चपराक दिवाळी 2020
‘चपराक प्रकाशन’ची वैविध्यपूर्ण विषयांवरील वाचनीय आणि दर्जेदार पुस्तके मागविण्यासाठी आणि ‘चपराक’ मासिकाचे सभासद होण्यासाठी संपर्क – 7057292092
एखाद्यावेळी भलताच गुरुमंत्र आपलाल्या आयुष्यात मार्गदर्शक ठरतो असं म्हणतात. मी तर गुरु करण्याच्या बाबतीत गुरुदेव दत्तांचं रेकॉर्ड मोडलं आहे. त्यांचे एकवीस गुरु होते, माझे अगणित गुरु आहेत. ज्या क्षणी आपण कुणाकडून काहीतरी शिकतो, ते त्यावेळचे गुरुवर्य!
अगदी उदाहरणच द्यायचं झालं तर शूटींगच्या वेळी येणार्या चहावाल्या पोराचं देता येईल. आपलं चित्रीकरण अगदी रंगात आलेलं असतं. लाईट्स, साऊंड च्या ऑर्डर देऊन झालेल्या असतात. सगळीकडे सायलेन्स चा अंमल असतो. आता फक्त अॅक्शन म्हणायचा अवकाश असतो. त्याचं क्षणी तो पोर्या चहा घेऊन सेटवर येतो. त्याला वातावरण अजिबात नवीन नसतं. लाईट्सच्या मध्ये यायचं नाही, हे त्याला पाठ असतं. तुमचे हिरो, हिरॉइन्स याबद्दलही त्याला कणमात्र आकर्षण नसतं. अॅक्शन ही ऑर्डर ऐकल्याबरोबर तो स्तब्ध होतो. तो जर हातातल्या अवजारांचा आवाज न करता, सीनकडे लक्ष द्यायला लागला तर तुम्ही जिंकलात. त्यानं जर चालू सीनमध्ये विशेष रस न दाखवता, चहा ओतायची तयारी केली तर घोळ आहे. आपलं काहीतरी चुकत आहे. कारण गुरु महाराजांना रस वाटावा असं आपण काही घडवीत नाही आहोत हा एक नवा मंत्र आपण शिकायचा.
असे असंख्य गुरुमंत्र मी घोटून टाकले आहेत, कोणता मंत्र कोणत्या गुरूने दिला ते मला सांगता येणार नाही पण कळत न कळत त्यातलाच एखादा मंत्र माझ्या मदतीला येत असतो. साधारणपणे प्रत्येक गुरु आवर्जून सांगत असतात – तुमचं ध्येय निश्चित करा. तुम्हाला काय करायचं आहे हे आधी नीट ठरवा. त्याचा ध्यास घ्या. वगैरे वगैरे. पण माझ्या एका अज्ञात गुरुजींनी मला मंत्र दिला आहे तो असा -आपल्याला आयुष्यात काय करायचं आहे, हे ठरवता आलं नाही तरी चालेल, पण काय करायचं नाही हे मात्र लगेच ठरविता यायला पाहिजे. ते जमलं की अनेक गुंते सुटतात! माझ्या सुप्त मनानं हा मंत्र घोटून टाकला असावा.
मी जेव्हा दूरदर्शनसाठी काम करायला सुरुवात केली तेव्हा एकच सरकारी वाहिनी होती. पुढे मन अनेक वाहिन्या सुरु झाल्या. तंत्रज्ञांचं आणि कलाकारांच काम प्रचंड वाढलं. पैसाही मिळू लागला. (त्यातही पगड्या, मुगुट, फेटे, टापश्या अशा विविध पध्दतीच्या टोप्या घालण्याचे प्रकार तज्ज्ञ लोकांनी शोधून काढलेच. पण तो वेगळ्या लेखाचा विषय आहे.) या वाढत्या कामाच्या पद्धतीमुळे साप्ताहिक मालिका जाऊन दैनिक मालिकांची सुरुवात झाली. त्याबरोबर मी सावध झालो. लेखक आणि दिग्दर्शक म्हणून ही वेठबिगारी माझ्या स्वभावात बसत नव्हती. त्यामुळे दैनिक मालिकांचं लिखाण आणि/किंवा दिग्दर्शन करायचं नाही असं मी ठरवून टाकलं.
त्या अनुभवासंबंधी आणि त्या निमिताने एकूणच या क्षेत्राच्या पर्यावरणविषयी थोडी चर्चा करावी असं मला वाटलं. त्यामुळे नवागताला काही शिकता येईल किंवा मार्गदर्शन होईल अशा भ्रमात मी बिलकुल नाही पण काही गैरसमज दूर होऊ शकतील असा मला संशय आहे. मात्र त्यासाठी आधी मला माझी थोडी पूर्वपीठिका सांगायला हवी. या पद्धतीने आत्मचरित्र सांगून टाकाव, असं पाप माझ्या मनात नाही याची गॅरंटी देतो.
असं म्हणतात की बोका आपल्या मिशीवरून अंदाज घेतो आणि आत घुसतो. म्हणजे ज्या खिडकीच्या गजातून त्याची मिशी जाते त्या खिडकीतून तो आत प्रवेश करतो. माझी परिस्थिती काहीशी बोक्यासारखी होती. कलाक्षेत्राच्या ज्या खिडकीतून घुसता येत आहे तिघून मी बिनधास आत घुसलो. यशस्वी झालो की नाही माहित नाही पण अपयशी नक्की ठरलो नाही.
साहित्य, नाटक, चित्रपट, दूरदर्शन, आकाशवाणी या सगळ्या क्षेत्रामध्ये मी वावरलो. ते सुद्धा वेगवेगळ्या भूमिकांमध्ये. लेखक, नाटककार, नाट्यदिग्दर्शक, नट, चित्रपट लेखक, चित्रपट दिग्दर्शक, चित्रपट अभिनेता, दूरदर्शन मालिका लेखक-दिग्दर्शक, आकाशवाणी लेखक, श्रुतिकांमधला नट, आकाशवाणी व्याख्याता, नाट्यशिक्षक वगैरे वगैरे यात आश्चर्य वाटण्याजोगे असे काहीही नाही. आचार्य अत्रे या नावाचा एक थोर पुरुष महाराष्ट्रात होऊन गेला. त्यांनी यापेक्षा असंख्य क्षेत्रात भरारी मारली होती. आचार्य मला प्रातःस्मरणीय होते आणि आहेत.
थोडं विषयांतर करूनही आचार्यांच्या बाबतीतला किस्सा सांगण्यासारखा आहे. आचार्य अत्रे यांची ‘नाटके’ किंवा ‘अत्रे-व्यक्ति आणि कर्तृत्व’ अशा विषयांवर मी बर्याच वेळा व्याख्यानं दिली. लेखही लिहिले. त्यावर गृहपाठ करताना प्रत्येकवेळी मी नव्याने अचंबित होत असे. एकदा मला असं वाटलं की त्यांनी काय केलं हे सांगण्यापेक्षा काय केलं नाही, हे सांगणं सोपं जाईल. तर त्या रकान्यात मांडण्यासाठी मला असा उद्योग दिसेना की जो अत्र्यांनी केला नव्हता. अचानक शोध लागला की अत्रे हे सार्वजनिक व्यासपीठावरून गायले नाहीत ! हा माझा शोध मी प्रत्येक वेळी जाहीरपणे ठणकावून सांगत असे. पुढे प्रभाकर पणशीकरांशी बोलताना तो मी नव्हेच’ नाटकाचा फिरत्या रंगमंचावरचा पहिला प्रयोग झाला त्या प्रसंगाविषयी पंत सांगत होते. अक्षरशः हजारो प्रेक्षकांची झुंबड उडालेली होती. गर्दी पाहिली की अत्रेसाहेबांना स्फुरण चढत असे. साहेब खुश. पडदा उघडण्यापूर्वी अत्रेसाहेब रंगमंचावर आले आणि पंतांना म्हणाले ‘‘चला, नांदी म्हणा!’’ पणशीकरांच्या पोटात गोळा! तो मी नव्हेच नाटकाला नांदी? पण अत्र्यांना नकार ठाऊकच नव्हता. ते स्वतःच माईकपाशी गेले आणि खणखणीत आवाजात नांदी गायले. आचार्य अत्रे सार्वजनिक व्यासपीठावर गायले नाहीत या माझ्या संशोधनाची वाट लागली. तिथून पुढे तो उल्लेख मी टाळायला सुरवात केली. असो.
आता मागे वळून पाहताना असं वाटतं की या प्रत्येक क्षेत्रात मला अतिशय मोठी माणसं भेटली. ती फार निष्ठावंत होती. प्रामाणिक, ध्येयवादी होती. भले त्यांचा हा व्यवसाय असेल, पण व्यवसायाला त्यांनी धंद्याचं स्वरूप येऊ दिलं नव्हतं. प्रत्येक वळणावर मला नवा गुरु भेटला.
माझ्या नाट्यप्रेमाला टेकायला सर्वात प्रथम ओसरी दिली ती अहमदनगर मध्ये प्राध्यापक मधुकर तोरडमल यांनी. ते माझे पहिले गुरु. नाटक म्हणजे केवळ करमणूक-ग्लॅमर नाही, तर प्रगल्भ जीवनशैली असते. नाट्यप्रेम हे जगण्याचं कारण होऊ शकतं. समृद्ध संस्कृतीचं ते प्रतिक आहे. ज्या भाषेत नाट्यकला बहरते ती भाषा समाजाचं सांस्कृतिक नेतृत्व करते. भारतीय पातळीवर मराठी, बंगाली, कानडी असेल किंवा जागतिक पातळीवर इंग्रजी, फ्रेंच असेल अशा या नाट्य व्यवहाराचा परिचय घडविला तो मामा तोरडमलांनी. प्रत्यक्षात त्यांनी एकही धडा घोटून घेतला नाही. एकही नियम समजावून सांगितला नाही. पण त्यांच्याबरोबर नाटक जगतांना या सगळ्या गोष्टींचा साक्षात्कार होत गेला. खुल जा सिमसिम’ तोरडमलांच्या नाट्यसंघात मी काय नव्हतो? चहा सांगायला जाणारा आणि येता येता कुणाच्या सिगारेटी, पानं वगैरे आणणारा होतकरू तरुण. पहिल्या नाट्यवाचनापासून सगळे प्रयोग संपेपर्यंत सगळ्या क्षणांना हजार असणारा एकमेव सभासद. साहजिकच, प्रत्येक नाटकातला प्रत्येक शब्द पाठ असणारा स्वयंसिध्द प्रॉम्टर. बाहेरगावच्या प्रयोगांना, बांबूची मंडपी बांधून फ्लॅट्स लावणारा बॅकस्टेज आर्टिस्ट आणि छोट्या मोठ्या भूमिकांसाठी कधीही उभा राहू शकणारा नट! नाट्यकलेचं असं अंतर्बाह्य भिनलेपण मला कोणत्या नाट्यशाळेत अनुभवायला मिळालं असतं?
मला असं वाटत की कलेच्या क्षेत्रामध्ये माणसाच्या अंगी थोडं तरी ‘एकलव्य’पण असावंच लागतं. तोरडमलांच्या बरोबर प्रॅक्टिकल होत होतं पण थिअरीचा अभ्यास स्वतंत्रपणे चालू होता. त्यासाठी माझं वाचनाचं वेड नव्हे, व्यसनच मला उपयोगी पडलं. त्या वाचनातून मला माझ्यातल्या लेखकाचा शोध लागला. अगदी तरुणपणीच माझ्या कथा, एकांकिका (नाटकच जगत असल्यामुळे मला या फॉर्मची जवळीक वाटायची) मासिकातून प्रसिद्ध होत्या.
मुंबईच्या ‘रामकृष्ण बुक डेपो’ या प्रकाशकांनी मासिकातली एकांकिका वाचून ‘‘आम्ही याचं पुस्तक काढू का?’’ अशी विचारणा केली. मी ‘‘नाही’’ म्हणण्याचा प्रश्नच नव्हता. उलट मी आणखी काही एकांकिका त्यांच्याकडे पाठवून दिल्या. कॉलेजच्या दुसर्या वर्षाला असताना माझ्या दोन-तीन एकांकिकांची पुस्तके प्रसिद्ध झाली होती. तोरडमलाचं ‘सैनिक नावाचा माणूस’ हे नाटक राज्य स्पर्धेमध्ये अंतिम फेरीत मुंबईला सादर झालं. त्यात मी भूमिका करत होतो. ‘रामकृष्ण बुक डेपो’ चे प्रकाशक वि. र. बाम यांना मी कळवलं की ह्या कारणाने मी मुंबईला येतो आहे. ते प्रयोगाला आले. त्यावेळी मी मुंबईला आणि बामसाहेबांनी मला पहिल्यांदा पाहिलं! माझ्यासारखा पोरकट/किरकोळ माणूस लेखक आहे यावर त्यांचा प्रथम विश्वास बसला नाही. प्रयोगाची श्रेयनामावली दोनदा वाचून त्यांनी खात्री करून घेतली. असो.
पुढे मी पुण्यात आलो. खूप नाट्यस्पर्धांमध्ये भाग घेतला. चिक्कार पारितोषिके मिळविली. हे सगळ आधीच्या धडपडीचं बायप्रॉडक्ट होतं असं मला वाटतं. माझं एका नाट्यस्पर्धेतलं काम पाहून 1989 साली चित्तरंजन कोल्हटकरांनी मला नाटककार, दिग्दर्शक आणि नट म्हणून नाट्यव्यवसायात आणलं. माझ्या पहिल्याच व्यावसायिक नाटकात (घालीन लोटांगण) माझ्या बरोबर, बाबा वैशंपायन (अत्रे थिएटरचे जुने जाणते नट), स्वतः चित्तरंजन कोल्हटकर यासारखे कलाकार होते. याच संस्थेच्या मीच लिहिलेल्या दुसर्या नाटकाचं (आकाशाशी जडले नाते) मी दिग्दर्शन केलं होतं. त्यात माझ्यासारख्या नवख्या दिग्दर्शकाच्या हाताखाली चक्क चंद्रकांत गोखले यांच्यासारखा बुजुर्ग अभिनेता काम करीत होता. रोजच्या तालमींना पहिला प्रयोग असावा तसा प्रामाणिक वावर. रोज तितकीच गुंतवणूक आणि तीव्र प्रतिक्रिया. दिग्दर्शक सांगेल ते न कंटाळता कितीही वेळा करण्याची तयारी. हीच वृत्ती माझ्याही अंगी बाणली गेली असणार. हे असे माझे नकळत गुरु. त्यांनी माहितीच नाही की मी त्यांचा शिष्य आहे.
काही दिवस चंद्रशेखर गाडगीळ या गायक मित्राच्या संगतीनं मी ‘राम कदम नाईट’ या मराठी ऑर्केस्ट्राच्या कार्यक्रमामध्ये निवेदकाचं काम करत असे. (हा उद्योग वरच्या यादीत लिहायचा राहिलाच!) माझी नाटकाची पुस्तकं प्रसिद्ध झालेली होती. ती मी राम कदम यांना वाचायला दिली. रामभाऊनी चक्क मला त्यांचा सिनेमा लिहिण्याची ऑफर दिली. ‘गड जेजुरी जेजुरी’ हा लेखक म्हणून माझा आणि नट म्हणून नाना पाटेकरांचा पहिला सिनेमा! नानाची आणि माझी आधीची नाटकातली मैत्री होती. नानामुळे मी या सिनेमाच्या चित्रिकरणालाही हजर राहिलो. रामभाऊ म्हणजे अंतर्बाह्य सुरेल व्यक्तिमत्व आणि नाना म्हणजे खडबडीत बेधडक प्रामाणिकपणा. दोघांच्याही कामाच्या निष्ठेबद्दल त्यांचा कट्टर शत्रूसुद्धा शंका घेणार नाही! रामभाऊंच्या आयुष्यातला उतार होता आणि नानाचा उदय पण प्रतिज्ञा सारखीच, लगाव सारखाच.
रवीन्द्र भट हे प्रख्यात साहित्यिक आकाशवाणीवरील संबंधांमुळे झालेले माझे ज्येष्ठ स्नेही. त्यांच्याकडे ‘गोंविंदा – गोपाळा’ या सरकारी चित्रपटाच काम आलं. त्यांनी मला त्यात खलनायकाची भूमिका आणि दिग्दर्शन सहायक म्हणून संधी दिली. कोकणातल्या केळशी या रम्य खेडेगावात आम्ही पंधरा एक दिवस त्याचं शूटींग केलं. या सिनेमाला, फिल्म इंस्टीट्यूटमधून नुकताच पास झालेला महेश अणे हा प्रकाश चित्रणासाठी सहायक होता. अत्यंत हुशार तंत्रज्ञ. पुढे त्याने ‘स्वदेश’ वगैरे सारखे खूप मोठे हिंदी चित्रपट कॅमेरामन म्हणून केले). त्याची आणि माझी घट्ट मैत्री झाली. मला सिनेमाच्या तंत्राविषयी खूप शिकायला मिळालं. मुख्य म्हणजे हाताळायला मिळालं. हलके हलके चित्रपट निर्मितीच्या प्रक्रियेविषयी मला आपलेपणा वाटायला लागला. या क्षेत्रात प्रत्येक क्षणी निर्माण होणारी आव्हानं मला आमंत्रण देऊ लागली. चित्रपटांच्या दुनियेनं माझ्याही नकळत मला कवेत घेतलं.
‘घाशीराम कोतवाल’ या नाटकात मी काम करीत होतो. तेव्हा मंगेशकर कुटुंब ‘जैत रे जैत’ हा चित्रपट निर्माण करत असून त्याचं दिग्दर्शन जब्बार पटेल करणार आहेत असं समजलं. ज्येष्ठ मित्र म्हणून पटेलांना विनंती केली आणि एका महत्वपूर्ण चित्रपटाचा सहायक दिग्दर्शक म्हणून रुजू झालो. हा चित्रपट म्हणजे माझ्या चित्रपट शिक्षणातली महत्वाची इयत्ता होती. आतापर्यंत चित्रपटाच्या तंत्राचा अभ्यास करण्यासाठी माझी धडपड होती. यावेळी मला त्याचा मंत्र जपण्याची संधी मिळाली. ना. धो. महानोरांनी गीतं वाचून दाखविली. त्यावेळीच त्या गीतांना असलेला पहिल्या पावसातल्या मात्तीचा धुंद सुगंध माझ्या रोमारोमात भिनत गेला. माझं नशीब थोर की त्या गाण्यांच्या ध्वनीमुद्रणालाही मी साक्षीदार होतो. हृदयनाथ मंगेशकरांच्या चाली आणि साक्षात लता मंगेशकर (मी रात टाकली), आशा भोसले (जांभूळ पिकल्या झाडाखाली) अशा केवळ थोर गायिका त्या गाण्याचं सोनं करताना मी याची देही याची डोळा पाहिलं आणि याची कानी साठवून ठेवलं. पुढे त्या गाण्यांच्या चित्रीकरणाला तर मदतनीसच होतो. त्यावेळी स्मिता पाटील सारख्या मनस्वी कलावतीशी मैत्री झाली. स्मिता, मोहन आगाशे, निळू फुले, सुलभा देशपांडे अशा कलावंतांना भूमिका जगताना जवळून निरखता आलं. या काळामध्ये मी सिनेमा टीपकागदा सारखा टिपून घेतला. पडद्यावरचा प्रत्येक क्षण जिवंत करण्यासाठी जिवाचं रान करणारे कलाकार अनुभवले. हे संस्कार माझ्या मनावर कायमचे कोरले गेले. पैशासाठी किंवा प्रसिद्धीसाठी सुमार दर्जाचं काम आपण कधीही करायचं नाही हे मला ठरवावच लागलं नाही. माझ्याही नकळत ठरलं.
याचं वेळी माझं ‘शांतेच कार्ट चालू आहे’ ह्या नावाचं नाटक तुफान यशस्वी झालं. लक्ष्मीकांत बेर्डे, सुधीर जोशी, नयनतारा अशी त्यावेळी फारसं नाव नसलेली मंडळी एकदम स्टार झाली. त्यामुळे गजानन सरपोतदार यांनी मला ‘तुझ्यावाचून करमेना’ हा विनोदी चित्रपट लिहायला बोलावलं. हा सिनेमा म्हणजे मित्र मंडळींचा गोतावळाच होता. अशोक सराफ, लक्षीकांत बेर्डे, अलका कुबल, वर्षा उसगावकर, श्रीकांत मोघे, जयराम कुलकर्णी, चेतन दळवी, अमृता सातभाई अशी नटमंडळी आणि नाटकामुळे आपल्यातले वाटणारे दामू केंकरे हे दिग्दर्शक. सुधीर मोघे हा सख्खा मित्र गीतं लिहायला. सुहासचंद्र कुलकर्णी हा संगीतकार… मी सगळी कामं सोडून या चित्रपटाच्या संपूर्ण चित्रीकरणाला हजर राहिलो. हा चित्रपटही गाजला, चालला. मुख्य म्हणजे मला राज्य सरकारच्या दोन बाहुल्या, सर्वोत्कृष्ट पटकथा आणि सर्वोत्कृष्ट संवाद यासाठी मिळाल्या. मग सिनेमा लेखनाची रांगच सुरु झाली.
मी छत्तीस चित्रपट लिहिले. कथा-पटकथा-संवाद. (कधी फक्त पटकथा-संवाद तर कधी फक्त संवाद) त्यातले काही चित्रपट पडद्यावर आले नाहीत पण माझं काम पूर्ण होतं. मराठी चित्रपटातल्या सर्व वयोगटातल्या दिग्दर्शकांबरोबर मी काम केलं. अगदी बुजुर्ग राजदत्त, सचिन, सतीश रणदिवे यांचेपासून ते तरुण अक्षय दत्त आणि पुष्कर जोग यांच्यापर्यंत. मीनल भाटीयांपासून ते सुषमा शिरोमणी यांच्यापर्यंत. सचिन, अशोक सराफ, लक्ष्मीकांत बेर्डे, अलका कुबल, निवेदिता सराफ, रेखा राव, अविनाश ठाकूर, कांचन नायक असे जिवाभावाचे मित्र मला सिनेमानं दिले. जयराम कुलकर्णी, श्रीकांत मोघे, गजानन सरपोतदार, दामू केंकरे, राम कदम, दादा कोंडके, हरगोविंद भनशाली असे ज्येष्ठ स्नेही मिळाले. या सगळ्यांच्या सान्निध्यामुळे असेल कदाचित, पण मी कधीही तडजोड केली नाही. कधीही काम ठोकून दिलं नाही. चित्रपटांच्या दुनियेचा मी त्यासाठी ऋणी आहे.
भनशाली फिल्मचा चित्रपट दिग्दर्शित करावा असं प्रस्ताव आला तेव्हा मी माँरीशीयस मध्ये ‘मुंबई ते माँरीशीयस’ नावाच्या चित्रपटाच्या शूटींगसाठी गेलो होतो. बरोबर अशोक सराफ आणि लक्ष्मीकांत बेर्डे होते. मी त्या दोघांशी बोललो. दोघांनीही आनंदाने प्रोत्साहन दिलं. आणि मी भनशालींना होकार कळविला. मोठ्या पडद्यासाठी मी दिग्दर्शित केलेला पहिला चित्रपट ‘धरलं तर चावतंय’. अशोक, लक्ष्मीकांत, दिलीप प्रभावळकर, जयराम कुलकर्णी, अलका, रेखा राव, प्रिया अरुण अशी दोस्तान्यातली टीम जमवली आणि चित्रपट पूर्ण केला. या सिनेमानं छान लोकप्रियता मिळविली आणि मुबलक व्यवसाय केला.
या सुमारास दूरदर्शन हे माध्यम दृगोचर होत होतं. बाल्यावस्थेत आणि कृष्णधवल होतं. काही चाणाक्ष मित्रांनी या माध्यमाच माहात्म्य ओळखलं. सरकारी कारभार असल्यामुळे केवळ कलावंत असणं हा एकमेव निकष नव्हता. अन्य काही निकष लागू होते.
त्यांची पूर्तता करून काही मंडळींनी आपापली संस्थानं तिथे स्थापन केली. कसलाही निर्माता होण्याचं कसब माझ्या अंगी कधीच नव्हतं. त्यामुळे मी साहजिकच जरा अंतरावर होतो. पण प्रकाश बुद्धिसागर या मित्रामुळे आख्यान’ या मालिकेतले काही भाग लिहिण्याचं काम माझ्याकडे आले. साधारणपणे साडेबावीस ते पंचवीस मिनिटांच्या मीटरमध्ये विषय बसवणे, विचार पोहोचवणे आणि उत्कर्षबिंदू साधणे हे मला आव्हानात्मक वाटले. अधिक स्वातंत्र्य मिळालं तर मनःपूर्वक काहीतरी करता येईल असं मला वाटत राहिलं. शरयू वर्तक या दिग्दर्शिकेने मला तसं स्वातंत्र्य दिलं, ‘मनोगत’ नावाची मालिका लिखाणासाठी माझ्याकडे आणली. मानसिक आजार आणि अंधश्रद्धा यांची सांगड घालून (उदा. ‘अंगात येणे-संचार’ हा एक मानसिक आजार आहे. त्या आजाराची उकल करून, त्या मागच्या अंधश्रद्धेचा मागोवा घेणारा असा एक भाग) मी तेरा भाग केले. पोटापुरता मानसशास्त्राचा अभ्यास, चिक्कार वाचन आणि अल्फ्रेड हिचकॉक नावाच्या सस्पेन्स सिनेमांच्या बादशहाचा भक्त असल्यामुळे मला ते काम करताना मानसिक बैठक मिळाली. दर आठवड्याला एक भाग असल्यामुळे कामासाठी वेळ मिळत होता. यां मालिकेला जाणकारांच्या कडूनही दाद मिळाली. गंमत म्हणजे मानसोपचारतज्ज्ञ समजून सल्ला विचारणारी पत्रेही मला आली. अर्थात, त्या पत्रकर्त्यांचा गैरसमज मी तातडीने दूर केला.
श्रीकांत मोघे यांनी जेव्हा ‘स्वामी’ या ऐतिहासिक मालिकेचे काम माझ्याकडे आणलं तेव्हा मी तत्क्षणी होकार दिला. कारण ही मालिका दिग्दर्शित करणार होते हिंदी – मराठी सिनेक्षेत्रातले ऋषितुल्य व्यक्तिमत्व गजानन जागिरदार (जहागिरदार नव्हे!). मराठ्यांच्या इतिहासासंबंधी असलेलं माझं प्रेम मुळाशी होतंच. रणजीत देसाई यांच्या कादंबरीची मी आधीच पारायणं केली होती. जागिरदारांच्या बरोबरचं काम ही माझ्या आयुष्यातली सोन्याची वर्ष होती. आम्ही त्यांना ‘पपा’ म्हणत असू. दोन वेळेला हृदयविकाराचा त्रास होऊन गेलेला, ब्याऐंशी वर्षाचा तपोनिधी, आयुष्य ओवाळून टाकल्यासारखा काम करताना अनुभवणं हा कामावरच्या निष्ठेचा वस्तुपाठ होता. मानेवर जू ठेवल्यासारखं काम करायच नसतं. कामाबरोबर खेळायचं असतं. ते वारंवार तपासून पाहायचं असतं. तज्ज्ञांचा सल्ला घ्यायचा असतो. ते जास्तीत जास्त परिपूर्ण करायचं असतं. काय काय शिकलो मी पपांच्याकडून! ते देखील हसत खेळत. महिमच्या ‘श्रद्धा’ लॉज मध्ये मी उतरत असे. सकाळी साधारण नऊच्या सुमारास पपा तिथे येत. कामाला सुरुवात होई. थेट दीडपर्यंत. मध्येच कोणत्यातरी संदर्भावरून गप्पा निघत. प्रभात स्टुडिओच्या ‘रामशात्री’ सिनेमापासून ते के. एन. सैगल, सोहराब मोदी, गुरुदत्त, देवानंद, रेखा (उमराव जान) असा सगळा अनुभवाचा परिसर होता. पण कधीही कुणाबद्दलही अपशब्द त्यांच्या तोंडून गेला नाही. कुणाबद्दलही राग नाही. असूया नाही. कामच काम होत असे. मग लंच ब्रेक. अगदी साधं, झोप येणार नाही असं काहीतरी मागवायचं. परत काम चालू. संध्याकाळी सातपर्यंत. नंतर मग श्रीकांतदादा (तो मालिकेचा निर्माता होता). येत असे. मग दोन तास माफक ‘आनंद’! त्याही वेळेला कुणाचा उपमर्द नाही. निखळ गप्पा. नंतर रोज नव्या ठिकाणी जेवण. श्रीकांत मोघ्यांचा या बाबतीतला व्यासंग दांडगा. कित्येक नवी ठिकाणं आणि असंख्य नव्या पदार्थांची त्यावेळी ओळख झाली. साधारणपणे साडेदहा अकराला आम्ही पपांना त्यांच्या घरी सोडत असू. रात्री साडेबारा – दीड अशा कोणत्याही वेळी त्यांचा लॉजवर फोन येत असे. (त्यावेळी मोबाईल नव्हते. लॉजच्या काऊंटरवर जाऊन फोन घ्यावा लागे). मी अर्धवट झोपेत फोन कानाला लावला की तिकडून ब्याऐंशी वर्षाचा तरुण आवाज येत असे, ‘‘शब्दप्रभू ! तू तो अमुक एक शब्द वापरला आहेस तो कधी कॉइन (निर्माण) झालाय याचा शोध घेतला पाहिजे. तो मला स्वातंत्र्योत्तर काळातला वाटतो आहे.’’
म्हणजे मी संध्याकाळी दिलेलं दृश्य ते रात्री, शब्द न शब्द वाचून चिंतन करत असतं! काय बिशाद आहे मी प्रत्येक शब्दावर मेहनत घेणार नाही.
पुण्यातल्या शूटींगच्या वेळी पपांची व्यवस्था ‘स्वरूप’ लॉज वर केलेली असे. शेवटच्या शेड्यूलसाठी ते आदल्या दिवशी पुण्यात आले. रात्री स्वरूपवर पुण्यातले एक आयुर्वेदाचार्य हजर झाले. जागिरदारांची तब्येत बर्यापैकी खालावली होती. मला वाटलं ते आयुर्वेदिक उपचार करून घेणार. पण वैद्यबुवांना त्यांनी विचारलं, माधवरावांना शेवटी थेऊरच्या गणेशमंदिरात दर्भशय्येवर ठेवलं होत. ते दर्भ म्हणजे कोणती वनस्पती असते आणि ती कुठे मिळेल?
दोन अटॅक येऊन गेलेल्या त्या वृद्ध सिनेमहर्षीचा हा प्रश्न ऐकून त्या आयुर्वेदसमृद्ध वैद्यांच्या हृदयाचासुद्धा ठोका चुकला असेल. त्या दोन अडीच वर्षात पपांनी मला काय नाही शिकवलं ? सभ्यता, सुसंकृतपणा, माणुसकी, वाचनाचा व्यासंग, संहितेवरची मेहनत, चित्रिकरणातले वेगवेगळे तंत्र मंत्र आणि मुख्य म्हणजे कामावरची निष्ठा!
‘स्वामी’ नंतर पपा गेलेच पण शेवटपर्यंत ते कामात होते. हृदयविकारानंच त्यांना मृत्यू आला. मी तातडीने मुंबईला गेलो. त्यांना निरोप दिला. रात्री परत आलो आणि दुसर्या दिवशी त्याचं नव्या कामासंबंधीचं पत्र मला पोस्टाने मिळालं.
त्या सुमारासच ‘पुणेरी पुणेकर’ ही मालिका लिहून दिग्दर्शित करण्याची संधी माझ्याकडे चालून आली. मी वेळ मागून घेतला. पुण्याच्या इतिहास भूगोलाचा अभ्यास केला. त्यावेळी मला असं वाटलं की अस्सल पुणेरी पण हे पानशेतच्या पुरापर्यंतच कायम होतं. नंतर व्यवसाय, कारखानदारी यांची भरभराट झाली आणि पुण्याची मुंबई झाली. म्हणून मालिकेचा शेवट मी पानशेतच्या पुरापाशी (12 जुलै 1961) करायचं ठरवलं. पुण्याच्या अभ्यासात मुख्यत्वेकरून पुणेरी वृत्तीचा मागोवा घेतला. विक्षिप्तपणाचा शोध घेतला. पुणेरी स्वभावाला आणि वागणुकीला थोडा अतिशयोक्तीचा मसाला लावून, विनोदाच्या रॅपरमध्ये गुंडाळलं. आणि एक प्रचंड यशस्वी मालिका सादर करू शकलो. जुन्या पुण्याचा शोध होता. त्यामुळे अनेक जुने वाडे, गल्ल्या, घरं अशी स्थळ शोधून काढावी लागली. त्यावेळी घराघरावर डोकं वर काढून असणारे टी. व्ही. चे अॅन्टेना काढून शूट करावं लागलं. कुठेही नव्या काळाचा वास येणार नाही याची काळजी घ्यावी लागली. संध्याकाळी सात वाजता भरल्या तुळशीबागेत चित्रीकरण करण्याचा भीमपराक्रम मी करून दाखवला. कसब्यातल्या एका जुन्या कार्यालयाची मी अक्षरशः फिल्मसिटी करून टाकली होती. पाटावरून बसून जेवणार्यांची जुनी खानावळ एका हॉल मध्ये, तिचाच भटारखाना अडगळीच्या खोलीत, पुण्यातला जुनाट बोळ तिथेच, स्वातंत्र्य पूर्व काळातलं रसवंतीगृह तिथे आणि भांड्याचं जुन्या पद्धतीचं दुकानही तिथेच!
सुधीर जोशी, श्रीकांत मोघे, प्रकाश इनामदार आणि पुण्यातली यच्चयावत हौशी आणि व्यावसायिक नटांची फौज घेऊन मी महाराष्ट्रात धमाल उडवून दिली. या यशात आमच्या कौशल्याबरोबरच महाराष्ट्रात पुण्याबद्दल जी एक प्रेम आणि असूया अशी भावना आहे तिचाही मोलाचा वाटा होता हे नक्की.
या निमित्ताने आपल्या सरकारी संस्थांमध्ये कलेचा वारसा जपण्याबद्दल, इतिहासाच्या खुणा राखण्याबद्दल जी एक निर्लज्ज अनास्था आहे तिचं दर्शन मला घडलं. ‘पुणेरी पुणेकर’ चा शेवट पानशेतच्या पुरानं करण्याचं ठरवलं. त्याचं कारण असं की त्या पुराच्या भीषण दृश्यामुळे मालिकेच्या उत्कर्षबिंदुला वजन येणार होतं. एक संस्कृती नष्ट झाल्याचा प्रत्यय येणार होता. इतका उचित शेवट मला कुठेच मिळाला नसता. आणि ती दृश्यं मला मिळणार अशी मला खात्री होती. कारण स्वामी’ मालिकेच्या वेळी गजानन जगिरदारांनी मला एक किस्सा सांगितला होता. 1961 साली जागिरदार पुण्याच्या फिल्म इन्स्टिटयूटचे प्रिन्सिपल होते. बारा जुलैला दुपारी धरण फुटल्याच्या आणि पुण्यात हाहा:कार उडाल्याच्या बातम्या इन्स्टिटयूटमध्ये येऊन धडकल्या. जागिरदारांनी ताबडतोब कॅमेरे आणि कच्ची फिल्म घेऊन काही विद्यार्थ्यांना/कर्मचार्यांना प्रत्यक्ष पूर चित्रित करायला शहरात पाठवले. पुराच्या ऐतिहासिक क्षणाचं जतन फिल्मच्या रिळात केलं गेलं परंतु त्यांच्या निर्णयाबद्दल सरकारी पातळीवर त्यांची चौकशी झाली. ‘महागामोलाचे कॅमेरे आणि रॉ स्टॉक, वरिष्ठांच्या लेखी परवानगीशिवाय संस्थेच्या बाहेर का पाठविले गेले?’ या प्रश्नाचं त्यांना उत्तर द्यावं लागलं. आता मंत्रालयाची परवानगी येईपर्यंत पूर थांबणार होता का? इतकं भीषण संकट कसं आलं आणि त्याचा परिणाम या नांदत्या गोकुळावर कसा झाला याचं जिवंत चित्रण त्याचवेळी केलं नसतं तर केव्हा मिळणार होतं? सरकारी अनास्थेचा हा पहिला नमुना. असो! तर पुराचं चित्रण फिल्म इन्स्टिटयूटमध्ये आहे हे माझ्या मेंदूत पक्क बसलं होतं.
‘पुणेरी पुणेकर’च चित्रिकरणाच काम झालं. आता फक्त पुराची दृश्यं जोडायची म्हणून मी फिल्म इन्स्टिटयूटमध्ये चौकशी केली. तीस पस्तीस वर्षांपूर्वी असं काहीतरी घडलं होतं आणि त्यांचे जिवंत पुरावे आपल्या संस्थेत आहेत याविषयी कुणालाही काहीही माहिती नव्हती. त्यावेळचे कुणी पटावरच शिल्लक नव्हते. सेवानिवृत्त होऊन गेलेल्या मंडळींना गाठलं तर त्यांच्या दृष्टीने हे सर्व गौडबंगाल होतं. ‘पुणेरी पुणेकर’च्या निर्मात्यांनी संस्थेतलं जुनं रेकॉर्ड शोधायचा प्रयत्न केला. हाती काहीही लागलं नाही. प्रिंट नसेल तर निदान निगेटिव्ह तरी मिळतील म्हणून मी परत एक संशोधनपर्व सुरु केलं. कुणाचा कुणाला मेळ नाही. ज्याला विचारावं तो आमच्याकडे विचित्र नजरेने बघतोय ! प्रत्येकाला पुण्याच्या पुराची हकीकत सांगून सांगून माझ्या जबड्याचे तुकडे पडले. ‘‘क्या बोलते हो ! ऐसा हुआ था पुणे में?’’ एवढीच प्रतिक्रिया. त्यांचा कुणाचा पुण्याशी संबंध नव्हता, स्वतःच्या संस्थेच्या पूर्वाध्यक्षांचा त्याहून नव्हता आणि इतिहासाचा तर अजिबातच नव्हता.
मी नर्व्हस झालो. एपिसोड सबमिट करायची वेळ काट्यावर आली होती. तेवढ्यात कुणीतरी सांगितलं की सिंहगडरोड वर खडकवासल्याच्या जवळ ‘सेन्ट्रल वॉटर आणि पॉवर रिसर्च स्टेशन’ (सी.डब्ल्यू.पी.आर.एस) अशा नावाचं ऑफिस आहे. तिथे इंजिनियर्स ट्रेनिंगसाठी येतात. धरणफुटीसंबंधात त्यांना प्रत्येक्ष पुराव्यानं शिकवता यावं म्हणून पुराच्या दुसर्या दिवशी त्यांनी फुटलेलं धरण आणि पुण्याची झालेली वाताहत याचं चित्रण करून ठेवलं आहे. मी तिथे पोहोचलो. तिथेसुद्धा आता नवी पिढी कार्यरत होती. धरणफुटीच्या कथासुद्धा आता कालबाह्य झाल्या असाव्यात या विदारक सत्याचा साक्षात्कार मला तिथे झाला. कोणाला काही पत्ता नव्हता. सरकारी अनास्थेचा हा दुसरा नमुना. आम्ही निराश होऊन बाहेर पडणारच होतो तेव्हढ्यात एक म्हातारा शिपाई माझ्याजवळ आला. म्हणाला, ‘‘शिनेमाच्या चकर्या हैत ठिवल्याला… चला दावतो.’’
त्यानं एक लोखंडी कपाट उघडून दाखवलं. त्यात फिल्म्सची रिळं होती. पाहिलं तर ती पुराचीच होती. पण कित्येक वर्षात ती कुणी फिरवली नव्हती. त्यांच्या पुंगळ्या झाल्या होत्या. उलगडायला गेलं की त्यांचे तुकडे पडत होते. एक इंचाचीही सलग फिल्म आम्हाला मिळेना. मी आता रडायच्याच बेताला आलो होतो. म्हातारबुवा आणखी कुठेतरी गेले आणि चिक्कार धूळभरल्या व्ही.एच.एस. कॅसेट्स घेऊन आले. कुणीतरी कल्पकतेनं त्या रिळांच्याच प्रती कॅसेट्समध्ये करून ठेवल्या होत्या. पण त्याही तीस वर्षात कुणी फिरवल्या नव्हत्या. चिकट झाल्या होत्या. मी त्या जशा होत्या तशाच कॉपी करून घेतल्या. रात्रभर एडिटिंग रूममध्ये डोळ्यांची खाचाडं करीत बसलो. सलग चित्रं मिळत नव्हतं. शेवटी व्ही सी आर वर असणारी वन-फ्रेम-अहेड’ हे सवलत मी वापरली आणि पूर्वीच्या अबोल इंग्रजी चित्रपटात असायची तशी थरथरणारी चित्रफित आम्हाला मिळाली. फुटलेली धरणाची भिंत, धबाबा वाहणारं पाणी आणि ओंकारेश्वराजवळ झालेली वाताहत. 1961 सालचे धसकलेले, भकास वावरणारे पुणेकर.
माझ्या मालिकेची सांगता झाली पण मी स्वतःच स्वतःला एक गुरुमंत्र दिला. अमुक एक गोष्ट आपल्याकडे आहेच हे गृहीत धरून संहितेची रचना कधीच करायची नाही. डोळ्यांना दिसतं आणि वापरायची परवानगी असते ते आपलं. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे की या देशातल्या सरकारी स्रोतांवर अवलंबून काही करायचं नाही!
या सुमारासच मी माझा ‘सुगंधा’ नावाचा चित्रपट लिहिला आणि दिग्दर्शित केला. याचा मुद्दाम उल्लेख करण्याचं एक कारण आहे. पूर्वीचे संबंध स्मरून मी त्या चित्रपटाचं संगीत राम कदम यांच्याकडे सोपवलं. सलग आठ दिवस रामभाऊ, मी आणि आमचे निर्माते हरगोविंद भनशाली महाराष्ट्र लॉजवर काम करीत बसलो होतो. चार गाणी जगदीश खेबुडकरांनी आणि दोन मी लिहिली होती. सकाळपासून रामभाऊ पेटी घेऊन बसत. पण कोणत्याच गाण्याची कोणतीच चाल मला किंवा रामभाऊंना पसंत पडत नव्हती. रामभाऊंनी कोणतीही धून पेटीवर वाजवली की मला त्यांचच जुनं गाणं आठवे. मी त्यांना सांगत असे. काहीतरी वेगळं द्या’ असा हट्ट करत असे. रामभाऊ सुद्धा परत नव्याने शोध घेत. माझे असिस्टंट, निर्माते आणि रामभाऊंचे वादक हेही हजर असत. या सगळ्यांच्या दिवसभराच्या खर्चाचं मीटर पडलेलं असे. मलाच लाजल्यासारखं व्हायला लागलं. आठव्या दिवशी रामभाऊ अतिशय दुःखाने म्हणाले, ‘‘भनगेअन्ना, हे माझ्याच्यानं होत नाहीये हो! मी स्वतःलाच रिपीट करतोय… दुसर्या कुणाकडून तरी करून घ्या!’’
माझ्या डोळ्यात पाणी आलं. मराठी चित्रपट संगीताचा राजा. ‘पिंजरा’ चित्रपटातल्या नितांतसुंदर गाण्यासाठी एका गाण्याला एका दिवसात नऊ नऊ चाली लावणारा हा अनभिषिक्त संगीतसम्राट स्वतःहून शस्त्र खाली ठेवत होता. मी त्यांच्या प्रामाणिकपणाला सलाम ठोकला. खरं तर त्यावेळी त्यांच्याकड काम नव्हतं. पण त्यांनी पैशासाठी कलेशी असलेलं इमान सोडलं नाही. तडजोड केली नाही. आणखी काय वेगळा गुरुमंत्र मला मिळायला हवा होता? विशेष म्हणजे ही हकीकत त्यांनी त्यांच्या आत्मचरित्रात देखील उल्लेखलेली आही. (पुढे तो चित्रपट मी त्यांचाच शिष्य असलेल्या विलास आडकर या मित्राकडून करून घेतला) असो.
ई.टी.व्ही. मराठी ही नवी वाहिनी सुरु होणार होती. हैदराबादला रामोजी स्टुडीओमध्ये सगळ काम होणार होतं. पुणे आकाशवाणी ड्रामा सेक्शनच्या प्रमुख मोहिनी पंडित तिकडे रुजू होणार होत्या. त्यांनी मला तिकडे एक मालिका लिहून दिग्दर्शित करण्याचं सुचवलं. विनोदाच्या पूर्वपुण्याईमुळे ‘श्री व सौ अब्जबुद्धे’ ही मालिका करण्याचं काम माझ्याकडे आलं. (पंडित बाई मात्र रामोजी स्टुडीओ मध्ये रुजू होऊ शकल्या नाहीत) या मालिकेच्या निमित्ताने मी यच्चयावत कलाकारांना घेऊन हैदराबाद येथे गेलो. प्रदीप पटवर्धन, अलका कुबल, सुहासिनी देशपांडे, जयराम कुलकर्णी, सुनील तारे, दिलीप हल्याळ, संजय मोने, वंदना वाकनीस, प्रकाश आणि जयमाला इनामदार, बाळ आणि भारती गोसावी, सुयश कुलकर्णी (बाल कलाकार), राजू गटणे, मोहन सैद ही आत्ता आठवलेली नावं आहेत. रामोजीमध्ये काम करताना मला केवळ आनंद मिळाला. कामात मुक्तपणा होता. स्टुडीओमध्ये सगळं काही हजर होतं. विमानतळ, विमानाचा आतला भाग, हॉस्पिटल (नर्सेस आणि वॉर्ड बॉयीजच्या स्टाफ सकट!) रेल्वे स्टेशन, प्लॅटफॉर्मवरचे स्टॉल्स, मुंबईच्या रेल्वेस्टेशनच्या बाहेरचा भाग, पोलीस स्टेशन्स, स्वर्ग, नरक, भूतबंगला, अलिशान बंगल्यांची वस्ती, कापड बाजार, भांडी बाजार, झोपडपट्टी इत्यादी इत्यादी काय वाटेल ते लोकेशन इथे तयार होतं. नसेल तर तयार करून मिळत होतं. म्हणजे लिखाणाच्या वेळेपासूनच जी लोकेशन्सची बंधनं येतात (एक बंगला आणि आउटहाऊस अॅव्हेलेबल आहे तेवढ्यात शक्यतो गोष्ट बसावा !’ ‘समुद्राच्या बीचवर कशाला फिरायला जातात ते? नदीकाठावर भागवा ना !’ ‘रायगड कशाला पाहिजे? घराच्या गच्चीवर भेटू दे ना त्यांना!’ – असे अगणित किस्से आहेत.) तो प्रकार अजिबातच नव्हता. चित्रीकरण सामुग्रीची ददाद नव्हती. दिग्दर्शक म्हणून मराठी सिनेमाला मी क्रेन वापरू शकलो नाही, इथे सिरिअलच्या एपिसोडला क्रेन वापरती! रामोजी स्टुडिओची म्हणून एक दाक्षिणात्य शिस्त होती. ती शिस्त पाळली की मनसोक्त कामच काम करता येत होतं. शिस्त पाळली नाही तर तत्परतेनं परतीचं तिकीट मिळत असे. छोट्या किंवा मोठ्या पडद्यासाठी काम करताना जो मुक्तपणा लागतो, जी एक जंगली कल्पनाशक्ती उपयोगी पडते, तिचा अनिर्बंध अनुभव मला रामोजी स्टुडिओमध्ये घेता आला. काम करण्यातल्या आनंदाला आर्थिक मोबदल्याचीही जोड होती.
प्रत्येक शेड्यूल झाल्यानंतर प्रत्येकाला ठरल्याप्रमाणे सगळ्या कामाचे पैसे, न मागता, चोख चेकने दिले जायचे. (त्यावेळी मराठी चित्रपटाच्या मोबदल्याचा शेवटचा हप्ता हा बुडवण्यासाठी असतो असं गृहीत धरलं जायचं. ‘पुढच्या पिच्चरला अॅडजस्ट करू ना’ हा सार्वजनिक वचननामा सर्वत्र वापरला जायचा. ते ‘पुढचं पिच्चर’ कधी सुरूच व्हायचं नाही). त्यामुळे ‘रामोजी’ सगळे कलाकार आणि तंत्रज्ञ खूश असायचे.
छोट्या पडद्याच्या कामाविषयी थोडं विस्तारानं सांगितलं, कारण कोणत्या माणसांच्या सहवासात आणि कशा पर्यावरणात माझा पिंड घडला याची ओळख व्हावी ‘कार्य-संतोष’ ही माझ्या कामाची प्राथमिकता त्यामुळे ठरली.
सिनेमाचं किंवा मालिकेचं लेखन आणि दिग्दर्शन हे चोवीस तासाचं काम. मी बराच काळ ते करीत राहिलो. त्यामुळे माझ्या पहिल्या प्रेमाकडे, नाटकाकडे माझं अंमळ दुर्लक्ष झाल्यासारखं मला वाटलं. ‘कॉटेज नंबर चोपन्न’ या नावाचं एक नाटक लिहूनही झालं होतं. ते स्त्रीप्रधान होतं. निवेदिता सराफ, पंकज विष्णू, सचिन देशपांडे, अमिता खोपकर अशी तगडी कास्ट मिळाली. जवळजवळ वर्षभर मी ‘कॉटेज’मय होऊन गेलो. इ.स. 2006 हे वर्ष नॉर्वेजियन नाटककार हेन्रिक इब्सेन यांचं स्मृती शताब्दी वर्ष होतं. पण मराठी नाट्यमुलखात त्याची फारशी दखल कुणी घेतलेली दिसत नव्हती. ‘कॉन्टिनेन्टल प्रकाशन’चे श्री. अनिरुद्ध कुलकर्णी हे इब्सेन प्रेमी – अभ्यासक. त्यांनी आणि प्रोग्रेसिव्ह ड्रॅमॅटिक असोसिएशन (पी. डी. ए. या नावाने प्रसिद्ध असलेली जुनी जाणती नाट्य संस्था) या संस्थेचे शशिकांत कुलकर्णी यांनी पुढाकार घेतला. इब्सेन याचं ‘एनिमी ऑफ द पिपल’ या नाटकाचं मी ‘शेवट नसलेली गोष्ट’ या नावानं स्वैर रुपांतर केलं. गंमत म्हणजे दोन अडीचशे वर्षांपूर्वी जी सामाजिक कीड, घाणेरडं राजकारण, माणुसकीशून्य अंधश्रद्धा आणि निर्लज्ज बुवाबाजी याचं जे चित्रं इब्सेनला नॉर्वेमध्ये पाहायला मिळालं, ते धुंडाळण्यासाठी मला कुठेही शोध घ्यावा लागला नाही. आजच्या महाराष्ट्रात मला ते तंतोतंत दिसलं. मी ते मराठी पद्धतीनं आहे तसंच मांडलं. ह्यावेळी मी दिग्दर्शनाची जबाबदारी घेतली नाही. प्रमुख भूमिका केली. समीक्षकांनी आणि जाणकारांनी या प्रयोगाचं खूप कौतुक केलं. त्यानंतर ‘तो मी नव्हेच’ या आचार्य अत्रे यांच्या नाटकाच्या दिग्दर्शनाच काम माझ्याकडे आलं. त्यातली प्रभाकर पणशीकर यांची गाजलेली ‘लखोबा लोखंडे’ ही भूमिका डॉ. गिरीश ओक हे करणार होते. गिरीशबरोबर काम करताना मला मजा आला. या नाटकाचे चिक्कार प्रयोग झाले. या तीनही नाटकांच्या दरम्यान माझ्याकडे चित्रपट लेखनाची कामे येतच होती. माझा जुना कलाकार – मित्र यशवंत दत्त याचा मुलगा अक्षय दत्त आता दिग्दर्शक होऊ पहात होता. त्यानं मला सिनेमा लिहिण्याची विनंती केली. त्या निमित्तानं मी अगदी तरुण पिढीबरोबर काम केलं. अक्षयसाठी मी सलग तीन चित्रपटांचे कथा, पटकथा आणि संवाद लिहिले. ‘आरंभ’, ‘धागेदोरे’ आणि ‘7 रोशनव्हिला’. त्याचवेळी अलका कुबल यांचा अग्निपरीक्षा’ हा चित्रपट देखील लिहिला. धागेदोरे, सेव्हन रोशनव्हिला आणि अग्निपरीक्षा या सिनेमातून मी भूमिकाही केल्या.
सांगायचा मुद्दा असा की ही नाटकं आणि हे चार चित्रपट यांच्या धावपळीत दूरदर्शन या माध्यमापासून मी पाच सहा वर्ष चांगलाच लांब गेलो. तेवढ्या अवधीत सृष्टीची बरीच उलथापालथ झाली होती. चोवीस तास चालणार्या अनेक वाहिन्यांची मांदियाळी झाली होती. त्यावर सतत लागणारे कार्यक्रम, मालिका, रिअॅलिटी शोज यांची प्रचंड गरज निर्माण झाली होती. त्यामुळे निर्मितीसंस्थांनी आणि स्वतः वाहिन्यांनी पिठाच्या गिरण्यासारखी चोवीस तास कार्यक्रमांच दळण पुरविणारी दुकानं उघडली होती. माझे अनेक मित्र मैत्रिणी यात सामील होते. त्यांनी बराच आग्रह केला पण या मंडईत आपल्याला दुकान चालविता येणार नाही असं मला सातत्यानं जाणवत होतं.
दूरदर्शन वाहिन्यांच्या सुलतानी कारभाराचा पहिला झटका मला बसला. नगरच्या एका निर्माता-स्नेह्याच्या आग्रहाखातर मी एका विनोदी मालिकेचा (साप्ताहिक मालिका) प्रस्ताव तयार केला. तो एका सुप्रसिद्ध वाहिनीनं मंजूर केला. पहिला भाग चित्रित करावा असा आदेशही दिला. आम्ही उत्साहानं नगरमध्ये पहिल्या भागाचं चित्रिकरण केलं. दूरदर्शनच्या पडद्यावर आत्तापर्यंत कधीही दिसली नव्हती अशी लोकेशन्स शोधली. मोहन जोशी, सतीश तारे, सुरेखा कुडची अशा कलाकार मित्रांना घेतलं. भाग संकलित केल्यावर सगळेच संबधित खूश झाले. वाहिनीनं आम्हाला टायटल शूट करायला सांगितलं. म्हणजे टायटल साँगचं रेकॉर्डिंग करणं भाग झालं. नरेंद्र भिडे या आजच्या प्रख्यात संगीतकारानं अप्रतिम टायटल साँग तयार केलं. मग प्रत्यक्ष श्रेयनामावलीचं चित्रीकरण. ते त्या काळात उत्तम अॅनिमेशन करून चित्रित केलं. खर्चाचं मीटर वाढतच चालल होतं. पहिला एपिसोड वाहिनीकडे सादर केला. तेवढ्या अवधीत ज्या अधिकार्यानं आमची मालिका मंजूर केली होती त्यानं वाहिनी सोडली. त्यांच्या जागेवर जे आले त्यांनी पूर्वाधिकार्याने मंजूर केलेले सगळे प्रकल्प रद्दबातल ठरवले. मंजूर झालेली मालिकाच रद्द झाली. निर्मात्याचे दोन अडीच लाख पाण्यात ! कारण काय ? केवळ मनमानी. हुकुमशाही. आम्ही तरी एकच भाग चित्रित केला होता. माझ्या एका दिग्दर्शक मित्राने तर पाच सात भाग चित्रित केले होते. त्याचा निर्माता दहा पंधरा लाखाला बुडाला होता. आणखी असे कितीतरी निर्माते दिग्दर्शक असतील. बरं, तीच मालिका दुसरी वाहिनी स्वीकारणं शक्यच नव्हतं कारण ती एका वाहिनीने नाकारली होती.
या फसवणुकीमुळे मी दुखावला गेलो. गप्प झालो. दूरदर्शनच्या व्यवहाराकडे/व्यापाराकडे लक्षपूर्वक पाहायला लागलो. माझ्या असं लक्षात आलं की दूरदर्शन आणि संगणक यांच्या प्रभावामुळे कला आणि भाषा याचं सुलभीकरण झालं आहे. मराठी भाषा, शब्दांचे अर्थ, त्यांचे अर्थपूर्ण उच्चार याबद्दल मी फार आग्रही होतो. ते कालबाह्य झालं होतं. ‘कुणाला कळतंय?’ हा मूलमंत्र झाला होता. या माध्यमातच नव्हे तर एकूण समाजातच ‘शासन’ हा शब्द असाच उच्चारणारा नेता शिल्लक नव्हता. सगळ्यांनी त्यांना उच्चारायला सोप असं शाशन’ करून टाकलं होतं. जनतेची केव्हाच ‘जन्ता’ झाली होती. माझ्या मातृभाषेच्या शिक्षणावर साहित्याचा पगडा तर होताच पण आकाशवाणीसारख्या माध्यमांचा सुद्धा मोठा हात होता. एकापेक्षा एक गुरु होते! मंगेशकर कुटुंबच मराठीची शिक्षणसंस्था चालवीत होतं. त्यांनी ज्ञानदेव, तुकारामापासून तो महानोर, शांताबाईंपर्यंतचे भाषाशास्त्री पुढ्यात आणून ठेवले, रुजवले, भिनवले. कानात आणि मनात घोळवले. आणखी एक महान ऋषी होते सुधीर फडके! ज्यांना बाबुजींसारखे मराठी उच्चार जमतात तो अस्सल मराठी माणूस, हे कुणीही न सांगता माझ्या मनात कोरलं गेलं होतं. शहामृगातला ‘श’ पोटफोड्या ‘ष’ आणि ‘क्ष’ यांच्या उच्चारणांमध्ये मुलभूत फरक असतो आणि ते ते उच्चारण अत्यंत आनंददायी असतं हे बाबुजींनी बिंबवलं. शिवाय त्यांच्या तोंडी शब्द होते ते गदिमा नावाच्या वाल्मिकीचे. ते शब्द नव्हतेच, माय माउलीला चढविलेला एकेक अलंकारच होता तो! आणि हे शिक्षण रेडिओवरून आपोआप पदरात पडत होतं. आता रेडिओ लावला की अंगावर काटा येत होता. भारताची सांस्कृतिक राजधानी असणार्या शहरात महानगरपालिकेच्या जाहिरातीत कुणी अज्ञात सुंदरी मिळकतकर भरण्याचे ‘आव्हान’ करीत होती. मी घाबरलो; कारण ते ‘आवाहन’ नसून ‘आव्हान’ होतं. परवाच एका निवेदिकेनं ‘सुकतातची जगी या’ हे नितांतसुंदर गाणं लावलं आणि सांगितलं की ते वि. दा. सावरकर यांच्या ‘सन्यस्त ख-ड-ग’ (तिन्ही अक्षरं वेगवेगळी) या नाटकातलं गीत आहे. ज्या सावरकरांनी इंग्रजी शब्दांचा आग्रह मोडून सुंदर सुंदर मराठी शब्दांची योजना केली त्यांच्या एका सुंदर शब्दाचं सुलभ रूप ! शासनानं सार्वजनिक ठिकाणी सुलभ शौचालयं केली, तरी तो विधी सुलभ व्हायला आपल्या पचनसंस्थेचीच साथ लागते. मला हे पचणारं नव्हतं.
प्रायोजित कार्यक्रम आणि जाहिरातींचं जग हे तर नव-अभिव्यक्तिस्वातंत्र्याचा धुडगूस घालायला दिलेली मैदानंच झाली होती. रेडिओवर एका मूळव्याध स्पेशालिस्ट व्यावसायिकाचा प्रायोजित कार्यक्रम चालू होता. मुलाखतकर्तीने विचारलं डॉक्टर, ‘‘मूळव्याध आणि भगेंद्र यात काय फरक आहे?’’
यावर ते डॉक्टर प्रसन्न हसत म्हणाले, ‘‘फार सुंदर प्रश्न विचारलात तुम्ही…’’
आता हा प्रश्न ‘महत्वाचा’ असू शकतो पण ‘सुंदर’ कसा असेल या विचारानं माझ्या संबधित अवयवावरच काटा आला. विवाह मंडळाच्या जाहिरातीतला ‘मनपसंत आयुष्याचा’ जीवनसाथी की ‘आयुष्याचा मनपसंत’ जीवनसाथी? नेमकं काय मनपसंत आहे?, आयुष्य की जीवनसाथी हे मला कळेनासं झालं! सरकारी पातळीवरचं मराठी समजायला दोन स्पेशल जन्म सलगपणे घ्यावे लागणार या धसक्यानं काळजाचा ठोकाच चुकायला लागला. खडकीला एक सरकारी कार्यालय आहे – ‘मध्यवर्ती अंडी उबवणी केंद्र’ नक्की काय मध्यवर्ती आहे? केंद्र की अंडी? आणि इथे फक्त ‘मध्यवर्ती अंडी’च उबवली जात असतील, तर ‘पूर्ववर्ती’ आणि ‘पश्चातवर्ती’ अंडी कुठे उबवतात? हे सगळं माझ्या आकलनापलीकडचं होतं.
आपण प्रामुख्यानं दूरदर्शनविषयी विचार करत होतो पण तिकडे तर अवघा आनंदी ‘आनंद’ पसरला आहे, असं मला आढळून आलं. साध्या ‘बातम्या’ या निरुपद्रवी कार्यक्रमाचं उदाहरण घ्या. पंधरा ऑगस्ट, सव्वीस जानेवारी अशा राष्ट्रीय सणांना बातमीदार चक्क हसत हसत ठामपणे सांगतात, अमुक ठिकाणी फलाण्या फलाण्यांनी ‘ध्वजारोहण’ केले! माझ्या माहितीप्रमाणे आरोहण म्हणजे वर चढून बसणे. अश्वारोहण म्हणजे घोड्यावर बसणे, ‘गजारोहण’ म्हणजे हत्तीवर बसणे… आता याची सांगड माननीयांनी केलेल्या ध्वजारोहणाशी कशी घालायची? प्रेक्षकांच्या अर्थाकलनात फरक पडत नाही ना? मग आम्ही म्हणतो तेच मराठी बरोबर. आता मी ज्याला ‘प्रेक्षक’ म्हणालो त्याला आता मराठीतसुद्धा ‘दर्शक’ म्हणायला लागले होते! मी लाख शिकलो असेन की दिग्दर्शक म्हणजे दिशा दाखवणारा, मार्गदर्शक म्हणजे रस्ता दाखवणारा वगैरे वगैरे! पण आता दर्शक म्हणजे पाहणारा, प्रेक्षक. हिंदीत दर्शक म्हणजे, ‘दर्शन करनेवाला’, ‘देखनेवाला’ आहे ना, मग मराठीतही तेच! ‘माय मरो आणि मावशी जगो’ हेच मराठी दूरदर्शन तत्त्वज्ञान आहे. मरू पाहणार्या माय मराठीच्या झाडाला हिंदी मावशीच्या भुतानं झपाटलं आहे. मालिकांच्या जगात तर याचा मुक्त संचार आहे. मालिकांमधील संवादात ‘तू मला मदत कर’ हे मराठी जुनं झालं. ‘तू माझी मदत कर’ हे खरं मराठी झालं आहे. एक तरुण माता आपल्या नवर्याला म्हणाली, ‘‘आपली मुलगी मला जास्त प्रेम करते….तुला नाही!’’ मुझ से, तुमसे अशा शब्दांची कार्बन कॉपी काढणारं हे राष्ट्रभाषा प्रेम आहे हे मला समजायला जड जात होतं. मी आलेली, मी गेलेली, मी गेलेलो असं क्रियापदांचं शेपूट कापून टाकलेलं कुलुंगी मराठी हेच आजच्या ज्ञानदेवांचं मराठी आहे. सोपं आणि सुलभ. एक अभिनेते मुलाखतीत म्हणाले, ‘‘त्यानंतर मी ज्ञान्देवांचं काम केलं!’’ ज्ञानदेव असा शब्द उच्चारताना, कानाला हात लावून ‘न’चा पूर्ण उच्चार करणारं मराठी गेलं… योग्य त्या ठिकाणी. आता असल्या शॉर्टकटचा जमाना आहे. कवडसे हा शब्द ‘व’ चा पाय मोडून उच्चारल्यावर माझ्या एका ज्येष्ठ मित्रानं कवडसे मधल्या ‘व’ चा उच्चार पूर्ण करायला हवा असं सांगितलं होतं. आज कवडसे म्हणजे काय हेच आमच्या शुद्ध मराठी कलाकारांना समजावून सांगावे लागेल. कारण शब्दांमधले सूक्ष्म भेद मिटवले गेले आहेत. ते सादरीकरण करत नाहीत तर ‘साद्रीकरण’ करतात ! एका व्यक्तिरेखेनं ‘रीतसर परवांगी’ आणली, ‘परवानगी’ नाही. तो कधीतरी ‘स्ववांगी’ देखील आणेल! कर्तृत्व हा शब्द परंपरागत पद्धतीनं उच्चारला तर तो अजामीनपात्र गुन्हा आहे म्हणे! तो कर्तुत्व असाच उच्चारला जातो. मंग्ला, साध्ना यांचंच पेव फुटलंय. मंगला, साधना नव्हे! एका अजरामर मालिकेची नायिका मैत्रिणीला न चुकता ‘रेव्ती’ अशी हाक मारीत होती. माझ्या मनातली रेवती ही स्त्री सौंदर्याची प्रतिमा ‘व’ चा पूर्ण उच्चार केला नाही तर दृगोचरच होत नाही! परवाच मला कुणीतरी सांगितलं की तूर्तास चालू असलेल्या पेशवेकालिन मालिकेमध्ये नॅपकीन हा शब्द वापरला गेला आहे म्हणे.
दूरदर्शनची ही भाषाविषयक अवहेलना माझ्यातल्या लेखकाला गुदमरवून टाकण्याची शक्यता होती. आपण तोलून मापून एकेक शब्द निवडायचा आणि कलाकारानं पडद्यावर त्याचं तेरावं घालायचं हे सहन करण्याची माझी तयारी नव्हती. दिग्दर्शकाला हे कसं चालतं हा अचंब्याचा विषय होता. (माझा दिग्दर्शक – गुरु रात्री दीड वाजता फोन करून शब्द कधी तयार झाला आहे?’ असं विचारीत असे.) पण बहुधा जरुरीप्रमाणे रंग बदलत फक्त कुंपणापर्यंत धाव घ्यायची यातच त्यांची इतिकर्तव्यता असावी. कारण महाराष्ट्रातल्या एका महान व्यक्तिमत्वाच्या चरित्रावर आधारित एक मालिका चालू होती. (असे अनेक विषय मंडळींनी नुसते चावून चोथा करून उष्टे केलेले आहेत.) काळ इंग्रज राजवटीचा. त्यातलं एक पात्रं दुसर्या पात्राला सांगतं की मी तुम्हाला एक चांगला वकील सांगतो. अॅड्व्होकेट ‘अमुकअमुक’! माझ्या अल्पज्ञानाप्रमाणे, वकिलांसाठी ‘अॅड्व्होकेट’ ही संज्ञा वापरण्याचा कायदा 1960-61 च्या सुमारास आला पण लेखकानं आणि दिग्दर्शकानं तो थेट स्वातंत्र्यपूर्व काळात नेऊन पास केला! ‘कोण पहातंय?’ या गृहीततत्त्वाचा परिणाम! असे अनेक विनोदी प्रसंग सांगता येतील.
दिग्दर्शक म्हणूनही आत्ताच्या कार्यपद्धतीशी जुळवून घेणं मला कठीण गेलं असतं. प्रत्येक दिवशी दीड ते दोन एपिसोड चित्रित करतो तो यशस्वी दिग्दर्शक असेल तर तो गुणवत्तेकडे आणि कामाच्या दर्जाकडे काय लक्ष देणार? जो कमीतकमी वेळात पाठांतर करू शकतो तो नट आणि ते पाठांतर कलात्मकतेच्या भानगडीत न पडता कमीतकमी वेळात छापून टाकतो तो दिग्दर्शक, ही भले काळाची सोय असेल, पण मला सोयीस्कर नव्हती. मी शिकलेल्या गुरुमंत्रांमुळे जास्त चिकित्सक आणि काटेकोर झालो आहे हे मला पूर्णपणे मान्य आहे. संबंधितांच या संदर्भातलं म्हणणं अगदी प्रक्टिकल आहे.
‘कोण बघतंय एवढ मन लावून ?’ हे त्याचं विधान चूक आहे असं मी कसं म्हणू? त्यांना काळाबरोबर धावायचं आहे. मग त्या धावपळीत कला आणि संस्कृती तुडवली गेली तर ते तरी काय करणार? सकाळी नऊचा कॉल टाईम (शूटींगची वेळ) असतो. रात्री नऊपर्यंत कारखाना चालू असतो. दहा-साडेदहा तर जवळ जवळ रोजच होतात. स्वतःच्या घरी पोहोचण्यासाठी मुंबई मध्ये दोन तास गृहीत धरले तर मध्यरात्री सगळे घरी पोहोचणार. ही पद्धती माझ्या आवाक्यातली नव्हती. कारण दिवसभराच काम संपवल्यावर रात्री त्याचा आढावा घेणं, काही तृटी असतील तर उद्याच्या उद्या त्यांची पूर्तता करण्याची नोंद करून ठेवणं, उद्या दिवसभर चित्रित करण्याच्या दृश्यांची उजळणी करून, त्याची शॉर्ट डिव्हीजन करून पेपरवर्क तयार ठेवणं आणि मग गिळायला बसणं ही सवय माझ्या अंगात मुरली होती. मध्यरात्रीनंतर मी हे सगळं करीत बसलो तर विश्रांती नावाचा प्रकारच माझ्या दिनचर्येत बसणार नव्हता. कारण परत सकाळी सात वाजता घोड्यावर बसायचंच असतं. दिग्दर्शक, त्याचे सहायक, कॅमेरामन, त्यांचे सहायक हे तर रात्री पॅकअप नंतर तासाभरानं निघतात. त्यानंतर लाईट बॉईज, स्पॉट बॉईज ही मंडळी जागा सोडणार. कारण त्यांच्यावर सामानाच्या सुरक्षिततेची जबाबदारी असते. या सगळ्यांना एक-दीड तास आधी, म्हणजे सात वाजता हजार रहावं लागतं. मला माझ्या सगळ्या सहकार्यांचा सहभाग हवा असायचा. अगदी स्पॉट बॉयने जरी काही सूचना किंवा कॉमेंट केली तरी मी त्यावर विचार करीत असे. चोवीस तासांच्या या गिरणीत सगळा रस निघून चोयटा झालेले तंत्रज्ञ आणि सहकलाकार कामात सहभाग घेण्यासाठी उत्साह कुठून आणणार? आपण नेमकं काय करतो आहोत यावर विचार तरी कधी करणार? चिंतन करण्याची गोष्ट तर लांबच राहिली. दूरदर्शनवर काम करण्यासाठी असं काळाचा बळी होण्याची माझी इच्छा नव्हती.
दूरदर्शन मालिकांच्या बाबतीत एक सुफळ संपूर्ण असं तत्त्वज्ञान सांगितलं जात. ते असं-सिनेमासारखा विचार दूरदर्शनच्या कामाचा कशाला करायचा? सिनेमा तयार करणं हा चित्रपटसृष्टीच्या इतिहासाचा एक भाग असतो. आणखी शंभर वर्षांनी जरी संदर्भ लागला तर जुना सिनेमा काढून पाहिला जातो. पूर्वी मॅटिनीला जुने सिनेमे लागत असंत. आता दूरदर्शनवर, यू-ट्यूबसारख्या माध्यमातून जुन्या चित्रपटांना नव्यासारखा प्रेक्षक वर्ग लाभतो. बर्याच वेळा जुन्या चित्रपटांच जतन केलं गेलं नाही म्हणून अभ्यासक शंख करतात. (दादासाहेब फाळकेंचे काही चित्रपट किंवा वासुदेव बळवंत फडके’ हा चरित्र पट उपलब्धच नाही!) हे सगळं दूरदर्शनच्या मालिकांच्या बाबतीत घडतं का? आजचा एक एपिसोड पुढच्या चोवीस तासात जो काही रिपीट होईल तेवढाच. त्यानंतर बापजन्मात कधी पाहिला जाणार नाही. अमुक एका मालिकेत चार दिवसांपूर्वी काय घडलं हे मुळात कलाकारांनाच आठवत नाही, मग प्रेक्षकांची गोष्टच सोडा. त्यांच्यासाठी रोज तीनचार मालिका असतात. पाणी घालून घालून मूळ कथेचा इतका चुथडा झालेला असतो की प्रेक्षक उत्सुकतेनं नव्हे तर सवयीनं मालिका बघतात.
कलाकारांच्या अभिनयाचा अविष्कार पाहण्यासाठी आणि अभ्यासण्यासाठी एक सिनेमा वारंवार पहिला जातो. ‘नायकन्’ हा तमिळ सिनेमा आणि त्यातल्या कमल हसन यांच्या अभिनयानं मी, सचिन आणि अविनाश ठाकूर इतके भारावलो होतो की तो सिनेमा आम्ही लागोपाठ आठ वेळा पाहिला. ‘रोमन हॉलिडे’ नावाचा सिनेमा मी तीन वाजता, सहा वाजता आणि नऊ वाजता असं सलग तीन वेळा पाहिला होता. दिलीप कुमार यांच्या अभिनयासाठी ‘गंगा जमुना’ हा सिनेमा मी चाळीस वेळा तरी पाहिला आहे. तिच गोष्ट ‘सेपरेशन’ या इराणी सिनेमाची. कोणत्या मालिकेच्या कोणत्या भागासाठी आणि कोणत्या कलाकारासाठी आपण असं हवालदिल होतो ? कुणाचं काम वारंवार बघू इच्छितो? तो कलाकार मोठ्या पडद्यावरही बघावा असं आपल्याला वाटतं का? वाटत असतं तर ‘रामायण’मधले राम, सीता आणि रावण हे नंतर कुठे गेले? महाभारतातले द्रौपदी, अर्जुन, कर्ण, अगदी श्रीकृष्ण सुद्धा परत का दिसले नाहीत ? एकूण मालिकांची लोकप्रियता ही तात्कालिक असते. आज आवडलेली गोष्ट पुढल्या आठवड्यात विसरलेली असते. एकूण या माध्यमाचं काहीच टिकाऊ नाही. मग त्यावर एवढी डोकेफोड का करायची?
हे समग्र तत्त्वज्ञान मला मान्य आहे. कळतं आहे पण वळत नाही. जे करतात त्यांना लखलाभ असो. हा माझा घास नाही कारण माझ्या खिशालाच नाही तर कामातही समाधान हवं असतं. त्यातला आनंद घ्यायचा असतो, ते नव्यानं जगायचं असतं. ते समाधान मला मिळणार होतं का? एक मालिका करायची म्हणजे आयुष्यातली तीन-चार वर्षे (कमीत कमी) बाजूला काढून ठेवायची कारण मालिका संपता संपत नाहीत. या पंचवार्षिक योजनेमध्ये चोवीस तास तुम्ही झापड लावून घाण्याभोवती फिरत असल्यासारखे बांधील राहणार. वेगळं काही करण्याचं सोडा, रोजचं वर्तमानपत्र वाचायलाही वेळ मिळत नाही. म्हणजे पाच वर्षानंतर मान वर केली की असं लक्षात येणार आपण बर्यापैकी श्रीमंत झालो आहोत पण दहा वर्ष मागे पडलो आहोत! माझ्या श्रीमंतीच्या कल्पना यापेक्षा वेगळ्या आहेत. तेव्हा मी या नव्या पद्धतीच्या मालिकांच्या नादी लागायचं नाही असं ठरवून टाकलं.
अलका कुबल, शंतनू मोघे, निवेदिता सराफ (निवेदिताच्या मालिकेची मी आखणी करून दिली आणि मराठी मालिकांच्या श्रेयनामावलीत कथा विस्तार’ अशा नव्या श्रेयाची भर घातली. ते अनेकांनी पुढे वापरलं.) आणि अशा अनेक सुहृदांनी गळ घातली पण अलिप्त राहिलो. आर्थिक मोहालाही बळी पडलो नाही.
कारण – ‘आपल्याला आयुष्यात काय करायचं आहे, हे ठरवता आलं नाही तरी चालेल. पण काय करायचं नाही, हे मात्र लगेच ठरवता यायला पाहिजे. ते जमलं की अनेक गुंते सुटतात!’ हा माझा गुरुमंत्र मला पूर्णपणे आठवत होता.
– श्रीनिवास भणगे
9657139958
खूप छान अनुभव मांडले आहेत.