धडपडीचे… न मावळलेले दिवस!

Share this post on:

‘लॉकडाऊन’च्या काळात वाचनालयं बंद असली तरी घरात पुस्तकांचा खजिना अन् हाताशी भरपूर वेळ होता. पूर्वी वेगवेगळ्या वेळी वाचलेली पुस्तकं, आता सलगपणे वाचताना प्रतिभावंत लेखक-कलाकारांच्या आठवणींचे कितीतरी उभे-आडवे समान धागे मिळत गेले. ते सारे काळाच्या समान सूत्रात गुंफताना झालेल्या वस्त्रांची ही गोधडी.

स्वातंत्र्यपूर्वकाळात वा नंतरही जगण्यासाठी करावी लागणारी धडपड, त्या काळचं शिक्षण, पाहिलेली स्वप्नं, जपलेली मूल्यं, स्वप्नवत वाटावी अशी स्वस्ताई असं बरंच कांही. आज या लेखक-कलावंतांपैकी बहुतेक आपल्यात नाहीत. त्यांची पुस्तकं-आत्मचरित्रं, मनोगतं-प्रस्तावना इत्यादीतून बरंच काही त्या काळाबरोबर समोर येतं, त्या काळात घेऊन गेलं… जणू ‘टाईम-मशीन’च सुरु झालं!

स्मृतिचित्रे- लक्ष्मीबाई टिळक

एकोणिसाव्या शतकाच्या मध्यावर स्त्री-शिक्षणाचा जेमतेम उद्गार झालेल्या काळात, १८६८ साली जन्मलेल्या लक्ष्मीबाई टिळकांचे ‘स्मृतीचित्रे’ एकविसाव्या शतकात पुनर्मुद्रित होऊन पुन्हा वाचकांसमोर आलं. एका स्त्रीच्या दृष्टीकोनातून तत्कालीन जातीपातींचे भले-बुरे व्यवहार, प्रथा-परंपरा, टिळकांनी ‘ख्रिश्चानीटी’ स्वीकारताना झालेले द्वंद्व अशी बरीच सामाजिक माहिती समोर आली. त्याचबरोबर एक विस्मृतीत गेलेली ‘बालकवीं’ची गोष्ट पुढे आली. त्या काळी त्र्यंबक बापूजी ठोंबरे टिळकांच्या घरी राहत. त्यांच्यावर पुत्रवत प्रेम करणार्‍या लक्ष्मीबाई लिहितात, ‘आमच्या घरी नानाप्रकारची माणसे आली आणि गेली पण ठोंबर्‍यांसारखे कुणीच नव्हते. तो प्रेमळ, मनमिळाऊ, आनंदी, थट्टेखोर आणि थोडासा खोडकरही होता! ठोंबरे स्वत:च्या कविता जितक्या प्रेमळपणे म्हणत तितक्या दुसर्‍यांच्याही म्हणत. एकदा टिळक फिरतीवर गेले होते. ठोंबर्‍यांना भेटायला कुणी ज्योतिषी आला. त्याने सांगितलं तुम्ही अपघाताने मरणार व आजच मरणार! तो आत आला ते थेट चुलीपाशी येऊन बसला. म्हणाला, ‘लक्ष्मीबाई, मला ज्योतिषाने आज मी अपघाताने मरणार असे सांगितले आहे.’ ‘अरे, ज्योतिषी लबाड असतात, कांहीतरी सांगतात झाले. तू आता कोठे बाहेर जाऊ नकोस.’ मी हातातले काम तसेच टाकून त्याच्याजवळ बसून राहिले. मित्रमंडळींना घरीच निजायला बोलावलं. ती रात्र टळेपर्यंत ठोंबर्‍यांना दृष्टीपुढून हालू दिलं नाही. भविष्य त्यावेळेस खोटं ठरलं… पण पुढे पांच वर्षांनी खरं ठरलं!’ ‘ती फुलराणी, आनंदी आनंद गडे, श्रावणमासी हर्ष मानसी…’ सारखं भावरम्य काव्य लिहिणारे बालकवी ठोंबरे, वयाच्या 28व्या वर्षी १९१८ साली अपघातात गेले!

‘स्मृतिचित्रे’मध्ये लक्ष्मीबाईंनी त्यांच्या आयुष्यातल्या आठवणी ‘लिहिल्या’ पण ११८० साली खानदेशात जन्मलेल्या बहिणाबाईंची अक्षर-ओळख देखील नव्हती. त्यांची बोलीभाषा ‘अहिराणी’, वर्‍हाडी-खानदेशी, सहज समजावी अशी. ‘माणूस आणि निसर्ग’ हीच शाळा असलेल्या ‘अशिक्षित’ बहिणाबाईंच्या घरकाम-शेतकाम करताना, जात्यावर बसल्यावर सुचलेल्या रचना, लिखित स्वरुपात कशा याव्यात? धाकटा सोपाना तिसरी-चौथीत असताना एका रात्री ‘सावित्रीचं चातुर्य’ धडा मोठ्यानं वाचीत होता. दुसर्‍या दिवशी रामप्रहरी सोपानाला आईच्या जात्यावरच्या ओव्यांनी जाग आली. सोपाना उठला. आईच्या मांडीवर डोकं टेकलं… ‘सायेत्री सायेत्री, सत्येवानाची सावली, निघे सत्येवान, त्याच्या मागून धावली!’ सोपनाला प्रश्न पडला, ‘माय, तू किती कष्ट करतेस…? तरी तुला हे सगळं कसं सुचतं?’ यावर ‘अरे, तुनं धडा वाचला, त्येचं मी गानं केलं! सोपान्या, माझी नजर धरतीकडे. या धरतीच्या आरशात मी सगळं पहाते!’ हे उत्तर! त्यानंतर सोपाना जे शिकायचा ते कधी आईला वाचून दाखवायचा. दुसर्‍या दिवशी बहिणाबाईंची ‘ओवी’च्या अंगाने रचलेली कविता तयार असायची! आईच्या कित्येक ओव्या-कविता सोपानदेवांनी कागदावर उतरवल्या, जिवापाड जपल्या… तरी लिहिल्या त्याहून अधिक ‘अलिखित’ राहिल्या, विस्मृतीत गेल्या! कवी सोपानदेव चौधरींनी दिलेलं बहिणाबाईंच्या ओव्या-कवितांचं बाड पाहून आचार्य अत्रे उद्गारले, ‘बावनकशी सोनं आहे हे… मोहरांचा हंडा आहे! हे विचारधन महाराष्ट्रापासून लपवून ठेवलं तर ते पाप ठरेल!’ संसाराच्या चुल्ह्यावरच्या तव्याच्या चटक्यातून ओठावाटे बाहेर आलेला, अतिशय सोप्या ‘ओवी’बद्ध शब्दांतला या मातीत उपजलेला… एका मनस्वी स्त्रीच्या हृदयाचा तो हुंकार होता! १९५२ साली ‘बहिणाबाईंची गाणी’ प्रसिद्ध झाल्यावर हे ‘लोकधन’ लोकांसमोर आलं. तत्पूर्वी १९५१ अखेरीस बहिणाबाई आपल्यातून गेल्या होत्या.

हे ‘लोकधन’ आपल्यासमोर आणणारे, १८९८ साली जन्मलेले आचार्य अत्रे अत्यंत प्रतिभाशाली, बहुआयामी व्यक्तिमत्व. त्यांच्या धडपडीच्या दिवसांविषयी ते सांगतात, ‘मला आठवतं तेंव्हापासून मी लिहितोय, कविता करतोय… अकरा साली माझी बालकवींशी ओळख झाली. त्यांना मी मनोमन गुरू करून टाकलं. चौदा साली गडकर्‍यांचा परिचय झाला पण त्यांच्या कवितेचा माझ्यावर परिणाम झाला नाही. माझे वळण बालकवींचेच राहिले… माझ्या कवितांच्या वहीला मी ‘फुलबाग’ नांव दिलं होतं. वही चाळत गडकरी म्हणाले, ‘अत्रे, तुम्ही स्वतंत्र कविता लिहित जा. भाषांतरे करण्याच्या भानगडीत पडू नका. भाषा साधी व्हावी एवढ्यासाठी लावण्या, पोवाडे, अभंग वगैरे वाचा!’ गडकरींचा उपदेश मी कसोशीने पाळला. त्यांच्या पाच वर्षांच्या सहवासात त्यांच्या ज्ञानाचा, वाचनाचा, तर्कपद्धतीचा व जगाकडे पाहण्याच्या विशिष्ट वृत्तीचा मला जितका फायदा करून घेता येईल तितका करून घेतला… १९१६ सालापासून माझ्या कविता ‘मासिक मनोरंजन’मध्ये प्रसिद्ध होऊ लागल्यावर पूर्वीच्या सर्व कवितांची मी होळी करून टाकली!’ अठरा-एकोणीस साली बालकवी आणि गडकरी वारले आणि शारदेच्या अंगणात काळोख पसरला! अशा वेळेस पुण्यातील सात-आठ कवी एकमेकांचा हात धरून भीतभीत एके ठिकाणी जमले आणि त्यांनी एका कोपर्‍यात एक लहानशी शेकोटी पेटवली, तिचं नांव ‘रविकिरण मंडळ’! अत्रे गमतीने म्हणत, ‘माधव ज्युलियन रवी, बाकीची नुसती किरणं!’ १९२२ च्या मे महिन्यात अत्र्यांनी ‘झेंडूची फुले’ लिहिलं, ते हस्तलिखित त्यांच्याकडे चार वर्षं पडून होतं! त्या झेंडूच्या फुलांबद्दल पुलं म्हणतात, ‘अत्र्यांच्या झेंडूच्या फुलांनी जर फार मोठे असे कार्य साधले असेल तर, पन्नासेक वर्षापूर्वीच्या केवळ मराठी काव्यसृष्टीतल्या नव्हे तर सामाजिक जीवनाच्या वास्तवातलं हसत हसत दर्शन घडवलं. अस्सल काय, भेसळ काय हे मराठी समाजाला दाखवून दिलं… अत्र्यांच्या विनोदातले उत्तमातले उत्तम दर्शन घडते या झेंडूच्या फुलांत!’

रविकिरण मंडळ
खुर्चीवर बसलेले डावीकडून : यशवंत, माधव जुलिअन. माडखोलकर आणि मनोरमाबाई रानडे
जमिनीवर बसलेले डावीकडून: गिरीश, दिवाकर, द. ल. गोखले आणि श्रीधरपंत रानडे
श्रेय : संपादन प्रभा गणोरकर इ., संक्षिप्त मराठी वाङ्मय कोश, (२००४: ६१०)

‘कवी जन्माला यावा लागतो, त्याप्रमाणे विनोदी लेखक कांही जन्मावा लागत नाही. जन्मत:च कोणी विनोदी नसतो. बुद्धिच्या प्रगल्भ अवस्थेतूनच विनोद निर्माण होतो आणि विनोद सुचायला संसाराचा बरा-वाईट अनुभव यावा लागतो. जीवनाच्या जंजाळाकडे खेळकर वृत्तीने पाहणे याचंच नांव विनोद!’ असं मानणार्‍या अत्र्यांच्या घराचं वातावरण हास्य-विनोदाला फारसं अनुकूल नव्हतं. वडील स्वभावाने रागीट, गंभीर. मोकळेपणाचे आनंदी वातावरण शाळेमध्येही त्यांना मिळालं नाही. त्यांच्या आजोबांना कथाकीर्तान-भजनाचा फार नाद. अत्रे म्हणतात, ‘गावात कुठेही चांगला हरिदास आला की ते मला मुद्दाम बरोबर नेत. त्या कथेतल्या हरिदासी विनोदाकडे माझे लक्ष लागू लागले. नाटकातला पहिला विनोद मला न.चिं. केळकरांच्या ‘तोतयाचे बंड’ नाटकामुळे झाला. गडकर्‍यांची काव्यप्रतिभा जशी स्वत:ची होती तसा त्यांचा विनोद काही स्वतंत्र नव्हता. तो श्रीपाद कृष्ण कोल्हटकरांच्या अनुकरणाचा परिणाम होता, ज्यांचे ‘सुदाम्याचे पोहे’ साहित्यप्रेमी तरुण मुठी भरभरून खात होते! मी ते पोहे प्रथम गडकर्‍यांच्या माडीवर खाल्ले, त्यावेळी झालेला आनंद मी जन्मात विसरणार नाही! विशुद्ध आणि उदात्त विनोदाचे प्रथम दर्शन झाले. माझे विनोदाचे क्षितिज विस्तीर्ण झाले. गडकर्‍यांच्या गुरुमुखातून विनोदी लेखनाची सर्व विद्या मिळाली. जगातील दु:खे पचविण्याचा हास्य आणि विनोद हाच एक राजमार्ग आहे, हास्यविनोद हा सर्वात मोठा मानवधर्म आहे, असेच मी म्हणतो! माझ्या लेखनात विनोद आहे, हे मला आरंभी ठाऊकच नव्हते. लोक जेंव्हा माझे लेख वाचून हसू लागले, तेंव्हा आपण विनोदी लेखक आहोत याचा शोध लागला… ‘झेंडूची फुले’ नंतर ‘साष्टांग नमस्कार’ हे नाटक रंगभूमीवर जवळजवळ नऊ वर्षांनी आलं. ‘गंभीर’पणे विनोदी लेखन करण्याचा हा माझा पहिलाच प्रयत्न. नंतर ‘ब्रह्मचारी’ या माझ्या बोलपटाने विनोदी चित्रपटांचा उच्चांक गाठला!’

ब्रह्मचारी १९३८ चित्रपटाचे पोस्टर

‘गडकर्‍यांच्या ‘पुण्यप्रभाव’चा पहिला प्रयोग मी पुण्यात पाहिला, त्यावेळी माझ्या मनाची जी अवस्था झाली ती शब्दात वर्णन करता येणे शक्य नाही!’ असं म्हणणार्‍या अत्र्यांनी, पुण्याच्या ‘कॅम्प एज्युकेशन सोसायटी’चा प्रमुख असताना शाळेच्या संमेलनासाठी दरवर्षी एक अशी तीन नाटकं लिहिली. ‘प्रल्हाद’, ‘गुरुदक्षिणा’ आणि ‘वीरवचन’. त्यांच्या नाट्यलेखनाचा आत्मविश्वास या नाटकांनी वाढवला… तेहतीसच्या जानेवारीत ‘रत्नाकर’चे चालक श्री. अप्पासाहेब गोखले आणि ‘बालमोहन’चे मालक श्री. दामुअण्णा जोशी त्यांना म्हणाले, ‘आम्हाला एक नाटक लिहून पाहिजे तुमच्याकडून, अगदी महिन्याच्या आत!’ कोणत्या विषयावर नाटक लिहायचं, प्रश्नच होता. मनाच्या ओढाताणीत चांगला महिना-दीडमहिना निघून गेला. एकदा ‘ज्ञानप्रकाश’मध्ये ‘साष्टांग नमस्कार’ या विषयावर औंधच्या अधिपतींच्या व्याख्यानाचा अहवाल वाचल्यावर त्यांची खूप करमणूक झाली. साष्टांग नमस्कार याच विषयावर नाटक का लिहू नये? पंधरावीस दिवसांत तिन्ही अंक लिहून पुरे केले. अत्रे म्हणतात, ‘नाटकाच्या पहिल्या प्रयोगाला लोक हसून हसून बेजार झाले, अगदी ‘ओक्साबोक्शी’ हसायला लागले! तो पहिला प्रयोग मी आयुष्यात कधी विसरणार नाही!’ नंतरचं त्यांचं ‘घराबाहेर’ हे नाटक अगदी विरुद्ध टोकाचं, गंभीर आणि प्रमेयात्मक! पहिला प्रयोग चौतीस साली पुण्यात झाला. श्री. अनंतराव गद्रे यांच्या कल्पक डोक्यातून निघालेला ‘हाउसफुल्ल’ हा शब्द या नाटकाच्या निमित्ताने प्रथम निर्माण झाला!

‘श्यामची आई’ चित्रपटासाठी तत्कालीन राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद यांचेकडून राष्ट्रपती पदक स्वीकारताना आचार्य अत्रे
छायाचित्र –

ग. दि. माडगूळकर अर्थात गदिमांच्या ‘धडपडीच्या दिवसांत’ चित्रपटसृष्टीतला पहिला मोठा माणूस आला तो देखील प्रल्हाद केशव अत्रे! घरातल्या माणसांनी ‘निरुपयोगी मुलगा’ म्हणून टाकून दिलेलं. देवाने रूप दिलं नव्हतं. सांपत्तिक स्थितीने शिक्षण दिलं नव्हतं. कुणा पूर्वजाने कीर्तीचा वारसा दिला नव्हता… 1938च्या मार्च महिन्यात औंध विद्यालयातील मुख्याध्यापक श्री. भा.वि. काळे यांची चिट्ठी घेऊन पुण्यात अत्र्यांच्या निवासस्थानी ‘म्यॅट्रिक-नापास’ गदिमा गेले. ‘चिट्ठी वाचून अत्र्यांनी विचारलं, ‘नकला करता तुम्ही?’ हो म्हणण्यापूर्वीच अत्रे खुर्चीतून ताडमाड उभे राहिले! गंभीरपणे म्हणाले, ‘पुढच्या महिन्यात कोल्हापूरला या. विनायकच्या कंपनीत. मी जाणार आहे तिकडे.’ बस्स! गदिमा म्हणतात, ‘मला तेवढं आश्वासन पुरेसं होतं… बर्‍याचशा खटपटीनंतर एकदाची विनायकरावांची भेट झाली. ‘नाव काय तुमचं?’ मी म्हटलं, ‘जी.डी. कुलकर्णी’… त्यावर ते म्हणाले, ‘औंधचे ना तुम्ही? हे पहा औंधकर, अत्रे बोललेत तुमच्याबद्दल माझ्याजवळ. कंपनीची आर्थिक स्थिती मोठी वाईट आहे. आमचा ‘ज्वाला’ नावाचा चित्रपट सपशेल पडला आहे. नवीन माणसं घेण्याची ताकद नाही. उमेदवार म्हणून येण्याची तुमची इच्छा असेल तर तुम्ही या. पगार मात्र कांही देता येणार नाही. विचार करा आणि उद्या भेटा.’ मी विचार केला, ‘प्रवेश मिळतोय हे काय थोडं झालं?’ योग्य वेळी मला चित्रपटधंद्यात प्रवेश मिळाला! एरवी औंध संस्थानात कुठेतरी मास्तर झालो असतो वा घराण्यात परंपरेने चालत आलेले ‘कुलकर्णीपण’ करीत राहिलो असतो! माझ्यातले नाट्यगुण, अभिनयशक्ती अत्र्यांनी कांहीच पाहिलं नव्हतं. मग त्यांनी हे कां केलं?’

आचार्य अत्रे, गीतकार ग. दि. माडगूळकर

‘हंस’ पिक्चर्समध्ये गदिमांची पगारावाचून नोकरी सुरू झाली पण जगायचं कसं? शाहूपुरी पेठेतील एका व्यापार्‍याने दिलेल्या ओटीवर हातपाय पसरायला मिळाले तरी पोटाचा प्रश्न सुटला नव्हता. श्री. हेरवाडे नावाच्या व्यापारी गृहस्थांच्या छोट्या-छोट्या मुलांना ते इंग्रजी शिकवू लागले. ‘दरमहा दहा रुपये’ ठरले. गदिमा लिहितात, ‘मग कोपर्‍यावरच्या खाणावाळवाल्याला माझी पत पटली. पोटाचा प्रश्न सुटला! पुढे एकदा ‘ब्रह्मचारी’च्या शूटिंगसाठी माझ्यावर मेकअप करण्याची पाळी आली तेंव्हा मी उसळीसारखा उठलो. मेकअपमास्तरनं गाडगं रंगवावं तसं माझं तोंड रंगवलं. असं वाटलं, ‘माझ्या मडक्याला आज ‘संक्रांती’चं स्वरूप आलं, आता त्याची पूजा होणार!’ माझ्यासारखेच पाच पंचवीस दाढीवाले सेटवर आले! नंतर सलग पंधरा दिवस शूटिंग रात्री बारापर्यंत, त्यामुळे माझी हेरवाड्यांकडची शिकवणी गेली! पगाराच्या दिवशी पगार घेऊन आलेला एक जण म्हणाला, ‘शिकलेला आहेस थोडासा. कुठही मास्तरकी कर. पुढं शीक. कशाला आला आहेस या दरिद्री धंद्यात?’ ही ध्वनिमुद्रिका माझ्या डोक्यात पुन्हा-पुन्हा वाजू लागली… एवढ्यात मला बोलावणं आलं! हिशेबनीस वामनरावांनी व्हाउचर पुढं केलं. त्यावर ‘पैसा अदा करण्याचे कारण’ अशा छापील अक्षरांपुढे शाईने लिहिलं होतं, ‘श्री. बाबुराव पेंढारकर यांच्या सांगण्यावरून.’ मी सही केली. दहाची आणि पाचची नोट उचलून घेतली. उपाशाला अन्न मिळालं! ‘पंधरा रुपये पगार ठरला. पुढल्या महिन्यापासून नाव पगारपत्रकात येईल.’ वामनराव म्हणाले. तिथून बाहेर पडल्यावर कॅमेरामन पांडुरंगराव नाईक म्हणाले, ‘आमच्या मुलींना शिकवत जा! माझ्याबरोबर गाडीतून घरी येत जा. तासभर शिकवणी कर. ड्रायव्हर तुला परत पोचवून देईल.’ ते मला दरमहा पंधरा रुपये पगारही देऊ लागले! ‘हंस’चे पंधरा, पांडुरंगरावांचे पंधरा… मी रोज रुपया मिळवू लागलो! अत्यंत आवडीचा अभिनयाचा व्यवसाय आणि चरितार्थाला पुरतील एवढे पैसे… मला आणखी काय हवे होते? बाबुराव पेंढारकरांनी माझं दु:खं का जाणलं? पांडुरंगरावांनी एवढा जिव्हाळा का दिला? योग्य वेळी या वृक्षांनी आपली छाया माझ्या मस्तकावर केली नसती, तर मी परत फिरलो असतो… अन् कोण झालो असतो? कुठे गेलो असतो?’

अभिनय सम्राट व दिग्दर्शकांचे दिग्दर्शक बाबूराव पेंढारकर

विधिलिखित तर प्रभू रामचंद्राला देखील चुकलं नाही!
‘मी रामचंद्र विनायक फडके… आता सुधीर फडके या नावानं ओळखला जाणारा!’ ‘जगाच्या पाठीवर’ आत्मचरित्रात स्वत:विषयी लिहितांना सुरूवातीलाच करून दिलेली ही ओळख. ‘प्रभू रामचंद्र’ देव असला तरी पृथ्वीतलावर जन्म घेतल्यावर… ‘पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा!’ रामचंद्राचा ‘सुधीर’ झाला तरी या रामाचा वनवास कांही चुकला नाही! वयाच्या नवव्या वर्षी मातृवियोग, सतराव्या वर्षी पितृवियोग. घर सुटून मुंबई गाठली होती. एकलव्य वृत्तीनं अन् श्रवणभक्तीनं गानविद्येचे धडे आत्मसात केले ते बालगंधर्व अन् हिराबाई बडोदेकर यांचे. तत्पूर्वी वयाच्या बाराव्या वर्षीच अब्दुल करीमखानसाहेबांकडून जाहीर कार्यक्रमात शाबासकी मिळाली होती. ही संपत्ती भरपूर होती पण पैशाचा कफल्लकपणा कायम सोबतीला. एकवेळ जेवणाचे देखील हाल. राहण्याच्या जागेची पंचाईत. एकदा राहण्याच्या जागेचं भाडं देण्यापायी तंबोरा अन् व्हायोलिन देखील गहाण ठेवावं लागलं! मग फूटपाथ जवळ केला. एकदा अपरात्री, दुकानाच्या फळीवर झोपलेलं असतांना, गुरख्यानं दम भरला, ‘यहां सोना नहीं… और कहीं जाके सोना.’ नंतर एक सदरा, पायजमा अन् कोट देखील काळ्या बाजारांत विकले! स्टेशनवर हमाली केली. शेवटी जवळचं ‘हार्मोनियम’ देखील मारवाड्याकडे गहाण टाकलं. तीन महिन्यांच्या मुदतीसाठी. पंधरा रुपये मिळाले… अखेर गाण्यासाठी लागणारा तो शेवटचा आधार, त्यावर देखील त्यांनी पोट जाळण्यासाठी पाणी सोडलं! त्या धडपडीच्या काळातल्या ‘एकरुपया’च्या त्यांच्या दोन कहाण्या मात्र त्यांच्या मनावर, जखमेची सदैव आठवण करून देणार्‍या व्रणासारख्या कोरल्या गेल्या…

‘मलबार हिलवर दुर्गाबाई खोटे यांच्या बंगल्यावर गेलो असताना रात्र झाली. खिशांत पैसे नव्हते. परतताना त्यांनी मला एक रुपया दिला अन् म्हणाल्या, ‘इतक्या रात्री इथून चालत जाऊ नका. व्हिक्टोरिया करून जा.’ मी तो रुपया घेत नव्हतो पण त्यांनी बळेबळे माझ्या हातात दिला. माझं मन कोडगं झालं होतं! दुर्गाबाईंना नमस्कार करून बंगल्याबाहेर पडलो. हातात एक रुपया होता. पोटात आग पेटली असताना घोडागाडीत पैसे खर्चायला मी कांही मूर्ख नव्हतो. चालत गिरगावात आलो. एका हॉटेलात जाऊन दोन आण्याची राईस प्लेट खाल्ली… दुर्गाबाईंच्या कृपेनं आज पोटात साक्षात अन्न गेलं होतं!’ नंतर मुंबई सुटली. पायाला चाकं लागली, रेल्वेप्रवासाची. प्रवास सुरु झाला. वाट फुटेल तिकडे… ‘जगाच्या पाठीवर’ कुठेही!

दुसर्‍या ‘एका रुपया’ची भागलपूरची गोष्ट बाबूजी सांगतात… ‘भागलपूरला धर्मशाळेत असताना एका घरातून पेटीचे सूर आले. दार वाजवलं. दार उघडलं. आत गेलो. मी त्या गृहस्थांना माझी कहाणी सांगितली. विचारलं, ‘आपण माझं गाणं कराल का?’ म्हणाले, ‘अरे भाई, मुझे नहीं मेरी बिवीको शौक है गानेका. उसे दोचार गाने सुनाओ. वो खुश हो जाएगी, तो तुम्हे कुछ मिलेगा.’ आत गेलो. त्या प्रौढ बाईंनी हार्मोनियम समोर ठेवला. मी दोनतीन गाणी म्हटली. ती खूश झाली. जेवणाचा आग्रह केला. जेवणानंतर मी जायला निघालो तेंव्हा तिने माझ्या हातावर रुपया ठेवला. म्हणाली, ‘देखो भैय्या, बाबूजी कुछ काम नाही करते. रातदिन ताश खेलते रहेते हैं. मैने कुछ पैसे बचाये हैं, उसमेसे एक रुपया तुम्हे दे दिया. इससे ज्यादा देनेकी मुझमे शक्ती नहीं. बुरा मत मानना.’ माझ्या डोळ्यांत पाणी आलं. मी चटकन वाकून तो रुपया बाईंच्या पावलावर ठेवला अन् घराबाहेर पडलो… मी तर भटक्या. माझं कसंही चाललं असतं… पण तिला तिचं घर चालवायचं होतं!’

संगीतकार , गायक सुधीर फडके

एकदा नागपूरहून कलकत्त्यास जातांना गोंदिया येथे ‘आमगांव’ पोस्ट ऑफिसच्या जागेत फडक्यांचं गाणं ठरलं. श्रोत्यांसमोर चादर अंथरली गेली. कशासाठी? ते गाणं संपल्यावर कळलं. श्रोत्यांनी चादरीवर नाणी टाकली. दोन आणे, चार आणे… भिकार्‍यासमोर टाकावेत तसे. ‘ही इकडची पद्धत आहे.’ पोस्ट मास्तरांनी खुलासा केला. भीक मागायची वेळ तशी अनेकदा आली होती. प्रत्यक्ष भीक अजून मागितली नव्हती. गोळा केलेले पैसे मोजून अकरा रुपये भरले! पुढे कलकत्त्याला परिस्थिती बर्‍यापैकी स्थिरावली. तेव्हा त्यांना वाटलं, ‘आता मुंबई परत कधीच नाही!’ विधिलिखित पुन्हा वेगळंच होतं… ‘फेब्रुवारी १९३७ मध्ये मुंबई आकाशवाणीवर माझा पहिला कार्यक्रम झाला. मी रेडिओस्टार झालो! आज या शब्दांना फारसं महत्त्व नाही पण त्यावेळी इतर सर्वसाधारण विश्वात जसं ‘रावसाहेब’ ‘रावबहाद्दूर’ला होतं तसंच महत्त्व गायकांच्या विश्वांत ‘रेडिओस्टार’ला होतं!’ सुधीर फडके यांच्या प्रतिभेचा आविष्कार तिथून सुरु झाला अन् पंचावन्न सालच्या माडगूळकर लिखित ‘गीत रामायणाने’ शिखरावर पोहोचला… हे विधिलिखित!

‘अक्षर साहित्य-नाट्य-चित्र क्षेत्रात’ चौफेर मुशाफिरी करणार्‍या पु.ल. देशपांडे यांनी आत्मचरित्र लिहिलं नाही. त्यांनी जे लिहिलं, त्यातून स्वातंत्र्यापूर्वीचा-थोडाफार नंतरचा काळ समोर उभा राहतो. पुलंचं बालपण मुंबईच्या पार्ल्यात गेलं. काळ तोच… धडपडीचा! त्याविषयी पुलं लिहितात, ‘समर्थ, छत्रपती आणि लोकमान्य ही त्रयी हे सार्‍या गावाचे अधिष्ठान! पुणेरी गवगवा नव्हता पण पुणेरी कार्य करण्याची चिकाटी होती. गरीब कारकुनी पेशाची सारी मंडळी डोळ्यापुढे हिमालयासारखे आदर्श ठेवून वाट चालण्याचा प्रयत्न करीत होती… आणि महायुद्धाच्या महागाईचा दणका बसला. सगळ्यांच्या कंबरा खचल्या. काहींच्या डोक्यांत पैशाची मस्ती गेली. काहींना दारिद्य्राची ग्लानी आली. पार्ल्याचा कणा मोडला. बुळबुळीत बिगरकणा स्वार्थी माणसांच्या गर्दीत हिमालयाचा आदर्श केंव्हाच वितळला. माणसे हीन, दीन, दुबळी होऊन गेली. एका सुंदर वस्तीवरून नव्या पाशवी संस्कृतीचा वरवंटा फिरला. माणूस म्हणून जगू पाहणारी ही मंडळी भुईसपाट झाली! आयुष्यभर उराशी जतन करून ठेवलेल्या मूल्यांची धूळधाण झालेली पाहत माझ्या आजोबांनी आणि त्यांच्या पिढीतल्या आदर्शवादी भाबड्या लोकांनी नव्या परिस्थितीचे धसके घेत देह ठेवला!’

१९४३ साली ‘अभिरुची’ मासिकात ‘ध चा मा’ हा त्यांचा लेख प्रसिद्ध झाला. १९४४ च्या सुमारास ‘सत्यकथेत’ त्यांची ‘जिम आणि सौ. गंगाकुमारी एम.ए., पीएच.डी’ ही कथा प्रसिद्ध झाली. तेव्हा शिक्षकी पेशातही ते रुळत चालले होते. १९४४ साली बी.ए. झाल्यावर मुंबईच्या ‘ओरिएन्ट’ हायस्कूलमध्ये शिकवू लागले. त्याच सुमारास त्या शाळेत सुनीताबाईंना इंग्रजी शिकवण्याची नोकरी मिळाली. पुलंचा पगार रु.५५, सुनीताबाईंचा रु.३५! महिना तीन रुपये मोबदल्यात पुलं गाण्याच्या शिकवण्या देखील करत. पुढे चिंतामणराव कोल्हटकरांच्या कंपनीत त्यांनी नाटकात भरपूर भूमिका केल्या. १९४५ साली त्यांनी चिंतामणरारावांसाठी बुद्धचरित्रावर सुंदर नृत्य-नाट्य लिहिलं पण ते रंगमंचावर येऊ शकलं नाही. मात्र १९५३ साली ‘भाग्यवान’ हे त्यांनी लिहिलेलं नाटक चिंतामणरावांनी ‘साहित्य-संघासाठी दिग्दर्शित केलं… ती रंगमंचावरच्या ‘पुल-युगाची’ सुरवात होती! बालकवी ठोंबरे यांच्या ‘फुलराणी’ या काव्याचा सुंदर उपयोग स्वत:च्या नाटकात करणार्‍या पुलंनी, एकेकाळी वॉल्ट डिस्नेच्या प्रतिभेनं या कवितेतेला किती सुंदर रूप आलं असतं म्हणून त्या कवितेचं इंग्रजीत भाषांतर करून वॉल्ट डिस्नेला पाठविण्याची विनंती त्यांनी बा.सी. मर्ढेकरांना केली होती!

पुलंचे परम ‘मत्स्य’मित्र जयवंत दळवी हे स्वत:शीच रमणारे, ‘एकांतप्रिय’ लेखक. ‘ललित साहित्याची आवड निर्माण करणारं कसलंही पोषक वातावरण लहानपणी आमच्या घरी नव्हतं’ असं म्हणणारे जयवंत दळवी शिक्षणासाठी मुंबईत आले तेव्हा भरपूर भटकण्याची अन् वाचनाची संधी मिळाली. ‘लेखकाचं अंग माझ्यात होतं. मला सतत म्हणजे रोजच्या रोज कांहीतरी लिहावं अशी उर्मी वाटे. मी या काळांत कांही ना कांही लिहित असे. माझे राष्ट्रसेवादलातले दिवस आणि वार्ताहर म्हणून दोन वृत्तपत्रांत काढलेले दिवस, याचा माझ्या लेखनाला खूप हातभार लागलेला आहे कारण भटकून खूप पाहणं, पाहिलेल्या गोष्टींवर विचार करणं, विचार करता करता अस्वस्थ होणं आणि मग दुसर्‍यासही ते सांगून अस्वस्थ करणं या सर्व गोष्टी साहित्यनिर्मितीत समाविष्ट असतात.’ ही त्यांची लिहिण्यामागची भूमिका. ‘मौज’ आणि ‘लोकमान्य’ या दोन्ही दैनिकात वार्ताहर म्हणून काम करत असताना त्यांनी मुंबईचा कानाकोपरा धुंडाळला. १९४८ मध्ये ‘दातार मास्तर’ ही पहिली कथा, ‘पहिला पाऊस’ ही दुसरी कथा, ‘नवसमाजाचा निर्माता’ ही ‘सत्यकथे’त छापून आलेली त्यानंतरची कथा… अशी लेखनाला सुरवात झाली! दळवी प्रथम चर्चेत आले त्यांच्या १९६३ च्या ‘चक्र’ या काळाच्या मानाने ‘बोल्ड’ कादंबरीमुळे. नीती-अनीती, पाप-पुण्य, श्लील-अश्लीलता या बाबतीतला तो संभ्रमावस्थेतला काळ. त्यामुळे प्रकाशक मिळाला तर प्रकाशित करून, अन्यथा त्याच्या कांही ‘चक्रमुद्रित’ सायक्लोस्टाईल प्रती काढायच्या पण आपली कादंबरी लोकांपर्यंत पोहोचलीच पाहिजे, हे त्यांनी ठरवलं होतं! ते म्हणतात, ‘मी बाहेरगावीही ज्या ज्या ठिकाणी फिरलो, तेथली प्रेक्षणीय स्थळं पाहिली नाहीत पण तिथले बाजार, रेल्वे-स्टेशनं, बस-स्टेशनं पुन्हापुन्हा पाहिली. अशा भटकंतीतूनच मला ‘चक्र’, ‘बाजार’, ‘स्वगत’ यांसारख्या कादंबर्‍या मिळाल्या. त्यातली सगळी पात्रं रस्त्यावरचीच आहेत!’ असं म्हणणारे दळवी कुणासाठी लिहित? ‘मी अमक्यासाठी-तमक्यासाठी अशी वर्गवारी न करता लिहितो कारण मला महत्त्वाचं वाटतं ते ‘लिहिणं’! ‘लिहिणं’ हा माझा श्वास आहे. ते ज्या दिवशी थांबेल, त्या दिवशी मी नसेन!’ पुलंच्या नंतर सहा वर्षांनी जन्मलेले दळवी पुलंच्या आधी सहा वर्ष आपल्यातून गेले.

पुलंच्या आणि ‘ठणठणपाळ’ दळवींच्या बहुतांशी पुस्तकांची अंतर्बाह्य सजावट करणारे चित्रकार वसंत सरवटे यांचं चित्रकलाविषयक शिक्षण देखील नव्हतं. ते सिव्हील इंजिनियर होते. कोल्हापुरातील जन्म असून, त्यांचा ‘कलापूर’परंपरेशी संबंध नव्हताच. घरातून चित्रकलेचा वारसा नव्हता. ते सांगतात, ‘वयाच्या 10-12 व्या वर्षापासून ‘चित्रकार’ व्हावं असं वाटायचं पण ‘व्यंगचित्रकार’ होणं कधीच डोक्यांत नव्हतं. कोल्हापूरातल्या कपिल-तीर्थ मंडई येथे मी आणि शि.द. फडणीस स्केचिंग करायचो. त्याकाळी कलामहर्षी बाबुराव पेंटर कोल्हापुरात होते. आमच्या घरीसुद्धा, ‘तुला पेंटर व्हायचंय का? बाबुराव पेंटरासारखं झालं पाहिजे, नाहीतर फुक्कट!’ असे वडिलधारे म्हणायचे. चित्रकार दलालांच्या चित्रांचा प्रभाव माझ्यावर होता. त्यांची चित्रं सोपी वाटायची पण काढायला अवघड असायची… मी कॉपी करायला लागलो. ते व्यंगचित्रं काढतात मग आपणही काढू, म्हणून व्यंगचित्रं काढू लागलो. दलालांचा मोठेपणा कळण्याचं ते वय नव्हतं… आपलं चित्र दलालांसारखं मुखपृष्ठावर आलं पाहिजे पण ते छापणार कोण? आतमध्ये व्यंगचित्र तरी छापणार कोण? ‘ब्लॉक’च्या खर्चामुळे चित्रांना तसंही महत्त्व नाहीच. त्यामुळे उपजीविकेसाठी हा पेशा अशक्य! कोल्हापूरातल्या नगर-वाचन मंदिरात येणार्‍या अमेरिकन साप्ताहिकात ‘व्यंगचित्र’ यायची. दलालांच्या प्रभावातून बाहेर पडायला त्यांची मदत झाली. आपल्याकडे दुर्दैवाची गोष्ट अशी की व्यंगचित्रकाराला ‘साहित्यिक’ मानतच नाहीत!’ त्यावेळी सिव्हील इंजिनियर म्हणून नोकरीनिमित्त मुंबईत स्थिरावल्यावर त्यांनी जे.जे. स्कूलचा ‘इव्हिनिंग क्लास’ सुरु केला, जिथं ‘फिगर ड्रॉइंगचा’ अभ्यास करण्यासाठी ‘लाइव्ह मॉडेल’ असे. सरवट्यांच्या व्यक्तिरेखांचं मूळ हे असावं. कोल्हापूरातील निवांत आयुष्य अनुभवल्यावर मुंबईतल्या उंच इमारती, क्षणभराची उसंत नसणारी प्रचंड गर्दी पाहून त्यांच्यातला ‘व्यंगचित्रकार’ बाहेर पडण्यासाठी धडपडू लागला. त्यांच्या चित्रात ‘गर्दी’ दिसू लागली. मुंबईत आल्यानंतरचा तो त्यांचा ‘सेफ्टी-वॉल्व्ह असावा! पुढं त्यांच्या चित्रांची-व्यंगचित्रांची मागणी वाढली. दिवाळी अंक त्यांच्या व्यंगचित्र-मालिकेनं सजू लागले… वसंत सरवटे या क्षेत्रात स्थिरावले! पुलंच्या साठीच्या निमित्ताने निघालेल्या ‘पु.ल. : एक साठवण’ या जयवंत दळवी संपादित पुस्तकाच्या मलपृष्ठावर ‘पुलं, जयवंत दळवी आणि वसंत सरवटे’ असं अलौकिक छायाचित्र आहे. अलौकिक एवढ्यासाठीच की पुस्तकाच्या चित्रकारालादेखील ‘साहित्यिका’इतकं महत्त्व दिलं गेलं!

पुलंहून सहाच महिन्यांनी लहान असणार्‍या प्रतिभावंत गायक डॉ. वसंतराव देशपांडे यांनी फारसं कधी लिहिलं नाही. स्वत:बद्दल तर नाहीच. या जवळच्या मित्राविषयी पुलं सांगतात, ‘शाळकरी वयांत देवळातल्या कीर्तनकाराबरोबर तबला वाजवून, वसंताच्या भाषेत ‘कुटून’- अखंड दोन आणे कमाई करून आईजवळ द्यायचा. त्या दोन आण्यात चूल पेटत होती की नाही, याचं रडगाणं तो कधीच गायला नाही! पुण्यातल्या अद्भूत चाळीतल्या एका खोलीच्या संसारात वसंता खाटेवर बादशहाच्या ऐटीत असा कांही बसायचा की त्या खाटेचं तख्त होऊन जायचं! मिलिटरी अकौंटसमधून ऐंशी-नव्वद रुपये माहे आणणारा हा कारकून… त्याने गरिबी भोगली पण दैन्याला मनात प्रवेश करू दिला नाही. उलट त्या कष्टांचे किस्से केले!’ नंतर पुण्यातच त्यांना खरी ‘ओळख’ मिळाली, जी दूरवर पसरली.

याच पुण्यातली स्वातंत्र्यपूर्व काळातली ‘प्रभात’ ही एक मान्यवर चित्रपट-निर्मिती संस्था. ‘चित्रपटकर्मी’ गजानन जागीरदार ‘प्रभात’ काळापासूनच्या त्यांच्या धडपडीच्या काळातील चित्रपट-क्षेत्रातल्या ‘पाउलखुणा’ वर्णन करतात… ‘भालजी पेंढारकरांनी आपला साहाय्यक म्हणून महिना ऐंशी रुपये पगारावर घेतलं आणि माझ्या नव्या जीवनाला सुरवात झाली. डिसेंबर १९३० मध्ये मी भालजींचं बोट धरून चित्रपट व्यवसायात शिरलो आणि कायम स्थिर झालो. नंतर ‘प्रभात’मध्ये नोकरी धरताना चाळीस रुपये पगार ठरला. आजोबांनी विचारलं, ‘पगार किती मिळणार आहे?’… ‘चाळीस रुपये.’ तो आवाज ऐकताच आजोबांचा आवाज कठोर झाला…. ‘बस्स झाला हा पोरखेळ. आत्ताच कळवून टाक त्यांना तू येत नाहीस म्हणून… चाळीस रुपये! बी.ए. होऊन फक्त चाळीस रुपये कमवायला निघाला आहेस. हायस्कूलच्या मास्तरला देखील ऐंशी रुपये स्टार्ट मिळतो. तिथं जा. या कमअस्सल धंद्यातून सुटशील तरी. तू कलेच्या मागं लागला आहेस… आधी दोन वेळा पोटाला मिळवायला शिक! कळव तुझ्या त्या प्रभात कंपनीला, तुझं शिक्षण इतकं स्वस्त नाही म्हणून!’ कालांतराने मी ‘प्रभात’मध्ये दाखल झालो… नंतर ‘शेजारी’ सिनेमाचा ‘पडोसी’ हा त्याचा हिंदी चित्रपट निर्माण होताना मी शांताराम बापूंना विचारलं, ‘मझहरखानला हिंदू जिवबाची अन् मला हिंदूला मुसलमान मिर्झाची भूमिका का?’ त्यावर बापू म्हणले, ‘अ हिंदू हॅज टू ग्लोरिफाय अ मुस्लिम, अ मुस्लिम हॅज टू ग्लोरिफाय अ हिंदू… हाच माझा हेतू आहे.’ हे सारं त्या स्वातंत्र्यपूर्व काळातील धार्मिक वास्तवाविषयी बरंच कांही सांगून जातं! कालांतराने देशाची धर्माधारित फाळणी व्हायची चुकली नाही. फाळणी दरम्यान झालेल्या अमानुष दंगलीत दोन्ही बाजूंच्या लाखो निरपराध्यांचा झालेला नरसंहार देखील चुकला नाही. हा फाळणीच्या भळभळत्या जखमेचा इतिहास!

त्या स्वातंत्र्यपूर्व काळाविषयी व्यंकटेश माडगूळकर लिहितात, ‘माझं शिक्षण चालू असतानाच बेचाळीस ऑगस्टचा संग्राम सुरु झाला. ‘करेंगे या मरेंगे’ या निश्चयी घोषणेचे प्रतिध्वनी आठी दिशांना उठले. तरुण मनाला हौतात्म्याचं विलक्षण आकर्षण असतं. मी क्रांतिकारकांची चरित्रं वाचली होती. पांडित्यानं भरलेल्या पुस्तकांपेक्षा, प्रामाणिकपणे लिहिलेली चरित्रं, आत्मचरित्रं आपल्याला बरंचसं शिकवतात… मी सोळाव्या वर्षी चळवळीत गेलो. गुन्हेगार ठरलो. लपूनछपून हिंडलो. खेड्यापाड्यातून, वाड्यावस्त्यांतून बराच भटकलो. आजवर जे पाहिलं होतं, अनुभवलं होतं, त्यापेक्षा फार वेगळं, फार दाहक मी पाहिलं. शरीराची आणि मनाची पुष्कळ होलपट सोसली… चळवळ संपली. शालेय शिक्षण संपलं. हे जीवनाचं ग्रंथालय मात्र माझ्यापुढं सदैव उघडलेलंच राहीलं!’ मुळात व्यंकटेश माडगूळकर अफाट वाचक होते. त्या काळी त्यांनी भरपूर वाचलं ते कोल्हापूरच्या नगर-वाचन मंदिरात. कोल्हापूरातच ते लिहायला लागले. त्यांनी भरपूर लिहिलं. त्यांच्या या ‘अक्षर-प्रवासा’ची सुरवात मात्र गमतीदार होती. त्यांची पहिली ‘गांवाकडं’ ही ‘नवभारत’च्या दिवाळी अंकात ‘व्यं.दि. माडगूळकर’ नावाने पाठवलेली कथा, कंपोझिटरनं ‘चूक’ सुधारल्यामुळे ‘ग.दि. माडगूळकर’ नावानं प्रसिद्ध झाली! नंतर ‘व्यं.दि.’नी संभाव्य चूक न व्हावी म्हणून ‘व्यंकटेश माडगूळकर’ हे नांव स्वीकारलं! ‘मौज’च्या रौप्यमहोत्सवी अंकात त्यांची ‘पडकं खोपटं’ ही कथा ‘व्यंकटेश माडगूळकर’ या नावाने प्रसिद्ध झाली. हा ‘तो मी नव्हेच’चा ‘नामानिराळा’ किस्सा!

‘तो मी नव्हेच’ चा ‘खलनायक-नायक’ अजरामर करणारे प्रभाकर पणशीकर, स्वातंत्र्यपूर्व काळाविषयी, त्यांच्या आयुष्याच्या यशाच्या ‘गणिता’विषयी लिहितात, ‘मी रोज शाळेत जात होतो. वर्गात बसत होतो पण माझं मन केंव्हाच शिक्षणाच्या फांदीवरून उडून नाटकाच्या फांदीवर जाऊन बसलं होतं. गणिताच्या तासाला मी फार वैतागत असे. अशात हिंदुस्तानला स्वातंत्र्य मिळालं. फाळणीला मान्यता देऊन आमच्या पुढार्‍यांनी ते स्वीकारलं. वातावरणात प्रचंड प्रक्षोभ भरला. आम्ही विद्यार्थी त्यापासून अलिप्त नव्हतो. विद्यार्थी समितीच्या माध्यमातून मी आमच्या नियतकालिकांमधून आणि मासिक वादसभांतून प्रक्षोभक विचार व्यक्त करीत असे… आम्ही विद्यार्थी प्रभात फेर्‍या काढीत होतो. वर्तमानपत्रात सिंध-पंजाब-बंगालमधल्या अत्याचारांच्या बातम्या येतच होत्या… हजारो निरपराध नागरिकांचं रक्त वाहून, कोट्यवधींच्या मालमत्तेवर पाणी सोडून… १५ ऑगस्टला आम्ही स्वातंत्र्यदिन साजरा करणार होतो! माझं मन बधीर झालं होतं. संवेदना बोथट झाल्या होत्या. मी शाळेतल्या झेंडावंदनाला गेलोच नाही!… मात्र दिवाळी सुट्टीनंतर शाळेच्या स्नेहसंमेलनात आचार्य अत्र्यांचं ‘साष्टांग नमस्कार’ करायचं ठरलं. माझ्यात पुन्हा चैतन्य सळसळलं. मॅट्रिकचं वर्ष होतं पण मी हट्टानं काम मागून घेतलं. ‘रावबहाद्दूर’ची भूमिका मिळाली. दिग्दर्शक नंदू खोटे. मी त्यांचा सहाय्यक बनलो. त्यांच्या गैरहजेरीत तालमी घेण्याची जबाबदारी माझी होती. माझ्यातला दिग्दर्शक आकार घेत होता! प्रयोग फार छान झाला. प्रमुख पाहुणे अप्पा पेंडसे, नाटक संपल्यावर रंगपटात येऊन स्वत:चे दहा रुपये देत म्हणाले, ‘मॅट्रिक झाल्यावर नाटक-सिनेमात पड. त्यात तुला यश मिळेल. मला भेट, मी तुला मदत करीन…’ मला स्वर्ग दोन बोटे उरला होता… पण मी फॉर्म परीक्षेतच नापास झालो! पाटणकरसरांनी बोलावून सांगितलं, ‘तू मॅट्रिक झालास, बी.ए., एम.ए. झालास तर तुझ्या कर्तबगारीला दाही दिशा मोकळ्या आहेत.’ सरांच्या बोलण्यातील कळकळ मला जाणवत होती पण डोक्यात शिरत नव्हती. मला नट व्हायचं होतं, तिथं अल्जिब्रा-जॉमेट्रीचा कांहीही उपयोग नव्हता! फायनल परीक्षेत मी गणितात नापास झालो… मला कमी पडलेल्या सात मार्कांनी माझ्या आयुष्याचं गणित पार बदललं!’

झेवियर्समध्ये शिकलेल्या विदुषी दुर्गाबाई भागवत त्यांचं वाचनवेड हे लेखनवेड झाल्याच्या ‘बदललेल्या गणिता’विषयी म्हणतात, ‘मी आज ज्या तर्‍हेचे ललितलेखन करते, ते मी करीन असे मला एम.ए. होईपर्यंत वाटले नव्हते. ते माझं ध्येयही नव्हते… वाङ्मय हे माझ्या मुक्त-विहाराचे स्थान होते. मी वाचनवेडी होते. ज्या पुस्तकात माझे मन रमे, ते मला जणू मीच लिहिले आहे असे वाटायचे… मृत्युचा प्रसंग आला की माझेच मरण मी पाही! जुनेनवे ग्रंथ माझीच अनंत जन्मीची रूपे मला वाटायची… पण वाचनवेड हे लेखनवेड होण्याचाही प्रसंग, जन्मांतरीच्या कुणाशीतरी कशातरी तर्‍हेने जडलेल्या अज्ञात सौहार्दाने घडवला असावा अशी माझी समजूत आहे… लेखन हे मला केंव्हाच सोपे वाटले नाही. त्यातली माझ्या मनापुढे असलेली सिद्धी मला प्राप्ती झालेली नाही. जितकी मी झटते तितके लौकिक यश तेवढे मिळते पण सिद्धी अधिकाधिक उंच जाते अथवा अधिकाधिक खोल दडते!’ दुर्गाबाई पुढे विश्लेषण करतात, ‘ललित लेखनाचा केवळ भावनेशीच नव्हे, देहाशीच नव्हे तर आगच्यामागच्या जीवनाशीही घनिष्ट संबंध असतो, हा माझा अनुभव आहे… अशा लेखनाला भाववृत्तीची डूब घेण्याची आवश्यकता असते. अन्यथा सृजनाचा अंकुर उगवणारच नाही!’ त्यांचे मानलेले चुलते रा. ना. भागवत त्यांना म्हणत, ‘हे बघ दुर्गा, तुला वाटत असेल की आपलं पुस्तक छापलं की आपण खूप सुखी होऊ! पण तसं नसतं. पुस्तक एकदा छापखान्यात गेलं की ते आपलं राहत नाही. सासरी गेलेल्या मुलीसारखं ते लोकाचं होतं. कुणी बरं म्हटलं तर फुशारून जाऊ नकोस. कुणी वाईट म्हटलं तर कष्टी होऊ नकोस… यशापयशाला फारसं महत्त्व देऊ नकोस.’ म्हणून दुर्गाबाई म्हणत, ‘इथे ते लेखन वाचकाचे असते. वाचकही लेखकाप्रमाणे साहित्यकृती घडवतो अशी माझी श्रद्धा आहे. म्हणूनच वाचकांचा भार मी माझ्यावर न घेता त्यांच्यावर सोपवून मोकळी होते!’

‘श्यामची आई’ लिहिणार्‍या साने गुरुजींची आठवण दुर्गाबाई सांगतात, ‘साने गुरुजी माझे आप्त नव्हते, मित्र नव्हते की पुढारी पण नव्हते. बेचाळीसच्या चळवळीत अनेक भूमिगतांच्या बैठका आमच्या घरी होत. त्यावेळी ही मंडळी माझ्या खोलीत तासन्तास बसत. त्यावेळी त्यांचा परिचय झाला. पुढे ‘साधना’ निघाल्यावर, ‘तुम्ही साधनेत काही लिहा’ अशी त्यांनी मागणी केली. मी ‘हो’ म्हटले पण लिहिणार काय? मी गुरुजींना म्हटलं, मला मराठीचा अभ्यास केला पाहिजे, त्याशिवाय लेखन जमणार नाही’ आणि खरोखरच त्यांनी मराठी खूप वाचले आणि चौपाटीवर भेटलेल्या एका अनाथ मुलीवर खाडाखोड करीत, नंतर सुवाच्य करीत कथा लिहिली आणि पोस्टात टाकून दिली. गुरुजींना लेख आवडल्याचं आणि ‘साधने’साठी लिहित जावं अशी इच्छा प्रकट केली होती पण त्यांनी ‘वाळूतील पाऊले’ या शीर्षकाचा उल्लेख चुकून ‘काळाची पाऊले’ असा केला होता, तो खोडून सुधारला होता. दुसर्‍याच दिवशी गुरुजींनी विष घेऊन आत्महत्या केली, हा योगायोग भयंकर होता!’ ही १९५० सालची घटना. नंतर १९५३ साली आचार्य अत्र्यांच्या ‘श्यामची आई’ चित्रपटाला राष्ट्रीय सुवर्णपदक मिळालं!
लक्ष्मीबाई टिळकांच्या ‘स्मृतिचित्रां’तल्या बालकवी ठोंबरे यांच्या आठवणीने सुरु झालेली आठवणींची यात्रा दुर्गाबाईंच्या ‘साने गुरुजींच्या’ आठवणींशी थांबवावी! या आठवणींचा तसाही भरवसा नसतो. ‘आठवणींच्या प्रदेशात स्वैर भटकंती’ करणार्‍या सुनीताबाई देशपांडे म्हणतात, ‘जुने ते सगळे काळाच्या पडद्याआड गेले. आजचेही तसेच कांही काळाने जाणार. जाणारा क्षण आपला कधीच विचार करीत नाही. आपण मात्र त्या क्षणाच्या पदराला घट्ट पकडून वेड्यासारखे लोंबकळत राहतो. अधांतरी. एकटे एकटेच. जुन्या आठवणी त्यांच्यासोबत गेल्या. माझ्या माझ्यासोबत जातील पण माझ्या जोडीने जाण्यासाठी शेवटपर्यंत त्या माझ्या सोबतीला राहतील ना?’ पु.लं. मात्र एकदा म्हणाले होते, ‘हा चाळीस-पंचेचाळीस वर्षांपूर्वीचा काळ असला तरी, ‘गेले ते दिवस’ असं मात्र मला कधी वाटत नाही… ते दिवस माझ्या मनातून मावळायचेच विसरले आहेत!’

प्रभाकर बोकील, पुणे
मो.९८१९०४१५०८

मासिक ‘साहित्य चपराक’, डिसेंबर २०२१, पान क्र. ११

Share this post on:

Author: चपराक

पुणे शहरातून ‘साहित्य चपराक’ हे मासिक आणि ‘चपराक प्रकाशन’ ही उत्तमोत्तम पुस्तके प्रकाशित करणारी ग्रंथ प्रकाशन संस्था चालविण्यात येते. ‘साहित्य चपराक’ मासिकाचा अंक दरमहा 10 तारखेला प्रकाशित होतो. आपले साहित्य पाठविण्यासाठी, ‘चपराक’मध्ये जाहिराती देण्यासाठी आणि नवनवीन पुस्तकांच्या माहितीसाठी संपर्क - घनश्याम पाटील, संपादक 'चपराक'.
व्हाट्सऍप क्रमांक - ८७६७९४१८५०
Email -

View all posts by चपराक >

One Comment

  1. सुंदर लेख. लेख आवडला! साहित्यिक कलावंतांनी जगण्यासाठी केलेली धडपड, अर्धपोटी राहून केलेले लेखन, कलेची सेवा मन विषण्ण करते. त्यांचा तो काळ डोळ्यासमोर उभा राहतो.

तुमची प्रतिक्रिया जरूर कळवा

error: Content is protected !!