नोव्हेंबर 2021… अगदी दोनच महिन्यांपूर्वीची गोष्ट… पुण्यातील पत्रकार कॉलनीतल्या अवचटांच्या घराच्या पायर्या मी चढत होतो.‘शिक्षणविवेक’च्या डिसेंबरच्या अंकासाठी ‘संवेदनशीलता’ या विषयावर त्यांची मुलाखत घ्यायची होती. प्रचंड कुतूहल आणि काहीशा भीतीनेच घराची बेल वाजवली. कामवाल्याताईंनी दार उघडलं आणि “मी मुलाखत घ्यायला आलोय”, असं म्हणताच आतून “या या, चहा ठेव गं आम्हाला!” असा आवाज आला. मी आत गेलो आणि नंतर सुमारे तासभर फक्त ऐकत होतो. मध्येमध्ये प्रश्न विचारत होतो. अनिल अवचट नावाची व्यक्ती नाही तर, एक समाजमन आणि समाजभानसुद्धा खूप पोटतिडकीने बोलतंय, असं वाटत होतं.
“संवेदनशीलतेची व्याख्या करण्याची गरज मला वाटत नाही, तो अनुभवण्याचा विषय आहे, समाजधारणेसाठी विविध प्रकारचा धाक असायलाच हवा, सभ्यता काटेकोरपणे पाळलीच पाहिजे, तुम्ही तुमच्या मुलांशी जसं वागता, तसं तुमची मुले तुमच्याशी वागतील” अशी अनेक परखड मते देत असतानाच ते मधूनच दोनदा म्हणाले… “तुमचा कुर्ता खूप छान आहे हो. रंग झकास आहे. कुठून घेतला.’ मुलाखत संपताना पुन्हा त्याच निरागसतेने हा माणूस म्हणतो, ‘सेल्फी काढूच; पण फोटोही काढू. फोटोत आपण दोघे छान येऊ न?” एकाच वेळी अभ्यासू प्रतिपादन आणि त्याच वेळी तितकंच हळवं, संवेदनशील मन… असं काहीसं अद्भूत रसायन मी अनुभवत होतो.
आयुष्याची ‘सेटलमेंट’ वगैरे अशा स्थिरतेच्या, आरामाच्या गोष्टींमागे न जाता स्वतःच्या आवडीसाठी आणि समाजासाठी अवचटांनी स्वतःला झोकून दिलं. ‘रिपोर्टिंगचे दिवस’पासून ‘कोंडमारा’पर्यंत आणि ‘पूर्णिया’पासून ते ‘छंदांविषयी’पर्यंत किती तरी गोष्टी त्यांनी लिहिल्या. त्या केवळ वाचलेल्या, ऐकलेल्या किंवा संदर्भ म्हणून शोधलेल्या नव्हत्या, तर त्या त्यांनी अनुभवलेल्या होत्या. ‘रिपोर्ताज’लेखनाला समानार्थी शब्द म्हणून अनिल अवचट नाव घेतलं जातं, ते याचसाठी. लेखक म्हणून नाव, प्रसिद्धी मिळत असताना केवळ त्यातच गुंतून राहणं सहजसाध्य होतं. मात्र, एका वळणावर पत्नीची कल्पना उचलून धरत त्यांनी व्यसनमुक्तीकेंद्राची स्थापना केली आणि हजारो उद्ध्वस्त कुटुंबांना आधार देणारं ‘मुक्तांगण’ उभं राहिलं. ‘पूर्वी बाबा घरी यायचे म्हटले की, ते आता आईला मारतील, आम्हांला रागवतील अशा भीतीने त्यांनी घरी येऊच नये, असं वाटायचं. मात्र, आता आम्हांला आमचे बाबा आवडतात. आम्ही त्यांची वाट बघतो…’, अशी ‘मुक्तांगण’मधल्या एका व्यसनमुक्त व्यक्तीच्या लहान मुलीने दिलेली प्रतिक्रिया आपल्याला त्या संस्थेचं मोठेपण, कार्य दाखवते.
अनिल अवचटांची अमूक अमूक चार पुस्तके वाचा… हे सांगण्याची ही वेळ नाही. त्यांचे हे लेख बघा… याची आठवण देण्याची ही घडी नाही. त्यांच्या अमूक नोंदी बघा… हे पडताळण्याचंदेखील हे औचित्य नाही. ही वेळ आहे त्या व्यक्तीने घेतलेला वसा, दिलेला विचार आपआपल्या परीने पुढे नेण्याची. अवचटांच्या निधनानंतर व्यक्त होणार्या प्रत्येक माणसाला त्यांचा उदंड सहवास लाभलाच होता, असं अजिबात नाही. अनेकांच्या पुस्तक प्रकाशनाला ते आले होते, अनेकांच्या संस्थेत, शाळा, महाविद्यालयात प्रमुख पाहुणे होते, काहींनी त्यांना फक्त खाली बसून ऐकलं होतं, तर काहींना ‘बाबा’ने कार्यक्रमात केलेले कागदाची पक्षी मिळाले होते… तरीही या प्रत्येक माणसाला मनापासून ‘व्यक्त’ व्हावसं वाटतंय आणि तो त्याला जमेल त्या पद्धतीने व्यक्त होतोय, यातच काय ते आलं.
चांगल्या माणसाच्या जाण्याने… हे वाक्य सहजासहजी पूर्ण करता येत नाही आणि अशी अवस्था सहजासहजी येतही नाही. ज्येष्ठ साहित्यिक, पत्रकार, सामाजिक कायकर्ते, ‘मुक्तांगण’चे संस्थापक आणि अनिल अवचट यांच्या जाण्याने आज अनेकांची अगदी अशीच अवस्था झाली. ‘येणार्या पिढ्यांनी मला डॉक्टर, लेखक वगैरे म्हणून लक्षात न ठेवता चांगला माणूस म्हणून लक्षात ठेवावं’, असं म्हणणारा अनेकांचा बाबा… डॉक्टरकीचं शिक्षण घेऊनही ऐशोरामात न जगता समाजासाठी बाहेर पडणारा कार्यकर्ता… लेखन असो, ओरिगामी असो, काष्ठकला असो किंवा बासरीवादन, दर वेळी जे जे म्हणून टिपणं शक्य आहे ते तसंच्या तसं टिपून किंवा जे जे आतून नैसर्गिकपणे बाहेर येतं आहे ते तसं ठेवून, त्यावर कोणताही कृत्रिम मुलामा न देता ते समाजाला परत देणारा संवेदनशील कलाकार… ‘मुक्तांगण’ व्यसनमुक्ती केंद्राचे संस्थापक… लहान मुलांशी गप्पा मारणारा, तरुणांना प्रश्न विचारून चाचपडणारा त्यांचा मित्र, लेखकांना लिहितं करणारा ‘लेखक’ आणि प्रत्येक माणसाला अगदी सहजपणाने भेटणारा ‘चांगला माणूस’ गेला. त्यामुळे आता ‘चांगल्या माणसाच्या जाण्याने….’ हे वाक्य पूर्ण करता न येणं हीच या ‘चांगल्या माणसाची’ उदंड कमाई आणि येणाऱ्या अनंत पिढ्यांसाठीची कायमची ठेव!
– मयूर भावे
मो. 9552416459
पूर्वप्रसिद्धी – दै. पुण्यनगरी (२८ जानेवारी २०२२)
सुंदर लेख.