बॅरिस्टर विठ्ठलराव गाडगीळ हे पुण्यातून काँग्रेसतर्फे खासदार म्हणून निवडून जायचे. ते केंद्रीय संरक्षण उत्पादन मंत्री होते. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचीही जबाबदारी त्यांनी सांभाळली. कै. न. वि. उर्फ काकासाहेब गाडगीळ यांचे ते चिरंजीव. काकासाहेब आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची चांगली मैत्री होती. एकदा बॅरिस्टर गाडगीळ दिल्लीला गेले असता डॉ. आंबेडकरांना भेटले. त्यावेळचा किस्सा ते रंगवून सांगायचे. त्यांच्या चेहर्यावर किस्से सांगताना कायम एक मिश्किल हास्य असायचं. बाबासाहेबांनी त्यांना विचारलं, ‘‘तू काय काम करतोस? दिल्लीत कसा आलास?’’
बॅ. गाडगीळ म्हणाले, ‘‘मी अजून शिकतोय. एका उद्योजकाच्या खाजगी विमानाने आलोय.’’
त्यावर बाबासाहेब म्हणाले, ‘‘उद्योजकांचा असाच वापर करून घ्यायचा असतो. उद्योजकांकडून सगळ्या प्रकारचे लाभ घ्यायचे पण काम मात्र सामान्य माणसाचं करायचं.’’
त्यावेळी बॅ. गाडगीळांच्या विरूद्ध अतुर संगतानी नावाचे एक उमेदवार उभे होते. ते मोठे उद्योजक होते. नेमकं गाडगीळांच्या या कार्यक्रमात सूत्रसंचालकानं सांगितलं की, ‘‘संगतानी यांनी आपल्या एका संस्थेला मोठी आर्थिक देणगी दिलीय.’’ त्याचा हाच धागा पकडत संगतानी यांच्या विरूद्ध प्रचार करताना बॅरिस्टर गाडगीळ यांनी आंबेडकरांची वरील भूमिका सांगितली. लोकांना ती पटली आणि लोकांनी त्यांना निवडूनही दिलं. ‘‘उद्योजकांचा फक्त वापर करून घ्यायचा, हे मला सांगितलंय! आणि कोणी सांगितलंय तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलंय,’’ असं ते म्हणताच टाळ्यांचा कडकडाट व्हायचा. गाडगीळ सामान्य माणसाशी एकरूप होऊन बोलायचे. त्यांची सहज संवादी वृत्ती होती. अतुर संगतानी इतके मोठे उद्योजक होते मात्र आज त्यांचे नावही कुणाला आठवत नाही.
त्यावेळी देवीलालजी पंतप्रधानपदाच्या शर्यतीत होते. त्यावेळचा एक किस्सा बॅरिस्टर गाडगीळांनी सांगितला. ते म्हणाले, ‘‘मी संसदेच्या कॅन्टिनमध्ये बसलो होतो. त्यावेळी उत्तरेकडचे खासदार यायचे आणि विचारायचे, श्रीदेवीचं लग्न होतंय हे खरं आहे का?’’
मी महाराष्ट्रातून आलेलो असल्यामुळे आणि मुंबईशी माझा संबंध असल्याने मला ते सगळे विचारत होते. उत्तरेकडच्या, दक्षिणेकडच्या अनेक खासदारांनी मोठ्या औत्स्युक्याने हाच प्रश्न विचारला. त्यामुळे मी पुण्याला येण्याअगोदर मुंबईत उतरलो. श्रीदेवीच्या घरी गेलो आणि तिला विचारलं, की ‘‘जो तो मला एकच प्रश्न विचारतोय, तुझं लग्न झालं का? ते ठरलंय का?’’ तेव्हा तिने मला सांगितलं, ‘‘माझं लग्न ठरलं होतं परंतु ते मोडलं. मी माझ्याकडून ते रद्द केलं.’’
तिनं असं का केलं हे विचारल्यावर ती म्हणाली, ‘‘माझं लग्न एका चिनी माणसाशी ठरलं होतं. त्याचं आडनाव ‘लाल’ असं होतं. लग्नानंतर माझं आडनाव ‘श्रीदेवी लाल’ असं झालं असतं. हे नाव भारतात इतकं बदनाम आहे की, त्यापेक्षा लग्न मोडणं मला योग्य वाटलं.’’
विठ्ठलरावांच्या बोलण्यात कसलाही आवेश नसायचा. सहज गप्पा मारल्याप्रमाणे ते बोलायचे. त्यांच्या भाषणाला त्यामुळे अभूतपूर्व प्रतिसाद मिळायचा. लोकसभेच्या निवडणुका आल्यानंतर तेव्हाचे असे नेते आणि त्यांचे किस्सेही आठवतात. या नेत्यांना सामाजिक भान होतं. संपर्क होता. जनसामान्यांत ते मिसळायचे. नामवंतात वावरायचे. प्रश्न पडले तर त्याची उत्तरेही शोधायचे. आजच्या राजकारण्यांनी यातून काही बोध घेतला तर आपल्या राज्याचे, देशाचे चित्र नक्कीच वेगळे असेल.
– घनश्याम पाटील
(प्रसिद्धी – दै. पुण्यनगरी दि. १३ एप्रिल २०२४)
श्रीदेवी लाल…
खूप छान किस्से आहेत.
मजा आली.
किस्से मस्त. 👍🏻🏆