यांची पोटं तरी केवढी?

यांची पोटं तरी केवढी?

– प्रवीण दवणे
सुप्रसिद्ध लेखक, ठाणे
9820389414
‘साहित्य चपराक दिवाळी अंक 2021’

राजाला शिकार कुठली, यापेक्षा शिकार करण्यात मजा येते. तो त्याचा खेळ असतो. तो पाठलाग! ते काटेकुटं चुकवणं, टपून नेम साधणं, मातीनं अंग माखणं याचीच नशा असते राजाला! तसा हा आमचा खेळ! घोटाळा करणं, लपवणं, हेलिकॉप्टरनं धावाधाव! त्या आमच्या नावाच्या ब्रेकिंग न्यूज! आम्हाला पैशात इंटरेस्ट नाय! मोप जमिनी, बागा, कारखाने, बार, गुरढोरं, बंगले-माड्या, सात हजार पिढ्यांना पुरेल एवढी इस्टेट आमची! पण आपण असं जनतेला चकवू शकतो, हीच आमची नशा! तुम्ही कवी आहात! तुमची नशा कवितेची! आमची घोटाळ्यांची!

मनातले छोटे-छोटे प्रश्न वयाबरोबर मोठे होत गेले आणि मग ते तसेच राहिले. लहानपणी मी ज्या गल्लीत रहायचो, तिथेच एक आमदार रहायचे. माझे वडील नि शेजारी-पाजारी म्हणायचे, ‘‘खरंतर हा एका भाजीवाल्याचा उनाड मुलगा. शाळेतल्या पुंडपणाचं रूपांतर गुंडपणात झालं नि शर्टाची सगळी बटणं उघडी ठेवत तारूण्य मग्रुरपणात शिरलं. आधी उत्सवाच्या वर्गणी निमित्तानं देवाचं नाव घेऊन दानवपण जोपासलं नि हे पोरगं अगदी अल्गद नगरसेवक झालं. अर्थात त्याच मिजाशीत आमदार झालं.’’

एखाद्या शूराच्या आख्यायिका व्हाव्यात तशा जिवंतपणीच आख्यायिका झालेले असे अनेकजण पुढेही पाहताना मला वाटायचं, ‘ज्या रस्त्यावरून आपल्या गाड्या जातात, त्या रस्त्यावरचे खड्डे पाहून यांना कधीच का वाटत नाही निदान एकदा तरी आपली जनता आपल्या घरासमोरील रस्त्यावरून तरी सरळ चालावी! एकदा तरी, कधीतरी का वाटत नाही?’

अगदी त्या आमदाराच्या आसपासच्या भागात आठ दिवसातून एकदाच येणार्‍या नि तासभरच रेंगाळणार्‍या नळाच्या पाण्यासाठी बायकांच्या केवढ्या तगमगत्या रांगा लागतात, आपल्या आईच्या, आजीच्या वयाच्या बायका पाण्यासाठी मेटाकुटीला येतात. त्या अगतिक रांगासमोरून यांच्या पांढर्‍या फियाट गाड्या रोरांवत जातात. खिडकीतून ती तहानलेली व्याकुळ रांग नि दुरून कुठून तरी वणवणत येणार्‍या त्या माता पाहून त्यांच्या पोटात कधीच का ढवळत नाही, ह्या समाजाचं हे दैन्य कायम दूर करावं? असं कधीच का वाटत नाही? बरं, वर्ण बदलतात, चेहरे बदलतात, रस्ते तसेच! नळही कोरडाच! अशी कुठली अदृश्य घट्ट बांधणी या माणसांमध्ये असते की हे दैन्य कायम ठेवण्यात त्यांची एकी असावी?

जनतेला किमान आनंद द्यावा, स्वतःची पोटं भरताना एक चतकोर तुकडा जरी ‘जनना जनार्दना’समोर टाकला तरी तो आशीर्वाद देईल, असं कधीच कधीच न वाटणारी कुठली बरं ही साखळी दिल्ली ते गल्ली असते?
हे मला लहानपणी पडलेले प्रश्न वयाबरोबर मोठे झाले नि कायम राहिले.

घोषणांच्या जंगलातूनच माझं बालपण वयानं मोठं झालं. ‘गरिबी हटाव’पासून ‘अच्छे दिन’पर्यंतच्या शेकडो घोषणांनी घेरलेलं माझं आयुष्य! प्रश्न पडायचा, या वेगवेगळ्या घोषणांची अफू यांना नेमकी मिळते कुठून? नि त्याचा त्यांना अगदी हवा तो परिणाम साधण्याचा धडा यांना कुठल्या पाठशाळेत मिळतो? जग हे आजच आभासी सुखात रममाण झालेले नाही. जनता ही प्रत्येक काळात केवळ आभासावरच जगताना पाहत-पाहत माझं वय वाढलं. ‘प्रत्येकाला स्वतःचे हक्काचे घर मिळणार’ ऐकत स्टेशनलगतची झोपडपट्टी एखाद्या नायट्याप्रमाणे पसरताना मी अनुभवली. समोर मोकळ्या मैदानात बांधलेल्या चार झोपड्या तुम्हाला-मला दिसतात. बहुधा लोकांनी चालावे या हेतूने बांधलेले पदपथ हे नंतरच्या अनधिकृत टपर्‍यांची पायाभरणी असते, हे माझ्यासारख्या सामान्यातल्या सामान्य व्यक्तिला कळतं; पण मग ‘ह्यांना’ का नाही दिसत? जे उघड्या डोळ्यांनी जगाला दिसतं ते न दिसण्याची किमया या शुभ्र बकांना कशी बरं साधलेली असते? हा माझा कोवळ्या-तरूणपणापासूनचा प्रश्न आहे नि आतातर प्रश्नही प्रौढ झाला पण अनुत्तरीतच!

निरपराध भाबडी जनता किती विश्वासाने मान ठेवते ज्यांच्या खांद्यावर पण ते खांदेच आपल्याला ‘पोहोचवणारे’ ठरणार आहेत हे माहीत नसतं बिचारीला. शेळीला मायेनं कुरवाळायचं, तिला सकाळ-संध्याकाळ ओला-हिरवा, लुसलुशीत घास देणारा तो हातच, एक दिवस हातात सुरा घेऊन मानेवरून फिरवणार आहे हे बिचार्‍या शेळीला कुठे माहीत असतं? तसंच ना हे? ज्यांनी औदार्याने जागा दिली, जमीन दिली, त्यांच्या रंगांचे चेहरे दिले, झेंडे दिले, येथेच त्यांच्या चार पिढ्या विस्ताराला विस्ताराने गुणत वाढल्या. जेथे दारिद्य्र, निरक्षरता, व्यसनाची शिस्तबद्ध पैदास केली तेथेच आपलीच माणसे बुलडोझर पाठवतात नि एक दिवस अपूर्ण स्वप्नांचे हे शापितजन अपुर्‍या स्वप्नांसह जमीनदोस्त होतात. शोषितांच्या या यशस्वी अत्याचारावरच संगमरवरी मजले चढतात. मजल्यावर मजले… मजल्यावर मजले, खाली अन्नपाण्याविना जीव सोडलेले नि वर दोन-अडीचशे इसम सहज पोहतील असे दुथडी भरलेले तरण तलाव!

दाद मागणार्‍यांचे मोर्चे ‘ब्रेकिंग न्यूज’ने टीआरपी मिळवून देतात. जाहिरातीचे रेट वाढवतात. सत्तेत नसलेल्यांना बंडखोर निमित्ताच्या मशाली पुरवतात. एकमेकांत ‘सूर’ नि ‘सुरा’ जुळली की बिचार्‍या शेळ्या दुसर्‍या डोंगराकडे वळवल्या जातात, पुढील दहा वर्षाची मोकळी जमीन अडवण्यासाठीचे कुंपण म्हणून. मग पुन्हा नवे सुरे, नव्या शेळ्या, नवे बें बें, नवीन गाड्या, रक्ताच्या तेलात उजळलेली बिलोरी रोशणाई!

कोटी कोटींच्या घोटाळ्यांची माझ्या भाबडी नागरिकत्वाला नवलाई वाटते. खिशातलं सामान्य मानधनाचं (तेही मिळालं तर) पाकिट घरी येऊन बघताना चार-चारदा आहे ना? आहे ना? म्हणून चाचपणारे आम्ही या पहिल्या अंकावरील पूज्य मोजताना शिणतो पण हे परमपूज्य घोटाळेवंत एकामागोमाग घोटाळे करताना खरंच थकत कसे नाहीत? याच्या आश्चर्यात मी अनेकदा बुडलो आहे. एक बँक घोटाळा की लगेच पतपेढीचा घोटाळा, मग लगेच भूखंड, मग त्वरेने आश्रमशाळेखा खिचडी घोटाळा, खिचडी पचते ना पचते तोच दुष्काळ फंडाचा लचका, तो भरतो न भरतो तोच खर खरेदी घोटाळा…! आत्ता या क्षणी शेकडो घोटाळे असे पांढर्‍याशूभ्र वस्त्रात माझ्या समोरून जात आहेत आणि ‘ठेंगा’ दाखवत, वाकुल्या करीत ‘अरे गुलामा, कसं चकवलं?’ असं म्हणत हसत आहेत.

एकातून दुसरा घोटाळा असा कांद्याच्या पाकळीसारखा बाहेर काढायचा. ते हजारो कोटी छान आपापसात वाटायचे नि पुन्हा पोटभरून जेवल्यावर बडिशेप दाताखाली असतानाच नव्या घोटाळ्यांसाठी पोट मोकळं करायचं यासाठी जी धमक लागते, त्याचं मला नेहमीच अप्रूप वाटत आलं आहे. एकदा भाजीवाल्याकडून उरलेले पैसे परत घेताना त्याच्याकडून चुकून मला वीस रूपयांची नोट जास्त आलेली घरी आल्यावर कळलं. विक्षिप्त वाटावं इतकं अस्वस्थ झालो मी. बायको म्हणालीही, ‘‘उद्या जाल तेव्हा द्या त्याला परत. नेहमीचाच भाजीवाला आहे तो.’’ पण त्या सल्ल्याला न जुमानता मी पुन्हा अनेक जिने उतरून खाली गेलो नि त्याला त्याचे माझे नसलेले वीस रूपये देऊन आलो. तो म्हणालाही, ‘‘साहेब, अहो नंतर द्यायचे!’’ या मानसिकतेच्या मला या नवनवीन घोटाळे पचवून पुन्हा झेंडावंदनाला ध्वजाची दोरी हातात घेताना पाहून घाम फुटला आहे.

वाटतं, हीच ऊर्जा, हीच प्रतिभा देशासाठी कारणी लागली तर!

…तर काय नंदनवन होईल या देशाचं!

असं एक भाबडं स्वप्नचित्र मी नेहमीच पाहतो पण ते भंगतं पुन्हा नवा ‘औषध घोटाळ्या’ची बातमी वाचून. अमाप पैसा खायचा, तो पचवायचा, पुन्हा नव्या करोडोंसाठी मोकळं पोट सज्ज ठेवायचं. प्रश्न पडतो यांची पोटं तरी किती मोठी असतील? हे काही सामान्य माणसाचं पोट नक्कीच नाही. मानवी दिसणारं काहीतरी अमानवी आहे. बरं, यांची पिलावळ फक्त राजकारणातच आहे असा माझा ऐन तारूण्यातला समज वय मोठं होताना दूर होत गेला.

अथांग आणि अपार पोट असणार्‍या पोटांनी सर्व क्षेत्रे अगदी निर्भयतेने काबिज केली आहेत. लष्करात शवपेटीपासून कोविड महामारीत पाण्याच्या लसी पुरवणार्‍यांपर्यंत ही पिलावळ आहे. संमेलनाच्या मंडप करारापासून जेवणाच्या पंगतीपर्यंत घोटाळेवंत पसरले आहेत. पुरस्काराच्या वाटपापासून ते अध्यक्षाच्या निवडीपर्यंत ही प्रतिभा वाटचाल करताना समोर दिसते. आपला हा जन्म फक्त आणि फक्त नोटांची बंडले घरात पुरण्यासाठीच आहे आणि त्यासाठी जेलपासून-स्वतःला ठार मारून घेण्याचीही तयारी असण्याचं हे भयानक धाडस या प्रचंड पोटाच्या मंडळीत येतं तरी कुठून?

मी विचार करतो, म्हणजे नाईलाजच आहे तसा. खरंखुरं जेवताना आपण जेवण रूचकर असलं तरी किती जेवतो? भाकरी किती खातो? भात नि भाजी? पण एखादा दोनशे भाकरी खाऊनही अगदी लगेच पंधरा मिनिटात पुन्हा जेवायला तयार असेल तर…!

हे चित्र माझ्या डोळ्यांसमोर येतं नि मग हे अपार पोटाचे पोटवीर! गंमत वाटते, यांच्यात धाडस, प्रतिभा, संवाद कौशल्य, वक्तृत्व, हिंमत सारं असतं; पण ते कुठल्या वाटेनं जाते! दारिद्य्र ते हे! मी एका मित्राशी गप्पा करताना अगदी सहज विचारलं, ‘‘यांच्या मनाला काही वाटत नसेल का रे?’’ तो इतक्या चटकन म्हणूनच सत्य बोलून गेला, ‘‘मन असेल तर ना?’’

असं ‘मन’ नसूही शकतं याची मात्र कल्पनेतही कल्पना करू शकत नाही. रानात स्वैर बागडणार्‍या देखण्या हरणात क्षणात घायाळ करणारी निबर अवस्था हीच असेल का? अश्राप निरागसाला ‘चॉकलेट देतो’ म्हणून कुशीत घेऊन अत्याचार करणारं दुष्टपण कुठून येतं? ‘इथं आपल्याला दीडशे मजली टॉवर बांधता येईल, टाका रातोरात झोपड्या जाळून!’ असं जिवंत ‘माणसाला’ वाटू शकतं? दीड दमडीच्या सत्तेसाठी निष्ठा रातोरात बदलणारी बोटे कुठली असतात?

जीवनाला उत्तरार्ध असतो नि सारे अवयव शिणल्यावर यांच्या डोक्यावरून मायेने हात फिरवणारं कुणी असतं का? सगळ्यांना जे सोडून स्वार्थासाठी नव्यांना सोडत गेले, त्यांना अखेरी घुसमटत्या मध्यरात्री कोण असतं? का तेव्हाही ते अजून काही श्वास मिळाले तर नवा घोटाळा करू हाच विचार करत असतील?

विशेष म्हणजे, एका बड्या नेत्याला त्याच्या बड्या मूडमध्ये हा प्रश्न विचारला. त्याने जे उत्तर दिलं त्यानं मी नुसताच निरूत्तर झालो नाही तर कायमचा गप्प झालो या प्रश्नाबाबत.

मी विचारलं, ‘‘तुम्ही मंडळी वर्षानुवर्षे कोट्यवधी रूपये घोटाळ्यातून खाता. या इतक्या अमाप पैशाचं तुम्ही करता तरी काय?’’

त्यांनीच मला विचारलं, ‘‘तुम्ही कवी आहात. हळवे आहात. म्हणून तुम्हाला हे असले अतिसामान्य प्रश्न पडतात. तुम्हाला काय वाटतं? आम्हाला खूप पैसा हवाय म्हणून आम्ही हे करतो?’’

‘‘मग? दुसरं काय कारण असू शकतं?’’

‘‘अहो, राजा शिकारीला जातो. कशासाठी?’’

मीच बालवाडीतील विद्यार्थी झालो होतो नि ते मला उपप्रश्न विचारत होते. मी टक्क बघत राहिलो.

‘‘अहो, मी काय विचारतोय? राजा शिकारीला जातो तो कशासाठी?’’

‘‘काय हे साहेब? शिकारीसाठी!’’ मी आपला चेहरा शक्य तितका आज्ञाधारक करून म्हणालो.

‘‘करेक्ट! शिकार हरणाची! रानडुकराची! अगदी वाघाची! ठरवलं तर राजाच्या पायाशी आणून टाकतील ना शिपाई हरिण, रानडुक्कर, ससा, वाघ, काय हवं ते! पण त्यात राजाला मजा येत नाय! राजाला शिकार कुठली, यापेक्षा शिकार करण्यात मजा येते. तो त्याचा खेळ असतो. पाठलाग, ते काटेकुटे, कधी नेम चुकतो, मग नेम लागतो! या खेळात राजा रमतो…’’

ते साहेब हे सगळं मला का सांगत होते ते काही केल्या माझ्या मठ्ठ डोक्याला कळत नव्हतं पण कोडं सुटलं. पांढर्‍या कपड्यातल्या त्या साहेबांनी आपला गर्दसावळा हात बोटे खुपसत माझ्या खांद्यावर ठेवला नि काही क्षण माझ्या डोळ्यातच पाहीलं. मग हसून म्हणाले, ‘‘तसा आम्हाला पैशात इंटरेस्ट नाय! मोप जमिनी, बागा, हॉटेलं, बार, शेती, गुरंढोरं, कारखाने आहेत आमचे. सात पिढ्या नाय सात हजार पिढ्यांना पुरेल एवढं बक्कळ आहे पण केलेला घोटाळा लपवणं, कोर्ट कचेर्‍या, एक घोटाळा लपवायला दुसरा घोटाळा, सारखी दिल्ली ते गल्ली हेलिकॉप्टरनं धावाधाव, सारख्या आपल्या नावाच्या ब्रेकिंग न्यूज ही आमची नशा आहे नशा! तुम्ही कवी आहात! तुमची नशा कवितेची! आमची अशी, घोटाळ्यांची!’’

त्यानंतर माझे बरेच प्रश्न सुटले. आपण आपलं राष्ट्र, विकास, प्रगती, संस्कृती, प्रजेची सुखशांती, शैक्षणिक धोरणातून उत्तम माणसाची निर्मिती अशा क्षुल्लक कारणांसाठी लोक राजकारणात पडतात किंवा राजकारण करतात ह्या भाबड्या समजूतीत असतो. ती केवळ ‘नशा’ आहे हे माझ्यासारख्या सामान्य नागरिकाला माहितच नसतं. पंचाईत अशी झाली की, बालपणी वडिलांनी स्वातंत्र्यवीर सावरकर, नेताजी सुभाषचंद्र, वल्लभभाई पटेल, चापेकर बंधू, लालबहाद्दूर शास्त्री यांची चरित्रं वाचायला दिली. त्यामुळं नेतृत्व आणि राष्ट्रभक्ती वेगळी नसतेच, असंच मनात ठसलं.

मी तोच जुना चष्मा घेऊन नव्या मंडळींकडे पाहत होतो. म्हणून मनातने छोटे प्रसंग वयाबरोबर मोठे होत गेले. आता यापुढे कोणी कितीही कोटी कोटी हजारो कोटींचे घोटाळे करेल; ह्या पैशांचं ते काय करतात हा प्रश्नही मला पडणार नाही!

नि यांची पोटं एवढी मोठी कशी? यांची भूक भागतच नाही कशी? असले प्रश्नही मला पडणार नाहीत.

दिल्ली असो की गल्ली! क्षेत्र कुठलंही असो. व्यवसाय कुठलाही असो. कधीच न भरणार्‍या ह्या पोटांची संख्या गुणाकार पटीने वारेमाप वाढतच राहणार!

आता मला खरंच प्रश्न पडणार नाहीत. मोठं होणारं वयही आता संपत आलंय नि तो ‘चष्मा’ही पार दूर फेकून दिलाय.

‘चपराक प्रकाशन’च्या वाचनीय आणि दर्जेदार पुस्तकासाठी आणि ‘चपराक’चे सभासद होण्यासाठी संपर्क – 7057292092

चपराक

पुणे शहरातून ‘साहित्य चपराक’ हे मासिक आणि ‘चपराक प्रकाशन’ ही उत्तमोत्तम पुस्तके प्रकाशित करणारी ग्रंथ प्रकाशन संस्था चालविण्यात येते. ‘साहित्य चपराक’ मासिकाचा अंक दरमहा 10 तारखेला प्रकाशित होतो. आपले साहित्य पाठविण्यासाठी, ‘चपराक’मध्ये जाहिराती देण्यासाठी आणि नवनवीन पुस्तकांच्या माहितीसाठी संपर्क - घनश्याम पाटील, संपादक 'चपराक'.
व्हाट्सऍप क्रमांक - ८७६७९४१८५०
Email - Chaprak Email ID

One Thought to “यांची पोटं तरी केवढी?”

  1. Jayant Paradkar

    अप्रतिम लेख !!!

तुमची प्रतिक्रिया जरूर कळवा

हे ही अवश्य वाचा