श्रीमंत योगी

श्रीमंत योगी

उमेश सणस
शिवचरित्राचे व्यासंगी अभ्यासक
9822639110

‘साहित्य चपराक दिवाळी अंक 2021’

छत्रपती शिवाजी महाराज हे सतराव्या शतकानं मानवतेला दिलेलं एक वरदान आहे. छत्रपती शिवाजीराजांचा इतिहास हा गौरवशाली आहे. माणूस इतिहास घडवतो की इतिहास माणूस घडवतो हा नेहमीचा वादाचा विषय राहिलेला आहे. मात्र छत्रपती शिवाजीमहाराज या माणसानं जो गौरवशाली इतिहास घडवला तो इतका वैभवी आहे की त्या इतिहासाकडं बघता-बघता नव्यानं माणसं घडत राहिली आणि घडलेल्या माणसांनी पुन्हा नवा इतिहास घडवला. जगाच्या इतिहासात असा चमत्कार क्वचित घडतो. तो चमत्कार महाराष्ट्राच्या आणि मराठी मातीच्या पुण्याईनं आपल्याकडं घडला.

छत्रपती शिवाजी महाराजांबद्दलचं मराठी माणसांना असलेलं आकर्षण, प्रेम, आदर त्यामुळं वेगळं आहे. जगात पारतंत्र्यात असलेल्या प्रत्येक मानवसमूहाला प्रेरणा देण्याचं काम शिवचरित्र करतं. शिवाजी महाराजांनी गुलामगिरीच्या शृंखला तोडून माणसांना स्वातंत्र्याचं महत्त्व सांगितलं.

शहाजीराजे हे विजापूरच्या आदिलशहाकडं जहागीरदार होते. जहागिरदाराच्या मुलानं वडिलांपेक्षा मोठा जहागीरदार होण्याचं स्वप्न बाळगणं ही त्याच्या महत्त्वाकांक्षेची कमाल मर्यादा होती. अशा काळात छत्रपती शिवाजीमहाराजांनी आपल्या वडिलांप्रमाणे जहागीरदार होण्याचं नाकारलं आणि हिंदवी स्वराज्याचं स्वप्न पाहिलं. राजांनी फक्त ते स्वप्न पाहिलं नाही तर असं स्वप्न पाहणारी एक पिढी निर्माण केली. स्वतःचं स्वप्न आपल्या सहकार्‍यांच्या, समवयस्क लोकांच्या आणि आपल्यापेक्षाही आधीच्या पिढीच्या लोकांच्या मनात हे स्वप्न रूजवलं. इथल्या मातीतच ते रूजवलं. हिंदवी स्वराज्याचं हे स्वप्न घेऊन एक जनसमुदाय चालू लागला. एका अभ्यासकाच्या शब्दात सांगायचं तर ‘शिवाजीराजांनी झोपलेल्या समुदायाला जागं केलं, जे जागे होेते त्यांना उभं केले, जे उभे होते त्यांना चालतं केलं आणि जे चालत होते त्यांच्या खांद्यावर स्वराज्याचं निशाण दिलं. हा अवघा पराक्रम शिवाजीराजांनी पन्नास वर्षाच्या आयुष्यात केला.’

शिवचरित्राचा अभ्यास करत असताना अभ्यासकांना अनेक गोष्टींचा मोह पडतो. एकोणिसाव्या आणि विसाव्या शतकात शिवचरित्राच्या अभ्यासकांना जी अस्सल कागदपत्रे उपलब्ध होती त्यापेक्षा अधिक पुरावे, कागदपत्रं, दस्तऐवज पुढे येत आहेत आणि त्यामुळं ‘शिवाजी’ या अफाट व्यक्तिमत्त्वाची अनेक विलोभनीय अंगं लोकांच्या नव्यानं लक्षात येत आहेत. प्रत्येकजण शिवाजीमहाराजांकडं आणि त्यांच्या इतिहासाकडं स्वतःच्या दृष्टीनं पाहतो आणि महाराजांना स्वतःचा आदर्श मानण्याचा प्रयत्न करतो.

महाराष्ट्रातल्या अंधश्रद्धांचं निर्मूलन करणार्‍यांनाही ‘अंधश्रद्धांच्या विरूद्ध लढणारा पहिला योद्धा’ म्हणून शिवाजीमहाराज या नावाचा उल्लेख करावा लागतो. छत्रपती शिवाजीमहाराजांचा राजाराम नावाचा मुलगा पालथा जन्माला आला. मूल पालथं जन्माला येणं हे आमच्या सामाजिक परंपरेत अशुभ समजलं जातं. पालथं जन्माला आलेलं मूल हे बापाच्या मुळावर येतं असं समजलं जातं. त्यामुळं राजाराम महाराजांच्या जन्माची वार्ता शिवाजीराजांपर्यंत जाऊन त्यांना सांगायला कोणी तयार होईना! राजाराममहाराजांचा जन्म झाला, ‘तुम्हाला मुलगा झाला’ हे त्यांना सांगितल्यानंतर राजाकडून बक्षीस मिळेल हे माहीत असतानाही ‘मुलगा पालथा जन्माला आला’ हे सांगावं लागेल म्हणून लोक दबकत होते. अशा परिस्थितीत ही जबाबदारी जिजाऊसाहेबांनी स्वीकारली आणि शिवाजीराजांना सांगितलं की, ‘‘तुम्हाला मुलगा झाला; मात्र मूल पालथं जन्माला आलेलं आहे.’’

आजच्या काळातला एखादा बाप असता तर त्यानं पायात चप्पल घातली असती. एखाद्या गुरूजीकडं जाऊन त्यांना विचारलं असतं की ‘‘कोणती शांती करायची आहे का? जन्मवेळ बरोबर नाही का? आणखी एखादी पूजा किंवा दुसरे काही करता येईल का?’’

पण शिवाजीमहाराज काय बोलले ते कृष्णाजी अनंत सभासदानं ‘सभासद बखरी’त लिहून ठेवलं आहे. महाराज एवढंच म्हणाले, ‘‘पालथा जन्मास आला चिंता नाही. दिल्लीची पातशाही पालथी घालेल!’’

आपल्या शब्दांनी अपशकुनांचं रूपांतर शुभशकुनांमध्ये करण्याची अशी शक्ती आणि सामर्थ्य त्यांच्याकडं होतं.

शिवाजीमहाराजांनी आरमार उभं केलं. विसाव्या शतकाच्या सुरूवातीला महाराष्ट्रातल्या त्यावेळच्या काही राजकीय लोकांनी समुद्रपर्यटन केलं. हिंदू धर्मात समुद्रपर्यटन निषिद्ध मानलेलं आहे. हे निषिद्ध मानलेलं समुद्रपर्यटन त्याकाळच्या नेत्यांनी केलं म्हणून तेव्हाच्या धर्मपंडितांनी त्यांना शिक्षा ठोठावली आणि आपल्या राजकीय कार्यक्रमांना जनाधार रहावा म्हणून तेव्हाच्या नेत्यांनी ही शिक्षा निमूटपणानं भोगली. विसाव्या शतकात आमची ही अवस्था असेल तर सतराव्या शतकात स्वतःचं आरमार उभं करणारा राजा हा एका अर्थानं नवीन क्रांती करत होता आणि अंधश्रद्धांचं निर्मूलन करत होता हेही लक्षात घेतलं पाहिजे.

शिवाजीमहाराजांनी उभं केलेलं हे पहिलं भारतीय आरमार आहे. भारतीय आरमार उभं करणारा भारतीय राजा म्हणून त्यांच्याकडं बघितलं जातं. शिवाजीमहाराजांनी समुद्रपर्यटनाला असलेली बंदी मोडून एका अर्थानं रूढी आणि परंपरांना मोठा धक्का दिलेला आहे, ही गोष्टही लक्षात घेतली पाहिजे.

जो-जो ज्या-ज्या दृष्टीकोनातून शिवाजीमहाराजांकडे बघतो त्या-त्या दृष्टीकोनातून त्याला शिवाजीमहाराज आणि शिवचरित्र अनेक गोष्टी शिकवतं.

शिवाजी महाराजांनी घोडा हे राजाचं धन असेल म्हणून खाजगी घोडा वापरण्यासाठी लोकांना मज्जाव केला. कुठल्याही गावात सावकारांनी, देशमुखांनी, पाटलांनी, कुलकर्ण्यांनी, देशपांडेंनी मोठे वाडे आणि गढ्या बांधायच्या नाहीत, घोडा ठेवायचा नाही, अशा प्रकारचे आदेश महाराजांनी दिले. खाजगी वतनं देण्यास महाराजांनी विरोध केला. राजेशाही असली तरी महाराजांचं राज्य हे लोककल्याणकारी व्यवस्थेचं होतं. त्यात समाजवादाची मूलतत्त्वं आहेत हे शिवचरित्र अभ्यासताना लक्षात येतं. समतेचा आणि समाजवादाचा विचार भारताच्या भूमीत मांडणारा पहिला राजा म्हणून त्यांचं नाव समाजवादी विचारवंत घेतात.

शिवचरित्राकडं तुम्ही ज्या दृष्टीकोनातून पाहाल त्या दृष्टीकोनातून शिवाजीमहाराज तुम्हाला दिसतील. पारतंत्र्यात राहणार्‍या माणसांना स्वातंत्र्याची प्रेरणा देणारा राजा म्हणून ते भावतात. जगात जिथं जिथं पारतंत्र्य होतं तिथं तिथं महाराजांच्या चरित्रानं त्यांना प्रेरणा दिली. ज्यावेळी अमेरिकेचं व्हिएतनामवर आक्रमण झालं त्यावेळी आपल्या आक्रमकांविरूद्ध कसं लढायचं याचा वस्तुपाठ व्हिएतनामी जनतेनं शिवचरित्रातून घेतला असं अलीकडचा इतिहास सांगतो. शिवचरित्र हे जगातल्या सर्व देशांना आणि पारतंत्र्यातून स्वातंत्र्यात येण्याची महत्त्वाकांक्षा बाळगणार्‍या सर्व मानवसमूहांना वेगळ्या पद्धतीनं म्हणूनच एक प्रेरणा किंवा नवी दिशा देतं.

शिवाजीमहाराजांचं राजकारण हा सुद्धा त्यांच्या विलोभनीय प्रतिभेचा आविष्कार आहे. कोणाशी कधी युती करायची आणि कोणाशी कधी आघाडी करायची याबाबत शिवाजीमहाराज तज्ज्ञ होते. पुरंदरचा तह झाला. महाराजांना मोघलांशी तह करावा लागला. यानंतर शिवाजीमहाराज आणि मोघलांच्या संयुक्त फौजा आदिलशाविरूद्ध चालून गेल्या. महाराजांनी मोघलांशी तह करून आदिलशहाच्या विरूद्धचं युद्ध पुरंदरच्या तहानंतर सुरू केलेलं दिसतं. महाराज कर्नाटकात जेव्हा दक्षिण दिग्विजयासाठी उतरले त्यावेळी महाराजांनी स्वतंत्र राज्य निर्माण करत असताना कुतुबशहाशी सलोख्याचे संबंध निर्माण केले आणि औरंगजेब दक्षिणेत येतो आहे हे लक्षात आल्यानंतर महाराजांनी आदिलशहा, कुतुबशहा आणि स्वतःची महाआघाडीही स्थापन केली आणि आपल्या सर्व दाक्षिणात्य राज्यकर्त्यांना एकत्र येऊन औरंगजेब नावाच्या शत्रूचा पराभव करावा लागेल हे महाराजांनी त्यांना समजावून सांगितलं. महाराजांचं राजकारण हे त्याअर्थानं बहुआयामी राजकारण आहे.

अ‍ॅबे कॅरे नावाचा एक प्रवासी असं लिहितो की, ‘‘शिवाजीराजांना युरोपियन देशांशी सलोख्याचे आणि सौहार्दाचे संबंध ठेवायचे होते. शिवाजीमहाराजांना युरोपियन देशांकडून तोफा, बंदुका आणि दारूगोळा हवा होता. त्यासाठी हे संबंध त्यांना प्रस्थापित करायचे होते.’’

शिवाजीराजांचे फ्रेंचाशी संबंध सलोख्याचे होते. डचांशी त्यांचे संबंध वाईट नव्हते. त्यांनी डचांच्या हक्काचं संरक्षणही अनेक ठिकाणी केल्याचं दिसतं. डचांना फारसा उपद्रव राजांनी दिला नाही. मात्र शिवाजीमहारांनी त्यांना उपद्रव देणार्‍या ब्रिटिशांना आणि पोर्तुगिजांना मात्र वेळोवेळी सरळ केलेलं आहे, ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे.

शिवाजीमहाराजांचे ‘पॉलिसी बुक’ म्हणून ज्याचा उल्लेख केला जातो त्या ‘आज्ञापत्रात’ त्यांनी ब्रिटिशांबद्दलचं त्यांचं धोरण स्पष्टपणानं विशद केलेलं आहे. या धोरणांकडं भारतीयांचं आणि महाराजांनंतरच्या राज्यकर्त्यांचं दुर्लक्ष झालं म्हणूनच भारत ब्रिटिशांच्या अधिपत्याखाली गेला. महाराजांनी आज्ञापत्रात स्पष्टपणे म्हटलं आहे की, ‘‘टोपीकर हे वरकड सावकारांसारखे नव्हेत. टोपीकरांना स्वराज्यात व्यापारासाठी जागा द्यायची झाली तर अत्यंत नीच जागा त्यांना द्यावी. जर त्यांना चांगली जागा दिली तर एखादं स्थळ हाती आल्यास मेल्यावरही ते स्थळ हे लोक सोडणार नाहीत इतकी ही चिवट जात आहे. त्यांना राज्यकारभाराची हौस आहे.’’

ब्रिटिशांचा कावा, त्यांची कारस्थानी वृत्ती ओळखून महाराजांनी त्यांना वेळोवेळी धडा तर शिकवलेलाच आहे पण त्याहीपेक्षा ब्रिटिशांच्या पाऊलखुणा ओळखून ब्रिटिशांबद्दल सावध रहा, हे महाराजांनी त्यांच्या पॉलिसीबुकमध्ये सांगितलं होतं. नंतरच्या राज्यकर्त्यांनी त्याकडं पुरेशा गांभिर्यानं लक्ष दिलं नाही. ब्रिटिशांची पाऊलं, त्यांची दृष्टी ओळखण्याची क्षमता असलेला राजा आपल्या महाराष्ट्रात सतराव्या शतकात होऊन गेला. ब्रिटिशांनी अठराव्या आणि एकोणिसाव्या शतकात संपूर्ण भारत स्वतःच्या ताब्यात घेतला परंतु त्यांच्या वृत्तीच्या पाऊलखुणा महाराजांच्या लक्षात आल्याचं आपल्याला दिसतं. इतकी दूरदृष्टी असलेला दुसरा राजा भारताच्या इतिहासात आपल्याला दुसरा दिसत नाही.

भारतीय राज्यकर्ते आणि हिंदू राज्यकर्ते हे प्रामाणिक होते. पृथ्वीराज चौहानापासून ते रामदेवराय यादवांपर्यंत परकीय आक्रमणापुढे या सर्वांचा पराभव झाला. परकीय आक्रमकांनी साम, दाम, दंड आणि भेद या चारही नीतिबरोबरच कपटनीतिचा वापर करायचा आणि भारतीय राज्यकर्त्यांनी त्यांच्यापुढे सपशेल लोटांगण घालायचं हा प्रकार जवळजवळ आठ ते दहा दशकं सातत्यानं झालेला आपल्याला दिसतो. हा प्रकार थांबवला तो छत्रपती शिवाजीमहाराजांनी. अफजलखान नावाचा विजापूर दरबारातला सरदार महाराजांना ‘चढे घोडियानिशी कैद करून आणतो’ असं म्हणून स्वराज्यावर चालून आला. तो कूटनीतितला तज्ज्ञ होता. आपल्या राजकीय शत्रूंना आणि विरोधकांना भेटीसाठी बोलवून त्याला मारून टाकायचं, अशी त्याची कार्यशैली होती. त्याच्यापुढे त्यावेळी कोणीही टिकत नव्हतं. तोच प्रकार त्यानं शिवाजीमहाराजांविरूद्ध करायला सुरूवात केली. महाराजांनी त्याच्या भेटीला यावं म्हणून त्यानं त्याचा वकील कृष्णाजी भास्कर कुलकर्णी याला शिवाजीमहाराजांकडं पाठवलं. महाराजांनी अफजलखानावर पहिली मात इथं केली. महाराजांचा वकील पंताजी गोपीनाथ बोकील हा शिवाजीराजांचा निरोप घेऊन अफजलखानाकडं गेला आणि त्यानं अफजलखानाला प्रतापगडावर येण्याचं निमंत्रण दिलं. महाराजांनी अफजलखानाची कार्यपद्धती लक्षात घेऊन त्यालाच स्वराज्यात भेटीस बोलावलं आणि त्याची भेट घेतली. अफजलखानानं दगाबाजी केल्यानंतर दगाबाजी करणार्‍या शत्रूचा कोथळा काढण्याचं सामर्थ्य भारतीय राज्यकर्त्यांमध्ये असतं आणि असू शकतं हे महाराजांनी पहिल्यांदा दाखवून दिलं. परकीय आक्रमकांना त्यांच्याच भाषेत उत्तर दिलं जाईल, हे सांगणारा राज्यकर्ता ही शिवाजीमहाराजांची वेगळी ओळख आहे.

कोणत्याही राज्यकर्त्याची न्यायव्यवस्था किती चांगली आहे यावर त्याचं राज्य किती चांगलं आहे हे स्पष्ट होतं. राजांची न्यायव्यवस्था ही अत्यंत पारदर्शी होती. रांझे गावच्या पाटलानं एका स्त्रीवर अत्याचार केला. त्या पाटलाचं नाव बाबाजी गुजर असं होतं. त्या रांझे गावच्या पाटलाची तक्रार महाराजांकडं आली. ज्या दिवशी तक्रार आली, आजच्या भाषेत एफआयआर दाखल झाला त्याच दिवशी महाराजांनी बाबाजी गुजर पाटलाला पकडण्याचे आदेश दिले. तो बोलावूनही आला नाही. आजच्या भाषेत राजांनी समन्स काढलं पण तो आला नाही. महाराजांनी त्याला ‘मुसक्या बांधून’ समोर हजर करा, असा आदेश दिला. आजच्या भाषेत राजांनी त्याच दिवशी त्याला ‘नॉनबेलेबल वॉरंट’ काढलं आणि त्याला न्यायपीठासमोर हजर केलं गेलं. ज्या दिवशी तो हजर झाला त्याच दिवशी राजांनी त्याला विचारलं, ‘‘पाटील, तुम्हाला गुन्हा मान्य आहे का?’’ रांझे गावच्या पाटलानं गुन्हा नाकारला. थोडक्यात त्याच दिवशी त्याच्याविरुद्ध ‘चार्ज फ्रेम’ केला आणि महाराजांनी प्रकरणाची सुनावणी घेतली. त्यानंतर त्यात तो दोषी आहे असं आढळलं. महाराजांनी त्याचा ‘चौरंगा’ करण्याची म्हणजे त्याचे दोन्ही हात आणि दोन्ही पाय तोडण्याचा आदेश त्याच दिवशी दिला. तो आदेश दिल्यानंतर शिवाजीराजांकडं त्यानं ‘रहेम राजे रहेम’ म्हणून दया मागितली. आजच्या भाषेत त्यानं दयेचा अर्ज केला. तो त्यांनी प्रलंबित न ठेवता त्याच दिवशी निकालात काढला आणि सांगितलं की, ‘‘तुझा गुन्हा दया दाखवावा इतका साधा नाही’’ आणि त्याच दिवशी शिक्षेची अंमलबजावणी केली.

स्त्रियांच्या अत्याचाराबाबत इतकं जलदगतीनं न्यायदान महाराष्ट्रात सतराव्या शतकात होतं ही गोष्ट त्यांच्या न्यायपद्धतीचं विशेष द्योतक आहे.

स्त्रीवर अत्याचार करणारा रंगो त्रिमल कुलकर्णी असू देत किंवा सखोजी गायकवाड असू देत… महाराज त्यांना शिक्षा करताना कधी कचरले नाहीत. न्यायपीठासमोर आलेला गुन्हेगार हा कोणत्या जातीचा आहे, कोणत्या धर्माचा आहे हे त्यांनी पाहिलं नाही. न्यायदान करत असताना जो पीडित आहे, वंचित आहे त्याच्यावरचा अन्याय दूर व्हावा यासाठीचे प्रयत्न केलेत. राजांच्या अष्टप्रधान मंडळात ‘न्यायाधीश’ नावाचं एक स्वतंत्र पद होतं. महाराज स्वतः न्यायदान करायचे. महाराजांच्या आई जिजाऊसाहेब यांच्यापुढंही काही खटले चालायचे. स्वराज्यात न्यायदानाची एक निःस्पृह आणि चांगली व्यवस्था महाराजांनी उभी केली होती. चांगल्या आदर्श राज्यात न्यायव्यवस्था सुदृढ असणं गरजेचं असतं. राजांनी स्वराज्यासाठी अशी न्याययंत्रणा उभी केली होती. म्हणून त्यांचं स्वराज्य, त्यांनी निर्माण केलेली व्यवस्था इतर व्यवस्थांपेक्षा अधिक वेगळी, अधिक सक्षम आणि कार्यक्षम झालेली आपल्याला पहायला मिळते.

प्लेटो या ग्रीक विचारवंतानं एके ठिकाणी म्हटलं आहे की, ‘‘राजे हे तत्त्ववेत्ते असावेत आणि तत्त्ववेते हे राजे असावेत.’’

राजे हे जर तत्त्ववेते असतील तर त्यांच्या मनात स्वतःच्या काही कल्पना, काही स्वप्नं असतात. त्याची पूर्तता करण्याचं सामर्थ्य राज्यकर्ता म्हणून त्यांच्याकडं असतं. तशा कल्पना राबवणारा राज्यकर्ता असेल तर नवीन आणि चांगला समाज उभा राहू शकतो. तत्त्ववेते जर राजे असतील, त्यांच्या हातात सत्ता असेल तर त्यांच्या कल्पनांना मूर्त रूप देण्यासाठी ते प्रयत्न करू शकतात. जगाच्या इतिहासात राजा तत्त्ववेता आहे आणि तत्त्ववेता राजा आहे हे महाराजांच्या रूपाने पाहण्यात आलं. महाराज तत्त्ववेते होते हे समजून घेण्यासाठी ‘आज्ञापत्रा’चं वाचन करणं गरजेचं आहे. ते वाचत असताना राजांची तत्त्वज्ञानी वृत्ती जाणवते. हा राजा तत्त्वज्ञानी राजा होता. म्हणूनच त्यांनी असंख्य गोष्टींची अंमलबजावणी केली.

याचं छोटंसं उदाहरण द्यायचं झालं तर शिवाजीमहाराजांनी मराठी भाषेच्या विकासासाठी केलेला पहिला आदेश हा त्यांच्या राज्याभिषेकानंतरचा आहे. किंबहुना मराठी भाषेच्या संवर्धनासाठी आदेश काढणारा पहिला राज्यकर्ता अशी त्यांची आणखी वेगळी ओळख आहे. छत्रपती शिवाजीमहाराजांच्या राज्याभिषेकानंतर त्यांनी ‘राजव्यवहार कोश’ नावाच्या ग्रंथाची निर्मिती करण्यासाठी रघुनाथ पंडित यांची नेमणूक केली. राजव्यवहार कोश म्हणजे नेमकं काय? तर तत्त्पूर्वी फारसी, अरबी, उर्दू, हिंदी असे इतर भाषेतून आलेले जे दरबारी शब्द होते त्यामुळे दरबारी भाषा सामान्य माणसाला कळणं अत्यंत अवघड होतं. ही भाषा सोपी व्हायची असेल तर ती त्यांच्या भाषेतून देणं आवश्यक होतं. शिक्षण जसं लोकभाषेतून दिलं जावं तसं राज्यकारभार हा सुद्धा लोकभाषेतून चालावा ही धारणा असणारा जगाच्या इतिहासातला पहिला राज्यकर्ता ही महाराजांची ओळख आहे. शिवाजीराजांनी राजव्यवहारकोशाची निर्मिती केली. मग ते काम रघुनाथ पंडितांना सांगितलं की धुंडिराज व्यास यांच्याकडून पूर्ण करून घेतलं हा वादाचा विषय असला तरी राजव्यवहार कोश निर्माण करून राज्यकारभार मराठी भाषेतून चालावा यासाठी प्रयत्न करणारा पहिला राज्यकर्ता ही महाराजांची ओळख पुसली जात नाही.

मराठी भाषा ही समर्थ आहे, माय मराठी ही सामर्थ्यशाली आहे याचा आविष्कार महाराजांनी स्वतःच्या कृतीतून आणि वागण्यातून दिला आहे.

महाराजांच्या लष्कराबद्दल बोलायचं तर त्यांचं जे लष्कर होतं त्याची रचना अत्यंत वेगळी आणि चांगली होती. महाराजांच्या लष्कराबाबत परकीय अभ्यासकांनी लिहून ठेवलंय की त्यांच्या लष्कराला कमालीची शिस्त आहे. ‘‘राजांचं सैन्य हे लुटीतला एकही दागिना, छोटीशी वस्तू सुद्धा स्वतःकडे ठेवत नाही. सगळं राज्याकडं जमा केलं जातं,’’ हे लिहिलेलं आहे. ‘आज्ञापत्रा’त याही गोष्टी महाराजांनी आपल्या सेनाअधिकार्‍यांसाठी सांगितलेल्या आहेत की, ‘‘आपल्या प्रदेशातून जाताना रयतेच्या भाजीच्या देठालाही धक्का लागू देऊ नका. तुम्हाला जर का गलबतासाठी किंवा राज्यकारभारासाठी झाडं हवी असतील आणि ती झाडं रयतेकडून घ्यायची असतील तर जुनी, वठलेली झाडं त्यांच्याकडून विकत घ्या. तीही योग्य तो मोबदला देऊन घ्या. जर आंबा, फणस अशी नवी झाडं जर तुम्ही विकत घ्याल तर तसे करू नका. रयतेनं लेकराप्रमाणे माया लावून झाडं वाढवलेली असतात. त्यांच्या झाडांना, भाजीच्या देठालाही हात लावू नका,’’ इथपर्यंत स्वतःच्या सैन्यदलाला महाराजांनी आदेश दिले होते.

महाराजांची महाडजवळ पागा होती आणि त्या पागेच्या अधिकार्‍याला महाराजांनी लिहिलेलं एक पत्र उपलब्ध आहे. त्यात ते म्हणतात, ‘‘रात्रीची वेळ होईल. उंदीर सर्वत्र फिरत असतील. देवासमोर लावलेली एखादी वात उंदीर पळवेल. ती पेटती वात जर गवताच्या गंजीला लागली तर अख्खी गंज पेटेल आणि गुरांवर उपासमारीची वेळ येईल. तेव्हा नव्यानं पुन्हा वैरण आणि गुरांना खाण्यासाठी गवत निर्माण करावं लागेल अशाप्रकारची नासाडी होऊ नये यासाठी तुम्ही काळजी घ्या…’’

सैन्याला महाराजांनी शिस्त लावली, प्रेम दिलं, आत्मबलिदान म्हणजे काय हे समजावून सांगितलं, त्यांना आत्मविश्वास दिला. छत्रपती शिवाजीराजांनी गरीब आणि सामान्य शेतकर्‍यांच्या हातातला नांगर बाजूला ठेवून त्यांच्या हातात तलवार दिली आणि त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण करून त्यांच्याकडून विलोभनीय असा पराक्रम करवून घेतला. ही गोष्ट त्यांच्या सैन्याचा विचार करताना लक्षात घेतली पाहिजे.

महाराजांनी जे आरमार उभं केलं ते स्वतःच्या शक्तिवर आणि सामर्थ्यावर उभं केलं. मुंबईजवळच्या खांदरी उंदेरी बेटापासून ते मालवणच्या सिंधुदुर्गापर्यंत त्यांनी जलदुर्गांची मालिका उभी केली. कृष्णाजी अनंत सभासदाच्या शब्दात सांगायचं झालं तर ‘‘राजांनी सागरास पलाण घातले.’’

‘ज्याच्याजवळ गड त्याचीच भूमी’ असं मानलं तर ‘ज्याच्याजवळ जलदुर्ग त्याचाच समुद्र’ हे महाराजांनी स्वतः सांगितलेलं आहे. कोकणातील जबरदस्तीनं होणारी धर्मांतरं रोखायची असतील आणि कोकणच्या जनतेचं रक्षण करायचं असेल तर समुद्रावर आपली सत्ता असलीच पाहिजे, हे त्यांच्या लक्षात आलं होतं. जवळजवळ अख्ख्या हिंदुस्थानवर सत्ता गाजविणार्‍या मोघलांकडं स्वतःचं आरमार नव्हतं. आदिलशहाकडं आणि कुतुबशहाकडं सतराव्या शतकात स्वतःचं आरमार नव्हतं. अशा परिस्थितीत आरमार उभं करण्याची, ते सांभाळण्याची प्रेरणा महाराजांच्या मनात निर्माण होते, ही अद्भूत गोष्ट आहे. महाराजांनी केवळ आरमार उभं केलं नाही. ते अत्यंत शक्तिशाली होतं. स्थानिक लोकांना सोबत घेऊन महाराजांनी उभं केलेलं आरमार, त्यांच्यात निर्माण केलेली प्रेरणा आणि कोकण किनारपट्टीवर स्वतःची निर्माण केलेली सत्ता पाहिल्यानंतर महाराजांच्या कल्पक बुद्धिमत्तेचं आणि चातुर्याचं आश्चर्य वाटतं.

महाराजांच्या कर्नाटक स्वारीबद्दल आणि दक्षिण दिग्विजयाबद्दल बोलत असताना सर जदुनाथ सरकार शिवाजीमहाराजांबद्दल एके ठिकाणी म्हणतात, ‘‘शिवाजीमहाराज स्वराज्यापासून सातशे किलोमीटर दूर गेले ते फक्त लुटीसाठी आणि धनासाठी गेले; कारण इतक्या दूर जाऊन तिथं एखादं राज्य निर्माण करणं हे राजांचं स्वप्न नव्हतं. राजांना धन आणि वैभव गोळा करण्याकरिता, लूट गोळा करण्याकरिता जावं लागलं.’’

महाराजांची स्वप्नं काय होती? त्यांची स्वप्नं हीही एकदा आम्ही समजावून घेतली पाहिजेत. संभाजीराजांनी राजा रामसिंहाला लिहिलेल्या एका पत्रात लिहिलंय, ‘‘संपूर्ण हिंदुस्थान आपल्याला यवनांच्या तावडीतून मुक्त करायचाय.’’ हेच महाराजांचं स्वप्न होतं. दक्षिणेतल्या कावेरी, नर्मदा आणि कृष्णा आणि उत्तरेतल्या गंगा, यमुना, सतलज आणि सिंधू या परकीय आक्रमकांच्या, यवनांच्या ताब्यातून मुक्त करणं आणि संपूर्ण हिंदुस्थान मुक्त करणं हे त्यांचं स्वप्न होतं. युरोपियन राज्यकर्त्यांशी स्नेहाचे संबंध प्रस्थापित करणं ही शिवाजीमहाराजांची महत्त्वाकांक्षा होती कारण त्यांचं स्वप्न हा देश गुलामगिरीतून आणि पारतंत्र्यातून मुक्त करण्याचं होतं. हे लक्षात न आल्यानं ‘महाराज लूट करण्याकरिता कर्नाटकात गेले’ असं सांगण्याची चूक सर जदुनाथ सरकारांनी केलेली आहे.

एका बाजूला अत्यंत धार्मिक असहिष्णु वृत्ती असलेला औरंगजेबासारखा मुघल राज्यकर्ता दिल्लीत काम करत असताना त्याच्याविरूद्ध शिवाजीराजांसारखा सहिष्णु राज्यकर्ता काम करतो हे विलक्षण आहे. औरंगजेबानं हिंदुंवर जिजिया कर लादला. औरंगजेबानं मथुरेतलं कृष्णमंदिर फोडलं. मुस्लिमांना व्यापारात विशेष सवलती दिल्या. राज्यकारभार करताना औरंगजेबानं कडवी धार्मिक वृत्ती बाळगल्याचं आपल्याला स्पष्टपणे दिसून येतं. अशावेळी शिवाजीराजांची सहिष्णुता ही अधिक नजरेत भरते. शिवाजीराजांनी त्यांच्याकडं नोकर्‍या देताना, त्यांच्याकडं काम करणार्‍या माणसांना केवळ गुणवत्तेचा निकष बघून मोठं केलेलं आहे. महाराज अफजलखानाला भेटायला गेले. इब्राहिम सिद्दी बर्बर नावाचा एक मुस्लिम अंगरक्षक महाराजांसोबत होता. त्यांनी त्याला त्याच्या गुणवत्तेच्या आधारावर निवडलेले होते. माणसाची गुणवत्ता बघून माणसाला स्थान देणं आणि त्याच्याकडून पराक्रम करवून घेणं हे महाराजांनी केलेलं आहे.

सतराव्या शतकात जातीयता असताना वेगवेगळ्या जातींची गुणवत्ता शोधून महाराजांनी त्यांना स्वराज्यात स्थान दिलेलं आहे. आपल्या दहा अंगरक्षकापैकी जिवा महाला, जिवाजी सकपाळ याला बरोबर घेत असताना तो कोणत्या समाजाचा आहे याचा महाराजांनी विचार केला नव्हता. त्याची गुणवत्ता ही महाराजांनी पारखली होती आणि त्या गुणवत्तेला न्याय देण्यासाठी महाराजांनी त्याची निवड केलेली होती.
औरंगजेबासारख्या शत्रूसोबत लढणं आणि विजय मिळवणं हे सतराव्या शतकात कुणालाही जमलेलं दिसत नाही. औरंगजेबानं त्याची सत्ता प्रस्थापित करत असताना त्याच्या सख्ख्या तीन भावांना ठार मारलं आणि वडिलांना कायमचं कैदेत टाकलं होतं. औरंगजेब एके ठिकाणी असं म्हणतो, ‘‘राजकारणात काही कामं संकेत आणि इशारे देऊन करायची असतात.’’

संकेत आणि इशारे देऊन कामं करण्यात वाकबगार असलेल्या औरंगजेबाचा आयुष्यात सगळ्यात मोठा पराभव छत्रपती शिवाजीमहाराजांनी केलेला आहे. 1681 ते 1707 अशी सत्तावीस वर्षे दक्षिणेत फिरणारा औरंगजेब एकच गोष्ट सातत्यानं म्हणत होता की, ‘‘आग्य्राला शिवाजी आलेला असताना मी त्याला सुटू दिलं ही माझ्या आयुष्यातली सगळ्यात मोठी चूक आहे.’’

1707 ला औरंगजेब पुन्हा उत्तरेकडं जायला निघालेला असताना आपल्या मुलांना तो शेवटच्या भेटीत बोलावून हेच सांगत होता की ‘‘मराठ्यांच्या नादी लागून मी चूक केली आणि मोघल साम्राज्याची दुर्दशा करून घेतली.’’

छत्रपती शिवाजीमहाराजांनी निर्माण केलेली स्वातंत्र्याची प्रेरणा आणि ज्योत लोकांना लढण्याचं एवढं सामर्थ्य देऊन गेली.

शिवचरित्रामधून सामान्य माणसाच्या मनात त्यागाची आणि बलिदानाची प्रेरणा निर्माण झाली, हे महाराजांचं सर्वात मोठं योगदान आहे.

बाजीप्रभू देशपांडे आणि फुलाजीप्रभू देशपांडे या दोघांनीच घोडखिंड लढवलेली नाही. बांदलांचे तीनशे मावळे त्यात आहेत. तीनशेपेक्षा अधिक लोकांनी एकावेळी छत्रपती शिवाजीमहाराज या एका व्यक्तिसाठी आत्मसमर्पण केलेलं आहे. बाजीप्रभू देशपांडे यांचं प्रसिद्ध वचन आहे, ‘‘मी साहेबकामासाठी धारातीर्थी पडलो तरी माझी बायका-पोरं उपाशी राहणार नाहीत आणि पुढच्या पिढीचं कल्याण होईल याची खातरी आहे.’’

ही खातरी एकट्या बाजीप्रभूंच्या मनात नव्हती तर धारातीर्थी पडलेल्या बांदलांच्या प्रत्येक मावळ्यात होती. असं सामुदायिक आत्मसमर्पण करण्याची प्रेरणा जगाच्या इतिहासात क्वचित दिसते.

शिवा काशिद हा एकटा नाही. त्याच्यासारखे हजारो मावळे महाराजांनी निर्माण केलेले आहेत. ज्यांना आपल्या आत्मसमर्पणानं स्वराज्य मोठं होईल असं वाटत आलेलं आहे. हा प्रकार पूर्वी कधी झालेला दिसत नाही आणि नंतर होईल असंही वाटत नाही.

आपल्याला काही मिळत नाही हे बघितल्यानंतर आपला राजकीय गट, पक्ष बदलणारे आजचे विसाव्या आणि एकविसाव्या शतकातले राज्यकर्ते पाहिल्यानंतर काहीच मिळण्याची शक्यता नसताना आणि केवळ मृत्यू समोर दिसत असताना ‘जय भवानी, जय शिवाजी’ म्हणत मृत्युला सामोरं जाणारी माणसं महाराजांनी उभी केली हे जगाच्या इतिहासात महाराजांचं सर्वात मोठं योगदान आहे.

शिवाजीमहाराजांनी उभ्या केलेल्या कान्होजी जेधे, तानाजी मालुसरे, बाजीप्रभू देशपांडे, फुलाजीप्रभू देशपांडे, मोरोपंत पिंगळे, निराजी रावजी, राघोची मित्रा, सर्जेराव जेधे, येसाजी कंक, बाजी पासलकर या लोकांची जर मालिका पाहिली तर अत्यंत कर्तृत्वसंपन्न माणसं शिवकाळात उभी राहिलेली दिसतात. एखाद्या काळात इतकी कर्तृत्ववान माणसं उभी राहिल्याची उदाहरणं जगाच्या इतिहासात फार अपवादानं आहेत. जर चांगलं नेतृत्व मिळालं, त्या नेतृत्वानं जनसमुदायाला चांगली दिशा दिली तर सामान्य माणसातून असामान्य कर्तृत्व उभं राहतं हे जाणून घ्यायचं असेल तर शिवाजीमहाराज आणि त्यांचा इतिहास हा वाचून घ्यावा लागेल.

राजांनी ज्यांच्या ज्यांच्या हातात तलवार दिली त्यांनी मोठा पराक्रम केलाय. मग महाराजांनी ज्यांच्या हातात तलवार दिली असे मोरोपंत पिंगळे असू देत, येसाजी कंक असू देत किंवा मुरारबाजी देशपांडे असू देत. माणसांच्या त्यागाची आणि बलिदानाची उदाहरणं जेवढी शिवचरित्रात सापडतात तेवढी अन्यत्र कुठंही सापडत नाहीत.

कर्नाटक दिग्विजयाच्या वेळी बाजी उर्फ सर्जेराव जेधे यांचा मुलगा मरण पावला. आपल्या मुलाचं शव आपल्या मूळ गावी अंत्यविधीसाठी त्यांनी पाठवलं. महाराजांना कुणीतरी सांगितलं, ‘‘बाजी जेधे हे मुलाच्या मृत्युनंतर गावी गेले नाहीत. मुलाच्या मृत्युनंतर त्याची विधवा पत्नी सती गेली पण बाजी गेले नाहीत.’’

महाराजांना अतिशय दुःख झालं. महाराज सैन्यात त्यांना भेटायला गेले आणि म्हणाले, ‘‘तुम्ही घरी जा. मी तुम्हाला सांगितलं होतं…’’

त्यावर बाजी म्हणाले, ‘‘मोहिम अर्धवट टाकून परत जाण्याची रीत ही जेध्यांच्या घराण्यात नाही.’’

अशी माणसं उभी करणं हे जगाच्या इतिहासात अन्य कुणाला जमलं नाही.

कुणाकडून आमिषं मिळाल्यानंतर कंपन्या बदलणारे आयटी सेक्टरमधले अभियंते असू देत, राजकीय पक्षांचे कार्यकर्ते असू देत. त्यांनी ही गोष्ट कधीतरी लक्षात घेतली पाहिजे. मुरारबाजी देशपांडे वज्रगडावरून खाली आलेला होता आणि दिलेरखानाशी लढत होता. दिलेरखानानं लढाई थांबवली आणि सांगितलं, ‘‘अरे तुझ्यासारखा शूर माणूस मी बघितला नाही. मी तुला कौल देतो. तू शिवाजीचा त्याग कर आणि मोघलांकडे ये. औरंगजेब बादशहाला सांगून मी तुला मोठी जहागिरी देतो.’’

आजच्या काळातला मुरारबाजी असता तर त्यानं सांगितलं असतं, महाराज शेवटचा निरोप इथंच घ्या. सेंड ऑफ नको. तुमच्याकडं फार काही मिळणार नाही. चांगली संधी आलीय, प्रमोशनही फार लवकर होणार आहे. रिस्कही नाही… मात्र मुरारबाजीची प्रतिक्रिया ही इतिहासात नमूद केलेली आहे ती अद्भूत आहे. मुरारबाजीनं उत्तर देण्यापूर्वी तो दिलेरखानाकडं बघून थुंकलेला आहे आणि म्हणालाय, ‘‘अरे शिवाजीराजांचा शिपाई मी! तुझा कौल घेतो की काय?’’

अशी माणसं जगाच्या इतिहास पूर्वी कधीच निर्माण झाली नाहीत. शिवकाळातच आणि राजांच्या अवतीभोवतीच अशी माणसं का निर्माण झाली हेही समजून घेतलं पाहिजे.

शिवाजीमहाराजांनी केलेले संस्कार आणि त्यांनी सामान्य माणसाच्या मनात जे पेरलं आहे त्या स्वप्नांनी अशी माणसं शिवकाळात घडलेली दिसतात.

एखादा जनसमूदाय 37 वर्षाचं महायुद्ध कोणाविरूद्ध लढू शकतो, ही फार अवघड गोष्ट आहे. 4 फेब्रुवारी 1670 ला शिवाजीराजांनी मोघलांविरूद्धचं त्यांचं युद्ध सुरू केलं आणि तानाजी मालुसर्‍यांना कोंढाण्याचा किल्ला जिंकण्यासाठी त्या दिशेनं पाठवलं. तानाजी मालुसर्‍यांनी कोंढाण्याचा किल्ला जिंकला आणि शिवाजीमहाराज आणि औरंगजेब यांच्यातील लढाई सुरू झाली. ही लढाई औरंगजेबाच्या मृत्युनंतर 3 मार्च 1707 ला संपली. या प्रदीर्घ लढाईत औरंगजेबाचा आणि मोघलांचा दारूण पराभव झालाय. या लढाईतली पहिली दहा वर्षे महाराज स्वराज्यात आहेत. महाराजांच्या मृत्युनंतर मराठे सत्तावीस वर्षे मुघलांशी लढले आहेत. 37 वर्षानंतरच्या लढ्यानंतर औरंगजेब निराश होऊन उत्तरेत परतायला निघाला. 37 वर्षानंतर उत्तरेत परतू पाहणारा औरंगजेब उत्तरेत गेला नाही. महाराष्ट्राच्या मातीत खुलताबादला मराठ्यांनी त्याला गाडलं आहे. अशा पद्धतीनं 37 वर्षाचा प्रदीर्घ लढा माणसं लढतात आणि स्वतःच्या स्वप्नासाठी सर्वस्वाची होळी करतात हाही प्रकार जगाच्या इतिहासात दिसत नाही.

माणसं कुणासाठीही आत्मसमर्पण करत नाहीत. कुणीतरी जहागीरदाराचा मुलगा जहागीरदार व्हावा, यासाठी ही माणसं लढत नव्हती. कुण्यातरी आमदाराचा मुलगा खासदार व्हावा आणि खासदाराचा मुलगा मंत्री व्हावा यासाठी माणसं लढत नाहीत. आपल्याला काय मिळतं हे बघून माणसं लढत असतात. आपल्याला काहीच मिळणार नाही हे माहीत असताना आणि आपल्यानंतरच्या पिढ्यांना याहूनही हलाखीचे दिवस येतील हे माहीत असताना ‘शिवाजी’ नावाचा मंत्र मनात ठेवत ही माणसं 37 वर्षे लढलेली आहेत. ही लढाई हिंदवी स्वराज्याच्या स्वप्नासाठी होती.

दोन राज्याचं आकर्षण भारतीय माणसांना सतत वाटत आलंय. रामराज्याचं स्वप्न भारतीय जनतेनं जसं अनेकदा पाहिलं तसं रामराज्यानंतर ज्या राज्याचं स्वप्न गेली अनेक वर्षे भारतीयांनी पाहिलं ते राज्य म्हणजे स्वराज्य आहे. ते राज्य म्हणजे शिवशाही आहे. ते राज्य म्हणजे शिवाजीमहाराजांचं आहे. आदर्श राज्य निर्माण करण्यासाठी महाराजांनी प्रयत्न केलेले होते. हे प्रयत्न लोकांनी पाहिलेले होते.

तानाजी मालुसरे हे महाराजांना मुलाच्या लग्नाची पत्रिका द्यायला आले आणि महाराजांनी ‘‘कोंढाणा किल्ला जिंकायचा आहे’’ असं सांगितल्यावर मुलाचं लग्न बाजूला ठेवून तानाजी कोंढाण्यावर गेलेत. ही प्रेरणा त्यांना कुठून मिळाली? याचाही इतिहास थोडासा बारकाईनं पाहिला पाहिजे. 5 सप्टेंबर 1659 ला राजगडावर सईबाईसाहेबांचा मृत्यू झाला. 10 नोव्हेंबर 1659 ला म्हणजे दोन महिने आणि चार ते पाच दिवसानंतर शिवाजीमहाराज अफजलखानाला भेटलेले आहेत. पत्नीच्या मृत्युचं दुःख करत, पत्नीच्या दुःखानं व्याकूळ होत हा माणूस स्वस्थ बसलेला नाही. अफजलखानाशी लढाईसाठी कुठल्याही प्रकारची रजा न घेता, कुटुंबात न राहता शिवाजीमहाराज आपल्या कामासाठी, कर्तव्यासाठी उभे राहिलेले तानाजींनी पाहिलेले आहेत. आपल्या पत्नीच्या मृत्युनंतर जर आपला राजा, आपला सहकारी, आपला मित्र घरी न बसता हिंदवी स्वराज्याच्या स्वप्नासाठी लढत असेल तर मुलाचं लग्न बाजूला ठेवून कर्तव्यावर जायला दुसरा सहकारी निश्चित तयार होतो. त्यासाठी त्याच्यासमोर असणारा आदर्शही तसा असावा लागतो. मावळ्यांच्या, सैनिकांच्या आणि सहकार्‍यांची प्रेरणार असणारे महाराज किती मोठे होते, हेही या अर्थानं आपण समजावून घेतलं पाहिजे.

शिवाजीमहाराजांनी निर्माण केलेलं स्वराज्य हे भौगोलिक भागाचा विचार केल्यास आजच्या पाच ते सात जिल्ह्यांएवढं होतं. महाराष्ट्र आणि कर्नाटकचा परिसर त्यात होता. महाराजांनी एक कोटी होनांचं स्वराज्य स्थापन केलं. मोघल साम्राज्याचा विचार केला तर आजचा पाकिस्तान आणि बांगलादेशसुद्धा औरंगजेबाच्या ताब्यात होता. शिवाय उर्वरित अख्खा हिंदुस्थान ताब्यात असताना सुद्धा चार-पाच जिल्ह्यांचं हे राज्य नष्ट करण्याकरिता दिल्लीचं वैभव सोडून इकडं येणं भाग आहे ही खूणगाठ औरंगजेबानं बांधली आणि प्रचंड सेनासागर घेऊन औरंगजेब दक्षिणेत उतरला आहे.

औरंगजेबाचं दक्षिणेत येण्याचं सर्वात मोठं कारण असं आहे की त्याला हे जाणवलं होतं की जर आपण दक्षिणेत आलो नाही आणि शिवाजीराजांच्या स्वराज्यावर आक्रमण केलं नाही तर उद्या शिवाजीराजा हा उत्तरेत येणार आहे आणि दिल्ली काबीज करण्याचा प्रयत्न करणार आहे. हे दिसल्यामुळं आणि एकदा शिवाजीराजा उत्तरेच्या दिशेनं यायला लागला तर राजस्थानातले रजपूत, पंजाबमधले शीख, आसाममधले स्थानिक हे आपल्याविरूद्ध बंड करतील आणि विरोधात उभे राहतील, त्यापेक्षा आपल्यालाच दक्षिणेत उतरलं पाहिजे हे दूरदृष्टी असलेल्या औरंगजेबाला जाणवलं होतं, हेही लक्षात घ्यायला हवं.

तुर्कस्थानचा कोणीतरी शाहिस्तेखान ही पदवी असलेला नबाब, ज्याला प्रतिऔरंगजेब म्हटलं जायचं तो पुण्यात येतो आणि महाराजांच्या घरात, लालमहालात मुक्काम करतो. कल्पकता म्हणजे काय असतं? हे महाराजांकडून शिकायला हवं. ‘गनिमी युद्घपद्धतीचे जनक’ असं त्यांना मानलं जातं. ही युद्धपद्धती काय असते हे शिवचरित्रातील अनेक प्रसंगातून शिकण्यासारखी आहे. महाराज लालमहालात गेले, शाहिस्तेखानाची बोटं तोडली आणि महाराज लालमहालातून बाहेर पडले. आपला पाठलाग होणार हे माहीत होतं. पाठलागावर जाणार्‍या सैनिकांबरोबर महाराज लाल महालातून बाहेर पडले. कात्रजच्या डोंगरात झाडांना आणि बैलाच्या शिंगांना पलिते बांधलेले होते. शाहिस्तेखानाचं सैन्य कात्रजच्या दिशेनं गेलं आणि महाराज सुखरूप सिंहगडावर पोहोचले. ‘शत्रूचा कात्रज करणं’ ही म्हण त्यानंतर मराठी मुलखात प्रचलित झाली. गनिमी कावा म्हणजे काय हे समजून घ्यायचं असेल तर त्यांचा हा प्रसंग समजून घेतला पाहिजे.

महाराज औरंगजेबाच्या तावडीतून सुटले. महाराज दक्षिणेकडं प्रवास करू लागले. बाल संभाजीराजे यांना मथुरेत ठेवलं गेलं. संभाजीराजांचा शोध थांबावा यासाठी शिवाजीमहाराजांनी ‘संभाजीराजे मरण पावले’ अशी अफवा वाटेत उठवली. ही अफवा शेवटपर्यंत ठेवली. संभाजीराजे स्वराज्यात परत आले त्याचवेळी ही अफवा आहे हे कळलं. तोपर्यंत हे खोटं प्रत्येकाला खरं वाटलं होतं. आपल्या मुलाच्या मृत्युची अफवा उठवायची, त्याला सुरक्षित ठेवायचं आणि स्वराज्यात आणायचं यातून ‘गनिमीकावा’ या शब्दाला किती गहन अर्थ आहे हे महाराजांनी वारंवार दाखवून दिलं आहे.

शिवाजीमहाराजांच्या जीवनात नाट्य आहे. त्यांच्या कर्तृत्वात नाट्य आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट महाराज संघर्ष व युद्ध सुरू असताना कधी पाठीमागे राहिले नाहीत. मोघलांचे आणि तत्त्पूर्वीचे राज्यकर्ते होते ते पिछाडीला असायचे. राखीव सैन्यात बसायचे आणि मोठमोठ्या लढाया लढायचे. हा प्रकार महाराजांकडं नव्हता. अफजलखानाला भेटायला जाताना महाराज स्वतः शिरस्त्राण घालून पुढं गेेलेत. लालमहालात महाराज स्वतः जातात. पन्हाळ्यावरून स्वतःची सुटका करून घेतानाही ते स्वतः आघाडीवर आहेत. महाराज कधी पाठीमागं राहिले नाहीत. दुसर्‍यांदा सुरत लुटून महाराज स्वराज्यात येत असताना मोघल सरदार त्यांना अडवायला येतात. महाराज स्वतः तलवार हातात घेऊन उभे राहतात. अफजलखानवधानंतर महाराज कोल्हापूरपर्यंतचा परिसर जिंकत जातात. पुढून फाजलखानाचं सैन्य येतं. बखरकाराचं वर्णन असं आहे की, ‘‘खासा राजा लढाईस उभा राहिला.’’ महाराज स्वतः लढाईला उभे राहतात. ते पाठीमागे उभे राहून मार्गदर्शन करत नाहीत. कार्यकर्त्यावर केसेस होताहेत आणि नेता घरात बसलाय असा प्रकार त्यांच्याकडं नव्हता.

महाराजांच्या लढण्यातून सामान्य सैनिकाच्या मनात प्रेरणा निर्माण होते.

त्यांच्या गनिमी युद्धनीतीबद्दलचं एक उदाहरण सांगितलं पाहिजे. शिवाजीमहाराज 3 एप्रिल 1680 ला मृत्यू पावले. त्यांच्या मृत्युची बातमी मुंबईच्या ब्रिटिश वखारीतून सुरतेच्या वखारीत कळवली गेली. त्यानंतर सुरतेच्या गव्हर्नरनं मुंबईवाल्यांना कळवलं, ‘‘शिवाजीचा बरेच वर्षे मुंबईवर डोळा आहे. सावध रहा. स्वतःच्या मृत्युची अफवा पसरवायची आणि कुठंतरी हल्ला करायचा असा प्रकार शिवाजीराजानं बर्‍याचदा केलाय. गेली दहा वर्षे शिवाजीराजा सुरतेला आला नाही. आम्हालाही सावध राहणं गरजेचं आहे.’’

ते मृत्यू पावल्यावरही त्यावर शत्रू विश्वास ठेवायला तयार नसणं यापेक्षा वेगळा गनिमी कावा तो कोणता?

शिवाजीमहाराज हे आदर्श पुत्र आहेत. ते मातृभक्त होते. पितृभक्त होते. याची असंख्य उदाहरणं शिवचरित्रात सापडतात. महाराज हे आदर्श पिता होते. मुलावर चांगले संस्कार करून मुलाला लढाईसाठी उभं राहण्याचं सामर्थ्य आणि जीवनात त्यांना आत्मनिर्भर करण्याचं सामर्थ्य त्यांनी दाखवलंय. छत्रपती शिवाजीमहाराजांनी जगावं कसं हे आम्हाला शिकवलं तसं महाराजांच्या मुलानं, म्हणजे संभाजीमहाराजांनी मरावं कसं? हेही मानवतेला शिकवलं आहे. ‘मरावं कसं?’ हे शिकवणारा मुलगा तयार करणारा पिता ही महाराजांची आणखी वेगळी ओळख आहे. महाराज हे आदर्श सहकारी होते. ते तानाजी मालुसरे, येसाजी कंक, बाळाजी देशपांडे, चिमणाजी देशपांडे यांचे आदर्श मित्र होते. महाराज हे आदर्श पती होते, आदर्श सेनापती होते, आदर्श राजा होते.

हे सगळे आदर्श जसे रामायणात सापडतात तशा प्रकारे आदर्शवादाची स्वप्नं पाहणार्‍या माणसांना शिवचरित्रात सर्व प्रकारचे आदर्श सातत्यानं दिसून येतात. अशाप्रकारचा आदर्शवादी राजा सहसा पहायला मिळत नाही.

महाराजांचा आदर्श जसा विलोभनीय आहे तसेच खाफीखानानंही मान्य केलेला त्यांचा एक महत्त्वाचा गुण म्हणजे ‘चारित्र्यसंपन्नता.’ ज्या काळात भारतीय राजकारणात चारित्र्यहीन माणसं राहत होती, चारित्र्याला फारशी किंमत नव्हती त्या काळातला, सतराव्या शतकातला हा चारित्र्यवान राजा आहे, असं प्रमाणपत्र औरंगजेबाचा इतिहासकार असलेल्या खाफीखानानं दिलेलं आहे.

‘‘परमुलखातून प्रवास करताना एखादी अबला शत्रू स्त्री दिसली किंवा परधर्मियांचा धर्मग्रंथ दिसला तर शिवाजीराजा त्याची काळजी घेतो, त्या धर्मियांकडं, त्या त्या कुटुंबीयांकडं त्यांना पाठवतो’’
हे खाफीखानानं आवर्जून नमूद केलेलं आहे.

महाराजांना नाचगाण्याची आवड नव्हती. वैयक्तिक छंद नव्हते. वैयक्तिक सवयी, व्यसन तर नव्हतंच नव्हतं. या गोष्टी करण्यासाठी आपला जन्म झाला नाही आणि या गोष्टी करण्यासाठी आपल्याकडं वेळही नाही यावर त्यांचा विश्वास होता.

महाराजांचं आर्किटेक्चर आणि त्यांचं बांधकाम या गोष्टीही विशेषत्वानं लक्षात घ्यायला हव्यात. त्यांनी महाराष्ट्र आणि कर्नाटकात तीनशेपेक्षा अधिक किल्ले उभारले. त्यातले अनेक किल्ले त्यांनी स्वतः बांधले आहेत. रायगडसारखा किल्ला महाराजांनी ताब्यात घेतला तरी त्याची पुनर्बांधणी महाराजांनी केली. प्रतापगड स्वतः बांधला. मालवणचा सिंधुदुर्ग त्यांनी स्वतः बांधला. जंजिर्‍याचा किल्ला जिंकता येत नाही हे लक्षात आल्यावर तिथून जवळच त्यांनी पद्मदुर्ग हा किल्ला बांधला. महाराजांच्या बांधकामाचा आणि त्यांच्या स्थापत्यशास्त्राचा विचार केला तर हे अद्भूत आहे. महाराज आग्य्राला गेलेले असताना स्वतःच्या घरचे दागिने गहाण ठेवून हिरोजी इंदलकर नावाच्या महाराजाच्या अभियंत्यानं सिंधुदुर्गाचं बांधकाम पूर्ण केलेलं आहे. लोकांचे पैसे गोळा करून पळून जाणारे व्यावसायिक आज सर्वत्र दिसत असताना ज्यानं बांधकाम करायला सांगितलंय तो कैदेत असताना स्वतःच्या घरचे दागिने गहाण ठेवून बांधकाम करण्याची प्रेरणा अभियंत्याच्याही मनात निर्माण करणारा राज्यकर्ता म्हणून शिवाजीमहाराजांकडं त्याही नजरेनं बघावं लागेल.

शिवकालीन तळी, शिवकालीन बंधारे आणि महाराजांनी बांधलेले अनेक पूल आजही सुस्थितीत आहेत. महाराजांच्या स्थापत्याचा वेगळ्या दृष्टीनं विचार करण्याची गरज आहे. त्यांचा सार्वजनिक बांधकाम विभाग अत्यंत भक्कम होता. त्यातून महाराजांच्या दूरदृष्टीचा प्रत्यय येतो..

शिवचरित्रातून शिकण्यासारखी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट कोणती असेल तर महाराज परिस्थितीला कधीच शरण गेले नाहीत. महाराजांच्या आयुष्यातला एकही प्रसंग असा नाही की त्याच्या मागे दुःखाची किनार नाही. 5 सप्टेंबर 1659 ला सईबाईसाहेब मरण पावल्या आणि 10 नोव्हेंबरला महाराजांनी अफजलखाना मारले. महाराज सुरत लुटून आले आणि त्यांना बातमी मिळाली ती त्यांच्या वडिलांच्या, शहाजीराजांच्या मृत्युची. त्यांच्या राज्याभिषेकाच्या अगोदर, 6 जून 1674 च्या अगोदर काही महिने महाराजांच्या पत्नी काशीबाई मरण पावलेल्या आहेत. राज्याभिषेकानंतर काही दिवसांनी आई मरण पावलेल्या आहेत. महाराज दक्षिण दिग्विजय करून आले आणि काही दिवसात संभाजीराजे मोघलांना मिळालेत. निखळ सुखाचे आणि समाधानाचे प्रसंग महाराजांच्या आयुष्यात आलेले नाहीत. तरीही ते निराश झाले नाहीत. परिस्थितीला शरण गेले नाहीत. सतत संघर्ष करणं आणि केवळ आणि केवळ विजय मिळवणं हेच त्यांच्या आयुष्याचं सार आहे. ते कधी हार मानत नाहीत, खचत नाहीत हे त्यांच्या आयुष्यातून शिकायला मिळतं.

दैवानं दिलेलं दुःख आणि नियतीनं दिलेले पराभव, अपयश हे प्रत्येकाला स्वीकारावे लागतात. ते त्यांनी स्वीकारले पण सदैव विजयाच्या दिशेनं वाटचाल केली. ज्या समुदायाचं ते नेतृत्व करत होते त्यांनाही त्यांनी हीच शिकवण दिलीय.

सतराव्या शतकातील भारतात आदिलशहा, मुघल, सोळाव्या शतकातील मोघलांच्या वास्तू बघितल्या तर महाराजांच्या वैयक्तिक वास्तू बघणं गरजेचं आहे. अत्यंत साधा बांधलेला लाल महाल, अतिशय साधं वाडा पद्धतीचं त्यांचं शिवापूरचं घर, रायगडावरचे सुद्धा त्यांनी स्वतःसाठी, राण्यासाठी बांधलेले महाल बघितले तर त्यांचं राहणीमान अतिशय साधं, सामान्य माणसांप्रमाणे होतं हे दिसतं. त्यांना ऐषोआरामी, विलासी, उपभोगाचं आयुष्य जगावं वाटलेलं नाही. हा राजा जगाचा उपभोगशून्य स्वामी आहे. श्रीमंत योगी आहे. श्रीमंत असूनही योग्यासारखं रहायला हवं हे त्यांना माहीत होतं. त्यामुळं त्यांचं वैयक्तिक आयुष्य अत्यंत साधं होतं याचा उल्लेख अनेक परकीयांनीही करून ठेवलेला आहे.

उत्तरेतला एक कवी भूषण महाराष्ट्रात आला. रायगडावरील जगदीश्वराच्या मंदिराच्या समोर त्यानं स्वतःच्या कविता ऐकवल्या. त्यानंतर महाराजांनी त्याला भरपूर बिदागी दिलेली आहे. त्यावर त्यानं सांगितलं आहे, ‘‘शिवाजीराजा त्याच्याकडून अपेक्षित असलेल्या माणसाला त्याच्या शतपट देतो.’’

देणारी दानशूर वृत्ती कशी आहे याबद्दल सुद्धा अतिशय आकर्षक शब्दात कवी भूषण यानं लिहून ठेवलंय.

महाराजांविरूद्ध कुणी बंड केलं नाही. त्यांना सोडून एखाद्या खंडोजी खोपडे किंवा एखाद्या सूर्याजी पिसाळचा अपवाद सोडला तर दुसरं कोणी नाही.

एखाद्या व्यक्तिमत्त्वाबद्दल पिढ्यानपिढ्या आकर्षण वाटावं, त्यांच्याविषयी आदर वाटावा असं सहसा कधी होत नाही. महाराज याला अपवाद आहेत.

ज्यांचा इतिहास गौरवशाली आहे, त्यांचं भविष्य गौरवशाली आहे. आमचा इतिहास म्हणजे छत्रपती शिवाजीराजांचा इतिहास आहे. महाराजांनी इतका गौरवशाली इतिहास आम्हाला दिलाय की त्या इतिहासाकडं पाहिल्यानंतर आम्ही निश्चितपणे म्हणू शकतो की आमचं भविष्यसुद्धा गौरवशाली आहे. हे गौरवशाली भविष्य घडवायचं असेल तर इतिहासाकडं कटाक्ष टाकणं, इतिहास समजावून घेणं आणि त्या इतिहासाचे वारस म्हणून त्या इतिहासाच्या पदचिन्हांचा मागोवा घेत त्यावर चालण्याचा प्रयत्न करणं प्रत्येक भारतीयासाठी गरजेचं आहे. त्यासाठी ‘जय भवानी, जय शिवाजी’ म्हणायचंय. त्यासाठीच शिवाजीमहाराजांचं नाव घ्यायचंय आणि त्यासाठीच शिवचरित्राचा अभ्यास प्रत्येक पिढीनं पुन्हा पुन्हा करायचाय आणि आपल्या जीवनाची वाटचाल समृद्ध करायचीय.

चपराक प्रकाशन’च्या वाचनीय आणि दर्जेदार पुस्तकासाठी आणि ‘चपराक’चे सभासद होण्यासाठी संपर्क – 7057292092

उमेश सणस
शिवचरित्राचे व्यासंगी अभ्यासक
9822639110

‘साहित्य चपराक दिवाळी अंक 2021’

चपराक

पुणे शहरातून ‘साहित्य चपराक’ हे मासिक आणि ‘चपराक प्रकाशन’ ही उत्तमोत्तम पुस्तके प्रकाशित करणारी ग्रंथ प्रकाशन संस्था चालविण्यात येते. ‘साहित्य चपराक’ मासिकाचा अंक दरमहा 10 तारखेला प्रकाशित होतो. आपले साहित्य पाठविण्यासाठी, ‘चपराक’मध्ये जाहिराती देण्यासाठी आणि नवनवीन पुस्तकांच्या माहितीसाठी संपर्क - घनश्याम पाटील, संपादक 'चपराक'.
व्हाट्सऍप क्रमांक - ८७६७९४१८५०
Email - Chaprak Email ID

One Thought to “श्रीमंत योगी”

  1. जयंत कुलकर्णी

    अतीशय सुंदर लेख आहे. छत्रपती शिवाजी महाराज ही अक्षरे नुसती उच्चारली तरी आमचा उर अभिमानाने भरून येतो. उमेश सणस सरांचा हा लेख वाचून अशीच परिस्थिती झाली. एक पत्नी, एक वचनी, एक बाणी असणाऱ्या प्रभू रामचंद्र यंची तुलनाच केवळ छत्रपती शिवाजी महाराजांच्या बरोबर होऊ शकते ही कल्पनाच मन जिंकते! इंग्रजांशी त्यावेळी सुद्धा योग्य अंतर ठेऊन राहणारा आणि इंग्रजांबद्दल पुढील पिढ्यांना सतर्क करणारा राजा ही देखील फार मोठी गोष्ट आहे. सणस सरांनी प्रत्येक ठिकाणी आजच्या काळातील तुलना केली आहे. त्यामुळे विषय समजायला अतिशय सोपा होऊन जातो! लेख आवडला.

तुमची प्रतिक्रिया जरूर कळवा

हे ही अवश्य वाचा