– जयेंद्र साळगावकर, मुंबई
9819303889
मराठीत लोकप्रिय झालेल्या टोपीवाल्याच्या गोष्टीतील टोपीवाल्याचा मुलगा टोपी विकण्याचा व्यवसाय करू लागतो. एका झाडाखाली तो विश्रांतीला बसतो व त्याचा डोळा लागतो. झाडावरुन माकडं खाली उतरतात आणि टोपीवाल्याच्या पेटीतील टोप्या पटापट घेऊन झाडावर जाऊन बसतात. टोपीवाला जागा होतो. त्याला आपल्या वडिलांच्या कथेतील प्रसंग आठवतो व तो आपल्या डोक्यावरील टोपी खाली टाकतो! पण माकडं आपल्या डोक्यावरील टोपी खाली टाकत नाहीत. ते म्हणतात, ‘‘एकदा आम्ही तुझ्या वडिलांसोबत फसलो, आता नाही फसणार!’’ अशी एका कीर्तनकाराने सांगितलेली आधुनिक टोपीवाल्याची गोष्ट ऐकण्यात आली. त्यांनी तरुणांना संदेश देण्यासाठी या गोष्टीचा पुढे कीर्तनात उपयोग केला.
मला ही गोष्ट ऐकल्यानंतर वेगळेच प्रश्न पडले. टोपीवाला, लोहार, सुतार, चांभार, शिंपी, परिट, न्हावी अशा बारा बलुतेदारांची मुले खरंच त्यांचा पारंपरिक व्यवसाय करतात का? तर या प्रश्नाचे उत्तर थोडा विचार केल्यास ‘नाही’ असेच मिळेल! कारण हलाखीचे जीवन जगत बारा बलुतेदारांनी आपल्या मुलांना शिकवले, पदरमोड केली! मुले शिकली आणि शहरात नोकरीच्या शोधात निघून गेली. त्यामुळे कुटुंबातील पारंपरिक व्यवसाय मागे पडले; किंबहुना बंद पडले. ही मुलं शिकली पण सध्या ती काय करतात? मुंबई, पुण्यासारख्या महानगरात सध्या ती कुठे आहेत? कशी जगतात?
शिक्षण तर घ्यायलाच हवे यामध्ये काही दुमत नाही; पण केवळ पदवीधर होऊन समाजातील तरूण नोकरीच्या शोधात गाव सोडून रोज शहरात येत आहेत. हे लोंढे कसे थांबणार? कोण रोखणार? या लोंढ्यांचे पुढे काय होते? जे तरूण डॉक्टर, वकील, इंजिनिअर होतात ते एखादी नोकरी मिळवतात पण जे केवळ पदवीधर होऊन, अपेक्षांचे ओझे घेऊन शहरात येतात त्यांचे आयुष्य संघर्ष आणि प्रचंड कष्टाचे असते. दोष या तरुणांचा नाही. दोष इथल्या शिक्षण व्यवस्थेचा आहे. आज गाव तिथे शाळा आणि कॉलेज उपलब्ध आहेत पण वर्गात जे शिकवले जाते त्याचा नोकरीच्या बाजारपेठेत किती उपयोग होतो? याचा लेखाजोखा कधीतरी मांडावा लागणार आहे. शेतकर्यांची पोरं शिकली. त्यापैकी इंजिनिअर वगैरे झाले त्यांचे ठीक! पण नुसते पदवीधर झाले, असा तरुण वर्ग त्याच्या पारंपरिक उद्योगाच्या कौशल्यापासून वंचित राहिला आणि नुसते डिग्रीचे प्रमाणपत्र हातात घेऊन बसला. माझा मुद्दाच हा आहे की आज नोकर्या नाहीत असे नाही तर आज कुशल मनुष्यबळ उपलब्ध होत नाही ही खरी अडचण आहे. आज कारखानदारी, पत्रकारितेसारख्या अनेक उद्योगक्षेत्रात कुशल मनुष्यबळ मिळत नाही. त्यामुळे अनेक जागा रिक्त आहेत. जे तरूण गावखेड्यात जन्माला आले त्यांच्या कुटुंबात वेगवेगळ्या उद्योगांचे, कलेचे कौशल्य, गुण होते पण शिक्षणाच्या नादात आपण त्यांना कुटुंबातील कौशल्यापासून वंचित केले. शेतकर्यापासून 12 बलुतेदारांमधील कोणत्याही कलेचा विचार केलात तर त्यातून तयार होणार्या कोणत्याही वस्तू बंद झालेल्या नाहीत. उलट त्यावर चकाचक ब्रँडचे लेबल लावून मोठ्या किंमतीला त्या वस्तू मॉलमध्ये विकल्या जात आहेत. मग आमच्या बलुतेदाराच्या कुटुंबात हे कौशल्य जन्मजात होते. आपण त्यांच्या मुलांना ज्यांना आवड आहे, त्याच व्यवसायात पुढे काही तरी दर्जेदार करायचे आहे, त्या तरुणांना त्या पद्धतीने शिक्षण, ट्रेनिंग, उद्योगासाठी लागणारे भांडवल, बाजारपेठ का उपलब्ध करून दिली नाही? आज हे ज्याने ओळखले असे किती तरी तरूण उच्च शिक्षण घेऊन नोकरीसाठी शहरात खस्ता खाऊन पुन्हा गावात परतले आहेत. त्यांनी आपल्या पारंपरिक शेती, दुग्ध व्यवसाय, पशुपालन सारखे उद्योग आधुनिकतेची कास धरुन करायला सुरुवात केली आणि ते त्यामध्ये यशस्वी पण झाले आहेत. म्हणून माझे तरूणांना निवेदन आहे, बाबांनो, काळ ओळखा, काळाची पावले समजून घ्या, शिक्षण आणि त्यातून मिळणार्या नोकर्या यांचे प्रत्यक्ष चित्र काय आहे हे समजून घ्या! आज कशाची गरज आहे? काय विकायला हवे? जागतिकीकरणात ‘जग’ हीच एक मोठी बाजारपेठ आहे. त्यामुळे मोठे आकाश खुले झाले आहे. त्यातील संधी आपल्यालाच शोधाव्या लागणार आहेत. आपल्याला कौशल्य विकसित केल्याशिवाय पर्याय नाही. शिक्षण आपल्याला ज्ञानार्थी बनवेल, जगाची दारे खुली करुन देईल. सोबत एक डिग्रीचे प्रमाणपत्र देईल पण आपल्याला या भवसागरात तरून जायचे असेल तर कौशल्य विकासाशिवाय पर्याय नाही.
भारतामध्ये 2020 पर्यंत सर्वाधिक संख्या तरुणांची असून ‘जगातील सर्वात तरूण देश’ भारत आहे. भारतातील लोकसंख्येचे सरासरी वय 29 आहे. 2014 च्या निवडणुकीच्या आकडेवारीनुसार आपल्या देशात त्यावेळी 18 ते 19 वयोगटातील मतदार होते 2 कोटी 31 लाख 61 हजार 196! म्हणजे देशाच्या एकूण मतदारांमध्ये हे प्रमाण होते 2.88 टक्के! तर महाराष्ट्रात त्यावेळी 3 कोटी 80 लाख 79 हजार 593 मतदार हे 18 ते 40 वयोगटातील होते. म्हणजे निम्मे 50% मतदार हे तरुण होते आणि आहेत. तर दुसरे चित्र काय आहे? थिंक टँक सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकोनॉमीने नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार जानेवारी 2021 मध्ये देशात बेरोजगारांची संख्या सुमारे चार कोटी आहे. यामध्ये दोन प्रकारचे बेरोजगार आहेत. यातील काही बेरोजगार सक्रियपणे नोकरी शोधत आहेत तर काहीजण नोकरी शोधण्याचा प्रयत्न करत नाहीत. यावर्षी जानेवारीत बेरोजगारीचं प्रमाण सुधारून 6.5% वर आलं. हे प्रमाण डिसेंबर 2020 मध्ये 9.1% इतकं होतं. उचखएए आकडेवारीनुसार 2019-20 या आर्थिक वर्षाच्या अखेरीस भारतात 40 कोटी लोक रोजगारप्राप्त होते तर त्यावेळी 3.5 कोटी जण बेरोजगार होते. यासोबतच प्रत्येकवर्षी भारतात सुमारे दोन कोटी लोक 15 ते 59 वयोगटातील नोकरीच्या शोधातील लोकांमध्ये सहभागी होत असतात.
ही सगळी आकडेवारी आपण समजून घ्यायला हवी. सरकारं देशात, राज्यात येतात, जातात! कोणाचेही सरकार देशात आणि राज्यात आले तरी हे चित्र रातोरात बदलणारे नाही. ‘हा देश तरुणांचा आहे’ ही जशी अभिमानाची बाब आहे त्यासोबतच ‘हा देश बेरोजगारांचा आहे’ अशी काळी बाजू सुद्धा त्याला आहे. त्यामुळे ही स्थिती तरुणांनी समजून घ्यायला हवी. तरुणांनी हीच परिस्थिती समजून घेऊन आपल्या आयुष्याचे गणित मांडायला हवे. नेत्यांच्या पाठी झेंडे घेऊन, घोषणा देऊन, आपापसात लढाया करून, अस्मितेचे प्रश्न उपस्थितीत करून तरुणांचे भले होणार नाही. कोणत्याही पक्षाला अथवा तुमच्या लाडक्या नेत्यांना निवडून आणा तरी हे चित्र बदलणार नाही. सोशल मीडियावर कितीही नेत्यांना शिव्या दिल्या, ट्रोल केले म्हणूनही हे चित्र बदलणार नाही. चित्र तेव्हाच बदलेल जेव्हा तरुण स्वतःच आव्हाने समजून घेईल. आज शाळेत असतानाच मोबाईल हातात येतो. विद्यार्थीदशेतच मोबाईल मिळाला की मग त्याचे व्यसन जडते. आजची तरूण पिढी मोबाईलच्या अती आहारी गेली आहे. जोडीला मोटरसायकल मिळतेच! मग काय! आकाशच ठेंगणे होते. मोबाईलवर गेम खेळणे आणि मोटरसायकल पळवण्यात तारूण्य हरवून जाते. त्यामुळे या व्यसनापासून सावध व्हायला हवे. मोबाईलचा दूरूपयोग करण्यापेक्षा त्याचा वापर करून अनेक चांगल्या गोष्टी करण्यासारख्या असतात. मोबाईलचे व्यसन होण्याआधीच मोबाईल हा प्रगतीचा मार्ग ठरू शकतो का? या प्रश्नाचे उत्तर आपण शोधायला हवे.
आज सेवा उद्योग झपाट्याने वाढतोय. सोशल मीडिया तर अमर्याद उपलब्ध झाला आहे. आज या क्षेत्रात मोठ्या संधी आहेत हे आपण कधी समजून घेतोय का? ज्या फेसबुक, ट्विटरसारख्या समाजमाध्यमातून आपण टाईमपास करतो त्या परदेशी कंपन्या आपल्याच खिशातून करोडो रूपये गोळा करीत आहेत याचे भान आपल्याला आहे का? आज राजकीय, सामाजिक, चित्रपट, उद्योग या क्षेत्रातील मोठ्या व्यक्ती, संस्था, कंपन्या यांना सोशल मीडिया हाताळणारी कुशल माणसे लागतात. त्या संधीचा आपण विचार करतोय का? आपण फेसबुक, ट्विटर आणि अन्य अॅप्स मग ते ओला, उबेर, स्विगी असो, ही अॅप आज कोट्यावधींची उलाढाल करीत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चीनच्या अनेक अॅपवर बंदी आणली त्याच दिवशी आपल्या देशातील तरुणांना मोठ्या संधीची दारे खुली झाली. त्याचा आपण खरंच फायदा करून घेतला का? माझ्या माहितीतील चिंगारी हे अॅप असेच आहे. टिकटॉकवर बंदी आल्यानंतर या चिंगारीने संधीचे सोने केले आणि आपले व्यावसायिक हातपाय रोवले. आमच्या कोकणातील दीपक चंद्रकांत साळवी नावाचा एक मराठी तरूण याचा सह-संस्थापक म्हणून आहे. त्याने लॉकडाऊनच्या काळात आपली नोकरी सोडली आणि व्यवसाय म्हणून यामध्ये हा तरूण उतरला व यशस्वी झाला. अर्थात इथेही त्याचे स्किल, कौशल्य उपयोगी आले. त्यासोबत धाडस, जगाची दिशा अचूक ओळखण्याची ताकद असल्याने हा तरूण यशस्वी झाला. माझे हेच तरुणांना सांगणे आहे, आज कोरोनामुळे जगाचा उद्योग व्यवसायाचा नकाशाच बदलून गेलाय. त्यामुळे अनपेक्षित अशा काही संधी तरूणांची वाट पाहत आहेत. चीनमधून अनेक कंपन्या बाहेर पडून अन्य देशात स्थलांतरित होत आहेत. त्यातून नव्या संधी उपलब्ध होत आहेत. या संधींवर तरूणांनी लक्ष ठेवायला हवे.
कोरोनामुळे भविष्यात जगाला काय पद्धतीने आरोग्य यंत्रणेवर काम करावे लागेल हेही स्पष्ट झाले आहे. जगातील आरोग्य यंत्रणा या साथीच्या आजारात कोलमडल्या. त्यामुळे त्यासाठी येणार्या काळात निधी उपलब्ध करुन सर्व देश आरोग्य यंत्रणा सक्षम करण्यासाठी काम करायला लागलेत तर दुसरीकडे कोरोनाचे नवनवीन विषाणू डोके वर काढत आहेत. त्यामुळे त्यामध्ये नवनवीन आयडिया, संकल्पना, संशोधन याची गरज भासणार आहे. तरुणांसाठी ही मोठी संधी आहे. मास्कपासून मृतदेहाला गुंडाळल्या जाणार्या बॅगेपर्यंत नवनवीन कल्पना शोधल्या जाऊ शकतात. त्यातून नव्या उद्योगांना संधी मिळणार आहे. या संधी शोधून तरुणांनी आपल्या पायावर उभे रहायला हवे. संकटाचे संधीत रूपांतर करण्याची ही योग्य वेळ आहे.
महाराष्ट्रात असे तरुण अजिबातच नाहीत असे माझे म्हणणे नाही. अनेक जण तसे प्रयत्न वेगवेगळ्या क्षेत्रात करीत आहेत पण सर्वदूर तसे प्रयत्न होताना दिसत नाहीत. आजच्या तरुणाईचे अनेक वेळा निराशाजनक चित्र रंगवले जाते आहे. तेवढा मी निराशाजनक नाही. काही गोष्टी जरूर चुकीच्या घडत असतील पण जे चुकीचे आहे तेच सर्वदूर सर्वत्र घडत आहे असे नाही. हो! पण तरुणांना एक गोष्ट मी आवर्जून सांगेन ती म्हणजे आज तरुणांनी आपल्या डोळ्यासमोर आदर्श मात्र योग्य ठेवायला हवेत. आपल्या महाराष्ट्राने देशाला, जगाला एकापेक्षा एक उत्तुंग माणसे दिली. छत्रपती शिवाजी महाराज, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, छत्रपती शाहू महाराज, स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर अशी किती नावे घ्यावीत! या माणसांनी प्रचंड काम तर केलेच, तेवढेच प्रचंड वैचारिक वाङ्मयीन लेखन केलेली माणसे ही महाराष्ट्रात झाली. त्यांचे कार्य, विचार आपण समजून घ्यायला हवे. मोठ्या माणसांचा संघर्ष समजून घेऊन आपली उद्दिष्टे ठरवणे आवश्यक आहे. गावच्या पुढार्यांच्या नादाला लागून, त्यांनी सांगितलेला इतिहास खरा मानून एखाद्याच्या घरावर दगड मारणारे तरूण पाहिले की चिंता वाटते. तुम्हाला ज्या थोर पुरुषांचे विचार पटतात तो आदर्श निवडा. मग तो कोणीही असेल! एकदा तुमचा आदर्श तुम्ही ठरवलात की अन्य थोर पुरुषांना कमी लेखण्याचा उद्योग कशाला करायचा? तुम्ही तुमच्या आदर्शावर जगा! पण तसे होत नाही.
समाजमाध्यमातून मग भडास काढणारा तरूण वर्ग मोठा आहे. तुमची मते मांडायला कुणाचाही विरोध नाही, पण बाबा तुझ्या पोटापाण्याचे काय? तुला कोण फसवतेय? त्या थोर पुरुषांनी फसवले की तुला तुझा आजचा पुढारी फसवतोय? एवढे समजून घेण्याची कुवत तुझ्याकडे आहे ना? मग असे का करताय?
कवीश्रेष्ठ बा. भ. बोरकर म्हणतात,
‘तुला एवढे कसे कळत नाही,
फुलत्या वेलीस वय नाही!
क्षितीज ज्याचे सरले नाही,
त्यास कसलेच भय नाही!’
तुम्हाला हे समजूनच घ्यावे लागणार आहे. हे सामाजिक गणित जेव्हा तुमचे तुम्ही सोडवाल तेव्हाच पोटापाण्याचे गणित सुटू लागेल. आय.ए.एस, आयपीएस, वैमानिक अशा अनेक क्षेत्रात आपण महाराष्ट्र म्हणून कुठे आहोत? मराठी तरूण अशा क्षेत्रात किती आहे? नसेल तर का मागे पडतो आहे? याची उत्तरे तुम्हाला मिळतील तेव्हाच तुम्हाला नव्या क्षेत्रातील संधी सापडू लागतील.
मागे एकदा माझ्या वाचनात आलेली एक सत्यकथा फारच सुंदर आहे. तिची आठवण झाली. कोल्हापूरच्या सीमेवरच्या गावातील एक अर्धवट शिक्षण घेतलेली बेबी कांबळे नावाची मुलगी घरच्या गरिबीशी संघर्ष करत असताना गोव्यात नोकरीच्या शोधात गेली. तिथे ती घरकाम करुन आपला उदरनिर्वाह करू लागली. त्याचवेळी तिच्या प्रेमात एक परदेशी पर्यटक पडला. तिने लग्नाची अट घातली. त्याने मान्य केली व लग्न केले. त्यानंतर तिला घेऊन तो परदेशात, आपल्या देशात गेला. तिथे जाऊन बेबीने त्यांची भाषा आणि शेतीची पद्धत शिकून घेतली. कालांतराने ही बेबीताई पुन्हा आपल्या गावी परतली. येताना परदेशातील भाज्यांची बियाणी सोबत घेऊन आली व गावाजवळ शेतजमीन भाड्याने घेऊन शेती करण्यास सुरूवात केली. ती पिकवत असलेल्या भाज्या गोव्यातील पंचतारांकित हॉटेलला लागतात. त्याला मागणी वाढली व बेबी आपल्या उद्योगात यशस्वी झाली. तिचा जीवनसंघर्ष मोठा आहे. मी आज थोडक्यात सांगितला पण त्यामध्ये शिकण्यासारखे प्रेरणादायी खूप आहे.
कुठे तिच्याजवळ भाषा होती? कुठे उच्चशिक्षण होते? कुठे भांडवल होते? पण तिच्याजवळ परिस्थितीला सामोरे जाण्याचे मोठे बळ होते. धाडस होते. मग आपण हे धाडस का करीत नाही? हा प्रश्न एकदा आपणच आपल्याला विचारुन पहायला हवा.
आज भाषेचे एवढे अवडंबर माजवले गेले आहे की इंग्रजी शाळेत शिकलं तर आपली मुलं जगात सर्वज्ञानी होणार, त्यांच्या पायाशी नोकर्या लोळण घालणार असा समज बहुतांश पालकांचा झाला आहे. म्हणून मराठी शाळा ओस पडल्या आणि इंग्रजी शाळांमध्ये रांगा लागल्या. इंग्रजी शाळांनी पण याचा फायदा उचलला नाही तर नवलच! व्हायचे तेच झाले. इंग्रजी शाळांचे भाव गगनाला भिडलेत! पण मला सांगा, गेल्या दहा वर्षांत इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिकलेले किती विद्यार्थी आय. ए. एस. झाले? कुठे गेले ते इंग्रजीचे पठ्ठे? ते सध्या काय करयात? कुणाशी इंग्रजीत बोलत बसलेत? त्यांचे जीवनमान उंचावले का?
मला मान्य आहे, इंग्रजी ही भाषा चांगली यायला हवी. इंग्रजीच नाही तर जगातील ज्या-ज्या भाषा शिकता येतील त्या सर्व शिकाव्या पण एक इंग्रजी भाषा चांगली यावी म्हणून केवढे अवडंबर माजवून बसलोय आपण? खरंच एकदा इंग्रजी माध्यमातून शिकलेल्या मुलाला किती स्वच्छ इंग्रजी बोलता-लिहिता येतं? हे तपासून पहा! खरं सांगायचं तर मुंबईसारख्या शहरात राहणार्या तरुणांना या इंग्रजीच्या नादात ना धड इंग्रजी येतं ना धड मराठी शुद्ध येतं, ना हिंदी! धेडगुजरी भाषा बोलल्या लिहिल्या जातात. म्हणून आज मराठी वर्तमानपत्रं, मराठी वेबसाईटवर, मराठी जाहिराती, मराठी चॅनल यांची भाषा पहा कशी आहे! या सगळ्या उद्योगात आज शुद्ध मराठी लिहिता, वाचता येणारी माणसे मिळत नाहीत. कुशल माणसे मिळत नाहीत म्हणून मराठी वर्तमानपत्रातून मुद्रितशोधक हे नोकरीचे पद बाद झाले. मी मराठी भाषा ‘पुणेरी’च असावी अशा आग्रहाने इथे बोलत नाही. मी स्वतः प्रिटींग व्यवसायात आहे. मला या क्षेत्रात झालेल्या बदलांची जाणीव आहे म्हणून हे पोटतिडकीने सांगतोय. कुठलीही शिका, एक तरी भाषा नीट शिका! एवढाच आग्रह आहे. स्वामी विवेकानंदाचे एक वाक्य आठवले… ते म्हणतात,
‘‘या विश्वातील सर्व शक्ती आपल्याकडे आहेत परंतु आपण आपल्या डोळ्यावर हात ठेवतो आणि किती अंधार आहे म्हणून रडत बसतो.’’
असे होता कामा नये, एवढेच इथे सांगणे आहे.
आम्ही काय किंवा आज पन्नाशीत असलेल्या वर्गाचा कालखंड फार वेगळा होता. तेव्हाही आव्हाने होती, आजही आहेत. आज आव्हाने बदली आहेत, वेगळी आहेत. त्यामुळे नव्या संधी आपल्याला खुणावत आहेत. त्या दिशेने आपला तरूण वर्ग जातोय की नाही? याचा लेखाजोखा घ्यायला हवा. खरंतर या देशात, राज्यात ज्या कुणाचे सरकार आहे आणि पुढे येईल त्यांनाही या देशातील तरूणांची ही संख्या, समस्या समजून घेऊन पावले टाकायला हवीत. धोरणे ठरवायला हवीत. जुनी धोरणे बदलायला हवीत. तरूणांची मने समजून घ्यायला हवीत. अन्यथा कोणत्याही पक्षाचे कितीही ताकदवान सरकार आले तरी ती राजवट तरूण आपल्या सामर्थ्यातून उलथून टाकू शकतात. एवढे सामर्थ्य या तरुणाईत आहे. तेवढी संख्या आज आपल्या देशात, राज्यात तरुणांची आहे. आपल्या देशाचा स्वातंत्र्यलढा असो वा मुघल साम्राजाला हादरवून सोडलेल्या छत्रपती शिवाजीमहाराज यांची कारकीर्द! तो इतिहास आज आठवला तर तो तरूण रक्ताचा इतिहास आहे. तरूणांनी दाखवलेले हे सामर्थ्य आहे. तरूणाईने आपले सामर्थ्य आपले आपणच ओळखायला हवे. कुसुमाग्रज म्हणतात तसे…
‘‘चला उभारा शुभ्र शिडे ती गर्वाने वरती
कथा या खुळ्या सागराला
अनंत आमुची ध्येयासक्ती अनंत अन् आशा
किनारा तुला पामराला’’
या देशातील तरूणाईकडून आपण जेव्हा अपेक्षा करीत आहोत, राजकीय व्यवस्थेवर बोट ठेवत आहोत तेव्हा या समाजातील विचारवंत, ज्येष्ठ कलावंत, मोठे उद्योजक, ज्येष्ठ पत्रकार, मोठी प्रसारमाध्यमे अशांची सुद्धा मोठी जबाबदारी आहे. यांना सुद्धा नव्या पिढीची धडकन, धावपळ, ताकद, क्षमता, कौशल्य हे सुद्धा समजून घ्यावे लागणार आहे. पूर्वी असे खूप वेळा घडायचे. यशस्वी माणूस नवा हुशार माणूस हेरून त्या तरूणाला, त्याच्यातील हुषारीला योग्य संधी देत होता. उद्योग, सिनेमा, नाटक, कला, साहित्य अशा प्रत्येक क्षेत्रातील नामवंत नव्या पिढीतील अनेकांना उभे करीत होते. आज तसे होताना दिसत नाही. आमच्या पु. ल. देशपांडे, कुसुमाग्रज यांनी नव्याने उभे केलेले अनेक साहित्यिक आज नावारूपाला आले. त्या काळात ‘सत्यकथा’ आणि श्री. पु. भागवत यांचे साहित्यिक पिढी उभी करण्यात मोठे योगदान आहे. तसेच त्यावेळेस आचार्य अत्रे सारख्या मोठ्या माणसांनी मराठी साहित्यात उपेक्षित दलित, ग्रामीण साहित्य प्रवाहाला प्रोत्साहन दिले. अशी असंख्य उदाहरणे देता येतील. अनेक सामाजिक, साहित्यिक चळवळी, दिवाळी अंक, साप्ताहिके यांचेही मोठे योगदान आहे. आज असे काहीच घडत नाही असे नाही. आजचा तरुण अशी संधी मिळाली नाही तर आपल्याच हिंमतीवर ‘चपराक’सारख्या व्यापक व्यासपीठाची निर्मिती करतो. आपले मार्ग आपणच शोधून पुढे चालू लागतो. म्हणून मी हे सर्व सांगताना निराशावादी नाही. मी उपदेश देण्याच्या उद्देशाने हा लेखनउद्योग केलेला नाही. मी एक सामाजिक चिंतन आजच्या पिढीसमोर मांडू पाहतो आहे. मी आरसा धरून तरुणांचा चेहरा त्यांचा त्यांना दाखवू पाहतोय. मला तरुणांच्या, देशाच्या भवितव्याची काळजी वाटते म्हणून, एक चिंतातुर जंतू म्हणून हा अक्षरप्रपंच केलेला नाही. मला या निमित्ताने तरूणांशी बोलायचे होते. संवाद साधायचा होता. त्या संवादाच्या निमित्ताने एकदा तरुणांच्या जगात नेमके काय सुरू आहे हे शोधायचे होते. तरुणांचे नवे जग मला समजून घ्यायचे होते. त्यातून जे मला दिसले, वाटले त्याचे हे एक टिपण आहे. मी आशावादी आहे. तरूणाईवर माझा विश्वास आहे. तरूणाईत सामर्थ्य आहे. त्यामुळे येणार्या काळात अनेक क्षेत्रात नवनवीन तरुण आपल्या यशस्वी वाटचालीने, प्रयोगशीलतेने, कल्पनांनी, श्रमाने, मेहनतीने या देशाच्या यशात आपला सहभाग नोंदवतील याचा मला विश्वास आहे. देशाची मान उंचावेल असे करुन दाखवतील… म्हणून चला कवीमित्र अशोक बागवे म्हणतात त्याप्रमाणे…
‘‘रक्तातले करारी आता इमान शोधा
आता नव्या ऋच्यांचे पसायदान शोधा
कोत्या पराभवाचे वार्धक्य नाव आहे
आता नव्या दमाचे जळते जवान शोधा!’’
‘साहित्य चपराक’ दिवाळी विशेषांक 2021
– जयेंद्र साळगावकर, मुंबई
9819303889
श्री. जयेंद्र साळगावकर यांनी तरुणाईच्या सद्य परिस्थितीवर फार सुंदर टिपण्णी केली आहे. बदल हा जीवनाचा स्थायीभाव आहे. तो समजून घेतला तर ही तरुणाई सुखी होईल असे साळगावकर यांचे मत आहे. जागतिक बाजापेठेतील अपेक्षा समजून वागायला हवे.