सातारा येथील लेखिका अनघा कारखानीस यांनी लिहिलेले ‘समईच्या शुभ्रकळ्या’ हे पुस्तक ‘चपराक’ने प्रकाशित केले. आपल्या विद्यार्थ्यांच्या जीवनावर आधारित सत्यकथा मांडल्याने मराठी साहित्यातील हा एक वेगळा प्रयोग झाला आहे. या पुस्तकाला सुप्रसिद्ध कवी आणि समीक्षक विश्वास वसेकर यांनी लिहिलेली ही प्रस्तावना. हे आणि ‘चपराक’ची इतरही उत्तमोत्तम पुस्तके घरपोहच मागण्यासाठी आमच्या www.chaprak.com या संकेतस्थळाला जरूर भेट द्या.
तुम्ही ‘कॉफी विथ करण’ हा कार्यक्रम कधी पाहिला आहे का? त्यात शेवटी करण जोहरने विचारलेल्या प्रश्नांना फारसा विचार न करता अतिजलद उत्तरं द्यावी लागतात. मी सुद्धा या कार्यक्रमात भाग घेण्याची तयारी पूर्ण केली आहे. वयाच्या पासष्टीत फारसे न घुटमळता सडेतोड उत्तरे देता आली पाहिजेत. आता तरी तुम्ही कुठल्याशा निष्कर्षाप्रत पोहोचले असले पाहिजे. मला मध्यरात्री झोपेतून उठवून ‘‘तुम्हाला सर्वाधिक आवडलेले पाच हिंदी चित्रपट कोणते?’’ असे विचारले तर मी विनाविलंब सांगेन ‘‘अंगुर, पडोसन, चुपके चुपके, प्यार किये जा आणि स्पर्श!’’
पुढे करण मला विचारेल, ‘‘हिमालय का सह्याद्री?’’
‘‘सह्याद्री.’’
‘‘परभणी का सातारा?’’
‘‘सातारा.’’
‘‘सातार्यामधली सर्वात आवडलेली व्यक्ती?’’
‘‘शिरीष चिटणीस वगैरे वगैरे…’’
मला शिरीष चिटणीसांचा असल्यामुळे सातारा आणि तो कुशीत असल्यामुळे सह्याद्री आवडतो! किंवा हे तिन्ही एकमेकांमुळे आवडतात.
या शिरीष चिटणीसांनी पहिल्या भेटीत मला आजवर न पाहिलेले पुष्पमंडित कास पठार दाखवले. त्यांचे छानसे फार्महाऊस दाखवले. उत्तमोत्तम पदार्थ चाखवले. माझी रसिकताच बहुमुखी आहे. सगळ्या क्षेत्रातले जे जे उत्तम, उदात्त, उन्नत, महन्मधुर आहे ते ते मला आवडते. ‘हर हसीन चीज का मैं तलबगार हॅूं!’ असो! शून्यातून स्वतःचे एक विश्व निर्माण केले आहे शिरीषभाईंनी. लेकिन, यह कहानी फिर सही!
मला एका शाळेला भेट देण्यासाठी शिरीषभाई घेऊन गेले. तेथील मुख्याध्यापिकेने हात जोडून स्वागत केले. माझ्या संज्ञाप्रवाहावर शब्द आले, इंदिवर, श्यामा. कार्यक्रमाला आधीच उशीर झाला होता. लगेच आम्ही हॉलवर गेलो. ‘जग सुंदर करण्याचा ध्यास’ या विषयावर मी भाषण देण्याचा प्रयत्न केला पण माझी खुलता कळी खुलेना! मध्येच मुख्याध्यापिकेने गडबड करणार्या एकीला मोजक्या शब्दात झापले. जणू मीच ती आहे असे वाटून मी गप्प गप्प झालो.
कार्यक्रम संपल्यावर अनेक विषयांवर बोलतं करण्याचा मी प्रयत्न केला. गाण्याच्या गोष्टी काढल्या, खाण्याच्या गोष्टी काढल्या. चांगल्या पुस्तकांविषयी बोललो (तर त्यांनी संबंधितांना ती नावे लिहून घेण्याची आज्ञा केली.) झाडांची चर्चा उपस्थित केली. फुलांच्या गप्पा काढल्या पण आता त्यांचीही कळी खुलेना. मी खूप विचार केला तेव्हा माझ्या लक्षात आलं की कापराला जसा एकच गंध असतो, एकच रूप असतं, एकच जीवनार्थ असतो तसं या बाईंचं आहे.
आमच्या परभणी जिल्ह्यात चारठाणा नावाचं फार सुंदर गाव आहे. ‘चारू स्थल’ या शब्दापासूनच मुळी त्याची व्युत्पत्ती आहे. तिथं महादेवाच्या मंदिरासमोर एक कुंड आहे. स्वच्छ पाण्यानं भरलेलं. त्या कुंडातील पाण्याच्या पृष्ठभागावर कोणतंही पान टाका बुडत नाही. फक्त महादेवाला प्रिय असणार्या बेलाचं पान तेवढं बुडतं. म्हणजे बाकी कोणतीही पवित्र वा सुंदर वनस्पती तिथं स्वीकारली जात नाही. फक्त बिल्वपत्र स्वीकारलं जातं. मला वाटलं या बाईचंही असंच आहे. ती इतकी इतकी आणि इतकी पराकोटीची शिक्षिका आहे की तिच्या व्यक्तिमत्त्वाची इतर सगळी अंगं लुप्त झालीत. ती कविता लिहील तर फक्त शिक्षणावर, झोपल्यानंतर स्वप्न पाहील तर फक्त शिक्षणाचं. तिच्या भावविश्वात फक्त आणि फक्त विद्यार्थी आहेत. चारठाण्याच्या कुंडासारखं इथं फक्त शिक्षणाचं पानच बुडतं. त्यांनी दिलेलं हस्तलिखित वाचल्यावर तर याची खात्रीच पटली.
हाडाचा शिक्षक हा शब्दप्रयोग शिक्षणक्षेत्रात जन्म गेलेल्या माझ्यासारख्यानं अनेकदा ऐकलेला असतो. मी कधी विचार केला नव्हता हा शब्दप्रयोग कसा तयार झाला असेल याचा. हाडांचे सबंध शरीराच्या बांधणीत अनन्यसाधारण असे स्थान असते. त्याच्या भोवतीच तर रक्तमांस लपेटून ते सिद्ध होते. माणसाच्या शरीरात रक्तमांस कितीही कमी असले तरी ‘हडकुळा’ का होईना माणूस उरतोच! पण हाडं नसलेला माणूस? शक्य नाही. माणसाला घरात, समाजात अनेक भूमिका निभवाव्या लागतात. तो कोणाचा तरी मुलगा असतो, भाऊ असतो, नवरा असतो, बाप असतो! या सगळ्या जबाबदार्या पार पाडण्यासाठी, पोटापाण्यासाठी त्याला काहीतरी कामधंदा करावा लागतो.
शिक्षक हा पोटापाण्यासाठी करावयाचा व्यवसाय नव्हे. पवित्र असे हे प्रोफेशन आहे. नोबेल प्रोफेशन म्हणून इतर कोणत्याही क्षेत्रात नोकरी करणार्यांपेक्षा शिक्षकाला समाजात विशेष मान असतो. प्राथमिक शाळेपासून पदव्युत्तर शिक्षणापर्यंत प्रत्येकाला अपरिहार्यपणे शिक्षक भेटतातच! आपण जितके मागे जाऊ तितके तिथले शिक्षक आपल्या मनात खोलवर रूजलेले असतात. प्रत्येक व्यक्तिच्या मनात प्रत्येक शिक्षकाचे सारखेच स्थान असते असे नाही. ते-ते शिक्षक आपल्या योग्यतेनुसार विद्यार्थ्यांच्या मनात हे स्थान निर्माण करतच असतात. यातले नव्वद-पंचाण्णव टक्के शिक्षक तेवढ्यापुरते तेवढेच आपल्या लक्षात असतात आणि नंतर वेगाने ते विस्मरणात जातात! कारण प्रत्येक शिक्षक हा काही ‘हाडाचा शिक्षक’ असत नाही. ‘हाडाचा शिक्षक’ तो ज्याच्या जीवनात विद्यार्थी आणि शिक्षण याखेरीज कशालाच फारसे स्थान असत नाही. त्याचे भावविश्व इतर नात्यांपेक्षा त्याच्याकडे शिकणार्या विद्यार्थ्यांनी गजबजून गेलेले असते. शाळेखेरीज रमावे असे त्यांच्या जीवनात दुसरे काहीही असत नाही. त्याच्या ध्यानी-मनी-स्वप्नी फक्त आणि फक्त त्याचा विद्यार्थीच असतो. फार दुर्मीळ असतात असे शिक्षक पण निश्चितपणे असतात. अनघा कारखानीस अशा हाडाच्या शिक्षिका आहेत.
आणखी एक शब्दप्रयोग, प्रस्तुत पुस्तकाच्या लेखिका अनघा कारखानीस यांच्या संदर्भात लागू पडणारा आहे. मातृहृदयाचा शिक्षक! ज्ञानेश्वर माऊली, साने गुुरूजी यांना लाभलेले हृदय मातृहृदय होते. आईचे अंतःकरण होते. सर्व नात्यांमध्ये आईचे नाते श्रेष्ठ असते. निरपेक्ष, निर्व्याज, समर्पित भावनेने, जीवनसर्वस्व ओतून आपल्या मुलांवर प्रेम करणारी ही फक्त आईच असते. आपल्या मुलांकडे ती जेव्हा प्रेमभरल्या नजरेने पाहते ना, ते फार पाहण्यासारखे आहे. माऊलींनी कासवीच्या नजरेची उपमा दिली आहे. कासवीण आपल्या पिलांकडे असे पाहते की तिच्या नुसत्या पाहण्यानेच ती भराभर, भराभर वाढतात! अन्नातून दिले जाणारे टॉनिक असते. विशेषतः झोपी गेलेल्या बाळांकडे जेव्हा ती तृप्त, वात्सल्यभरल्या नजरेने पाहते तेव्हा तिच्या पाहण्याकडे एकदा जरूर पहा. ‘निजल्या तान्ह्यावरी माऊली, दृष्टी सारखी धरी,’ असे कुठले पाहणे तुमच्या पाहण्यात आले नसेल तर अनघा कारखानीस जेव्हा त्यांच्या विद्यार्थ्यांकडे पाहत असतील तेव्हा त्यांच्या नकळत त्यांचे पाहणे पहा. मातृहृदयाचा शिक्षक काय असतो हे तुम्हाला कळेल. हाडाचा शिक्षक आणि मातृहृदयाच्या असणार्या अनघा कारखानीस यांना भेटणे ज्यांना शक्य नाही त्यांनी ‘समईच्या शुभ्र कळ्या’ हे पुस्तक वाचावे, म्हणजे माझे म्हणणे त्यांना तपशीलाने तर कळेलच शिवाय शंभर टक्के पटेलही!
प्रस्तुत पुस्तकातला पहिला लेख ‘रिमांड होम’मधील आठवणींचा आहे. गरीब, अडचणीच्या प्रसंगाने निराधार झालेली किंवा एखाद्या गुन्ह्यात सापडलेली मुले रिमांड होममध्ये असतात; पण लेखिका सहजपणे लिहून जाते..! रिमांड होममधील मुलांबरोबर काम करताना काही वेगळं वाटेल असं मला अजिबात वाटत नाही. पूर्वग्रहदूषित नसणं म्हणजे हे असं. निरभ्र असणं म्हणजे असं. निर्मळ असणं म्हणजेही हे असं. लेखिकेला या मुलांमध्ये गुन्हेगारी तर अजिबात दिसत नाही; त्याउलट ‘मुले कुठलीही असोत, ती तर निष्पापच असतात ना?’ असा त्यांचा सवाल आहे. इथल्या प्रत्येक मुलाची वेगळी कहाणी असते. ती समजून घेण्यामागे विकृत कुतूहल नसून व्यापक सहानुभूती आहे. याही मुलांमध्ये आपल्याला ‘माणूस’ घडवायचा आहे ही त्यांना जाणीव आहे. ही मुलेच आव्हानात्मक होती आणि त्यांना आपलंस करण्याचं आव्हान लेखिकेनं कसं पेललं ते मुळातून वाचण्यासारखं आहे.
विद्यार्थी हे आपले दैवत आहे असे शिक्षकांमध्ये म्हटले जाते. सुमन नावाच्या दैवताची पूजा लेखिकेने कशी केली हे दुसर्या कथेत वाचता येईल. या कथेचे आणि तिच्या नायिकेचे नाव सुमन आहे. कुणाच्या लक्षात न येता ती लेखिकेच्या टेबलावर कळ्या, फुले आणून ठेवायची. एक दिवस तिला विचारले, ‘‘का गं, ही फुलं तुझ्या अंगणातली का?’’
ती म्हणाली, ‘‘नाही, येता-जाता दिसणारी मी तुमच्यासाठी आणते.’’ एकदा ‘‘कळ्या तोडू नयेत’’ असं म्हणाल्यावरून सुमन फुलंच आणणं बंद करते. लेखिका त्याचे स्मरण देते तेव्हा सुमन फुलं पुन्हा आणायला लागते मात्र त्यात कळ्या नसतात. मुली बाईंचं बोललेलं कसं प्रत्येक वाक्य मनाला लावून घेतात पहा. त्यानंतर काही महिला फुलं तोडून नेणार्या मुलींची बाईंकडे तक्रार करतात. ही सुमन स्वतःच्या घरी कुंड्यात बाग फुलवते. त्याचे कारण नंतर कळते. तेव्हा आपलेही डोळे पाणावतात. गाव सोडून जाताना घरात वाढवलेली सगळी फुलझाडं सुमन बाईंना आणून देते तो प्रसंगही मन हेलावणारा आहे. ‘शंकरास पूजिले सुमनाने’ असं चारदा लिहून श्लेष अलंकाराचं उदाहरण आम्ही लहानपणी परीक्षेत लिहायचो. फूल, गहू, चांगले मन आणि विशेषनाम असे चार अर्थ. त्यातल्या तीन अर्थांनी सुमनने आपल्या बाईंची बांधलेली पूजा म्हणजे हा सुंदर लेख आहे.
प्रस्तुत पुस्तक क्रमाने वाचत जाताना हे जाणवते की प्रत्येक पुढचा लेख आधीच्यापेक्षा तुलनेने अधिक चांगला झाला आहे. प्रत्येक पुढच्या लेखातली विद्यार्थिनी किंवा विद्यार्थी आधीच्या सर्वापेक्षा वेगळा आणि वैशिष्ट्यपूर्ण असल्याचे वाटत राहते. ‘कुंडीतली फुलराणी’वरूनही हेच म्हणता येईल. रोज सकाळी फिरायला जाण्याचा परिपाठ असलेली लेखिका सतत जणू अप्रगत, शालाबाह्य मुलांच्या शोधातच असते. फिरताना एक दिवस फुलझाडांच्या कुंड्या विकणारे एक कुटुंब त्यांच्या नजरेत आले. फुले बघायला मिळतात म्हणून तिची नजर सारखी तिकडे जायची. एक दिवस त्यांच्यापैकी अक्षरशः तीनच वर्षांची मुलगी चालत-चालत रस्त्यापर्यंत आलेली त्यांना दिसते. तिच्याकडे कोणाचे लक्षही नसते. लेखिकेला काळजी वाटते काही विपरित घडण्याची. पालकांशी संवाद होतो आणि नंदिनी पाळणाघरात यायला लागते. झेंडावंदनाच्या वेळी तोतर्या, बोबड्या भाषेत भाषण करायला लागते. सगळीकडे पहिला नंबर मिळवायला लागते. स्वतःहून दिवटीवर अभ्यास करताना दिसते. केवळ कारखानीस यांच्यामुळे एक शालाबाह्य मुलगी हुषार मुलगी होऊ शकली. हे परिवर्तन या लेखात अनुभवणे मोठे सुखद आहे. त्यानंतरच्या ‘अबोध’ या कथेतही यथातथाच बुद्धी असणार्या सुमित या मुलामधले परिवर्तन पाहणेही असेच सुखद आहे.
‘परीस’ या लेखामध्ये फ्लॅशबॅकचं तंत्र वापरलं आहे. रस्त्याने भीक मागणार्या मुलांपैकी एक अकरा-बारा वर्षांची मुलगी लेखिका आपल्या त्या विशिष्ट नजरेने हेरते. भीक मागण्यापेक्षा तिला आणि तिच्या भावंडांना शाळेत यायला सुचवते. पुस्तकं, वह्या, दप्तर सगळं देईन म्हणते आणि वर रोज गरम-गरम, पोटभर जेवायला देईन म्हणते. सुनिता आणि तिची भावंडे त्याप्रमाणे शाळेत यायला तयार होतात.
एकदा लेखिका सर्वांना लाकुडतोड्याची गोष्ट सांगते आणि त्यांच्यावर प्रामाणिकपणाचा एक सूक्ष्म संस्कार करते. ज्या शाळेत आता तुम्ही आहात त्या शाळेत खूप श्रीमंतांची मुलं शिकतात. त्यांची एखादी वस्तू सापडली तर माझ्याकडे आणून द्यायची. काही पाहिजे असेल तर माझ्याकडे मागा; पण कुणी आपल्याला नावं ठेवायला नको असं बिंबवते.
मिळालेल्या संधीचं सुनितानं अक्षरशः सोनं केलं. अभ्यासात तिची झपाट्यानं प्रगती होत होती; पण एक दुर्दैवी घटना अचानक घडते जिच्यामुळे सगळी शाळा हादरून जाते. सुनितानं एका मुलीचं दप्तर मागून आणलेलं असतं. त्यातच मुलीच्या वडिलांनी आतल्या कप्प्यात पाच तोळ्यांची सोन्याची वळी ठेवलेली असते. चोरांनी तिजोरी फोडली तर त्यांना ते न मिळावं हाच हेतू; मात्र त्यांनी ते घरात कुणालाही सांगितलेलं नसतं. दुसर्या दिवशी त्या मुलीचे वडील शाळेत येऊन सुनिताची तक्रार करतात. ‘‘तुम्ही अशा मुलांना शाळेत का घेतलं? आमची मुलं बिघडतील’’ वगैरे वगैरे सुनावतात.
लेखिकेला रात्रभर झोप येत नाही. सुनिताचं घर माहीत नसल्यामुळं तिला कसं शोधायचं हाही प्रश्नच होता. थोड्या वेळानं दार वाजतं तर दारात सुनीता. काही बोलायच्या आत ती दागिने ठेवलेला रूमाल पुढं करते. लेखिकेनं पुढचा प्रसंग फार उत्कटतेनं रंगवला आहे. तो मुळात वाचण्यासारखा आहे.
लेखिकेजवळ घडवण्यायोग्य मुलं निवडून घेण्याची एक ‘निगाह’ आहे. या सर्वच लेखांमधून, कथांमधून आपल्याला ते प्रकर्षाने जाणवते.
माना के जाने जहॉं, लाखो में तुम एक हो
हमारी निगाह की भी, कुछ तो मगर दाद दो
बहारों को भी नाज, जिस फूलपर था
वही फूल हमने, चुना गुलसितॉं से।
हे गाणं एका वेगळ्या संदर्भात असलं तरी लेखिकेला लागू पडतं. तिनं शोषीत, उपेक्षित दलित समाजातली अशीच मुलं निवडली ज्यांचा पुढं समाजाला अभिमान वाटावा. ‘बहारों को भी नाज जिस फूल पर था, वही फूल अनघाने चुना गुलसितॉं से.’
अनघाजवळ प्रेम देण्याघेण्यासाठी जसं आसुसलेलं मन आहे तसंच अविकसित, अप्रगत मुलांकडे पाहण्याचा एक सकारात्मक दृष्टिकोन आहे. शैक्षणिक मानसशास्त्रामध्ये ‘प्रबलन’ आणि ‘ऋणप्रबलन’ या फार सुंदर संकल्पना आहेत. विद्यार्थ्यांच्या गुणांचे कौतुक करणे, त्यांना प्रोत्साहन देणे, त्यांच्या महत्त्वाकांक्षांना पाठबळ देणे, त्यांना जगण्याची नवी उमेद देणे या गुणाला म्हणायचे ‘प्रबलन’. लेखिकेच्या रोमरोमी हा गुण भरलेला आहे. याच्या उलट जे वागणे असते त्याला म्हणायचे ‘ऋण-प्रबलन’! मुलांना तुच्छतेने वागवणे, हिडिस-फिडिस करणे, ‘गप्प बस! आलाय मोठा शहाणा!’ असे सारखे बोलून त्यांची बोलती बंद करणे याला म्हणायचे ऋण-प्रबलन. लेखिकेला दुसरीत असताना अशीच एक वाईट शिक्षिका भेटली जिच्यामुळे त्या दुसरीत दोनदा नापास झाल्या. देव करो पिंगळे मॅडमसारखी शिक्षिका कुणालाही न मिळो! आणि देव करो अनघा मॅडमसारखी शिक्षिका सर्वांना मिळो.
अनघाजवळ तिच्या लहानपणच्या फार सुंदर आठवणी आहेत. ती आई ज्या मुलांना मिळाली नाही त्याचं त्यांना फार वाईट वाटतं आणि त्या आपल्या उत्कट कृतीयुक्तीद्वारा त्यांच्या जीवनातील या उणिवेची भरपाई करण्याचा प्रयत्न करतात. अगदी सुरूवातीला मी चारठाण्याच्या शिवमंदिरासमोरील शिवपिंडीचे जे उदाहरण दिले त्याचा अन्वयार्थ आता मी लावेल. तिच्या मनाच्या डोहात विद्यार्थी आणि शिक्षणाखेरीज कोणालाही स्थान नाही. कापराला जसा एकच एक सुगंध आणि एकच एक असं विमल रूप असतं तसं या लेखिकेच्या संवेदनशील स्वभावाला मातृत्वाचा गंध आणि शिक्षिकेचं रूप लाभलं आहे. पराकोटीचं मातृत्व आणि श्रेष्ठ दर्जाचं शिक्षकपण यांच्या रूपगंधानं भारलेले लेख म्हणजे ‘समईच्या शुभ्र कळ्या’मधील कथा आहेत.
– विश्वास वसेकर
सुप्रसिद्ध कवी आणि समीक्षकआमचे इतरही लेख वाचण्यासाठी, दर्जेदार पुस्तके विकत घेण्यासाठी www.chaprak.com ला भेट द्या. ‘चपराक प्रकाशन’चे फेसबुक पेजही जरूर लाईक करा. उत्तमोत्तम व्हिडीओ पाहण्यासाठी ‘चपराक’च्या युट्यूबला भेट द्या आणि सबस्क्राइबही नक्की करा.
Copyright @ www.chaprak.com / All Rights Reserved.
समईच्या शुभ्रकळ्या हे पुस्तक मी वाचले आहे. खूप छान अनुभव मांडले आहे.
खूपच प्रगल्भ प्रस्तावना आहे ही सर.