फाईल आणि दादूमियाँ : किस्सा-ए-इलेक्शन – घनश्याम पाटील

दादूमियाँ उर्फ दामोदर विष्णू नेने हे बडोद्यातील एक मोठं प्रस्थ. स्तंभलेखक म्हणून त्यांची ओळख आहे. इंदिरा गांधी यांचं पहिलं चरित्र त्यांनी लिहिलं. नरेंद्र मोदी दादूमियाँच्या घरी येणार्‍या पाहुण्यांच्या मदतीसाठी स्वयंसेवक म्हणून काम करायचे. मध्यंतरी ते पुण्यात एमआयटीने आयोजित केलेल्या ऋषिपूजनाच्या कार्यक्रमासाठी आले होते. नव्वदीच्या पुढे वय असूनही त्यांच्या चेहर्‍यावरील विद्वत्तेचं तेज विलक्षण आहे. त्यांनी एक किस्सा सांगितला.

त्यावेळी ते ‘माणूस’ साप्ताहिकात ‘दिल्लीतला महाराष्ट्र’ हा स्तंभ लिहायचे. तो वाचून यशवंतराव चव्हाण यांनी त्यांना फोन केला आणि भेटीची इच्छा व्यक्त केली. दादूमियाँ म्हणाले, ‘‘मी दिल्लीत इंदिराबाईंकडे येत असतो. आपण तिकडेच भेटूया!’’
त्यावर यशवंतराव म्हणाले, ‘‘नाही, मला वैयक्तिक तुम्हाला भेटायला यायचं आहे. मी तुमच्या घरी आलो तर तुमची काही हरकत आहे का?’’
त्यानंतर ठरलेल्या वेळी यशवंतराव चव्हाण दादूमियाँच्या घरी आले. वेगवेगळ्या विषयांवर त्यांची सविस्तर चर्चा झाली. निघताना यशवंतराव म्हणाले, ‘‘खरंतर इथून पाय निघत नाही पण जायला हवं. त्यापूर्वी मला तुम्हाला काहीतरी द्यायची इच्छा आहे. काय देऊ ते सांगा.’’
त्यावेळी टेलिफोन खूप काळ वेटिंगला असायचे. दुचाकी लवकर मिळायच्या नाहीत. या व अशा कामासाठी पत्रकार अशा बड्या नेत्यांकडे वशिला लावायचे!
दादूमियाँ म्हणाले, ‘‘माझे आजोबा बडोदा संस्थानचे दिवाणजी! वडील विश्वस्त आणि आता मीही या राजघराण्याशी संबधित आहे. त्यामुळे माझ्याकडे नाही असे काहीच नाही. घर आहे, गाडी आहे, टेलिफोन आहे. वैद्यकिय व्यवसायात मी सक्रिय आहे. त्यामुळे मला सदिच्छांशिवाय काहीच नको.’’
यशवंतरावांनी हट्ट धरला की, ‘‘माझ्या समाधानासाठी म्हणून काहीतरी मागा.’’
त्यावर दादूमियाँ म्हणाले, ‘‘ठीक आहे. शोध पत्रकारिता हा माझ्या जिव्हाळ्याचा विषय आहे. माझ्यासाठी काही करायचे असेल तर तुमच्या गुप्तहेर संस्थेने शोधलेली एखादी महत्त्वाची फाईल दाखवा.’’
आता आली का पंचाईत?
यशवंतराव म्हणाले, ‘‘तुम्ही मला धर्मसंकटात टाकलं. अशी कोणतीही फाईल मला तुम्हाला देता येणार नाही. तुमच्या इच्छेचाही मान राखायला हवा. त्यामुळे आता बडोद्यातल्याच एका नेत्याची फाईल माझ्याकडे आली आहे. ती तुम्हाला देतो. माझ्या समोरच नजर टाका आणि मला परत द्या.’’
फाईल दादूमियाँच्या पुढ्यात आली. लोकसभा निवडणुकीचं वातावरण तापलं होतं. दादूमियाँचाच एक मित्र त्यासाठी इच्छुक होता. त्याच्या विरूद्ध काँग्रेसने कोणताही उमेदवार दिला तरी त्याचे डिपॉझिट जप्त होईल अशी परिस्थिती होती. दादूमियाँनी ती फाईल बघितली. घाई गडबडीत वाचली आणि यशवंतरावांना परत दिली.
दुसर्‍या दिवशी ते त्यांच्या या मित्रांकडे गेले. ते म्हणाले, ‘‘काल मला यशवंतराव चव्हाण भेटले.’’
मित्र म्हणाला, ‘‘भेटले असतील! त्यात काय विशेष? तू पत्रकार आहेस!’’
दादूमियाँ म्हणाले, ‘‘त्यांनी तुझ्याविषयी एक फाईल तयार केली आहे.’’
मित्र त्याच तोर्‍यात म्हणाला, ‘‘केली असेल! मी त्यांच्या उमेदवाराचे डिपॉझिट जप्त करणार.’’
दादूमियाँ म्हणाले, ‘‘तू तुझ्या वयाच्या अठ्ठाविसाव्या वर्षी एका मुलीवर अत्याचार केले होते…’’
कित्येक वर्षांपूर्वीचं हे सत्य ऐकल्यावर मित्र भडकला. तो म्हणाला, ‘‘माझ्याकडून त्या वयात ही अक्षम्य चूक झाली होती. त्यानंतर मी त्या मुलीची सगळी जबाबदारी घेतली. तिच्या आईवडिलांचं आजारपण बघितलं. भावाला चांगली नोकरी लावून दिली. त्या प्रसंगानंतर मी एकही रात्र शांत झोपू शकलो नाही. त्या परिवाराची कसलीच तक्रार नव्हती. तुला हे कसं कळलं?’’
दादूमियाँ म्हणाले, ‘‘त्या फाईलमध्ये याचे तपशील आहेत.’’
मित्रानं त्यांना निरोप दिला. दादूमियाँ घरी निघून आले.
साधारण आठ दिवस गेले असतील. दादूमियाँ सकाळी त्यांच्याच घराबाहेर चहा घेत बसले होते. तेवढ्यात ‘गुजरात समाचार’चा अंक आला. त्यावरचा मुख्य मथळा होता, ‘अमूक तमुक उमेदवाराचा काँग्रेसमध्ये बिनशर्त प्रवेश!’
पुढे त्या मित्राने काँग्रसने तिथून दिलेल्या डमी उमेदवाराचा प्रचार केला. त्याला मोठ्या मताधिक्क्याने निवडून आणले.
असं असतं राजकारण…!
आज अनेक नेत्यांच्या बदलत्या भूमिका, पक्षांतर हे सगळं बघितलं की दादूमियाँनी सांगितलेला हा किस्सा आठवतो. अशा फाईलराजचं ग्रहण देशाला कधी लागलं आणि ते कधी सुटणार हे काळच जाणो. मतदारांनी मात्र खूप सजग राहून मतदानाचं कर्तव्य पार पाडणं गरजेचं आहे, इतकंच!

– घनश्याम पाटील
7057292092

(प्रसिद्धी – दै. पुण्यनगरी १५ एप्रिल २०२४)

चपराक

पुणे शहरातून ‘साहित्य चपराक’ हे मासिक आणि ‘चपराक प्रकाशन’ ही उत्तमोत्तम पुस्तके प्रकाशित करणारी ग्रंथ प्रकाशन संस्था चालविण्यात येते. ‘साहित्य चपराक’ मासिकाचा अंक दरमहा 10 तारखेला प्रकाशित होतो. आपले साहित्य पाठविण्यासाठी, ‘चपराक’मध्ये जाहिराती देण्यासाठी आणि नवनवीन पुस्तकांच्या माहितीसाठी संपर्क - घनश्याम पाटील, संपादक 'चपराक'.
व्हाट्सऍप क्रमांक - ८७६७९४१८५०
Email - Chaprak Email ID

तुमची प्रतिक्रिया जरूर कळवा

हे ही अवश्य वाचा