नायिका

क्रोधो न च मात्सर्यं न लोभो नाशुभा मति: ।
भवन्ति कृत पुण्यानाम् भक्तानां श्रीसूक्तं जपेत् ॥

श्रीसूक्तामधील वरील ऋचा सांगते की श्रीसूक्ताच्या पठणाने, पुण्यवान भक्ताच्या मनात, राग-लोभ-मत्सर इत्यादी वाईट विचार येत नाहीत!
तिला मी कधी श्रीसूक्त म्हणताना पाहीले नाही परंतु वरील सर्व वर्णन तिला तंतोतंत लागु पडत होते. अर्थात हे आता एवढ्या वर्षांच्या आयुष्याच्या अनुभवाने समजते आहे. त्यावेळी तिच्यामधील हे मोठेपण समजण्याची आमची पात्रता नव्हती असंच म्हणावं लागेल.
‘ती’ म्हणजे माझी आजी, माझ्या आईची आई जिने आई बनून आमच्या शैक्षणिक वर्षांत आम्हांला सांभाळले, ती विलक्षण बाई!!
तिची ओळख करुन द्यायची तर ‘एकेकाळची ओसाडगावची पाटलीण’ अशीच करुन द्यावी लागेल.
त्यावेळच्या पद्धतीप्रमाणे, न्हाणे आले की लगेच वयाच्या तेराव्या-चौदाव्या वर्षी, म्हणजे साधारण इ. स. 1935 सालच्या दरम्यान, तिचे लग्न कोकणातून घाटावर झाले. तिचे वडील ब्रिटिश काळात पोलीस इन्स्पेक्टर होते. कोकणातील चिपळूण जवळचे दुर्गवाडी हे तिचे माहेरचे गांव. घरात देशपांडकी होती. घरची परिस्थिती सधन म्हणावी अशीच होती. इन्स्पेक्टर वडील आणि शिस्तप्रिय करारी आई यांच्या संगोपनात ती अगदी छान तयार झाली होती. एक मोठा भाऊ आणि धाकटी दोन भावंडे यांची ती ताई होती. पुढे तिची मुले आणि नंतर आम्ही नातवंडेही तिला ताईच म्हणत असू. अशा या ताईचे घाटावरच्या माण तालुक्यातील, महिमानगड या गावच्या वतनदार घराण्यात लग्न झाले. आजोबा गांवचे पोलीस पाटील होते. शेती भरपूर पण प्रदेश सगळा ओसाड होता. आजोबा गावात राहून आपल्या धाकट्या भावासोबत शेती आणि वतनदारी सांभाळत. त्यांचे बाकीचे भाऊ मुंबईला नोकरी करत असत.

ताई लग्न होऊन सासरी आली तेव्हा तिच्याच सांगण्याप्रमाणे, तिच्या अंगावर भरपूर दागिने होते. किती होते असं विचारलं की ‘होते टोपलीभर!’ असं तिचं उत्तर असायचं. दोन्हीकडची घराणी मातब्बर असल्याने तिचे लग्नही त्यावेळच्या पद्धतीप्रमाणे वाजतगाजत झाले. लग्नानंतर घरात पंधरा-वीस माणसे पाहून ती सुरवातीला बिचकून गेली पण मुळच्या कष्टाळू आणि समंजस स्वभावाने तिने तो ओसाड प्रदेश, घर, माणसं आणि परिस्थिती चटकन समजून घेतली आणि अंगवळणी करून घेतली. कोकणातील निसर्गसौंदर्याने नटलेल्या गावातून एकदम माणदेशी, धुळभरल्या, पावसापाण्याची वानवा असलेल्या, दूरदूरपर्यंत झाडांचं कुठलंही हिरवेपण न दिसणार्‍या, रखरखीत प्रदेशात, आपल्या प्रेमाच्या माणसांना सोडून येताना, तिच्या कोवळ्या जिवाची खरंतर कोण घालमेल झाली असेल! परंतु बाईच्या जातीच्या उपजत शहाणपणाने तिने त्या भावना दडपून टाकल्या असणार आणि तिच्या स्वभावातील शांतपणाने समोरचं वास्तव स्वीकारलं असणार. असणार म्हणावं लागतं आहे कारण तिने त्याबद्दल वाईट वाटून घेतलेलं आम्ही कधीच पाहिलं नाही. त्यावेळच्या परिस्थितीचा नकारात्मक उल्लेख तिने कधीही केला नाही. आठवणी आल्या आणि सांगितल्या तरी त्या सगळ्या चांगल्या प्रसंगाच्याच असत.

तिचे लग्न झाले तेव्हा दळपाच्या गिरण्या ही संकल्पना प्रत्यक्षात आली नव्हती. पहाटे ‘एक झोप झाली की’ उठायचे आणि रोज प्रथम जात्यावर दळण करायचे. घरची माणसे आणि गडीमाणसे धरुन साधारण पंचवीस माणसांचे दळण करावे लागे. घरात सासूबाई नव्हत्या. हिच्या लग्नाआधीच त्या निवर्तल्या होत्या. सासरे, एक मोठी विधवा नणंद आपल्या मुलासोबत असलेली आणि धाकटे दीरनणंदा, काही आश्रित माणसे असा भलामोठा राबता होता. तिचे सर्वात धाकटे दीर त्यावेळी फक्त दोन वर्षांचे होते. वरकामाला सगळे मदत करत पण मुख्य स्वयंपाक, वारकरी असलेल्या सासर्‍यांचे पूजा-नैवेद्य-जेवण हे सर्व ताईलाच पहावे लागे. त्यावेळच्या पद्धतीप्रमाणे घरात कामाला मदतनीस ही कल्पना तेव्हा मान्य नव्हती. धाकट्या दिरांना तिने आपल्या पोटच्या मुलाप्रमाणेच वाढविले. पुढे कम्युनिस्ट पार्टीचे सचिव झालेले ल. स. कारखानीस म्हणजे ताईचे हे धाकटे दीर, बंडुकाका. आपली आई आठवत नसलेले बंडुकाका ताईलाच आपली आई समजत आणि जगभरात कुठेही असले तरी वर्षातून एकदा तिला भेटायला नक्की येत असत.

लग्नानंतर लगेचच ताईला एक मुलगा झाला परंतु काही छोट्या आजाराचं निमित्त होऊन तो गेला. पुढे माझी आई झाली. आपलं पहिलं मूल हे आपलं विश्वासाचं ठाणं असतं हे या दोघींच्या नात्यातून प्रत्यक्ष दिसत असे. त्या दोघींचं नातं काही वेगळंच होतं.
सुरूवातीच्या दिवसात महिमानगडला असताना अचानक गावात गडबड सुरु झाली. पोलीस पाटीलकी निभावताना दुखावले गेलेले लोक आजोबांच्या जिवावर उठले आणि त्यांना रातोरात गाव सोडावं लागलं. एका बैलगाडीत बसेल एवढं सामान, बायको-मुलं, धान्य देऊन त्यांच्या वडिलांनी त्यांना कराडला रवाना केलं आणि भल्यामोठ्या संपन्न घरातून सुरू झालेला संसार एका छोट्या भाड्याच्या घरात येऊन पोहोचला. छोटं घर म्हणजे एक खोली! पुढे ताईच्या मृत्युपर्यंत म्हणजे जवळ जवळ पन्नास वर्षे तो संसार तिथंच वाढला.

तरीही कधी गेल्या सधनतेची हळहळ, आलेल्या विपन्नतेचा संताप तिच्या वागण्यातून आम्हाला दिसला नाही. यातुन येणार्‍या उदासीनतेचा साधा मागमूसही कधी तिच्या बोलण्यातून जाणवला नाही. आलेली परिस्थिती स्वीकारायची आणि त्यातूनच पुढे जायचं हे तिचं ब्रीद होतं.
कराडमध्ये आल्यावर आजोबांनी अनेक छोट्या-मोठ्या नोकर्‍या केल्या. घरात मुलाबाळांची संख्या वाढली तरी उत्पन्न तेवढेच होते. गावाकडून सासरे येताना काहीबाही घेऊन येत तेवढाच आधार असायचा. माहेरून भाऊ आई येत असत ते काही मदत करत असत पण ते सगळं तुटपुंजं होतं. तिची दानत मात्र या सर्वांवर मात करून होती. तालुक्याचं गाव असल्यानं आजूबाजूच्या खेड्यात राहणार्‍या नातेवाईकांचं हक्काचं ठिकाण म्हणजे ताईचं घर! त्या एका खोलीच्या घरात रोज जास्तीचे दोन-चार नातेवाईक तर सहज असत. कुणाचे कचेरीत काम असे तर कुणाचे कोर्टात, कुणाचे कोण दवाखान्यात अ‍ॅडमिट असे तर कुणाचं मूल शिकायला ठेवायचे असे. आपल्या तुटपुंज्या कमाईत जी भाकरीआमटी होईल ती येणार्‍याला वाढत तिने तिचा चांगुलपणा जपला होता. आधी दुसर्‍याचं चांगलं होऊ दे मग माझं हा दुर्मीळ दृष्टिकोन त्यामागे होता!! मुलं गमतीनं विचारतही असत की ‘ताई!!! मग आपलं कधी चांगलं होणार?’ पुढे मुलं मोठी झाली, कमावू लागल्यावर परिस्थिती सुधारली पण पूर्वीचे दिवस ती कधीही विसरली नाही आणि आपलं साधं जीवन तिनं कधी बदललं नाही.

ताईचा मला जाणवलेला महत्त्वाचा पैलू म्हणजे तिनं आपल्या मुलींना दिलेली साथ. मुली लग्न करुन दिल्या म्हणजे आपली जबाबदारी संपली ही भावना तिनं कधीच बाळगली नाही. आपल्या मुलासोबतच मुलींच्या, नोकरीच्या संसारात, त्यांच्या अडचणीच्या काळात, तिनं नातवंडं व त्यांच्या सर्व अडचणीच्या वेळा सांभाळून, त्यांना समर्थ साथ दिली. मुलींच्या धावपळीच्या आणि कष्टाच्या आयुष्याची तिला चांगली जाणीव होती म्हणुन होता होईल तेवढी जास्तीत जास्त मदत ती आपल्या मुलांना करत असे.

दुसरा महत्त्वाचा आणि काळाच्या पुढे असणारा तिचा गुण म्हणजे ज्याकाळी देवधर्माला, कर्मकांडांना नको तितके महत्त्व होते त्याकाळात आपले नेमधर्म तिनं सर्वांची सोय पाहूनच केले. तिने त्याचे कधीही अवडंबर माजवले नाही. आजोबा गेल्यानंतरही सर्व पूजाअर्चा, नैवेद्य ती स्वत: करत असे. ‘मी विधवा! मी हे कसं करु?’ असं ती कधीच म्हणाली नाही. सोवळंओवळ्याचं अवडंबर न माजवता ती सर्व सण नीट पार पाडत असे. काळाच्या कितीतरी पुढचा हा विचार होता. ती सर्वांना जेवू घालून, डबे देऊन शाळा-कॉलेज-ऑफिसला पाठवून मग शांतपणे आपल्या नेमधर्माकडे वळत असे. भुकेल्याला जेवू घालणे हाच तिचा खरा धर्म होता.

तिचे मोठे बंधु श्रीयुत गजाननराव देशपांडे हे स्व. यशवंतराव चव्हाणांचे अगदी जवळचे मित्र. दोघांनी स्वातंत्र्यलढ्यात सोबत एकत्र काम केले होते. मामा नेहमी त्या दिवसांविषयी सांगत असत. स्वातंत्र्यलढ्यात ताईने आणि तिच्या छोट्या बहिणीने-बाईआजीने- कित्येकवेळा आपल्या नऊवारीच्या ओच्यातून स्वातंत्र्यलढ्यातील महत्त्वाची पत्रे भूमिगत कार्यकर्त्यांना पोहोचविण्याचे काम केलेले होते परंतु नंतर स्व. यशवंतराव चव्हाणांची एवढी मैत्री असूनही मामांनी किंवा ताईने ते मंत्री झाल्यावर त्यांच्याकडून कोणतीही अपेक्षा ठेवली नाही. हे मैत्र स्व. यशवंतराव चव्हाण असेपर्यंत निर्भेळपणे टिकले. त्या दोघांनाही या मैत्रीचा अभिमान होता.

प्रत्येकाशी प्रेमाने, आपुलकीने बोलणारी ताई तिच्या मुला-नातवंडांकरिता मात्र कठोर शिक्षा देणारी होती. तिला शिस्त मोडलेली आवडत नसे. खोटं बोलणे, निंदानालस्ती करणे, कुणाचं काही वाईट झालेलं सांगणे या गोष्टींना तिच्यापाशी थारा नव्हता. स्वत: शिस्तीने वागत तिने त्याचा वस्तुपाठच सर्वांसमोर ठेवला होता. सकाळपासून दुपारपर्यंत ती सतत कामात असे. दुपारी जेवण झाले की एक हात उशाला घेऊन चटईवर पंधरा ते वीस मिनिटांची एक डुलकी ती काढत असे. आम्हाला त्यावेळी तिच्या त्या झोपेची खूप गंमत वाटे पण आताच्या मॅनेजमेंटच्या भाषेतील पॉवर नॅपच्या संकल्पनेत तिच्या त्या डुलकीची बीजे सापडतात. उठल्यानंतर पाणी भरणे, भजनाला जाणे, संध्याकाळचा स्वयंपाक करणे यासाठी तिला त्या पॉवरनॅपचा उपयोग होत असणार कारण परत ती सकाळसारखी एकदम फ्रेश होत असे.

शेवटी जाण्याआधी फक्त चार महिने ती अंथरुणावर होती. तोपर्यंत ती स्वत:चे नऊवारी लुगडे स्वत: धुवत असे आणि घरची कामेही करत असे. काम न करता बसलेली आम्ही तिला पाहिली नाही. आपली मुलं, त्यांची मुलं म्हणजे नातवंड आणि नातवंडांची मुलं म्हणजे पतवंडं तिने न्हाउमाखू घातली. शेजारीपाजारी एखादी तरुण आई असली आणि तिच्या घरचं मोठं कुणी नसलं की ताई तिच्याही बाळांना सांभाळत असे, प्रेमाने न्हाऊ घालत असे.

शेवटी चार महिने अन्न त्यागलेली ताई केवळ दुधपाण्यावर राहीली. आपलं कोणाला काही करावं लागू नये एवढा एकच विचार त्यावेळी तिच्या मनात होता. जाताना ती शरीराने आणि मनाने कापसासारखी हलकी होऊन गेली.
एका संपन्न घरात जन्म होऊन, सधन घरात लग्न होऊन पुढे परिस्थिती बदलली तरी मनाचा तोल ढळू न देता जीवनाचं सोनं कसं करायचं हे ताईकडून शिकावं!
कुठलाही कौतुकाचा शब्द नाही, कुठलाही सोहळा नाही असं असताना आपल्या श्रद्धांच्या जोरावर मनाचं धैर्य टिकवत जगणं आनंददायी कसं करावं हे ताईकडून शिकावं!
स्वत:ला कधीही रिकामं न ठेवता कार्यमग्नतेतून मन:शांति कशी टिकवावी हे ताईकडून शिकावं!
आजच्या उठसूट मन:स्थिती बिघडण्याच्या, सगळी सुखं भरपूर असताना मानसिक अस्वास्थ्य वाटण्याच्या काळात ही अशी व्यक्तिमत्वं म्हणजे दीपस्तंभ असतात. म्हणुनच माझी ताई – स्व. शकुंतला दत्तात्रय कारखानीस – मला नायिका वाटते!
माझी ताई ही एक प्रातिनिधिक उदाहरण आहे. पूर्वी घराघरांमध्ये अशी व्यक्तिमत्वे असत आणि जर जाणीवपूर्वक पाहीलं तर ती व्यक्तिमत्वे आदर्शवत होती. कोणत्याही बिरूदांची अपेक्षा न करता या लोकांनी आपल्या वागण्या-बोलण्या जगण्यानं अनेक घरादारांचं नंदनवन बनविलं होतं!
धकाधकीच्या, मानसिक अस्वास्थ्याच्या काळात त्यांचं नुसतं स्मरणही आपल्याला धैर्य देऊन जाईल हे नक्की!

– संजीवनी घळसासी, पुणे
9284028076

पूर्वप्रसिद्धी – ‘साहित्य चपराक दिवाळी विशेषांक 2021’, पृष्ठ क्र. 254

‘चपराक प्रकाशन’च्या वाचनीय आणि दर्जेदार पुस्तकासाठी आणि ‘चपराक’चे सभासद होण्यासाठी संपर्क – 7057292092

चपराक

पुणे शहरातून ‘साहित्य चपराक’ हे मासिक आणि ‘चपराक प्रकाशन’ ही उत्तमोत्तम पुस्तके प्रकाशित करणारी ग्रंथ प्रकाशन संस्था चालविण्यात येते. ‘साहित्य चपराक’ मासिकाचा अंक दरमहा 10 तारखेला प्रकाशित होतो. आपले साहित्य पाठविण्यासाठी, ‘चपराक’मध्ये जाहिराती देण्यासाठी आणि नवनवीन पुस्तकांच्या माहितीसाठी संपर्क - घनश्याम पाटील, संपादक 'चपराक'.
व्हाट्सऍप क्रमांक - ८७६७९४१८५०
Email - Chaprak Email ID

तुमची प्रतिक्रिया जरूर कळवा

हे ही अवश्य वाचा