मैत्र मैत्री आणि मैत्रेय अर्थात दोस्ताना

मैत्र मैत्री आणि मैत्रेय अर्थात दोस्ताना

आम्ही तीन मित्र जवळजवळ तीस वर्षांनी पुण्यात भेटलो. तिघांचे शिक्षण सोलापूरला शाळा व कॉलेज असं एकत्र झालं. शाळेमध्ये आणखी इतरही काही मित्र होते. एक दीपक नावाचा मित्र शाळेत बरोबर होता. आम्हा दोघांच्याही फॅमिली मोठया होत्या. हा मित्र लक्षात राहण्याचे कारण म्हणजे तो मला सिनेमाच्या गोष्टी सांगत असे. गोष्टी इतक्या रंगवून सांगत असे की ‘सिनेमा’ पाहिल्यासारखे वाटत असे!

नववी, दहावी आणि अकरावी अशी तीन वर्षे मी सोलापूर येथील ‘हरिभाई देवकरण प्रशाले’ त होतो. तेव्हा अनेक मुलांच्या बरोबर हा दीपकही माझ्या वर्गात होता. शाळेव्यतिरिक्त इतर वेळीही आम्ही बरोबरच असायचो. कधी कधी एकमेकांच्या घरी दुपारचं खाणं किंवा चहा व्हायचा. हल्ली ‘चहा-बिस्कीट’ खातात तसे आम्ही त्यावेळी ‘चहा-पोळी’ खात होतो. बेकरीचे पदार्थ वर्ज्य असत!

पण सगळयाच मुलांशी आपली मैत्री होतेच असं नाही. मैत्री का होते? कुणाशी होते? आणि केव्हा होते? याचं काही गणित मांडता येत नाही. ठरवून मैत्री तर अजिबात होत नाही असं माझं मत आहे. शाळेत कांही मुलं हुशार असतात, काही मध्यम असतात काही अगदीच ‘ढ’ असतात. ‘ढ’ मुलांचं एक बरं असायचं ते बिचारे वर्गातील शेवटचे बाक धरून असत. त्यांच्या काही वेगळ्या ऍक्टिव्हिटी चालू असत. वर्गात येणाऱ्या शिक्षकांशी किंवा अभ्यास, गृहपाठ याच्याशी त्यांचा काही संबंध नसे. त्यांनी काय करावे यावरही कोणाचे नियंत्रण नसे. इतर मुलांनी काही चूक केली, वर्गात लक्ष दिलं नाही किंवा गृहपाठ केला नाही तरच या ‘ढ’ मुलांचा उद्धार होत असे!

“आरे बाबांनो ‘त्यांच्या’ नादाला लागू नका, वाटोळे करून घ्याल स्वतःचे!” असे ‘ढ’ मुलांकडे बघून शिक्षक आम्हाला सांगत असत.

आम्ही आपले मध्यम श्रेणीतले. पन्नास-पंचावन्न टक्के मार्क्स ही आमची रेंज होती! त्यामुळे साठ टक्के आणि त्यापुढे मार्क्स मिळवणाऱ्या मुलांचं नेहेमीच कौतुक वाटायचं. त्यावेळचे साठ टक्के मार्क आजच्या नव्वद पंचांणव टक्क्यांच्या बरोबरीचे होते! पण ही मुलं आम्हाला कधी जवळ करायची नाहीत. ती नेहेमी आपल्याच तोऱ्यात असल्यासारखी वाटायची. कदाचित ती तशी नसतीलही. पण आम्हाला तसा ‘कॉम्प्लेक्स’ होता.

वडिलांच्या सरकारी नोकरीमुळे सतत बदल्या होत. गाव बदललं की शाळा आणि मित्र सगळंच बदलत असे! काहीमुलं पहिली पासून अकरावी पर्यंत एकाच शाळेत शिकत असत. त्यात त्यांचा काही ‘दोष’ होता किंवा त्यांचं ते ‘कर्तृत्व’ होतं असं काहीच नव्हतं! पण ती मुलं एकत्र होती. मग आम्हा बाहेरून येणाऱ्या मुलांना त्यांनी त्यांच्या ‘कळपात’ सामावून घेतलेच पाहिजे असंही काही बंधन त्यांच्यावर नव्हतं. किंवा ते मुद्दाम आम्हाला टाळत होते असंही कांही नव्हतं. शाळकरी मुलांच्या वयाचा विचार करता आम्हाला ‘टाळण्याचा’ किंवा ‘सोबत’ घेऊन जाण्याचा ‘विचार’ त्यांच्या मनात असेल असंही काही नव्हतं! पण हे आज शिक्षण संपल्यावर चाळीस-पंचेचाळीस वर्षांनी समजतंय!

कदाचित आम्हीच स्वतःला आशा काही मर्यादा घालून घेतल्या असाव्यात की आम्ही मधल्या काळात किंवा मधल्या इयत्तेत शाळेत येणाऱ्या मुलांनी एकत्र यावे! पण नकळत काहीवेळा तसं व्हायचं खरं! बाल मानसशास्त्राचा माझा काही अभ्यास नाही. पण जे काही घडलं किंवा आम्ही अनुभवलं ते असं!

थोडक्यात काय तर मैत्री कोणाशी, केव्हा, कुठे, कधी व्हावी याचं काही गणित किंवा ठोकताळा नाही हेच खरं!

पंढरपूरला माझं सातवी आणि आठवीचं शिक्षण झालं. इथे रवी आणि सतीश असे माझे दोन मित्र होते. पंढरपूर सुटल्यानंतर या दोघांचा पुढे कधीच संबंध आला नाही, संपर्क झाला नाही. पंढरपूर येथे भारत नावाचा आणखी एक मित्र असल्याचं मला आठवतं. पण त्याचा संबंध शाखेपुरता येत असे. शाळा सुटल्यावर खाकी चड्डी, पांढरा शर्ट घातलेला भारत हातात ‘दंड’ (काठी) घेऊन मला शाखेत जाण्यासाठी बोलवायला येत असे.

जयंत sssss

अशी त्याची उंच स्वरातील मोठया आवाजातील हाक घरादाराच शेजार पाजाऱ्यांचं लक्ष वेधून घेत असे आणि मग सगळेजण माझ्या मागे लागत..

” जा जा लवकर, भारत आला आहे बोलवायला!”

एवढीच त्याची आठवण. पुढे तो किती शिकला, त्याने कुठे नोकरी केली, त्याचं लग्नही झालं असेल, त्याला किती मुलं असतील, ती सध्या काय करत असतील? असे प्रश्न नेहेमी मनात येतात आणि तिथेच थांबतात! कधी कधी वाटतं पंढरपूरची बस पकडावी आणि या मित्रांना भेटून ‘जाब’ विचारावा…

“लेको कधी तुम्हाला माझी आठवण येतच नाही का रे!”

पण पुन्हा वाटतं ते भेटतील का? ते त्या गावातच असतील का? की माझ्याप्रमाणे ते ही नोकरीमध्ये अनेक गावे फिरून कुठे तरी वेगळ्याच गावी स्थायिक झाले असतील! कदाचित त्यांच्या मुलांबरोबर असतील. काय माहित!
मंगळवेढ्याला असताना श्रीमंत बापूसाहेब पटवर्धन यांच्या वाड्यातील बिऱ्हाडकरूंची मुलं उदा. राजू, संजू, सुनील, आण्णा, परशा, पांडू आणि खुद्द श्रीमंत बापूसाहेब यांचे नातू हेमंत राव. यांच्याबरोबर वाड्यात खेळलेले खेळ, केलेल्या उनाडक्या हे तर अविस्मरणीयच आहे. त्याशिवाय मधुकर (मध्या) आणि तातोबा (तात्या) असे माझे जिल्हा परिषदेच्या शाळेतील दोन मित्र होते. या दोघांबरोबर रानोमाळ भटकल्याची मला आठवण आहे. झाडावर चढून चिंचा-बोरे काढणे, विहिरीत पोहणे, शेतातील ढाळा तोडून खाणे वगैरे. मंगळवेढा सोडल्या नंतर या मित्रांशी काही संपर्क राहिला नाही. पटवर्धन कुटुंबियांचा घरोबा मात्र कायम राहिला. अगदी मर्मबंधातल्या ठेवीसारखा! तोपर्यंत पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलं. अलीकडेच निवृत्तीनंतर मला एक फोन आला.

“जयंत…”

“बोलतोय …” – मी

“मधुकर बोलतोय …”

मी मेंदूला ताण देण्याचा प्रयत्न केला पण मधुकर नावाचा कोणी इसम आठवेना. मंगळवेढा सोडल्यानंतर मी आणखीन दोन शाळा बदलल्या, कॉलेज झालं, पस्तीस वर्षांच्या नोकरीत अनेक गावे पाहिली, स्टाफमधील खूप जणांशी मैत्री झाली, कामाच्या निमित्ताने अनेक लोक भेटले पण मधुकर काही केल्या आठवेना.

“कोण मधुकर?” मी ओळखलं नाही.

“आरे जयंता मी मंगळवेढ्यातून बोलतोय”

हे ऐकून मला खूप आश्चर्य वाटलं आणि आनंदही झाला. माझा बालमित्र ‘मधुकर’ बोलत होता! आणि मग शिक्षण, नोकरी यामधली सगळी लेबल गळून पडली. वय विसरून आम्ही दोघे बालपणीच्या आठवणीत रमलो. बराच खटाटोप करून त्याने माझा नंबर मिळवला होता. मंगळवेढा तालुक्यातील त्याच्या गावातील तो एक मोठा शेतकरी झाला होता. वडिलांच्या शेतीमध्ये त्याच्या कर्तृत्वाने त्याने काही एकरांची भर घातली होती. मुलांना चांगलं शिकवलं होतं. आणि मला सहकुटुंब त्याच्या गावी हुरड्याला येण्याचं आमंत्रणही दिलं होतं! बालमित्राच्या भेटीचा आनंद केवळ अवर्णनीय होता!

मैत्र हे सहानुभावाने, प्रचिती, साक्षात्कार, दृष्टांताद्वारे आपोआप जाणवायला लागतं.

“जे खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो भूता परस्परे जडो, मैत्र जीवांचे ।।”

असं संत ज्ञानेश्वरांनी पसायदानात म्हटलं आहे. मैत्रीच्या ऐवजी मैत्र हा शब्द ज्ञानेश्वर माऊली ने का वापरला असेल त्याचं कारण वर लिहिल्याप्रमाणे आहे. मैत्र सहानुभावाने आपोआप जाणवायला लागतं मैत्र म्हणजे देणे-घेणे, मागणे काहीच नसते. ती एक संवेदना असते, त्या पलीकडे काहीच नसते. जवळ असण्याचीही गरज नसते. एकरूपत्व म्हणजे मैत्र!जसं भक्ताशी भगवंताचं किंवा भगवंताशी भक्ताचं असतं तसं! माऊलींना अभिप्रेत आहे ते भक्त आणि भगवंतातील मैत्र! ज्यामुळे भक्त आपोआप चिंतामुक्त होईल! मैत्र म्हणजे एकरूपता असंही म्हणता येईल! विश्वातील चराचरामध्ये मैत्रभाव निर्माण झाला तर अवघं विश्व सुखानंदाच्या सागरी पोहू लागेल अशी माऊलींची इच्छा यातून प्रतीत होते! द्वेष, ईर्षा आणि वैर या पासून सामान्य माणूस दूर राहिला तरी तो परमेश्वराशी मैत्र साधू शकेल अशी माऊलींना आशा असावी!

त्यासाठी नेहमी सुदामा आणि श्रीकृष्णाचे उदाहरण सांगितले जाते. पत्नीच्या सांगण्यावरून सुदामा श्रीकृष्णाकडे द्वारकेला गेला पण काही मागावं असं त्याला वाटलंच नाही. श्रीकृष्णाने मैत्रभावाने सारं जाणलं होतं. सुदाम्याने मागितलं नाही, श्रीकृष्णाने दिलं नाही पण सुदाम्याला मिळालं मात्र आपोआप!

त्याचं असं झालं, सुदामा श्रीकृष्णा बरोबर विद्यार्थिदशेत शिकायला होता. सुदामा गरीब ब्राह्मणाचा मुलगा होता. सुदामाची गरिबी अशी होती की मुलांना दोन वेळ जेवायला घालणंही मुश्किल होतं. गरिबीने पोळलेल्या सुदामाच्या पत्नीला, सुशीलाला असं वाटत होतं की आपण उपाशी राहू पण मुलांना उपाशी ठेवणे अशक्य आहे. तिने आपल्या मनातील गोष्ट, मनातील सल सुदाम्याला सांगितला. ते ऐकून सुदाम्याला ही दुःख झालं आणि त्याने आपल्या पत्नीला याबाबत उपाय विचारला. पत्नी म्हणाली,

“तुम्ही नेहमी सांगता की द्वारकेचा राजा प्रत्यक्ष श्रीकृष्ण तुमचा मित्र आहे. मग एकदा त्यांना भेटा, ज्यामुळे तुमची अवस्था बघून, न मागताच ते तुमची मदत करतील.”

तेव्हा मोठ्या मुश्किलीने सुदामा आपल्या मित्राला, श्रीकृष्णाला भेटायला तयार होतो पण रिक्त हस्ताने कसं जायचं? मित्रासाठी काही न्यायला हवं. घरात तर अन्नाचा कणही नसतो. सुदाम्याच्या हट्टामुळे पत्नी सुशीला शेजाऱ्यांकडून चार मुठी पोहे घेऊन येते आणि पोह्याची पुरचुंडी कृष्णाला देण्यासाठी सुदाम्या कडे देते. सुदामा द्वारकेला जातो. तेथील द्वारकेश्वराचे वैभव पाहून आश्चर्यचकित आणि आनंदित होतो. पूर्ण द्वारका नगरी सोन्याची असते. नगरवासी सुखी आणि आनंदी दिसत असतात. विचारत विचारत सुदामा श्रीकृष्णाच्या महाला पर्यंत पोहोचतो आणि द्वारपालाजवळ श्रीकृष्णाला भेटण्याची इच्छा व्यक्त करतो.

“राजाला सांगा तुमचा बाल मित्र सुदामा भेटायला आला आहे.”

द्वारपाल श्रीकृष्णाकडे येऊन “एक गरीब ब्राह्मण आपल्याला भेटायला आला आहे आणि आपलं नाव सुदामा सांगतो आहे”
-असा निरोप देतात.

‘सुदामा’ नाव ऐकताच श्रीकृष्ण, त्याच पावली सुदाम्याला आणण्यासाठी दरवाज्याकडे धाव घेतात. ते पाहून तेथील लोक आश्चर्यचकित होतात ‘एक राजा आणि एक गरीब ब्राह्मण यांच्यात मैत्री कशी असू शकते?’

श्रीकृष्ण सुदाम्याला घेऊन आपल्या महालात येतात आणि शाळेच्या आठवणीत रमून जातात. गप्पा संपल्यानंतर सुदाम्याला विचारतात, “वहिनींनी माझ्यासाठी काय पाठवलं आहे?”

हे ऐकून सुदाम्याला संकोच वाटतो, आणि पोह्याची पुरचुंडी तो लपवायला लागतो. ते पाहून श्रीकृष्ण ती पोह्याची पुरचुंडी ओढून घेतात आणि कच्चे पोहे खायला लागतात. सुदाम्याची गरीबी पाहून त्यांच्या डोळ्यात पाणी येतं. सुदाम्याला श्रीकृष्ण काही दिवस द्वारकेला ठेऊन घेतात. त्याचा पाहुणचार करतात. हवं नको विचारतात पण संकोचामुळे सुदामा काही मागत नाही. सुदामा निघायचं म्हणतो. सुदाम्याला निरोप देताना श्रीकृष्ण लांबपर्यंत सोडवायला जातात. साश्रु नयनांनी मित्राची गळाभेट घेऊन त्याला निरोप देतात.

घरी येताना सुदामा या चिंतेत असतो की आता पत्नीला, तिने विचारल्यावर काय आणलं म्हणून सांगायचं? सुदामा घरी पोहोचतो पण त्या जागेवर त्याला त्याची झोपडी दिसत नाही. झोपडी शोधताना त्याची पत्नी एका सुंदर घरातून बाहेर येताना दिसते. तिच्या अंगावर रेशमी वस्त्रे असतात. विस्फारलेल्या डोळ्यांनी सुदामा पाहत राहतो. तेव्हा तीच सुदाम्याला म्हणते,

“पाहिलंत ना तुमच्या मित्राचं कर्तृत्व! आपली गरिबी दूर करून त्याने आपल्याला दुःख मुक्त केले आहे!” मित्रप्रेम आठवून सुदाम्याच्या डोळ्यात आनंदाश्रू येतात!

असं म्हणतात की कृष्णाने सुदाम्याला आपल्यापेक्षाही श्रीमंत बनवलं!…

मृगः मृगैः संगमुपवृजन्ति गावश्च गोभिस्तुरगस्तुरङै मूर्खश्च मुर्खैः सुधियः सुधीभिः समानशीलव्यसनेषु सख्यं ।।

या संस्कृत सुभाषिताचा अर्थ काहीसा असा…

अर्थात हरिण आपण होऊन हरणांच्या कळपात सामील होतात, गायी इतर गायींच्या कळपात, घोडे इतर घोड्यांच्या कळपात, त्याचप्रमाणे मूर्ख मुर्खांच्या नंदनवनात तर सज्जन आणि गुणी व्यक्ती इतर सज्जनांमध्ये सामील होतात, मिसळून जातात. याचाच अर्थ समान चरित्र, स्वभाव, आचरण, आवडी आणि सवयी असणारे स्वाभाविकच एकमेकांचे मित्र होतात. एकमेकांच्या सहवासातून, विचारातून, आवडीतून ती मैत्री बहरते!

अशी कल्पना करा की बस खचाखच भरलेली आहे. तंबाखू सेवन करणारा माणूस तंबाखू खाण्यासाठी अस्वस्थ झाला आहे. त्याची पुडी घरी विसरलेली आहे. खाली उतरण्यासाठी पुढील बसस्टॉप दूर आहे. आता कोणाला तरी मागण्याशिवाय पर्याय उरलेला नाही. पण कोणाकडे मागणार? चेहेऱ्यावर थोडंच लिहिलेलं असतं? प्रत्येक पॅसेंजर चा चेहरा, कपडे, हालचाली तो न्याहाळू लागतो. बसच्या या गर्दीत त्याला हातावर तंबाखू मळणारा एक इसम दिसतो आणि त्याला गाठून, त्याच्याशी सख्य करून तो इसम आपली तल्लफ भागवतो! ‘मद्यपी’ देखील असंच आपलं ‘इप्सित’ साध्य करतात!

असं फक्त व्यसनांच्या बाबतीत होतं असंच काही नाही. खेळांच्या बाबतीत, नाटक वेड्यांच्या बाबतीत, एखादया छंदाच्या बाबतीतही ‘अशी’ मैत्री होते. आपल्या विचारांशी, छंदांशी जुळणारी माणसं शोधून आपण त्यांच्याशी ‘सख्य’ वाढवतो!

नोकरीनिमित्त धुळ्याला असताना आम्ही ‘ नाटक-संगीत ‘ वेड्या लोकांनी वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणारे हौशी कलाकार एकत्र आणून लेखक श्रीनिवास भणगे यांचं ‘घालीन लोटांगण’ हे नाटक बसवलं होत. त्याचा प्रयोग आम्ही सानेगुरुजींच्या कर्मभूमीत अमळनेर येथे पोलीस मुख्यालयाच्या नवरात्र महोत्सवात केला होता. अगदी भिन्न क्षेत्रात कार्यरत असलेल्या लोकांनी एकत्र येऊन हे ‘नाटक’ केलं होतं!

विश्वास, समर्थन, परस्पर साहाय्य आणि जवळचा वैयक्तिक संपर्क यावर आधारित मैत्री ही एक अतिशय सुंदर मानवी भावना आहे! जीवनात माता, पिता आणि गुरू नंतर मित्राचे स्थान आहे!

आदरणीय द्वय गोपीनाथराव मुंडे व विलासराव देशमुख हे वेगवेगळ्या राजकीय पक्षाचे प्रतिनिधी होते, आपापल्या पक्षाचे नेतृत्वदेखील करत होते पण वैयक्तिक आयुष्यात ते दोघे एकमेकांचे घनिष्ट मित्र होते! अशी असते मैत्री! श्रीराम व सुग्रीव यांची मैत्री, दुर्योधन आणि कर्ण यांची मैत्री, बादशहा अकबर आणि बिरबल यांची मैत्री आपल्याला मैत्रीची महती सांगणारी आहे. मैत्री असावी तर अशी!

सुप्रसिद्ध साहित्यिक पु.ल.देशपांडे एकेठिकाणी लिहितात…

मैत्री एक सोपी व्याख्या आहे
‘रोज आठवण यावी असं काही नाही
रोज भेट व्हावी असं काही नाही
एवढंच कशाला रोज बोलणं व्हावं
असंही काहीच नाही;
पण मी तुला विसरणार नाही
ही झाली खात्री आणि
तुला याची जाणीव असण ही झाली मैत्री’
शेवटी काय हो भेटी नाही झाल्या तरी गाठी
बसणं महत्त्वाचं. ज्यांनी हे जाणलं त्यांनी
माणसातलं माणूसपण जाणलं…
अशा सगळ्या मित्रांना माझ्या शुभेच्छा.
ही नाती टिकवा आणि आयुष्याचा आनंद घ्या…

जयंत कुलकर्णी
दूरभाष : ८३७८०३८२३२

आमचे इतरही लेख वाचण्यासाठी, दर्जेदार पुस्तके विकत घेण्यासाठी www.chaprak.com ला भेट द्या. ‘चपराक प्रकाशन’चे फेसबुक पेजही जरूर लाईक करा. उत्तमोत्तम व्हिडीओ पाहण्यासाठी ‘चपराक’च्या युट्यूबला भेट द्या आणि सबस्क्राइबही नक्की करा.
Copyright @ www.chaprak.com / All Rights Reserved.

चपराक

पुणे शहरातून ‘साहित्य चपराक’ हे मासिक आणि ‘चपराक प्रकाशन’ ही उत्तमोत्तम पुस्तके प्रकाशित करणारी ग्रंथ प्रकाशन संस्था चालविण्यात येते. ‘साहित्य चपराक’ मासिकाचा अंक दरमहा 10 तारखेला प्रकाशित होतो. आपले साहित्य पाठविण्यासाठी, ‘चपराक’मध्ये जाहिराती देण्यासाठी आणि नवनवीन पुस्तकांच्या माहितीसाठी संपर्क - घनश्याम पाटील, संपादक 'चपराक'.
व्हाट्सऍप क्रमांक - ८७६७९४१८५०
Email - Chaprak Email ID

3 Thoughts to “मैत्र मैत्री आणि मैत्रेय अर्थात दोस्ताना”

 1. Nagesh S Shewalkar

  जयंतजी, खूप छान लिहिले आहे.

 2. Vinod s. Panchbhai

  मैत्रीवरील सुंदर लेख…
  बालपणीचे बरेच मित्र आठवले!
  अभिनंदन माऊली!!

 3. सुनीता इनामदार

  फारच सुंदर लेख..प्रत्येकाला आपापली मैत्री आठवावी असा…

तुमची प्रतिक्रिया जरूर कळवा

हे ही अवश्य वाचा