“डोळे हे जुलमी गडे
रोखुनी मज पाहू नका
जादूगिरी त्यात पुरी
येथ उभे राहू नका”
हे कविवर्य भा. रा.तांबे यांच्या गीताचे बोल आहेत. अनंत काळापासून शृंगारामध्ये डोळ्यांना अनन्यसाधारण महत्व आहे. माणसाचे डोळे अनेक रंगांचे व अनेक छटांचे असतात. जसे की काळे, पिंगट, घारे, निळे, टपोरे. डोळ्यांमधून वेगवेगळ्या भाव-भावना व्यक्त होतात.
जसे की, खुनशी, भेदक, मग्रूर, करारी वगैरे. डोळे मोठे केले की भीती, डोळे विस्फारले की आश्चर्य, डोळे मिचकावले की खोटं खोटं. या डोळ्यांमुळेच आपण वाचू शकतो, लिहू शकतो, चित्र काढू शकतो, सिनेमा, टीव्ही, मोबाईल, कम्प्युटर पाहू शकतो, त्या उपकरणांचा सहज वापर करू शकतो. रस्त्यावर चालू शकतो, अडथळे पार करू शकतो. दोन चाकी, चार चाकी गाडी चालवू शकतो. रेल्वे, जहाज, विमान चालवू शकतो. अभ्यास करू शकतो, परीक्षा देऊ शकतो. अनेक देश पाहू शकतो, निसर्गाचे अनेक आविष्कार पाहू शकतो. वेगवेगळ्या रंगांच्या फुलांनी बहरलेल्या बागा पाहू शकतो. फळांनी लहडलेली झाडं पाहू शकतो. सूर्य, चंद्र, आकाश, सूर्योदय, सूर्यास्त पाहण्याचा आनंद आपण घेऊ शकतो आणि घेतो.
देवानं आपल्याला निसर्गतःच सगळे अवयव देऊन उपकृत केलं आहे. त्यामुळे त्यांची आपल्याला किंमत वाटत नाही. आपण दैवी देणगी म्हणून सहजासहजी मिळालेल्या अवयवांची जपणूक तर करतच नाही पण हेळसांड करतो. डोळ्यांच्या बाबतीत बोलायचं झालं तर कमी प्रकाशात वाचन करणे, कम्प्युटर, मोबाईल वगैरे वापरताना योग्य अंतर न ठेवणे, सतत मोबाईल गेम खेळणे, टीव्ही पाहताना आवश्यक अंतर न ठेवणं शिवाय मोबाईल, कॉम्प्युटर, टीव्ही यांचा ब्राईट नेस जरुरी पुरता नसणं वगैरे. डोळ्यांची हेळसांड करून आपण बऱ्याच वेळा चांगल्या डोळ्यांचं मातेर करतो. त्यामुळे लहान मुलांना लवकर चष्मा लागतो, डोळ्यांचे आजार होतात, ऑपरेशन्स करावी लागतात, मोती बिंदू वाढतो, काही बाबतीत मोतिबिंदूच काचबिंदूत रूपांतर होतं आणि डोळा निकामी होतो . आशा वेळी आपण त्यांचा विचार करायला हवा ज्यांना डोळे नाहीत! जन्मतःच नाहीत किंवा जन्मा नंतर अपघाताने किंवा रोगाने गेलेले आहेत!
लहानपणी आपण ‘आंधळी कोशिंबीर’ नावाचा खेळ खेळत होतो. या खेळात एकाच्या डोळ्याला पट्टी बांधून त्याला थोडया दूर अंतरावर उभं करायचं आणि नंतर त्याने खेळातल्या इतर मुलांना पकडण्याचा प्रयत्न करायचा. काहीं क्षणांसाठी सुद्धा डोळे बांधून चालणं, खेळणं किती अवघड आहे हे त्या डोळ्यांना पट्टी बांधलेल्या मुलालाच समजतं! कदाचित डोळ्यांचं महत्व समजावं म्हणूनच असे खेळ होते. तुम्हीही एकदा सहज डोळ्यांना पट्टी बांधून बघा, मग तुम्हालाही लक्षात येईल की डोळ्यांपुढे अंधार आल्यानंतर शरीराची व मनाची काय अवस्था होते! नेत्रहीन बांधव आपलं सगळं जीवन आशा अंधारात व्यतीत करतात!
उपलब्ध माहितीनुसार अशा या वास्तवातील अंधांची संख्या जागतिक स्तरावर चार कोटींपेक्षा जास्त आहे. त्यातील नव्वद टक्के विकसनशील देशात आहेत. आणि त्यातील पंचावन्न लाखांपेक्षा जास्त भारतात आहेत. त्यात मोतीबिंदू मुळे दृष्टी गमावणाऱ्यांची संख्या बासष्ट टक्के आहे. नेत्रदान करणाऱ्यांचे प्रमाण फारच कमी आहे. आणि नेत्रदानातून मिळालेल्या डोळ्यांपैकी फक्त पन्नास ते पंचावन्न टक्के डोळेच प्रत्यक्षात वापरात येऊ शकतात. त्याला अनेक कारणे आहेत. देशभरात दरवर्षी सर्वसाधारणपणे पंधरा हजार नेत्रप्रत्यारोपणाच्या शस्त्रक्रिया होतात. तेवढया दृष्टीहीनांना सृष्टी पाहायला मिळते. अपघातात दगावणाऱ्यांपैकी ०.३ ते ०.४ टक्के नेत्र, दान केले जातात. देशात दरवर्षी पन्नासहजार पेक्षा जास्त दृष्टीहीनांची भर पडते. संपूर्ण अंध व्यक्ती व सर्वसाधारण दृष्टीच्या एक दशांश इतकीच दृष्टी असलेल्या व्यक्ती यांची अंध व्यक्तीत गणना करण्यात येते. अंध लोक सरकारी ‘अपंग’ या व्याख्येत येतात.
डोळ्यांवर काळा चष्मा आणि हातात पांढरी काठी घेऊन रस्ता ओलांडणारे, चालत्या रेल्वेत खेळणी विकणारे अंध बांधव आपण नेहेमी पाहतो. पांढरी काठी ही अंध बांधवांची जीवन रेखा आहे. ही काठी अंध बांधवांना “नॅशनल असोसिएशन ऑफ ब्लाइंड” म्हणजेच “नॅब” या संस्थेने बहाल केली आहे. अंधांना अंधारातून प्रकाशाकडे नेणारा एक आशेचा किरण! पांढरी काठी हा अंध बांधवांचा एक अवयवच आहे! अंध बांधवांना या काठीमुळे आत्मविश्वास मिळतो. या काठीमुळे जीवनातील अडथळ्यांची शर्यत अंध बांधव सहजी पार करू शकतात! शाळा, कॉलेज व कामाच्या ठिकाणी अंध बांधवांना पोचवण्याचे काम ही काठीच करते. या काठीचे लॉग केन, सिम्बॉल केन, गाईड केन, लिडी केन इत्यादी प्रकार आहेत. अंध व कर्णबधिर असलेल्या व्यक्तीच्या काठीच्या खालील बाजूवर लाल रंगाचे दोन पट्टे असतात. ही साधी अल्युमिनियम ची काठी असते. यात जादूटोणा नसतो! काठी नव्हती तेव्हा अंध बांधवांना एका माणसाला सोबत घेऊन जायला लागे!
विसाव्या शतकाच्या प्रारंभी पहिल्या महायुद्धानंतर डॉ. रिचर्ड व्हूव्हर यांनी सर्वप्रथम अंधांना चालण्याचा आधार म्हणून एक काठी तयार केली. ती काठी व्हूव्हर केन म्हणून प्रसिद्ध झाली. १९२१ मध्ये ब्रीस्टलचे फोटोग्राफर जेम्स विंग्ज यांना अपघातात अंधत्व आलं. त्यांनी ही काठी सर्वांना सहज दिसावी म्हणून या काठीला पांढरा रंग दिला. १९३० मध्ये पिवोरा एलिनॉईज यांनी पांढऱ्या काठीचा कायदा प्रथमतः जगात अंमलात आणला. १९३१ साली फ्रान्समध्ये गिली हर्बर्ट मॉँट याने फ्रान्सच्या तत्कालीन राष्ट्राध्यक्षांसामोर सफेद काठीचे प्रात्यक्षिक सादर केले. त्यानंतर त्यांनी निवृत्त अंध सैनिक व इतर अंध लोकांसाठी पाच हजार काठ्यांचे वाटप केले. हेन्री विकारडो यांनी १९५२ मध्ये अमेरिकेत ‘ अंबिलिटीस इम्पोरेटस ‘ नावाची अपंगांच्या पुनर्वसनासाठी एक संस्था काढली. भारतात १९५७ मध्ये श्रीमती फातिमा इस्माईल यांनी मुंबईत एक संस्था स्थापून भारतातील अपंगांच्या पुनर्वसनाच्या समस्येस तोंड देण्याच्या प्रयत्नास चालना दिली. १९६४ मध्ये अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष लिंकन बी जॉन्सन यांनी १५ ऑक्टोबर हा ‘ सफेद काठी दिन ‘ म्हणून साजरा करण्यात येईल असं घोषित केलं. युनो ने ही त्यासाठी सहमती दर्शवली. तेव्हापासून आजतागायत १५ ऑक्टोबर हा ‘ सफेद काठी दिन ‘ किंवा ‘ अंध सहाय्यता दिन ‘ म्हणून जगभर साजरा होतो. तो आपण नुकताच साजरा केला.
अंध बांधवांना ‘संवेदना’ हेच विशेष इंद्रिय परमेश्वराने दिले आहे. ते अतिसूक्ष्म आवाज ऐकू शकतात. तीक्ष्ण घ्राणेंद्रियाने वास घेऊ शकतात आणि स्मरणातही ठेऊ शकतात. रसायनासारखे विशेष वास त्यांना ठराविक भौगोलिक विभागाची जाणीव करून देतात. टाचणी किंवा सुई पडली तरी त्यांना आवाज येतो. आवाज, वास आणि स्पर्श यामुळे ते संबंधित परिसर बरोब्बर लक्षात ठेवतात. रेल्वेचा कमीजास्त वेग त्यांना स्टेशन आल्याची सूचना देतो.
नेत्रहीनांना आत्मनिर्भर करण्यासाठी, त्यांना आपल्या पायावर उभे करण्यासाठी, स्वयंपूर्ण होण्यासाठी १९९५ मध्ये अपंगांना शासकीय नोकऱ्यांमध्ये ३% आरक्षण जाहीर झालं आहे. त्यातील १०% अंधांसाठी राखीव आहे. अंध बांधवांना दया किंवा सहानुभूती नको आहे.
आज अंधव्यक्ती सामान्य माणसाइतक्याच कर्तबगार आहेत. विज्ञानाच्या प्रगतीमुळे हे शक्य झाले आहे. जगातील मोठमोठ्या कंपन्या विज्ञानाच्या मदतीने दृष्टीहीनांसाठी वेगवेगळी उपकरणे बनवत आहेत. त्यासाठी संशोधन करत आहेत. उद्देश अंधांचे जगणे सोपे व्हावे हा आहे. लिफ्टमध्ये आतील व बाहेरील पॅनल वर ब्रेल लिपीत आकडे टाकल्यास अंध व्यक्ती लिफ्ट सहज वापरू शकते. ‘गुगल’तर्फे अनेक शास्त्रज्ञ व संशोधकांना अंधांसाठी उपयुक्त साधने बनवण्यासाठी प्रोत्साहन व निधी दिला जातो. तसेच इंग्लंड च्या ‘आर एन आय बी’ म्हणजे ‘रॉयल नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर द ब्लाइंड’ या संस्थेतर्फेही अंधांसाठी संशोधन करणाऱ्या व्यक्तींना निधी दिला जातो. आर एन आय बी व ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीच्या सहयोगाने अंधांसाठी स्मार्ट ग्लासेस अर्थात चष्मे बनवण्यात आले आहेत. यात थ्रीडी कॅमेरा वापरण्यात आला आहे. मेक्सिको च्या ‘सेंटर फॉर रिसर्च अँड ऍडव्हान्स स्टडीज ऑफ द नॅशनल पॉलिटेक्निक इन्स्टिट्यूट’ या संस्थेने देखील असेच स्मार्ट चष्मे बनवले आहेत. यात अल्ट्रासाऊंड, जीपीएस यंत्रणा व स्टीरिओ साउंड सेन्सर्स वापरले आहेत. दृष्टीहीनांसाठी वाचन ही मोठी समस्या असते. यासाठी एमआयटी मीडिया लॅब ने ‘फिंगर रीडर’ बनवलं आहे. यात डिजिटल मजकुराचे भाषांतर होऊन ते ती व्यक्ती ऐकू शकते. आजकाल अंधव्यक्तींसाठी मोबाईल ऍप्स ही उपलब्ध आहेत. एरिआना ऍप हे त्यातीलच एक. दक्षिण कोरियातील कंपनी ‘डॉट’ने ब्रेल स्मार्ट वॉच बनवले आहे. यातील डॉट्स अंध व्यक्तीला शब्द समजावून सांगतात. ऑस्ट्रियाची कंपनी ‘ब्लिटॅब’ यांनी दृष्टीहीनांसाठी लिक्विड बेस्ड टॅब्लेट बनवला आहे. यातील बबल्स म्हणजे बुडबुडे ब्रेल लिपी उमटवतात.
अंधांसाठी स्पर्श पद्धतीवर आधारित ठिपक्यांची लिपी म्हणजेच ब्रेल लिपी उपयोगी ठरली आहे. या ब्रेल लिपी मुळेच अंध विद्यार्थी शिक्षणाचा विचार करू शकतात. लिहिताना उजवीकडून डावीकडे तर वाचताना डावीकडून उजवीकडे असं या लिपीचा अभ्यास होतो. लुईस ब्रेल या फ्रेंच समाज सेवकाने ही पद्धत शोधली. ही लिपी सहा उठावाच्या टिंबांवर आधारित आहे. ही लिपी मराठीत व गुजरातीत आणण्यासाठी कै. नीलकंठ राय छत्रपती यांनी परिश्रम घेतले. त्यांचे बंधू हरिप्रसाद छत्रपती यांनी अनेक पुस्तिका प्रसिद्ध करून या विषयी जागृती केली. युनेस्कोच्या साहाय्याने बऱ्याच संशोधनानंतर आता भारतीय ब्रेल लिपी तयार झाली आहे.
अनेक विद्यार्थी ही दृष्टीहीनांसाठी अशी उपकरणे बनवत आहेत. हेब्रॉन मधील पॉलिटेक्निक युनिव्हर्सिटी च्या काही पॅलेस्टिनी विद्यार्थ्यांनी दृष्टीहीनांसाठी ‘स्मार्ट असिस्ट सिस्टीम’ बनवली आहे. अंगद दर्यानी हा मुंबईचा तरुण विद्यार्थी भारतात थ्रीडी प्रिंटर बनवणाऱ्या काही सर्वात तरुण मुलांपैकी एक आहे. टेक्नॉलॉजी इंजिनिअरिंग आणि रोबोटिक्स मध्ये त्याचं डोकं अफाट चालतं. अंधांसाठी त्याने आयपॅड अर्थात ‘व्हर्च्युअल ब्रेल रीडर’ बनवला आहे. यात डिजिटल रोमन, इंग्लिश मजकूर त्वरित ब्रेल लिपीत भाषांतरित होतो. अंधांना टॅब्लेट वर पुस्तके वाचता यावीत यासाठीचा हा जगातील पहिलाच प्रयत्न. असाच प्रयत्न बंगळुरू येथील शिवकुमार एच.आर. या विद्यार्थ्याने केला आहे. अंधांना मजकूर वाचून दाखवण्यासाठी उपयुक्त असं एक तांत्रिक साधन त्यानं बनवलं आहे. कोणत्याही छापील पुस्तकातील स्कॅन केलेल्या मजकुराचे इ टेक्स्ट मध्ये हे उपकरण रूपांतर करते. सध्या कन्नड व तामिळ भाषांसाठी हे उपकरण बनवलं आहे. या संशोधनासाठी त्याला ‘गांधीयन यंग टेक्नॉलॉजीकल इनोव्हेशन अवॉर्ड’ ही मिळाले आहे. विज्ञान व तंत्रज्ञानाने अंधांसाठी विविध प्रकारची उपकरणे बनवून त्यांचे जीवन सुसह्य करण्याचा प्रयत्न केला आहे!
पुण्यातील एस.पी. महाविद्यालयात मध्ये “रौशनी” आणि फर्ग्युसन महाविद्यालयात “साथी” हे गट अंधांच्या समस्यांवर काम करत आहेत. पुस्तके ब्रेल लिपीत उपलब्ध करून देणं आणि ऑडिओ बुक तयार करणं आशा प्रकारचे कार्य केले जाते. परीक्षेच्या वेळी अंध विद्यार्थ्यांना लेखनिक मिळवून देण्यासाठी मदत केली जाते. “निवांत अंधमुक्त विकासालय” या संस्थेत पदवी पासून पीएचडी पर्यंत शिक्षणाचे संपूर्ण साहित्य विद्यार्थ्यांसाठी ब्रेल लिपीत उपलब्ध आहे. तसेच विद्यार्थ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी २२ विषयांमधील अभ्यास शिकवण्यात येतो. संस्थेच्या विद्यार्थ्यांची स्वतःची ‘टेक व्हिजन’ नावाची सॉफ्टवेअर कंपनी आहे.
भारतात अंधांच्या राष्ट्रीय संस्थेने टाटा निधीच्या मदतीने अंधांचे ‘शेतकी आणि ग्रामीण टाटा शिक्षण केंद्र’ मुंबई पासून १६० किमी वर उंबरगाव तालुक्यातील ‘फणसा’ या गावी ९७.१२५ हेक्टर जमीन घेऊन सुरू केले आहे. संपूर्ण भारतातून अंध मुलांना इथे प्रवेश मिळतो. शेती, कुक्कुटपालन, दुग्धव्यवसाय, बागकाम वगैरे व्यवसाय अंधांना शिकवून त्यांना ग्रामीण भागातच स्थायिक करावयाचे हा या केंद्राचा हेतू आहे.
आतापर्यंत १४ ते १६ व त्या पुढील वयातील तरुण अंधांना संगीत, वाद्यांची दुरुस्ती, टंक लेखन, लघुलेखन, वेतकाम, खुर्च्या विणणे, ब्रश तयार करणे, खडू करणे, चर्मकला, विणकाम, भरतकाम इत्यादी उद्योगांचे शिक्षण देण्यात येत असे. नवीन यंत्रप्रधान संस्कृती मध्ये त्यांचे कामाचे क्षेत्र वाढले आहे. त्यामध्ये टेलिफोन ऑपरेटिंग, यंत्रांचे छोटे भाग जुळवणे, मोटारीतील तारांची जोडणी, छापखान्यात घड्या घालणे वगैरे कामे देखील अंधलोक करू शकतात.
जागतिक पातळीवर अंधत्वावर मात करण्यासाठी “आंतरराष्ट्रीय अंधत्व प्रतिबंधक संस्था” (आय ए बी पी) आणि जागतिक आरोग्य संघटना डब्लू एच ओ यांनी संयुक्त पणे ‘२०२० व्हिजन’ हा कार्यक्रम राबवून ‘प्रत्येकाला दृष्टीचा अधिकार’ ही संकल्पना साकार करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. भारतासह ४० देश या संकल्पनेसाठी योगदान देणार आहेत. भारताबरोबरच दक्षिण आफ्रिका व चीन या दोन देशातही अंधत्वाची समस्या गंभीर आहे.
वार्धक्य, बदलती जीवन शैली, गरिबी, निरक्षरता, विकासाचा अभाव, सामाजिक मागासलेपणा, अत्याधुनिक वैद्यकीय साधनसामग्रीची कमतरता या प्रमुख गोष्टी अंधत्वाच्या वाढत्या प्रमाणाला जबाबदार आहेत असे जागतिक आरोग्य संघटनेने आपल्या सर्वेक्षणात नमूद केले आहे. अंध, अपंग, मतिमंद व मूकबधिर यांना त्यांच्या गुणदोषांसह स्वीकारून त्यांना आपलंसं करणं यात मानवी जीवनाची सार्थकता आहे. अंधांचे मनोबल वाढवण्यासाठी आपण विशेष प्रयत्न करायला हवेत. ‘नेत्रदान’ ही मोहीम लोकचळवळ व्हायला हवी. नेत्रदानासाठी मृत्यूपूर्वी ‘इच्छापत्र’ देणे आवश्यक आहे. मृत्यूनंतर नेत्रदान केल्याने चेहरा विद्रुप दिसत नाही हे लोकांच्या मनावर ठसायला हवं. आपण नेत्रदान नाही केलं तर मृत्यूनंतर डोळ्यांची तशीही राखच होणार आहे. मात्र नेत्रदान केल्याने मृत्यूनंतर ही तुमचे डोळे हे जग बघू शकणार आहेत, अर्थातच दुसऱ्या व्यक्तीच्या माध्यमातून! पुण्यकर्म तर आहेच पण एका अंधाला प्रकाश दाखवण्याचा, जग दाखवण्याचा आनंद फार मोठा आहे!
ऋचा मुळे यांची डोळ्यांवर एक समर्पक कविता….
डोळे
——–
कधी बदामी कधी गोल
कधी बोलके कधी अबोल
कधी टपोरे कधी पाणीदार
कधी तलवारीसारखे तीक्ष्ण धारदार
कधी नाराज कधी हासरे
कधी मादक कधी लाजरे
कधी मिश्किल कधी फितूर
कधी प्रेमळ कधी निष्ठुर
पापणीत लपलेले स्वप्नात सजलेले
अश्रूंनी भिजलेले शांत कधी निजलेले
सुंदर ते डोळे
– जयंत कुलकर्णी
दूरभाष : ८३७८०३८२३२
आमचे इतरही लेख वाचण्यासाठी, दर्जेदार पुस्तके विकत घेण्यासाठी www.chaprak.com ला भेट द्या. ‘चपराक प्रकाशन’चे फेसबुक पेजही जरूर लाईक करा. उत्तमोत्तम व्हिडीओ पाहण्यासाठी ‘चपराक’च्या युट्यूबला भेट द्या आणि सबस्क्राइबही नक्की करा.
Copyright @ www.chaprak.com / All Rights Reserved.
व्वा,सविस्तर माहिती दिली आहे सर,
मनःपूर्वक अभिनंदन
मनाला भेदणारा लेख
खूप सव्वीस्तर माहिती असलेला हा लेख मनाला खूप भावला..
जयंयरावांचे लेख एक वेगळीच अनुभुती देऊन जातात.👌