युवा शक्ती

युवा शक्ती

‘विवेकानंदांनी पटविले व्यायामाचे महत्त्व’ या मथळ्याखाली दैनिक ‘महाराष्ट्र टाइम्स’च्या शनिवार दि. १६ जानेवारी २०२१ च्या अंकात पुढील बातमी वाचली.

‘स्वामी विवेकानंदांनी युवकांना सुदृढ मन आणि व्यायामाचे महत्त्व पटवून दिले; तसेच ध्यानधारणा आणि योग करण्याविषयी मार्गदर्शन केले. भारतभूमीची कीर्ती जगभर पसरवणारे योद्धा संन्यासी म्हणजे स्वामी विवेकानंद होते,’ असे मत ज्येष्ठ शिक्षणतज्ञ डॉ. अनिल कुलकर्णी यांनी व्यक्त केले.

आशा प्रतिष्ठान ट्रस्टच्या वतीने पूना नाईट हायस्कूल व जुनियर कॉलेज यांच्यातर्फे रात्रशाळेतील विद्यार्थ्यांसाठी युगप्रवर्तक स्वामी विवेकानंद व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली होती. टिळक रस्त्यावरील डॉ. नीतू मांडके हॉल येथे झालेल्या या कार्यक्रमाला कॉलेजचे प्राचार्य अविनाश ताकवले, शिक्षणतज्ञ डॉ. देवानंद शिंदे, आशा प्रतिष्ठान ट्रस्टच्या अध्यक्षा अंजली लोणकर, चंदन डाबी उपस्थित होते. संस्थेतर्फे शंभर विद्यार्थ्यांना स्वामी विवेकानंद चरित्र पुस्तके भेट म्हणून देण्यात आली.”

नुकताच बारा जानेवारीला ‘राष्ट्रीय युवा दिवस’ साजरा झाला. आदरणीय राष्ट्रपिता महात्मा गांधीजी, नेताजी सुभाष चंद्र बोस, पंडित जवाहरलाल नेहरू, स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर आदी असंख्य महापुरुषांनी विवेकानंदांच्या जीवन व विचारातून प्रेरणा घेतली. स्वामीजींच्या वाणीने, विचारांनी आणि आचारणांनी अनेकजण प्रभावित झाले. काहींनी स्वामीजींचे थेट शिष्यत्वच पत्करले. स्वामीजींच्या कृतीमुळे एक इंग्रज अधिकारीही प्रभावित झाला आणि त्याने अहिंसेचा मार्ग स्वीकारला! योद्धा संन्यासी आणि कोट्यवधी तरुणांचे स्फूर्तिस्थान म्हणजे स्वामी विवेकानंद!

तरुण तपस्वी असणारे स्वामी विवेकानंद हे साहित्य तत्वज्ञान आणि इतिहास यांचे गाढे अभ्यासक होते. स्वामी विवेकानंदांनी ‘योग’ ‘राजयोग’ आणि ‘ज्ञानयोग’ असे ग्रंथ तयार करून तरुण पिढीला मार्गदर्शन केले आहे. युगानुयुगे याचा प्रभाव तरुण पिढीवर राहील.

“उठा जागे व्हा उद्दिष्ट साध्य होईपर्यंत थांबू नका!”
अशी त्यांची विचारसरणी होती. संपूर्ण जगामध्ये आपल्या देशाला, या भारतभूमीला त्यांनी गौरव प्राप्त करून दिला. तरुणांसाठी योग वर्ग घेतले. रामकृष्ण मिशन तर्फे रुग्णालय, शाळा, महाविद्यालयांची स्थापना केली. स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिभेमुळे लोक प्रेरित होत. ज्यामुळे ते तरुणांसाठी आदर्श बनले होते. स्वामी विवेकानंद यांची जयंती 12 जानेवारी ला साजरी होते. बारा जानेवारी अठराशे त्रेसष्ठ यादिवशी स्वामींचा जन्म झाला. स्वामी विवेकानंद यांचा जन्मदिवस “नॅशनल युथ डे” किंवा “राष्ट्रीय युवक दिवस” म्हणून भारतभर साजरा केला जातो. प्रत्येक मनुष्यामध्ये प्रचंड ऊर्जा असते. कोणतेही काम करण्याची त्याची क्षमता असते. पण त्यासाठी प्रेरणा मिळण्याची आवश्यकता असते. आपल्या तेजस्वी विचारांनी ओघवत्या वक्तृत्वाने आणि राष्ट्र प्रेमाच्या ऊर्जेने जगभरातील युवकांना कायमच प्रेरित करणारे स्वामी विवेकानंद यांचे विचार आजच्या युवकांसाठीही खरंच गरजेचे आहेत. “तुमच्या आत्म्याशिवाय चांगला गुरू नही.”
“परमेश्वर आपल्या हृदयात आहे. अगदी ‘तुझे आहे तुजपाशी’ म्हणतात त्या प्रमाणे!”
“ब्रम्हांडातल्या सगळ्या शक्ती तुमच्याजवळ आहेत. फक्त त्या शोधण्याची दृष्टी हवी.”
“निस्वार्थी व्यक्तीच यशस्वी होतात.”

असे स्वामी विवेकानंद नेहेमी सांगत असत!
“मला असा एक तरुण मिळवून द्या की जो शरीराने तंदुरुस्त आहे, त्याच्या इच्छा व विकार त्याच्या ताब्यात आहेत, त्याचे मन आरशासारखे पारदर्शक व स्वच्छ आहे. तर मी जगात कोणताही चमत्कार करून दाखवेन.”
….. थॉमस हक्सले.
इंग्लंड (युके)चे हक्सले हे जीवशास्त्रज्ञ, मानववंश शास्त्रज्ञ, शरीर रचनेचे तुलनात्मक अभ्यासक, डार्विनच्या उत्क्रांतीवादाचे समर्थक होते. त्यांना ‘डार्विन्स बुल्डॉग’ असंही म्हटलं जायचं.
खरं आहे. आजच्या जगाला विकसित करणारा एकमेव सक्षम घटक म्हणून तरुणाईकडे पाहिले जाते. तरुणांनी आव्हाने स्वीकारली पाहिजेत. तरुण हा शारीरिक, मानसिक, बौद्धिक व नैतिकदृष्ट्या समर्थ असला पाहिजे. चांगले तरुण, चांगली माणसे घडवावी लागतात. त्यासाठी स्वामी विवेकानंद व इतरांचे मोलाचे विचार आत्मसात करावे लागतात. तरुणांनी आपला आत्मविश्वास जागृत करायला हवा. आत्मविश्वास असणारे लोक यशस्वी होतात. म्हणूनच स्वामी विवेकानंद म्हणतात,

“या देशाचा इतिहास म्हणजे मूठभर आत्मविश्वास असणाऱ्या लोकांचा इतिहास आहे. मूठभर आत्मविश्वास असणारे लोक जर मला मिळाले तर मी या देशाचा विकास घडवून आणेन.”

सर्वाधिक तरुणांची संख्या असलेला देश म्हणजे भारत. उपलब्ध माहिती नुसार भारतात 10 ते 24 वयोगटातील 35.6 कोटी लोक आहेत. चीन 26.9 कोटी तरुण लोकसंख्ये सह दुसऱ्या क्रमांकावर आहे. तिसर्‍या क्रमांकावर 6.7 कोटी तरुण लोकसंख्या असणारे इंडोनेशिया आहे. युवा हा भारताचा चेहरा, ताकद आणि भविष्य आहे. उद्याचा भारत कसा असेल हे आजच्या युवकांच्या कामगिरीवर ठरेल. त्यामुळे सर्व समाज घटकांना न्याय्य असलेला असा सक्षम भारत घडवण्याचे आव्हान युवा पिढीसमोर आहे. स्वातंत्र्यसंग्राम भारतभर घडवून आणण्यासाठी त्यावेळच्या युवापिढीने मोठे योगदान दिले आहे. त्यामुळेच महात्मा गांधी युवकांना ‘एजंटस फॉर सोशल ट्रान्सफॉर्मेशन’ म्हणायचे. पुढे जयप्रकाश नारायण यांच्या आंदोलनात देखील त्यावेळेच्या युवकांचे योगदान सर्वज्ञात आहे. जयप्रकाश नारायण यांच्या मार्गदर्शनात युवकांनी राजनैतिक, आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक, बौद्धिक, शैक्षणिक आणि अध्यात्मिक आशा सात प्रकारच्या क्रांतीचा विचार केला. हा युवकांचा सहभाग केवळ आंदोलना पुरता मर्यादित नव्हता तर अनेक युवकांनी रचनात्मक कामाद्वारे समाजपरिवर्तनाचा वसा पुढे चालू ठेवला आहे. अगदी अलीकडच्या काळातले 2011 चे भ्रष्टाचार विरोधी आंदोलनाचे उदाहरण घेतले तर, ज्येष्ठ समाजसेवक ‘आण्णा हजारे’ यांच्या या आंदोलनात युवकांचा सक्रिय सहभाग भारत सरकारला हलवून सोडणारा होता!

सर्वाधिक तरुणांची लोकसंख्या असलेल्या आपल्या देशामध्ये बेरोजगारी हे अत्यंत महत्त्वाचे आव्हान आहे. उपलब्ध माहितीनुसार 2014 मध्ये बेरोजगारांची संख्या 14 कोटी इतकी होती आता त्यात काही प्रमाणात वाढ झाली आहे. बेरोजगारीची अनेक कारणे आहेत. भारतीय अर्थव्यवस्थेचा वृद्धीदर स्थिर नाही. गुंतवणुकीचा न्यून दर, रोजगार संधी निर्माण करणाऱ्या उत्पादन क्षेत्राचा मंदवृद्धी दर, बांधकाम क्षेत्रातील मंदी आणि माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात निर्यातीची तुटपुंजी वृद्धी. सार्वजनिक आणि खाजगी दोन्ही क्षेत्रातील रोजगार संधी कमी होत आहेत. मार्च 2020 पासून सुरु असलेल्या ‘लॉक डाउन’मुळे उद्योगधंद्याची चाके मंदावली आहेत. काहींचे रोजगार गेले तर काहींना कमी पगारावर काम करणे भाग पडते आहे. ट्रॅव्हल टुरिझम व त्याला अनुषंगिक इतर व्यवसाय बहुतांशी बंद झाले आहेत. या क्षेत्रातील रोजगार नाही च्या बरोबर आहे. उदारीकरणानंतर सार्वजनिक क्षेत्राने अनेक आर्थिक उद्योगातून अंग काढून घेतल्याने हे क्षेत्र कमी होऊ लागले आहे. सरकारी नोकरी मिळवण्यासाठी रांगा लागत आहेत. उच्चशिक्षित देखील अत्यल्प असलेल्या सरकारी नोकरीसाठी कोणत्याही पदावर काम करायला तयार आहेत. नोकरीची सुरक्षितता आणि उच्च वेतन पातळी ही या पाठीमागील मुख्य कारणे आहेत. उपलब्ध माहिती नुसार 16 टक्के शिक्षित तरुण बेरोजगार आहेत शेतीतील कामांमध्ये यंत्रांचा वापर वाढल्याने त्याचाही परिणाम काही प्रमाणात ग्रामीण रोजगारावर झाला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वरोजगार आणि सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना उत्तेजन देण्यावर भर दिला आहे. या साठी त्यांनी अनेक प्रकारे वित्तीय सहाय्य देऊ केले आहे. ज्यामुळे रोजगार मागणाऱ्यांपेक्षा रोजगार देणाऱ्यांची संख्या वाढेल. असंख्य स्वस्त चिनी उत्पादनामुळे येथील अनेक लघुउद्योग उध्वस्त झाले आहेत. ‘ब्रेन ड्रेन’चा प्रश्न आणखीन वेगळा आहे. उच्चशिक्षित तरुण नोकरीची सुरक्षितता व मोठे पॅकेज यामुळे परदेशात जात आहेत. तेथील आरामदायी जीवन त्यांना आकर्षित करते आहे. त्याच प्रमाणे संप, टाळेबंदी, रास्ता रोको, मोर्चे, असुरक्षित वाहतूक, धरणे आंदोलन, राजकिय पक्षांच्या रॅली, भ्रष्टाचार, चक्का जाम या पासून त्यांना सुटका हवी आहे.

भारतातील शेतीविषयी बोलायचं झालं तर शेतकरी आत्महत्या, शेतीतील कष्ट, शेतीवरचा खर्च, शेतीचे मर्यादित उत्पन्न, पावसाची अनिश्चितता, हमीभावाचा अभाव आणि उत्पादकता लक्षात घेता या कृषिप्रधान देशाचा पाया मजबूत करण्यासाठी मोठ्या प्रमाणात युवाशक्तीला शेती क्षेत्रात काम करायची गरज आहे. आरोग्य क्षेत्रातील सोयी सवलतींचा अभाव लक्षात घेतला तर हेही क्षेत्र भारतीय युवकांसाठी आव्हानात्मक आहे. शिक्षण क्षेत्रातही युवकांना भरपूर वाव आहे. भरपूर खर्च करून देखील जिल्हा परिषदेच्या व महापालिकेच्या शाळांमधील गुणवत्ता खाजगी शाळांच्या तुलनेत सुधारत नाही. मराठी माध्यम इंग्रजी माध्यम हे देखील कळीचे मुद्दे आहेत.भारतीय युवकांसमोर धार्मिक आणि जातीय तेढ कमी करण्यासारखी अनेक आव्हाने आहेत. ही आव्हाने मोठी असली तरी यावरती उपाय शोधण्याचा प्रयत्न अनेक सामाजिक कार्यकर्ते त्यांच्या त्यांच्या पद्धतीने करताना दिसतात. असाच एक प्रयोग ‘सर्च’ संस्थेच्या माध्यमातून डॉ. राणी बंग आणि डॉ. अभय बंग यांच्या पुढाकाराने सुरू आहे. “निर्माण” असे या उपक्रमाचे नाव असून सामाजिक क्षेत्रात युवा नेतृत्व घडवण्यासाठी याचा मोठ्या प्रमाणात उपयोग होतो आहे. महात्मा गांधींच्या ‘नई तालीम’ या शिक्षण प्रयोगाला मार्गदर्शक मानून आकार घेत असलेली “निर्माण” प्रक्रिया युवांच्या आयुष्याला समाजाभिमुख प्रयोजन लाभावे यासाठी प्रयत्नशील आहे. आज हे युवक करिअरच्या नेहमीच्या चौकटीच्या बाहेर पडून सामाजिक प्रश्नांवर काम करत आहेत.

आजच्या तरुणाईवर देशाचा विकास आणि येणारा काळ अवलंबून आहे. तरुणांना भूत, भविष्य व वर्तमानाची जाणीव असावी. भ्रष्टाचार व अंधश्रद्धा याविरुद्ध तरुणांनी आवाज उठवावा. स्वतः कधीही भ्रष्टाचार न करण्याची शपथ घ्यावी. सुधारणा स्वतःपासून कराव्या. तरुणांनी ध्येय निश्चिती करून त्या ध्येयाच्या पूर्णते साठी झटावे. त्याने गर्वाने फुलून जाऊ नये आणि अपयशाने खचून जाऊ नये. व्यसनांच्या आहारी जाऊ नये. आजच्या जगाला विकासाकडे नेणारा एकमेव सक्षम घटक हा तरुण आहे!

भारतीय युवकांच्या दृष्टीने आदर्श म्हणून छत्रपती शिवाजी महाराज, स्वामी विवेकानंद, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि अगदी अलीकडच्या काळातले डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांची चरित्र आहेत. त्यांचं नुसतं ज्ञानच नाही तर नैतिकता, सखोल विचार करण्याची प्रवृत्ती, निर्णयक्षमता, साधी राहणी उच्च विचारसरणी, सचोटी, जगाकडे पाहण्याचा दृष्टिकोन, काहीतरी करून दाखवण्याची जिद्द, आपण जगाला काहीतरी देणं लागतो ही भावना देखील महत्वाची आहे. तरुणांनी आत्मसात करण्याजोगी आहे. आजचा तरूण जेव्हा ध्येय संकटांना सामोरे जाण्याची क्षमता आणि आकाशाला गवसणी घालण्याची मानसिकता बाळगेल तेव्हाच उज्वल भारत वर्षाची निर्मिती होईल! आशा तरुणांनी राजकारणात येऊन तिथेही नीतिमत्तेचे आदर्श निर्माण करावेत!

शेवटी स्वामी विवेकानंदांच्या शब्दात त्यांना अभिप्रेत असलेला युवक हा मनाने कणखर,शक्तिसंपन्न, प्रभावी विचार असणारा, संस्कारक्षम, राष्ट्रापती आणि समाजाप्रती नितांत प्रेम करणारा, माझ्या राष्ट्राला, माझ्या समाजाला, माझ्या भारत मातेला शक्तिसंपन्न करणारा असेल. हा युवक पुन्हा एकदा माझ्या भारत मातेला त्या विश्वाच्या उत्तुंग शिखरावर बसवेल! आणि ज्या दिवशी असे राष्ट्रभक्त युवक माझ्या भारत भूला मिळतील त्यादिवशी निश्चितच माझी भारत माता त्या उत्तुंग शिखरावर असेल!!

गीतकार गुरू ठाकूर यांची ‘डॉ. प्रकाश बाबा आमटे’ चित्रपटातील एक प्रार्थना तरुणांसह सर्वानाच प्रेरणादायी ठरेल.

तू बुद्धि दे तू तेज दे नवचेतना विश्वास दे
जे सत्य सुंदर सर्वथा आजन्म त्याचा ध्यास दे

हरवले आभाळ ज्यांचे हो तयांचा सोबती
सापडेना वाट ज्यांना हो तयांचा सारथी
साधना करिती तुझी जे नित्य तव सहवास दे

जाणवाया दुर्बलांचे दुःख आणि वेदना
तेवत्या राहो सदा रंध्रातूनी संवेदना
धमन्यातल्या रुधिरास या खल भेदण्याची आस दे
सामर्थ्य या शब्दास आणि अर्थ या जगण्यास दे

सन्मार्ग आणि सन्मती लाभो सदा सत्संगती
निती ना ही भ्रष्ट हो जरी संकटे आली किती
पंखास या बळ दे नवे झेपावण्या आकाश दे

——————–^——————–^——————–
जयंत कुलकर्णी
दूरभाष: ८३७८०३८२३२
——————————-^

चपराक

पुणे शहरातून ‘साहित्य चपराक’ हे मासिक आणि ‘चपराक प्रकाशन’ ही उत्तमोत्तम पुस्तके प्रकाशित करणारी ग्रंथ प्रकाशन संस्था चालविण्यात येते. ‘साहित्य चपराक’ मासिकाचा अंक दरमहा 10 तारखेला प्रकाशित होतो. आपले साहित्य पाठविण्यासाठी, ‘चपराक’मध्ये जाहिराती देण्यासाठी आणि नवनवीन पुस्तकांच्या माहितीसाठी संपर्क - घनश्याम पाटील, संपादक 'चपराक'.
व्हाट्सऍप क्रमांक - ८७६७९४१८५०
Email - Chaprak Email ID

तुमची प्रतिक्रिया जरूर कळवा

हे ही अवश्य वाचा