हे देवाघरचे देणे!

प्रेम नाही मिळाले म्हणून द्वेष? घृणा? सूड? मग प्रेमच कसले?

अलीकडच्या माणुसकीला काळिमा फासणाऱ्या घटनांना पाहिले की मन सुन्न होते आणि विचारात पडते की इतक्या खालच्या पातळीवर जाईपर्यंत माणसाचा आत्मा, विवेक, त्याच्यातील दयाभाव कसा काय झोपू शकतो? की या सगळ्याला जागे ठेवण्याच्या अभ्यासात/जागरणात समाज आणि संस्कृतीचा सहभाग कमी व्हायला लागलाय?

जेव्हा खरे प्रेम होते तेव्हा इतर सर्व भावांपेक्षा समर्पणभाव मनामध्ये सर्वाधिक स्थान करून असतो. तो भाव अधून मधून, प्रभावांमुळे उठणाऱ्या क्रोध, ईर्षा, अहंकार वा द्वेषादी भावांना जिथल्या तिथे समाप्त करतो व त्वरित दयाभावास निर्माण करून नकारात्मक विचारांना मारतो. जर हे भाव दीर्घकाळ मनात तग धरत असतील तर समजावे की ते प्रेम नसून कामनेतून उत्पन्न झालेले केवळ क्षणिक आकर्षण आहे किंवा अवलंबातून निर्माण झालेले मानसिक दास्यत्व. जेव्हा समर्पित भावनेने प्रेम होते तेव्हा त्या व्यक्तीचा होकार,नकार, सामाजिक स्थान, जात धर्म, आर्थिक क्षमता इतके महत्त्वाचे वाटत नाही, जितके त्या व्यक्तीला आनंदात पाहणे, त्याच्या संकल्पपूर्तीत सहभागी होणे, त्याच्या दुःखात त्याच्यासाठी प्रार्थना करणे आणि परतफेडीची अपेक्षा न करता त्याला प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरित्या मदत करणे, हे सर्व महत्वाचे होते.

कोणत्याही घटनेच्या मागे समाजाच्या विचारशैलीचा, त्यात होणाऱ्या संवादांचा देखील अप्रत्यक्ष सहभाग असतोच. प्रेमभंग झालेल्या लोकांचे हितचिंतक म्हणवणाऱ्यांचे संवाद ऐकले तर ही गोष्ट प्रखरतेने जाणवते की, ते जखमेवर मलम लावण्यापेक्षा आगीत तेल ओतण्याचे काम करत असतात. पलीकडच्या व्यक्तिबद्दल घृणा निर्माण करणे, इर्षेने काहीतरी करण्यास उद्युक्त करणे (नकारात्मक प्रेरणा) त्याच्या आयुष्यातील प्रत्येक व्यक्तिविषयी द्वेष निर्माण करणे. आपण आपल्या आसपास अशा कित्येक चर्चा ऐकल्या असतील. या गोष्टी छोट्या वाटतात पण यातूनच समाजसंस्कार घडत असतात आणि कधी एका कमकुवत मनावर त्याचा विपरीत परिणाम होईल याचा आपल्याला सहसा अंदाज देखील नसतो. मग प्रेमभंगातून आत्महत्या, ऍसिड अटॅक वगैरेसारख्या घटना या पसरवलेल्या नकारात्मकतेच्या परिणामस्वरूप विकृतरुपाने बाहेर येतात.

एखादी व्यक्ती आपल्याला मिळाली नाही तर त्याविषयी इतकी चिडचिड का? स्वतःचे आणि दुसऱ्याचे आयुष्य संपवण्याइतपत, त्या व्यक्तीचा सूड घेण्याइतपतची मानसिकता अगदी शिकल्या सवरलेल्या माणसांच्या मनात सुद्धा निर्माण कशी होऊ शकते ?

आपले आयुष्य हे केवळ आपले नसते ,आपण आता जसे आहोत तसे निर्माण होण्यामागे एक खूप मोठी शृंखला असते ,कित्येक जन्मांची, कित्येक कर्मांची, कित्येक प्रार्थनांची, वडिलांच्या कष्टांची, आईच्या वेदनांची, पिढ्यापिढ्यांच्या पुण्याईची, अनेक मनांच्या’एक अशी व्यक्ती या कामासाठी निर्माण व्हावी’ या प्रगाढ इच्छेची, इतिहासातील सर्व महात्म्यांच्या महान त्यागांची शृंखला. आपल्यातील एकेक जण महत्वाचा आहे, एकेक व्यक्ती महत्वाची आहे, आपण महत्वाचे आहोत! प्रत्येकाच्या वाट्याने अखंड जग उभे आहे. केवळ प्रेमभंगामुळे इतरांचा काय स्वतःचा जीव घेण्याचा अधिकार देखील आपल्याला नाही. मी तर याला प्रेमभंगाऐवजी अपेक्षाभंगच म्हणेन, कारण प्रेम निर्माण करते, ते भंग होतही नाही आणि करतही नाही.

हरवून तृषांना साऱ्या
विसरून स्वतःला जाणे
अन खोडून देणे सारे
असणे आणि ते होणे
याचेच नाव रे प्रीती
हे निर्मळ जीवनलेणे

प्रेमाला उपमा नाही
हे देवाघरचे देणे

(जगदीश खेबुडकर, ज्योती पाटील)

वेळोवेळी मनात येणाऱ्या अपेक्षांना, कामनांना वेळचेवेळी आळा न घालता आल्याने अनेक विकृतींना वाव मिळतो. प्रत्येक मनुष्यात परमात्मा आहे आणि तो भक्तीचाच भुकेला आहे एकतर प्रेमाला भक्तीपर्यंत पोहोचवा नाहीतर त्याला शक्तीस्वरूप प्रेरणा म्हणून धारण करा. विश्वात प्रेमाचे गंतव्य आणि त्याच्या असण्याचा उद्देश हाच आहे. तुम्ही कोणाला आवडला नाही म्हणून त्याच्याविषयी घृणा द्वेष निर्माण करणे परमेश्वराविषयीच हे भाव निर्माण करणे नाही का?

– ज्योती घनश्याम पाटील
८४३१७५४०२९
पूर्वप्रसिद्धी – दै.संचार १४ फेब्रुवारी २०२२

चपराक

पुणे शहरातून ‘साहित्य चपराक’ हे मासिक आणि ‘चपराक प्रकाशन’ ही उत्तमोत्तम पुस्तके प्रकाशित करणारी ग्रंथ प्रकाशन संस्था चालविण्यात येते. ‘साहित्य चपराक’ मासिकाचा अंक दरमहा 10 तारखेला प्रकाशित होतो. आपले साहित्य पाठविण्यासाठी, ‘चपराक’मध्ये जाहिराती देण्यासाठी आणि नवनवीन पुस्तकांच्या माहितीसाठी संपर्क - घनश्याम पाटील, संपादक 'चपराक'.
व्हाट्सऍप क्रमांक - ८७६७९४१८५०
Email - Chaprak Email ID

3 Thoughts to “हे देवाघरचे देणे!”

 1. Rakesh Shantilal Shete

  कोणत्याही अटीशिवाय असलेलं, आध्यात्मिक पातळीवरचं, जे दुस-याला देत राहायचं ते खरं प्रेम! खूप छान विश्लेषण!

 2. Nagesh S Shewalkar

  खूप छान व्यक्त झाला आहात.
  अतिशय पोटतिडकीने लिहिले आहे. अभिनंदन।

 3. जयंत कुलकर्णी

  प्रेम देवाघरचे लेणे हे अगदी बरोबर! प्रेमात देखील त्याग असावा. ज्या व्यक्तीवर प्रेम आहे त्या व्यक्तीचे भले व्हावे हीच मनीषा असावी. ती व्यक्ती आपली होवो काय न होवो! लेख आवडला.

तुमची प्रतिक्रिया जरूर कळवा

हे ही अवश्य वाचा