मराठी माणसाचा ‘शेअर’ चढताच!

मराठी माणूस उद्योगधंद्यात मागे पडतो’, असं म्हटलं जातं. हे खरं आहे का? शेअर मार्केटमध्येही गुजराती-मारवाडी माणूसच पुढे आहे, असा गैरसमज उराशी बाळगून अनेकजण न्यूनगंडात का राहतात? मराठी माणसाचा शेअर नेमका कसा आणि किती वाढतो आहे, याबाबतचा डोळे उघडणारा आणि सकारात्मक चर्चा करणारा हा लेख. कालनिर्णयचे संचालक श्री. जयेंद्र साळगांवकर यांनी टिपलेले हे वास्तव निश्चितच प्रेरणादायी आहे. जरूर ऐका. अशाच उत्तमोत्तम साहित्याचा आनंद घेण्यासाठी ‘चपराक’ युट्युब चॅनेल नक्की सबस्क्राईब करा…

हा लेख ऐकण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

सकाळी वर्तमानपत्र वाचून झाले की, वाचनात आलेल्या काही गोष्टींबाबत चर्चा करण्यासाठी नेहमीप्रमाणे मी मराठीतील नामवंत लेखक असलेल्या एका मित्रांना त्यांच्या मोबाईलवर फोन केला तर त्यांच्या पत्नीने सांगितले की, ‘‘साहेब घाईत आहेत, दुपारी फोन करा…’’ हा अनुभव सतत दोन-चार दिवस आल्यानंतर मी चौकस बुद्धिने विचारणा केली की, ‘‘मित्रवर्य नव्या कादंबरीच्या वगैरे लेखनात आहेत की काय…?’’ तेव्हा वहिनी म्हणाल्या, ‘‘नाही हो, सकाळी ते घाईत असतात कारण शेअर बाजार उघडताना कंम्प्युटरसमोर बसून असतात. त्यांचे व्यवहार आटोपले की मग दुपारी अन्य कामाला लागतात’’ आणि वहिनींनी एक सूचनाही मला पुन्हा केली, ‘‘पुन्हा संध्याकाळी तीनच्या दरम्यान फोन करू नका, कारण लेखक महोदय पुन्हा शेअर मार्केटमध्येच गुंतलेले असतात.’’ असे सांगताना वहिनी म्हणाल्या की, ‘‘बरं आहे या वयात पैसे कमावतातच पण त्याहीपेक्षा अल्झायमर आणि डिमेंशिया यासारख्या आजारांपासूनचा धोकाही कमी होतो.’’

प्राध्यापक म्हणून निवृत्ती घेतल्यानंतर आणि लेखक, कवी असा नावलौकिक मिळाल्यानंतर एका मराठी लेखकाचा हा दिनक्रम ऐकला आणि मला यावेळच्या दिवाळी अंकासाठीचा विषय सुचला. कारण मराठी माणूस शेअर बाजारात कुठे आहे? या सर्वसामान्य विचाराला मिळालेली ही मोठी ‘चपराक’ होती. मी त्याच अंगाने आज मराठी माणसाचे आर्थिक प्रगतीपुस्तक उलगडून दाखवणार आहे.

मराठी माणसाला अनेक वेळा बदनामच केले गेले. उद्योग-व्यापारात मराठी माणूस नाही, मराठी माणूस शेअर बाजारात नाही, असा ढोबळ शेरा मारला गेला! पण नीट बारकावे तपासून पाहिले तर मराठी माणूस केवळ आठवडी बाजारापुरता मर्यादित नाही, तर तो शेअर बाजारातही आपले भक्कम पाय रोवून उभा आहे. मुळात हे आपण समजून घ्यावे लागेल की, नॅशनल स्टॉक एक्सस्चेंजची स्थापनाच डॉ. आर. एच. पाटील या मराठी माणसानेच केली असून अर्थशास्त्रात प्रावीण्य मिळविलेल्या डॉ. पाटील यांच्या हुशारीवरच नॅशनल स्टॉक एक्सस्चेंजची पायाभरणी झाली आहे. सन 2022च्या आकडेवारीनुसार भारतात सुमारे 10 कोटी डिमॅट खाती असून यातील सर्वाधिक खाती ही महाराष्ट्रातील आहेत. त्यामुळे मुंबईसारख्या शहरात जिथे शेअर बाजाराची वास्तू उभी आहे त्या शहरात मराठी माणसाची शेअरमध्ये गुंतवणूकच नाही, असे म्हणणे भाबडेपणाचे ठरेल. हे मान्य आहे की, शेअरमध्ये असणारा धोका पत्करणारी मराठी माणसे कमी आहेत, म्हणून ती त्या मार्केटमध्येच नाहीत असे नाही. फक्त मराठी माणसाने आपली ओळख तशी निर्माण केली नाही. मैदानात तलवार गाजवण्याची मर्दानगी करणारा, बळकट, सह्याद्रीचा बुलंद आवाज म्हणजे मराठी माणूस अशी ओळख जी इतिहासाने निर्माण करून दिली, तीच ओळख घेऊन मराठी माणूस आजही जगतो आहे. त्याला ते भूषणावह वाटते. त्यामुळे शेअर बाजारात आपण गुंतवणूक करतो, दलाली करतो ही ओळख होर्डिंग लावून आमच्या मराठी माणसाने कधी निर्माण केली नाही.

शेअर बाजार असो वा व्यापार यामध्ये गुजराती आणि मारवाडी माणसाचे प्राबल्य आहे, असे मानले जाते. काही अंशी हे खरेही असेल कारण या समाजाकडे धोका पत्करण्याची धाडसी वृत्ती आहे पण म्हणून मराठी माणूस यामध्ये नाही असे नाही. आता नवनवीन माहिती समोर येते आहे. त्यामध्ये महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेश ही दोन राज्ये आकडेवारीनुसार परस्परांमध्ये स्पर्धा करीत आहेत. या दोन राज्यांच्या तुलनेत गुजरात तिसर्‍या क्रमांकावर आहे.

जे डी पराडकर यांचे कसबा डायरी हे पुस्तक मागविण्यासाठी येथे क्लिक करा

शेअर बाजारात आज महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेश या दोन राज्यात प्रचंड चुरस दिसून येते आहे. बॉम्बे स्टॉक एक्सचेंजच्या जून 2023च्या आकडेवारीनुसार उत्तर प्रदेशातून 35 लाख नवी खाती उघडली गेली असून महाराष्ट्रातील खात्यांची संख्या 44 लाख आहे. गुजरातमधून 17 लाख नवी खाती उघडण्यात आली आहेत. 2023च्या आकडेवारीनुसार शेअर बाजारात डिमॅट खाते उघडण्यात महाराष्ट्रातील वाढ ही 20 टक्के असून यामध्ये महिलांची संख्या मोठी आहे. महाराष्ट्रात ब्रोकिंग कंपन्यांची संख्या ही 7 हजार 309 असून उत्तर प्रदेशची संख्या ही 6 हजार 693 तर गुजरातची संख्या 5 हजार 709, कर्नाटकची 3 हजार 742, पश्चिम बंगालची 3 हजार 561 एवढी आहे. ही सगळी आकडेवारी पब्लिक डोमेवर आज उपलब्ध आहे.

खरंतर कोरोना आजाराने ज्यावेळी जगाचे कंबरडे सर्वार्थाने मोडले त्यानंतर जग नव्याने अनेक गोष्टी शिकले. जेव्हा कोरोनामध्ये सगळा व्यापार ठप्प होता, त्यावेळी शेअर बाजार मात्र सुरू होता. घरबसल्या अनेक जण शेअर बाजारात आपले नशीब अजमावत होते. कोरोना काळातील म्हणजे 2021ची आकडेवारी पाहिली तर असे लक्षात येते की, या काळात शेअर बाजारात गुंतवणूदारांची संख्या झपाट्याने वाढली. या काळात दर महिन्याला 10 लाख डिमॅट खाती उघडली जात होती. त्या काळातसुद्धा दोन राज्य शेअर बाजारात पैसा गुंतवण्यात सर्वात आघाडीवर होती. ती दोन राज्ये म्हणजे महाराष्ट्र आणि गुजरात होय. तर बिहारसारखे राज्यसुद्धा या काळात शेअर बाजारात आघाडी घेत होते.

बीएसईच्या आकडेवारीनुसार महाराष्ट्र आणि गुजरात या दोन राज्यातील गुंतवणूकदारांची संख्या 1 कोटीपेक्षा जास्त असून पहिल्या स्थानावर असणार्‍या महाराष्ट्रातील गुंतवणूकदारांची संख्या 1 कोटी 9 लाख एवढी होती, तर गुजरात दोन नंबरवर होते. त्या राज्यातील नोंदणीकृत गुंतवणूकदारांची संख्या 1 कोटी 1 लाख होती.

खरंतर महाराष्ट्र आणि मराठी माणसाचे शेअर बाजारातील नेमके स्थान काय? हे या आकडेवारीवरून स्पष्ट होते. केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकार आल्यानंतर देशात एका क्रांतीला सुरूवात झाली असून यामध्ये सर्वच क्षेत्रात अनेक बदल होत आहेत. स्वाभाविकत: याचे सकारात्मक परिणाम शेअर बाजारात दिसून येत आहेत. बँकामधील गुंतवणूकीचे दिवसागणिक घसरत जाणारे व्याजदर आणि छोट्या बँकांमध्ये होणारे घोटाळे यामुळे एक काळ सुरक्षित गुंतवणुकीचा मार्ग असलेल्या बँकांवरचा विश्वास कमी होतो की काय अशी स्थिती आहे. अशा वेळी थोडा धोका पत्करून गुंतवणूकदार आता शेअर बाजाराकडे वळतो आहे. यामध्ये मराठी माणूस आघाडीवर आहे. निवृत्त झालेले अनेक जण आज कमी रक्कम का होईना पण शेअर बाजारात गुंतवून आपले नशीब आजमावत आहेत. वर्तमानपत्रात अशा गुंतवणुकीतून मोठी रक्कम मिळवल्याच्या बातम्याही आता येऊ लागल्या आहेत. त्यामुळे मराठी माणसात आता आर्थिक साक्षरता झपाट्याने वाढत आहे. शेतकरी कुटुंबातील नवी पिढीसुद्धा आता शेअर बाजारात उतरू लागली आहे. खेड्यापाड्यात शिक्षण पोहोचले तसेच इंटरनेट आणि अनेक साधने पोहोचली. त्यामुळे आर्थिक साक्षरतेचे प्रमाण झपाट्याने वाढू लागले आहे. ‘गोष्ट पैशापाण्याची’ हे पुस्तक नुकतेच मराठीतून प्रकाशित झाले. त्याच्या लाखो प्रती हातोहात संपल्या. बरं, या पुस्तकाचे लेखक प्रफुल्ल वानखेडे हे कोणी अर्थतज्ज्ञ आहेत असेही नाही. ते गेल्या दोन दशकापासून औष्णिक ऊर्जा, विविध इंधनाचे सुरक्षित ज्वलन आणि ऊर्जा संवर्धन या क्षेत्रात काम करणारे उद्योजक आहेत. त्यांच्या या पुस्तकाने ज्या पद्धतीने मराठीत विक्रीचे उच्चांक मोडले त्यावरून महाराष्ट्रातील नव्या वाचकाचा कल काय हे समजू शकते. शेअर बाजारावरील इंग्रजी आणि अन्य भाषेतील पुस्तके मराठीत अनुवादित होत असून त्यांचीही मागणी वाढते आहे. हे कशाचे द्योतक आहे? आज यूट्यूबवर शेअर बाजाराविषयी मार्गदर्शन करणारे अनेक ब्लॉग आहेत. रचना रानडे यांचा ब्लॉग तर लोकप्रिय आहे. बरोबर कोरोनाच्या काळाच्या दरम्यान 2019 मध्ये सुरू झालेला हा यूट्यूब ब्लॉग तीन-साडेतीन वर्षांत 4 मिलियन सबस्क्रायबर मिळवतो, यावरून या विषयाची उत्सुकता महाराष्ट्रात किती आहे, हे स्पष्ट होते. विशेष म्हणजे रिझर्व्ह बँक आणि नाबार्डसारख्या संस्था महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात आर्थिक साक्षरता अभियान राबवत आहेत. चंद्रपूर, पालघर यासारख्या आदिवासी भागात अशी अभियाने राबविली गेली. त्याला उत्तम प्रतिसाद मिळाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘जनधन योजनेत’ खाती उघडण्याचे आवाहन केले त्याला प्रचंड प्रतिसाद मिळाला. देशात या योजनेत 47 कोटी खाती उघडण्यात आली. ज्या माध्यमातून बँकिंग क्षेत्राच्या बाहेर असणारे बँकेच्या प्रवाहात आले. यातूनच आर्थिक साक्षरतेचे प्रमाण वाढत गेले. तसेच दुसरीकडे डिजिटल पेमेंटचे प्रमाण आपल्याकडे वाढत असून 2022 मार्चच्या आकडेवारीनुसार देशात डिजिटल पेमेंट करणार्‍यांची संख्या 91 टक्क्यांनी वाढली. त्यामुळे या वर्षीचा भारताचा डिजिटल पेमेंटचा व्यवहार हा सुमारे 89.5 मिलियन असून चीनलासुद्धा देशाने मागे टाकले आहे. भारतामध्ये केलेल्या पाहणीमध्ये महाराष्ट्र हे राज्य याही बाबतीत आघाडीवर आहे. आज बाजारात साधी कोथिंबीरीची जुडी घेताना आणि रिक्षाला पैसे देताना किंवा वडापाव अथवा पानटपरीवर सिगारेट घेतानासुद्धा डिजिटल पेमेंट केले जाते. ही सगळी आकडेवारी सांगण्याचे कारणच हे आहे की, यातून आपल्या देशाची आणि राज्याची आर्थिक साक्षरता कशी झपाट्याने वाढते आहे हे यातून लक्षात येते. जे राज्य एक काळ निरक्षरांना साक्षर करण्यासाठी ‘राष्ट्रीय साक्षर अभियान’ राबवत होते ते महाराष्ट्र राज्य आज आर्थिक साक्षरता अभियान राबवित आहे. यातूनच मराठी माणसाचा आणि ग्रामीण महाराष्ट्राच्या शेअर बाजाराकडे बघण्याचा दृष्टिकोन झपाट्याने बदलत आहे.

‘इस्लाम खतरे में है’ हे पुस्तक मागविण्यासाठी येथे क्लिक करा

आपल्याला कोरोनामुळे अनेक गोष्टी नव्याने कळल्या. त्या काळात झालेले नुकसान हे वैयक्तिक पातळीवर असो वा देशाच्या पातळीवर असो ते कधीही न भरून निघणारे आहे; पण त्याच काळात काही चांगल्या गोष्टीदेखील घडल्या. त्या बाबी छोट्या आहेत, पण त्या एका नव्या आर्थिक प्रगतीच्या वाटा चोखंदळणार्‍या आहेत. कोरोना काळात लागलेल्या लॉकडाऊनमुळे उद्योग-व्यापार बंद झाले. याचा मोठा फटका सगळ्यांना बसला, पण संकटातून संधी शोधणारे याही काळात धडपडत होते. याच काळात आमच्या कोकणातील पौरोहित्य करणारे अनेक गुरूजी शेअर बाजाराकडे वळले. त्यांनी चार पैसे कमावले. याची अनेक उदाहरणे देता येतील. याच काळात नोकरदार वर्गाला घरी बसूनच काम करावे लागत असल्याने आपल्या महाराष्ट्रातील नोकरदार वर्गही मोठ्या प्रमाणात शेअर बाजाराकडे वळला. विशेष बाब म्हणजे यामध्ये महिलांची संख्या लक्षणीय होती. या काळात किरकोळ गुंतवणुकीमध्ये 56 टक्क्यांनी वाढ झाली होती, तर एप्रिल ते सप्टेंबर 2020 या काळात 63 लाख नवी डिमॅट खाती उघडली गेली होती. ही वाढ मागील वर्षाच्या तुलनेत 103 टक्के एवढी होती. भारतातील सर्वात मोठी ट्रेडिंग अकाऊंट डिपॉझिटरी सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस लिमिटेडनुसार गुंतवणूकदारांनी सन 2020च्या पहिल्या नऊ महिन्यांत 50 लाख नवीन डिमॅट खाती उघडली. यामध्ये महाराष्ट्र अर्थात आघाडीवर होताच. विशेषत: यामध्ये 33 वयोगटापर्यंतच्या महिलांचा समावेश मोठा होता. उदाहरण द्यायचे झाले तर जे रोधाने कोरोना काळात शेअर बाजार गुंतवणुकीवर शिकवणी सुरू केली. त्याला प्रचंड प्रतिसाद मिळाला व त्यांचे पेज व्ह्यूज दिवसाला 45 हजारांवरून 85 हजारांवर गेले होते. याच काळात याच कंपनीने 15 लाख नवीन ग्राहक बनवले. यात महिलांची संख्या ही 2 लाख 35 हजार एवढी होती. यावरून कोरोनाने आपल्याला हेही शिकवले असे म्हणता येईल.

एकीकडे कोरोना काळातील ही आकडेवारी समोर येत असतानाच सन 2023च्या आकडेवारीनुसार म्युच्युअल फंड सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅनद्वारे मासिक चलनाने मार्च 2023 मध्ये 14 हजार कोटींचा टप्पा गाठला. म्युच्युअल फंड उद्योगामध्ये विक्रमी 5 कोटी गुंतवणुकदारांनी गुंतवणूक केली असून यामध्ये भिशीसारख्या पारंपरिक पद्धतीने गुंतवणूक करणार्‍या महिलावर्गाने आता म्युच्युअल फंडात गुंतवणूक करायला सुरूवात केली. सध्या 40 लाख 4 हजार कोटींवर असणारा हा उद्योग येत्या सात-आठ वर्षांत शंभर लाख कोटींवर जाईल, यामध्ये महाराष्ट्र अग्रेसर असेल, असा अंदाज जाणकार व्यक्त करीत आहेत.

सर्वसाधारणपणे मराठी माणूस म्हणजे ‘नाट्यवेडा’ असा समज होता. मराठी माणूस नाटकावर गप्पा मारण्यात वेळ घालवतो, असे बोलले जायचे. खरंतर नाटक हे मराठी माणसाचा श्वास आहे. त्यामुळे त्यात गैर नाही, पण उद्योग-व्यापाराकडे मराठी माणसाचे दुर्लक्ष असायचे असा समज होता. आज हे चित्र बदलले आहे. मराठी माणूस ज्या कट्यांवर गप्पांसाठी बसतो, तिथे जाऊन कधीतरी डोळसपणे पाहा, तिथे आज शेअर बाजारात कोणता शेअर वर गेला, भविष्यात शेअर बाजारात कोणता शेअर वाढेल, तसेच बीपीओ, निक्रटी, निर्देशांक, जागतिक अर्थकारण आणि त्याचे परिणाम यावरसुद्धा चर्चा होतात. कॉफी शॉपमध्ये भेटलेली दोन मराठी माणसे आज शेअर बाजारावर बोलताना दिसतात, तर विशेष म्हणजे कॉलेज तरूण आज शेअर बाजारावर चर्चा करताना दिसतो. महाविद्यालयाच्या परिसरात कधी फेरफटका मारून बघा. शंभरपैकी 20 तरूण तरी तुम्हाला शेअर बाजाराबाबत बोलताना दिसतील. काही जणांची डिमॅट खाती उघडलेली तुम्हाला सापडतील. इथला भाजीवाला, टपरीवाला, छोटा व्यापार करणारा, दुकानदार अशा विविध घटकांतील सामान्य मराठी माणसे आज शेअर बाजार, म्युच्युअल फंड यासारख्या गुंतवणुकीच्या मार्गाचा अवलंब करताना दिसत आहेत. मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी, मुंबईतील कापड गिरण्या बंद पडल्या. 2 लाख मराठी कुटुंबे रस्त्यावर आली. त्यासोबतच मुंबई, ठाणे, रायगड पट्ट्यातील अनेक उद्योग बंद पडले. त्यामुळे मुंबईचे आणि इथल्या मराठी माणसाचे अर्थकारण कोलमडले होते. त्यावेळी जी परिस्थिती निर्माण झाली, त्यातून मार्ग काढताना मराठी माणूस कांदे-बटाटे विकू लागला. वडापावचे स्टॉल टाकून उदरनिर्वाह करू लागला. तोच काळ होता ज्यावेळी हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये मराठी माणूस म्हणजे ‘घरकाम करणारा नोकर’ असे चित्र रंगवले गेले! पण तो संक्रमणाचा काळ होता. ते दिवस फार काळ राहिले नाहीत. या सर्व संकटातून मराठी माणूस पुन्हा उभा राहिला. महाराष्ट्राला निसर्गाच्या आपत्तीचा फटकाही अनेक वेळा बसला. कधी मोठी वादळे आली, कधी ओला दुष्काळ तर कधी सुका दुष्काळ! पण त्याही संकटाशी इथल्या मराठी माणसाने नेटाने लढा दिला, संघर्ष केला. त्यामुळे आज वडापाव विकणार्‍या मराठी माणसाची नवी पिढी अनेक क्षेत्रात आघाडीवर जशी आहे, तशीच ती हाताशी आलेले चार पैसे शेअर बाजारात अथवा म्युच्युअल फंडात गुंतवणूक करतानाही दिसते आहे. शेतकरी तर निसर्गाच्या लहरीपणाशी वर्षानुवर्षे सामना करतो आहे. त्यात अनेक वेळा सरकारी धोरणाचा फटकाही त्याने सहन केला, पण त्याही संघर्षात आमचा मराठी माणूस, शेतकरी जिंकला आहे. आज शेतीमध्ये नवनवीन प्रयोग तरूण यशस्वी करून दाखवत आहेत. केवळ काश्मीरमध्ये पिकणारे केशर आपल्या महाराष्ट्रात कंटेनर शेती करून पिकवणार्‍या आमच्या पुण्याच्या तरूणाने जगाचे लक्ष वेधून घेतले आहे. अशी कितीतरी उदाहरणे सांगता येतील. उद्योग-व्यापारातील अनेक नावे सांगता येतील. 2021 मध्ये सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगात 2 कोटी 65 लाख महिलांना रोजगार मिळाला. त्यात 17 लाख 97 हजार महिला महाराष्ट्रातील आहेत. त्यामुळे ‘देश बदल रहा है’ तसाच महाराष्ट्रही आमचा बदलतो आहे. इथला मराठी माणूस बदलतो आहे. आव्हाने कितीही असली तरी त्यांना टक्कर देऊन इथला मराठी माणूस नवनवीन क्षेत्रात भरारी घेत आहे. कवीमित्र रामदास फुटाणे यांची एक लोकप्रिय कविता आहे, त्यामध्ये त्यांनी मराठी माणसाबद्दल चिंता व्यक्त केली आहे.

मराठी माणूस फेकला गेला,
महाराष्ट्राला अवकळा आली,
बघता बघता पंचवीस वर्षांत
मुंबईची बंबई झाली…’
पण आम्ही याबाबत अजिबात निराशावादी नाही. मराठी माणसाच्या सर्वच क्षेत्रातील कामगिरीचा नीट अभ्यास केला तर लक्षात येईल की, मराठी माणसाचा ‘शेअर’ नेहमीच चढता राहिला आहे. तो कधीच गडगडलेला नाही. त्याचा आलेख इतिहासापासून आजपर्यंत मांडला तर तो चढताच आहे.

– श्री. जयेंद्र साळगांवकर

संचालक, कालनिर्णय 

साहित्य चपराक दिवाळी अंक २०२३

 

चपराक

पुणे शहरातून ‘साहित्य चपराक’ हे मासिक आणि ‘चपराक प्रकाशन’ ही उत्तमोत्तम पुस्तके प्रकाशित करणारी ग्रंथ प्रकाशन संस्था चालविण्यात येते. ‘साहित्य चपराक’ मासिकाचा अंक दरमहा 10 तारखेला प्रकाशित होतो. आपले साहित्य पाठविण्यासाठी, ‘चपराक’मध्ये जाहिराती देण्यासाठी आणि नवनवीन पुस्तकांच्या माहितीसाठी संपर्क - घनश्याम पाटील, संपादक 'चपराक'.
व्हाट्सऍप क्रमांक - ८७६७९४१८५०
Email - Chaprak Email ID

तुमची प्रतिक्रिया जरूर कळवा

हे ही अवश्य वाचा