चपराक दिवाळी 2020
‘चपराक’ची वैविध्यपूर्ण विषयांवरील पुस्तके मागविण्यासाठी आणि ‘चपराक’ मासिकाचे सभासद होण्यासाठी संपर्क –
7057292092
संगीताच्या विश्वात विहार करताना
लागते ताल, स्वर लयीची आस
संगीत कलेची अखंड साधना करता करता
घडावा सुरेल जीवनप्रवास!
लहानपणापासून आत्तापर्यंत मी (डॉ.धनश्री मकरंद खरवंडीकर) या संगीत विश्वाशी कधी नकळत एकरूप झाले हे माझे मलाच कळले नाही. खरं तर माझ्या या सांगीतिक जीवनप्रवासाविषयी सांगताना खूप भरभरून बोलावेसे वाटते आहे पण यात आत्मप्रौढी मिरविण्याचा कोणताही हेतू नाही हे स्पष्ट करणे आवश्यक आहे.
माझ्या या सांगीतिक प्रवासात माझे आदरणीय गुरुजन, माझे सर्व कुटुंबीय आणि माझे सर्व हितचिंतक यांच्या शुभेच्छा आणि शुभाशीर्वाद माझ्या पाठीशी कायम होते आणि यापुढेही ते राहतीलच याची मला पूर्ण खात्री आहे. आज संगीत क्षेत्रात मी जी माझ्या परीने सांगीतिक वाटचाल विकसित करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करीत आहे ती सर्व गुरुजन, सर्व कुटुंबीय, हितचिंतक आणि नगरकर मायबाप रसिक श्रोते यांच्यामुळेच. त्या सर्वांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठीच हा लेखप्रपंच.
माझा जन्म पुण्यातलाच असला तरी माझे मूळ गाव सांगली जिल्ह्यातील श्रीक्षेत्र कोळे नरसिंहपूर हे आहे. पूर्वाश्रमीची मी धनश्री शाम कुलकर्णी. माझे पदव्युत्तरपर्यंतचे सर्व शिक्षण पुणे येथे झाले. व्यवसायानिमित्ताने माझे वडील शाम कुलकर्णी पुण्यात स्थायिक होते. माझ्या आईचे माहेर मिरज. आईला (सौ. अलका कुलकर्णी) माहेरी सतार वादनाची आवड होती. विवाहापूर्वी ती मिरजेत सतार वादनाचे शिक्षण घेत असे आणि वडिलांना संगीताची आवड होती. यापेक्षा फार काही संगीताचे वातावरण घरात नव्हते. तसे म्हणायला गेले तर करवीरपीठाचे शंकराचार्य जगद्गुरू विद्याशंकरभारती (पूर्वाश्रमीचे लोकप्रिय कीर्तनकार रामचंद्रबुवा कर्हाडकर) हे माझ्या वडिलांचे काका होते. रामचंद्रबुवा कर्हाडकर यांचे वडील प्रसिद्ध कीर्तनकार नरहरीबुवा कर्हाडकर हे थोर गायक भास्करबुवा बखले यांचे शिष्य होते. त्यामुळे कदाचित त्यांच्याकडून ही स्वरगंगा पुढील पिढीत माझ्यापर्यंत पाझरत आली असावी, एवढेच म्हणता येईल.
आई वडिलांना असणारी संगीताची विलक्षण आवड, त्यांनी कायम मला दिलेले प्रोत्साहन यामुळे माझी सांगीतिक वाटचाल अधिकाधिक सुरेल होण्यास सहायभूत ठरली.
मला संगीताची आवड आहे किंवा मला उपजतच काही संगीताची, सुरांची देणगी आहे हे लक्षात आले ते मी सहा वर्षांची असतानाच. पुण्याच्या नामांकित हुजूरपागा शाळेत इयत्ता पहिलीच्या वर्गात शिक्षण घेत असताना आंतरशालेय गायन स्पर्धेत मी एक बालगीत साभिनय सादर केले. त्या बालगीताला प्रथम क्रमांकाचे पारितोषिक प्राप्त झाले. त्यातूनच खरी गाण्याची आणि अभिनयाची चुणूक माझ्या आईवडिलांना जाणवली. त्यातूनच माझ्यावर संगीताचे संस्कार व्हावेत व त्यासाठी संगीताचे योग्य शिक्षण घेणे आवश्यक असल्याचे माझी मावशी डॉ. भाग्यश्री नातू हिने सुचविले.
ज्येष्ठ गायिका अभिनेत्री जयमालाबाई शिलेदार आणि त्यांच्या कुटुंबियांशी आमचे घरोब्याचे संबंध असल्यामुळे माझ्या मावशीनेच त्यांच्याकडे माझ्यासकट माझ्या आईवडिलांना नेले. माझी मावशी शिलेदार कुटुंबियांची 50-60 वर्षे फमिली डॉक्टर होती. तिने जयमालाबाईंकडे मला गायन शिकविण्याविषयी विनंती केली आणि त्यांचा क्षणात होकार मिळताच वयाच्या 9 व्या वर्षापासून माझी ज्येष्ठ गायिका अभिनेत्री जयमाला शिलेदार यांच्याकडे नाट्यसंगीताचे शिक्षण घ्यायला सुरुवात झाली. नाट्यसंगीताबरोबरच हार्मोनियम वादनाचेही धडे त्यांच्याकडे घेतले. गंधर्व गायकीचा वारसा अविरतपणे जपणार्या शिलेदार कुटुंबियांच्या सहवासात मला गायिका व अभिनेत्री कीर्ती शिलेदार, लता शिलेदार उर्फ दीप्ती भोगले या सर्वांचे बहुमोल मार्गदर्शन मिळत गेले. शिलेदारांच्या ‘मराठी रंगभूमी पुणे’ या संस्थेच्या अनेक संगीत नाटकांमध्ये, उदा. सौभद्र, मानापमान, कान्होपात्रा, संशयकल्लोळ, स्वयंवर, मृच्छकटिक, स्वरसम्राज्ञी अशा नाटकांमध्ये कीर्ती शिलेदार, रामदास कामत, अरविंद पिळगावकर, शरद गोखले अशा दिग्गजांबरोबर अनेक छोट्या मोठ्या भूमिका करण्याची संधी मला मिळाली. त्यामुळे खर्या अर्थाने अभिनय आणि संगीत दोन्हींचे शिक्षण जवळून घेता आले. तसेच जयमाला शिलेदार यांच्या अनेक नाट्यसंगीत मैफलींमध्ये त्यांच्या मागे स्वरसाथ करण्याचीही संधी मिळाली. त्यातून नाट्यसंगीताचे मैफलीत होणार्या सादरीकरणाचेही शिक्षण मिळत गेले. परिणामी संगीत नाटक आणि नाट्यसंगीत हा माझा जिव्हाळ्याचा विषय बनत गेला. संगीत नाटक ही एक जिवंत अनुभूती असते आणि ती अनुभूती घ्यायला मला या शिलेदार कुटुंबीयांनी शिकवले.
नाट्यसंगीताचे शिक्षण चालू असतानाच मला अभिजात शास्त्रीय संगीताचे शिक्षण घेण्याविषयी ज्येष्ठ कीर्तनकार दत्तदासबुवा घाग यांनी सुचवले. त्यानुसार इयत्ता 9 वीत असताना शास्त्रीय संगीताचे शिक्षण घ्यायला सुरुवात केली. गुणवर्धिनी संगीत विद्यालय पुणे येथील संचालिका आणि शास्त्रीय संगीत गायिका गुरुवर्या सौ. हेमा गुर्जर यांचेकडे मी शास्त्रीय संगीताचे धडे घेतले. त्यांच्याच मार्गदर्शनाखाली प्रारंभिक ते विशारद पर्यंतच्या अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मंडळाच्या गायन आणि हार्मोनियम या दोन्ही विषयांच्या परीक्षा विशेष योग्यतेसह उत्तीर्ण होऊन ‘संगीत विशारद’ पदवी संपादन केली. पुढे ‘संगीत अलंकार’ (गायन व हार्मोनियम) आणि एस. एन. डी. टी. महिला विद्यापीठ पुणे येथून संगीत विषयात ‘एम.ए.’ पदवीही संपादन केली. संगीत अलंकार (हार्मोनियम) मध्ये भारतात सर्वप्रथम येण्याचा आणि एम.ए.संगीत मध्ये विद्यापीठात द्वितीय क्रमांक आणि पुणे विभागात प्रथम येण्याचा मान पटकवला. त्यासाठी ‘गानहीरा पुरस्कार’, ‘माधवी सिन्हा रॉय’, ‘प्रभाकर साने’ इत्यादी पारितोषिके तसेच ‘शंकरराव व्यास पुरस्कार’, ‘सुलोचना नातू ट्रस्ट पुरस्कार’, ‘हरी ओम ट्रस्ट तर्फे ‘संगीता वसंत बेंद्रे पुरस्कार’ अशी अनेक पारितोषिके मला प्राप्त झाली. त्यातून सांगीतिक वाटचाल यशस्वी करण्यासाठी खूप मोठी प्रेरणा मिळत गेली.
एम.ए.संगीत करत असतानाच विद्यापीठाच्या युवा संगीत महोत्सवात मुंबईला शास्त्रीय संगीत गायची संधी मिळाली. त्यावेळी शास्त्रीय संगीताची तयारी करून घेण्याच्या निमित्ताने आग्रा घराण्याचे ज्येष्ठ गायक आणि कीर्ती शिलेदार यांचे गुरु पं.नीळकंठबुवा अभ्यंकर यांचेकडे काही दिवस मार्गदर्शन घेण्याचे खूप मोठे भाग्य मला मिळाले. ज्येष्ठ तबलावादक पं. विनायकराव थोरात यांचेकडूनही ताल, लय आणि शास्त्रीय आणि नाट्यसंगीताचे सादरीकरण याविषयी मार्गदर्शन मिळाले. नंतर पुढे पुणे आकाशवाणीच्या सुगम संगीत विभागाच्या इ+ (इ – हाय) श्रेणीच्या मान्यताप्राप्त कलाकार म्हणूनही माझी निवड झाली. आकाशवाणी बरोबरच गोवा, दिल्ली, अहमदाबाद, कोकण, सांगली, मिरज, जळगाव, कोल्हापूर, पारनेर, मुंबई, पुणे, नरसिंहपूर, अहमदनगर अशा विविध ठिकाणी संगीताचे वेगवेगळे कार्यक्रम सादर केले.
यामध्ये संगीत नाट्यप्रवेश, नाट्यसंगीत, भक्तीसंगीत, शास्त्रीय संगीत मैफलींचे सादरीकरण केले.
एम.ए.च्या द्वितीय वर्षात शिकत असताना 2002 साली अहमदनगर येथील गायक आणि हार्मोनियम वादक मकरंद खरवंडीकर यांच्याशी विवाहबद्ध होऊन मी नगरला स्थायिक झाले. संपूर्ण खरवंडीकर कुटुंब हे संगीतातीलच असल्यामुळे नगरलाही त्यांच्याकडून मला कायम मार्गदर्शन आणि प्रोत्साहनच मिळत गेले. माझी सांगीतिक जडणघडण नगरला आल्यावर अधिकाधिक बहरत गेली. नगर येथे गेली 18 वर्षे श्रुती संगीत निकेतनची संचालिका म्हणून मी कार्यरत आहे. अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मंडळाच्या प्रारंभिक ते अलंकार परीक्षा तसेच बी.ए., एम.ए. परीक्षांच्या विद्यार्थ्यांना मी संगीताचे मार्गदर्शन करत आहे. नगरला आमच्याकडे अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मंडळाच्या संगीत परीक्षांचे केंद्र असून केंद्रव्यवस्थापक मकरंद खरवंडीकर यांच्या बरोबर सहकेंद्रव्यवस्थापक म्हणूनही मी कार्यरत आहे.
विवाहानंतर अहमदनगर येथील आमच्या घरी सांगीतिक वातावरण असल्यामुळे आणि सर्व कुटुंबियांकडून मला प्रोत्साहन मिळत गेल्यामुळे माझ्या जिव्हाळ्याचा विषय असणार्या नाट्यसंगीत विषयात मी ‘डॉक्टरेट’ पदवी संपादन केली. एस. एन. डी. टी. महिला विद्यापीठातून पीएच. डी. पदवी संपादन करण्यासाठी ‘मराठी नाट्यसंगीताचे नाटकातील आणि मैफलीतील स्वरूप, प्रयोजन, व्याप्ती या संदर्भांच्या अनुषंगाने तुलनात्मक विश्लेषण’ हा विषय मी निवडला. यासाठी मार्गदर्शिका म्हणून ज्येष्ठ गायिका अभिनेत्री कीर्ती शिलेदार यांचे मार्गदर्शन मिळाले. अहमदनगर जिल्ह्यात संगीत विषयातील पहिल्या ‘महिला डॉक्टरेट’ होण्याचा मान 2012 साली मला मिळाला.
अहमदनगर येथील संगीत क्षेत्रात पूर्वीपासूनच संगीत नाटक आणि नाट्यसंगीताचे एक वैशिष्ट्यपूर्ण स्थान होते. रुस्तुमकाका हाथीदारू यांचे नाट्यसंगीत तसेच वसंतराव पाठक, पंडितराव भावे यांच्यासारखे दिग्गज कलावंत नगरच्या नाट्यसंगीत क्षेत्राचे वैभव होते. त्याकाळात बालगंधर्व काळातील नाट्यसंगीताचा प्रभाव नगरकर रसिकांवर होता परंतु त्यानंतर मधल्या काळात काही कारणांमुळे ही परंपरा खंडीत झाली होती. ती परंपरा पुन्हा नव्या जोमाने सुरु व्हावी या उद्देशाने नगरमध्ये संगीत नाट्यचळवळ उभी करण्याचा आमचा मानस आम्ही ठरवला. त्यानुसार आमच्या श्रुती संगीत निकेतन अहमदनगर या रजि. संस्थेमार्फत नगरमध्ये विविध संगीत नाटकांमधील निवडक प्रवेश, तसेच नाट्यसंगीताच्या मैफलिंमधून नाट्यसंगीत पुन्हा एकदा जिवंत करण्याचे प्रामाणिक प्रयत्न आम्ही नगरमध्ये केले. नाट्यसंगीताचे प्रशिक्षणही देण्यास सुरुवात केली. नवीन पिढीतील अहमदनगरच्या तरुण कलावंतांना घेऊन केलेल्या या संगीत नाट्यविषयक उपक्रमांना नगरकर रसिकांची भरभरून दाद मिळाली. 2016 साली संगीत संशयकल्लोळ, 2018 साली संगीत एकच प्याला ही संपूर्ण नाटके नगरकर रसिकांच्या उदंड आणि उत्स्फूर्त प्रतिसादात उत्तमरीत्या सादर झाली. त्याचे संपूर्ण दिग्दर्शन करताना मी दिग्दर्शकाचीही भूमिका बजावली. एकच प्याला मधील नायिका सिंधूच्या मी केलेल्या भूमिकेला विशेष दाद मिळाली. ती माझ्यासाठी अविस्मरणीय आहे.
महाराष्ट्र शासनाच्या 56 व्या संगीत राज्यनाट्य स्पर्धेत सांगली येथे आमच्या श्रुती संगीत निकेतन अहमदनगरच्या संघाने संगीत संशय कल्लोळ हे संपूर्ण नाटक यशस्वीरीत्या सादर केले. तसेच 57 व्या संस्कृत राज्यनाट्य स्पर्धेत भरतनाट्य मंदिर पुणे येथे श्रुती संगीत निकेतन अहमदनगर तर्फे राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त महामहोपाध्याय डॉ. देवीप्रसाद खरवंडीकर (माझे सासरे) यांनी लिहिलेल्या ‘अपूर्वयोगः ख’ या जातीभेद निर्मुलनावर आधारित संस्कृत नाटकाचे सादरीकरण नगरच्या कलाकारांनी केले. या नाटकाचे दिग्दर्शक म्हणूनही मी काम पाहिले. अहमदनगर येथे झालेल्या 58 व्या संगीत राज्यनाट्य स्पर्धेचे परीक्षक म्हणून कार्य करण्याचा मानही मला मिळाला. याशिवाय महाराष्ट्र राज्य शासनाच्या उपशाश्त्रीय संगीत विभागात सांस्कृतिक पुरस्कार निवड समितीवर माझी नियुक्ती केली गेली. पुणे येथील एसएनडीटी महिला विद्यापीठ येथे गेल्या 12 वर्षांपासून पदव्युत्तर संगीत विभागात (एम.ए.) नाट्य संगीत आणि लोकसंगीत या विषयांसाठी अभ्यागत व्याख्याती म्हणून मी कार्यरत आहे.
शास्त्रीय व सुगम संगीताच्या विविध स्पर्धांमध्ये तसेच अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मंडळाच्या संगीत अलंकार पर्यंतच्या परीक्षांसाठी परीक्षक म्हणून मी कार्यरत आहे. श्रुती संगीत निकेतन बरोबरच संस्कार भारती (पश्चिम प्रांत) अहमदनगर शाखेच्या उपाध्यक्षा म्हणून मी कार्यरत असून श्रुती संगीत निकेतनची खजिनदार आहे. ‘मन मेघा रे’ या अहमदनगर येथील विख्यात साहित्यिक डॉ. अनिल सहस्रबुद्धे लिखित सुगम संगीताच्या सी.डी. मध्ये आणि ‘अगस्ती प्रसादे अनिल बोले’ या प्रकल्पा अंतर्गत डॉ.सहस्रबुद्धे रचित अगस्ती ऋषींचे अभंग गायन व संगीत दिग्दर्शन केले आहे. ‘मितरंग’ या डॉ. देवीप्रसाद खरवंडीकर रचित शास्त्रीय संगीतातील बंदिशींच्या सी.डी. मध्येही गायन केले आहे. न्यू आर्ट्स कॉमर्स व सायन्स कॉलेज अहमदनगर तसेच पुणे येथील एसएनडीटी महिला विद्यापीठ निरंतर प्रौढ शिक्षण व विस्तार विभाग आयोजित पदविका प्रथम वर्षासाठी नाट्यसंगीत व शास्त्रीय संगीत विषयक सप्रयोग व्याख्याने दिलेली आहेत.
लेखनाविषयी सांगावयाचे झाल्यास अहमदनगर येथील दै.समाचार या वृत्तपत्रात ‘गाथा संगीताची’ ही 102 लेखांची संगीतविषयक लेखमाला प्रसिद्ध झाली आहे. अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मंडळाच्या ‘संगीत कलाविहार’ या मासिकात संगीतविषयक लेख प्रसिद्ध झाले आहेत. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या साहित्य पत्रिकेत नाट्यसंगीत विषयक लिखाण प्रसिद्ध झाले आहे. विवेक तर्फे प्रकाशित केलेल्या ‘शिल्पकार चरित्रकोष’ या ग्रंथात संगीतातील बुजुर्ग कलाकारांविषयीचे लेखनही करण्याचे भाग्य मला लाभले. तसेच ‘कशी या त्यजू पदांना’ हे संगीत एकच प्याला या नाटकातील लोकप्रिय पदांचा भावार्थ सांगणारे माझे पुस्तकही प्रकाशित झाले आहे. याशिवाय अनेक स्मरणिकांमध्ये संगीतविषयक लेखन करण्याची संधी मला मिळाली.
विविध नाट्यसंगीत स्पर्धा, कै. गोविंदराव टेंबे स्मृती स्पर्धा, अण्णासाहेब कराळे ट्रस्ट सांगली तर्फे होणार्या संगीत स्पर्धा, संगीत नाट्यप्रवेश स्पर्धा अशा अनेक स्पर्धांमध्ये मला विविध पारितोषिके मिळाली. यामध्ये जयराम शिलेदार ट्रस्ट तर्फे नाट्यप्रवेश स्पर्धांमध्ये विशेष लक्षवेधी गायिका अभिनेत्री पारितोषिक, दिल्ली येथे झालेल्या 28 व्या बृहन्महाराष्ट्र नाट्यस्पर्धेत ‘संगीत शाकुंतल’ नाटकातील ‘प्रियंवदा’ या भूमिकेसाठी विशेष पारितोषिक, जयराम शिलेदार करंडक स्पर्धेत एसएनडीटी महिला महाविद्यालया तर्फे सादर केलेल्या नवीन ‘संगीत अनवट’ या स्वाती गणपुले लिखित नाटकातील भूमिकेसाठी उत्कृष्ट गायिका अभिनेत्रीचे प्रथम पारितोषिक प्राप्त झाले.
माझ्या प्रामाणिक प्रयत्नांची दाद म्हणून मला प्रेरणादायी ठरणारे अनेक पुरस्कार माझ्या या सुरेल प्रवासात प्राप्त झाले. त्यातील काही पुढीलप्रमाणे –
1) अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद (मुंबई) तर्फे मानाचा ‘कै. वसंत देसाई पुरस्कार.’
2) स्वरानंद प्रबोधिनी अहमदनगर तर्फे ‘स्वरानंद भूषण’ आणि संगीत नाट्यरत्न हे दोन पुरस्कार.
3) आनंदोत्सव चॅरीटेबल ट्रस्ट अहमदनगर तर्फे ‘विशेष अभ्यासक गौरव पुरस्कार.’
4) सार्वमत आणि देशदूत परिवारातर्फे ‘कर्मयोगिनी पुरस्कार.’
5) लोकमत सखी सन्मान जिल्हास्तरीय आणि राज्यस्तरीय असे दोन पुरस्कार
6) बालगंधर्व रसिक मंडळ पुणे तर्फे ‘बालगंधर्व गुणगौरव पुरस्कार.’
हे सर्व पुरस्कार मला माझ्या पुढील सांगीतिक वाटचालीसाठी खूप मोठे प्रेरणादायी असून माझ्या सर्व गुरुजनांचे माझ्या पाठीशी असणारे आशीर्वाद आहेत असे मी समजते.
कोणतीही कला ही कष्टसाध्यच असते. त्या कलेची साधना करताना खडतर तपश्चर्या करावी लागते. त्यानुसार संगीत साधक म्हणून हा सर्व प्रवास करताना मलाही अनेक अडचणी आल्या, अनेक चांगले-वाईट अनुभवही आले. त्या सर्व कडू-गोड आठवणींची शिदोरी घेऊन मी आत्तापर्यंत संघर्ष करत आले पण गुरुकृपेमुळे कुठेही न डगमगता माझा प्रवास प्रामाणिकपणे करत राहिले आणि यापुढेही करेनच. जसजशी यशाची वाटचाल पुढेपुढे जाते तसतसे विरोधकही वाढत जातात याचाही अनुभव मला पदोपदी आला परंतु अशा कठीण प्रसंगातूनच आपण पुढे कशी वाटचाल करतो याची परीक्षा परमेश्वर नेहमीच घेत असतो. त्यातूनच तावूनसुलाखून आपण पुढे जात असतो आणि या सर्व वाटचालीत गुरूंचा वाटा हा खूप महत्त्वपूर्ण असतो.
खरं तर आजच्या काळात महान-सर्वांग परिपूर्ण गुरु लाभणे ही खूप दुर्मीळ गोष्ट आहे पण त्या बाबतीत मी नक्कीच भाग्यवान आहे. मला काहीही माहिती नसताना संगीत नाटक आणि नाट्यसंगीताच्या मोहमयी दुनियेत रममाण होण्याची दिशा माझ्या गुरु स्व.जयमाला शिलेदार यांनीच दिली. उत्तम कलावंत आणि उत्तम शिक्षक या दोन्ही भूमिका एकाच वेळी यशस्वीपणे पार पाडणे खरं तर फार अवघड गोष्ट आहे पण असे असूनही उत्तम कलावंत म्हणून श्रोत्यांमध्ये जयमालाबाई लोकप्रिय होत्याच पण एक उत्तम शिक्षक म्हणूनही आम्हा सर्व विद्यार्थ्यांच्याही त्या लाडक्या बाई होत्या. ‘गुरुविण कोण दाखवील वाट’ या उक्तीप्रमाणे त्यांच्याशिवाय खरंच मी दिशाहीन भरकटत गेले असते.
बाईंकडे गाणं शिकणं ही खरंच एक मोठी पर्वणी असायची. गंधर्व परंपरेचा वारसा लाभलेल्या आणि संगीत नाटकांच्या खर्या आधारस्तंभ असणार्या बाईंनी संगीत रंगभूमी जतन करण्याचं व्रत अखंड चालू राहावं यासाठी अनेकांना मार्गदर्शन केलं. वय वर्ष तीन-चार पासून वय वर्ष सत्तर पर्यंतच्या सर्व वयोगटातील शिष्यांना अगदी सा रे ग म पासून गायकी पर्यंत न कंटाळता नव्या उत्साहाने आणि प्रत्येकाच्या गळ्याच्या कुवतीनुसार बाई शिष्यांना विद्यादान करायच्या. त्यांच्या चेहर्यावरील निरपेक्ष आनंद बघत रहावासा वाटायचा. आजही त्यांच्या चेहर्यावरील तो निखळ-निर्मळ आनंद आठवला की आपण त्या क्षणांचे साक्षीदार आहोत ही खरोखरच माझ्या आयुष्यातली सगळ्यात मोठी भाग्याची गोष्ट आहे असे वाटते.
शिलेदार कुटुंबियांच्या सहवासात केवळ गायनच नाही तर नाट्यसंगीत गाताना त्याच्या कोणत्या गुणांमुळे, वैशिष्ट्यांमुळे कलाकार भूमिकेशी, पदाशी, गाण्याशी एकरूप आणि तन्मय होतो हे मला प्रत्यक्ष अनुभवायला मिळाले. संगीत नाटकांमध्ये भूमिका करताना चालायचे कसे, बोलायचे कसे, देहबोली कशी असावी, जुन्या काळाला अनुसरून आपले वागणे नाटकात कसे असावे याचेही बहुमोल शिक्षण मला त्यांच्याकडून मिळाले. त्यातूनच माझी नाट्यसंगीताविषयीची गोडी अधिकाधिक वाढत गेली. बाईंच्या सहवासात त्यांच्या अष्टपैलू व्यक्तिमत्त्वाचा मी जवळून अनुभव तर घेतलाच पण त्यांनी माझ्यावर सामाजिक, नैतिक, शैक्षणिक, कौटुंबिक, सांगीतिक असे वैविध्यपूर्ण संस्कार केले. त्या संस्कारांच्या शिदोरीवरच मी पुढे वाटचाल करत आहे. ही त्यांनी दिलेली संस्कारांची शिदोरीच मला पुढील आयुष्यात कायम मार्गदर्शक ठरणार आहे. हीच माझ्या जवळ असणारी शिदोरी आणि संगीत नाट्यपरंपरेची अवीट गोडी नवीन पिढीलाही अधिकाधिक चाखता यावी म्हणून अहमदनगरमध्ये ही गंधर्व संगीत नाट्यपरंपरा रुजवण्यासाठी आम्ही श्रुती संगीत निकेतन या आमच्या संस्थेमार्फत सतत प्रयत्नशील असतो. त्यादृष्टीने अहमदनगरमधल्या नवीन पिढीतील, संगीत नाटकाची कोणतीही पार्श्वभूमी नसताना पुढे आलेल्या कलाकारांना घडवण्याचे कार्य आम्ही संगीत नाटके आणि संगीत नाट्य प्रवेशांचे कार्यक्रम करून करत असतो आणि यापुढेही करत राहू. जेणेकरून महाराष्ट्राची वैभवशाली परंपरा असलेली संगीत नाटके आणि नाट्यसंगीत जतन होत राहील. भविष्यात अहमदनगर मध्ये नाट्यसंगीत अकादमीची कल्पना मोठ्या प्रमाणावर राबवण्याचा आमचा मानस आहे. ज्यातून संपूर्ण अहमदनगर जिल्ह्यात पुणे-मुंबई शहरांप्रमाणेच याचा प्रचार-प्रसार होईल.
आत्तापर्यंतच्या माझ्या सर्व सांगीतिक वाटचालीत महत्त्वपूर्ण वाटा असणारे माझे सर्व कुटुंबीय यांचे खूप बहुमोल योगदान आहे. त्यांच्या पाठिंब्याशिवाय, प्रोत्साहनाशिवाय मी इथपर्यंत येऊ शकले नसते. यामध्ये माझे आईवडील सौ. अलका व श्री. शाम कुलकर्णी, माझे सासूसासरे सौ. कीर्तीदेवी व डॉ. देवीप्रसाद खरवंडीकर, अत्यंत सक्रीय आणि बहुमोल वाटा असणारे माझे पती श्री. मकरंद खरवंडीकर आणि माझी कन्या कु. दीप्ती तसेच माझ्यावर कायम प्रेम करणारे सर्व नगरकर रसिक, माझा सर्व विद्यार्थीवर्ग, माझे शुभचिंतक यांचा समावेश असून त्यांचे आशीर्वाद आणि शुभेच्छा कायम माझ्या पाठीशी राहोत हीच विनम्र प्रार्थना.
कोणत्याही कलेची साधना करताना त्या कलेवर नितांत श्रद्धा ठेवून, प्रामाणिकपणाने, सातत्याने साधना करत राहणारा खरा कलाकार आणि त्या कलेचे मर्म समजून घेण्यासाठी कलाकाराने आपले आयुष्य खर्ची घातले पाहिजे. सतत रियाजात, साधनेत राहिले पाहिजे असे मौलिक मार्गदर्शन करणार्या माझ्या सर्व गुरुजनांना शतशः प्रणाम. या गुरुऋणातून मी कधीच मुक्त होऊ शकत नाही.
शेवटी जाताजाता एवढंच म्हणेन –
भावस्वरांची ही पूजा श्वासाप्राणाने बांधावी
गुरुवर्य,
तुमच्या जन्मोजन्मीच्या ऋणातून होऊ कशी मी उतराई?
होऊ कशी मी उतराई?
– डॉ. धनश्री मकरंद खरवंडीकर
अहमदनगर
भ्रमणध्वनी – 9822391240