोडली अन मिरीच्या हातावर ठेवत म्हणाली, ‘‘माला ब्लॅकमेल करून र्‍हायली नाह गं; ही घे तुझी रिबीन अन निंगायचं!’’
मिरी काही हलत नाही. ती लापटासारखी तिथच उभी. कंपासपेटीतील कर्कटकने वहीच्या पानावर नव्वद अंशाचा कोन काढावा तसा पायाने मातीवर काढत होती. सुलीचं तर मग डोकंच फिरलं. तिने पुन्हा एकदा दम भरला. ‘‘संगे आम्च्यासंग न्हायी यायचं, कानात उंदरं मुतले काय झापडे!’’
‘‘झापडेबिपडे न्हायी करायचं हं सांगून ठिवते, माकडतोंडे!’’
‘‘हे काळउंद्रे लगेच निंगायचं!’’
‘‘तुझाच लई उजेड पडून र्‍हायलाय! दुसर्‍याला बोलून र्‍हायली!’’
‘‘थोबाड पाह्य आरशात, आरशाची काच बी काळी व्हऊन जाईल!’’ असं म्हणत रुख्मीच्या हातावर टाळी देते. दोघीही हसायला लागतात.
‘‘नका लई दाताड कहाडू!’’
सुली-रुख्मी तिचं ऐकणार का? त्यांनी तर थेट गाणंच सुरू केलं.
मिरी ग मिरी
डांगर चिरी
डांगराची फोड खाल्ली कुणी
खाल्ली कुणी
ज्याच्या पोटात दुखलं त्यानी
ज्याच्या पोटात दुखलं त्यानी

मिरी ग मिरी
डांगर चिरी
डांगर बाई दिसतं कसं
दिसतं कसं
मिरीचं तोंड पाहून घ्यावं जसं
मिरीची तोंड पाहून घ्यावं जसं
मिरीचा तीळपापड होतो. ती बोसाळते. थयथयाट करत, कडाकडा बोटं मोडत दोघींना शाप देते.
‘‘ये बास झालं बरं का, लई मैत्रीची भरभरयनं तुमाला. यकदिवस तुमची मैत्री तुटल, यकमेकीचं तुमी तोंड पाहणार न्हायी. तोंड पाह्यचं सोडा, यकमेकीचा गळा धरशाल! महा शाप भवलंच तुमाला!’’
‘‘कावळ्याच्या शापानं कायी गाय मरत न्हायी. तूच काय, देव जरी वरून खाली उतरून आला तरी आम्ची मैत्री तोडू शकत न्हायी.’’
मिरी पाय आपटीत दूर गेल्यावर दोघींचं परत सुरू झालं…
मिरी ग मिरी
डांगर चिरी..
एक दिवस झालं काय, सुलीची आई दळण करत होती. शेजारची गोजरकाकू येऊन, दातांना मशेरी लावत बसली होती. पाय आपटत सुली येते अन् दप्तर कोपर्‍यात फेकून देते. गोजरकाकूच्या मशेरी लावण्याच्या सवयीत कुठलाही व्यत्यय आला नाही. एक क्षण थांबली होती. मात्र पुन्हा तिच्या छदाने मशेरी लावण्यात गडून गेली. सुलीची आई दळण करता करता थांबली अन् म्हणाली,
‘‘काय गं सुले, साळातून यवड्या जल्दी आली!’’
‘‘रुख्मी न्हायी आली आज!’’
‘‘रुख्मी न्हायी आली म्हन्ल्यावर साळा का ओस पडली का? का साळाला सुट्टी देली! शिप्तर कुणीकडचं आलं वर तोंड करून!’’
‘‘न्हायी त काय!’’ गोजरकाकू आपल्या लयीत म्हणाली.
‘‘सुलीबिगर का ती शाळा हाये का आई!’’
‘‘तीच एक खरी. बाकीचे नडघच हाये!’’
‘‘न्हायी त काय!’’ गोजरकाकूने आपली लय जराही सोडली नाही.
‘‘तिनं हिरीत जीव देला त तुबी देशील का?’’
‘‘न्हायीत काय!’’ गोजरकाकू त्याच तल्लीनतेनं.
‘‘देईलच!’’
गोजर काकूची लय जरा भंग पावली अन् ती आ वासत सुलीकडे पाहत राहिली.
‘‘अशी देईन न मुक्सटात.’’
‘‘न्हायी त काय!’’ गोजरकाकू पुन्हा समेवर येते.
‘‘ये गोजर काकू, तुझं काय चाल्ल गं न्हायी त काय, न्हायी त काय!’’
गोजरकाकू आपली तल्लीनच. सुलीला पुन्हा चेव येतो. ती गोजरकाकू चेष्टा करत लयीत म्हणते,
न्हायी त काय
न्हायी त काय
गोजर काकू म्हण नं कुडं काय?
तिच्याकडे नादी लागते?
न्हायी त काय! गोजरकाकू आपली लय सांभाळत म्हणाली
माझं खेटरं पाह्य!
सुलीची आई तिच्यावर बेफाम चिडते. चप्पल उचलते. सुली धूम ठोकते.
वडील नं धाकलं म्हणे कारे शिदड मातलं!
न्हायी त काय!
बराचसा काळ पुढे ढकलला गेला. जगात काय काय बदल झाले, कुठे कोरडा दुष्काळ पडला तर कुठे ओला दुष्काळ. दुष्काळ पडला नाही तो सुलीच्या अन् रुख्मीच्या मैत्रीवर. झालं एवढंच की रुख्मीचं लग्न ठरलं होतं अन् सुलीचं अजून ठरलं नव्हतं. अगदी आठ दिवसांवर आलं होतं रुख्मीचं लग्न तेव्हाचा हा प्रसंग. सुली एक घागर डोक्यावर अन् एक कंबरेवर घेऊन रुख्मीच्या दारी उभी राहिली अन् म्हणाली,
‘‘ये रुख्मीऽऽ आवरलं का नाही बाई तुझं? विहिरीवर तर चाललो आपण; फार अप्पाचोप्पा करून र्‍हायलीय! तिडं तुला कुणी जसं पाह्यलाच येणारंय! ज्यानं पाह्यचं, त्यानं तुला पसंत बी केलंय!’’
‘‘सुले ये ना गं घरात! तुला मेकअपचं सामान दाखवायचंय!’’
‘‘संवसाजी निवांत येईन बाई!’’
‘‘आसं गं काय सुले!’’
‘‘ये बाईऽऽ तिकडं विहिरीवर टँकरबी येऊन रिकामाबी व्हऊन जाईन; आपल्याला कपभर पाणी मिळायचं नाही. मग बसा हरीराम इठ्ठल करीत!’’
‘‘ये गं कुडं आजून टँकर आलाय?’’
‘‘आला मंग?’’
‘‘तुला त काही माझ्या लग्नाची हौसच न्हायी बाई!’’
‘‘ये बाई नको गाल फुगू!’’
सुलीनं दारच्या ओट्यावर घागरी ठेवल्या; अन् हातात चुंबळ घेऊन घरात आली. पाच दिवसांवर तर आलं होतं रुख्मीचं लग्न. सुलीला तिच्या मैत्रिणीचा शब्द काही मोडता आला नाही. खरंतर रुख्मीचं लग्न व्हावं ही तिची मनोमन इच्छा; पण आता आपली ही मैत्रीण आपल्याला सोडून जाणार; म्हणून तिच्या काळजात मोठा खड्डा पडला होता. रुख्मीचं लग्न दूर ठेवून, तो खड्डा बुजवण्याचा सुली खूप प्रयत्न करायची; पण वास्तव असं कशाच्याही रूपानं धपकन तिच्यासमोर उभं राहायचं. म्हणजे सुलीला असं वाटत नव्हतं की आपल्या मैत्रिणीचं लग्न होऊच नये. दोघींनी एकमेकींच्या लग्नाची केवढी स्वप्न पाहिली होती! एकमेकींच्या करवल्या होऊन त्या मिरवणार होत्या. मग असं काय झालं की ती रुख्मीचं लग्न दूर ठेवू पाहत होती?
सुली अन् रुख्मीच्या मैत्रीचं गावभर अप्रूप. रानात शेण्या वेचायला, पाणवठ्यावर पाणी आणायला; शेळीला गवत घ्यायला, नदीवर धुणं धुवायला, शेतात निंदणी-खुरपणी करायला, काश्या वेचायला… एवढंच काय, शाळेतही बरोबर अन् बेंचवरही एकाच. आयाबाया तर रूख्मीचं लग्न ठरल्यापासून सुलीला म्हणायलाही लागल्या होत्या, ‘‘ये सुल्याबाई तुही जोडीदारीन तर चालली! तुला सोडून… तुझं कसं व्हावं?’’
‘‘तुला गमंल का तिच्याबिगर?’’
‘‘आम्हाला तर वाटलं, तूही जाते की काय तिच्यासंग!’’
‘‘तुझे गं हात कधी पिवळे व्हणार?’’
‘‘एका आईच्या गर्भातून नळकल्या जशा; एकमेकींना घासाला इसरती न्हायी!’’
‘‘एका आईच्या गर्भातून नळकलेल्या बी एकमेकीवर जीव टाकत न्हायी, एवढ्या जिवाच्या हायेत त्या!’’
‘‘तुम्च्या मैत्रीला दृष्ट लागू नये म्हण्जे झालं!’’
सुली कुणालाच काही उत्तर द्यायची नाही.
नुस्ती हसायची.
मात्र आतून उदास व्हायची.
बसलेल्या जागी माती बोटानं टोकरीत रहायची.
माती टोकरता टोकरता
स्वस्तिकाची नक्षी… कमळाचं फूल… बदामाची फुली
मातीत उमटून यायचं…!
याचा काय अर्थ लावणार?
सुली पाहत राहिली, चमकभरल्या डोळ्यांनी रुख्मीचं मेकअपचं सामानं. कुंकवाचा करंडा तिच्या हाताला लागला. आनंदानं उचंबळून सुली म्हणाली,
‘‘ये बाईऽऽ करंडा तर कित्ती छानय न्हायी!’’
‘‘होन नं, गौरीलाबी फार आवडला!’’
‘‘अगं आहेच तसा!’’
‘‘पाचूच्या खड्यात मढवलेला असा करंडा कुणाकडंच न्हायी. नशीबवानंय रुख्मी तू! तुला त् लई हौशी माणसं मिळाले बाई!’’
‘‘सुले मला त् बाई तुझ्याबिगर करमायचं न्हायी!’’
सुलीच्या तर गाई पाण्यावर आल्याच होत्या. तिला हुंदका फुटला. मग दोघीही जिवाचं अस्तर बराच वेळ उस्तरीत बसल्या!! जरा वेळानं उसासून सुली म्हणाली, ‘‘रुख्मी मी येणार बायी तुझ्याबरोबर!’’
‘‘अगं दोन दिवसांची करवली म्हणून येता येईन, कायमचं थोडंच!’’
‘‘का न्हायी येता येणार गं!’’
‘‘यडबंगू रीतंय ती!’’
‘‘अशी कशी रीत गं? झाडाच्या फांदीला कुर्‍हाडीचा तडाखा देऊन दोन भाग करणारी! रुख्मी र्‍हावू नं आपण एकाच घरात!’’
‘‘कसं र्‍हाता येईन?’’
‘‘का र्‍हाता येणार न्हायी; जगात का सवत नसते का?’’
‘‘ये बाई, तू सवत बनणार का माझी?’’
‘‘मग काय झालं? आपली मैत्री त् तुटणार न्हायी!’’
‘‘चल मनचंदी कुणीकडंची! असं चालतं का?’’
‘‘का चालणार न्हायी!’’
‘‘सुले मैत्री वेगळी आन संसार वेगळा!’’
‘‘आपण सगळ्याच गोष्टी वाटल्या!’’
‘‘मग नवरा वाटते का? तुला चालणार असेल पण मला न्हायी!’’
सुलीला खट्टू झालं. हातातली चुंबळ चुरगळली. काळजात काहीतरी दुभंगून गेल्यासारखं झालं. उदासीनं तिला घेरून टाकलं. जरा वेळानं दोघीही विहिरीव आल्या. बायाच बाया अन् बापेच बापे. ही गर्दी पाण्यासाठी. हंडेच हंडे. बादल्याच बादल्या! घागरीच घागरी! जत्राच! दोघींनी घागरी खाली ठेवल्या अन् बायांच्या घोळक्यात जाऊन बसल्या. पाण्याचा टँकर अजून काही आला नव्हता. रिकाम्यारानी रूख्मीची खोड हंसा वहिनीनं काढलीच,
‘‘अग्गोबाईऽऽ नवी नवरी बी पाण्याला आली!’’
रूख्मी लाजली. सुलीच्या छातीवर डोकं ठेवून, तोंड लपवलं.
‘‘बाईऽऽ बाईऽऽ अजून तर हळदही लागली न्हायी; तरी चेहरा बगा कसा पिवळा दिस्तोय!’’
‘‘हंसा येडी का खुळी? ती का आपल्यात र्‍हायली का? ती जाऊन बी पोचली तिच्या माणसाकडं!’’
‘‘वैनी कायी पण बोलून र्‍हायल्या बाई तुमी! मुरका मारत रूख्मी म्हणाली.’’
‘‘नको काही लटके बोलायला बरं का! आम्हाला कळून र्‍हायलंय मनात लाडू फुटून र्‍हायलेय!’’
‘‘वैनी, म्या जातेच कशी!’’
‘‘पाहिलं का हंसा!’’
‘‘काय ग दुर्गा?’’
‘‘रूख्मी आताच जाते म्हणतेय!’’
‘‘कुडं गं?’’
‘‘तिच्या नवर्‍याला भेटायला!’’
आता मात्र रूख्मी खरंच निघाली. दुर्गा वहिनीने तिचा हात धरला अन् खाली बसवलं.
‘‘सुले, तुझं कसं व्हावं, जोडीदारीन सोडून चालली नं बायी तुला!’’
‘‘रूख्मी हिला बी तुझ्या गावातला एकांदा नवरा बघ, म्हणजे दुरावा काही तुमच्यात र्‍हाणार न्हायी!’’
‘‘ये, गपा गं मेल्यानो, का चेष्टा करून र्‍हायलाय लेकरायची!’’
‘‘मोठ्याई त्यांना एकमेकीशिवाय भाकरतुकडा काही गोड लागणार न्हायी!’’
‘‘गंज मैतरणी पाह्यल्या, पण यांच्या खालीच!’’
‘‘आत्या मी खरंच जाणारंय रूख्मीबरोबर!’’
‘‘कलवरी म्हणून ती तुलाच घेऊन जाईल!’’
‘‘आत्या कलवरी म्हणून न्हायी!’’
‘‘मंग ग?’’
…………………
‘‘तिची सवत म्हणून जाणार की काय तू?’’
सुली काही बोलणार तोच पाण्याचा टँकर आला. असा गलका झाला की कोण घागरी घेऊन धावलं तर कोण हंडे घेऊन; विहिरीला गराडा पडला. कडंच कडं माणसाबायांचं. ते कडं भेदण्यासाठी रेटारेटी! टँकरचं पाणी पाइपातून विहिरीत सोडलं नाही तोच बादल्या खणखणू लागल्या. त्यात एक बादली सुलीची; एक रुख्मीची! घडू नये ते घडलं! रूख्मीला कुणाचा तरी धक्का लागला. तोल गेला! विहिरीच्या खडकावर रूख्मी आपटली. एकच हलकल्लोळ! पाणी रक्ताचं झालं. काळजात धस्सं झालं. लोकांच्या तोंडचं पाणी पळालं. रूख्मीला वरती काढलं; पण ती कुठं राहिली होती! विहिरीचा तळ शोधण्यातच तिनं मृत्युचा ठाव घेतला होता. विहिरीत उरलं होतं रक्ताचं लालजर्द पाणी. ते सांगू पाहत होतं रूख्मीची कहाणी…
सुली डोळे विस्फारून नुस्तीच पाहत राहिली.
आपलीच का दृष्ट लागली आपल्या मैत्रिणीच्या कुंकवाच्या करंड्याला?
आता कसं भरणार रूख्मी कुंकू भांगात?
आपण कसं राहणार तिच्याशिवाय?
एकाएकी सर्व गर्दीतून सुली पळत सुटली. कुठे गेली…?
सुली रुख्मीच्या घरी आली. मेकअपच्या सामानातून तो मोत्याच्या खड्याखड्याचा नक्षीदार कुंकवाचा करंडा हातात घेतला अन् पायांना वाटा बांधून पळत सुटली! बोलत राहिली करंड्याशी… अन् नंतर लोक बोलायला लागले की सुली वेडी झाली. तेव्हापासून ती विहीर तिच्या जिव्हाळ्याची झाली… किती दिवस, किती महिने, किती वर्षं उलटून गेली असली तरी नियम बदलला नाही… त्यानंतर त्या विहिरीत कितीदा तरी पाणी टाकलं गेलं; पण शेवटपर्यंत पाणी शुभ्र झालंच नाही. ते आणखी लाल होत गेलं. एक दिवस सुलीनं कुकंवाच्या करंड्यासकट लाल पाण्याचा ठाव घेतला. तेव्हा तर पाणी इतकं लाल… इतकं लाल… इतकं लाल… होत गेलं की कुंकू फिकं फिकं होत गेलं… पाणी आणखीनच लाललाल…!
सुली ही काही आतापर्यंत परकरी पोर राहिली असती का? म्हणजे रुख्मी असती तर तीही म्हातारी झाली असती; पण त्यांची मैत्री काही म्हातारी झाली नव्हती. नुकतीच शेणानं भुई सारवल्यासारखी; ताजी ताजी हिर्वीगार! सुली, रुख्मी, कुंकवाचा करंडा अन् लाल पाणी! हे अजूनही आईच्या लक्षात आहे. तिनंच तर सांगितलीय मला ही गोष्ट! अन् आईनं असंही सांगितलं की लोक म्हणायचे की रूख्मीला सुलीनेच विहिरीत ढकललं! पण हे बिलकूलही खरं नाही!
-आजही त्या विहिरीचं पाणी लालच आहे अन् लाल पाण्याची विहीर म्हणून गावात प्रसिद्ध आहे…!

– ऐश्वर्य पाटेकर
साहित्य अकादमी विजेते लेखक

मु. पो. काकासाहेबनगर ता. निफाड जि. नाशिक-४२२३०८
मो.८८३००३८३६३

साहित्य चपराक दिवाळी विशेषांक २०२१
पृष्ठ क्र. – ११८

‘चपराक प्रकाशन’च्या वाचनीय आणि दर्जेदार पुस्तकासाठी आणि ‘चपराक’चे सभासद होण्यासाठी संपर्क – ७०५७२९२०९२

Share this post on:

Author: चपराक

पुणे शहरातून ‘साहित्य चपराक’ हे मासिक आणि ‘चपराक प्रकाशन’ ही उत्तमोत्तम पुस्तके प्रकाशित करणारी ग्रंथ प्रकाशन संस्था चालविण्यात येते. ‘साहित्य चपराक’ मासिकाचा अंक दरमहा 10 तारखेला प्रकाशित होतो. आपले साहित्य पाठविण्यासाठी, ‘चपराक’मध्ये जाहिराती देण्यासाठी आणि नवनवीन पुस्तकांच्या माहितीसाठी संपर्क - घनश्याम पाटील, संपादक 'चपराक'.
व्हाट्सऍप क्रमांक - ८७६७९४१८५०
Email -

View all posts by चपराक >

One Comment

तुमची प्रतिक्रिया जरूर कळवा

error: Content is protected !!