लेखक, पत्रकारांवर हल्ले करणं ही महाराष्ट्राची संस्कृती नव्हे!
एखाद्या व्यक्तिला एखाद्याच्या मतांबद्दल आपत्ती किंवा मतमतांतरे असतील तर त्याने त्याच माध्यमातून आपली मते व्यक्त करावीत. कारण दोन विद्वान जेव्हा वाद घालतात तेव्हा त्यातून येणारे परिणाम हे कायमच सुखद असतात.
मागील आठवड्यात ‘चपराक प्रकाशन’चे संस्थापक संपादक घनश्याम पाटील यांनी आपल्या ब्लॉगवरून लिहिलेल्या लेखामुळे बरेच वादंग माजले. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या गेल्या 15 वर्षांच्या राजकीय कारकिर्दीचे विवेचन करणार्या लेखामुळे मनसेचे अनेक कार्यकर्ते आक्रमक झाले. घनश्याम पाटील यांना मारा, झोडा, त्यांच्या कार्यालयाची तोडफोड करा यांसारख्या धमक्यांसह शिवीगाळ आणि असंस्कृत भाषेचा त्यांच्यावर भडिमार करण्यात आला.
सदर लेखात व्यक्त केलेली मते ही घनश्याम पाटील यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे व मनसेचे पोटतिडकीने काम करणारे कार्यकर्ते यांच्या राजकीय भवितव्याबाबत चिंता आणि त्यांच्या कर्तृत्वावर विश्वास व्यक्त करणारी होती; परंतु हा लेख काही मनसे कार्यकर्त्यांनी सकारात्मक पद्धतीने न घेता आपल्या सर्वोच्च नेत्यावर व आपल्या पक्षावर घनश्याम पाटील यांनी हा केलेला वैयक्तिक हल्ला आहे असे समजून मारझोडीची भाषा सुरू केली. राजकीय कार्यकर्त्यांनी वापरलेली भाषा अत्यंत क्लेशदायक आणि महाराष्ट्राच्या उज्ज्वल संस्कृतीला न शोभणारी आहे.
लेखक, पत्रकारांना धमकावणे ही चिंताजनक बाब
लोकशाहीचे तीन स्तंभ मानले जातात. 1) न्यायव्यवस्था 2) संसद आणि 3) मंत्रिमंडळ. ह्यातील न्यायव्यवस्था जर सोडली तर इतर दोन स्तंभ हे राजकीय पक्षांशी निगडित आहेत. जेथे राजकीय पक्ष चुकतात तेथे त्यांना दिशा देण्याचे काम हे लेखक व पत्रकार यांचे आहे. आजच्या ध्रुवीकरणाच्या काळात निपक्ष: आणि निर्भिड पत्रकारिता करणारे लेखक आणि पत्रकार फार कमी आहेत. अशा लेखकांचा अपमान नव्हे तर सन्मान होणे गरजेचे आहे.
मागील वर्षी सौदीचे क्राऊन प्रिन्स महमंद बिन सलमान यांच्यावर टीकात्मक लेख लिहिणारे पत्रकार जमाल खागोशी यांची हत्या टर्कीतील सौदीच्या दुतावासात करण्यात आली. सदर घटनेमुळे क्राऊन प्रिन्स महमंद बिन सलमान आणि सौदीच्या कारभारावर जगभरातून टीका झाली. रिपोर्टर्स विदाऊट बॉर्डर आंतरराष्ट्रीय संस्थेच्या दरवर्षी प्रकाशित करण्यात येणार्या ‘वर्ल्ड प्रेस फ्रीडम इंडेक्स’च्या अहवालात भारताचे स्थान हे कायमच निचांकी दाखवण्यात येते. अर्थात भारतातील पत्रकार व लेखक हे सुरक्षित नाहीत असा त्याचा अर्थ निघतो.
भारत ही जगातील सर्वात मोठी लोकशाही असल्याचे आपण अभिमानाने सांगतो. त्याच लोकशाहीत जर आपल्या देशातील लेखक – पत्रकार सुरक्षित आणि स्वतंत्र नसतील तर त्या लोकशाहीला काही अर्थ आहे काय याचा विचार होणे आवश्यक आहे. विचारांची लढाई ही जेव्हा विचारांनी लढता येत नाही तेव्हा लोक मारझोडची भाषा करतात. जमाल खागोशी यांच्या लेखणीचा सामना करण्याची हिंमत क्राऊन प्रिन्स महमंद बिन सलमान यांच्याकडे नव्हती म्हणून कदाचित हे हत्याकांड करण्यात आले. महाराष्ट्रात आपण हीच संस्कृती रुजवून महाराष्ट्राचा व पर्यायाने मराठी माणसाचा खरंच उत्कर्ष होणार आहे का? हे समजणे आवश्यक आहे.आपली मते व्यक्त करणे हा घटनात्मक अधिकार
भारतीय संविधानाच्या भाग 3 मधील कलम 19 अन्वये देशातील प्रत्येक व्यक्तिस आपले मत मांडण्याचा पूर्ण अधिकार आहे. त्यामुळे प्रत्येकाने एकमेकांच्या मतांचा आदर करणे अपेक्षित आहे. एखाद्या व्यक्तिला एखाद्याच्या मतांबद्दल आपत्ती किंवा मत-मतांतरे असतील तर त्याने त्याच माध्यमातून आपली मते व्यक्त करावीत कारण दोन विद्वान जेव्हा वाद घालतात तेव्हा त्यातून येणारे परिणाम हे कायमच सुखद असतात.घनश्याम पाटील हे एक कर्तृत्ववान लेखक
घनश्याम पाटील आणि ‘चपराक प्रकाशन’ हे साहित्यक्षेत्राला नवीन असलेले नाव नाही. कसलीही आर्थिक व कौटुंबीक पार्श्वभूमी नसताना स्वकर्तृत्वाने पाटील आज सलग गेली 20 वर्षं महाराष्ट्रात साप्ताहिक आणि मासिकाचे प्रकाशन करीत आले आहेत. अनेक राज्यस्तरीय पुरस्कारांनी सन्मानित झालेले घनश्याम पाटील यांच्या नावावर एकाच वेळी अधिकाधिक पुस्तके प्रकाशित करण्याचा विक्रम आहे. गेली अनेक वर्षे मराठीची आणि मराठी सारस्वतांची सेवा करणारे घनश्याम पाटील हे महाराष्ट्रातील तरुण लेखकांसाठी आदर्श आहेत.राज ठाकरे हे आदरस्थानीच!
मराठी भाषा आणि मराठी माणूस यांच्यासाठी लढा उभारणारे राज ठाकरे हे महाराष्ट्रासाठी आदरस्थानीच आहेत. त्यांनी व त्यांच्या पक्षाने मराठीसाठी अंगावर घेतलेले खटले, सोसलेला तुरुंगवास विसरून चालणार नाही परंतु काळाच्या ओघात त्यांच्या भूमिकेत झालेला बदलसुद्धा नाकारुन चालणार नाही. घनश्याम पाटील यांनी ह्याच मर्मावर बोट ठेवले. पाटील यांच्या लेखनाचा उद्देश ठाकरे यांच्यावर वैयक्तिक टीका करणे किंवा त्यांची निंदा करणे असा मुळीच नव्हता. शेवटी राज ठाकरे आणि घनश्याम पाटील हे दोघेही महाराष्ट्राचे सुपुत्र आहेत. मराठी भाषा आणि मराठी माणूस ह्यांचा उत्कर्ष हाच दोघांचा ध्यास आहे. एक आपल्या नेतृत्व कौशल्याचा वापर करतो तर दुसरा आपल्या लेखणीचा. हाच काय तो दोघांमधील फरक आहे.
– स्वप्निल श्रोत्री/ नित्तेन गोखले
आमचे इतरही लेख वाचण्यासाठी, दर्जेदार पुस्तके विकत घेण्यासाठी www.chaprak.com ला भेट द्या. ‘चपराक प्रकाशन’चे फेसबुक पेजही जरूर लाईक करा. उत्तमोत्तम व्हिडीओ पाहण्यासाठी ‘चपराक’च्या युट्यूबला भेट द्या आणि सबस्क्राइबही नक्की करा.
Copyright @ www.chaprak.com / All Rights Reserved.