दरवळ

दरवळ

Share this post on:

मराठी साहित्य परिषद, तेलंगण राज्य, हैदराबाद यांच्या ‘पंचधारा’ या मुखपृष्ठात परभणी येथील सुप्रसिद्ध लेखिका मनीषा कुलकर्णी-आष्टीकर यांनी ‘दरवळ’ या पुस्तकाची लिहिलेली समीक्षा. हे पुस्तक घरपोच मागवण्यासाठी संपर्क – ७०५७२९२०९२

‘पंचधारा’च्या प्रमुख संपादक डॉ. विद्याताई देवधर यांचे विशेष आभार.

दरवळ

झुळूक आणि झळा व दखलपात्र या दोन पुस्तकानंतर प्रकाशित होणारं घनश्याम पाटील यांचं नवं पुस्तक म्हणजे ‘दरवळ’ होय. डॉ.द.ता.भोसले यांची प्रस्तावना आणि डॉ.प्र.चिं.शेजवलकर यांची पाठराखण लाभलेल्या या पुस्तकातील एक एक लेख म्हणजे समृद्ध विचारांनी सजलेली जीवनबागच. कर्मकांडाला धर्म मानणाऱ्या समाजाने धर्माची व्याख्या फारच संकुचित केलीय.लेखकाचे विचार मात्र यापेक्षा भिन्न आहेत.त्यांच्या मते धर्म म्हणजे,’आत्मानुभूती व आत्मसाक्षात्कार!’ तसेच ‘स्वतःच्या क्षमतांची ओळख होणे म्हणजे धर्म!’

देशाचं नेतृत्व गाजवणारी स्त्री खरंच स्वतंत्र आहे? देवतेसारखं पूजन होणाऱ्या देशातच तिच्या अस्तित्वावर हल्ले होत आहेत. यात समानता कुठे दिसतेय? समानतेवर भाषण ठोकणं वेगळं आणि प्रत्यक्ष तिला स्वावलंबी बनवणं, तिच्या सुरक्षिततेची जबाबदारी घेणं वेगळं. समानतेवरील हे विचार मांडताना लेखकांनी आद्य शंकराचार्य आणि मंडन मिश्र यांचं एक उदाहरण दिलं आहे. स्वतःच्या पत्नीचं अभ्यासू व्यक्तिमत्व, तिची सारासार बुद्धी तटस्थ व न्यायप्रिय मानून तिचा निर्णय अंतिम मानणाऱ्या मंडन यांच्या पत्नी भारती यांच्या न्यायबुद्धीचा शंकराचार्यानी आदर केला. इतकेच नव्हे तर यापुढे शंकराचार्याच्या गादीवर जे कोणी बसतील ते त्यांच्या नावापुढं ‘भारती’ नाव लावतील असं सांगितलं.

स्त्रीशक्तीचा जागर करत असतानाच स्त्रीभ्रूण हत्याही इथं कशाप्रकारे चालू आहेत यावर त्यांनी प्रकाश टाकलाय. ज्या देशातील जनावरं, माणसं, बायका, बालकं, अर्भकंही सुरक्षित नाहीत त्या देशाचं भवितव्य काय असणार असा लेखकांना प्रश्न पडतो. यासोबतच भारतात नव्यानं निर्माण झालेल्या जसं ‘मी टू चळवळ’, ‘स्वीट डॉल’ अशा काही प्रकारावरही त्यांनी आपले स्पष्ट विचार मांडले आहेत. थोडक्यात नाण्याच्या दोन्ही बाजू त्यांनी प्रकाशात आणल्या आहेत. समानतेवर बोलताना ते विवाहबाह्य संबंध, समलिंगी संबंध अशा व्यक्तिस्वातंत्र्याच्या नावाखाली सुरू असलेल्या प्रकारावर सणसणीत प्रहार करतात. हे थांबवण्यासाठी कठोर पावलं उचलण्यात येत यावीत, नैतिक मूल्यांचा ऱ्हास थांबावा असे त्यांना वाटतेय.

समाजात कुठलीही घटना घडली की सारासार विचार न करता लगेचच प्रतिक्रिया देणाऱ्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवावी अभिव्यक्ती स्वातंत्र्य मिळालं तरी आपल्या बोलण्यानं द्वेष पसरणार नाही, यंत्रणेत अडथळा निर्माण होणार नाही, सामाजिक ऐक्य धोक्यात येणार नाही याची काळजी घ्यावी. सोशल मीडियावरून समजलेल्या गोष्टींची सत्यता आधी तपासून पहावी. ‘क्षमता असूनही काहीच न करणं हा मोठा सामाजिक गुन्हा आहे’ असं ते समजतात. ज्याला जे जमेल त्यानं ते करावं असं तरूणांना सांगतात. प्रत्येक व्यक्ती स्वतःचं दुःख गोंजारते मात्र त्याला इतरांना आधार देण्याची जाणीव व्हायला हवीय. आत्महत्या करणं म्हणजे संकटाला भिऊन दूर पळणं. दुःखाचा आवंढा गिळताना मनातील शल्य कुणाला तरी सांगायला हवं. मन रितं करायला हवं. दुःख कितीही मोठं असलं तरी त्याला कोलता आलं पाहिजे. यासाठी तरूणांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांचा आदर्श समोर ठेवावा असं घनश्याम पाटील या पुस्तकातून प्रभावीपणे सांगतात.

साहित्यिकांनी गटतट, विचारधारा यापुढं जाऊन व्यापक विचार करायला हवा. संकुचित भूमिका सोडून नवोदितांना प्रोत्साहन द्यावं. साहित्यात राजकारण करू नये असं त्यांना वाटतं. जीवन जगताना आपण अनेक स्वप्न ऊराशी बाळगतो पण सारीच पू्र्णत्वास जातातच असं नाही. काही गोष्टी राहूनच जातात आणि त्या तशाच राहू द्याव्यात असं सांगताना लेखकांनी स्वतःच्या जीवनातील राहून गेलेलं काही प्रसंगअगदी सहज आणि ओघवत्या शैलीत सांगितले आहेत. शाकाहाराबद्दलही लेखकाचे विचार स्पष्ट आहेत. एक तर मांसाहार पूर्ण वर्ज्य करा, शाकाहाराची चळवळ राबवा आणि कोणत्याही हत्येचा निषेध करा. गाय मारू नका असं सांगणारे माणसं मारण्यास धजावतात. अशा विचारसरणीचा लेखक निषेध करतात.

देशभक्तीची साधी सोपी व्याख्या त्यांना प्रत्येकाच्या मनात रूजावीशी वाटते. आपलं काम प्रामाणिकपणे करणे, इतरांच्या मतांचा आदर करणे, प्रत्येकाच्या मनात कारूण्याचे भाव प्रगट होणे म्हणजे देशभक्ती. आपण एवढं केलं तरी त्यात देशप्रेम दिसून येईल. देशभक्तीचा पोकळ आव आणणे त्यांना रूचत नाही. आपल्या देशातील तरूण दिशाहीन आहेत असं वारंवार ऐकण्यात येतं पण लेखकांनी ध्येयवादी तरूणांचं नवं चित्र आपल्या डोळ्यासमोर ठेवलंय. ते प्रकाशक या नात्यानं तरूणांना लिहायला प्रेरित करतात. यात स्वतःला झोकून द्यायला सांगतात. ‘पूर्णवेळ लेखन’ ही कल्पना समोर आणतात. प्रस्थापित लेखकांना नवलेखकांच्या लेखणीला बळ द्यायला सांगतात. तसेच साहित्यविषयक जीवननिष्ठा प्रबळ असणाऱ्यांना प्रकाशक म्हणून आश्वासक हात देतात. ते वाचनसंस्कृती वाढण्यासाठीही प्रयत्न करतात आणि ज्यांनी त्यांची पुस्तके वाचून अभिप्राय कळवला त्या वाचकांविषयी कृतज्ञतेचा भावही व्यक्त करतात.

महापुरुषांच्या नावाखाली देशात घाणेरडं राजकारण होऊ नये असं त्यांना वाटतं. दगटविटांचं स्मारक बांधण्यापेक्षा त्यांच्या विचारांचं स्मारक उभारावं असंही ते म्हणतात. याठिकाणी काळावर मात करणारे, सतत राष्ट्रहिताचा विचार करणारे, प्रामाणिक, कर्तव्यतत्पर आणि व्यापक दृष्टी असलेले लोकनेते अटलबिहारी वाजपेयी यांचं स्मरण करतात.

विचारांची लढाई विचारांनी लढावी पण महाराष्ट्रातील काही वेगळं घडत आहे. संभाजी उद्यानातील राम गणेश गडकरी यांचा पुतळा हटवणं, भांडारकर इन्स्टिट्यूटची तोडफोड असेल वा दादोजी कोंडदेवांचा पुतळा हटवणं हा तर महाराष्ट्रावरील सांस्कृतिक बलात्कार आहे असं परखड मत लेखक व्यक्त करतात. पुरोगामी कोणाला म्हणायला हवं याबद्दल त्यांचं मत असं, ज्याचं अन्याय-अत्याचाराविरूद्ध रक्त सळसळतं, उसळून येतं, जुन्या चुकीच्या प्रथा-परंपरा मोडून काढण्याची धमक ज्याच्यात आहे, जे जे विज्ञाननिष्ठ नाही आणि जे समाजासाठी मारक आहे त्याच्याविरूद्ध जो पेटून उठतो तो पुरोगामी. आपल्या महाराष्ट्रावर छत्रपती शिवरायांसारख्या युगपुरुषाची छाप आहे. महाराजांचं तत्वज्ञान, त्यांची शिकवण आचरणात आणणारे खरे पुरोगामी! ‘वेदांचा तो अर्थ आम्हासीच ठावा’ असं ठणकावून सांगणारे तुकाराम महाराज, भगवद्गीतेचं तत्त्वज्ञान मराठीत आणणारे संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पुरोगामी! पण सध्याचे नेते काही गटाला खूश ठेवण्यासाठी कोणतेही विधान करून आपण पुरोगामी असल्याचा आव आणतात. सध्याचा काळ पाहता दुष्ट लोक आणि त्यांचा दुष्टपणा संपणार नाही हे सत्य स्वीकारून त्यांचा दुष्टपणा कमी व्हावा अशी प्रार्थनाही लेखक करतात.

जातीचा अंत झाला, जातीनिर्मूलन होतंय असं म्हटलं जातं पण उलट सध्या जातीय अस्मिता अधिक टोकदार झाल्यात हे खरं चित्र आहे. जात कोणतीही असो त्यात सगळेच चांगले किंवा सगळेच वाईट असे असूच शकत नाही याचं सर्वांनी भान ठेवायला हवं. सर्वांच्या मनातील जातीय जळमटं बाजूला सारायला हवीत असं त्यांना वाटतं.

दरवळ म्हणजे काय? असं जर थोडक्यात सांगायचं झालं तर राष्ट्र भक्ती, स्त्री-पुरूष समानता, राष्ट्रीय एकात्मता, सर्वधर्म समभाव, श्रमप्रतिष्ठा, नीटनेटकेपणा, वक्तशीरपणा, वैज्ञानिक दृष्टीकोन, सौजन्यशीलता ही सारी मूल्ये एकत्र केल्यावर निर्माण होणारी सुंदर कलाकृती म्हणजेच दरवळ!

दरवळ म्हणजे आईची अंगाई, बापाचा आश्वस्त हात, तुकारामाची गाथा, ज्ञानेशाची ज्ञानेश्वरी, समर्थांचे श्लोक, श्रीकृष्णाची गीता, शिवरायांची स्वराज्यप्रेरणा, संभाजीराजेंची शूरता, विवेकानंदाची-सावरकरांची राष्ट्रभक्ती!

नवीन प्रेरणा घेऊन मार्गस्थ झालेल्या प्रत्येक तरूणाने घनश्याम पाटील यांचे ‘दरवळ’ हे पुस्तक नक्कीच वाचावे.

पुस्तकाचे नाव – दरवळ
लेखक – घनश्याम पाटील
प्रकाशक – चपराक
पृष्ठसंख्या –
१२८
मूल्य – २००

मनिषा कुलकर्णी-आष्टीकर
परभणी
९५११८७५३५३

Share this post on:

Author: चपराक

पुणे शहरातून ‘साहित्य चपराक’ हे मासिक आणि ‘चपराक प्रकाशन’ ही उत्तमोत्तम पुस्तके प्रकाशित करणारी ग्रंथ प्रकाशन संस्था चालविण्यात येते. ‘साहित्य चपराक’ मासिकाचा अंक दरमहा 10 तारखेला प्रकाशित होतो. आपले साहित्य पाठविण्यासाठी, ‘चपराक’मध्ये जाहिराती देण्यासाठी आणि नवनवीन पुस्तकांच्या माहितीसाठी संपर्क - घनश्याम पाटील, संपादक 'चपराक'.
व्हाट्सऍप क्रमांक - ८७६७९४१८५०
Email -

View all posts by चपराक >

तुमची प्रतिक्रिया जरूर कळवा

error: Content is protected !!