वाचाळवीरांची कुचकामी फौज

वाचाळवीरांची कुचकामी फौज

महाराष्ट्रात शिवसेना, राष्ट्रवादी काँगे्रस आणि काँग्रेस अशा आघाडीचं सरकार आहे. या तीन पक्षांनी एकत्र येऊन आघाडी केल्याने त्यांना महाआघाडी सरकार म्हणतात. या महाआघाडीत काँग्रेस पक्ष नेमका कुठंय हे समजून येत नाही. काँग्रेसचे मंत्री नेमक्या कोणत्या खात्याचे आहेत आणि काय काम करताहेत, त्यांची कामगिरी काय? हेही समजून येत नाही. राष्ट्रवादीचा गृहमंत्री, त्यांचाच अर्थमंत्री सार्वजनिक ठिकाणी त्यांच्या खात्यावर बोलताना दिसतो. शिवसेनेचा परिवहन मंत्री एसटी बस बंद असतानाही त्याचं खातं कसं सुरू आहे हे दाखवून देतो. त्यामानानं मुळात काँग्रेसचे राज्यात कुठले मंत्री आहेत हेही ठळकपणे जाणवत नाही.

राष्ट्रवादीच्या आरोग्य मंत्र्यानं कोरोना काळात स्वतःची प्रतिमा तयार केली. राजेश टोपेंच्या चिकाटीचा आणि कार्यशैलीचा ठसा समाजमनावर उमटला. अशी कामगिरी करणारे मंत्री काँग्रेसकडून दिले गेले नाहीत. काँग्रेसचे मंत्री विजय वडेट्टीवार हे लोकांसमोर येतात आणि लक्षात राहतात पण ते मंत्री म्हणून केलेल्या कामामुळं नव्हे. ओबीसी आरक्षणाच्या संदर्भात आणि मराठा आरक्षणाच्या विरोधात त्यांनी जे मत मांडलं त्यावरून ते चर्चेत आले. नितीन राऊत मंत्री म्हणून लक्षात राहत नाहीत. ते त्यांच्या वादग्रस्त विधानामुळे लक्षात राहतात. काँग्रेसच्या मंत्र्यांची ही मोठी शोकांतिका आहे. अमित देशमुख, विश्वजीत कदम, वर्षा गायकवाड हे अतिशय नव्या दमाचे मंत्री काँग्रेसने दिले होते. हे सगळे घराणेशाहीतून आलेले असल्याने सत्ता कशी राबवायची याचं आकलन त्यांना होतं. त्यांच्याकडून मोठ्या अपेक्षा होत्या. कोरोना काळात शिक्षण चांगल्या पद्धतीनं चालू रहावं आणि विद्यार्थ्यांपर्यंत शिक्षक पोहोचावेत यासाठी अनेक कल्पक योजना आखून शिक्षण क्षेत्रात काम करता आलं असतं. मात्र काँगे्रसकडे जी खाती आहेत त्या खात्याकडून काहीही झालेलं दिसत नाही.

शेतकर्‍यांची वीज बिलं माफ करायची बाजूलाच राहिली, उलट वीज तोडणी करण्याचा प्रयत्न झाला. ऊर्जामंत्री असलेल्या राऊतांनी वीज बिलं माफ करण्याची घोषणा केली आणि परत त्यांची ती घोषणा त्यांनाच रद्द करावी लागली. महाराष्ट्राच्या राजकारणात इतके प्रभावहीन मंत्री आजवर कधीही नव्हते. विधानसभेचं सभापतीपद नाना पटोले यांच्याकडं होतं. विदर्भातला काँग्रेस पक्षाचा चेहरा दाखवावा, फडणविसांना शह द्यावा आणि एखादी आक्रमक व्यक्ती प्रदेश काँग्रेसची अध्यक्ष असावी म्हणून नाना पटोलेंना विधानसभेच्या सभापतीपदावरून पायउतार करावं लागलं. त्यानंतर आपल्या मित्रपक्षांना मान्य होईल असं सभापतीपदाचं नाव काँग्रेस आजतागायत देऊ शकलं नाही. पृथ्वीराज चव्हाण महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री असून त्यांना विधानसभेचे सभापती करावे असा आग्रह काँग्रेसकडून होतोय आणि त्याला राष्ट्रवादीचा विरोध आहे असं समजतं.

आघाडी सरकारच्या काही मर्यादा असतात. त्या मर्यादामध्ये राहून काम करावं लागतं, हे नाना पटोले यांना कळत नाहीये. नानांनी दरवेळी कुठंतरी जायचं आणि स्वबळावर निवडणूक लढवणार म्हणून जाहीर करायचं यापेक्षा स्वतःच्या पक्षाच्या मंत्र्यांची कामगिरी कशी प्रभावी होईल आणि त्यामुळं लोकांचा काँग्रेसकडे बघण्याचा दृष्टीकोन सकारात्मक कसा होईल याच्याकडं त्यांनी अधिक लक्ष दिलं पाहिजे.

खातं छोटं आहे की मोठं आहे हे महत्त्वाचं नाही. तुमची काम करण्याची दृष्टी काय, हे महत्त्वाचे.
तसं म्हटलं तर सुरूवातीला आर. आर. आबांना ग्रामीण विकास मंत्रीपद दिलं होतं. त्या माध्यमातून त्यांनी ग्रामस्वच्छतेची असंख्य काम करून दाखवली. तुम्हाला मंत्रीपद कोणतं मिळालंय, तुम्ही कोणत्या खात्याचे काम करत आहात याच्यापेक्षा तुमची त्याकडं बघण्याची दृष्टी काय आणि तुमच्यासमोर ध्येय काय हे अधिक महत्त्वाचं असतं. अशी दूरदृष्टी ज्याच्याकडं असते त्याला स्वतःची प्रगती करता येते. असे लढावू बाण्याचे मंत्री काँग्रेसमध्ये असणं गरजेचं आहे.

राष्ट्रवादीची बाजू सांभाळणारे किमान तीन मंत्री अतिशय सक्षमपणे त्यांच्याकडे कार्यरत आहेत. अर्थमंत्री अजित पवार, पाठबंधारे मंत्री जयंतराव पाटील आणि आरोग्यमंत्री म्हणून काम करणारे राजेश टोपे. शिवसेनेच्याही दोन-तीन मंत्र्यांनी स्वतःची छाप पाडलीय. मुख्यमंत्र्यांचं स्वतःचं खातं प्रभावीपणे काम करतंय. पर्यावरण खातं हे फारसं प्रभावी नव्हतं पण त्या माध्यमातूनही आदित्य ठाकरे स्वतः काहीतरी करण्याची धडपड करत आहेत. उच्चशिक्षण मंत्री उदय सामंत यांनीही विद्यार्थीहीत डोळ्यासमोर ठेऊन काम करण्याचा प्रयत्न केलाय. तसं काँग्रेसच्या कोणत्या मंत्र्याची कोणती छाप पडली?

नितीन राऊत ना वीज बिलं माफ करू शकले ना बाळासाहेब थोरात काही काम करू शकले. काँग्रेसचे नेते मंत्री म्हणून लोकप्रिय होण्याऐवजी अन्य काही गोष्टींमुळं वादग्रस्त होताहेत. मंत्री म्हणून त्यांचं नाव घेतलं जात नाही आणि मंत्री म्हणून त्यांचं कामही बोललं जात नाही. ते काम बोललं गेलं पाहिजे यावर नाना पटोलेंना पुढच्या काळात लक्ष केंद्रीत करायला हवं. ज्या मंत्र्यांचं काम बोलत नसेल आणि जे मंत्री कामाशिवाय बोलत असतील त्यांना समज द्यायला हवी. तुम्ही पक्षाचा जनाधार वाढवत आहात की घालवत आहात हे त्यांना सांगायला हवं. नितीन राऊत उत्तर प्रदेशमधल्या दलित अत्याचारासंदर्भात तिथल्या लोकांना भेटायला गेले होते. महाराष्ट्रात त्यांचं स्वतःचं ऊर्जाखातं गरीब शेतकर्‍यांची वीज तोडतंय. आपल्या शेतकर्‍यांना आजही पुरेसा वीज पुरवठा केला जात नाही. असं असताना तुम्ही उत्तरप्रदेशमध्ये फिरू शकत असाल तर तुम्ही टुरिझमचा हट्ट करताय.

काँग्रेसच्या मंत्र्यांना स्वतःची ओळख निर्माण करावी लागेल. 44 आमदारांच्या गटाला बर्‍यापैकी मंत्रीपदं मिळाल्यानंतर सत्तास्थापनेसाठी आणि सत्तावाढीसाठी त्याचा उपयोग झाला पाहिजे. काँग्रेसच्या मंत्र्यांचं काम बोलत नाही. अनेक ठिकाणी भाजपला खिंडार पडतंय. त्या पक्षातून लोक राष्ट्रवादीत जात आहेत, शिवसेनेत जात आहेत, अगदी मनसेतही जात आहेत. काँग्रेसमध्ये यायला मात्र कोणीही तयार नाही. काँग्रेसवाल्यांचं काम इतकं बोलायला हवं की भविष्यात काँग्रेस हा एकमेव आश्वासक चेहरा आहे असं लोकांना वाटायला हवं. इतक्या चांगल्या दर्जाचं काम त्यांच्याकडून घडावं. मंत्रीपदं सामान्य आहेत, दुय्यम दर्जाची आहेत, आम्हाला काम करता येणार नाही, ते दाखवता येणार नाही असं काहीही सांगण्यात काही अर्थ नाही. अतिशय छोट्या खात्यात काम करतानाही मोठी कामगिरी पार पाडता येते आणि त्याचा कॅनव्हास हवा तितका वाढवता येतो हे आर. आर. पाटील यांच्याकडून शिकायला हवे.

काँग्रेसच्या नेत्यांची एकच सकारात्मक गोष्ट म्हणता येईल. शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप झाले. तसे आरोप काँग्रेसच्या मंत्र्यांवर आजपर्यंत झाले नाहीत. तरीही त्यांना स्वतःची छाप पाडता आली नाही. आघाडी सरकारला दोन वर्षे पूर्ण होत असताना अजूनही काँग्रेसवाले लोकापर्यंत पोहचत नसतील, स्वतःच्या खात्याला पुरेसा न्याय देऊ शकत नसतील तर 44 आमदार निवडून आलेल्या काँग्रेसचं भवितव्य आणखी खडतर होईल.

नाना पटोले महाराष्ट्रात कितीही आक्रोश करत फिरले आणि त्यांनी स्वबळावर निवडणूक लढण्याच्या घोषणा केल्या तरी काँग्रेसची अवस्था पेट्रोलवाढीच्या आंदोलनात मोडलेल्या, पडलेल्या बैलगाडीसारखी होण्याची शक्यता आहे. काँग्रेस अशी उताणी पडायला नको असेल तर स्वतःच्या खात्याकडं मंत्र्यांनी लक्ष द्यायला हवं, मंत्र्यांच्या खात्यांकडं कार्यकर्त्यांनी लक्ष द्यावं आणि प्रदेशाध्यक्षांनी वाचाळ बडबड करणार्‍या आपल्या नेत्यांना आवरायला हवं. हे सरकार शिवसेना आणि राष्ट्रवादीचं आहे, भाजपा विरोधात आहे आणि कॉमिंट्री करायला काँग्रेस आहे की काय असं एकंदरीत चित्र आहे. काँग्रेस विरोधकांना समाजमाध्यमांवर उत्तरं देताना दिसत नाही. विधिमंडळात उत्तरं देताना दिसत नाही. नेते कामातून बोलत नाहीत. या सगळ्यांच्या बोलण्याचा लोड आपल्या एकट्यावर आलाय अशा गैरसमजातून नाना पटोले इतके बोलतात आणि आघाडी धर्माचं पालन करणंही त्यांच्याकडून राहून जातं. परिणामी शरद पवारांना सांगावं लागतं की इतक्या छोट्या माणसाबद्दल मी काहीही बोलणार नाही.

तेव्हा महाराष्ट्र काँगे्रसला आत्मचिंतन करण्याची, स्वतःच्या कामकाजात सुधारणा करण्याची वेळ आलीय. आत्ता जर असे बदल केले गेले नाहीत तर महाराष्ट्र काँग्रेसला काहीच भवितव्य नसेल. पुढच्या किमान एक वर्षात इतर पक्षातून जे काही पक्षांतर होईल त्यातलं किमान पंचवीस टक्के इनपुट थेट काँग्रेसला मिळालं पाहिजे. त्यासाठी सामान्यातल्या सामान्य कार्यकर्त्यालाही काँग्रेसनं बळ द्यावं इतकंच!

– घनश्याम पाटील

संपादक, ‘चपराक’, पुणे
7057292092

पूर्वप्रसिद्धी – दै. ‘पुण्य नगरी’, मंगळवार, दि. 13 जुलै 2021

चपराक

पुणे शहरातून ‘साहित्य चपराक’ हे मासिक आणि ‘चपराक प्रकाशन’ ही उत्तमोत्तम पुस्तके प्रकाशित करणारी ग्रंथ प्रकाशन संस्था चालविण्यात येते. ‘साहित्य चपराक’ मासिकाचा अंक दरमहा 10 तारखेला प्रकाशित होतो. आपले साहित्य पाठविण्यासाठी, ‘चपराक’मध्ये जाहिराती देण्यासाठी आणि नवनवीन पुस्तकांच्या माहितीसाठी संपर्क - घनश्याम पाटील, संपादक 'चपराक'.
व्हाट्सऍप क्रमांक - ८७६७९४१८५०
Email - Chaprak Email ID

4 Thoughts to “वाचाळवीरांची कुचकामी फौज”

  1. जयंत कुलकर्णी

    काम कोणतेही असो आपला ठसा उमटवता आला पाहिजे हेच खरे! संधी पुन्हा पुन्हा दार ठोठावत नाही. लेख आवडला.

  2. Gayatri Sonje

    जबरदस्त चपराक

  3. अंजली कुलकर्णी

    अगदी अचूक विश्लेषण केलंय . मंत्री कामातून दिसले पाहिजेत , पोकळ बोलण्यातून नकोत .

तुमची प्रतिक्रिया जरूर कळवा

हे ही अवश्य वाचा