शिवशाहीर

शिवशाहीर

असं म्हणतात की शूर मर्दाचा पोवाडा शूर मर्दानंच गावा! असा पोवाडा गाणारे, छत्रपती शिवाजीमहाराजांचं चरित्र जगाला सांगणारे एक चांगले शिवचरित्रकार आम्हाला मिळाले, ते म्हणजे बळवंत मोरेश्वर पुरंदरे! शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे या नावानं विख्यात असलेल्या या शाहीरानं वयाची शंभरी गाठली आणि अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या प्रत्येक श्वासात छत्रपती शिवाजीमहाराज होते. त्यांच्या हृदयातही महाराजच आणि महाराजांचा इतिहासच होता, याबद्दल कुणाच्या मनात दुमत असण्याचं कारण नाही.

ज्या काळात करमणुकीची कोणतीही साधनं नव्हती त्या काळात बाबासाहेब पुरंदरे यांनी शिवचरित्रावर विविध ठिकाणी व्याख्यानमाला दिल्या. त्यासाठी अनेकांनी गर्दी केली. त्यांची भाषणं ऐकली गेली, पुस्तकं वाचली गेली. बाबासाहेबांनी शिवचरित्रावर ग्रंथ लिहिले. शिवकालिन ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेल्या कथा, कादंबर्‍यातून त्यांनी महाराजांचं चरित्र घराघरात पोहोचवलं. ते सतराव्या शतकातून कधी बाहेर आले नाहीत आणि शिवचरित्राशिवाय दुसरं काही जगले नाहीत. बाबासाहेबांकडे अधिक साधनं उपलब्ध झाली तेव्हा त्यांनी ‘जाणता राजा’ नावाचा एक भव्यदिव्य प्रयोग केला. ज्या काळात दुर्गभ्रमण हा लोकांचा छंद नव्हता त्या काळात बाबासाहेब महाराष्ट्रभर फिरले. शिवाजीमहाराजांच्या पदचिन्हानं पावन झालेल्या अनेक ठिकाणी बाबासाहेब स्वतः गेले आणि त्यांनी त्या पदचिन्हांचा मागोवा घेतला. इतिहास वाचायचा नसतो, सांगायचा नसतो तर तो जगायचा असतो हे समजावून घ्यायचं असेल तर या शिवशाहीराला समजावून घेणं गरजेचं आहे.

बाबासाहेबांचं लेखन काहीवेळा वादग्रस्त झालं. एक गोष्ट सांगितली पाहिजे की त्यांना शिवचरित्राबाबतची जी साधनं उपलब्ध झाली त्या साधनांचा अभ्यास करून त्यांनी शिवचरित्र मांडलं. नुसतं मांडलं नाही तर दर दहा वर्षांनी एक पिढी बदलते असं मानलं तर किमान सहा-सात पिढ्यांपर्यंत ते प्रभावीपणे पोहोचवलं. त्यांचं लेखन म्हणजे शिवचरित्रावरचा शेवटचा शब्द आहे असं मानण्याचं काही कारण नाही. त्यांचं लेखन म्हणजे शिवचरित्रावरचा पूर्णविराम आहे असंही नाही. स्वतः त्यांनीही असा कधी दावा केला नाही. ते स्वतःला ‘शाहीर’ मानायचे. किंबहुना ‘शिवशाहीर’ असं स्वतःला म्हणवून घेणं हेच त्यांना सर्वोच्च सन्मानाचं प्रतीक वाटायचं. स्वतःला शिवशाहीर म्हणवून घेणं हे त्यांना भारतरत्न सन्मानापेक्षाही मोलाचं वाटायचं. ‘मी इतिहासाचा अभ्यासक आहे, संशोधक आहे’ अशी भूमिका त्यांनी स्वतः कधीही मांडली नाही. शाहिराचा श्रद्धाळूपणा त्यांच्याकडे होता. शाहीराची अत्यंत भावनाशीलता, रसाळपणा त्यांंच्याकडे होता. त्यांनी केलेलं संशोधन किती खरं, किती खोटं? या वादात न जाता शिवचरित्र चांगल्या पद्धतीनं काही पिढ्यापर्यंत पोहोचवणं आणि शिवचरित्रावर प्रेम करणारी एक सुसंस्कारी पिढी निर्माण करणं याबाबत त्यांचं योगदान कदापि विसरता येणार नाही.

बाबासाहेब पुरंदरे यांनी जे शिवचरित्र महाराष्ट्रभर पोहोचवलं त्यामुळं शिवचरित्रावर प्रेम करणारी एक पिढी निर्माण झाली. शिवचरित्राकडं पाहण्याचा लोकांचा दृष्टिकोन बदलला. रामायण आणि महाभारतातल्या कथा पूर्वीच्या काळी मुलांवर संस्कार होण्यासाठी सांगितल्या जायच्या. बाबासाहेबांचे वक्तृत्व आणि त्यांच्या एकंदर जीवनशैलीमुळं मुलांवर सुसंस्कार करण्यासाठी शिवचरित्रातल्याच गोष्टी सांगायला हव्यात हे त्यांनी दाखवून दिलं. यापेक्षा मोठं योगदान असूच शकत नाही.

छत्रपती शिवाजीमहाराज हे अनेक पिढ्यांसाठी आदर्श राहिलेले महापुरूष आहेत. शिवचरित्र जेवढं भव्य आहे, रम्य आहे तेवढ्याच शिवचरित्रातील काही घटना आणि प्रसंग वादग्रस्त आहेत. बाबासाहेबांनी त्यांच्यापरिनं शिवचरित्र मांडलं. ‘मला उपलब्ध झालेल्या साधनसामग्रीचा उपयोग करून, पुराव्यांचा अभ्यास करून मी याची मांडणी केलीय’ अशी एका विनम्र अभ्यासकाची भूमिका त्यांनी आयुष्यभर स्वीकारली होती. छत्रपती शिवाजीमहाराजांचं व्यक्तिमत्त्व, त्यांचं आयुष्य, त्यांच्या आयुष्यातील लढाया, त्यांची कल्पकता, त्यांचा प्रतिभासंपन्नपणा अशा असंख्य गोष्टी बाबासाहेबांमुळं महाराष्ट्राच्या नकाशावर ठळकपणे मांडल्या गेल्या. याचा अर्थ असा नाही की त्यापूर्वी कुणी शिवचरित्र मांडलं नव्हतं किंवा त्यानंतर कुणी शिवचरित्राची मांडणी केली नव्हती! पण केवळ ‘एक ध्यास, एक निश्वास, छत्रपती शिवाजीमहाराज’ असं समजून आपलं जीवन या विषयासाठी समर्पित करणारा कोणी दुसरा पूर्वी कधी दिसला नाही आणि पुढे दिसेल याचीही शक्यता नाही. केवळ शिवचरित्राला सर्वस्व मानणारे बाबासाहेब पुरंदरे एकमेव होते.

शिवचरित्रावर प्रेम करणार्‍या, शिवचरित्राचा अभ्यास करणार्‍या प्रत्येकाला बाबासाहेब पुरंदरे यांनी केलेलं लेखन, त्यांची भाषणं आणि त्यांनी शिवचरित्रावर आणि महाराजांच्या जीवनावर केलेलं निस्सिम प्रेम याची दखल घ्यावी लागेल. बाबासाहेबांना नाकारून कुणालाही पुढे जाता येणार नाही. त्यांना स्वीकारायचं का? आणि स्वीकारायचं तर किती स्वीकारायचं या सगळ्या गोष्टी वेगळ्या! पण शिवचरित्रावर बोलताना आणि लिहिताना बाबासाहेब पुरंदरे मैलाचा दगड आहेत. महाराष्ट्राचे गड, कोट, किल्ले हेच आपलं वैभव आहे. किंबहुना हीच आधुनिक तीर्थक्षेत्रं आहेत असं आपण वेगवेगळ्या भाषणात आणि निबंधात म्हणतो. बाबासाहेब पुरंदरे हा इतिहास जगले. गडावर काय पाहायला पाहिजे हे त्यांनी पहिल्यांदा सांगितलं. मग त्यावेळचे भारताचे राष्ट्रपती ग्यानी झेलसिंग असतील की ज्यांना रायगडचा किल्ला दाखवायचा होता. तो किल्ला दाखवण्याचं काम शिवशाहीरांनी केलंय. शिवचरित्र महाराष्ट्राच्या बाहेर नेण्याचं श्रेय बाबासाहेबांना देणं गरजेचं आहे. ‘शिवाजीमहाराज हा श्रद्धेचा विषय आहे, आस्थेचा विषय आहे. कवी आणि साहित्यिकांनी महाराजांवर फार लिहिलं नाही’ याची जाणीव त्यांनी सातत्यानं करून दिली. कवींना, कलावंतांना प्रेरणा आणि स्फूर्ती देऊन ‘शिवचरित्र हे तुमच्यासाठी सगळ्यात मोठं लेखन करण्यासाठीचं प्रेरणास्थान आहे, शिवकालिन जीवनात तुम्ही प्रवेश केला तर तुम्हाला असंख्य कथानकं सापडतील, त्यातून तुम्ही बाहेर येऊ शकणार नाही’ असं सांगत त्यांनी या साहित्यिक खजिन्याची जाणीव वारंवार करून दिली.

बाबासाहेबांना महाराष्ट्रभूषण पुरस्कार मिळाला. खर्‍याअर्थानं ते महाराष्ट्रभूषण होते. त्यांनी एका विषयावर मनापासून प्रेम केलं आणि त्यासाठीच आपलं आख्खं आयुष्य खर्ची घातलं. त्या विषयासाठी तन, मन आणि प्राण पणाला लावून शेवटपर्यंत काम केलं. सन आणि सनावळ्यात माणूस अडकला की खरा इतिहास लोकांपर्यंत पोहोचत नाही असं म्हणतात पण सन-सनावळ्यासह खरा इतिहास काही पिढ्यांपर्यंत पोहोचविण्याचं अद्भूत कौशल्य त्यांनी दाखवून दिलं. त्यांनी महाराजांच्या आरमाराचं महत्त्व विषद केलं. छत्रपती शिवाजीमहाराजांच्या जीवनाचा मागोवा घेत असताना त्यांच्या अनेक पैलूंवर प्रकाश टाकणारं लेखन केलं.

प्रत्येक कवी-लेखकाची इच्छा असते की आपली एक तरी कलाकृती वाचकांपर्यंत पोहोचावी आणि आपलं जीवन उजळून निघावं. बाबासाहेब वयाच्या कितव्या वर्षी शिवचरित्राकडं वळले, शिवचरित्राचं आकर्षण त्यांना का वाटलं, ते पेशवाईतल्या कोणत्या घराण्यात जन्माला आले होते, त्या घराण्याची छत्रपती शिवाजीमहाराजांवर किती देदीप्यमान श्रद्धा होती याबाबत त्यांनी विविध मुलाखतीद्वारे सांगितलं आहे. आपलं जीवन उजळून टाकणारा छत्रपती शिवाजीमहाराज नावाचा महानायक बाबासाहेबांना आयुष्यात फार लवकर भेटला आणि या महानायकाच्या आयुष्याचा धांडोळा घेत असताना बाबासाहेबांनी स्वतःचं आयुष्य समर्पित करून टाकलं. आज ते आपल्या लक्षात राहतात ते त्यामुळंच.

शेवटी प्रश्न पडतो की बाबासाहेबांनी महाराष्ट्राला आणि मराठी माणसाला काय दिलं? त्यांनी मराठी माणसाला शिवचरित्रावर प्रेम करायला शिकवलं. छत्रपती शिवाजीमहाराजांचं साहित्य आणि त्यांचं मोठेपण बाबासाहेबांनी जनमनापर्यंत पोहोचवलं. महाराजांचा इतिहास कसा समजावून घ्यावा, त्याचा अभ्यास कसा करावा, शिवचरित्राची पारायणं कशी करावीत आणि चांगलं राष्ट्र निर्माण करण्यासाठी महाराजांचे संस्कारच कसे महत्त्वपूर्ण आहेत याबाबतची भूमिका वेळोवेळी मांडली. महाराजांनी निर्माण केलेलं हिंदवी स्वराज्य, त्यांचं अद्भूत व्यक्तिमत्त्व हे समजावून घेतलं तर आमचा भविष्यकाळ अधिक मोठा आणि संपन्न होईल हे बाबासाहेबांनी सातत्यानं सांगितलं. हेच त्यांचं मोठं योगदान आहे. या इतिहासपुत्राला भावपूर्ण आदरांजली.
– घनश्याम पाटील
7057292092

* एक एप्रिल 2006 चा दिवस. चार-पाच वर्षे मासिक चालवण्याचा अनुभव घेतल्यानंतर त्याच्या जोडीला आम्ही प्रकाशन संस्था सुरू करण्याचा निर्णय घेतला आणि वाई येथील ऐतिहासिक कादंबरीकार उमेश सणस यांची शिवदिग्विजयाची रोमांचकारी कहाणी असलेली ‘शिवप्रताप’ ही कादंबरी प्रकाशित केली. प्रकाशक म्हणून माझी आणि लेखक म्हणून सणस यांचीही ही पहिलीच कादंबरी. ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या हस्ते या कादंबरीचं थाटात प्रकाशन झालं. त्यानंतर लगेचच डॉ. सदाशिव शिवदे यांनी त्याचं सविस्तर परीक्षण लिहिलं. एका आघाडीच्या वृत्तपत्रात ते छापून आलं. सकाळी सहा वाजताच मोबाईल वाजला. प्रकाशनात अगदीच नवखा असल्यानं याची सवय नव्हती. मी घेतला. समोरून आधी ही कादंबरी प्रकाशित केल्याबद्दल अभिनंदन करण्यात आलं. ते म्हणाले, ‘ही कादंबरी मला हवीय.’
मी म्हणालो, ‘आपल्याला अप्पा बळवंत चौकात विक्रेत्यांकडं मिळेल.’
ते म्हणाले, ‘आपण आपला दूत पाठवला तर मी त्याच्याकडे या पुस्तकाच्या किंमतीसह त्यांचे प्रवासभाडेही देईन.’
मी त्यांचे नाव विचारले. त्यांनी सांगितलं, ‘बळवंत मोरेश्वर पुरंदरे.’
माझ्या डोळ्यावरील झोप गेली नव्हती.
मी म्हणालो, ‘जवळच्या खुणेसह पत्ता द्या.’
ते म्हणाले, ‘पर्वती पायथ्याला यायला सांगा आणि बाबासाहेब पुरंदरे यांचं घर विचारा. कोणीही सांगेल…’
माझी झोप खाडकन उडाली. मी म्हणालो, ‘बाबासाहेब मला माफ करा. मी आपल्याला ओळखलं नाही. मी स्वतः ही कादंबरी घेऊन आपल्याकडे येतो.’
ते म्हणाले, ‘कशाला कष्ट घेता? आपला दूत पाठवला तरी चालेल.’
मी कादंबरी घेऊन त्यांच्याकडे पोहोचलो. त्यांनी त्याचे पैसे दिले. मी म्हणालो, ‘तुम्हाला ही स्नेहभेट दिलीय. तुमच्याकडून पैसे घेऊ शकत नाही.’
ते म्हणाले, ‘आजच्या पिढीचा एक लेखक आणि आजच्याच पिढीचा एक प्रकाशक शिवचरित्रावर काम करतोय ही परम संतोषाची बाब आहे. यासाठी तुमचे बरेच कष्ट आहेत. इतक्या मेहनतीनं केलेलं पुस्तक भेट देऊ नका…’
त्यांनी आग्रहानं पैसे दिले. वाचल्यानंतर पुन्हा त्याच्या काही प्रती विकत मागवल्या. त्या इतरांना भेट दिल्या.

* मी त्यांना ‘चपराक’च्या टीमसह कायम भेटायचो. त्यावेळी त्यांच्यासोबत चर्चा व्हायची. शिवचरित्रात काय वाचलं पाहिजे, शिवचरित्राचा अभ्यास कसा करायला हवा? असे प्रश्न आम्ही विचारायचो आणि त्यावर मग बरंच बोलणं व्हायचं. बोलणं व्हायचं म्हणजे बाबासाहेब बोलायचे, आम्ही एकाग्रतेनं ऐकायचो.
‘तुम्ही आहार काय घेता? तब्येत कशी सांभाळली? या वयात इतरांचे केस गळतात मग तुमचे कसे गळत नाहीत?’ असं काहीही विचारायचो. ते सांगायचे, ‘लहानपणी माझा अक्षरशः चमनगोटाच केला जायचा. त्यामुळं कदाचित ड जीवनसत्त्व जास्त मिळालं असावं. त्यामुुळं केस काही जात नाहीत! शिवाय डोक्याला तेल चोपडूनच लावलं जायचं. ‘जेवणात काय घेता?’ याला उत्तर असायचं, ‘ताक भात खातो.’ ‘लोणचं वगैरे?’ असं विचारल्यावर म्हणायचे, ‘खावसं वाटतं पण आता त्रास होतो.’
इतक्या मोठ्या माणसाला आम्ही किती बालिशपणे प्रश्न विचारायचो आणि त्याची उत्तरंही ते अतिशय प्रेमानं द्यायचे हे आठवूनही आज उचंबळून येत आहे.

* ‘चपराक साहित्य महोत्सवा’ला ते अध्यक्ष
म्हणून आले. त्यावेळी उमेश सणस यांनी त्यांना सांगितलं की, ‘वाईच्या घाटावर तुम्हाला सर्वप्रथम ऐकलं. अफजलखान वधावर तुम्ही बोलला होतात.’ त्यावर ते लगेच म्हणाले, ‘कृष्णाबाई संस्थान, गंगापूरी घाट, 1978.’ अशी तल्लख स्मरणशक्ती अपवादानंच कुणाकडं असेल.
अशा अनेक कार्यक्रमांना त्यांना बोलावताना आपल्यामुळं त्यांना त्रास होऊ नये असं वाटायचं. हे एकदा त्यांना बोलून दाखवलं. तर ते म्हणाले, ‘तेल संपत आलंय, पण वात जळतेच आहे. जोपर्यंत तुम्हाला माझ्याकडून काही काढून घ्यावसं वाटतंय तोपर्यंत जरूर घ्या!’ त्यांचे हे शब्द आठवले की आजही गलबलून येतं.

* उमेश सणस यांची ‘शिवप्रताप’ गाजत असताना अचानक पुण्याचे माजी महापौर माउली शिरवळकर यांचा फोन आला. ते म्हणाले, ‘ताबडतोब पुरंदरे वाड्यावर या!’
मी माझ्या टीमसह पोहोचलो. तिथं बाबासाहेबांनी आणखी चार लोकांना बोलावलं होतं. ‘यांनी प्रतापगडाला न्याय दिलाय’ म्हणत त्यांनी मला पेढा भरवला. लेखकाला फोन लावायला लावला. त्यांचं अभिनंदन केलं. आस्थेनं विचारपूस केली. वयाच्या 33 व्या वर्षी इतकं मोठं कार्य तुमच्या हातून घडलंय. भविष्यात हा मार्ग सोडू नका. जिथं जिथं शक्य होईल तिथं महाराजांवर बोला, त्यांच्यावर लेखन करा, वाचन करा असं म्हणत त्यांनी त्यांना प्रोत्साहन दिलं. पुढे ‘चपराक’च्या कार्यक्रमात सणसांची आणि त्यांची भेट झाल्यावर त्यांचा सणसांना एकच प्रश्न असायचा, ‘पुढे काय लिहिताय?’
कोविडच्या आधी त्यांची भेट झाल्यावर त्यांना सांगितलं होतं की, ‘सणस महाराजांची आग्रा भेट आणि सुटकेवर लिहित आहेत.’ तर ते म्हणाले, ‘आई जगदंबा त्यांना उदंड बळ देवो!’

* ‘म्यानातनू उसळे तलवारीची पात, वेडात दौडले वीर मराठे सात,’ ही कुसुमाग्रजांची कविता आहे. हे गाणं लतादीदींकडून ऐकण्यात काही गंमत नाही. ही कविता ऐकायची तर बाबासाहेबांच्या तोंडूनच ऐकायची. जेव्हा कुडतोजी गुजर बहलोलखानाच्या सैन्यावर चालून गेले त्याचं त्यांनी असं काही वर्णन केलं होतं की त्याला तोड नाही.

* डोंबिवलीच्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनातील परिसंवादात मी निमंत्रित वक्ता म्हणून सहभागी होतो. त्यावेळी संभीजी ब्रिगेडने त्यांच्याविरूद्ध वातावरण तापवले होते. मी माझ्या भाषणात याचा समाचार घेतला आणि मराठी भाषेला लागलेल्या प्रतिसादशून्यतेच्या ग्रहणावर आसूड ओढले. ‘बालशिवबा, आऊसाहेब आणि दादोजी कोंडदेव यांचं गोत्र एकच’ या त्यांच्या वाक्यावरून त्यांना ट्रोल करण्यात येत होतं. ते मूळ वाक्य होतं, ‘बालशिवबा, आऊसाहेब आणि दादोजी कोंडदेव यांचं गोत्र एकच, ते म्हणजे सह्याद्री!’ यातील ‘ते म्हणजे सह्याद्री’ हे वाक्य काढून टाकून जी दिशाभूल करण्यात येत होती त्याची मी मांडणी केल्यावर त्यांनी खास कौतुक केलं होतं.

* शिवचरित्र लिहिणारा लेखक गरीब राहू नये, उपेक्षित राहू नये अशी त्यांची भूमिका असायची. त्यासाठी त्यांनी पदरमोड करून अनेकांना यथायोग्य सहकार्य केलं आहे. त्याचा मी साक्षीदार आहे.

* मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी त्यांना एकदा विचारलं की ‘खरी शिवजयंती कोणती? ती तारखेनुसार साजरी व्हावी की तिथीनुसार?’ त्यावर त्यांनी अतिशय मार्मिक उत्तर दिलं. ते म्हणाले होते, ‘तुम्ही रोज जरी शिवजयंती साजरी केली तरी काय फरक पडणार? यानिमित्ताने महाराजांचे स्मरण होते हे महत्त्वाचे नाही का? अरे महाराजांच्या जन्मदिनानिमित्ताने वाद घालण्याऐवजी त्यांच्या आदर्शांचे गुण घ्या. त्यांनी दाखवलेल्या रस्त्यावरून मार्गक्रमण करा.’

* एकदा काही खोडसाळ लोकांनी त्यांच्या निधनाची बातमी पसरवली. त्यांना श्रद्धांजली वाहणारे बॅनरही लावले. समाजमाध्यमातून ते व्हायरल झाले. त्याच वेळी त्यांचं मुंबईत व्याख्यान सुरू होतं. ते झाल्यावर एका पत्रकारानं त्यांना ते बॅनर मोबाईलवर दाखवलं आणि त्यांची प्रतिक्रिया विचारली. त्यावर अतिशय मिष्किलपणे हसत त्यांनी प्रतिप्रश्न केला, ‘असं कसं होऊ शकतं? मी तर पुढच्या दोन वर्षांच्या व्याख्यानाच्या तारखा लोकांना दिल्यात…’ अशी जबरदस्त महत्त्वाकांक्षा त्यांच्यात होती.

* माझ्या अनेक लेखकांना त्यांना भेटायचं असायचं. मी शक्य त्यांच्या गाठीभेटी घालून द्यायचो. त्यातून लेखनाचे विषय सूचत जायचे. प्रत्येकाला प्रोत्साहन देताना ते नवा विचार द्यायचे. अगदी वर्षभरापूर्वी त्यांना विचारलं, ‘आता काय करताय?’ तर त्यांनी आम्हाला काही चित्रे दाखवली आणि ‘चित्रमय शिवकाल’ निर्माण करत असल्याचं सांगितलं. छत्रपती शिवाजी महाराज हाच त्यांचा श्वास होता.

* ‘साहित्य चपराक’ मासिकाच्या एका अंकावर
मी संजय सोनवणी यांची यशवंतराव होळकर यांच्यावर लिहिलेली मुखपृष्ठ कथा केली होती. तो अंक मी त्यांना भेट दिला. तो पाहताच त्यांनी तो डोक्याला लावला आणि म्हणाले, ‘आता मी तुम्हाला गंमत दाखवतो.’ ते आत गेले आणि आतून त्यांनी एक बॉक्स आणत आमच्या हातात दिला. म्हणाले, ‘काळजीपूर्वक काढा.’ तो काढला तर आमच्या मुखपृष्ठावर होळकरांच्या चित्रावर जो मुकूट होता तोच त्यात होता. मी हादरलो. त्यांनी सांगितलं, ‘होळकरांचे दोन मुकूट होते. त्यातला हा एक माझ्या संग्रहात आहे.’

* महाराष्ट्रभूषण पद्मविभूषण श्रीमंत शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या शंभर वर्षाच्या आयुष्याचा पट प्रचंड विस्तीर्ण आहे. इतिहास संशोधनाच्या नव्या दिशा शोधताना त्यांच्या साहित्याचा वाटा मोठा असणार आहे. अतिशय लालित्यपूर्ण शैलीत शिवचरित्र मांडताना त्यांनी वाचकांना खिळवून ठेवले. ‘जाणता राजा’सारखे महानाट्य तयार करून त्याचे जगभर प्रयोग केले. त्यांच्या पुण्यातील प्रयोगाला तेव्हा विद्यार्थी दशेत असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी खास अहमदाबादहून आले होते अशी आठवणही नुकतीच पंतप्रधानांनी सांगितली. अशा या थोर इतिहासपुत्रावर शेकडो प्रबंध येणे अपेक्षित असताना आपण समाज म्हणून मात्र करंटे ठरलो. असे जरी असले तरी त्यांच्या सूनबाई डॉ. चित्रलेखा पुरंदरे यांनी त्यांच्या जीवन आणि कार्यावर पीएचडी केली. सूनबाईने सासर्‍यावर पीएचडी करण्याचे हे एक दुर्मीळ उदाहरण आहे.

दै. ‘पुण्य नगरी’

मंगळवार, दि. 16 नोव्हेंबर 2021

‘चपराक प्रकाशन’ची सर्व पुस्तके आपण या संकेतस्थळावरून घरपोहच मागवू शकाल. ‘साहित्य चपराक’चे सभासद होण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क – 7057292092

चपराक

पुणे शहरातून ‘साहित्य चपराक’ हे मासिक आणि ‘चपराक प्रकाशन’ ही उत्तमोत्तम पुस्तके प्रकाशित करणारी ग्रंथ प्रकाशन संस्था चालविण्यात येते. ‘साहित्य चपराक’ मासिकाचा अंक दरमहा 10 तारखेला प्रकाशित होतो. आपले साहित्य पाठविण्यासाठी, ‘चपराक’मध्ये जाहिराती देण्यासाठी आणि नवनवीन पुस्तकांच्या माहितीसाठी संपर्क - घनश्याम पाटील, संपादक 'चपराक'.
व्हाट्सऍप क्रमांक - ८७६७९४१८५०
Email - Chaprak Email ID

6 Thoughts to “शिवशाहीर”

  1. Deva zinjad

    खूपच सुंदर मांडणी केलीय दादा

    1. Ramkrushn P.Patil

      खूप छान..

  2. जयंत कुलकर्णी

    सर फारच सुंदर लेख आणि हृद्य आठवणी. तुमची त्यांचेशि पहिली भेट वाचून तर डोळे पाणावतात. तुम्ही भाग्यवान आहात की अशा ऋषितुल्य व्यक्तिमत्वाशी तुमचा स्नेह होता, संवाद होता. बाबासाहेबांनी छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्रतील घराघरात पोहोचवले. मला तुमच्या लेखाची प्रतिक्षा होती. त्यामुळे नेहेमी प्रमाणे लेख आवडला. धन्यवाद! शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना भावपूर्ण श्रद्धांजली!!

  3. Prashant Manohar Thakare

    दादा, नेहमीप्रमाणेच हा प्रासंगिक लेख अतिशय सुरेख झालाय. आदरणीय शिवशाहिरांच्या तेजोमय जीवनप्रवासातून कित्येक ज्योती तेवू लागल्या, त्यांच्या आयुष्याला सूर्याचे तेज प्राप्त झाले. छत्रपती शिवरायांच्या कार्यास संपूर्ण आयुष्य वाहून घेतलेले असे व्यक्तिमत्त्व दुर्मीळच! त्यांच्या स्मृतींस विनम्र अभिवादन!

  4. रवींद्र तांबोळी

    अप्रतिम आदरांजली !

  5. Vinod s. Panchbhai

    लेख वाचताना खूप गहिवरून आलं! आदरणीय बाबासाहेब यांच्या पावन करकमलांनी माझ्या ‘मुलांच्या मनातलं’ या पुस्तकाचे प्रकाशन झाल्याचा अविस्मरणीय प्रसंग डोळ्यासमोर तरळला!
    परमपूज्य बाबासाहेब यांना भावपूर्ण आदरांजली!

तुमची प्रतिक्रिया जरूर कळवा

हे ही अवश्य वाचा