आपण सगळे जाणतो की महाभारतात युधिष्ठिराने द्यूत नावाचा खेळ (जुगार) खेळताना द्रौपदीला पणाला लावलं होतं. दुर्योधनाने शकुनीच्या मदतीने द्रौपदी ला जिंकलं होतं. द्रौपदी दुर्योधनाची दासी झाली होती. युधिष्ठिर पहिल्यांदा स्वतः जवळचं धन द्यूतात पणाला लावून हरला. नंतर स्वतःचं राज्य त्यानं द्यूतात पणाला लावलं, ते ही तो हरला. त्या नंतर त्यानं स्वतःला पणाला लावलं आणि तो स्वतः दुर्योधनाचा दास झाला. त्यानंतर त्यानं स्वतःच्या भावांना पणाला लावलं. त्यांनाही तो द्यूतात हरला. त्याचे भाऊ दुर्योधनाचे दास झाले आणि सरतेशेवटी तो हरलेलं सगळं परत मिळवण्यासाठी द्रौपदीला पणाला लावून द्यूतात हरला आणि द्रौपदीही दुर्योधनाची दासी झाली! दुर्योधनाच्या आज्ञेनुसार दु:शासनाने भर सभेत द्रौपदीला अपमानित करून तिचे वस्त्रहरण करण्याचा प्रयत्न केला पण प्रभू श्रीकृष्णाने द्रौपदीला वस्त्रे नेसवल्यामुळे द्रौपदीची अब्रू आणि विटंबनाही वाचली!
द्यूत हा खेळ होता आणि दुर्योधनाने युधिष्ठिराला योजनाबद्ध आखणी करून द्यूत खेळण्यासाठी आमंत्रित केलं होतं. युधिष्ठिर सर्व अडथळे पार करून सार्वभौम राजा झाल्यानंतर त्याचं राज्य मिळवण्याच्या दुष्ट हेतूने दुर्योधनानं आपल्या पित्याकरवी म्हणजेच हस्तिनापूरचे महाराज धृतराष्ट्र यांच्या करवी इंद्रप्रस्थचे महाराज युधिष्ठिर यांना आमंत्रित केलं होतं. पुत्र मोहापायी अगोदरच अंध असलेल्या धृतराष्ट्राने डोळ्यावर पट्टी बांधून द्युताच्या खेळाला मान्यता दिली होती. धर्मराजासाठी हे द्यूत खेळण्याचं आमंत्रण नाकारणं म्हणजे नामुष्की होती! म्हणून धर्मराजाने ते आमंत्रण स्वीकारलं होतं.
“श्रीकृष्णाने युधिष्ठिराला द्यूत खेळण्यापासून का नाही थांबवलं?”
असा प्रश्न उद्धवाने महाभारताचे युद्ध संपल्यानंतर श्रीकृष्णाला विचारला होता. उद्ववाचं खरं नाव ‘बृहदबल’, तो बृहस्पतींचा शिष्य होता. बृहस्पतींकडून त्याला ब्रम्हज्ञान मिळालं होतं. श्रीकृष्ण श्रीविष्णूंचा अवतार असल्याचं उद्धवला बृहस्पतींकडून समजलं होतं. श्रीकृष्णांनी उद्धवला योग मार्गाचा उपदेश केला होता. श्रीकृष्णांचा उपदेश ‘उद्धव गीता’ या नावाने प्रसिद्ध आहे. उद्धवाप्रमाणे वरील प्रश्न अनेकांच्या मनातही असेल. अशाच काही प्रश्नांचे व श्रीकृष्णाने दिलेल्या उत्तरांचे वर्णन ‘उद्धव गीते’त केलेले आहे. उद्धवाने श्रीकृष्णाला वरदान मागण्याऐवजी काही प्रश्नांची उत्तरे मागितली.
श्रीकृष्णाने दिलेलं उत्तर थोडक्यात असं,
“विवेकी माणूस जिंकू शकतो. दुर्योधनाला फासे टाकण्याची कला अवगत नव्हती म्हणून त्याने विवेक राखून शकुनीमामाचा द्यूत क्रीडेसाठी उपयोग केला. हाच विवेक आहे. धर्मराजा देखील विवेक वापरून फासे टाकण्यासाठी माझी मदत घेऊ शकला असता. ती त्याने घेतली नाही उलट ‘बोलावल्याशिवाय आत येऊ नका’ असे त्याने मला बजावून ठेवले होते. पांडव श्रीकृष्णापासून चोरून द्यूत खेळू इच्छित होते! त्यांना श्रीकृष्णासमोर जुगार खेळायचा नव्हता किंवा जुगार खेळलेला श्रीकृष्णाला कळू नये अशी पांडवांची इच्छा होती.
द्रौपदी ला दु:शासनाने केस ओढून फरपटत द्यूत सभेत आणले. त्यावेळी तिला माझी आठवण झाली नाही. जमेल तेवढा प्रतिकार ती करत राहिली. जेव्हा दु:शासनाने द्रौपदीचे वस्त्रहरण सुरू केले. दस्तुरखुद्द पांडवही तिच्या मदतीला जाऊ शकले नाहीत. भीष्माचार्य, द्रोणाचार्य, विदुर ही न्यायप्रिय ज्येष्ठ मंडळी खाली मान घालून बसली तेव्हा द्रौपदीने माझा धावा केला, मदत मागितली. त्यावेळी मला द्रौपदीच्या ‘लज्जा रक्षणासाठी’ मदतीला धावून जाणे भाग पडले!
उद्धव म्हणाला, “प्रभू याचा अर्थ तुम्ही तेव्हाच याल जेव्हा तुम्हाला बोलावलं जाईल, भक्ताची मदत करण्यासाठी तुम्ही स्वतः होऊन येणार नाही!”
प्रभू म्हणाले, “प्रत्येकाचे जीवन त्याच्या ‘कर्मफलावर’ अवलंबून असते. मी यात हस्तक्षेप करत नाही. मी केवळ साक्षी आहे. हाच सृष्टीचा धर्म आहे.”
याचा अर्थ उद्धव म्हणाला, “आम्ही एकानंतर एक पाप करत राहू आणि तुम्ही फक्त ते पाहत राहाल!”
प्रभू म्हणतात, “हे उद्धवा, मी तुझ्याजवळ उभा आहे हे समजून उमजून तू पाप करू धजशील असे मला वाटत नाही. धर्मराजाला देखील हे समजायला हवं होतं की, प्रत्येकाच्या कोणत्याही कृतीत मी साक्षी रूपाने तिथे हजर असतो. मला बोलावले नाही तरी मी साक्षीभावाने तेथे आहे हे समजून तो द्यूत खेळू शकला असता का? या वेळी हे समजायला हवं की, ‘झाडाचे पानदेखील परमेश्वराच्या इच्छेशिवाय हलत नाही!”
दारू, जुगार, व्यभिचार, धूम्रपान, गुटखा, चघळायचा तंबाखू यांची तल्लफ आयुष्य उध्वस्त करते! जुगाराबाबत आपण महाभारतातील वरील उदाहरण पाहिलं. द्यूतात हरलेल्या युधिष्ठिर राजाने आपली धनदौलत, संपत्ती, राज्य घालवले, तो स्वतः, त्याचे भाऊ व पत्नी यांनाही पणाला लावून तो हरला. राजा युधिष्ठिर स्वतः व त्याचे भाऊ दुर्योधनाचे दास झाले, पत्नी द्रौपदी दुर्योधनाची दासी झाली, पत्नी द्रौपदी चा भर सभेत अपमान झाला, तिचं वस्त्रहरण करण्याचा प्रयत्न झाला, पांडवांना पत्नी द्रौपदी सह बारा वर्षे वनवास व एक वर्षाचा अज्ञातवास भोगावा लागला. द्यूतातील जुगाराची खूप मोठी किंमत पांडवांना मोजावी लागली आणि युद्धामुळे सर्वनाश झाला तो वेगळा! महाभारताच्या युद्धाची बीजे कुठेतरी या द्यूतातच रुजली होती!
सहज गम्मत म्हणून सुरू केलेला जुगार, कमी वेळात कष्टाविना अनेक पटीने पैसे मिळवून देणारा जुगार! जुगारात माणूस फार कमी वेळा जिंकतो. बहुतेक वेळा तर हरतोच! हरलेले पैसे परत मिळवण्यासाठी जुगार खेळत राहतो आणि आणखीन बरबाद होतो. घरदार विकतो, कर्ज काढून ते पैसेही जुगारात हरतो. आणि घेतलेल्या कर्जासाठी तारण ठेवलेला जमीन-जुमलाही विकतो. आयुष्यातून उठतो. संसाराची वाताहत होते. याचं सर्वात मोठं उदाहरण महाभारतातील द्युताशिवाय दुसरे असूच शकत नाही!
इतर व्यसनांचीही तीच गत होते. बारा ते सतरा वर्षांच्या वयोगटातील मुले उत्सुकता म्हणून, गम्मत म्हणून, कोणी आपल्याला ‘बावळट’ म्हणूनये म्हणून धैर्य दाखवण्यासाठी धूम्रपान, मद्यपान वगैरे गोष्टी लपून छपून करतात. पालकांनी मुलांच्या हातात मोबाईल किंवा कम्प्युटर देताना वयस्कांसाठी असलेल्या ‘विशिष्ठ’ वेबसाईट लॉक करून द्याव्यात, अन्यथा नको त्या वयात नको त्या गोष्टी त्यांच्या पाहण्यात येतात. ज्यामुळे अभ्यासाकडे दुर्लक्ष होऊन मुलं वाईट नादाला लागू शकतात!
धूम्रपान करणाऱ्या चारमधील एका व्यक्तीला दमा किंवा इतर फुफ्फुसांसंबंधी आजार होण्याची शक्यता असते. फुफ्फुसांचा कॅन्सरही होऊ शकतो. हृदयरोगाची शक्यता वाढते. सिगारेट व इतर तंबाखूजन्य पदार्थांचे व्यसन सुटण्यासाठी ‘स्वास्थ्य आणि परिवार कल्याण मंत्रालय’ यांच्या ‘एम.सिसेशन’ कार्यक्रमात सामील होता येते. सरकारने एक वेबसाईट तयार केली आहे. त्यावर रजिस्ट्रेशन करून मदत मिळवता येते. http//www.nhp.gov.in/quit-tobacco ही ती वेबसाईट. व्यसन सोडण्यासाठी इच्छाशक्ती मात्र हवी! जनजागृती करण्यासाठी सिगारेटच्या पाकिटावर ‘सिगारेट ओढणे आरोग्यासाठी अपायकारक आहे’ किंवा ‘तंबाखूने कॅन्सर होतो’ आशा प्रकारच्या सूचनाही ठळक अक्षरात लिहिणे उत्पादकांना बंधनकारक करण्यात आले आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या उपलब्ध आकडेवारीनुसार जगात दरवर्षी सत्तर लाख लोक तंबाखूच्या सेवनाने मरतात. चेन स्मोकर्सचे आयुष्य बारा ते पंधरा वर्षांनी कमी होते!
मद्यपानामुळे फिट्स येतात, वारंवार पडल्याने डोक्याला इजा होते, काहीवेळा रक्ताची उलटी होते, वारंवार कावीळ होते, लिव्हर खराब होते, नपुसकत्व येऊ शकते असे शारीरिक परिणाम होतात. मानसिक परिणामामध्ये विस्मृती होणं, मानसिक असंतुलन, स्वतःला इजा करून घेणे, भीतीदायक भास होणे इत्यादी. मानसिक अस्वस्थतेमुळे वाहन चालवताना अपघाताची शक्यता, कौटुंबिक हिंसाचार, शेजाऱ्यांशी भांडण-तंटा, गुन्हेगारीत वाढ इत्यादी दुष्परिणाम होतात. उपलब्ध माहितीनुसार भारतात एकवीस टक्के पुरुष कमी-अधिक प्रमाणात मद्यपान करतात. 20 टक्के अपघात मद्यपानामुळे, मद्याच्या प्रभावामुळे होतात. महात्मा गांधींनी दारूबंदी अनिवार्य केली. त्यामुळे स्वातंत्र्यानंतर गुजरातमध्ये दारूबंदी झाली. महाराष्ट्रात वर्धा व गडचिरोली जिल्ह्यात दारूबंदी आहे. धार्मिक चळवळी व स्त्री चळवळींनी दारूबंदी आंदोलनात मोठी भूमिका बजावली आहे. महाराष्ट्र व गुजरात मधील ‘स्वाध्याय’ चळवळीने लाखो लोकांची दारू सोडवली आहे. वारकरी चळवळीने अनेकांना ‘माळ घालून’ दारू पासून परावृत्त केले आहे. शेतकरी महिला आघाडीने या चळवळीला उचलून धरले आहे. दारूचे अबकारी उत्पन्न चालू राहण्यासाठी सरकारे दारुबंदीला अनुत्सुक असतात! आपल्या देशात दारू पिण्यासाठी ‘परवाना’ घ्यावा लागतो असा कायदा आहे. पण या कायद्याचे पालन अभावानेच होते. दारू पिऊन गोंधळ घालणं, दारू पिऊन गाडी चालवणं या गुन्ह्यांना शिक्षा आहेत. दारुड्याच्या रक्त तपासणीतून मद्यार्क कळतो. तसेच आता श्वासावरून दारूचं प्रमाण मोजण्याचे उपकरण उपलब्ध आहे.
व्यभिचार म्हणजेच अनैतिक शारीरिक संबंध. चोरी, भय, लज्जा, पापकर्म यांचा समावेश व्यभिचारात होतो. सहसा ‘पती, पत्नी और वो’ असा त्रिकोण व्यभिचारात असतो. पती अथवा पत्नी एकमेकांची फसवणूक करतात. स्त्री व पुरुष दोघांसाठीही व्यभिचार घातक आहे. अनैतिक शारीरिक संबंधांमुळे स्त्री व पुरुष दोघांनाही कालांतराने नरकयातना भोगायला लागतात. एड्ससारख्या जीवघेण्या आजारांचा प्रसार होतो. जीवन धोक्यात येतं. दोन मिनिटांची मजा आयुष्यभरासाठी सजा होते. बाधित व्यक्ती खंगून मरते! हे रोग स्पर्षजन्य असल्याने यांच्या शारीरिक संपर्कात येणारी अन्य व्यक्तीही बाधित होते. या व्यक्तींच्या समागमातून जन्माला येणारी मुलं ही बाधित असू शकतात. इस्लामिक देशात व्यभिचार हा मोठा अपराध आहे आणि त्यासाठी कडक शिक्षा आहेत. सौदी अरेबियात व्यभिचारासाठी मृत्युदंडाची शिक्षा आहे. अमेरिकेतील वीस राज्यात व्यभिचार हा अपराध मानला गेला आहे. भारतात व्यभिचारासाठी पुरुषाला दोषी धरलं जातं.
आम्ही कॉलेजला असताना आमच्या वर्गात दोन मुलं होती. त्यांनी कॉमर्सला प्रवेश तर घेतला पण अकौंटन्सी या विषयाची त्यांना धास्ती वाटत होती. अकौंटन्सी हा कॉमर्सच्या विद्यार्थ्यांसाठी नवीन विषय आणि अतिशय महत्वाचा. नावडता विषय म्हणून ते कॉलेज मध्ये क्लासला हजर नसत. मग शिकवणीची गरज निर्माण झाली. विषयाची आवडच नव्हती मग शिकवणीची गोडी तरी कशी लागणार? विषयाचं टेन्शन म्हणून ते दोघे शिकवणी झाल्यावर एका पानाच्या टपरीवर जाऊन सिगारेट ओढत. विषयाचं आकलन तर झालं नाही पण सिगारेट ची सवय लागली व्यसन जडलं! त्या दोन मुलांपैकी एकाच्या वडिलांना आपला मुलगा सीए व्हावा असं वाटत होतं. आणि त्यासाठीच त्यांनी त्याला कॉमर्सच्या शाखेत घातलं होतं. हा मुलगा कसातरी बीकॉम झाला. आणि सीए च्या तयारी साठी एका सीएकडे काम करू लागला ते ही वडिलांच्या ओळखीने! सिगारेट चे अग्निहोत्र अखंड सुरू होतेच. सीए ची इंटरमिजीएट सुद्धा तो पास होऊ शकला नाही. शेवटी तिथेच ऑडिट क्लार्क म्हणून नोकरी करत राहिला आणि एक दिवस सिगारेट च्या दुष्परिणामाने खराब झालेल्या फुफुसाच्या गंभीर आजाराने इहलोक सोडून गेला! इथे आणखीन एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी की त्या मुलाच्या वडिलांनी कॉमर्सचे शिक्षण त्याच्यावर लादले होते. त्यांनी जर मुलाशी विचारविनिमय करून मुलाशी चर्चा करून मुलाच्या आवडीचे शिक्षण त्याला दिले असते तर कदाचित परिस्थिती बदलली असती! पण पालकही आपल्या आवडी आपले छंद मुलांवर लादताना दिसतात! ‘ माझ्या आयुष्यात मला जे करायला मिळाले नाही , शिकायला मिळाले नाही ते माझ्या मुलाला मिळावे ‘ अशी काहीशी भावना पालकांची दिसून येते! मग त्यात मुलाची आवड असो की नसो! मुलाची फरफट मात्र होते!
सुप्रसिद्ध साहित्यिक पु.ल. देशपांडे यांच्या आर्थिक मदतीतून एकोणीसशे शहाऐंशी साली पुण्यात डॉ. अनिता अवचट व डॉ. अनिल अवचट यांनी ‘मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्रा’ची स्थापना केली. व्यसनी लोकांना व्यसनापासून परावृत्त करणं व त्यांचं पुनर्वसन करणं या उद्देशाने ही संस्था स्थापन करण्यात आली आहे. या संस्थेच्या उदघाटनाच्या भाषणात पुलंनी ‘या संस्थेची भरभराट न होता ही संस्था लवकर बंद व्हावी’ अशी इच्छा व्यक्त केली होती पण तसे घडले नाही असे खेदाने म्हणावे लागेल! व्यसनी लोकांची संख्या वाढतेच आहे. तरीही ‘मुक्तांगण’ सारख्या अनेक समाजसेवी संस्था व्यसनी माणसामध्ये सुधारणा घडवून आणून पुन्हा त्या व्यक्तीला मूळ जीवन प्रवाहात आणून सोडतात. या चळवळीतून अनेक कार्यकर्ते ही तयार झाले आहेत. पुण्यात येरवडा येथे ‘आनंदवन’, ‘मुक्तांगण’, ‘तुकरे ट्रस्ट’, ‘लाईफ लाईन’, ‘मनविकास’,कोल्हापूर येथील ‘कागल एज्युकेशन सोसायटी’, ‘नवचैतन्य’ गडहिंग्लज येथील ‘जीवनज्योत’, नागपूर येथील ‘जागृती’, ‘जीवनज्योति’, ‘नवजीवन’, ‘प्रेरणा’, ‘मैत्री’, ‘सत्यनारायण नवल’, ‘सदभावना’, लातूर येथील ‘जीवन रेखा’ अशी काही महाराष्ट्रातील इतर व्यसनमुक्ती सेवाभावी संस्थांची नावे सांगता येतील. यांच्या कार्याला सलाम!
‘श्रीगजानन विजय’ या ग्रंथात ह. भ.प. संतकवी श्री दासगणू महाराजांनी शेगाव येथील संत श्री गजानन महाराज यांचे चरित्र लिहिले आहे. या ग्रंथाच्या नवव्या अध्यायात बाळापूरच्या दोन भक्तांची कथा आहे. गजानन महाराज कधीच कुणाकडून कशाची अपेक्षा करत नसत पण सामान्य माणसे आपल्या मनातील हेतू पूर्ण करण्यासाठी त्यांना साकडे घालत, नवस बोलत! असेच एकदा बाळापूरचे दोन गृहस्थ मनात काही इच्छा धरून गजानन महाराजांच्या दर्शनासाठी आले. पुढच्या वेळी दर्शनाला येताना आपण सुका गांजा घेऊन येऊ असे रस्त्यात ते एकमेकांशी बोलले. त्या दोन भक्तांना गांजाची आवड असल्याने गांजा नेला तर गजानन महाराजांची कृपा होईल असे त्यांना वाटत होते.
“जी वस्तू ज्या आवडे खरी तिचाच तो नवस करी
आणि मानी सर्वतोपरी हीच वस्तू उत्तम।।” —श्री गजानन विजय ग्रंथ.पुढील वेळी दर्शनाला येताना आपण गांजा घेऊन येऊ असे आपसात बोलून ते दर्शन घेऊन गेले.
पुढच्या वेळी दर्शनासाठी येताना गांजा आणायला विसरले. महाराजांच्या पायावर डोके ठेवताना त्यांना नवसाची आठवण झाली. तेव्हा पुढच्या वेळी दर्शनाला येताना दुप्पट गांजा आणू असे मनाशीच बोलून ते दर्शन घेऊन गेले. त्यापुढील वेळी पुन्हा तेच घडले दर्शनाला येताना गांजा आणायला विसरले. हात जोडून बसले पण गांजाची आठवणच राहिली नाही. तेव्हा गजानन महाराज त्यांच्या शिष्याला भास्कराला म्हणाले,“धोतराला गाठ मारून ठेवतात पण जिन्नस आणायला विसरतात. ब्राह्मण असून खोटे बोलतात, जे तत्वाच्या विरुद्ध आहे. धर्माप्रमाणे न वागणारे, आचार-विचारांशी प्रतारणा करणारे ब्राह्मण आदर्श कसे म्हणावेत! वारंवार नवस बोलून तो पूर्ण न करणाऱ्यांचे हेतू कसे पूर्ण होतील? ”
महाराज पुढे म्हणाले,
“आपल्या बोलण्यात मेळ असावा, मन निर्मळ असावे तरच तो परमेश्वर कृपा करतो!”
हे शब्द त्या दोन भक्तांच्या मनाला खूप लागले, त्यांना या गोष्टीचे आश्चर्य वाटत होते की आपण मनाशी बोललेल्या गोष्टी महाराजांनी कशा ओळखल्या? ‘आपण आत्ता जाऊन गांजा गावातून घेऊन येऊ’ असेही ते मनाशी म्हणाले. हे त्यांचे मनातले बोलणेही महाराजांनी ओळखले आणि त्यांना म्हणाले,
“आता शिळ्या कढीला उत आणू नका. मी गांजासाठी हापापलेलो नाही पण तुम्ही मात्र आपल्या बोलण्यात मेळ ठेवा. आणखीन एक गोष्ट लक्षात ठेवा ती म्हणजे लबाडाचे हेतू पूर्ण होत नाहीत! परमार्थात माणसाने खोटे बोलू नये!”
जाता जाता एक गोष्ट मला आवर्जून सांगावीशी वाटते की श्री गजानन महाराजाना चिलीम ओढण्याची आवड नसतानाही एका भक्ताच्या नवसाखातर ती गोष्ट स्वीकारावी लागली. ही कथा श्रीगजानन विजय ग्रंथाच्या तिसऱ्या अध्यायात आहे. काशीचा एक गोसावी गजानन महाराजांच्या दर्शनाला आला होता. महाराजांच्या दर्शनासाठी नेहेमीप्रमाणे गर्दी होती. त्या गर्दीत तो गोसावी दर्शनाची इच्छा मनाशी बाळगून बसला होता. महाराजांचा लौकिक त्या गोसाव्याने काशीत ऐकला होता. आणि नवस म्हणून ‘भांग’ स्वामींना अर्पण करण्यासाठी तो आला होता. गांजाचे नाव काढले तर इथले लोक मला लाथा मारून हाकलून देतील असे त्याला वाटते. इथे तर कुणालाच गांजाची आवड दिसत नाही. माणसाला जे आवडते त्याचाच तो नवस बोलतो. असा तो काशीचा गोसावी महाराजांचे दर्शन घेऊन आपला नवस फेडण्यासाठी आतुर झाला होता. गोसाव्याचे मनोगत समर्थांनी मनोमनी जाणले आणि महाराजांनी गोसाव्याला बोलावण्याची आज्ञा केली. महाराज अंतर्ज्ञानी होते . ते अंतर्ज्ञानी असल्याची अनेक उदाहरणे या ग्रंथात आहेत. महाराजांनी आपल्याला बोलावल्याचे ऐकून गोसावी अतिशय आनंदी झाला. महाराजांनी आपल्या मनीची गोष्ट जाणली याचा गोसाव्याला विशेष आनंद झाला. ज्ञानेश्वरितील सहाव्या अध्यायात सांगितल्याप्रमाणे ‘योग्यांना स्वर्गलोकातील गोष्टीही समजतात’ याचे जणू प्रत्यंतरच गोसाव्याला आले! माझा नवसही न सांगता ते जाणतील याची मनोमनी गोसाव्याला खात्रीच झाली! गोसावी समोर आल्यानंतर महाराज रागाने ओरडले, “गेले तीन महिने जी बुटी तू झोळीत सांभाळली आहेस ती बाहेर काढ, एकदाचे त्याचे पारणे कर, नवस केलास तेव्हा तुला लाज वाटली नाही आणि आता का मागेपुढे पाहतो आहेस.”
हे ऐकून गोसावी स्वामींपुढे गडबडा लोळू लागला. गोसाव्याने दोन्ही हात जोडले आणि म्हणाला, “महाराज मी बुटी काढतो, माझा नवस फेडतो पण आपण मला एक वचन द्या” गोसावी पुढे म्हणाला, “माझ्या बुटीची आपल्याला सदैव आठवण राहावी एवढी माझी इच्छा पूर्ण करा. तुम्हाला बुटीची गरज नाही हे मला माहिती आहे पण माझी, या बालकाची आठवण म्हणून आपण बुटीचा स्वीकार करावा. यासाठी गोसाव्याने अंजनीच्या गोष्टीचा संदर्भ दिला. अंजनीच्या विनंतीला मान देऊन शंकराने अंजनीच्या पोटी वानर म्हणून जन्म घेतला. त्याप्रमाणे माझ्यासाठी आपण शंकर होऊन बुटीचा स्वीकार करा आणि नित्य बुटीची आठवण ठेवा. शंकराच्या रुपात आपल्यालाही बुटी भूषणावहच होईल.”
‘माय पुरवी बालक लळे, वेडे वाकुडे असले जरी’ अशी महाराजांची अवस्था झाली! आणि नाईलाजाने महाराजांनी बुटीचा स्वीकार केला! भक्त हट्ट, बाल हट्ट समजून महाराजांनी बुटीचा स्वीकार केला आणि तेव्हापासून मठात गांजाची प्रथा पडली! महाराजांच्या फोटोतही आपण चिलीम पाहतो. अर्थात यामुळे समर्थ कधीही व्यसनाधीन झाले नाहीत. किंवा चिलीमीची त्यांना कधीच आसक्ती नव्हती. कमळाच्या पानावर ज्याप्रमाणे दवबिंदू राहत नाही, घरंगळुन जातो त्याप्रमाणेच महाराज नशेपासून अलिप्त होते!
आपली काहीही चूक नसताना, आपल्याला विश्वासात न घेता आपल्याला द्यूतात हरणाऱ्या धर्मराजाबद्दल आणि पांडवांच्या कुलवधूच्या अब्रूची लक्तरे वेशीवर टांगली जात असताना हतबल असणाऱ्या पांडवांबद्दल, भीष्म, द्रोण, विदुर आदी न्यायप्रिय पराक्रमी ज्येष्ठांबद्दल, पुत्राच्या आसक्तीमुळे मौन बाळगणाऱ्या धृतराष्ट्राबद्दल चीड व्यक्त करणारी द्रौपदीची दुःखद मानसिकता आणि नैराश्य व्यक्त करणारी हिंदी कवी पुष्यमित्र उपाध्याय यांची ही कविता समर्पक आहे.
सुनो द्रौपदी शस्त्र उठालो, अब गोविंद न आएंगे।
छोडो मेहेंदी खडक संभालो
खुदही अपना चिर बचालो
द्यूत बिछाये बैठे शकुनी,
मस्तक सब बिक जाएंगे
सुनो द्रौपदी शस्त्र उठालो, अब गोविंद न आएंगे ।कब तक आस लगाओगी तुम
बिके हुए अखबारोसे
कैसी रक्षा मांग रही हो
दुशासन दरबारोसे ।स्वयं जो लज्जाहीन पडे है
वे क्या लाज बचाएंगे
सुनो द्रौपदी शस्त्र उठालो, अब गोविंद न आएंगे ।कल तक केवल अंधा राजा
अब गुंगा बहरा भी है
होठ सी दिये है जनताके,
कानोपर पहरा भी है ।तुम ही कहो ये अश्रू तुम्हारे
किसको क्या समझाएंगे?
सुनो द्रौपदी शस्त्र उठालो, अब गोविंद न आएंगे ।——————–^——————–^——————–^-
जयंत कुलकर्णी
दूरभाष : 8378038232
^आमचे इतरही लेख वाचण्यासाठी, दर्जेदार पुस्तके विकत घेण्यासाठी www.chaprak.com ला भेट द्या. ‘चपराक प्रकाशन’चे फेसबुक पेजही जरूर लाईक करा. उत्तमोत्तम व्हिडीओ पाहण्यासाठी ‘चपराक’च्या युट्यूबला भेट द्या आणि सबस्क्राइबही नक्की करा.
Copyright @ www.chaprak.com / All Rights Reserved.
छान