संपादकीय

संपादकीय

एकदा एक भविष्यवाणी झाली.
‘पुढची पंधरा वर्षे जमिनीत काहीच पिकणार नाही…’
ती ऐकून सगळे शेतकरी हवालदिल झाले. सगळ्यांपुढं मोठं प्रश्नचिन्ह!
बरं, पंधरा वर्षे म्हणजे कालावधीही थोडाथोडका नव्हता.
या वर्षात पिकलंच नाही तर खायचं काय?
सगळेच चिंतेत होते.
पंधरा वर्षे पिकणार नाही म्हटल्यावर रोज रानात जाण्याची गरज नव्हती. कामही करावं लागणार नव्हतं.
पिकणारच नाही तर कष्ट करून काय फायदा? असा साधा-सोपा विचार होता.
अशा सगळ्या वातावरणात गावातला रामू मात्र रोज रानात जायचा. त्यानं नांगरणी सुरू केली. त्याआधी रानातलं सगळं तण बाजूला सारलं. त्याचा हा खुळेपणा पाहून सगळे हसू लागले.
एकानं विचारलं, ‘‘अरे पिकणारच नाही तर तू इतकी मेहनत घेतो कशाला?’’
त्यानं सांगितलं, ‘‘भविष्यवाणी झालीय म्हणजे पिकणार नाही हे तर खरं… पण जेव्हा पंधरा वर्षांनी पीक पिकायला सुरूवात होईल तेव्हा मी जमिनीची मशागत कशी करावी, नांगरणी, पेरणी, कुळपणी कशी करावी हेच विसरून जायचो. ते विसरायला नको म्हणून मी रानात रोज काम करणार…’’
आकाशातून जाणार्‍या शंकर-पार्वतीनं रामूचा हा निर्धार ऐकला. त्यांनी स्वतःच घोषणा केली होती की ‘पंधरा वर्षे पाऊस पडणार नाही. नापिकी होणार. कोणतंच धान्य उगवणार नाही!’
रामूचा निर्धार पाहून देवही हसले. त्यांनी वरूणराजाला आदेश दिला आणि मुसळधार वृष्टी सुरू झाली. पार्वतीनं विचारलं, ‘‘काय हे देवा! पंधरा वर्षे काही पिकणार नाही असं तुम्हीच जाहीर केलं होतं ना?’’
देव म्हणाले, ‘‘या पंधरा वर्षात मी आशीर्वाद द्यायला, मानवाचे कल्याण करायला विसरलो तर सगळंच वाळवंट व्हायचं… रामू म्हणतो ते खरं आहे. आपली चांगुलपणाची सवय हरवायला नको.’’
आमच्या दिवाळी अंकाच्या संपादकांचंही गेली काही वर्षे असंच होतंय. या वर्षी काय तर जीएसटी, दुसर्‍या वर्षी नोटबंदी. तिसर्‍या वर्षी सांगली-कोल्हापूरचा पूर, यंदा कोरोना… अशा संकटापुढं हतबल होऊन अनेकजण ‘अंकच करायचा नाही’ असा निर्धार करत आहेत. काहीजण फक्त ऑनलाईन अंक करून समाधान मानून घेत आहेत. अशा अस्मानी-सुलतानी संकटाला घाबरून आपण अंक बंद केले तर समाजात विचारांचं बीज कोण पेरणार? त्यातून काय पिकणार आणि वाचक तरी काय खाणार?
कोरोनासारखी वैश्विक समस्या उद्भवली. घरकोंडी सुरू झाली. टपाल विभाग बंद झाला. किंबहुना घरी येणारी वृत्तपत्रंही सगळ्यांनी बंद केली. काही काळ तर वृत्तपत्रांनीही त्यांची छपाई बंद केली. अशा सगळ्या दोलायमान परिस्थितीत अनेकजण भविष्याची चिंता करत बसले. अनेक भांडवलदार वृत्तपत्रांनी त्यांच्या आवृत्त्या बंद केल्या. निराशेचं एक मळभ दाटलं आणि आम्ही त्यावर मात करत निश्चय केला की यंदाही अंक जोरदारच करायचा. त्यात कसलीच तडजोड करायची नाही. मग नेहमीप्रमाणं विषय ठरवणं सुरू झालं. अनेक लेखकांशी बोलणं झालं. काहींनी सकारात्मक प्रतिसाद दिला. काहींनी कोरोनाच्या परिस्थितीमुळं ‘नवं काही सुचतच नाही’ असंही प्रांजळपणे सांगितलं. जाहिरातीचा मात्र काही पत्ताच नव्हता. कामगारांचे पगार करायला पैसे नाहीत, वाढीव वीजबिल भरायला पैसे नाहीत अशी जवळपास सगळ्यांचीच अडचण होती आणि ती रास्तही होती. काही ठिकाणी तर त्या त्या समूहातील कर्तेधर्ते पुरूष किंवा त्यांच्या कुटुंबातील सदस्यच या आजारानं ग्रस्त होते. अशा सगळ्या परिस्थितीत बोलायचं तरी काय आणि कुणाला?
मात्र हा ज्ञानयज्ञ थांबवताही येणारा नव्हता. केवळ आणि केवळ वाचकांच्या जिवावर आम्ही मजकुराची निवड सुरू केली. दरम्यान, कोरोनामुळं अनेक अप्रिय बातम्या ऐकाव्या लागत होत्या. आमच्या परिवारातील काहींनाही त्याचा फटका बसला. असं असलं तरी हार मानून चालणारं नव्हतं. सर्वोत्तम मजकूर द्यायची आमची धडपड सुरूच होती.
अशावेळी ‘चपराक’ परिवाराचे सर्वच सदस्य जोमानं कामाला लागले. प्रत्येकजण आपापली जबाबदारी यथाशक्ती पार पाडत होता. आमचे ज्येष्ठ सदस्य दिलीप कस्तुरेकाका आणि चंद्रलेखा बेलसरे यांनी जाहिरातीच्या आघाडीवर बाजी मारली. ज्ञानेश्वरभाऊ तापकीर, प्रमोद येवले यांनी अंकाची जोरदार नोंदणी सुरू केली. अरूण कमळापूरकर आणि गिरमे मॅडमनी मजकूर निवडणं, व्याकरण तपासणं यात पुढाकार घेतला. राजेश कदम यांनी अंकाची सुंदर सजावट केली. संतोष घोंगडे यांनी सुंदर मुखपृष्ठ साकारलं आणि आतली चित्रंही तितकीच सुंदर पद्धतीनं रेखाटली. खरंतर यंदा कोरोनामुळं वारी रद्द झाली आणि छातीत चर्रर झालं. त्याचवेळी मनात विचार आला, यंदा विठुरायाच्या भेटीला जाता येत नाही तर आपणच त्याला वाचकांच्या घरापर्यंत नेऊया. ही कल्पना संतोषजींना बोलून दाखवली आणि त्यांच्या कुंचल्यानं कमाल केली. या अंकाच्या मुखपृष्ठावरून आपल्याला त्याचा अंदाज येईल.
मुळात इथला बळीराजा हाच आमचा आदर्श आहे. वर्षानुवर्षे तो राबत असतो. कधी निसर्गाच्या अवकृपेनं असेल किंवा कधी सरकारी-प्रशासकीय धोरणाच्या उदासीनतेमुळं असेल… त्याच्या हाती काहीच येत नाही. तरीही तो सारं सहन करतो. मग दिवाळी अंकाच्या संपादकांनी एखाद्या वर्षी नफ्याची अपेक्षा न ठेवता अंक काढला तर बिघडलं कुठं? सध्या सर्वत्रच अशी परिस्थिती असताना आपण असं हतबल होऊन कसं चालेल?
आमच्या अंकाचं काम शेवटच्या टप्प्यात आलं आणि जाहिरातींचा आकडा वाढत गेला. आमच्यावर प्रेम करणार्‍या सर्वांनीच सगळीकडून प्रेमाचा वर्षाव केला. अंकाची नोंदणीही तडाखेबंद झाली. हे धाडस आम्ही करू शकलो ते आमच्या सर्व मान्यवर लेखक, वाचक, सभासद, जाहिरातदार, हितचिंतक आणि माझ्या सर्व सहकार्‍यांच्या प्रेमाच्या बळावर. बरं, हा विक्रमी अंक फक्त प्रकाशितच करून आम्ही थांबलो नाही. यंदा या अंकाचं सोमवार 9 नोव्हेंबर 2020 रोजी भारतात शंभर ठिकाणी प्रकाशन होतंय. कदाचित हाही एक अभिनव प्रयोग असेल. जिथपर्यंत मराठी माणूस आहे तिथपर्यंत जाण्याचा आमचा प्रयत्न आहे. गेल्यावर्षीचा अंक जवळपास 25 देशातील मराठी वाचकांपर्यंत गेला होता. यंदा आमचा तो विक्रम आम्हीच मोडून काढू याची खातरी आहे.
सध्या वाचनसंस्कृतीला कधी नव्हे इतके सुगीचे दिवस आहेत. कोरोनाच्या काळात तर घरी बसून असलेल्या अनेकांना टीव्ही, मोबाईलचा वीट आलाय. त्यामुळं भविष्यात ‘चपराक’सारखं जे काही दर्जेदार असेल ते नक्कीच टिकून राहील. असो. सर्वांना या प्रकाशोत्सवाच्या शुभेच्छा देतो आणि थांबतो.
– घनश्याम पाटील

संपादक, ‘चपराक’
7057292092

‘चपराक दिवाळी अंकाच्या नोंदणीसाठी www.chaprak.com या संकेतस्थळाला भेट द्या. गुगल पे, फोन पे, भीम अँपवरून नोंदणीसाठी क्रमांक – ७०५७२९२०९२

चपराक

पुणे शहरातून ‘साहित्य चपराक’ हे मासिक आणि ‘चपराक प्रकाशन’ ही उत्तमोत्तम पुस्तके प्रकाशित करणारी ग्रंथ प्रकाशन संस्था चालविण्यात येते. ‘साहित्य चपराक’ मासिकाचा अंक दरमहा 10 तारखेला प्रकाशित होतो. आपले साहित्य पाठविण्यासाठी, ‘चपराक’मध्ये जाहिराती देण्यासाठी आणि नवनवीन पुस्तकांच्या माहितीसाठी संपर्क - घनश्याम पाटील, संपादक 'चपराक'.
व्हाट्सऍप क्रमांक - ८७६७९४१८५०
Email - Chaprak Email ID

One Thought to “संपादकीय”

  1. Pradnya karandikar Banglore

    योग्यच केलंत विचाराचं बीजं पेरणं चपराकने सातत्याने पेरले आहे आपली वाटचाल प्रशंसनीय अभिमानास्पद आहे चपराक परिवाराचा सदस्य असणे प्रत्येक लेखक कवी यांना गौरवास्पद असते गर्व वाटतो.आपले हे कार्य जोमाने पुढे जावं हिच शुभेच्छा
    या अडचणीच्या परिस्थितीचा सामना करत रसिक वाचकांचा हिरमोड होऊ नये म्हणून नेटाने जिद्दीने अंक पूर्ण करणे सोपे नव्हते ते तुम्ही करुन दाखवले ..सलाम तुम्हाला तुमच्या साहित्यिक सेवेला

तुमची प्रतिक्रिया जरूर कळवा

हे ही अवश्य वाचा