तुझ्याविना

इतकं पूर्णपणे नवर्‍याला स्वातंत्र्य देऊन त्याच्या आनंदातच आपला आनंद मानणार्‍या समर्पित तुला मी कसा विसरेन? तूच म्हणाली होतीस, दवाखान्यात घर सोडून-शेवटचं घेऊजाताना… की, ‘‘मी या घरात परतण्याची शक्यता कमी पण मी गेल्यावर रडगाणं नको. मुलं अजून लहान वयात आहेत. त्यांच्यासाठी तरी…’’
काय बोलणार?

‘तुझ्याविना’ घरातलं सारं यथासांग पार पडलंय. तुझी आठवण काढत! पण डोळ्यात पाणी येऊ न देता! आता सारा, रिया, नील ही नातवंडं खिदळतात तेव्हा मात्र सतत वाटतं, की तू त्यांना भेटायला हवी होतीस. केतनबरोबर मुग्धा (सूनबाई) आणि मुग्धाबरोबर कपिल (जावई) हेही आठवण काढत असतात.

सूत्रसंचालन हा पूर्णवेळेचा व्यवसाय होईल, असं चाळीस वर्षांपूर्वी तुम्हाला सुचलंच कसं? सदाशिव पेठेतल्या मध्यमवर्गीय घरातल्या तुम्ही नोकरी सोडून देण्याचं धैर्य केलंच कसं?
नोकरी सोडण्याचा आततायीपणा केल्यावर निवडलेल्या क्षेत्रातही सुरूवातीला काम मिळालं नाही, की तुम्ही कुटुंबाचा मासिक खर्च भागवायचात कसे? ओढाताण झाली नाही? त्यावरून कुटुंबात वादविवाद घडले नाहीत? त्याचा परिणाम तुम्ही आणि तुमच्या बायकोच्या संबंधांवर झाला नाही?
अशा शंका गेली कित्येक वर्षे मला सतत विचारल्या जातात. मी शांतपणे उत्तरतो, की ‘‘मला नोकरी सोडून हा बेभरवशी व्यवसाय निवडण्याचा एकदाही कनमात्र पश्चाताप झाला नाही.’’हे उत्तर मी कशामुळे देऊ शकतो? माहित्येय शैला?
तर कारण फक्त तू! अनघा उर्फ शैला गाडगीळ!
तू!‘तुझ्याविना’ हा आगळा प्रवास इतक्या सहजपणे घडालाच नसता. तुला आठवतं? सकाळी प्रादेशिक बातम्यांसाठी पहाटेच घराबाहेर. दिवसा नोकरी. संध्याकाळी एखादा सांस्कृतिक कार्यक्रम. या धबडग्यात ‘नोकरी’तली जबाबदारी नीट सांभाळत नसल्याच्या तक्रारी सुरू झाल्या होत्या. मी नोकरीतली लेखनाची जबाबदारी नीट पार पाडत नव्हतो, अशातला भाग नव्हता; पण मला या जोडउद्योगातून मिळणारे जादा पैसे ‘क्लार्क’ प्रवृत्तीच्या काही सहकार्‍यांना खुपत होते. नोकरी सोडायचं मनानं केव्हाच ठरवलं होतं.
प्रत्यक्षात 30 मार्च 1980 ला राजीनामा देऊन घरी आलो. तू तुझ्या ऑफिसातून थकून घरी आली होतीस आणि मी थेट तुला येता क्षणी सांगितलं, ‘‘मी आज राजीनामा देऊन आलोय. पुन्हा नोकरी कदापिही करण्याची शक्यता नाही.’’
यावर एखादी बायको बिथरली असती. ती ‘‘मी आत्ताच ऑफिसातून येतेय नां? आल्याआल्या काय अभद्रपणाची बडबड?’’ असं कावली असती किंवा हताश होऊन घराच्या कोपर्‍यात चेहरा वाकडा करून किंवा रडून बसली असती.
…पण ‘तू’ तू! क्षणाचाही विलंब न लावता काय म्हणालीस?
‘‘तुमचा नोकरीत अडकण्याचा पिंडच नाहीये. माझ्या गेल्या काही दिवसांत लक्षात आलंय. द्या सोडून! काही काळजी करू नका. जर पैसे कमी पडले, चणचण वाटली, तर आपण आपल्या गरजा कमी करू!’’ असं म्हणून तू थेट एकत्र कुटुंबातली तुझी संध्याकाळची स्वयंपाकाची जबाबदारी पार पाडण्याकरता वळलीस. जेवणाच्या टेबलवरच्या हास्यविनोदात सामील झालीस. कुणाला जाणवूही दिलं नाहीस, की मी काहीतरी त्या काळातला धक्कादायक निर्णय घेतलाय. रात्री दोघांत या विषयाची चर्चाही नको, म्हणून म्हणालीस, ‘‘मस्तानी प्यायला जाऊया!’’

‘गरजा कमी करू’ असं कोणती ‘स्त्री’ इतक्या सहज म्हणेल? माझ्या कर्तृत्वाबद्दलचा आत्मविश्वास असल्याशिवाय, तू इतक्या शांतपणे निर्णय स्वीकारला असतास?
त्यामुळे जेव्हा कोणी माझ्या, ‘निवेदन-सूत्रसंचालन’ ही करिअर करण्याबाबत भरभरून ‘दाद’ देतं, तेव्हा फक्त तूच आठवतेस. ‘तुझ्याविना’ हे शक्य नव्हतं.
तू पहिल्या महिला क्रिकेट टीममध्ये खेळत होतीस. बास्केटबॉलमध्येही राष्ट्रीय स्तरावर स्थान मिळवलं होतंस; पण एकदा माझ्यासह, माझी कुटुंबव्यवस्थाही मान्य केलीस आणि नोकरी सांभाळून, सारे नातेसंबंध, सारे रीतिरिवाज, सार्‍या कौटुंबिक जबाबदार्‍या स्वीकारल्यास आणि तू अगदी सहजपणे सार्‍या खेळ प्रकारांपासून अलिप्त झालीस. कुणा महिला खेळाडूच्या सन्मानाच्या कार्यक्रमात जेव्हा मी व्यासपीठावर असतो किंवा अप्पाची खिचडी खायला जिमखाना मैदानावरून पुढे सरकतो तेव्हा फक्त ‘तूच’ आठवतेस. ‘मैदान’ ही तुला आवडणारी गोष्ट केवळ माझ्यामुळे हुकली हे मनात येऊन मन व्यथित होतं. साध्या-साध्या संधी हुकल्यावर चिडचिड करणार्‍या मुली पाहिल्यावर, तुझा ‘शांतपणा-स्वेच्छानिवृत्ती’चा भाव आठवतो. अशावेळी ‘तुझ्याविना’ कोण आठवणार?

लग्नानंतर नवरा-बायकोनं फिरायला जाणं, किमान एखादं नाटक, सिनेमा एकत्र पाहणं, ही स्वाभाविक गोष्ट आहे पण माझा पत्रकारिता-सूत्रसंचालनाचा व्यवसाय म्हणजे नियमितपणे अनियमितपणा. बर्‍याचदा आपण परस्सरांत ठरवलेली एखादी गोष्ट कामाच्या ओघात सहजपणे विसरणं, एवढंच नव्हे तर कधीतरी अपरात्री घरी आल्यावरही माझ्या लक्षात न येणं आणि तूही लक्षात न आणून देता, माझ्या आवडीच्या पदार्थांचा डबा फ्रिजमधून काढून देणं हे सगळं कसं विसरेन? एखाद्या ठरलेल्या बाहेरच्या जेवणाची वेळ जरी माझ्या एखाद्या मित्राची चुकली तरी सार्वजनिक ठिकाणी सर्व मित्रांसमोर आरडाओरडा करणार्‍या मित्रांच्या बायका मी पाहिल्यात. त्या पार्श्वभूमीवर तू इतकी शांत-सोशिक कशी? सतत वाटायचं, हिच्या मनात खळबळ चालू नसेल ना? पण तिचा स्फोट कधी एकत्र कुटुंबातल्या अन्य कुणापुढेही किंवा कुणावरही झाला नाही. मीच साशंक होऊन विचारायचो, ‘‘मला घाबरून तर गप्प बसत नाहीस ना?’’ तू त्यावर फक्त एवढंच म्हणायचीस की, ‘‘मी तत्त्वज्ञानाची विद्यार्थीनी आहे. माहितेय ना?’’

तू कुठल्याही देवाला जात नव्हतीस. नवस-उपास तापास करत नव्हतीस. फक्त घरातल्यांच्या धार्मिक भावनांचा आदर म्हणून एकदा संकष्टी केलीस. त्या दिवशी ‘‘थेऊरला जाऊया का?’’ म्हणाली होतीस. ‘स्वामी’कारांच्या गणरायाचं दर्शन मात्र राहून गेलं.
तुझा हा शांत-संयमी-समतोलपणा मी कसा विसरेन? तुला फक्त ‘राग’ एकाच गोष्टीचा यायचा – मुलांकडे दुर्लक्ष होतंय म्हणून! तू म्हणायचीस की, ‘‘त्यांचा अभ्यास घेऊ नका. तो मी घेतेच पण निदान पोरं कितवीत आहेत तेवढं तरी लक्षात असू द्या.’’
आणि खरंच तू त्यांच्या अभ्यासात पूर्ण लक्ष घालायचीस. त्यांच्या परीक्षा काळात उत्तररात्रीपर्यंत जागायचीस. हे सारं करता करता, माझ्याबद्दल पोरांच्या मनात दुरावा निर्माण होणार नाही, याची काळजी घ्यायचीस. त्यामुळे मुलाच्या-केतनच्या-एखाद्या ‘इंटीरिअर डिझायनिंग’चं कुणी कौतुक केलं किंवा मुलगी मुग्धानं एखादी आव्हानात्मक केस लढवल्याचं मला माझ्या वडिलांकडून (ते वयाच्या 91व्या वर्षांपर्यंत होते.) कळायचं. ‘तुझ्याविना’ ही करिअरची शिस्तबद्धता त्यांच्यात कुणी बांधवली असती? असंच मनात येतं.

स्वतः मिळवती असताना साडी तर सोडाच कुठलीही छोटी गोष्ट घेताना माझ्या कानावर घालण्याची दक्षता घ्यायचीस. ‘साडी’ तर तू स्वतः जाऊन कधीच आणली नाहीस. ‘कलकत्ता कॉटन’चे मलाच आवडणारे नाना प्रकार मीच आणायचो आणि ‘कलकत्ता साडी’ तुझी आवड बनली. तुला कोणता पॅटर्न आवडतो, हे विचारायचंही मी विसरून गेलो. कुठल्याही दुकानात कॉटन कलकत्ता साडी टांगलेली दिसली की ‘तुझ्याविना’ कोण आठवणार?

मी महाराष्ट्रातली जवळजवळ सर्व गावं, भारतातली प्रमुख शहरं पाहिली. त्या ‘गावांवर’ तिथल्या वैशिष्ट्यांसह गावांची व्यक्तिचित्रं माझ्या ‘मुक्काम’ या पुस्तकात लिहिली पण त्यापैकी एकाही ठिकाणी तू बरोबर नव्हतीस. परस्परांच्या कामाच्या व्यापात, त्या-त्या गावांना जायचं, तिथली ‘मुलखावेगळी माणसं’ तुला भेटवण्याचं राहून गेलं. आज तू असतीस तर तुझ्या नोकरीतून निवृत्त झालेली असतीस! आपल्या कौटुंबिक जबाबदार्‍याही संपल्या होत्या. त्यामुळे माझ्या परदेशवारीत तू आता सहभागी झाली असतीस. तुझे देश पहायचे राहूनच गेले. निदान अमेरिकेतला ‘नायगरा’, जपानमधला ‘हिरोशिमा’, न्यूयॉर्कचं ‘नाटक’, सिडनीचा ‘ऑपेरा’, स्वित्झर्लंडचा ‘बर्फाळ डोंगर’, मॉरिशसचा ‘हिरवा समुद्र’, हाँगकाँगचा ‘एकशे ऐंशी कोना’तला उभा रस्ता, दुबईच्या राजाचा ‘पॅलेस’ हे सर्व पहायला तू माझ्याबरोबर नव्हतीस. आता निवांत सारं पाहता आलं असतं.

व्यवसायच असा, क्षेत्रच असं की मला आठवणीनं भेटणार्‍या मैत्रिणी खूप. त्या मैत्रिणी आणि माझ्यामधले संवाद-गप्पा मी कधीतरी ओझरत्या सांगायचो पण तू माझ्याकडे भलत्याच चौकशा केल्या नाहीस. शंका-कुशंकांचं काहुर माजवलं नाहीस. क्वचित म्हणायचीस, ‘‘मैत्रिणींइतकी भटकंती नाही पण निदान पोरांना गाडीतून एखादी चक्कर आणूया का?’’

‘मैत्रीण’ प्रकारावरून मुलांच्या मनात संदेह निर्माण होणार नाही याची काळजी घ्यायचीस. ‘‘तुम्ही जाऊन जाऊन कुठे जाणार? माझ्याइतकं पूर्णत्वानं, निखळपणे कुणी तुम्हाला स्वीकारणार आहे का? तुम्हा कलावंतांच्या, प्रत्येकाच्या बायका हे ओळखून असतात. म्हणून तुम्ही व्यासपीठावर मुक्तमनानं झोकून, समरस होऊन आपली कला दाखवू शकता. तेव्हा ‘पाठी’कुणाचं बळ तेवढं लक्षात असू द्या म्हणजे झालं.’’ एवढंच कधीतरी ‘बौद्धिक’ घ्यायचीस. या सरळ वक्तव्याला ‘बौद्धिक’ म्हणत चेष्टा केली की क्वचित उद्गारायचीस, ‘‘हसा, चेष्टा करा पण मी गेल्यावरच हे ‘पाठीमागे पूर्णत्वानं’ उभं राहण्याचं बळ कळेल तुम्हाला!’’

‘‘जाण्याच्या कसल्या गोष्टी करतेस?’’ असं विचारल्यावर म्हणायचीस, ‘‘…माझे बाबा अकाली गेले. माझ्यात सगळं त्यांच्यातलं उतरलंय.’’ आणि ‘तुझ्याविना’ ही कल्पनाही न करण्याइतकी तुझी सवय असलेल्या मला अचानक सोडून गेलीस. ‘अचानक’ तरी कसं म्हणणार? किडनी फेल्युअरची बातमी अचानक होती पण नंतर ती मृत्युची चाहुल, त्या वेदना, त्या तपासण्या, ते डायलेसीस, सारं सारं शांतपणे स्वीकारलंस.

उलट मला धीर देत सांगितलंस, ‘‘डायलेसीसच्या दिवशी हॉस्पिटलमधून घरी घेऊन न जाता मला विद्यापीठात सोडा. तेवढंच काम होईल. मनातून आजाराचा विषय काही काळ हद्दपार होईल. फक्त विद्यापीठात न्यायला तेवढं या.’’
तक्रारीचा सूर तुला आठवतच नव्हता. आईची औषधं, माझ्या वडिलांची ‘साठी’ असले घरातले सोहळे करण्याची ‘आठवण’ मात्र तुला तुझं आजारपण सांभाळता सांभाळता होती. कुणाही नातेवाईकाकडे तू तुझ्या तब्येतीचं रडगाणं गायलं नव्हतंस. उलट मुलांना एका क्षणी तू स्वच्छपणे सांगितलंस, ‘‘मी फार दिवसांची सोबती नाही. मी गेल्यावर तुम्हीही रडगाणं गाऊ नका. माझ्या फोटोला हार घालू नका. उदबत्ती लावू नका. मी तुमच्यातच आहे.’’

आणि तू आहेसच. दर्शनी भागात तुझा हसतमुख फोटो आहे. जाता-येता तुझं आमच्याकडे लक्ष आहेच. खरंतर ‘तुझ्याविना’ घर नाहीचंय.
पण तरीही काही गोष्टी आठवत राहतात. माझ्या नकळत तू तुझ्या पगाराचे पैसे बँकेत बचत करत गेलीस. दर गुरूपुष्याला सोनं घेत गेलीस. त्यामुळे ‘तुझ्याविना’ मुलांची लग्नं होत असताना, सोनं खरेदीचं ओझं वाटलंच नाही. या दरम्यान ‘तुझ्यामुळे’च, तुझ्या खरोखरच निरपेक्ष सहकार्यामुळे मी माझ्या व्यवसायात उत्कर्षाप्रत गेलो आणि मुलांच्या लग्नात, आजवर जोडलेल्या माणसांचा गोतावळा प्रचंड संख्येनं जमा करू शकलो. ती लग्नं मात्र ‘तुझ्याविना’ साजरी करावी लागली.

माझ्या अनोख्य करिअरची पंचविशी आणि वयाची पन्नाशी या दोहोंचा समारंभ शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या उपस्थितीत साजरा झाला. त्याला मात्र तू आमच्यात प्रत्यक्ष होतीस, एवढंच समाधान! पण तिथंही तुझा ‘सत्कार’ होताना मागेच राहणं पसंत करत होतीस. उलट माझ्या आईवडिलांचा सन्मान करण्याचा आग्रह धरलास. बाळासाहेबांनीही माझ्या आधी माता-पित्यांचा सत्कार करायची सूचना केली. तेव्हा तू मनोमन हरखलीस. पुढचे उत्तरोत्तर होत गेलेले सारे सन्मान, मिळालेले सारे पुरस्कार मात्र ‘तुझ्याविना’ होत गेले. तू सतत आठवत राहिलीस.

मी गंभीरपणे पुस्तक लिहिण्याचं तुला आवडणारं काम केल्यावर, ‘मुद्रा’चं प्रकाशन होताना, तू सर्वाधिक खळाळून हसत होतीस. मुंबईतल्या पत्रकारांनी ‘दादर क्लब’मध्ये सत्कार केला तेव्हा त्या पत्रकार मित्रांचं ऋण (विनय केतकर आणि चंदु कुलकर्णी) पुन्हा पुन्हा व्यक्त करत राहिलीस. तेव्हा कुठं कल्पना होती की, आणखी दोन वर्षात ते मित्र तुझ्या शेवटच्या आजारात, तुला बघायला रात्री-अपरात्री मुंबईहून मुद्दाम दवाखान्यात येणार आहेत?

तुझ्या विद्यापीठातल्या नोकरीत ‘तू’ माझ्या नावाचा उल्लेखही टाळलास. उलट तू गेल्यावर विद्यापीठाचे काही चतुर्थ श्रेणी कर्मचारी माझ्याकडे आले आणि म्हणाले, ‘‘बाईंनी आमच्या अडचणीच्या काळात दिलेले पैसे परत करायला आलोय. हे घ्या.’’ याची कुठे नोंद नव्हती. मला त्या उसणे दिलेल्या पैशांचा पत्ताही नव्हता. तू केलेली अशी अबोल मदत परत करायला आलेल्या त्यांनी दिलेेले पैसे ‘तुझ्याविना’ खर्च तरी कुठे करू?

मी जेव्हा जेव्हा परदेशात जातो, तेव्हा तू फारच आठवतेस. स्वतंत्रपणे कुठेही जाण्याची तुझी क्षमता असताना, तू मुलांना सोडायला नको म्हणून स्वतः कुठे गेली नाहीस. माझ्याबरोबर परदेशात येण्याचीही इच्छा व्यक्त केली नाहीस आणि मीही माझ्याच व्यवसायाच्या नादात. तुला परदेशी नेण्याचा आग्रह धरला नाही. यावर तू चुकूनही तक्रार केली नाहीस. आता मात्र मी विमानतळावर विमानाची वाट पाहत असलो की ‘तुझ्याविना’ जातोय, हे पदोपदी जाणवतं.

इतकं पूर्णपणे नवर्‍याला स्वातंत्र्य देऊन त्याच्या आनंदातच आपला आनंद मानणार्‍या समर्पित तुला मी कसा विसरेन? तूच म्हणाली होतीस, दवाखान्यात घर सोडून-शेवटचं घेऊन जाताना… की, ‘‘मी या घरात परतण्याची शक्यता कमी पण मी गेल्यावर रडगाणं नको. मुलं अजून लहान वयात आहेत. त्यांच्यासाठी तरी…’’
काय बोलणार?

‘तुझ्याविना’ घरातलं सारं यथासांग पार पडलंय. तुझी आठवण काढत! पण डोळ्यात पाणी येऊ न देता! आता सारा, रिया, नील ही नातवंडं खिदळतात तेव्हा मात्र सतत वाटतं, की तू त्यांना भेटायला हवी होतीस. केतनबरोबर मुग्धा (सूनबाई) आणि मुग्धाबरोबर कपिल (जावई) हेही आठवण काढत असतात.

ती नातवंडं मात्र तुझ्या फोटोपुढे उभे राहून म्हणतात, ‘‘आजी, नमस्कार.’’
त्यांच्या दृष्टीनं ‘तू’ आहेसच.
‘तुझ्याविना’ आम्ही कोणीही काहीच शुभकार्य, आनंदसोहळा साजरा करू शकत नाही.
म्हणूनच तुझ्या फोटोला ‘हार’ घातलेला नाही.

– सुधीर गाडगीळ
9822046744
मासिक ‘साहित्य चपराक’ दिवाळी विशेषांक 2021,
पृष्ठ क्र. 202

‘चपराक प्रकाशन’च्या वाचनीय आणि दर्जेदार पुस्तकासाठी आणि ‘चपराक’चे सभासद होण्यासाठी संपर्क – 7057292092

चपराक

पुणे शहरातून ‘साहित्य चपराक’ हे मासिक आणि ‘चपराक प्रकाशन’ ही उत्तमोत्तम पुस्तके प्रकाशित करणारी ग्रंथ प्रकाशन संस्था चालविण्यात येते. ‘साहित्य चपराक’ मासिकाचा अंक दरमहा 10 तारखेला प्रकाशित होतो. आपले साहित्य पाठविण्यासाठी, ‘चपराक’मध्ये जाहिराती देण्यासाठी आणि नवनवीन पुस्तकांच्या माहितीसाठी संपर्क - घनश्याम पाटील, संपादक 'चपराक'.
व्हाट्सऍप क्रमांक - ८७६७९४१८५०
Email - Chaprak Email ID

39 Thoughts to “तुझ्याविना”

  1. Nagesh S Shewalkar

    डोळे पाणावले. अत्यंत हृदयस्पर्शी भावना आहेत. दुःखाची पुसटशी रेषा चेहऱ्यावर न येऊ देता इतरांच्या चेहऱ्यावर आनंदाची बाग फुलविणाऱ्या सुधीरभाऊ, तुम्हाला सलाम!

  2. जयंत कुलकर्णी

    सुधीर गाडगीळ सरांचे अतिशय हृद्य मनोगत! संसाराचे एक चाक निखळले म्हणजे काय होते याची जाणीव! सगळे काही होते आहे पण “तुझ्याविना” या जाणीवेसह! मर्मस्पर्शी लेख!

    1. Dr Kalyani

      Very touchy emotional expressions. 🙏

      1. कांचन मोहन शेठ

        अत्यंत भावस्पर्शी लेख, मन ओलं झालं

  3. Vinod s. Panchbhai

    खूप भावस्पर्शी लेख! 🙏

    1. Kalpana Patil

      अत्यंत ह्रदयस्पर्शी लेख,वाचतांना डोळे पाणावले,सुधीरजींच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या असलेल्या पत्नीला मानाचा मुजरा…सुनेला,आईला,स्रीत्वाला सलाम ….!

  4. इंद्रायणी दीक्षित

    अतिशय भावस्पर्शी लेख सुधीर भाऊ. वाचताना डोळे पाणावले.

  5. Manda Wadekar

    गाडगीळ साहेब, माझी अतिशय गुणी बहिण आताच एप्रिल मध्ये बँकेतील रिटायरमेंटच्या पाच दिवस अगोदर गेली, तिच्या जाण्यान तिच्या संसाराची तर अपरिमित हानी झाली आहे. पण आम्ही अक्षरशः तिच्याशिवाय पोरके झालेलो आहोत. मॅडम विषयी वाचतांना माझी ताईच डोळ्यापुढे उभी राहिली. असे गुणी लोक देव आपल्यातून का बर लवकर घेऊन जातो? आपल्याला त्या लोकांची महती कळावी म्हणून का? आपण त्यांच्या जिवंतपणी त्यांच्यावर खूप अन्याय केलेला असतो म्हणून का? खूप छान लेख.

  6. सौ.आशा मेलग्.

    सुधीरजी, नमस्कार.
    शैला, माझी चुलत बहीण !तुम्ही तिच्यावर फार सुंदर लिहीलय. तिचा हसरा चेहरा, शांत स्वभाव पुन्हा आठवला. तिच्या स्मृतीला वंदन.

  7. Shreekant Bhalerao

    आदरणीय सुधीरजी, सप्रेम नमस्कार,
    अतिशय सुंदर लेखन. आपल्या निवेदनातून आपल्या प्रतिभेचा प्रत्यय आम्ही कायमच घेत आलो आहोत.हसत खेळत केलेलं निवेदन सर्वांच्याच मनात आपल्या बद्दलच एक वेगळं स्थान निर्माण करुन जातं. अर्थात या लेखातून एक वेगळा पैलू पहिला.तो म्हणजे आपण आपल्या कुटूंबावर केलेलं निस्सीम प्रेम !!
    आणि तिथेच खात्री पटते की असे निस्सीम प्रेम व्यक्त करणाऱ्या व्यक्तीला याही पेक्षा जास्त प्रेम समोरच्या व्यक्ती कडून म्हणजे च आपली पत्नी सौ.शैला ताई !! यांचेकडून मिळाले आहे।
    पतीबरोबर आपल्या संपूर्ण कुटुंबाची व सामाजिक जबाबदारी सांभाळणाऱ्या
    आणि एक आदर्श माता, पत्नी म्हणून शैलाताईंना विनम्र अभिवादन!!!

  8. Manjusha Balekundri

    Very emotional and heart touching! I must say you are a very strong and wonderful person Sudhir ji. I remember meeting you in Singapore long back with a small group and listening about music, Lata Didi and Asha tai Bhosale… Best regards..Manjusha

  9. Advocate Ashok Shankar Jadhav

    प्रिय मित्र सुधीर यांस,
    सप्रेम नमस्कार
    खरं तर आपण बीएमसीसी चे सहाध्यायी. पण कॉलेजनंतर आपली प्रत्यक्ष भेट होऊ शकली नाही. तुझ्या काही कार्यक्रमात तू दिसायचा. पण प्रसिद्धीच्या वलयात तू सदैव बीझी असल्यामुळे तुला भेटणं शक्य झाले नाही. असो. कॉलेज जीवनानंतर बरेच पाणि पुलाखालून वाहून गेले आहे. वहिनींविषयीचा तुझ्या खाजगी जीवनावरील लेख वाचला आणि डोळ्यात अश्रू आले. वहिनींच्या पवित्र स्मृतीला त्रिवार वंदन.

  10. Sameer

    खूपच हृदयस्पर्शी लेख .

  11. Suresh Dhadve

    🙏नमस्कार! खूप प्रेरणादायी मन स्पर्शी लेख👍👌 प्रत्येकाला आप-आपल्या जीवनात वेगवेगळ्या प्रकारच्या प्रश्नांनातून स्त्रि कडून ही प्रेरणा मीळतच असते ह्यालाच कुटुंब वस्थल्य हीच परीभाषा योग्य आहे, असेच म्हणावे लागेल. धन्यवाद!💐💐💐

  12. Anagha Potnis

    Sudhir dada,khup khup sundar lekh.

  13. Devdutt Kadrekar

    हृदयस्पर्शी लेख…वाचता वाचता डोळ्यात पाणी कधी तरळले, कळलेच नाही…

  14. Shilpa Naik

    भावस्पर्शी लेख.

  15. Anuradha Dinkar Dalvi

    अलिकडेच एक Ted Talk बघितला ज्यात भाषण देणाऱ्या बाईने म्हटलं की आपल्या जवळची व्यक्ती आपल्याला कायमची सोडून गेली की बरेच जण आपल्याला असा सल्ला देतात की आता “you have to move on” पण तिचं म्हणणं असं होतं की आपण का म्हणून आपल्या प्रिय व्यक्तीला विसरायचं? आणि कसं विसरू शकतो? उलट त्यांच्या सहवासातल्या आठवणींनी आपल्याला ऊर्जा मिळते, काहीतरी भरीव करण्याची उमेद मिळते. तुमच्या या “तुझ्याविना” लेखातून हेच पुन्हा एकदा जाणवलं. तुमच्या दोघांमधलं हृद्य नातं खूप भावलं. आणि विशेषतः तुमच्या नातवंडांनी आजीला प्रत्यक्ष पाहिलेलं नसुनही तिच्याबद्दल जो आदर आणि आत्मीयता आहे त्याचं खूप अप्रूप वाटलं.

  16. Anilkumar Mallelwar Ex-CBI

    Absolutely touching tribute ! It shows that your writing is rather better than your flowing delightful ankering and it shows how great your better half was! My obeisance to her!!!

  17. सुधा पेंढारकर

    खरंच ! गाडगीळांचे सूत्रसंचालन बघताना , ऐकताना त्यांच्या पत्नीचा विचार तेव्हां केलाच नव्हता. आणि आत्ता वाचताना डोळे भरून आले.

  18. Sudhir Gangawane

    सुधीर, अप्रतिम लेख. शैला आणि तू डोळ्यासमोर उभे राहतात. तू माझ्यापेक्षा एक वर्ष सीनिअर होतास म्हणून ओळख आणि शैला अजितची धाकटी बहीण,जो माझा बालमित्र सुभाषनगर मधला. लेख खूपच आवडला म्हणून लिहितो आहे. घरातले माणूस कमी होते म्हणजे काय हे माहिती आहे पण तू मुलांना किती छान वाढवलेस, चांगल्या मार्गावर नेलेस. Hat’s off to you.

  19. Suhas Pansare

    नमस्कार!

    आपला वरील लेख मला व्हाट्सएप वर आत्ता वाचयाला मिळाला. वाचताना डोळ्यातून पाणी आलं. कोणत्याही मध्यमवर्गीय घरातील कथा असावी असं वाटलं. पण नाही – असं म्हणणे आपण आणि शैला वहिनींवर अन्याय करण्यासारखे होईल. आपण दोघे म्हणजे एक असामान्य कुटुंब आहात.

    संपूर्ण लेख वाचताना अंगावर सरसरून काटा आला. नियतीने असे क्रूर का व्हावे – असे वाटून गेले. मी तुम्हाला कायमच पडद्यावर पाहिले आहे – सदैव हसतमुख! सुखी माणसाचा सदरा म्हणून तुमचा मागून घ्यावा असे तुम्हाला पाहिले की वाटते. पण या लेखाने या समजुतीवर खोल चरा उमटला आहे.

    सुहास पानसरे (पुणे)

    1. Pramod Umarji

      Very touching article.would like to talk personally esp.experinces during dialysis

  20. Shekhar Pawar

    अतिशय हृदयस्पर्शी लेख.

  21. MAITREYEE UTTAM BARDHAN

    अक्षरशः डोळ्यातून पाणी काढणारा लेख.तुम्हा दोघांना वंदन करते.खरच अप्रतिम लेख.

  22. मनोरमा परांडेकर

    पत्नी ही गृहिणी सखी सचिव असते , असं म्हणतात , तुमची पत्नी शैला याची प्रचिती देणारी होती , हे तुमच्या लेखातून जाणवलं . अतिशय समंजस सहजीवनाचा तुमचा अनुभव वाचून खूप आनंद वाटला .
    मी मनोरमा परांडेकर , आधीची प्रतिभा कुलकर्णी . माझी बहीण सुहासिनी कुलकर्णी कॅामर्स कॅालेजात तुमची सहाध्यायी होती , तेव्हापासून तुमचं नाव मला ज्ञात होतं , पण तुमच्यातला हळवा पती आज दिसला .

  23. Tushar Lohande

    अप्रतिम, ह्रदयस्पर्शी , लेख. प्रत्येक शब्द आणि त्यांतील भावनांनी डोळे पाणावले….

  24. प्रकाश बडवे ं

    अत्यंत सुंदर लेख खुप छान

  25. Suhas Bokil

    सुधीरजी आपला पत्नी शैला ह्यांच्यावरील ह्रदयस्पर्शी लेख वाचुन काळीज गलबललं हो! मध्यम वर्गीय माणसाचे संसारिक जीवन
    सविस्तर उलगडले आहे.

    1. H.R. Girme

      खूपच छान, सर्व सामान्य कुटुंबाची कथा वाचून डोळ्यातून अश्रू आवरणे कठीण झाले. आपली चूक कथा कोणी लिहिलीय असं क्षणभर वाटले.

  26. गोकुळ मुले.

    गाडगीळ साहेब, मन सुन्न झाले आणि डोके बधिर..आपले अनेक कार्यक्रम मी पाहिले आहेत. आपल्या मिश्किल, खुसखुशीत व कौशल्यपूर्ण निवेदनामागील उर्जेचा स्त्रोत काय होता ते आज समजले. खरोखरच आपणास कळसाचे दर्शन होते पण पायातले दगड कधीच दिसत नाहीत. हेच खरे. शैला नावाच्या व्यक्ती अद्वितीयच असतात असे मला वाटते. ( माझ्या आईचे नावही शैलाच होते)

  27. Jyoti Kshatriya

    तुम्ही दोघे तुमच्या सामंजस्याने नियतिला जड झालात. श्री राम चन्द्र आणि सीता माता च्या बाबतीत हाच प्रश्न सगळ्यांना पडतो.सर्व सामान्यांना नियति बद्दल तक्रार राहू नये म्हणून तीचा सर्व समभाव. दाखवण्यासाठी हीकमी केली असावी.नियतिकोणालाच वरचढ होऊ देत नाही

  28. Vrushali

    अतिशय सुंदर आणि हृदयस्पर्शी लेख आहे .

  29. माधुरी खाडिलकर

    तुमची पत्नी शैला माझी गरवारे कॉलेज मधील जवळची मैत्रीण, बास्केटबॉल टीममधील आम्ही दोघी खेळाडू होतो.तसेच 73चया बालआनंद मेळाव्यात आम्ही तिथेच दोघी स्वयंसेवक होतो .अशा खूप छान आठवणींना उजाळा दिल्याबद्दल धन्यवाद अगदी डोळ्यांसमोर सगळेच दिवस उभे राहीले.तिचे शेवटचे वाक्य अगदी मनात घर करुन राहीले.

  30. Harsha Mahesh Mankame

    अतिशय ह्रदयस्पर्शी लेख, मन विषिण्ण झाले लेख वाचून, डोळे पाणावले…

  31. Snehal

    अतिशय भावपूर्ण मनोगत.

  32. Sharvari Dharap

    सुधीर जी तुमच्या पत्नी बद्दल लिहिले ला लेख वाचला खूपच भावपूर्ण व हृदयस्पर्शी तसेच नात्यातला पारदर्शी पणा जाणवतो आपले निवेदन दूरदर्शन वरच ऐकले पण ऐकत रहावे असे आणि मिश्किल तुम्हाला व तुमच्या पत्नीला मनापासून सलाम

  33. Dr. Pradeep Kishanrao Gulwelkar

    केवळ अप्रतिम ! वाचताना अनेक वेळा डोळ्यात अश्रू दाटले ! परमेश्वर अशी स्त्री प्रत्येकाला आई/बहीण/मुलीच्या रुपात देवो )!

  34. Swati Somnath Parab

    निवेदन= सुधीर गाडगीळ हे समीकरण होते आणि आहे…..सर तुम्ही तुमच्या पत्नीविषयी लिहिलेला लेख वाचून मन खूपच हेलावून गेले…… तुझ्याविना हे शीर्षक खूप काही सांगून जाते……

तुमची प्रतिक्रिया जरूर कळवा

हे ही अवश्य वाचा