‘हा कसला महात्मा? ही तर फुले नावाची दुर्गंधी’ अशा आशयाची अत्यंत संतापजनक आणि चुकीची मांडणी बाळ गांगलसारख्या कोणी केल्यावर किंवा ‘हले डुले महात्मा फुले’ अशी म्हण कुणी अग्रलेखातून मांडल्यावर त्याचा तीव्र विरोध व्हायलाच हवा. महात्मा फुले हे कोणत्याही एका जातीधर्माचे नाहीत तर ते सर्वांचेच आहेत.
महात्मा फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाईंनी जे योगदान दिलंय ते शब्दातीत आहे. त्यामुळे त्यांच्याविषयी, त्यांच्या तत्त्वज्ञानाविषयी अशी चुकीची मांडणी कोणी कोणत्याही काळात केली तरी ती निषेधार्हच ठरेल. हरी नरके नावाच्या एका तथाकथित विचारवंताने अशा काही मुद्द्यावरून संधी मिळेल तसे राजकारण सुरू केले आणि आयुष्यभर त्यात त्यांना यशही आले. महात्मा फुले यांच्या कार्यकर्तृत्वाविषयी कुणाच्याही मनात दुमत असण्याचे काही कारण नाही पण नरके यांच्यासारख्या लोकांनी असे महापुरूष हे कायम त्यांच्या उपजिविकेचे साधन बनवले. आजही शालेय आणि महाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धेत मुलं जसं बोलतात तशी हरीभाऊंची मांडणी असते.
2016-17 साली महाराष्ट्रात मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी मराठा समाजानं खूप मोठं आंदोलन केलं. जगाच्या इतिहासात सगळ्यात मोेठ्या संख्येनं मोर्चे निघाले. मराठा आरक्षणाला महाराष्ट्रात कोणत्याही राजकीय पक्षानं उघडपणे विरोध केला नाही परंतु यावेळी हरी नरके यांचं एक भाषण सगळीकडं जाणीवपूर्वक व्हायरल करण्यात आलं. त्याला टायटल असायचं, ‘हरिभाऊंनी मराठा आरक्षणाची हवा काढून घेतली!’ राज्यघटनेनुसार मराठी समाजाला आरक्षण कसं देता येणार नाही, मराठा समाजाला आरक्षणाची कशी गरज नाही यावर हरिभाऊ ढेरी हलवत अतिशय पोटतिडकिने बोलत आहेत असा आभास निर्माण केला जायचा. हे सगळं मांडताना त्यांच्या चेहर्यावरचे ओशाळवाणे भावच त्यांची गुलामगिरी सांगून जायचे.
महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात शेती करताना अत्यंत दुरावस्था झालेल्या आणि वाईट अवस्थेत जीवन जगणार्या मराठा समाजाच्या समस्या जर हरिभाऊपर्यंत पोहचत नसतील तर त्यांनी समाज बघितलेला नाही. ज्याला महाराष्ट्राचं समाजदर्शन घडलं नाही त्याला स्वतःला विचारवंत म्हणवून घेण्याचा काहीही अधिकार नाही. छत्रपती उदयनराजे भोसले यांच्यासारखा राजघराण्यात जन्माला आलेला नेता सांगतोय की ब्राह्मणांपासून ते दलितांपर्यंत जो कोणी आर्थिक उपेक्षेत आहे त्याला आरक्षण द्या आणि हा स्वयंघोषित विचारवंत सांगतोय की मराठा समाजाला आरक्षणाची गरज नाही. अशाप्रकारे तुम्ही एखाद्या समाजाचा मनोभंग करण्यासाठी उभे राहता त्यावेळी तुमची विश्वासार्हता आणि तुमची वैचारिक पातळी काय आहे हे लक्षात येते.
छगनराव भुजबळांची समता परिषद ते संघाची समरसता परिषद अशा प्रत्येकाशी मधुचंद्र साजरा करायला हरिभाऊ नेहमी गेले. संभाजी ब्रिगेड, बामसेफ, संघ अशा कोणत्याही व्यासपीठावर ते सोयीस्कर जातात. त्यांची कमिटमेंट नेमकी कोणाशी आहे हे महाराष्ट्राला कधीच कळलं नाही. त्यांचं लेखन औचित्याला धरून असतं अशातलाही भाग नाही. सातारचे माजी खासदार लक्ष्मणराव पाटील यांच्या निधनानंतर हरिभाऊंनी एक लेख लिहिला होता. माणसाच्या मृत्युनंतर लगेच त्याच्याबद्दल वाईट लिहू नये, बोलू नये, जो आपल्या टीकेला उत्तर देऊ शकणार नाही त्याच्या निधनानंतर टीका करण्यासाठी मध्ये किमान काही काळ जाऊ द्यावा इतकंही सौजन्य त्यांच्याकडे नसतं. पाटलांच्या मृत्युनंतर कसलेही संकेत न पाळता हरिभाऊंनी त्यांची बदनामी केली. अशी औचित्यहानी करणारा, सामाजिक संकेतांचं भान नसणारा हा समता परिषद ते समरसता परिषदेच्या वैचारिक व्यभिचारात मोठा झालेला हा स्वयंघोषित विचारवंत आज ओबीसी आरक्षणाच्या बाजूने उभा आहे.
ओबीसींचं राजकीय आरक्षण गेलं आणि याला देवेंद्र फडणवीस, भाजप आणि संघ परिवार जबाबदार असल्याचा बिनबुडाचा आरोप हरिभाऊंनी सुरू केला. ते नेहमी कुणाची तरी सुपारी घेऊन कुणासाठी तरी बोलतात हा गेल्या पंधरा-वीस वर्षातला अनुभव आहे. ओबीसींचं राजकीय आरक्षण परत मिळवायचं असेल तर आधी हरिभाऊंसारखे लोक बाजूला सारायला हवेत. ओबीसी आरक्षणाच्या बाजूनं किमान उघडपणे फडणवीस बोलत आहेत. असं असताना त्यांचीच नालस्ती करायची यामागचं हरिभाऊंचं राजकारण घाणेरडं आहे. त्यांचं एकंदरीत लेखन, भाषणं आणि त्यांचे फेसबुकवर लिहिलेले लेख हे त्यांच्या सुमार बुद्धिचं प्रदर्शन करणारेच आहेत. हरिभाऊंनी आजवर कुणावर काही संशोधनात्मक लिहिलंय असंही नाही. धनंजय कीर यांनी शाहू महाराजांवर संशोधनपर लेखन केलं, डॉ. आंबेडकरांवर लिहिलं तसं इतकी साधनं आणि संधी मिळूनही हरिभाऊंनी कधी अशा लेखनासाठी आणि संशोधनासाठी वेळ दिला नाही. शासकीय अनुदानावर आणि स्वतःच्या स्वार्थावरच डोळा असलेल्या या माणसानं आजवर काही भरीव केलंय का?
ते अनेक शासकीय समित्यांवर कार्यरत होते. तिथं काम करताना सरकार बदललं तशा त्यांच्या विचारधाराही बदलल्या. याबाबत हरिभाऊ सदानंद मोर्यांचे पट्टशिष्य शोभतात. कोणतीही राजकीय विचारधारा आली तरी हरिभाऊ आपलं तोंड वेंगाडत आणि ढेरी हलवत तिथं असतातच. असल्या स्वयंघोषित विचारवंतांनी त्या त्या समाजाची आणि व्यवस्थेची कायम हानी केलीय. मराठा समाजाला आरक्षण मिळू नये यासाठी वाचाळ बडबड करणारा हा हरिभाऊ ओबीसी समाजाचंही मोठं नुकसान करत असल्यानं त्याचं तोंड बंद करणं आवश्यक आहे. मराठा आरक्षणाच्या विरूद्ध बोलण्यासाठी त्यांना कुणी सुपारी दिली होती याचं संशोधन केलं पाहिजे. आता ओबीसींच्या राजकीय आरक्षणाविषयी बोलताना ते त्याबाबत मुद्दे न मांडता केवळ फडणवीस आणि संघावर तुटून पडत आहेत. ही अशी दिशाभूल करण्यासाठीही त्यांना कुणाची सुपारी मिळाली असावी अशीच शक्यता आहे. हा तमासगीर कुणाची तरी सुपारी घेतल्याशिवाय त्याचा वग सादर करायला उभा राहतच नाही असं आजवरचं त्यांचं वागणं आणि बोलणं आहे.
छगन भुजबळांनी समता परिषदेच्या माध्यमातून नायगावला सावित्रीबाईंच्या जयंतीचा कार्यक्रम सुरू केला. भारतातल्या ओबीसींना एकत्र करावं म्हणून भुजबळांनी जे प्रयत्न केले ते आपण बघितले. ते करताना भायखळ्यात भाजीपाला विकणार्या माणसाला हरिभाऊ महान विचारवंत वाटला तर त्यात त्याची काही चूक नाही. भुजबळांना हरिभाऊ विचारवंत वाटत असले तरी हरिभाऊंच्या बुद्धिचा पसारा नेमका केवढा आहे हे आजवर दिसून आलेले आहे. विलासराव देशमुखांकडे महाराष्ट्रातल्या अनेक संस्थांनी, संघटनांनी अनेक वर्षे मागणी केली की, राजर्षि छत्रपती शाहू महाराजांची जयंती राज्यभर मोठ्या प्रमाणात साजरी व्हावी! छत्रपती शाहू महाराज हे समतेच्या क्षेत्रात सर्वात मोठं नाव असल्याने, त्यांनी कलाकांरांना, गुणवंतांना प्रोत्साहन दिलेले असल्याने, अनेकांचे आयुष्य उभे करण्यात त्यांनी फार मोठे योगदान दिलेले असल्याने त्यांची जयंती राज्य पातळीवर साजरी व्हावी अशी मागणी होती. तो निर्णय विलासरावांनी त्यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कारकिर्दीत घेतला. डॉ. बाबासाहेब आंबेडकरही म्हणाले होते, ‘‘एकवेळ मला विसरलात तरी चालेल पण राजर्षि छत्रपती शाहू महाराजांना विसरू नका, त्यांची जयंती साजरी करा, त्यांचे विचार नव्या पिढीपर्यंत सातत्याने पोहोचवा.’’
असं सगळं असताना ‘विलासरावांना याबाबत मी सांगितलं आणि विलासरावांनी हा महत्त्वाचा निर्णय घेतला’ असं हरिभाऊ सर्वांना जाहीरपणे सांगतात. अरे लेका, विलासरांशी तुझे इतके चांगले संबंध होते तर मग त्याचवेळी त्यांना सांगून ओबीसी आरक्षण फायनल करू घ्यायचे की! किती थापा माराव्यात माणसानं? सत्तेत तुझं इतकं वजन होतं आणि मुख्यमंत्री तू सांगशील तशी कामं करत होते तर मग आत्ता कशाला लेख लिहित बसतो?
असला हा थापेबाज आणि कावेबाज मनुष्य आहे. त्याचं कोणतंही लेखन प्रेरणादायी नाही, संशोधनात्मक नाही. ज्या महापुरूषांचं नाव घेत त्यांनी आजवर आपली भाकरी मिळवली आणि त्यातूनच सातत्यानं व्याजाचं उत्त्पन्न मिळवलं त्या राजर्षि छत्रपती शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले यांच्याबद्दल नव्यानं संधोधन करून त्यांनी काही लिहिलंय का? त्यांच्या चरित्राची नव्यानं मांडणी केलीय का? भाषणं ठोकणं, प्रसिद्धी मिळवणं, वादविवादात तेल टाकणं आणि वाचाळ बडबड करणं असा हा वाचाळवीर दर दोन-पाच वर्षांनी महाराष्ट्राची विचारधारा गढूळ करत असतो.
मराठा समाजाचं ओबीसींच्या आरक्षणाला सातत्यानं समर्थन होतं. तो कायम मोठ्या भावाच्या भूमिकेत राहिला पण मराठा समाजाच्या आरक्षणाच्या विरोधात वाचाळ बडबड करणार्या हरिभाऊंनी दोन समाजात तेढ निर्माण केली. त्यांचं राजकीय कर्तृत्व, वक्तृत्व, अभिनय आणि अभिनिवेष पाहता ते कोणाबरोबरही, कधीही वैचारिक व्यभिचार करत मधुचंद्र साजरा करायला जाऊ शकतात. महात्मा फुल्यांचं मृत्युपत्र हे ते त्यांच्या कुटुंबियांशी, म्हणजे त्यांच्या भावांशी कसे फटकून असायचे यावर प्रकाश टाकणारं आहे. त्यांच्या चरित्राची मांडणी न करता ‘मी महात्मा फुल्यांचं मृत्युपत्र प्रकाशात आणलं’ असं हरिभाऊ सांगत असतात. अहो नरके, महात्मा फुल्यांचं मृत्युपत्र आधीच होतं. तुम्ही ते प्रकाशात आणलं म्हणजे नेमकं काय केलं? जिथं जमेल तिथं अशा भाकडकथा कशाला सांगत असता?
असल्या तथाकथित विचारवंतांनी महाराष्ट्राचं आजवर खूप नुकसान केलंय. त्यांना सामान्य माणसाचं अंतःकरण कळत नाही. दुःख समजत नाही. समाजात नेमकं काय सुरू आहे याचं आकलन होण्याइतपत बुद्धिमत्ता त्यांच्याकडं नाही. अशा परिस्थितीत हा गृहस्थ फक्त कुणाला तरी बदनाम करत असतो. एखाद्या राजकारण्याला लाज वाटावी इतक्या हरिभाऊंच्या भूमिका बदलत्या असतात. इतकं सगळं करूनही मी सगळ्यांपेक्षा वेगळा आणि प्रामाणिक कसा आहे असा आभास ते निर्माण करत असतात. यांच्यासारख्या माणसांमुळे ओबीसी समाजाला पाठिंबा देणार्यांची फार मोठी पंचाईत होतेय. सगळा महाराष्ट्र ओबीसी समाजाच्या आरक्षणासाठी त्यांच्या पाठिशी राहतोय मात्र हरिभाऊंसारखे वाचाळवीर त्यात तेल ओतत आहेत.
महात्मा फुल्यांचं मृत्युपत्र मी प्रकाशात आणलं, शाहू महाराजांची जयंती मी सुरू केली असं ते सांगतात. उद्या ते म्हणतील, शाहू महाराजांना मी सांगितलं आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना शिष्यवृत्ती म्हणून पैसे दिले, मी शाहू महाराजांशी बोललो आणि प्रबोधनकार ठाकर्यांना साप्ताहिक काढून दिलं, मी शाहू महाराजांना सांगितलं, या दिनानाथाचा आवाज चांगला आहे, त्याच्या मुली अजून लहान आहेत पण त्यांचा आवाज चांगला आहे, भविष्यात त्या गायनक्षेत्रात प्रचंड गाजणार आहेत, त्यामुळे त्यांना मदत करायला हवी. मग महाराजांनी मंगेशकरांना स्टुडिओ सुरू करून दिला, कोल्हापूरात कुस्ती परंपरा नाही आणि कुस्तीला चांगलं वातावरण आहे, महाराज तुम्ही त्यात लक्ष घाला… मग महाराजांनी कुस्तीला प्रोत्साहन दिलं…
पुढच्या चार-दोन वर्षात हरिभाऊंनी अशी काही विधानं केली तरी आश्चर्य वाटायला नको. ते असं काही बोलतील आणि इतिहासाचं वाचन नसलेले त्यांचे चेले हे ऐकून मुंड्याही हलवतील, टाळ्या वाजवतील. हे सारं व्हायचं नसेल तर अजूनही वेळ गेलेली नाही. हरी नरके यांच्यासारख्या तथाकथित विचारवंतांपासून महाराष्ट्रानं कायम दूरच असायला हवं.
– घनश्याम पाटील
संपादक, ‘चपराक’, पुणे
7057292092
सडेतोड लेखणी….!
सन्माननीय घनश्याम पाटील, आपले चपराक चे आम्ही बर्याचदा वाचन करतो. सुंदर काम करता आपण.
पण आज जे लेखन केले ते अतिशय चुकीचे केले. व्यक्ती स्वातंत्र्याचे उल्लंघन केले. हरी नरके सारख्या अभ्यासू व्यक्ती बाबत बोलण्याची ही पद्धत चुकीची आहे. कदाचित कुण्या राजकीय दबावाखाली आपण लिहित असाल तर ही आपली बौध्दिक गुलामगिरी आहे. ती झुगारून जरा सर्व तपासून पहावे.
भले बहाद्दर!
सव्वालाख से एक लढाऊ!!
नेहेमीप्रमाणे सडेतोड चपराक लेख. बाकी आरक्षणाबाबत मी सामान्य माणूस म्हणून इतकेच म्हणू शकतो की कोणत्याही समाजाच्या आर्थिक मागासांचाही विचार व्हावा!
हरी नरके सर बहुजन समाजातील एक नामवंत अभ्यासक व संशोधक आहेत, त्यांच्याविषयीचा सन्मान कायम राहील, बहुजनांना खरा इतिहास त्यांच्या लेखणीतून कळतो.
तुका म्हणे सांगो किती। जळो त्यांची संगती।।
छान टोचलेत कान … महाराष्ट्रात अशा तथाकथित कूचकामी विचारवंतांची पैदास वाढली आहे …. असच अशांचे थोबाड रंगवत रहा …
प्रा.हरी नरके आणि अपणात काय वैचारिक मतभेद आहेत हे आज कळलं