‘चपराक’ परिवाराच्या लेखिका आशा दत्ताजी शिंदे (ज्यांना आम्ही ‘आशाई’ म्हणतो) त्यांचा आज ऐंशीवा वाढदिवस. यानिमित्त त्यांच्या भगिनी सौ. ज्ञानदा चिटणीस यांचा हा विशेष लेख. आशाईंना उत्तम आणि निरोगी दीर्घायुरारोग्य लाभावे ही प्रार्थना.
गुणांचे अदभुत रसायन
माझी आशुताई !!
—————————–
क्रीडा साहित्य व्यवसायातील पहिली यशस्वी महाराष्ट्रीयन महिला म्हणून जिचा सर्वत्र गौरव केला जातो, ती पुण्याच्या शिंदे स्पोर्ट्स ची ” आशा शिंदे” म्हणजे आम्हा ५ प्रधान भावंडांच्या पैकी २ नंबरची बहीण,माझी आशूताई!! ताईबद्दल लिहिण्यासाठी हातात लेखणी घेतली खरी,पण तिच्याबद्दल काय आणि किती लिहावे ? हेच समजेना.इतके तिचे कार्य मोठे आहे.
अगदी लहापणापासूनच ताई माझी लाडकी, ती आज पर्यंत!मी खूप ताई वेडी होते आणि आहे.माझ्या लांब केसांच्या २ वेण्या घालण्यासाठी मला फक्त ताईच लागायची.यावरून लहानपणी मला सर्व जण चिडवायचे,की ” ताई च लग्न होऊन ती सासरी गेल्यावर काय करशील?” यावर मी सांगायची की सासरी जाण्यापूर्वी ताईकडून वेण्या घालून,त्यावर डिंक लावीन म्हणजे केस घट्ट बसतील ताई येईपर्यंत ” योगायोग असा की,डिंक लावावाच लागला नाही.दोघींच्या लग्नानंतर आम्ही पुण्यातच आहोत.
मला समज आल्यापासून मी ताईचा संघर्ष पहात आले आहे.लग्नापूर्वी गोड आवाजात गाणारी,संगीत नाटकामध्ये भूमिका करणारी,दिवाळीत लक्ष्मीपूजनाच्या दिवशी तासनतास उन्हात बसून लक्ष्मीची रांगोळी काढणारी ताई आठवते .लग्नानंतर १९७४ साली झालेला भाऊसाहेबांचा – दत्ताजी शिंदे यांचा अपघात,त्यामुळे तिच्या एकटीवर पडलेली संसार,दुकान,पती,मुले यांची सर्व जबाबदारी,त्यासाठी तिने केलेली मेहेनत,अपार कष्ट अशा कितीतरी गोष्टी मी ” याची देही याची डोळा” पाहिलेल्या आहेत.
ताईला हे सर्व करताना बळ येते तरी कुठून? असा प्रश्न मला सतत पडत आलेला आहे.परंतु सकारात्मक दृशिकोन,समाधानी वृत्ती,सहनशीलता, सत्प्रवृत्ती,सचोटी,सहकार्य,सर्व संकटांशी सामना करण्याची तयारी,अशा अनेक गुणांचे रसायन तिच्यात आहे.उगमापासून अनेक खाचखळगे ,दगड काटे इ.अडथळे पार करत डोंगराला वळसा घालून न थांबता नदी सतत पुढे पुढे जाताच असते .ताईचेही तसेच झाले. दत्ताजिंच्या अपघातानंतर ,जेमतेम ११ वी शिकलेल्या,क्रीडा व्यवसायाची काही माहिती नसताना,आजारी पती,२ लहान मुले,त्यांचे शिक्षण,लग्ने सर्व करणाऱ्या ताईला अक्षरशः तारेवरील कसरत करावी लागली पण ती धैर्याने सर्व संकटाना सामोरी गेली.आपल्या अनेक आवडीच्या गोष्टी ,छंद यांना मुरड घालून हृदयाच्या एका कप्प्यात बंद करून ठेवले.स्वतः पेक्षा समोरच्या व्यक्तीला काय हवे याचाच विचार केला.परिस्थितीशी एकटीच झगडत राहिली.सर्वांना सांभाळून घेण्याची सोशिक वृत्ती तिच्याकडे आहे,पण कुठे अन्याय,खोटेपणा दिसला ,तर तो मात्र तिला सहन होत नाही.
सामाजिक कार्याची आवड असलेली माझी लाडकी ताई,२७ जानेवारीला ८० व्या वर्षात पदार्पण करत आहे.एक सजग नागरिक आहे.सार्वजनिक वाहतूक,स्वच्छता अभियान या उपक्रमात सतत कार्यरत.तिचा जनसंपर्क,लोकसंग्रह देखील खूप मोठा आहे.तिच्या कार्याबद्दल अनेक वृत्तपत्रे,मासिके,पुस्तके,रेडिओ,दूरदर्शन याद्वारे मुलाखती,लेख प्रसिद्ध झाले .
तिच्या यशस्वी कारकिर्दीमुळे,लायन्स स्वयंसिद्धा,जिजाऊ सावित्री,स्त्री शक्ती आदी शक्ती,प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व,आदर्श आई,प्रियदर्शनी इंदिरा,लोकमत सखी मंच स्पर्धेतील यशस्विनी,लायन्स स्त्री शक्ती इ.अनेक पुरस्काराने ताईला गौरवले.पण माझी ताई पूर्वी होती तशीच आहे.सतत हसतमुख!! आम्हा सर्व भावंडाना खूप अभिमान वाटतो तिचा.
२०११ साली दत्ताजींचे निधन झाले,दोन्ही मुलगे,सूना,४ नातवंडे,१ पणती परदेशात आहेत.ताई पुण्याला एकटी असली तरी खूप समाधानी,आनंदी आहे.अजूनही रोज डायरी लिहिणे,हार्मोनियम वाजवून गाणी म्हणणे,लेखन वाचन,घरकाम यामध्ये तिने स्वतः ला व्यस्त ठेवले आहे.याचा तिला सध्याच्या कोरोना काळात खूप फायदा झाला.
अशा वेळी कवी अशोक थोरात यांच्या कवितेतील काही ओळी आठवतात
आव्हान !!
छळून घ्या संकटांनो,संधी पुन्हा मिळणार नाही
मार्ग बिकट आला तरी,मागे मी वळणार नाही
वेदना झाल्या तरीही,अश्रू मी गाळणार नाही.
अशा माझ्या सर्वगुण संपन्न,जणू अनेक गुणांचे अदभुत रसायन च असलेल्या आशुताईला निरोगी,आनंदी,दीर्घायुष्य मिळावे हीच तिच्या ८० व्या वाढदिवसाच्या दिवशी प्रभूचरणी विनम्र प्रार्थना आहे.
सौ ज्ञानदा चिटणीस.
मोबाईल ९८८१२०१२९०
‘भरारी – एका आशावादी खेळाडूची’ हे पुस्तक घरपोच मागवण्यासाठी येथे क्लिक करा