कुठे लाठीहल्ला, कुठे अश्रुधारांचा वापर, कुठे हवेत गोळीबार, कुठे प्रत्यक्ष गोळीबार झाला की सामान्य नागरिकांपासून ते राजकारण्यांपर्यंत, अगदी गल्ली ते दिल्ली जर कुणाला जबाबदार धरले जात असेल तर ते म्हणजे पोलीस यंत्रणेला! पण खरेच का प्रत्येकवेळी, प्रत्येक ठिकाणी पोलिसच जबाबदार असतात काय? बारा-पंधरा तास सेवा बजावणारे पोलीस इतके निर्दयी, निष्ठुर आहेत का की ते निष्पाप लोकाच्या जीवावर उठतील?
असे म्हणतात की नाण्याला दोन बाजू असतात. तद्वतच प्रत्येक घटनेलाही दुसरी बाजू असू शकते हे का कुणी लक्षात घेत नाही. पोलीस प्रत्येकवेळी ‘दिसला माणूस दे रट्टा’ अशा भूमिकेत असतात का? संरक्षक म्हणून ख्याती प्राप्त असलेले, जनतेचे मित्र अशी कीर्ती असलेले पोलीस अचानक शत्रूप्रमाणे का वागतात हेही पाहणे महत्त्वाचे आहे. प्रत्येकाच्या जीवनात घडलेले आणि घडणारे उदाहरण आपण घेऊया. घरातील लहान मुल सर्वांचेच आवडते असते पण जसजसे ते पालथे पडू लागते, बसू लागते, रांगू लागते, चालू लागते तसतसा त्याचा खेळकरपणा आणि खोडकरपणा वाढू लागतो. सुरुवातीला त्याचे होणारे कौतुक कळत नकळत रागात, चिडचिडेपणात बदलते. बाळाला एखादी गोष्ट करु नको असे प्रथम सांगताना त्याला कुणी शिव्या देणे, रागावणे किंवा मार देणे इथपर्यंत जात नाही. एक, दोन, तीन वेळा, चार वेळा, अनेकदा त्याला ती गोष्ट करु नको असे सांगितले जाते पण ते बाळही हट्टाला पेटलेले असते, जे करु नकोस असे मोठी माणसे सांगतात तरीही तीच गोष्ट करायला ते बाळ वारंवार धावते. एकप्रकारे ते त्याच्या जवळ असणाऱ्या माणसांच्या संयमाची परीक्षा घेते असे म्हटले तर ते अतिशयोक्तीचे ठरु नये. त्याचे लक्ष इतरत्र वळवण्याचे कितीही प्रयत्न केले तरीही ते बाळ त्याच गोष्टीकडे धाव घेते. मग त्या बाळावर ओरडणे सुरू होते. रागावणे सुरु होते. सुरुवातीला नकळत हात उगारला जातो. तरीही ते बाळ स्वतःचा हट्ट सोडत नाही हे पाहून मग मार द्यायला सुरुवात होते. हे सारे करायला ते बाळ पालकांना उद्युक्त करते असे म्हटले तर ते अनाठायी ठरु नये. सुरुवातीलाच मोठ्या माणसाने सांगितलेली गोष्ट बाळाने केली नाही, मोठ्यांचे ऐकले तर मग पुढील प्रकार आपोआप टळतात पण तसे घडत नाही. असे काहीसे पोलीस आणि जनता यांच्यामध्ये असलेल्या संबंधाचे असते.
जमावाला नियंत्रित करणे हे फार मोठे जोखमीचे, तितकेच नाजूक काम असते. कारण अनेकदा जमावाला जात नसते, धर्म नसतो ह्यामागचे कारण असे की अमुक एका पक्षाचा ध्वज, त्या रंगाचे कपडे घातले, तशा टोप्या घातल्या म्हणजे माणूस त्या धर्माचा होत नाही कारण कोणताही धर्म हिंसेचे, गुंडगिरीचे समर्थन करत नाही. एखाद्या विशिष्ट धर्माची शिकवण, नियम आचरणात आणणे, धर्मात सांगितल्याप्रमाणे माणुसकीने वागणे ह्या गोष्टी अंगीकृत करणे म्हणजे त्या धर्माचे, त्या संप्रदायाचे आपण पाईक आहोत असा अर्थ घेतला तर तो अनाठायी ठरु नये. एखाद्या धर्माला आपण स्वीकारणे आणि एखाद्या धर्माने आपणास स्वीकारणे ह्यामध्ये फार मोठे अंतर आहे. हा विषय तसा फार मोठा आणि गहन आहे.
जमावाला विशिष्ट चेहराही नसतो. साध्या कारणामुळे एक एक माणूस जमत जातो आणि वाहत्या गंगेत हात धुऊन घ्यावेत त्याप्रमाणे कोणताही सारासार विचार न करता, कोणतेही तथ्य विचारात न घेता त्या कृत्यात शरीक होतात. अशी जमलेली गर्दी नेताहीन असते. गर्दीला नियंत्रित करु शकेल असा नेता तिथे नसतो. किंवा कुणी नियंत्रित करुच पाहत असेल तर त्याचे कुणी ऐकत नाही. होश धुळीला मिळवून जोश मिळविलेल्या माणसांना नक्की काय घडलेय हेही माहिती नसते परंतु अनेक जण त्यात पडतात, त्या भांडणापासून, त्या दंगलीपासून स्वतःला अलग ठेवू शकत नाहीत आणि म्हणून पुढील घटना कुणी टाळू शकत नाही. जेव्हा घटनेची सुरुवात असते त्याचवेळी जमावाला नियंत्रित करता येऊ शकते परंतु अनेकदा शहरातील एका कोपऱ्यात, छोट्या गल्लीत घडत असलेल्या घटनेच्या ठिकाणी पोहोचायला पोलिसांना थोडावेळ लागतोच. यावेळेत जमावाला नियंत्रित करणारा तिथे कुणीतरी हवा असतो. पण तसे घडत नाही. अनेक वेळा जो नियंत्रणात आणू शकतो अशीच व्यक्ती तिथे उन्माद कसा पसरेल, दंगल कशी भडकेल, माथेफिरुंची टाळकी कशी बेभान होतील हेच पाहते त्यामुळे पोलीस तिथे पोहोचेपर्यंत माथेफिरुंनी थैमान घातलेले असते. कुणीतरी त्यास जातीयवादाची, धार्मिकतेची फोडणी देते आणि मग तिथले वातावरण अधिकच हिंसक बनते. अशा वातावरणात पोलीस तिथे पोहोचतात परंतु तिथली परिस्थिती तोपर्यंत अधिक चिघळलेली असते. त्या ठिकाणच्या जमावाला नियंत्रित करताना पोलीस सरळसरळ कुणाच्याही शरीराचा वेध घेत नाहीत. एक-एक सोपस्कार पूर्ण करुनही जमाव नियंत्रणात येत नाही. आपला हट्ट सोडत नाही. लावलेले अडथळे दूर करून त्याच्या लक्ष्याच्या दिशेने कुच करताना पाहून आणि प्रसंगी जमावाला शांत राहण्याचे आवाहन, प्रयत्न केल्यानंतर आणि ज्यावेळी जमाव पोलिसांच्या अंगावर धावून जाण्याचा, त्यांना इजा पोहोचविण्याचा प्रयत्न करतो त्यावेळी नाइलाजाने पोलीस स्वतःचा बचाव करण्यासाठी त्यांच्याकडे असलेले एक एक करत सारे हथकंडे, आयुधे वापरतात. दूरदर्शनवर आपण काश्मीरमधील पोलिसांवर होणारी दगडफेक पाहत असतो. तिथे का नेहमी पोलिसच दोषी असतात? जमाव, झुंड या माध्यमातून एकत्र जमलेला प्रत्येक जण तिथे शेर असतो. त्याच्यामध्ये एक वेगळे धाडस निर्माण होते तो स्वतःला काही वेगळेच समजतो. त्याला समजवणारी व्यक्ती, पोलीस त्याचा दृष्टीने तुच्छ असतात या भावनेने तो अधिक आक्रमक होतो. प्रसंगी पोलिसांना शिव्या देत त्यांच्यावर आक्रमणही करतो. काही वेळा पोलीसही निष्कारण आक्रमक होत असतील, नाही असे नाही पण अशा घटना त्यामानाने नगण्य असतात.
यासाठी आपण दोन उदाहरणे लक्षात घेऊया. १६ – १७ जुलैला दिल्लीत एक घटना घडली. विविध वाहिन्यांवर त्या घटनेचे झालेले थेट प्रक्षेपण आणि नंतर झालेल्या चर्चा आपण सर्वांनी अनुभवल्या आहेत. एक निवृत्त अधिकारी आपल्या पत्नीसह दुचाकीवरून जात असताना त्याने हेल्मेट घातले नाही म्हणून वाहतूक पोलीस त्याला थांबण्याचा इशारा करतो. चालक गाडी बाजूला घेत असताना त्याच्या मागे बसलेली पत्नी खाली उतरून पोलिसांसोबत वाद घालते, त्याच्याशी धक्काबुक्की करते. त्याच्या हाताला हिसके देते. तरीही तो पोलीस शांतपणे त्या चालकाला गाडी बाजूस घ्यायला सुचवत असतो. त्याप्रसंगी त्या पोलिसाचा संयम सुटला असता तर? त्यानेही केवळ समोर महिला आहे म्हणून प्रकरण शांतपणे हाताळले. कदाचित त्या बाईचा चालक नवरा पोलिसासोबत हुज्जत घालत असता किंवा पोलिसाच्या अंगावर धावून गेला असता तर कदाचित त्या पोलिसाचा संयम सुटला असता, हातातील काठीचा त्याने वापर केला असता तर? त्या घटनेचा उद्रेक झाला असता, नेहमीप्रमाणे इतर नागरिक केवळ महिलेसोबत पोलीस वाद घालतोय म्हणून त्या जोडप्याच्या मागे उभे राहिले असते तर प्रकरण कोणत्या थराला गेले असते? या घटनेत चूक कुणाची? नागरिक जर हातात कायदा घेऊन पोलिसांना सतावत असतील, त्रास देत असतील, त्यांच्या अंगचटीला जात असतील तर त्या घटनेला जबाबदार कोण? या बाबींचाही विचार होणे गरजेचे आहे.
दुसरी एक घटना अशीच पोलिसांसोबत एका दारुड्याने केलेल्या मुजोरीची. त्या दिवशी मी सहकुटुंब पुणे ते हैदराबाद असा प्रवास करण्यासाठी म्हणून पुणे रेल्वेस्थानकावर आलो होतो. हैदराबाद जाणाऱ्या रेल्वेची प्रतीक्षा करत असताना समोरच्या फलाटावर एक लोकल रेल्वे येऊन थांबली. एक दारूडा झोकांड्या देत पण झोकात एका डब्यात शिरला. तो डबा महिलांसाठी राखीव होता. ते लक्षात आल्यावरही ते महाशय डबा सोडायला तयार नव्हता उलट त्याला उसना जोर आला. ती गोष्ट स्थानकावर गस्त घालणाऱ्या पोलिसांच्या लक्षात आली. साध्या वेषातील एक पोलीस डब्यात गेला. त्याने त्याला समजावून खाली आणताना तो बडबडत होता,
“बायांचा डब्बा झाला म्हणून काय झाले? आम्ही कोठे बसावे? बायांची अशी मुजोरी काय कामाची? उतरत नाही जा.”
“दादा, अशाने पोलीस येतील…” तो पोलीस समजून सांगत असताना तोंडातून लाळ गळत असतानाही विद्रूप, गगनभेदी हास्य करत तो दारुडा म्हणाला,
“पोलीस? काय करणार? त्याला भितो कोण?…” असे ओरडत खिशातून मोबाईल काढून त्या साध्या वेषातील पोलिसाला दाखवून कुत्सितपणे म्हणाला,
“हे काय आहे? मोबाईल! एक कॉल केला ना तर हे… हे पोलीस मला सलाम करतील…” असे म्हणत तो दारुडा त्या पोलिसासोबत डब्याखाली उतरताच तिथे गणवेशात असलेले पोलीस पाहून तो इसम जास्तच चेकाळून म्हणाला,
“या.. या पोलिसांना भितोच कोण? हे करणार काय?…” खिश्यातून पन्नास रुपयाची नोट काढून पोलिसांना दाखवत म्हणाला, “बस होईल ना? पाहिजेत अजून?” तितक्यात एक पोलीस त्याच्या हाताला धरून म्हणाला,
“बरे. बरे. साहेब, चला तिकडे. आपण बोलूया.”पोलिसाच्या हाताला झटका देत इतर प्रवाशांकडे पाहात तो म्हणाला,
“येत नाही जा. काय करायचे ते करा. अंगाला हात लावायाचा नाही. हात धरायचा नाही हं सांगून ठेवतो… तुमच्यासारखे पोलीस खिशात घेऊन फिरतो. काय समजता स्वतःला?”
“आम्ही स्वतःला काही समजत नाही. एक कर, तू आता इथून लवकर जा.”
“का जाऊ? कुणाच्या बापाचे हे रेल्वेस्टेशन नाही. काय म्हणता?”
“काही नाही बाबा. हा महिलांसाठी डबा आहे. तू त्यात का गेला होता?”
“तोंड सांभाळून बोला हं. सांगून ठेवतो. अरे -तुरे करायचं नाही…”
“काय करशील ? कशाला दारू पिऊन आलास?” एका पोलिसाने शांतपणे विचारले.
“होय. मी दारु पिलोय. माझ्या खर्चाने पिलो. तुझ्या बापाच्या …” एवढे म्हणायला अवकाश बाप काढला म्हणून खवळलेल्या पोलिसाने मग मात्र हातातल्या दांडुक्याचा मनसोक्त वापर सुरु केला. इथे पोलिसांची काही चूक होती का? पाच-सहा पोलीस असूनही तो इसम नसलेली मर्दुमकी दाखवत होता. तेही पोलीस शांतपणे ऐकत होते, सहन करत होते, त्याला समजावण्याचा प्रयत्न करीत होते. आजकाल बालवाडीत शिकणारे मुलही त्याच्या वयाच्या मुलाने ‘बाप’ काढलेला सहन करत नाही. मग तिथे तर प्रत्यक्ष पोलीस होते. दारुड्याच्या प्रत्येक गोष्टीकडे कानाडोळा करत असताना त्याने पोलिसाचा बाप काढलेली गोष्ट समर्थनीय आहे का? कुणी सहन करेल काय? प्रत्येक क्षेत्रात अशा घटना घडत असतात. प्रत्येकवेळी संबंधिताकडून परिस्थिती तशी निर्माण केली जाते आणि मग समोर कितीही जबाबदार, शांत, संयमी व्यक्ती असली तरीही तिचा संयम संपतो. सहन करण्याचीही एक वेळ असते, शक्ती असते. संयम संपला की मग मात्र माणूस असो की, पोलीस असो सारे विसरल्या जाते. पोलीस एक यंत्रणा असेल पण पोलीस मात्र एक माणूसच आहे. तो यंत्र किंवा रोबोट नाही आहे. त्याची, त्याच्या सहनशक्तीची परीक्षा पाहणे केव्हाही घातकच असते.
गुन्हेगार असेल किंवा नसेल एखाद्या वेळी सामान्य माणसाचीही पोलिसांसोबत हुज्जत घालण्याची हिंमत का होते? वीस-पंचवीस वर्षांपूर्वी पोलीसांच्या वाहनाचा आवाज जरी आला किंवा पोलीस दिसला तरी गावातील लोक त्यांच्यापासून दूर जायला बघत होते, तिथे आपोआप शांतता निर्माण होत असे पण आज ती परिस्थिती राहिली नाही. आज प्रत्येकालाच हे चांगले माहिती की आज पोलिसांच्या विरोधात, पोलिसांना आपल्यासाठी माघार घ्यायला लावणारे कुणीतरी आहे. कुणीतरी कुणाचा हस्तक असतो मग तो याच्यासाठी सरकार दरबारी दस्तक देतो आणि मग आपोआप सुटका होते. काही वेळा तर समोर उद्भवलेल्या, हाताबाहेर जाऊ पाहणाऱ्या परिस्थितीला सावरण्यासाठी पुढील पाऊल टाकण्यासाठी पोलिसांना आपल्या वरिष्ठांच्या आदेशाची वाट पाहावी लागते. असा आदेश येईपर्यंत परिस्थिती पार बिघडून गेलेली असते, चिघळलेली असते अशी परिस्थितीही पोलिसांना आक्रमक बनवते. विरोधकांना, प्रचार माध्यमांना केवळ पोलिसी अत्याचार दिसतो, ते पोलिसांच्या नावाने शंख करतात पण ती परिस्थिती का ओढवली, पोलिसांना तो प्रकार का करावा लागला याकडे कुणी गांभीर्याने बघत नाही.
पोलीस हाही आधी माणूसच आहे. नंतर तो पोलीस आहे. पोलिसांजवळही माणुसकी आहे. फक्त ती योग्यवेळी, योग्य ठिकाणी व्यक्त करु द्यायला हवी. त्यांच्या कामात अडथळा निर्माण न करता, हाताबाहेर जाऊ पाहणारी परिस्थिती काबूत आणण्यासाठी पोलिसांना मदत करणे हेही जनतेचे कर्तव्यच आहे…
नागेश सू. शेवाळकर
९८३४५४८१६६
आमचे इतरही लेख वाचण्यासाठी, दर्जेदार पुस्तके विकत घेण्यासाठी www.chaprak.com ला भेट द्या. ‘चपराक प्रकाशन’चे फेसबुक पेजही जरूर लाईक करा. उत्तमोत्तम व्हिडीओ पाहण्यासाठी ‘चपराक’च्या युट्यूबला भेट द्या आणि सबस्क्राइबही नक्की करा.
Copyright @ www.chaprak.com / All Rights Reserved.
चांगला आहे लेख.
धन्यवाद!
शेवाळकर सर … नेहेमी प्रमाणे सुंदर लेख. पोलिसांच्या या दुसऱ्या बाजूचा फार कमी लोक विचार करतात. त्यांच्यातही एक माणूस असतो याचा फार थोडेजण विचार करतात. पोलिसांना व्हिलन ठरवणं सोपं असतं. आणि हे काम मागचा पुढचा विचार न करता केवळ टीआरपी साठी माध्यमं करत असतात. देव त्यांना सद्बुद्धी देवो!
मनःपूर्वक धन्यवाद!
शेवाळकर सर, तुम्ही पोलिसांची मानसिकता अचूक ओळखली. तुमच्यासारखा सूक्ष्म विचार करणारे लोक फार कमी आहेत. आज सर्वसामान्य लोकांचीच मानसिकता बदलली आहे. पोलीस मात्र जिथं आहे तिथंच आहे. त्यांच्या असंख्य समस्यांचा विचार स्वतः पोलीस कमिश्नरही करत नाही. फक्त त्यांना बंदोबस्तासाठी राबवून घेतले जाते ही वस्तुस्थिती आहे! आपल्यासमोर कोरोनाचं बोलकं उदाहरण आहे. कोरोना सुरू झाल्यानंतर ५५ वरील वय असलेल्या पोलिसांना बाहेर बंदोबस्त देऊ नये हा राज्य शासनाचा असूनही आज संपूर्ण महाराष्ट्रात उलट स्थिती बघायला मिळते. कोरोनामुळे जीव गमावलेले बरेच पोलीस ५५ च्या वरचे होते. तसेच ५५ च्या वरील पोलीस अजूनही त्यांची ड्युटी बाहेर बंदोबस्तात करत आहेत. ‘तोंड दाबून बुक्क्यांचा मार’ अशीच एकंदरीत परिस्थिती आहे! शेवटी एवढंच सांगायचं आहे, एक दोन टक्के बेइमानी करणाऱ्या पोलिसांमुळे बाकी अख्खं पोलीस खातं नाहक बदनाम होत असते!