सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत असंख्य विचार आपल्या मनात येत असतात. एका अभ्यासकाने या विचारांची संख्या मोजण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्या असं लक्षात आलं की ही संख्या दिवसागणिक सत्तर-पंचाहत्तर हजार वगैरे आहे. आश्चर्य वाटलं ना!
आपण आपल्या कामात व्यवसायात इतके मग्न असतो की या विचारांना झुरळासारखं झटकून आपण न कळत पुढे पुढे जात राहतो आणि ते योग्यही आहे. आपलं मन फुलपाखरासारखं आहे. या फुलावरून त्या फुलावर जसं फुलपाखरू सहजगत्या आणि चपलतेनं फेरफटका मारत असतं तसंच काहीसं मनाचं आहे. फुलपाखराला जसं वेगवेगळ्या रंगांच्या आकारांच्या आणि वेगवेगळ्या गंधांच्या फुलांवर उडताना बागडताना पाहण्यात मजा आहे अगदी तसंच मनाचं देखील आहे. मन कुठल्या काळात आणि कोणत्या व्यक्तीसामूहात केव्हा आपल्याला घेऊन जाईल हे आपण सांगू शकत नाही. बरं मनावर आपलं नियंत्रण ही नाही.
‘मन सदा आशाळभूत ते न कदा स्थिर होत
सहजी फिरून येत शोधून अवघ्या त्रिभुवना’
अशी एक ओवी ‘श्री गजानन विजय’ या ग्रंथात आहे आणि यामुळेच मनावर ज्यांचं नियंत्रण आहे त्यांना आपण ‘योगी’ ‘मुनी’ वगैरे उपाधी देऊन मोकळे होतो. हे एखाद्याला मोठेपणा देऊन मोकळं होणं सोपं असतं! साधारण चाळीस वर्षांपूर्वी मी शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचा शिवाजी महाराजांचे चरित्र कथन करणारा कार्यक्रम धुळ्याला असताना ऐकला होता. त्यावेळी गड-किल्ल्यांचे महत्व सांगताना ते म्हणाले होते…
“लोक माझ्याकडे गड-किल्ले दाखवा म्हणून येतात. किल्ल्यांचा इतिहास सांगा म्हणून आग्रह धरतात! पण जेव्हा प्रत्यक्षात गड चढण्याचा प्रसंग येतो तेव्हा मात्र, ‘आहाहा काय ते शिवाजी महाराज… किती अवघड गड चढत असत…’ असं म्हणून सोयीस्करपणे गड चढण्याचे टाळतात.”
हे म्हणजे तसच झालं. मनावर नियंत्रण ठेवण्यापेक्षा नियंत्रण ठेवणाऱ्यांना ‘योगी’ म्हणून त्यांच्या साधनेच कौतुक करून सोडून दिलेलं बरं! आपल्याला तसदी नको!
अवघड आहे हे मनावर नियंत्रण ठेवण्याचं काम! बरं हे जे काही असंख्य विचार मनात येतात त्यांना आपण पकडूही शकत नाही. लक्षात ठेवणं त्याहून कठीण!
मग एवढया हजारो विचारांमधून आठवणींमधून एखादी आठवण जरी आपल्याला लिहिता आली सांगता आली तरी पुष्कळ झालं! श्री समर्थ रामदास स्वामींनी तर या मनाला समजवण्यासाठी मनाला मार्गदर्शन करण्यासाठी चक्क दोनशे पाच श्लोकांचा ‘मनाचे श्लोक’ नावाचा ग्रंथ लिहिला!
हल्ली मी व्हाट्सएप, फेसबुक वगैरे पाहतो. बरा वेळ जातो त्यामध्ये! काल मला चैतन्यची फ्रेंड रिक्वेस्ट आली आणि पुन्हा मी गतकाळातील आठवणीत रमलो. चैतन्य माझ्या मित्राचा म्हणजे अरुणचा भाचा. त्यावेळी आम्ही सोलापूर येथे होतो. चैतन्यचे आईवडील शिक्षक होते. एका खेड्यात ज्ञानदानाचे पवित्र काम करत होते. त्यांचा हा खेड्यातून सोलापूरला आलेला हुशार मुलगा. त्याला मेडिकल ला ऍडमिशन मिळाली होती. ती ही मेरिटमध्ये! हल्ली तो एक प्रतिथयश त्याच्या विषयात संशोधन करणारा आणि त्याद्वारे लोकांची सेवा करणारा डॉक्टर झाला आहे. ग्रामीण भागात शिक्षण घेऊनही तो हे यश मिळवू शकला!
अलीकडेच सोलापूर जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या शाळेतील डिसले गुरुजींना सात कोटी रुपयांचा आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाला. तोही त्यांच्या शिक्षण क्षेत्रातील योगदानाबद्दल! शिक्षण ही काही ठराविक शहरांची मक्तेदारी नाही हे त्यांनी सिद्ध केलं!
खेड्यात शिक्षण घेतलेल्या चैतन्यला मेडिकलला मिळालेली ऍडमिशन ती ही मेरिटमध्ये आणि अलीकडेच डिसले गुरुजींना खेड्यात केलेल्या शिक्षण योगदानाबद्दल मिळालेला सात कोटी रुपयांचा आंतरराष्ट्रीय पुरस्कार यात कुठेतरी साधर्म्य शोधण्याचा प्रयत्न माझ्या मनात सुरू झाला!
रणजितसिंह डिसले गुरुजींना ग्लोबल टीचर २०२० चा पुरस्कार मिळाला. एखादया भारतीय शिक्षकाला पहिल्यांदाच हा पुरस्कार मिळाला. लंडन येथे एका कार्यक्रमात अभिनेता स्टीफन फ्राई यांनी ही घोषणा केली. युनेस्को आणि लंडनच्या वार्कि फौंडेशनने दिलेल्या या पुरस्काराची रक्कम एक मिलियन यूएस डॉलर म्हणजेच अंदाजे सात कोटी रुपये आहे. डिसले गुरुजींनी पुरस्काराची अर्धी रक्कम लगेचच इतर स्पर्धकात वाटण्याची घोषणा केली. गुरुजींच्या मते, ‘शिक्षक नेहेमीच देण्यात आणि वाटण्यात विश्वास ठेवतात’
जगातल्या एकशे चाळीस देशांमधील बारा हजारांपेक्षा जास्त शिक्षकांमधून डिसले गुरुजींची निवड झाली आहे. शिक्षण क्षेत्रातील विशेष योगदानाबद्दल शिक्षकांना प्रोत्साहन देऊन त्यांचा गौरव करण्यासाठी २०१४ मध्ये वार्कि फौंडेशन ने हा पुरस्कार सुरु केला. हे शिक्षक दुर्गम प्रदेशात काम करतात. शिक्षणाचा हक्क विद्यार्थ्यांना देण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. सर्वसमावेशकता व विद्यार्थ्यातील गुणांचा विकास हे ज्यांचे ध्येय आहे. समाजात बदल घडवण्याची ज्यांच्यात धमक आहे असे शिक्षक या स्पर्धेसाठी निवडले जातात.
डिसले गुरुजींनी सोलापूर जिल्ह्यातील एका परितेवाडी नावाच्या खेड्यामधल्या जिल्हापरिषदेच्या शाळेत अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरून पहिल्यांदाच पुस्तकांमध्ये क्यू आर कोडचा शोध लावला व तेथील आदिवासी मुलींच्या शिक्षणाला प्रोत्साहन दिले. २००९ साली जेव्हा डिसले गुरुजींनी या शाळेत काम सुरू केले तेव्हा या आदिवासी मुलींची उपस्थिती केवळ दोन टक्के होती. शिवाय या मुलींचे विवाह देखील लहान वयात होत. भाषेचा ही प्रश्न होता. या सगळया अडचणींवर हिमतीने डिसले गुरुजींनी मात केली. क्यूआरकोड मुळे शिक्षणात ऑडिओ व्हिडिओ या गोष्टींचा वापर करता आला. आदिवासी मुलींना वैयक्तिक पातळीवर मार्गदर्शन करून शिकवलं. आता मुलींची उपस्थिती तर शंभर टक्के आहेच पण शिक्षणामुळे प्रगल्भता येऊन लग्नाचे वय देखील वाढले आहे! मुली आता पदवीधर होत आहेत. गुरुजींच्या प्रयत्नांमुळे शाळेच्या सभोवतालची २५० हेक्टर जमीन वाळवंट होण्यापासून वाचली आहे. त्यामुळे त्यांच्या शाळेला २०१८ साली “विप्रो नेचर फॉर सोसायटी” अवॉर्ड मिळाले आहे.
“लेटअस क्रॉस द बॉर्डर” या प्रोजेक्ट च्या माध्यमातून डिसले गुरुजींनी एकमेकांशी वैर असणाऱ्या शेजारी देशांमधील तरुणाईमध्ये शांतता रुजविण्यासाठी भाईचारा स्थापन करण्यासाठी प्रयत्न केला आहे. राज्यातील शिक्षकांना तंत्रज्ञानाच्या वापरसंबंधी ते मार्गदर्शनही करतात.
डिसले गुरुजींनी महाराष्ट्र सरकारला सगळा सिलेबस क्यूआर कोडला जोडण्याची विनंती २०१७ साली केली होती. गुरुजींच्या या सूचनेनुसार प्रायोगिक तत्त्वावर काम करून महाराष्ट्र सरकारने सगळ्या इयत्तांसाठी पाठ्यपुस्तकांमध्ये क्यूआर कोडचा उपयोग करण्याचा निर्णय घेतला. आता तर एनसीईआरटीनेही आशा स्वरूपाची घोषणा केली आहे!
क्यूआरकोड म्हणजे क्विक रिस्पॉन्स कोड. याला ‘बारकोड’च्या पुढचे संशोधन म्हणता येईल. ज्यामध्ये मोठया प्रमाणावर माहिती सुरक्षित राहते व जलदगतीने स्कॅनही होते.
डिसले गुरुजींनी त्यांच्या कर्तृत्वाने महाराष्ट्राला व या भरतभूमीला शिक्षण क्षेत्रात जागतिक पातळीवर ओळख मिळवून दिली. त्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन!!
मनाच्या चपळतेविषयी व गुढतेविषयी कवी सौमित्र आपल्या गीतात लिहितात…
माझिया मना जरा थांब ना
माझिया मना जरा थांब ना
पाऊली तुझ्या माझिया खुणा
तुझे धावणे अन मला वेदना
माझिया मना जरा बोल ना
ओळखू कसे मी हे तुझे ऋतू
एकटी न मी सोबतीस तू
ओळखू कशा मी तुझ्या भावना
माझिया मना जरा ऐक ना
सांजवेळ ही तुझे चालणे
रात्र ही सुनी तुझे बोलणे
उष:काल आहे नवी कल्पना
हे गीत आशा भोसले यांनी गायलं आहे आणि या गीताला संगीत श्रीधर फडके यांनी दिलं आहे.
जयंत कुलकर्णी
दूरभाष : ८३७८०३८२३२
——————————–^
जयंत रावांचा नेहमी प्रमाणे सुंदर लेखन 👌🙏💐
कुलकर्णी सर, अत्यंत अभ्यासपूर्ण लेख आहे. अभिनंदन!
माउली नमस्कार..
सुंदर वाचनीय लेख.. 😊
खूपच छान लेख सरृ
खूप अभ्यासपुएन लेख..खूप आवडला..