भारतीय सुपुत्र: जोगींदर सिंग

बालमित्रांनो!आपल्या देशाच्या आणि आपल्या रक्षणासाठी सीमेवर तळहातावर शीर घेऊन लढणाऱ्या एका महान सुपुत्राची गोष्ट मी तुम्हाला सांगत आहे. कोण होता हा भारतमातेचा शूरवीर शिपाई ज्याने आपल्या प्राणाची आहुती दिली? प्रत्यक्ष रणांगणावर लढताना आणि समोर शत्रू यमदूताच्या रुपाने येत असताना हा वीर आपल्या सहकाऱ्यांना प्रोत्साहन देत होता, “माझ्या बहादूर शिपायांनो, युद्धाचे ढग चालून येत आहेत. शत्रू यमदुताच्या रुपाने आपल्या दिशेने येतो आहे. युद्धाला केव्हाही तोंड फुटू शकते. हिच ती वेळ आहे, आपले देशावरील प्रेम आणि निष्ठा दोन्ही पणाला लावून पराक्रम गाजवण्याची. शत्रुशी लढताना वीरमरण पत्करणे किंवा आत्ताच माघारी जाणे असे दोनच पर्याय आपल्यासमोर आहेत. पळून जाण्यापेक्षा मरण पत्करणे हाच शिपायाचा खरा धर्म. उलट पळून गेलो तर मरेपर्यंत आपण हार पत्करली ही भावना आपल्याला जिवंतपणी मरण देणारी असेल. शिवाय लोक आपल्याला कायम ‘गद्दार’ म्हणून हिणवतील. ज्या कुणाला हा शिक्का नको असेल त्याने मला साथ द्या! म्हणा!जो बोले सो निहाल! सत् श्री अकाल! हे शब्द ऐकणाऱ्या साथीदारांनी आपल्या सुभेदाराला जोरदार साथ दिली. मित्रांनो, तो प्रसंग होता भारत आणि चीन या दोन देशातील युद्ध समयीचा. आपल्या सहकाऱ्यांना धीर देणाऱ्या, त्यांच्यामध्ये पराक्रमाचे स्फूलिंग चेतविणाऱ्या या सुभेदाराचे नाव होते, जोगींदर सिंग!

पंजाब राज्यात मोगा या गावाजवळ निसर्गरम्य परिसरात वसलेले, फरिदकोट जिल्ह्यातील महाकालन हे एक छोटेसे खेडे. या खेड्यात शेर सिंग साहनन नावाची एक व्यक्ती राहात होती. त्यांचा प्रमुख व्यवसाय शेती होता. त्यांच्या पत्नीचे नाव बीबी क्रिश्नन कौर असे होते. या दांपत्याच्या पोटी २८ सप्टेंबर १९२१ पुत्ररत्न जन्मले. कुटुंबात आनंदाचे वातावरण पसरले. ह्या मुलाचे नाव थाटामाटात जोगींदर असे ठेवण्यात आले. परंतु सर्व जण लाडाने त्यास ‘जग्गी’ या नावाने बोलावत असत. जग्गी जसा त्याच्या कुटुंबात सर्वांचा लाडका होता तसाच तो शेजारी राहणाऱ्या लोकांचाही आवडता, लाडका होता. कुटुंबाची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची असल्यामुळे जोगींदरला जास्त शिकता आले नाही. जग्गीचे प्राथमिक शिक्षण नाथू अला या गावी झाले तर माध्यमिक शिक्षण डारोली येथे झाले. शाळेत शिकत असताना जोगींदर सीमेवर लढणाऱ्या सैनिकांकडे आकर्षित झाला. सैनिकांनी बजावलेले पराक्रम तो लक्ष लावून ऐकायचा. सैनिकांची कामगिरी, शौर्य गाथा ऐकून त्याचे रक्त खवळले जायचे. हाताच्या मुठी आवळल्या जात असत. आपणही देशासाठी काहीतरी करावे ही इच्छा उफाळून येत असे. उंचपुरा, ताकदवान असलेल्या जोगींदरने अखेरीस सैन्यात भरती होण्याचा निश्चय केला. सुरुवातीला घरातून विरोध झाला. ते साहजिकच होते. परंतु घरची परिस्थिती पाहून आणि विशेष म्हणजे जोगींदरची आंतरिक इच्छा आणि तळमळ पाहून लाडक्या जग्गीला सैन्यात शरीक होण्याची परवानगी मिळाली. सप्टेंबर १९३६ मध्ये त्याला सैन्यात भरती करून घेण्यात आले. त्याचा समावेश शीख बटालियन या समूहात करण्यात आला. त्यामुळे जग्गाला अतोनात आनंद झाला. इच्छापूर्तीचे समाधान काही वेगळेच असते. लहानपणापासून पाहिलेले स्वप्न साकार झाल्यामुळे जोगींदर सिंग आनंदाने काम करु लागला. सैनिकी प्रशिक्षण घेत असतानाच जोगींदरने स्वतःचे शिक्षणही पूर्ण केले.

१९६२ हे वर्ष उजाडले. भारतीय सीमेवर शेजारच्या चीन देशाने युद्धाची मोठ्या प्रमाणावर तयारी सुरु केली होती.भारतानेही आपले सैन्यदळ जमवायला सुरुवात केली. सुभेदार जोगींदर सिंग यांना ताबडतोब हजर होण्याचे आदेश मिळाले. कुटुंबात एकच हलकल्लोळ माजला. त्याची पत्नी बीबी गुरुदयाल कौल डोळ्यात पाणी आणून जोगींदरला म्हणाली,” सरदारजी, आता हो कसे? तुम्हाला जावेच लागणार का? नाही गेले तर जमणार नाही का? युद्ध सुरू होण्याची स्थिती आहे म्हणतात. तुम्ही गेला नाही तर चालणार नाही का? जिवावर उठणारी अशी नोकरी करायची काही आवश्यकता आहे का?”पत्नीच्या तशा बोलण्याने आणि तिची अवस्था पाहून जोगींदर दुःखी झाले परंतु धरतीमाता त्यांना खुणावत होती. भारतमातेला त्यांची फार आवश्यकता होती. घर संसार की भारतमाता कुणाला निवडावे? कुणाला माझी अधिक आवश्यकता आहे? असे प्रश्न स्वतःला विचारत परंतु न डगमगता, मोठ्या आत्मविश्वासाने आणि धैर्याने दुसऱ्याच क्षणी ते पत्नीला म्हणाले, “मी नाही गेलो तर काही अडणार नाही. तसेच युद्धही टळणार नाही. माझ्या जागेवर कुणाला तरी जावेच लागणार आहे. वाहेगुरूंची आपल्यावर कृपा आहे म्हणूनच तुझ्या नवऱ्याची या कामगिरीसाठी निवड झाली आहे. देशसेवेची ही फार मोठी संधी आहे. ती दवडता येणार नाही.”
यावर पत्नी काही बोलली नाही आणि शेवटी जोगींदर यांच्या मनासारखे झाले. सीमेवर जाण्याची सारी तयारी झाली आणि जोगींदर यांच्या प्रस्थानाचा क्षण आला. तितक्यात जोगींदर यांची छोटी कन्या म्हणाली,”पापा, तुम्हाला तर मी जवळ असल्याशिवाय झोप येत नाही. मग तिथे मी नसताना तुम्हाला झोप कशी येणार? थांबा हं…” असे सांगून ती मुलगी धावत आत गेली आणि दुसऱ्याच क्षणी बाहेर आली. तिच्या हातात एक बाहुली होती. ती बाहुली पापाच्या हातात देऊन ती म्हणाली,”पापा, मला तर तुम्ही सोबत नेत नाहीत मग माझी ही बाहुली तुम्ही सोबत न्या. या बाहुलीला जवळ घेऊन झोपत जा. म्हणजे तुम्हाला माझी आठवण येणार नाही.. …” चिमुकलीचे ते बोल ऐकून स्वतः जोगींदर सिंग आणि तिथे असणारांना गहिवरून आले. पण भावनेपेक्षा कर्तव्याला प्राधान्य देत जड अंतःकरणाने जोगींदरने सर्वांचा निरोप घेतला आणि तो निघाला, भारत मातेच्या संरक्षणासाठी.

तिकडे भारत-चीन या सरहद्दीवर चीन पूर्ण तयारीनिशी सज्ज होता. सर्वच बाबतीत चीन भारतापेक्षा सुसज्ज स्थितीत होता. एकीकडे भारतासोबत दोस्तीचा हात पुढे करीत असताना दुसरीकडे दगा देण्याच्या विचारात होता. चीनचा मूळ हेतू असा होता की, टोवांग या प्रदेशावर कब्जा मिळवायचा त्यासाठी त्यांच्या सैनिकांना नेफाजवळ असलेल्या टोंगपेन- ला हा डोंगराळ प्रदेश ओलांडून जावे लागणार होते. या डोंगरकड्याचे रक्षण करण्यासाठी सुभेदार जोगींदर यांच्या नेतृत्वाखाली एक तुकडी तैनात करण्यात आली होती. त्या तुकडीतील सैनिकांची संख्याही अतिशय कमी होती. युद्ध सामग्रीही फारशी अत्याधुनिक नव्हती. अपुरीही होती. शिवाय कडाक्याच्या थंडीपासून बचाव करण्यासाठी पुरेसे उबदार कपडेही नव्हते. अशा परिस्थितीत चीनसारख्या बलाढ्य, ताकदवर, अत्याधुनिक शस्त्रास्त्रसाठा असलेल्या सैन्याशी लढणे म्हणजे एक प्रकारचे दिव्यच होते. परंतु तुकडीचा नायक सुभेदार जोगींदर सिंग होता. तो अतिशय धाडसी, पराक्रमी, मुत्सद्दी होता. १९४७ ला पाकिस्तान सोबत झालेल्या युद्धाचा त्याला चांगला अनुभव होता. तो आपल्या सहकाऱ्यांना वारंवार प्रोत्साहन देऊन त्यांच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण करीत होता. ‘शूरातला शूर’ असा जोगींदर यांचा उल्लेख त्याचे सहकारी अत्यंत आदराने करीत असत.

अखेर तो दिवस उजाडला. २३ ऑक्टोबर १९६२ ची पहाट. सकाळचे साडेपाच वाजत असताना चिनी सैन्य आणि त्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवून असणारा एक सैनिक पळतच जोगींदर यांच्याकडे येऊन म्हणाला, “सुभेदारजी, लक्षण काही ठीक दिसत नाही. समोरून शत्रू आपल्या दिशेने येतो आहे.” ते ऐकून जोगींदरने आपले सैनिक गोळा केले आणि म्हणाले,”बहाद्दूर सहकाऱ्यांनो, बहुतेक युद्धाची वेळ आली आहे. आपण सारे सैनिक ज्या क्षणाची वाट पाहात असतो, मैदानावर तो पराक्रम गाजविण्याची वेळ समोर आली आहे. आपण संख्येने कमी असलो तरी घाबरायचे नाही. भारतमातेची सेवा करण्याची संधी सर्वांंना आणि वारंवार मिळत नाही. शेवटची गोळी आणि शेवटचा श्वास असेपर्यंत लढायचे आहे. बोला तयार आहात काय?” “भारत मातेसाठी बलिदान द्यायला आम्ही तयार आहोत.”

जोगींदरच्या प्रेरक शब्दांनी आत्मविश्वास दुणावलेले सैनिक मोठ्या धैर्याने म्हणाले आणि लगोलग प्रत्येकाने आपापल्या जागा घेतल्या. समोरून दोनशे चिनी सैनिकांची तुकडी चालून येत असल्याचे पाहून प्रत्येक जण संतापाने, त्वेषाने पेटून उठला. ‘जो बोले सो निहाल, सत् श्री अकाल’ या घोषणा त्या डोंगर कपारीत निनादू लागल्या. पाठोपाठ भारतीय वीरांनी केलेल्या बंदुकीच्या गोळ्यांसमोर चिनी तुकडीचा टिकाव लागत नव्हता. शिकाऱ्याने आपले सावज टिपावे त्याप्रमाणे भारतीय शूरवीर शत्रूला टिपत होते.शत्रू कोसळत असल्याचे पाहून भारतीय वीरांचे हौसले बुलंद होत होते. ते अजून त्वेषाने तुटून पडत होते. अखेरीस शत्रूच्या पहिल्या तुकडीचा पराभव झाला. शेकडो शत्रू सैनिक मृत्युमुखी पडले. भारतीय जवानांचा प्रचंड विजय झाला. भारतीय वीर घोषणा देत नाचत असताना जोगींदर त्यांना सावध करताना म्हणाला,
“शाब्बास! शूरवीरांनो शाब्बास! फार मोठी कामगिरी आपण बजावली आहे. पण गाफील राहून चालणार नाही. शत्रू पुन्हा चवताळून चाल करून येऊ शकतो.”

सुभेदार जोगींदर सिंग यांचे अनुभवाचे बोल खरे ठरले. पहिल्या चकमकीत अपयश पदरी पडलेला शत्रू चिडला, संतापला. पुन्हा त्वेषाने चीनी सैन्याची दुसरी फळी भारतीय जवानांच्या दिशेने निघालेली पाहून भारतीय वीरही चवताळले. त्यांनी त्याच त्वेषाने, आक्रमकपणे प्रतिहल्ला चढवला. पुन्हा एकदा चीन सैनिकांची तुकडी पराभूत झाली. परंतु दुर्दैवाने अनेक भारतीय वीरही शहीद झाले. स्वतः जोगींदर सिंग यांच्या मांडीमध्ये एक गोळी घुसली. ते जखमी झाल्याचे पाहून त्यांच्या साथीदारांनी त्यांना औषधोपचार घेण्यासाठी माघारी जाण्याचा दिलेला सल्ला धुडकावून जोगींदर आपल्या सैनिकांना म्हणाले, “नाही. मी मैदान सोडणार नाही. प्राण गेले तरी बेहत्तर पण मी तुमची साथ सोडणार नाही.” असे म्हणत ते सैनिकांसोबत मैदानावर थांबले. ते पाहून त्यांच्या साथीदारांमध्ये कमालीचा जोश निर्माण झाला. ज्यावेळी शत्रूची तिसरी तुकडी चालून येत होती. त्यावेळी बोटावर मोजण्याएवढे भारतीय सैनिक शिल्लक होते. दुर्दैवाची गोष्ट अशी की, भारतीय सैनिकांजवळचा गोळ्यांचा साठाही संपत आला होता. काय करावे असा फार मोठा प्रश्न निर्माण झाला. जोगींदर आपल्या शूरवीर सहकाऱ्यांना म्हणाले, “मित्रांनो,गोळ्या संपल्या आहेत. आपल्याला मदत नक्कीच मिळेल पण ती येईपर्यंत शत्रू थोडीच थांंबणार आहे? आता एकच शेवटचा उपाय तो म्हणजे शत्रूच्या तुकडीवर तुटून पडायचे आणि बंदुकीच्या संगिनीने शत्रूला कंठस्नान घालायचे. चला, समोरासमोर जाऊन लढूया. बोला,बोले सो निहाल! सत् श्री अकाल!” अशी साथ देत ते सहा-सात वीर समोरून येणाऱ्या शेकडो शत्रूंच्या तुकडीत घुसले. हातातल्या संगिनीने शत्रूवर जोरदार हल्ला करते झाले. काय होतेय हे शत्रूला समजण्यापूर्वी त्यांचे अनेक सैनिक मैदानावर कोसळले. असे काही होईल, भारतीय सैनिक अशाप्रकारे हल्ला करतील असे त्यांना स्वप्नातही वाटत नव्हते. भारतीय वीर हातातल्या संगिनी शत्रूवर चाललत होते. स्वतः जोगींदरच्या संगिनीने अनेक बळी घेतले. भारतीय वीरांच्या त्या अद्भुत आणि अकल्पित धाडसाने शत्रू अचंबित झाला. परंतु शेवटी भारतीय शूरवीरांचा टिकाव लागला नाही आणि ते भारत मातेच्या कुशीत शिरले.

दुसऱ्या दिवशी सकाळी चीनी सैनिक पुन्हा मैदानावर आले. कुठन तरी कण्हण्याचा आवाज येत होता. चीनी सैनिकांनी शोध घेतला असता एका भारतीय वीराच्या शरीरात जीव असल्याचे त्यांना जाणवले. तळमळणारा तो शूरवीर होता जोगींदर सिंग. याचा अर्थ जोगींदर संपूर्ण रात्र जखमी झालेल्या अवस्थेत रणांगणावर रात्रभर विव्हळत होता. त्या शूरवीराला चीनी सैनिकांनी अटक केली. परंतु दुर्दैवाने जोगींदर सिंग यांचा मृत्यू झाला. त्याहीपेक्षा दुर्दैवाची आणि चीनच्या राक्षसी वर्तनाची गोष्ट अशी की, जोगींदर यांचे पार्थिवही चीन सरकारने भारताकडे सोपवले नाही. जोगींदर यांच्या बलिदानाची आणि शहीद झाल्याची बातमी समजताच त्यांच्या कुटुंबासह, गावावरही शोककळा पसरली. कुटुंबाला फार मोठा धक्का बसला आणि दुःखाने व्याकूळ झालेल्या जोगींदर यांच्या मोठ्या मुलीचा मृत्यू झाला.

या युद्धातील अतुलनीय पराक्रमाबद्दल निधड्या छातीच्या जोगींदर सिंग यांना भारत सरकारने १९६२ चे परमवीर चक्र मरणोत्तर बहाल केले. त्यावेळी चीनला जाग आली आणि या भारतीय वीराच्या अस्थी सैनिकी इतमामात, संपूर्ण आदराने भारतीय लष्कराकडे सोपवण्यात आल्या.जोगींदर सिंग यांचा आम्हा भारतीयांना अभिमान आहे. या युद्धात पराक्रम गाजवणाऱ्या, शहीद होणाऱ्या वीर जवानांसाठी कवी प्रदीप यांनी लिहिलेल्या, लता मंगेशकर यांच्या आवाजात अजरामर झालेल्या गीतातील काही ओळी

थी खून से लथपथ काया
फिर भी बन्दूक उठाके
दस-दस को एक ने मारा
फिर गिर गये होश गँवा के
जब अंत समय आया तो
कह गये के ‘अब मरते है’
खुश रहना देश के प्यारों
अब हम तो सफर करते है

वीर जवानांना कोटी कोटी प्रणाम।… जय हिंद।

नागेश सू. शेवाळकर.
९४२३१३९०७१

चपराक

पुणे शहरातून ‘साहित्य चपराक’ हे मासिक आणि ‘चपराक प्रकाशन’ ही उत्तमोत्तम पुस्तके प्रकाशित करणारी ग्रंथ प्रकाशन संस्था चालविण्यात येते. ‘साहित्य चपराक’ मासिकाचा अंक दरमहा 10 तारखेला प्रकाशित होतो. आपले साहित्य पाठविण्यासाठी, ‘चपराक’मध्ये जाहिराती देण्यासाठी आणि नवनवीन पुस्तकांच्या माहितीसाठी संपर्क - घनश्याम पाटील, संपादक 'चपराक'.
व्हाट्सऍप क्रमांक - ८७६७९४१८५०
Email - Chaprak Email ID

2 Thoughts to “भारतीय सुपुत्र: जोगींदर सिंग”

  1. Nagesh S Shewalkar

    धन्यवाद, घनश्यामजी!

  2. जयंत कुलकर्णी

    शेवाळकर सर .. लेख आवडला.. अतिशय प्रेरणादायी अशी जोगिंदर सिंग यांची शौर्यगाथा आम्हा वाचकांना समजली. भारत मातेसाठी शिर तळहातावर घेवून लढणाऱ्या भारतीय सैनिकांना विनम्र अभिवादन! जय हिंद!!

तुमची प्रतिक्रिया जरूर कळवा

हे ही अवश्य वाचा