समंजस

समंजस

चपराक दिवाळी 2020
‘साहित्य चपराक’ मासिकाचे सभासद होण्यासाठी संपर्क –
7057292092

पायानं रेती उडवत दिनू किनार्‍यावर उगाचच चकरा मारीत होता. मावळत्या सूर्यानं सार्‍या आभाळभर लाल केशरी रंगांची उधळण केली होती. वार्‍याबरोबर उसळणार्‍या लाटांच्या कॅलिडोस्कोपमधून लाल, केशरी पिवळ्या रंगांच्या विविधाकृती नक्षी सागरपटलावर चमचमत होत्या. घरट्यांकडं परतणार्‍या पक्ष्यांची शिस्तशीर रांग सोनेरी झिलई चढवून क्षितिजावर उमटून क्षणात नाहीशी होत होती.

पण फिरत्या रंगमंचावरचं दृश्य क्षणात पालटावं किंवा एखाद्या मनस्वी कलावंतानं, पॅलेटमध्ये उरलेल्या रंगांच्या मिश्रणानं तयार झालेल्या करड्या रंगाचे फटकारे सुंदर रेखाटलेल्या आपल्याच चित्रावर मारावेत तसा धुरकट करडेपणा हलके हलके सार्‍या कॅनव्हासवर उतरू लागला. सावल्यांनी हातपाय पसरले आणि दिनूच्या मनावरचं मळभ आणखी गडद होऊ लागलं.

आपल्या तेजाचे कण न कण गोळा करत सूर्य क्षितिजापार निघून जाऊ लागला. लाल रंग विरत विरत, लाटांवर हळूहळू सावळ्या छाया पसरायला लागल्या. नारळी-पोफळीच्या गच्च झाडवळाचा देखणेपणा नाहीसा होऊन ती झपाटल्यासारखी वाटायला लागली. सगळ्या चराचरावर औदासिन्य दाटून आलं.

काळ्याशार पाण्यात दूरवर तरंगणारी एकमेव नाव जेव्हा अंधारात अदृष्य झाली तेव्हा नाईलाजानं दिनू घराकडं वळला.

चांगलंच अंधारून आलं होतं. समुद्रकिनार्‍याला लागून असलेल्या वाडीतून, नारळी-पोफळीच्या गर्द राईतून घराकडं जाणारी पाऊलवाट पालापाचोळ्यानं, झाडोर्‍यानं झाकून गेली होती. नीरव शांततेत त्या पालापाचोळ्यावरून रेंगाळत, ओढत चालणार्‍या त्याच्या पावलांचा केवढा तरी आवाज होत होता. पायाजवळून सळसळत काहीतरी गेल्याची जाणीव झाली तसा नकळत त्याच्या पावलांचा वेग वाढला. खिन्नतेची जागा भीतीनं घेतली. झिरपत्या अंधारातून कसले कसले भास व्हायला लागले तसा कधी तो पळत सुटला हे त्याचं त्यालाही कळलं नाही. धपापत्या उरानं तो घराजवळ आला. बंद दाराच्या फटीतून आत हात घालून कोयंड्यातून कडी काढायची सफाई आताशा त्याला जमायला लागली होती.

परसात अंधार होता. रखमानं देवघरात दिवा लावला होता आणि वार्‍यानं भकभकणारा कंदील ओसरीत टांगला होता पण त्यानं उजेड पडायच्या ऐवजी अंधाराची तीव्रता अधिकच वाढत होती. वार्‍यानं झोपाळा कुणीतरी बसल्यासारखा उगाच हलत होता. झोपळ्याच्या कड्या घरातल्या शांततेला छेद देत कुरकुरत होत्या.

परसातल्या बादलीतलं पाणी तांब्यानं पायांवर ओतून दिनू घरात आला. पाण्याचा आवाज ऐकल्याबरोबर आजीला त्याची चाहूल लागलीच. ‘‘दिनू, एवढा वेळ बाहेर कुठं खेळत होता रे रांडीच्या?’’

आजीनं आवाज दिला. तिची खाट कुरकुरली. उठवत नव्हतं तरी बळंच उठून वाकत वाकत ती स्वयंपाकघराकडं निघाली.

‘‘हात-पाय धुतलेस ना रे सोन्या? जा आता देवापाशी बसून शुभंकरोती आणि परवचा म्हण. तो पर्यंत मी पान वाढते. रखमाकडून तुझ्यासाठी शेवग्याची भाजी आणि तांदळाची भाकरी रांधून घेतलीन मगाशीच. चांगली गरम गरम आहे. खाऊन घे.’’

आजीच्या प्रेमळ बोलण्यानं त्याच्या घशात आवंढा आला. देवाला नमस्कार करून मुकाट्यानं तो स्वयंपाक घरात येऊन पाटावर बसला. तिच्या आग्रहाखातर दोन घास कसेबसे घशाखाली ढकलून चूळ भरून तो तिच्या शेजारच्या अंथरुणावर लवंडला. आजीनं पुन्हा डोळ्यांना पदर लावला. गेले सहा महिने तीही रडतच होती. दिनूला चुकवून वरचेवर डोळे पुसत होती पण दिनूची अवस्था पाहून तिच्या काळजाचा थरकाप होत होता.

मुंबईहून गावाकडं येऊन सहा महिने होत आले तरी दिनेश होता तिथंच होता. काळ कुणासाठी थांबत नाही पण दिनेशसाठी तो थांबला होता. पोरवयाच्या शरीराला झोप लगेच लागत होती पण अपरात्री जाग येऊन एखाद्या चित्रपटाच्या पडद्यासारखा भूतकाळ त्याच्या मिटल्या डोळ्यांपुढून सरकत होता.

समीर जोग, एक तरुण उद्योगपती. मुंबईत मोठी फॅक्टरी, गाडी, बंगला, नोकरचाकर, देखणी, सुविद्य पत्नी आणि राजबिंडा पुत्र. ओसंडून वाहणारं सुख आणि म्हणूनच त्या सुखाला नजर लावण्यासाठी टपलेल्या विखारी नजराही! पण या नजरांची फिकीर न करण्याइतका बेफिकीर आणि धाडसी असणारा समीर, बिझिनेस वाढवण्याच्या महत्त्वाकांक्षेनं इतका झपाटलेला होता की एकुलत्या एक लाडक्या लेकाच्या बाललीलांचं कौतुक बघायला ना त्याला वेळ होता ना मोठ्या हॉस्पिटलच्या संचालिका असलेल्या डॉ. स्मृती या त्याच्या धर्मपत्नीला. सुशीलाच्या अंगाखांद्यावर खेळत मोठा होत असलेला दिनेश आईबाप असूनही असा पोरकाच होता. नाही म्हणायला कोकणातून आजी आलेली असली की दिनूची कळी खुललेली असायची.

सुशीला म्हणायची पण त्याला, ‘‘आजी असली की सुशीला लगेच परकी होतीय व्हय रं तुला?’’

पण जसजसा दिनेश मोठा होत होता तसतसा एक समंजस एकाकीपणा त्याच्या मनाच्या एका काळोख्या कोपर्‍यात हळूहळू हातपाय पसरत होता. भल्या मोठ्या बंगल्यातल्या त्या प्रशस्त खोल्यांमध्ये वावरताना तो एकाकीपणा मध्येच उसळी मारून वर यायचा आणि मनभर पसरायचा. मग कंटाळा आणि बेचैनी त्याला इतकी सतवयाची की आईबाबा घरी येऊन दिवे लावेपर्यंत तो अंधारातच त्याच्या भल्यामोठ्या बेडवर लोळत पडून राहायचा.

पण असं कधीतरीच व्हायचं. शहरातल्या उच्छभ्रू वस्तीमध्ये असलेल्या कॉन्व्हेंट स्कूलमध्ये हुशार विद्यार्थी असलेल्या दिनेशला शाळेत मित्रांची कमतरता नव्हती आणि आईबाबाही कुठल्याच गोष्टीत त्याला काही कमी पडू देत नव्हते. इतर अनेकांपेक्षा आपण खूपच सुदैवी आहोत, सुखात आहोत याची जात्याच जाण असलेला दिनेश त्यामुळं मनाच्या काळोख्या कोपर्‍यात दबा धरून त्याला मध्येच अस्वस्थ करणार्‍या या मनातल्या मित्राला अगदीच किंमत देत नव्हता.

एकूण दिवस अगदी मजेत, बिनघोर चालले होते. शाळेमध्ये क्रिकेट मॅचेस सुरू व्हायच्या होत्या. क्रीडाशिक्षक मुलांकडून बेदम सराव करून घेत होते. संध्याकाळी दिनेशला घरी यायला चांगलाच उशीर झाला होता. टीमचा कॅप्टन म्हणून त्याची निवड झाली होती. ही आनंदाची वार्ता त्याला आईबाबांना सांगायची होती. खूप वेळ जागत तो त्यांची वाट पाहत बसला होता पण दोघांचाही पत्ता नव्हता. सगळी कामं उरकून सुशीलाही ‘‘जरा घरी डोकावून येते दिनेशबाबा’’ म्हणून तिच्या घराकडं गेली होती. तिचा आजारी नवरा सारखा फोन करत होता. दोन-तीन वेळा धावत ती फोनकडं जाताना दिनू बघत होता. त्यामुळं पुस्तक वाचता वाचताच, ‘हं’ म्हणून त्यानं तिला परवानगी दिली होती.

शरीर दमलं होतं तरी त्याला झोप येईना. आनंदाची बातमी सांगण्याची उत्सुकताही आता मनातच विरली होती. मनाच्या कोपर्‍यात लपलेला त्याचा तो मित्र त्याला हळूच हाक मारू लागला. स्वतःच्या एकाकीपणाला त्यानं कुरवाळायला सुरवात केली. त्याला बेचैन वाटू लागलं. अंगातली सर्व शक्ती नाहीशी होतीय असं वाटायला लागलं. त्याला राग आला होता का? त्याचं मन खट्टू झालं होतं का? काहीच झालं नव्हतं पण तरीही एक नकारात्मकता, एक उदासी त्याच्या मनभर पसरली. त्याला कंटाळा आला. पुस्तकातही मन लागेना. बंगल्याचा मुख्य दरवाजा उघडून तो बाहेर आला. बाहेर दूर दूर पर्यंत कोणी दिसत नव्हतं. बंगल्याचं आवारच इतकं लांब पर्यंत पसरलेलं होत की आजूबाजूला हाकेच्या अंतरावर कुणाचं घर असण्याची शक्यताच नव्हती. नाही म्हणायला दूरवर गेटपाशी वॉचमनची केबीन तेवढी होती. घरासमोरची बाग फुलांनी बहरली होती. थुई थुई उडणारं कारंजं होतं, आरामशीर कुशन्स असलेला झोपाळा होता, तो लहान असताना त्याच्यासाठी आणलेलं ट्रॅम्पोलिन, छोटा स्विमिंग पूल सारं काही होतं. अगदी नीट नेटकं! पण उपभोग घेण्यासाठी तो एकटा होता आणि आत्ता कंटाळा आणि बेचैनी यानं त्याचं मन व्यापलं होतं. आईबाबांची वाट पाहणंही त्या मनात आता कुठंच नव्हतं. कुठल्याच भावना नव्हत्या. रिकाम्या बंगल्यासारखंच रिकामं होतं ते. समोरचं दृष्यही जणू त्याला दिसतंच नव्हतं. त्यानं दार लावून घेतलं.

लॅच उघडून समीर आणि स्मृती घरात आले. सुशीलाही पाठोपाठ लगबगीनं घरात शिरली आणि स्वयंपाक घराकडं वळली. दिनेश टेबलावर बसल्या बसल्याच झोपी गेला होता. त्याला उचलून समीरनं त्याच्या बेडवर आणून झोपवलं. दोघंही प्रचंड दमलेले होते. त्यामुळं जेवणं आटोपल्यावर लगेचच बंगल्यात निजानीज झाली.

सकाळी नऊ वाजले तरी दिनेश आज अजून अंथरुणातच होता. घरातली गडबड त्याला ऐकू येत होती पण आत्ता मात्र तो आईबाबांवर अगदी नाराज होता. कालची बेचैनी गायब झाली होती आणि मनाची स्थिती पूर्ववत होऊन आता तो आईबाबांवर नीट, व्यवस्थित रागावला होता पण नऊ वाजले तरी हे दोघे अजून घरात कसे हे त्याला कळत नव्हतं.

‘‘उठा दिनूबाबा. सकाळ झाली. आईबाबा कवा धरनं वाट बघून राहिले’’ सुशीलानं त्याच्या खोलीचे पडदे सारत त्याला हाक दिली. ‘‘उठणार आहे’’ कुरकुरत तो म्हणाला ‘‘पण आईबाबा अजून घरात कसे?’’ जरा आढ्यतेनंच त्यानं विचारलं.

‘‘तुमचीच तर वाट बघतात न्हवं का? या आता बाहेर’’ सुशीला हसत हसत बोलली.

खोलीच्या वॉशरूममध्ये फ्रेश होऊन दिनेश स्वयंपाकघरात गेला. टेबलावर सुशीलानं आज दुधाचा ग्लास ठेवलाच नव्हता. विसरली वाटतं.

‘‘सुशीला मावशीऽऽ, सुशीला मावशीऽऽऽ’’ हाका मारत तो हॉलमध्ये आला आणि एकदम थबकला. हॉल पूर्ण सजवला होता. हॉलमधलं डेकोरेशन पाहून तो अवाक्च झाला. फुगे, माळा लावल्या होत्या. खूप सार्‍या फुलांची सजावट केली होती. कधी घडलं हे? काल तर काहीच नव्हतं! टेबलवर मोठा केक होता. आईबाबा, सुशीलामावशी आणि नोकर शिवा सगळे दिनेशच्या जवळ आले आणि टाळ्या वाजवत त्यांनी गाणं म्हणायला सुरवात केली. ‘‘हॅपी बर्थ डे टू युऽऽ, हॅपी बर्थ डे टू युऽऽऽ. हॅपी बर्थडे दिनू बेटा! आता तू सात वर्षाचा झालास. तू आता मोठा झालास. हो की नाही?’’ बाबांनी गाल गुच्चा घेऊन दिनूच्या कपाळावर किस केलं.

आपला राग वगैरे तो विसरूनच गेला. त्याला हवी असलेली, हँडलवर सचिनचं चित्र असलेली बॅट बाबांनी त्याला प्रेझेन्ट दिली होती. आईनं पण क्रिकेटसाठी त्याला वेगळे शूज आणले होते. सुशीलाकडून त्याची आनंदाची बातमी काल त्यांना कळली होती. सगळ्या गोष्टी जमवून आणणं समीरसारख्या उद्योजकाला काहीच अशक्य नव्हतं. दिनू राग विसरला, त्याचा एकाकीपणा सगळं सगळं विसरला. त्यानं आईबाबांना घट्ट मिठी मारली.

सेलिब्रेशन, खाणं पिणं झालं. आईबाबा जायला निघाले आणि समंजस एकाकीपणानं पुन्हा त्याच्या मनात चुळबूळ केली. त्याला आईबाबा आज दिवसभर जवळ हवेसे वाटत होते पण नेहमीच्या अनुभवावरनं तो काहीच बोलला नाही. त्याचा चेहरा एकदम पडला. फिकट, निस्तेज दिसू लागला. तो एकदम गप्प झाला.

गेले काही दिवस त्याच्यातले हे बदल स्मृतीला जाणवत होते. त्याला चांगल्या मानसोपचारतज्ज्ञाकडं घेऊन जायचं ती बरेचदा ठरवत होती पण हॉस्पिटलच्या कामातून सवड होत नव्हती आणि अजून तरी ही गोष्ट खूप गंभीर नाहीये हेही तिला जाणवत होतं. म्हणून समीरलाही ती काही बोलली नव्हती.

ती एकदम समीरला म्हणाली, ‘‘समीर शक्य असेल तर आपण आज घरी थांबायचं का? मलाही हॉस्पिटलमध्ये आज महत्त्वाच्या केसेस नाहीयेत. डॉ नीता सांभाळू शकेल बाकी सर्व गोष्टी.’’

‘‘मलाही आवडलं असतं स्मृती! पण एका पार्टीबरोबर मिटिंग आहे. थोडा तणाव आहे. ते उगीचच वाकड्यात शिरत आहेत. दोनदा त्यांच्याशी वादावादी झालीय. ऑफिसमध्ये उगाच लफडा व्हायला नको. मी थोडं उशिरा का होईना पण ऑफिसमध्ये जाऊन येईन’’ समीर म्हणाला.

‘‘जपून काम करीत जा समीर. मला कळलंय की ते लोक फार वाईट आहेत. मला काळजी वाटते’’ स्मृती म्हणाली.

‘‘डोन्ट वरी डार्लिंग. मै हुं ना!’’ बेफिकीरीनं समीरनं ते संभाषण संपवूनच टाकलं.

दिनेश मात्र खूश झाला. शाळेमधल्या गंमतीजमती उत्साहानं तो आईबाबांना सांगू लागला.

पण दिनेशच्या आयुष्यातला आनंदाचा तो शेवटचा दिवस ठरला. त्याच्या दुसर्‍याच दिवशी समीर आणि स्मृती यांच्या गाडीला अपघात झाला. संशयास्पद मृत्यू म्हणून पोलीस केस झाली. स्मृतीची आई म्हणजे कोकणातली आजी हिच्या व्यतिरिक्त दिनेशला कोणीच नातेवाईक नव्हते. समीर अनाथाश्रमात वाढलेला आणि आईबरोबर, कोकणात एकटी वाढलेली, गरीब पण अत्यंत हुशार असलेली स्मृती यांचा विवाह ही एक अजब प्रेमकहाणी होती पण तिचा शेवट असा होईल याची कुणी कल्पनाही केली नव्हती.

एकुलत्या एक नातवाच्या जिवाला असलेला धोका ओळखून आजीनं दिनेशला घेऊन कोकणातलं आपलं घर गाठलं होतं.

कोकणातलं घर दिनेशला खूप आवडायचं. लहान असताना सुट्टीत तो आईबरोबर नेहमी इथं यायचा. इथं मित्रही झाले होते त्याचे पण हॉस्पिटलचा व्याप वाढत गेला तसं आईची कामं वाढली आणि त्यांचं कोकणात येणं होईनासं झालं.

आईबरोबर मजा करायला त्याला कोकण आवडत होतं पण आता मात्र इथं त्याला घुसमटल्यासारखं व्हायला लागलं होतं.

जे आईबाबा, सारखे बाहेर असतात, घरात त्याच्या जवळ राहत नाहीत म्हणून त्याला त्यांच्यावर रुसायचं होतं, रागवायचं होतं ते आईबाबा आता या जगात अस्तित्वातच नाहीत हा धक्का त्याच्या सहनशक्तीच्या पलीकडचा होता. ते कळण्याइतका दुर्दैवानं तो मोठा होता. आजीनं जवळच्या डॉक्टरांकडून त्याच्यावर उपचार सुरू केले होते पण दिनू हरवल्यासारखा झाला होता. तो कुणाशी काहीच बोलत नव्हता.

आजी त्याला म्हणत होती, ‘‘दिनू बाळा, आता काही वर्षे तरी आपल्याला इथं कोकणातच रहावं लागेल. इथल्या शाळेत आपण तुझं नाव घालू. इथं पण तुला छान मित्र भेटतील. जीवन असं कुणासाठी थांबून राहत नसतं बाळा. तुझा बाप अनाथाश्रमात वाढला पण तुला मी आहे ना? तू काळजी करू नकोस! थोड्या दिवसांनी मी घेऊन जाईन हो तुला मुंबईला! पण एक-दोन वर्षे तरी तुला इथं काढायला लागतील बाळा. ऐकशील ना माझं? कुठंतरी तुला तुझं मन रमवलं पाहिजे.’’ ती खूप सांगत राहायची.

पण दिनेशला जणू काही ऐकूच येत नव्हतं. त्याचा कोरा चेहरा पाहिला की तिला भडभडून यायचं.

रात्री अंथरुणावर पडलं की शिवानं धाडधाड दार वाजवत मोठ्यानं मारलेल्या हाका, पाठोपाठ अँबुलन्सचा सायरन, बर्थडेसाठी सजवलेल्या हॉलमध्ये आणलेले त्याच्या प्रिय आईबाबांचे देह, नंतर घरभर फिरणारे पोलीस, भेदरलेली सुशीलामावशी आणि उगाचच संशयाच्या फेर्‍यात सापडलेला बिचारा प्रामाणिक शिवा या सार्‍या गोष्टी काल घडल्यासारख्या दिनेशच्या डोळ्यासमोर उभ्या रहायच्या. उन्हं उतरली आणि संध्याकाळची चाहूल लागली की ते अंधारं घर त्याला खायला उठायचं. गावात वीज होती पण खूपदा लोडशेडिंग असायचं. तो उठायचा आणि समुद्रावर जायचा. किनार्‍यावरल्या रेतीत उगा बसून राहायचा. अगदी अंधार पडेपर्यंत.

घरापासून समुद्र किनारा बराच दूर होता. वाटेत डांबरी सडक होती. टुरिस्ट लोकाच्या गाड्या अगदी वेगात कधीतरी तिच्यावरून धावायच्या. सडक पार करून तो वाडीत घुसला. पायवाटेनं चालायला लागला. वारा पडलेला होता. रान स्तब्ध होतं. त्या निस्तब्धपणात पायाखाली चुरडणार्‍या पाला पाचोळ्याचाच काय तो आवाज उठत होता. साप, विंचू यांच्याविषयी आजीनं त्याला सावधगिरी बाळगायला सांगितलं होतं. त्यानं झाडाची एक डहाळी तोडून घेतली आणि पाऊल ठेवण्यापूर्वी तो खुपसून पाहू लागला. झाडी संपून त्यानं रेतीत पाऊल टाकलं आणि तो एकदम दचकला. पिल्लांना पाजत बसलेली एक कुत्री त्याच्या अचानक येण्यानं दचकली आणि संशयानं त्याच्याकडं पाहत संरक्षणाच्या पावित्र्यात, उभी राहिली.

दिनू खूपच घाबरला. त्याला जागेवरून हलण्याचीही भीती वाटू लागली. रस्त्यावरच्या कुत्र्यांना तो खूप घाबरायचा पण जराशानं ती स्वतःहूनच निघून गेली. तिच्या मागून तिची पिल्लंही लडखडत निघून गेली. त्या संध्याकाळी दिनू लवकरच घरी परतला. खेडेगावातल्या वातावरणाशी जुळवून घ्यायलाही त्याचं शहरी मन तयार होत नव्हतं. कॉन्व्हेंट स्कूलमधलं वातावरण, तिथले मित्र यांच्या आठवणीनं तो अजूनच खिन्न झाला.

दिवसेंदिवस तो अधिकच अबोल, घुमा होत चालला होता. म्हातार्‍या आजीचा जीव त्याच्यासाठी तीळ तीळ तुटत होता. आपल्या परीनं ती त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न करीत होती. त्याला रामायण, महाभारतातल्या गोष्टी ऐकवीत होती पण दिनूच्या मनात काही शिरतच नव्हतं. शाळेतही तो घुम्म बसून राहत होता. रसरशीत व्यक्तिमत्त्वाचा मुंबईतला हुशार मुलगा. त्याची पार रया गेली होती.

त्याला आत्ता फक्त एकच मित्र उरला होता. त्याच्या शरीरातल्या नसानसात आणि सार्‍या मनभर व्यापून राहिलेला त्याचा समंजस एकटेपणा. घरात, शाळेत, समुद्रकिनारी जाऊन बसल्यावर त्या एकटेपणाला कुरवाळत बसण्याचा चाळाच त्याला लागला होता. बेचैनी, कंटाळा हेच दोस्त त्याला आता आवडायला लागले होते.

शाळा सुटल्यावर आजही त्याची पावलं सुमुद्राकडं वळली. समुद्रावर जाऊन बसलं की त्याला थोडं शांत वाटायचं. समुद्राची धीरगंभीर गाज त्याच्या मनातल्या नकोशा वाटणार्‍या विचारांच्या आवर्तनांना थोडा बांध घालायची किंवा त्या विचारांमध्ये पार हरवून जायला मदत करायची. आजीचं प्रेम, आजीची धडपड यांचा त्याला आधार वाटायचा तसा त्रासही वाटायचा. त्याच्या मनाला शुद्धीवर येण्याचं भान सोसवायचं नाही. काळोखातनं कुणीतरी हात द्यावा ही अंतःप्रेरणा आणि काळोखातच बुडून जावं ही असहाय्यता यांच्यात त्याची घुसमट व्हायची.

आपल्याच नादात भरभर चालत त्यानं सडक ओलांडली आणि वाडीतल्या पाऊल वाटेवर पाय टाकला आणि अनपेक्षितपणे कशाला तरी अडखळून तो धाडकन जमिनीवर पडला. त्याच्या तोंडाशीच अकस्मात हालचाल झाली आणि तो दचकून मागं झाला. दोन काळेभोर डोळे त्याच्या तोंडाच्या अगदी जवळच कुतूहलानं त्याच्याकडं पाहत होते. तो बघतच राहिला. आपल्या पाणीदार डोळ्यांनी कुत्र्याचं एक अगदी छोटं पिल्लू त्याच्याकडं टक लावून पाहत होतं. पिल्लू थरथरत होतं. उठण्याचा किंवा पळण्याचाही त्यानं प्रयत्न केला नाही. नाक वर करून त्यानं दिनूला हुंगलं. दिनूनं हात पुढं केला आणि अगदी हळूच त्याच्या मऊसूत मानेवर ठेवला. त्या स्पर्शानं दिनू बेभान झाला. पिल्लानं घाबरून जाऊ नये म्हणून हलकेच रांगत तो पिल्लाच्या अगदी जवळ गेला आणि त्यानं हातानं त्याला वेढलं. पिल्लाचं अंग थोडं थरथरलं पण त्यानं चळवळ केली नाही. दिनू त्याला म्हणाला, ‘‘अरे घाबरू नकोस. मीच आहे.’’

तो सावकाश उठला. त्यानं पिल्लाला उचलून घेतलं. पिल्लाचं अंग मुंबईतल्या त्याच्या बेडवरच्या गादीपेक्षाही मुलायम होतं. स्वच्छ होतं आणि त्याला रानातला सुरेख ताजा वास येत होता. तो कशाला अडखळला होता ते त्यानं पाह्यलं. ती कुत्री होती. पिल्लाची आई. कुठल्यातरी गाडीनं तिला उडवलं होतं. ती मरून पडली होती. इतर पिल्लंही कुठं दिसत नव्हती. त्यानं पिल्लाला जरा खाली ठेवलं. कू कू करत पिल्लू आईकडं गेलं. तिला ढुशा मारू लागलं. मग पुन्हा ते दिनुकडं आलं आणि त्याच्या पायात घुटमळू लागलं.

इतर पिल्लांचा त्यानं थोडा शोध घेतला पण त्याला कुठंच ती दिसली नाहीत. तो थोडा जरी हलला तरी पिल्लू लडखडत त्याच्या मागं येत होतं. समुद्रावर जाण्याचा बेत त्यानं रहित केला. पिल्लाच्या मऊशार अंगावर थोपटीत तो परत फिरला.

आज कधी नव्हे ते सडकेवरनं गाडी येत नाही ना हे नीट पाहत त्यानं सडक ओलांडली. कुंपणाभोवतालच्या काटेरी वेली पिल्लाच्या तोंडाला लागू नयेत म्हणून तो जपत होता. त्याच्या प्रत्येक पावलाला पिल्लाची मुंडी मागंपुढं हलत होती. घरापाशी आल्यावर विसावा घेण्यासाठी तो थोडा थांबला आणि फटीतून हात घालून कोयंड्यातून कडी काढण्यासाठी त्यानं पिल्लाला खाली ठेवलं. पिल्लू त्याला सोडायलाच तयार होईना. तल्लीनपणे त्याच्याकडं पाहत तो म्हणाला, ‘‘अरे जरा थांब! मला कडी तर काढू दे!’’

आज्ञाधारक मुलासारखं दूर उभं राहून कू कू आवाज करत ते दिनूकडं पाहत बसलं.

घरात शिरल्याबरोबर त्यानं आजीला हाक मारली. ‘‘आजी आजी, हे बघ कोण आलंय आपल्याकडं?’’

अगदी चालवत नव्हतं तरी आजी जवळजवळ धावतच बाहेर आली. मुंबईहुन आल्यापासून प्रथमच दिनेशनं आजीला हाक मारली होती.

पिल्लाला छातीशी कवटाळून दिनेश उभा होता. पिल्लूही अगदी विश्वासानं त्याला चिकटलं होतं. ‘‘आजी, याच्या आईला गाडीनं उडवलं. ती वाडीच्या रस्त्यावर मरून पडलीय. कित्ती छान आहे ना आजी हे. रंग बघ ना कसा पांढरा शुभ्र आहे. कापसासारखा.’’

‘‘खरंच रे! फारच सुंदर आहे’’ आजीनं दुजोरा दिला.

पिल्लाच्या डोळ्यातली चमक तिला नातवाच्याही डोळ्यात दिसत होती. ‘‘याला आठवण येत असेल का गं त्याच्या आईची?’’ त्यानं अधीर पणे विचारलं.

‘‘छे! आत्ता त्याला आठवण आहे ती खूप वेळ खायला न मिळाल्याची. काहीतरी गमावल्याची अंधुक कल्पना त्याला असली तरी ते त्याला नीट कळत नाहीये. दूध पाज जा थोडं त्याला’’ आजी गंभीरपणे म्हणाली.

आपल्यापेक्षा सुदैवी आहे बेटा. मनात विचार करत दिनू स्वयंपाक घरात गेला. पिल्लाला खाली ठेवलं. नीट उभंही राहता येत नव्हतं त्याला. जाळीच्या लाकडी कपाटातलं दूध दिनूनं वाटीत काढून घेतलं. त्यानं दुधाची वाटी पिल्लाच्या समोर ठेवली. पिल्लानं वाटीला हळूच धडक दिली. दिनूनं वाटी पकडली म्हणून दूध सांडता सांडता वाचलं. पिल्लाला वाटीतून दूध पिता येईना. काय बरं करावं? दिनू विचार करू लागला. दिनूनं दुधाच्या वाटीत बोट बुडवलं आणि पिल्लाच्या ओलसर तोंडात घातलं. ते अधाशीपणे बोट चोखू लागलं. दिनूनं बोट बाहेर काढलं तर ते ‘कू कू’ करत ओरडू लागलं. दिनूला ढुशा देऊ लागलं. दिनूनं दोनदोन बोटं दुधात बुडवून पिल्लाच्या तोंडात घातली. पिल्लू पुन्हा बोटं चोखू लागलं. नाकानं फुसफुस आवाज करीत दूध चाटु लागलं. उतावळेपणाने आपले नाजूक पाय जमिनीवर आपटू लागलं. हातावर फिरणारी त्याची जीभ दिनूला मजेदार वाटत होती. फुर फुर करीत त्यानं अर्धी वाटी दूध संपवलं. त्याची भूक आता शांत झाली होती आणि झोपेनं डोळे पेंगुळले होते.

आजी शेजारच्या आपल्या अंथरुणाच्या जवळच त्यानं पिल्लासाठी मऊ गादी तयार केली. पटापट जेवून जवळच झोपलेल्या पिल्लाला उचलून घेऊन त्यानं त्याला नीट त्याच्या अंथरुणावर ठेवलं आणि तो शेजारी झोपला. स्वयंपाक घरातलं आवरून आजी पण शेजारच्या खाटेवर लवंडली.

रात्री त्याला कुठलीही स्वप्न पडली नाहीत की कुठले भास झाले नाहीत. जेव्हा जेव्हा जाग आली तेव्हा पिल्लाचेच विचार त्याच्या मनात होते.

सकाळी जाग आली ती पिल्लाच्या आवाजानं. अजून त्याला भुंकताही येत नव्हतं.

‘‘फारच लहान आहे हे पिल्लू, लहान बाळासारखं सांभाळावं लागणार त्याला. जरा मोठं असतं तर बरं झालं असतं’’ आजी म्हणाली.

‘‘आजी मी करेन सगळं त्याचं. तुला काही त्रास नाही होऊ देणार.’’

मोठ्या माणसासारख्या त्याच्या बोलण्यानं आजी त्याच्याकडं बघतच राहिली. तो अख्खा दिवस दिनू पिल्लाची शी शु, दूध पिणं यातच व्यग्र होता आणि तोंडानं त्याच्याशी गप्पा चालल्या होत्या.

‘‘आजी आज मी शाळेत जाणार आहे गं’’ दुसर्‍या दिवशी सकाळी उठल्या उठल्या दिनूनं जाहीर केलं. पिल्लाचं सगळं उरकून तो शाळेत गेला. शाळा सुटल्यावर तो घरी आला तेव्हा त्याच्याबरोबर तीन-चार मित्र होते. दिनूच्या पिल्लाशी सगळे खेळत होते. ‘पिल्लू फारच छान आहे’ असं सर्वांनी एकमतानं मान्य केलं. सर्वांना दिनूचा हेवा वाटत होता आणि दिनू मनातून अगदी आनंदित होत होता. आता त्याच्या गप्पा ऐकायला, त्याच्याशी खेळायला सर्वस्वी त्याचा, त्याच्या एकट्याच्या मालकीचा दोस्त त्याला मिळाला होता आणि आता त्याला एकटं राहण्याची वेळ कधीच येणार नव्हती.

सर्वांनी मिळून त्याचं नाव पण ठेवलं, ‘भुर्‍या!’ कारण तो पांढरा होता म्हणून. भुर्‍या भुर्‍या म्हणत दिनूनं त्याच्या नाकाला हात लावला तर आपले नाजूक पाय त्याच्या हाताभोवती वेढत, दिनूच्या हाताला आपलं डोकं घासत त्यानं मान्यता दिली. अंधार पडला तसं सगळे मित्र घरी पळाले. आपली छोटीशी शेपटी सटसट हलवत भुर्‍या त्याच्या पायात घोटाळत होता. त्यानं त्याला नीट उचलून जवळ घेतलं. दिवसभरातल्या शाळेतल्या गंमती दिनू भुर्‍याला सांगत राहिला.

आजी समाधानानं नातवाकडं पाहत राहिली. आजीच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते पण तिनं आज ते दिनूपासून लपवले नाहीत कारण ते अश्रू दुःखाचे नव्हते तर आनंदाचे होते.

– सरिता कमळापूरकर
९८५०९८३३६९

चपराक दिवाळी 2020

आमचे इतरही लेख वाचण्यासाठी, दर्जेदार पुस्तके विकत घेण्यासाठी www.chaprak.com ला भेट द्या. ‘चपराक प्रकाशन’चे फेसबुक पेजही जरूर लाईक करा. उत्तमोत्तम व्हिडीओ पाहण्यासाठी ‘चपराक’च्या युट्यूबला भेट द्या आणि सबस्क्राइबही नक्की करा.
Copyright @ www.chaprak.com / All Rights Reserved.

चपराक

पुणे शहरातून ‘साहित्य चपराक’ हे मासिक आणि ‘चपराक प्रकाशन’ ही उत्तमोत्तम पुस्तके प्रकाशित करणारी ग्रंथ प्रकाशन संस्था चालविण्यात येते. ‘साहित्य चपराक’ मासिकाचा अंक दरमहा 10 तारखेला प्रकाशित होतो. आपले साहित्य पाठविण्यासाठी, ‘चपराक’मध्ये जाहिराती देण्यासाठी आणि नवनवीन पुस्तकांच्या माहितीसाठी संपर्क - घनश्याम पाटील, संपादक 'चपराक'.
व्हाट्सऍप क्रमांक - ८७६७९४१८५०
Email - Chaprak Email ID

तुमची प्रतिक्रिया जरूर कळवा

हे ही अवश्य वाचा