गावात नेत्यांची सभा होती. संध्याकाळी सहाची वेळ असली तरी या नेत्याने दिलेला गुंड प्रवृत्तीचा उमेदवार आणि त्याचे काही कार्यकर्ते उत्साहात तयारी करत होते. तशी गावात या नेत्याविषयी प्रचंड नाराजी होती. निवडणुकीचा अपवाद वगळता नेते कधीही गावात फिरकत नसत. गावातले सगळे प्रश्न ‘जैसे थे’ होते. या नेत्याचे जे चार कार्यकर्ते होते त्यांचीच मनमानी चालायची. त्यांच्या दहशतीमुळे सगळे गपगार असायचे.
यावेळी मात्र गावानं एकत्र येऊन ठरवलं की, काहीही झालं तरी या नेत्याच्या उमेदवाराला मत द्यायचं नाही. उमेदवार गावातलाच असल्याने तोंडदेखल हजर राहणं गरजेचं होतं. मत मात्र नाही म्हणजे नाहीच!
शहरातील धरणाचं पाणी कालव्याच्या माध्यमातून गावात यायचं. त्यामुळे सगळं रान हिरवंगार! भाजीपाला, फळे याच्या उत्पादनामुळे सगळ्यांच्या घरी चूल पेटायची.
पाच वाजल्यापासून नेते येत असल्याचं माईकवरून सांगण्यात येऊ लागलं. त्यांना ऐकण्यासाठी, पाहण्यासाठी गर्दी सुरू झाली. पाचचे सहा झाले, सात झाले, साडे सात झाले तरी त्यांची यायची चिन्हे दिसेनात. दरम्यान उपस्थितांसाठी, चहा, अल्पोपहार याचीही व्यवस्था केलेली. त्यामुळे सगळेजण नेत्यांची वाट बघत बसलेले.
आठच्या दरम्यान गाड्यांचा ताफा आला. उमेदवाराच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष सुरू केला. सूत्रसंचालकाने त्यांचं स्वागत करत त्यांना व्यासपीठावर विराजमान होण्याची विनंती केली. खास नेत्यांच्या स्वागतासाठी तयार करून घेतलेला मॅरेथॉन हार घेऊन चार कार्यकर्तेही व्यासपीठाकडे येऊ लागले.
नेते व्यासपीठावर आले. त्यांच्या जागेवर बसण्याऐवजी सरळ सूत्रसंचालकाकडे येत त्यांनी त्याच्या हातून माईक अक्षरशः हिसकावून घेतला.
ते म्हणाले, “मला यायला थोडा उशीर झाला. सगळ्यांच्या प्रचाराची जबाबदारी असल्यानं याला पर्याय नाही. तुम्ही मात्र काळजी करू नका. तीन मिनिटात आपली सभा संपेल. मग मतदानाबाबतचा काय तो निर्णय घेऊन शिस्तीत आपापल्या घरी जा…”
नेत्यांनी पॉज घेत लगेचंच एक प्रश्न विचारला.
“तुमच्यापैकी गांजा कोण कोण ओढतं रं?”
त्यांच्या या आकस्मिक प्रश्नावर सारे चिडीचूप!
नेते म्हणाले, “बोला फटाफट! तुम्ही सांगितलं नाही तर मला तुम्हाला उठवावं लागेल. गांजा कोण कोण ओढतं याची माहिती काढायला मला किती वेळ लागणार?”
तेवढ्यात एकाने धाडसाने हात वर केला.
नेते म्हणाले, “भले शाब्बास! आता मला सांग गांजा कसा ओढतात?”
त्यावर तो माणूस गांगरला.
नेत्यांनी त्याला आश्वस्त करत सांगितलं, “घाबरू नकोस! मी तुला काही त्रास देणार नाही. गांजा कसा ओढतोस ते सांग!”
तो माणूस म्हणाला, “काय साहेब! सोपं आहे. आधी चिलीम घ्यायची. गांजा भरायचा. छापी लावायची. चिलीम पेटवून मस्त झुरके घ्यायचे!”
नेते पुन्हा गरजले, “छापी तशीच लावायची की त्यावर काही टाकायचं?”
तो म्हणाला, “साहेब त्यावर दोन थेंब पाणी टाकायचं…”
नेते म्हणाले, “आता कसं बोललास! सगळ्यांनी लक्षात ठेवा. गावातून आपल्या उमेदवाराबरोबर दगाफटका होईल अशी चर्चा माझ्या कानावर आलीय. तुम्हाला उमेदवार आवडो की न आवडो, तो मी दिलाय इतकं ध्यानात ठेवा. तुम्ही जर त्याला मतदान केलं नाही तर चिलीमीची छापी भिजेल इतकंही पाणी गावात येऊ देणार नाही. पाणी किती, कधी, कुठं सोडायचं हे माझ्या हातात आहे, निधी किती सोडायचा हेही मीच ठरवतो हे तुम्हाला सांगायची गरज नाही. त्यामुळे काय करायचं ते तुम्हीच ठरवा. सभा संपली. आता इथून निघा अन सगळ्यांनी वेळेत मतदान करा.”
नेते जे बोलतात ते करतात हे आजवर अनेकदा दिसून आलंय. त्यामुळे त्यांच्या उमेदवाराला मत दिलं नाही तर सगळं बेचिराख व्हायला वेळ लागणार नाही. त्यापेक्षा नकोच ते! कोणीही निवडून आलं तरी आपल्या जीवनात काय फरक पडणार? निवडणुकीनंतर कोणीही कुणाचा नसतो. उभं पीक, सगळी बाग जळून जायला वेळ लागणार नाही. त्यापेक्षा देऊ यांच्या उमेदवाराला मत…
मतदान झालं. संपूर्ण गावाने त्यांच्या उमेदवाराला मत दिलं. नेत्यांना नंतर तिथे कधीही सभा घ्यावी लागली नाही. प्रचार करावा लागला नाही. कसली आमिषे नाहीत की पैसे वाटप नाही.
त्यानंतर गेल्या तिन्ही पंचवार्षिकला गावानं नेत्याचं मताधिक्य कायम राखलं. यंदा मात्र नेत्याची आणि गावाची सगळी समीकरणं बदललीत. पाहूया यंदा काय होतं ते!
–घनश्याम पाटील
7057292092
दैनिक पुण्य नगरी, 22 एप्रिल 2024
फार छान, अशी निर्भिड पत्रकारिता पाहिजे . सत्य परिस्थिती मांडायला धाडस लागते . नाहीतर बरेच पत्रकार जे नेते देतात तेच छापतात. असे असू नये . पत्रकार हा समाजाचा एक विश्वासू दुवा आहे. त्याने प्रामाणिक काम केले तर जनतेचे प्रश्न सुटणार आहेत .
बापरे,नंगटपणाची परीसीमा! पण ब्रिटीशांचा हंटर खाऊन त्यांची (आता त्यांच्या काॅंग्रेसी वारशाची) तरफदारी करणाऱ्या जनतेला अशी वागणूकच पचनी पडते!