आधुनिक पिढी

आधुनिक पिढी

Share this post on:

21 व्या शतकात जन्माला आलेली ही पिढी फारच चौकस आहे. कोणत्याही गोष्टीबद्दलची सखोल माहिती मिळाल्याशिवाय शांत बसत नाही. नोकरी अथवा व्यवसाय करण्यासाठी संगणकाच्या मदतीने ते पूर्ण माहिती आत्मसात करून घेतात. ती माहिती पटली तरच ते त्यावर कृती करतात. या पिढीने काळाची पावले लवकर ओळखली आहेत.

पुस्तकी ज्ञानाबरोबरच ते संगणकीय ज्ञानालाही तेवढेच महत्त्व देतात. संगणकीय ज्ञानामुळे त्याच्या विचारशक्तीलाही एक प्रकारचा वेग मिळाला आहे. ते कोणत्याही गोष्टीचा सखोल अभ्यास करून ती गोष्ट जास्तीत जास्त सुलभ करण्यामागे त्यांचा कटाक्ष असतो. फेसबुक, व्हॉट्स अ‍ॅप्स, ट्वीटर यासारख्या आधुनिक तंत्रज्ञानांनी युक्त अशी विविध सोशल मीडियाची उपलब्धता म्हणजे या पिढीला मिळालेले वरदान आहे. मुख्य म्हणजे या सोयी सुविधांचा वापर ते नुसते मनोरंजनाकरिता न करिता स्वत:च्या उत्कर्षासाठीही करून घेत आहेत. विविध सोशल मीडियाद्वारे नोकरीच्या जाहिराती प्रसिद्ध केल्या जातात व एखाद्या बेरोजगाराला नोकरी मिळते. त्याचे आयुष्य उजळून निघते. कळत-नकळतपणे या सर्वाचे श्रेय या माध्यमाच्या संपर्क शृंखलेला जाते. शृंखलेतील सर्वच जण या यशाला कारणीभूत ठरतात.

आजची तरूण पिढी नोकरीकरिता याचा फार छान उपयोग करून घेत आहे. सोशल मीडियातील विविध माध्यमांमुळे ही पिढी नेहमी परस्परांच्या संपर्कात राहू शकते. त्याचबरोबर माहितीची देवाण घेवाण करून एकमेकांना अद्ययावत ठेवत असते. परिस्थितीचे भान ठेवून ही पिढी वागत आहे. एखादा सांघिक प्रकल्प असेल तर या पिढीचे प्रतिनिधी जीवापाड मेहनत करून तो प्रकल्प तडीस नेतात. याचे उत्तम उदाहरण म्हणजे वेगवेगळे टेकफेस्ट. ही पिढी जरी स्वतंत्र विचाराची असली अथवा विचाराची वेगळी वाट चोखाळणारी असली तरी विघातक कृत्य करणारी नक्की नाही. त्यांच्याकडे विचारांची पक्की बैठक आहे. त्यांच्या विचारांकडे थिल्लर विचार म्हणून दुर्लक्ष केले तरी कधी कधी अंतिमत: त्यांचेच विचार पटतात. आजची पिढी ही तंत्रज्ञानातील क्रांतीमुळे खूपच नशीबवान आहे. एका टिचकीवर जगातील कोणतीही गोष्ट संगणकाद्वारे सहज उपलब्ध झाले आहे. तंत्रज्ञानातील विविध शोधांमुळे शिक्षण प्रक्रियेतही त्याचा उपयोग होऊ लागला आहे. सर्वसाधारणपणे पाहिले तर आजची पिढी शिक्षणात नक्कीच खूप वरच्या पातळीवर आहे. शिक्षणाचे महत्त्व त्यांना कळलेले आहे. त्यांनी ते आत्मसातही केले आहे. नवीन पिढी दैनंदिन व्यवहारातील सर्व क्षेत्रात नक्कीच परिपक्व आहे. शैक्षणिक, आर्थिक, व्यावहारिक परिपक्वता त्यांच्याकडे नक्की आहे.

आजची पिढी ताणतणावाखाली आहे हे निर्विवाद सत्य आहे. मानसिक कणखरतेच्या बाबतीत नवीन पिढी कमी पडत आहे असे वाटते. यशापयश पचवण्याची मानसिक तयारी फार कमी जणांकडे दिसून येते. भावनिक बाबतीत नवीन पिढी अजूनही अंधारात चाचपडत आहे. ही जी नवीन पिढी आहे त्यांचे विचार ऐकले किंवा त्यांची दैनंदिनी अवलोकिली तर एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते की त्यांच्यात सातत्य व चिकाटी दाखविणे याचे प्रमाण खूप कमी आहे. त्याचप्रमाणे अपयश आलेच तर ते पचवून पुढे जाण्याची जिद्द याबाबतीत ही पिढी अजूनही अपरिपक्व आहे असे वाटते.

थोड्याशा अपयशाने ह्या पिढीतील प्रतिनिधी खचून जातात. थोडक्यात सांगायचे म्हणजे ही आधुनिक पिढी वैफल्यग्रस्त या अवस्थेतून जात आहे. मग खचून गेल्यावर अपयश पचविण्यासाठी वेगवेगळ्या अवैध मार्गांचा म्हणजेच अमली पदार्थ सेवन, आत्महत्येचा विचार ह्या सारख्या गोष्टींचा विचार करून जास्तच खचतात. एकदा का अंमली पदार्थांची चटक लागली की विचार करण्याची शक्ती नष्ट तर होतेच पण त्याचबरोबर तो अंमली पदार्थ मिळविण्यासाठी मुलगा किंवा मुलगी कोणत्याही थराला जाण्याची जी मानसिकता निर्माण झाली आहे त्याला लगाम घालणे गरजेचे आहे. अंमली पदार्थात अडकलेल्या या पिढीच्या प्रतिनिधींना यातून बाहेर काढण्यासाठी जुनी पिढीच नाही तर सरकारही प्रयत्न करीत आहे. शिक्षण असतानाही ही पिढी अशी का भरकटत चालली आहे हा मोठा गहन व विचार करण्यासारखा प्रश्न आहे. अंमली पदार्थ ही दूरची गोष्ट आहे. सध्या धूम्रपानाचे प्रमाण या पिढीत दिवसेंदिवस वाढत आहे. मुलांबरोबर मुलीही या धूम्रपानाच्या आहारी जात आहेत ही गोष्ट प्रकर्षाने जाणवत आहे. याच्या मागचे खरे कारण धुम्रपानामुळे भूक लागत नाही व अंगकाठी बारीक राहते. जुन्या पिढीवरील राग, बेदरकारी, गर्भश्रीमंती, घरातील मंडळींकडे यांना देण्यास वेळ नसणे इत्यादी विविध कारणे यामागे असण्याची शक्यता आहे.

घरात गर्भश्रीमंती अथवा नवश्रीमंती असेल तर या पिढीतील प्रतिनिधीला लहान वयातच ‘वाहन’ घेऊन दिले जाते. अपरिपक्व वयात वाहन, महागडा मोबाईल इत्यादी गोष्टी दिल्या तर श्रीमंतीची हवा डोक्यात जाण्यास वेळ लागत नाही. ही अशी हवा डोक्यात गेली की ‘हिणविण्याची’ वृत्ती वाढीस लागते. यांचे मित्र मैत्रिणी कोण आहेत किंवा हे कोणत्या प्रकारच्या व्यक्तिंच्या संगतीत असतात याबद्दल घरातील मंडळी अनभिज्ञ असतील अथवा ते त्याबद्दल जास्त उत्सुकता दाखवीत नसतील तर अशी मुले मनाला येईल तसे अनिर्बंधपणे वागतात. संस्कारांचा पगडा फारसा नसल्यामुळे तसेच कसलाही धरबंध नसल्यामुळे व खिशात भरपूर पैसा खुळखुळत असल्यामुळे मनात येईल ते करतात मनाला येईल तसे वागतात. संगणकावर नको ते बघतात आणि त्याचे अनुकरण करतात. घरात संवाद नसणे हे महत्त्वाचे कारण यामागे असू शकते. घरातल्या मंडळींनी त्याच्या किंवा तिच्या प्रत्येक हालचालीवर, मित्र-मैत्रिणींवर, वाचनावर, संगणक वापर इत्यादी गोष्टींवर लक्ष ठेवले तर ही पिढी उज्ज्वल यश मिळविण्याची क्षमता बाळगून आहे. घरच्यांकडून असलेल्या अपेक्षा पुर्‍या करण्यात असलेली असमर्थता लपविण्यासाठी तसेच कधी कधी प्रेमप्रकरणात आलेल्या अपयशामुळे आत्महत्येचा विचार करण्याचीही शक्यता नाकारता येत नाही.

भावनिक बाबतीत त्यांना जर वेळीच आधार दिला किंवा त्यांनी तो आधार स्वेच्छेने घेतला तर त्यांची भेदरलेल्या अवस्थेतून सुटका नक्कीच होईल. अपयशाने येणारी निराशा घालविण्यासाठी मानसिकरित्या सबळ होण्याची गरज असते. नेमके इथेच ते कमी पडतात. अपयश येण्यामागे असलेल्या अनेक कारणांपैकी प्रयत्नातील सातत्य हे ही एक कारण असू शकते.

शिक्षण घेण्यातील सातत्य, एखादा छंद जोपासण्यातील सातत्य इत्यादी सातत्याच्या अभावाला ही पिढी बळी पडत आहे. सातत्य नसल्यामुळे अपयश येते व अपयश येत असल्यामुळे सातत्य राखले जात नाही अशा दुष्ट चक्रात ही पिढी अडकली आहे पण यातून बाहेर पडण्याचा मार्ग तेच काढू शकतात. भावनिकदृष्ट्या ताकदवान होण्यासाठी या पिढीने समुपदेशकाची मदत घेणे ही काळाची गरज आहे. तसे पहावयास गेले तर ही पिढी प्रयत्नात कुठेही कमी पडत नाही पण त्याचबरोबर असेही वाटते की त्यांचे प्रयत्न एकमार्गी फार कमी वेळा असतात. एकाच वेळी वेगवेगळ्या तसेच कधी कधी परस्परांशी भिन्न महत्त्वाकांक्षा डोळ्यासमोर ठेवून प्रयत्न केले जातात. त्यामुळे साहजिकच प्रयत्न कमी पडतात व अपयश येऊ शकते.

संपर्क परिपक्वतेच्या बाबतीत नवीन पिढीने जर जास्त लक्ष दिले तर त्यांना अजून चांगले यश मिळू शकते. आपण जेव्हा आजूबाजूला पाहतो तेव्हा ही नवीन पिढी आपल्याच विश्वात दंग असते. त्यांना बाकी जगाशी काही देणे घेणे नसते. ते लक्ष देतीलच याची खात्री नाही. याउलट कधी कधी टर उडविण्यास पण कमी करत नाहीत. कधी संवाद साधण्याचा प्रयत्न केला अथवा काही सांगण्याचा प्रयत्न केल्यास खिल्ली उडविण्यास कमी करीत नाहीत. अर्थात आधुनिक पिढीतील सर्वजण असे असतात असे नाही. काही वेळा या गोष्टी खटकतात. आपण सर्वजण या समाजाचे घटक आहोत. नवीन पिढीने जर जुन्या पिढीशी संवाद साधून विचारांची देवाण घेवाण केली तर नक्कीच त्याचा फायदा नवीन पिढीला होऊ शकतो. जुनी पिढी बुरसट विचारांची पिढी हा जो गैरसमज नवीन पिढीतील काही जणांनी करून घेतला आहे तो खरेच विचार करण्यासारखा आहे. जुन्या पिढीच्या अनुभवाचा फायदा नवीन पिढीने करून घेणे हे नवीन पिढीला लाभदायक ठरू शकते. जुन्या पिढीकडे दुर्लक्ष करणे, त्यांच्या विचारांची टर उडविणे ही नक्कीच चांगली गोष्ट नाही. आपल्या संस्कृतीबद्दल त्यांनी विचार करणे गरजेचे आहे.

आपली हिंदू संस्कृती ही जगातील प्राचीन संस्कृती आहे. त्यास कित्येक वर्षांची परंपरा आहे. आपले माता-पिता, ज्येष्ठ बंधू-भगिनी तसेच इतर ज्येष्ठ त्याचबरोबर समाजातील ज्येष्ठ यांचा योग्य तो आदर करणे हे प्रत्येकाचे कर्त्यव्य आहे. आपल्यापेक्षा वयाने मोठ्या असणार्‍या व्यक्तीला ‘वयस्कर’ म्हणणे ही हिंदू संस्कृती आहे. ‘म्हातारा’ किंवा ‘बुढा’ म्हणून त्याची अवहेलना करण्यात कसली आधुनिकता आहे हे न सुटणारे कोडे आहे. एखादा कानाने ‘बहिरा’ असणे हे वास्तव असले तरी चारचौघात त्याला ‘बहिरा’ म्हणणे किंवा हिणवणे हे चुकीचेच आहे. याउलट त्यांच्या अनुभवाचा फायदा घेऊन स्वत:चा उत्कर्ष करून घेणे ही मानसिकता जास्त सकारात्मक वाटते. आपल्या संस्कृतीत चार आश्रमांचे वर्णन केले आहे. त्यापैकी वानप्रस्थाश्रम एक आहे. हा त्या काळात ऐच्छिक होता. कोणावरही कसलीही जबरदस्ती नव्हती. आजकाल याचे नाव बदलून ‘वृद्धाश्रम’ हे ठेवले गेले आहे. अडचण होत असलेली जुनी पिढी इथे ठेवली जात असावी. घरातील अडगळ दूर करावी हा विचारही असू शकेल. कधी कधी जुन्या पिढीचीही चूक असू शकते यास आक्षेप नाही. त्यांना सांभाळून घेणे हीच मानसिकता नवीन पिढीने जोपासावी एवढी माफक अपेक्षा जुन्या पिढीची असते. जुन्या पिढीला फक्त दोन प्रेमाचे शब्द हवे असतात. मागच्या पिढीने आपल्याला मोठे करण्यात घेतलेले कष्ट, खाल्लेल्या खस्ता नवीन पिढीने स्मरणात ठेवणे गरजेचे आहे.

शेवटी एवढेच सांगता येईल विचारांच्या बाबतीत जुनी पिढी जर दोन पावले पुढे येत असेल तर नवीन पिढीने दोन पावले मागे येऊन हातमिळवणी केली तर बरेच प्रश्न सुटू शकतील. नवीन पिढीची कल्पकता तसेच जुन्या पिढीचा अनुभव याचे मनोमिलन झाले तर कल्पकता अनुभवाच्या मुशीतून तावून सुलाखून निघेल जेणेकरून नवीन पिढीला विविध क्षेत्रातील यशाची शिखरे पादाक्रांत करणे सुलभ जाईल. दोन्ही पिढीतील प्रतिनिधींनी आपापला अहंकार बाजूला ठेवून परस्परांना त्यांच्या गुण-दोषासकट अंगिकारले तर सर्वजण सुखी होतील हे नक्की.

– मिलिंद कल्याणकर

नेरूळ, नवी मुंबई
9819155318

Share this post on:

Author: चपराक

पुणे शहरातून ‘साहित्य चपराक’ हे मासिक आणि ‘चपराक प्रकाशन’ ही उत्तमोत्तम पुस्तके प्रकाशित करणारी ग्रंथ प्रकाशन संस्था चालविण्यात येते. ‘साहित्य चपराक’ मासिकाचा अंक दरमहा 10 तारखेला प्रकाशित होतो. आपले साहित्य पाठविण्यासाठी, ‘चपराक’मध्ये जाहिराती देण्यासाठी आणि नवनवीन पुस्तकांच्या माहितीसाठी संपर्क - घनश्याम पाटील, संपादक 'चपराक'.
व्हाट्सऍप क्रमांक - ८७६७९४१८५०
Email -

View all posts by चपराक >

2 Comments

  1. दोन पिढ्यातील अंतर कमी करण्यासाठी, संवाद वाढवण्यासाठी मार्गदर्शनपर सुंदर लेख!

तुमची प्रतिक्रिया जरूर कळवा

error: Content is protected !!