ब्रह्मचर्यावरी बोलू काही!

ब्रह्मचर्यावर बोलू काही!

Share this post on:

‘एक वेळ हिमालयासारखा महापर्वत स्थानभ्रष्ट होईल, आकाश कोसळेल, अग्नी शीतल होईल, पाण्यासारखे पदार्थ स्वतःचे गुणधर्म, स्वतःची ओळख सोडतील पण हा भीष्म केलेल्या ब्रह्मचर्य या प्रतिज्ञेचा कधीही भंग होऊ देणार नाही…’ असे ठाम उद्गार आहेत पितामह भीष्माचार्य यांचे. ज्यांनी आजन्म ब्रह्मचारी राहण्याचा संकल्प केला आणि एखादी उपासना करावी त्याप्रमाणे ते स्वतःच्या प्रतिज्ञेशी प्रामाणिक राहिले म्हणूनच आज एखाद्याने कोणताही प्रण केला, प्रतिज्ञा केली की आपण त्यास भीष्मप्रतिज्ञा म्हणतो.

पितामह भीष्माचार्य एकदा ज्येष्ठ पांडुपुत्र धर्मराजास म्हणाले, “या जगात जो आजन्म ब्रह्मचारी राहतो त्या तेजस्वी पुरुषाला या जगात अशक्य असे काहीच नाही हे निश्चित आहे.”

दुसरे उदाहरण म्हणजे स्वामी विवेकानंद यांचे! स्वामींनीही ब्रह्मचर्य पालनाची कठोर भीष्मप्रतिज्ञा केली होती. एकदा ते अमेरिकेत गेले असताना तिथे एक भारतीय युवक त्यांना भेटला. तो म्हणाला, “स्वामीजी, मी आजपर्यंत ब्रह्मचर्याचे कठोरपणे, निर्धाराने पालन केले आहे. काही दिवसांपूर्वी मी आजारी पडलो म्हणून इथल्या डॉक्टरांकडे गेलो. त्यांना मी ब्रह्मचारी असल्याची कल्पना देताच ते म्हणाले की, ब्रह्मचर्य पालन करणे हे पूर्णपणे अनैसर्गिक आहे. शिवाय आपल्या तब्येतीसाठी ते धोकादायक आहे. मी काय करु?”

स्वामी विवेकानंद त्या युवकाला म्हणाले,

“युवका, तू भारतीय आहेस. भारत आज अध्यात्मिक क्षेत्रात या विश्वाचा गुरू आहे. तुला आपल्या ऋषींवर, संतांवर आणि आपल्या संस्कृतीवर विश्वास ठेवायला हवा. ज्यांना ब्रह्मचर्य या बाबतीत जराही माहिती नाही अशा पाश्चिमात्य डॉक्टरांवर तू का विश्वास ठेवतोस? ब्रह्मचर्य या विषयावर अशी उलट माहिती असणारांमध्ये आणि पशुंमध्ये काहीही फरक नाही.”

आयुर्वेदात एक श्लोक महत्त्वपूर्ण आहे,

‘पुण्यतमं आयुःप्रकर्षकरं जराव्याधिप्रशमनम्
ऊर्जस्करं अमृतं शिवं शरण्यं उदात्तं परम।’

वरील रचनेनुसार ब्रह्मचर्य हे पुण्यकारक, पापहारक, दीर्घायुष्य देणारे, व्याधींचा नाश करणारे, उन्नतीकारक, अमृतासम, कल्याणकारी या अर्थाने शिव,उदात्त असे आहे.

आयुर्वेदात पुढे असेही म्हटले आहे की, सज्जनांची सेवा, दुर्जनांचा त्याग, ब्रह्मचर्य, उपवास, धर्मशास्त्राप्रमाणे आचरण आणि अभ्यासाच्या नियमांची माहिती म्हणजेच आत्म कल्याण होय.

आयुर्वेदाचे दैवत म्हणजे धन्वंतरी एक छान दृष्टान्त देताना म्हणतात, ‘जी व्यक्ती शांती, उत्तम कांती, स्मृती, ज्ञान, आरोग्य आणि उत्तम अपत्य ह्या अपेक्षा ठेवून असेल त्यांच्या प्राप्तीसाठी एकमेव आणि सर्वोत्तम धर्म म्हणजे ब्रह्मचर्य!’

आयुर्वेदीय एक आचार्य यांनी सर्व मानवप्राण्यास असा मोलाचा सल्ला दिला आहे की, ज्या कुणास स्वतःचे आरोग्य स्वास्थ्य चांगले ठेवायचे आहे, सुखी जीवन जगायचे आहे त्याने कठोर प्रयत्न करुन वीर्य सांभाळले पाहिजे. कारण वीर्य असा एक खजिना आहे, अशी एक नैसर्गिक पुंजी आहे ज्याचा सांभाळ केला नाही तर माणूस आरोग्याच्या बाबतीत दरिद्री बनतो. ही शिदोरी ना उधार मिळते, ना भीक मागून मिळते.

खुद्द भगवान शंकर वीर्याची महती स्पष्ट करताना म्हणतात,

‘वीर्याच्या बिंदूला प्रयत्नपूर्वक सांभाळणारा तेजस्वी ब्रह्मचारी व्यक्ती या जगात सर्व काही प्राप्त करु शकतो. वीर्य हे प्रसादासम आहे आणि म्हणूनच माझ्यासारखा पुरुषोत्तम ईश्वर बनतो आणि सर्वत्र पूजनीय होतो.’

महर्षी स्वामी दयानंद सरस्वती महाराज यांच्याकडे एक सुंदर स्त्री आली. ती महाराजांना म्हणाली, “स्वामीजी, मीही या क्षणापर्यंत आपल्याप्रमाणेच ब्रह्मचारिणी आहे. एक तपस्या म्हणून मी हे व्रत केले आहे. पण आता माझ्या मनात आपल्यासोबत विवाह करावा असा विचार येत आहे. यामागे कारण असे की, विवाहानंतर मला तुमच्यासारखा महातेजस्वी, योगीपुत्र व्हावा.”

त्या अतिसुंदर महिलेचे ते विवेचन ऐकून स्वामी दयानंद म्हणाले, “माते, तुला माझ्यासारखाच पुत्र हवा आहे ना, तर मग मलाच तुझा पुत्र समज म्हणजे तुझी इच्छा पूर्ण होईल.” स्वामींचे असे बोल ऐकून ती ब्रह्मचारिणी स्त्री मनोमन लज्जीत झाली आणि स्वामीचरणी नतमस्तक होत निघून गेली.

वेद भगवान यांचा एक संदर्भ लक्षात घेतला तर असे समजते की, ब्रह्मचारी व्यक्ती आरोग्यदायी असते, शक्तिशाली असते. प्रसंगी ती मृत्यूलाही हरवू शकते.

छांदोग्योपनिषद यामध्ये असं म्हटलय की, एकीकडे वेद आहेत. त्यामध्ये वर्णन केलेला आचारविचार आणि उपदेश आहे तर दुसरीकडे ब्रह्मचर्य आहे. तुलनात्मक अभ्यास केला तर ब्रह्मचर्य हे पारडे वेदांच्या बरोबर असल्याचे लक्षात येते. यावरून ब्रह्मचर्याची महिती लक्षात येते.

विदेशी विचारवंत डॉ. एम. क्राऊन यांचे असे मत आहे की, व्याधी, रोग, आजार ब्रह्मचारी मानवाकडे फिरकतही नाहीत. या व्यक्तीची पचनसंस्था सुदृढ, शक्तीशाली असल्यामुळे त्याला आजीवन आनंद लुटता येतो.

विनोबा भावे यांच्या मते, ‘हिंदू धर्मात विशिष्ट आचरण करण्यासाठी एक महत्त्वाचा असा शब्द आहे, तो म्हणजे ब्रह्मचर्य! ब्रह्मचर्याश्रम हे हिंदू धर्माचे प्रमुख वैशिष्ट्य आहे.’

भगवान बुद्ध यांचे विचार यादृष्टीने महत्त्वाचे आहेत. ते म्हणतात,’भोग आणि रोग हे एकमेकांचे सहकारी आहेत तर ब्रह्मचर्य हे सुदृढ आरोग्याचे मूळ आहे.’

‘इंद्रियांवर संयम ठेवा, ब्रह्मचर्य पाळा त्यामुळे तुम्ही बलवान आणि वीर्यवान बनाल.

जिम्मी ओ’ब्राईन हे पादरी म्हणतात, तरुणपणी ब्रह्मचारी राहणे अत्यंत कठीण आहे. सगळ्या इच्छांविरुद्ध लढावे लागते. एक वेळ अशी येते की, ही जणू रोजची लढाई होऊन जाते.

या सर्व लेखनातून एक गोष्ट जाणवते ती म्हणजे ब्रह्मचर्य! काय जादू असेल या शब्दात! भल्या भल्या, महनीय व्यक्ती ब्रह्मचर्याचा कोणत्या ना कोणत्या कारणाने भंग झाल्यामुळे आपल्या ध्येयापासून, उपासनेपासून दुरावले गेल्याची अनेक उदाहरणे आहेत. मत्स्यगंधेकडून पराशरऋषी, मेनकेमुळे विश्वामित्र, मोहिनीरुपाद्वारे प्रत्यक्ष भगवान शंकर, सरस्वतीमुळे पिता ब्रह्मदेव, कामिनीरुप धारण केल्यामुळे व्यासाकडून जेमिनी, इंद्रदेव आणि चंद्रदेव ही परमपवित्र, पूज्यनीय देवता-ऋषी स्वतःच्या ध्येयापासून दूरावले गेले असल्याचे आपणास धर्मग्रंथातून वाचायला मिळते. जर अशी मंडळी या विषयाला, विकाराला जाणते- अजाणतेपणी बळी पडत असतील तर सामान्यांचे काय? सर्वसाधारणपणे सामान्य माणसाचा असा समज असतो की, जो अविवाहित आहे, जो संसारी नाही तो ब्रह्मचारी! परंतु हे सत्य आहे का? ब्रह्मचारी कोणास म्हणावे? ब्रह्मचारी माणसाला काय काय गोष्टी आचरणात आणाव्या लागतील? कोणत्या कोणत्या संकटांना सामोरे जावे लागते हे समजून घेणे अगत्याचे आहे.

मुळात ब्रह्मचारी म्हणजे कोण? जैन धर्मानुसार ब्रह्मचर्य म्हणजे पवित्रता, शुद्धता! आयुर्वेदात म्हटल्याप्रमाणे शरीराचे तीन प्रमुख आधारस्तंभ आहेत ते म्हणजे आहार, निद्रा आणि ब्रम्हचर्य! भगवान महावीर स्वामी म्हणतात, ‘ब्रह्मचर्य म्हणजे उत्तम तपस्या, नियम, ज्ञान, दर्शन, चारित्र्य आणि विनय यांचा समुच्चय आहे.’ ब्रह्मचर्य हा शब्द ‘ब्रम्ह’ आणि ‘चर्य’ या दोन शब्दांचा समुच्चय आहे. वास्तविक पाहता हे दोन शब्द नाहीत तर फार मोठा आशय धारण केलेला अर्थसागर आहे. ब्रह्म म्हणजे साक्षात परमात्मा! चर्य म्हणजे परमात्म्यासोबत राहणे, सदा परमात्म्याचे स्मरण करणे. महाभारत हा अजरामर ग्रंथ लिहिणारे व्यास म्हणतात, विविध इंद्रियाद्वारे मिळणाऱ्या सुखांचा संयमाने त्याग करणे म्हणजे ब्रह्मचर्य! ब्रह्मचर्य म्हणजे विविध शक्ती मिळवून त्यांना एकत्र गुंफून ठेवणे आणि त्याद्वारे स्वतःचा विकास साधणे. ब्रह्म शोधणे म्हणजेच ब्रह्मचर्य कारण ब्रह्म म्हणजे सर्वस्पर्शी, सर्वव्यापी! ब्रह्माजवळ पोहोचायचे असेल तर इंद्रियांवर संयम, ताबा मिळविणे आवश्यक असते. काया,वाचा, मन आणि नयनावर ताबा मिळविणे गरजेचे आहे. ब्राह्मण आणि चर्य या दोन शब्दांनी मिळून बनलेले ते ब्रह्मचर्य!

सर्वसाधारणपणे ब्रह्मचारी म्हणजे स्त्रियांपासून दूर राहणे, स्त्रीला स्पर्श न करणे असे आपण मानत असलो तरीही महिलेस स्पर्श झाला किंवा एखाद्या महिलेने कळत नकळत स्पर्श केला तरी मन विचलित होऊ नये, रत होण्याची भावना निर्माण होऊ नये हे खरे ब्रह्मचर्यत्व! एकदा एक गुरु आपल्या शिष्यासह एका नदीकाठी फिरायला गेले असता तिथे एक सुंदर स्त्री त्यांच्या दृष्टीस पडली. त्या स्त्रीला नदीच्या दुसऱ्या बाजूच्या तीरावर जायचे होते. तिला पोहणे येत नसल्यामुळे ती स्त्री कुणीतरी येईल आणि आपल्याला पैलतीरावर नेईल या आशेने वाट पाहत असताना तिला ते गुरु आणि त्यांचा शिष्य येताना दिसले. तिच्या मनात आशेचा दीप तेवला. त्या स्त्रीने त्यांना तशी विनंती केली परंतु ते गुरुशिष्य ब्रह्मचारी असल्यामुळे गुरुंंनी तिची मदत करायला नकार दिला परंतु त्या शिष्याला तिची दया आली तो तिचा हाथ पकडून पैलतीरी जायला निघाला. नदीच्या मध्यावर पाणी खूप खोल असल्यामुळे ती स्त्री घाबरली त्यामुळे शिष्याने त्या बाईला खांद्यावर उचलून घेतले आणि पैलतीरावर पोहोचला. इकडे गुरु शिष्याच्या तशा वागण्याने खूप संतापले. आश्रमात जाताच ते खूप रागावले. तसा तो शिष्य म्हणाला,

“गुरुवर्य, त्या स्त्रीला पैलतीरी पोहोचवताना मी तिला जरूर उचलले परंतु माझ्या मनात तुम्ही समजता तसा कोणताही विकार, विषय आला नाही कारण हात पकडलेली, खांद्यावर घेतलेली ती स्त्री तुमच्या दृष्टीने एक स्त्री असेल परंतु माझ्या मते ती एक याचक होती आणि त्यापुढे जाऊन ती माझ्यासाठी एक बालिका होती.” शिष्याच्या त्या उत्तराने गुरु निरुत्तर झाले आणि मनोमन म्हणाले,

‘खरे आहे तुझे. तू खरा ब्रह्मचारी! माझ्या मनात त्या स्त्रीला पाहिल्यावर ज्या विषय वासनेचे विकार उत्पन्न झाले ते पाहता मी अजूनही खरा ब्रह्मचारी नाही.’

यावरून ब्रह्मचर्य पाळणे किती आवश्यक आहे हे लक्षात येते पण ब्रह्मचर्य पाळायचे कसे? आपण असे समजतो की, अविवाहित पुरुष म्हणजे ब्रह्मचारी! कारण ब्रह्मचर्याचा सरळ सरळ संबंध आपण वासनेशी आणि वीर्य पतनाशी जोडतो पण ते कितपत योग्य आहे? दुसराही एक प्रश्न उभा राहतो की, प्रत्येकाने ब्रह्मचारी राहण्याचे ठरवले तर मग हा संसार निर्मनुष्य होईल त्याचे काय? मानवीय आयुष्य साखळीत बाल्यावस्था, किशोरावस्था, गृहस्थाश्रम आणि वानप्रस्थाश्रम ह्या चार अवस्था यशस्वीपणे पार पाडाव्या लागतात. बाल्यावस्था आणि किशोरावस्था ओलांडून गृहस्थाश्रमी प्रवेश करण्याची साधारणपणे पंचवीस वर्षे आहेत. हाच पंचवीस वर्षाचा काळ म्हणजे शुद्ध ब्रह्मचर्याचा काळ! उत्तम विद्यार्जन, सर्वोत्तम बलोपासना करून आरोग्यदायी स्वास्थ्य कमावणे हे या पर्वाचे खास कर्म! या कालावधीत शरीर, वाणी, मन, डोळे आणि कान यांना मैथुनापासून दूर ठेवणे हेच खरे ब्रह्मचर्य! यामध्ये सर्वात महत्त्वाचे आहे ते म्हणजे मन! मन हे अतिशय चंचल आहे. त्याला सांभाळणे हे या काळात अत्यंत गरजेचे आहे. मनाचे ब्रह्मचर्य हेच खरेखुरे ब्रह्मचर्य होय. गीतेच्या एका श्लोकात भगवान श्रीकृष्ण म्हणतात,

‘कर्मेन्द्रियाणी संयम्य म आस्ते मनसा स्मरन् ।
इंन्द्रियार्थान्विमूढात्मा मिथ्याचारःस उच्यते।।

या श्लोकाचा भावार्थ असा की, कर्मेन्द्रियांचे संयमन करून, मनाने मात्र जो मुर्ख विषयांचे चिंतन करतो, तो निःसंशय दांभिक मनुष्य होय.’

मानवाच्या पाच इंद्रियांपैकी एका इंद्रियाचा जरी संयम सुटला तरी त्या मानवाची बुद्धी भ्रष्ट होते असे सांगून श्री वेदव्यास म्हणतात, सर्व इंद्रियांवर संयम मिळविणे, ताबा मिळविणे आवश्यक आहे. हा ताबा, हा संयम कसा मिळवायचा हेही पाहणे गरजेचे आहे. काही महत्त्वाच्या गोष्टींची चर्चा करणे गरजेचे आहे. दृढ संकल्प, साधीसुधी राहणी, पवित्र आणि ताजा आहार, योगासन, प्राणायाम, सतत कार्यरत राहणे, चांगले विचार आणि वर्तन असणाऱ्या व्यक्तींच्या संपर्कात राहणे, रात्री लवकर झोपून सकाळी लवकर उठणे, सकाळी लवकर स्नानादि कार्य उरकणे, निर्व्यसनी, चांगले तेच पाहणे, योग्य तेच ऐकणे आणि रुचेल तेच बोलणे, परस्त्री मातेसमान मानणे अशा काही गोष्टी प्रयत्नपूर्वक,कठोरपणे अंगी बाणवल्या तर त्या ब्रह्मचर्य रक्षणासाठी फायदेशीर ठरू शकतात. यातील संकल्प हा अति महत्त्वाचा आहे. मानवास आरंभशूरतेचा शाप लागलेला आहे. भावनेच्या भरात माणूस विशेषतः नववर्षाच्या निमित्ताने दरवर्षी नवनवीन संकल्प करतो पण हे संकल्प किती काळ टिकतात? काही दिवस जातात न जातात तोच पुन्हा ये रे माझ्या मागल्या अशी अनेकांची स्थिती होते. दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या निद्रेची! लहानपणापासून आपण शाळेत एक गोष्ट ऐकतो ती म्हणजे ‘लवकर निजे, लवकर उठे, तया ज्ञान, आरोग्य संपत्ती भेटे.’ आजच्या विकृत स्पर्धेत किती जण या वचनाशी एकनिष्ठ राहतात हा संशोधनाचा विषय ठरेल.

विवाहित असतानाही ब्रह्मचारी राहणे हे काम वाटते तितके सोपे आहे का? वाघ-सिंहाच्या पिल्लांना मानवीय रक्ताची चटक लागली की, त्याला कायम तेच रक्त प्राशन करण्याची इच्छा होते. तद्वतच वासनेचे आहे. एकदा का शारीरिक संबंधाची चटक, गोडी लागली की, मग ब्रह्मचर्याचे पालन करणे अति कठीण होऊन बसते. ते नैसर्गिक आहे, स्वाभाविक आहे, आवश्यकही आहे पण विवाहित असूनही ब्रह्मचारी राहणे खरेच अवघड आहे का? पंचवीस वर्षे वयापर्यंत ब्रह्मचारी राहिल्यानंतर विवाह करून गृहस्थाश्रमाचा स्वीकार केला की, मग या अवस्थेतील कार्य करणे गरजेचे आहे. मग ब्रह्मचर्य पालन कसे करता येईल. गृहस्थाश्रमातील ब्रह्मचारी कोण? हाही प्रश्न स्वाभाविक आहे. संसारात रमलेल्या मानवाने संतती उत्पत्तीसाठी केलेला संभोग हा अब्रह्मचारी म्हणून समजल्या जातो तिथे ब्रह्मचर्य भंगाचा प्रश्न उद्भवत नाही. सांसारिक कर्तव्य पार पाडण्यासाठी मर्यादेत राहून केलेला संभोग आवश्यकच आहे. या कालखंडात (गृहस्थाश्रम) जितके ब्रह्मचर्य आवश्यक आहे तितकेच अब्रह्मचर्यही आवश्यक आहे. पत्नीसोबत केलेला शारीरिक व्यवहार हा ब्रह्मचारी या संकल्पनेत येतो. याबाबत असेही म्हणतात की, निसर्गनियमानुसार स्त्रीच्या रजदर्शनापासून अर्थात मासिक पाळीच्या पहिल्या दिवसापासून ते सोळाव्या दिवसांपर्यंत आणि त्यातही पहिले चार दिवस तसेच अकरावी आणि तेरावी रात्र वगळून केलेला संभोग हा त्या गृहस्थाच्या ब्रह्मचर्यत्वाचे प्रमाण आहे. उरलेल्या रात्री स्वतःच्या पत्नीसोबत केलेला शृंगार हा ब्रह्मचर्य भंग किंवा अब्रह्मचर्य ठरते. अशा ब्रह्मचर्याला गार्हस्थ ब्रम्हचर्य असेही म्हणतात. महर्षी चरक असेही म्हणतात की, ‘वीर्याची जपणूक ही जशी ब्रह्मचारी व्यक्तींसाठी आवश्यक आहे तशीच ती विवाहित पुरुषांनाही गरजेची आहे. जो विवाहित पुरुष वीर्यस्खलन हुशारीने करतो अर्थात स्वतःच्या पत्नीसोबत शय्यासोबत करतो असा पुरुषही ब्रह्मचारी असतो. ‘

ब्रह्मचर्य पालन करताना काही गोष्टी निर्धाराने, कठोरपणे पाळाव्याच लागतात. महावीर स्वामी यांच्या विचारानुसार ब्रह्मचारी व्यक्तीने मनुष्यवस्ती कमी असलेल्या, जिथे स्त्रियांची संख्या कमी आहे अशा ठिकाणी राहणे हितकारक आहे. मन सैरभर होऊन हातून काही विपरित घडू नये यासाठी ही काळजी घ्यायला हवी. ज्या गोष्टींमुळे विषयलालसेला हवा मिळेल, स्त्रियांबद्दल अशी चर्चा करू नये ज्यामुळे मनाला आनंद मिळेल आणि दुष्कृत्य होईल. ब्रह्मचाऱ्याने अशा ठिकाणांपासून दूर राहावे जिथे महिलांसोबत परिचय होईल, त्यांच्यासोबत घनिष्टता वाढेल. त्याचप्रमाणे महिलांसोबत वारंवार गप्पा मारणे घातक ठरु शकते. कारण अशावेळी महिला स्वाभाविकपणे किंवा कळत- नकळत जे हावभाव करतात, त्यांच्या नयनाची जी भाषा असते आणि महिलांचे सौंदर्य पुरुषांना आकर्षित करु शकते. त्यामुळे घडणारा अनर्थ हा ब्रह्मचर्य संकल्पास घातक ठरतो. केवळ स्त्रियांसोबत गप्पा मारणे टाळून चालणार नाही तर स्त्रियांचे रडणे, हसणे, गाणे, हावभाव याकडेही ब्रह्मचाऱ्याने दुर्लक्ष केले पाहिजे. भूतकाळात एखाद्या महिलेसोबत जे कार्य केले असेल, बोलणे-हसणे करताना जाणते- अजाणतेपणी स्पर्श झाला असेल हे सारे विसरून जाणे गरजेचे आहे कारण आपण त्याच आठवणीत गुंतून पडलो तर तेच कार्य आपल्या संकल्पाच्या आड येऊ शकते.

भावनांवर संयम ठेवण्यासाठी भोजन हे फार मोठी मदत करते. धर्मानुसार योग्य असलेले, भावभावनांना उत्तेजित न करणारे भोजन ठराविक वेळेवर घेतले पाहिजे. जशा जेवणाच्या वेळा ठरलेल्या असाव्यात तसेच जेवणाचे प्रमाणही मोजकेच असले पाहिजे. ‘अन्न तारी, मारी!’ हे जसे आरोग्यासाठी आवश्यक आहे तसेच अन्न हे वासना, लालसा, शृंगार यासाठीही तारक आणि मारक ठरु शकते. भावना उत्तेजित करणारे घटक असलेले अन्न वर्ज्य असलेच पाहिजे. ब्रम्हचर्याचा संकल्प किंवा उपासना ज्याला करायची आहे त्याने अन्नसेवन करताना कटाक्ष बाळगला पाहिजे. ज्या अन्नघटकांच्या सेवनामुळे शरीरात वासना, विकार, उत्तेजना निर्माण होते असे घटक म्हणजे दूध, दही, तूप, साखर, गुळ, तेल, मिठाई अशा पदार्थांचे प्रमाण खाण्यातून कमी केले पाहिजे. अगदी सात्विक आणि माफक प्रमाणात सेवन करणे हितावह ठरते. शिळे पदार्थ, तिखट, आंबट, लसूण, कांदा यांचे सेवन अहितकारक आहे. याशिवाय ब्रह्मचारी व्यक्तीने स्वतःच्या शरीराला जास्त शृंगारित करु नये, सजवू नये. केस, पोशाख, नखे यांना रंगवू नये कारण अशी सजलेल्या, नटलेल्या व्यक्तीकडे इतर कुणी आकर्षित होऊ शकते. प्रसंगी सान्निध्यात आलेल्या आणि आकर्षित झालेल्या व्यक्तीबद्दल वासना, विकार उत्पन्न होऊन व्यक्ती स्वतःच्या निश्चयापासून दूर जाऊ शकते.

कामवासना चेतवणारे काही घटक आहेत त्यांचा त्याग केला पाहिजे. या घटकांमध्ये प्रामुख्याने शब्द, रूप, वास, रस आणि स्पर्श यांचा समावेश आहे. समोर एखादे मनमोहक रुपडे आले की, मानव स्वतःला हरवून बसतो. काही शब्द, एखाद्याची वाणीही उत्तेजक असते तीही टाळायला हवी. वास किंवा गंध यामुळेही मानव बेभान होऊन आपणच केलेल्या संकल्पापासून दूर जाऊ शकतो म्हणून आपणच या गोष्टींपासून दूर राहिलेले चांगले. असे म्हणतात की, आगीजवळ लोण्याचा गोळा नेला तर तो वितळतो अशीच परिस्थिती स्त्री-पुरुष यांच्या निकटतेमुळे घडून येते त्यामुळे असा एकांत, अशी जवळीक टाळलीच पाहिजे. यासाठी आपणास वैज्ञानिक दृष्टिकोन आणि सोबतच जैन धर्म ग्रंथात लिहिल्यानुसार चुंबकत्व नियमाचा विचार करावा लागेल. समान दोन ध्रुव जवळ आले तर त्यांच्यामध्ये अनाकर्षण निर्माण होते परंतु जर दोन विजातीय ध्रुव जवळ आले तर त्यांच्यामध्ये आकर्षण निर्माण होते. स्त्री-पुरुष हे असेच परस्परविरोधी ध्रुव आहेत त्यामुळे या दोन ध्रुवांनी जवळ येऊ नये म्हणजे आकर्षण निर्माण होण्याचा प्रश्नच येणार नाही. त्यासाठी आपला जास्तीत जास्त वेळ चांगल्या व्यक्तींच्या सहवासात घालवावा. म्हणजे मनाची एक बैठक तयार होते. आचारविचारांना सुयोग्य दिशा मिळते.

देह केवळ पशूप्रमाणे आहार, निद्रा, भय, मैथून या करिता वापरणे यासारखे वाईट काही नाही. मग आम्ही करावे तरी काय? असा प्रश्न एकदा संत एकनाथ महाराजांना त्यांच्या भक्ताने विचारला तेव्हा एकनाथ महाराज म्हणाले,
‘ते त्यागावे ना भोगावे। मध्यभागी विभागावे।।’

म्हणजे विवाहित असूनही ब्रह्मचारी राहावे. नितीबंधन पाळून विषय, भोगाचा आनंद घ्यावा.

व्यासमुनी यांनी त्यांच्या ग्रंथात लिहिले आहे, ‘विषय (वासना) ज्ञानवंतानांही नडतात, त्यांनीही सर्व विषयासंदर्भात सावध असावे.’ विषय असेल, वासना असेल, भोग असतील यापासून ना संत महात्म्यांची सुटका आहे ना सुशिक्षित अथवा अशिक्षितांची! वासना ही एक अशी गोष्ट आहे जी भल्याभल्यांना सतावते. व्यासांचे जेमिनी नामक एक शिष्य होते. त्यांना व्यासांचे असे विचार पटले नाहीत. जेमिनीच्या मते ज्ञानी माणसाला सारे काही सहजशक्य आहे. ज्ञानाच्या आधारे ती व्यक्ती कोणत्याही व्यसनावर, व्याधीवर, लालसेवर विजय मिळवू शकते. व्यासांच्या लक्षात जेमिनीचे विचार आले. व्यासांनी हेही ओळखले की, जेमिनीला काही सांगितले तर तो ऐकणार नाही. तो स्वतःला ज्ञानी समजतो आहे. त्याचा अहंकार त्याच्याच कृतीतून उतरवू या. खरेतर व्यासांनी आपल्या ज्ञानी शिष्याची परीक्षा घेतली…

ते दिवस पावसाळ्याचे होते. थंडगार वारा सुटला होता. थंडी वाजते म्हणून आश्रमात एकटे असलेल्या जेमिनीने यज्ञकुंड पेटविले आणि उष्णता निर्माण केली. तितक्यात बाहेर पाऊस सुरू झाला. जेमिनीला बाहेर कुणी तरी आले असल्याची चाहूल लागली. जेमिनी बाहेर येऊन पाहतात तर एक लावण्यवती, तरुण स्त्री उभी होती. जेमिनीला तिची करुणा आली. त्यांनी तिला आत घेतले. आत कुंडातील अग्नीप्रकाशात त्या ओलेत्या, तरुणीला पाहताच जेमिनीच्या शरीरात वासनेचा लोट धक्के मारु लागले. त्या तरुणीशी विवाह करण्याची इच्छा त्याच्या मनात उत्पन्न झाली. त्याने तरुणीला विचारले,

“माझ्याशी लग्न करशील का?” तो प्रश्न ऐकून लज्जीत झालेली ती स्त्री म्हणाली,

“माझ्या वडिलांची एक अट आहे की, जो कुणी मला पाठीवर घेऊन यज्ञकुंडाला सात फेऱ्या मारील, त्याच्याशी मी लग्न करावे. ह्या अटीमुळे मी अजूनही अविवाहित आहे.”

ते ऐकून जेमिनीने त्या तरुणीला पाठीवर घेऊन यज्ञकुंडाला सात फेऱ्या मारल्या. सातवी फेरी झाल्यानंतर तरुणीला खाली उतरवताच जेमिनीला आश्चर्याचा धक्का बसला. पाहतो तर काय त्या तरुणीच्या जागी प्रत्यक्ष व्यासऋषी उभे होते. व्यासांनी हसत विचारले,

“काय मग ज्ञानवंत?”

गुरूंनी आपली परीक्षा घेऊन आपल्याला म्हणजे ज्ञानवंतालाही वासनाविकार जडतो हे दाखवून दिले हे लक्षात येताच जेमिनी मान खाली घालून उभे राहिले. असा आहे वासना, विकार, लालसा यांचा महिमा.

अनेकांनी वर्णन केल्याप्रमाणे कोणत्याही संकल्पाच्या, दृढ निश्चयाच्या आड येणारी वासना आहे तरी काय? वासना म्हणजे इच्छा! एखादी वस्तू दिसताक्षणी ती मिळावी अशी प्रबळ इच्छा निर्माण होणे म्हणजे वासना! ही इच्छा, वासना, लालसा एवढी प्रबळ असते की, ती वस्तू प्राप्त करण्यासाठी मानव कोणत्याही स्तरापर्यंत जाऊ शकतो. त्यावेळी त्याला आपले वय, आपली सामजिक, आर्थिक स्थिती, आपले संस्कार, आपला परिवार आणि आपण जे प्राप्त करु पाहतोय त्यासाठी जे जीवाचे रान करतोय त्यामुळे आपली स्थिती कशी होईल, समाज काय म्हणेल, कुटुंब काय म्हणेल अशा कोणत्याही गोष्टीचा तो सारासार विचार करत नाही. प. पू. गोंदवलेकर महाराज त्यांच्या प्रवचनांमधून वासना हा विकार स्पष्ट करताना म्हणतात,

‘आपण सर्व जीव वासनेत गुंतलेलो आहोत, कारण आपला जन्मच वासनेत आहे. वासना म्हणजे आहे ते असूच द्या, आणि आणखीही मिळू द्या’ असे वाटणे.’ किती सोप्या भाषेत महाराजांनी हा एकप्रकारे दृष्टान्त दिला आहे. माझ्याजवळ पैसा, बंगला, गाडी सारे काही आहे पण मला अजून पैसा मिळवायचा आहे. तद्वतच एखादी स्त्री कितीही सुंदर, प्रामाणिक, एकनिष्ठ असली तरीही तिचा पती समाधानी नसतो. दुसरी एखादी स्त्री संपर्कात आली की, तो तिला मिळविण्यासाठी नाही नाही ते प्रकार करतो.

श्री महाराज पुढे म्हणतात, ‘वासनेत आपला जन्म आणि वासनेत आपला अंत, असे असताना वासनेला दूर कशी सारता येईल? एखादा मनुष्य काळा असेल तर त्याला आपले काळेपण घालवता येत नाही; त्याप्रमाणे वासना असणे हा मनुष्याचा एक सहज- गुण आहे, त्याला तो पालटता येत नाही. तर मग आम्हाला वासनेतून कधीच मुक्त होता येणार नाही का? मनुष्याच्या ठिकाणी इतर प्राणीमात्रापेक्षा जर काही वेगळे असेल तर चांगले काय आणि वाईट काय हे कळण्याची बुद्धी. आपण कळूनसवरूनही वासनेला, अहंपणाला आधार देतो, इथेच आपले चुकते…’

नेमके मुद्द्यावर, वर्मावर बोट ठेवले आहे. मानवाला मिळालेली बुद्धी तो अनेक वेळा कोणताही विचार न करता अनैतिकतेकडे वळवतो आणि कधीही न भरून येणारे नुकसान करवून घेतो. वासनेचेही असेच आहे, हातचे सोडून पळत्याच्या मागे लागण्याच्या हट्टापायी तो सर्वस्व गमावून बसतो. श्री ब्रह्मचैतन्य महाराज पुढे सांगतात,’नीतीची बंधने पाळा, परस्त्री मातेसमान माना. प्रपंचात एकपत्नीव्रताने राहणारे लोक ब्रह्मचारीच होत. परस्त्री, परद्रव्य यांच्याप्रमाणेच परनिंदा हीही अत्यंत त्याज्य गोष्ट आहे…” महाराजांची ही विचारसरणी थेट कुणाच्या विचारांशी जुळत असेल तर थेट जाणता राजा, छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी! युद्धात सैन्याने पकडून आणलेल्या बंदी स्त्रीला मातेसमान मानून तिचा साडीचोळी देऊन सन्मान करणारे शिवाजी महाराज विचार, कृतीने किती महान होते हे दिसून येते. अत्यंत प्रेरक, अनुकरणीय असा आदर्श छत्रपतींनी समाजासमोर ठेवलाय…

‘एखाद्याला बायको नसली म्हणजे विरक्त आणि असली तर आसक्त, असे म्हणता येणार नाही. बायको असूनही लंपट नसेल तो विरक्त. भावनेत राहून जो इंद्रियांच्या नादी लागत नाही तो वैरागी.’ मला वाटते यापेक्षा वेगळे कुणी समजावून सांगणार नाही इतके सुस्पष्टपणे महाराजांनी सांगितले आहे. ‘वासना’ विषयावर गोंदवलेकर महाराजांनी ठिकठिकाणी आपली मते नोंदवली आहेत. ते म्हणतात,’आपले मन वासनेच्या अधीन होऊन तात्पुरत्या सुखाच्या मागे गेल्यामुळे थप्पड खाऊन परत येते. लोक समजतात तितके वासनेला जिंकणे कठीण नाही. आपली वासना कुठे गुंतते ते पाहावे. जी गोष्ट आपल्या हातात नाही तिच्याविषयी लालसा बाळगणे वेडेपणाचे आहे हे ध्यानात ठेवावे.’

‘वासना या शब्दाची फोड करुन महाराज म्हणतात, विषयाजवळचा वास ना- म्हणजे नको.’ विषयाचा वास मजजवळ नको. वासनेला दूर ठेवून तिला नकार देणे एवढे सोपे नाही म्हणून श्री ब्रह्मचैतन्य महाराज पुढे म्हणतात,’आम्ही वासनेचे खत विषयाला घालतो आणि विषयातच गुंतून राहतो. वासना दुसऱ्या कोणत्याही उपायांनी तृप्त होण्यासारखी नसून, आपण जर भगवंताजवळ ‘वास’ ठेवला तर तरच ती नष्ट होते.’ समर्थ रामदास स्वामी अशाच आशयाच्या एका श्लोकात म्हणतात, ‘मना वासना वासुदेवी वसो दे…’ दुसऱ्या एका ओवीत समर्थ रामदास म्हणतात,

‘जे विचारापासून चेवले। जे आचारापासून भ्रष्टले।
विवेक करूं विसरले। विषयलोभी।’

जे विषयाचे लोभी असतात ते विचार करू शकत नाहीत, ते विवेकहीन आणि आचारभ्रष्ट असतात. अन्य एका ठिकाणी रामदास स्वामी असेही सांगतात की, अशुद्ध विषयांचा त्याग करून देहनिर्वाणापुरते कार्यकारणपरत्वे सेवन करावे. हीच विषयत्यागाची लक्षणे जाणून घ्यावीत.

व्वा! किती सुंदर दृष्टान्त आहे ना! अनैतिक, अनैसर्गिक गोष्टींमध्ये अडकलेल्या ‘वासना’मधला वास काढा आणि तो वास भगवंतचरणी अर्पण करा. भगवंताजवळ वास ठेवा म्हणजे काय करा, तर नामस्मरणात काया, वाचा, मन गुंतवा. एकदा का आपण नामस्मरणाच्या वासनेत गुंतलो तर मग इतर कोणतीही वासना, इच्छा, आशा,आकांक्षा आपल्याला जखडून टाकण्याचे सोडा परंतु आपल्या जवळही फिरकणार नाहीत.

ब्रह्मचारी व्यक्ती म्हटलं की, आपल्यासमोर जी ठळक नावे येतात त्यापैकी एक अत्यंत महत्त्वाची व्यक्ती म्हणजे संत रामदास स्वामी! ज्यांनी ब्रह्मचर्य पालनेसाठी, बलोपासना करण्यासाठी लग्नसमयी अर्थात संसार स्वीकारण्यापूर्वीच संसाराचा त्याग केला. संयमाचा महामेरू म्हणून ज्यांच्याकडे पाहिल्या जाते त्यांनी ब्रह्मचर्य या विषयावर त्यांच्या ‘मनाचे श्लोक’ या ग्रंथातून खूप मार्गदर्शन केले आहे. मनाचा सरळ संबंध वासनेशी जोडला जातो कारण मन ही एक अशी चंचल बाब आहे त्याद्वारे अनेक विषय, विकार मानवाला काबूत करतात. संत रामदास स्वामी सरळ सरळ मनाशी हितगूज करून फार मोठा संदेश देतात. त्यांचे अत्यंत महत्त्वाचे संदेश किंवा मंत्र आपण विचारात घेऊया. रामदास स्वामी म्हणतात,

मनात, दुष्ट कामना, विचार येऊ देऊ नयेत. दुष्ट विचार मनात आले की, मनाला एक प्रकारची मलिनता येते. मन वासनेच्या मागे धावले तर अपराध घडतो. म्हणून स्वामी म्हणतात,’म्हणोनी कुडी वासना सांडि वेगी!’ येथे कुडी वासना म्हणजेच दुष्ट वासना होय. दुष्ट वासना, तसे विचार मनात येऊन तसे वर्तन केले की काय होते त्यासाठी रावणाचे उदाहरण स्वामी देतात.ब्रह्मचारी कसा असावा हे समर्थ अत्यंत सोप्या भाषेत सांगतात,’जो एकपत्नी आहे, जो परस्त्री माता-भगिनीप्रमाणे मानतो, सन्मान देतो आणि ज्याचे कामावर, कामनांवर पूर्ण नियंत्रण आहे तो ब्रह्मचारी!’

या चर्चेचा शेवट संत ज्ञानेश्वर महाराजांनी रचलेल्या एका ओवीने करुया. महाराज म्हणतात,
‘कैसी सुख निद्रा इंगळाचे पलंगावरी’

निखारे अंथरलेला पलंग यातून ज्ञानेश्वर महाराज सुचवितात, मनात येणारे वाईट विचार, वासना, लालसा हे सारे म्हणजे जणू धगधगणारा निखारा! अशा इच्छा-आकांक्षांना अंगीकृत करणे म्हणजे शरीर भाजून घेणे….

संदर्भ :-
१) पद्मपुराण
२) दासबोध (गीताप्रेस गोरखपूर)
२) मना सज्जना : तुकाराम नारायण विप्र
३) ब्रह्मचर्य हेच जीवन : श्रीमत्स्वामी शिवानन्दतीर्थ.
४) इंटरनेटवरील लेख.

– नागेश सू. शेवाळकर
8600110649

आमचे इतरही लेख वाचण्यासाठी, दर्जेदार पुस्तके विकत घेण्यासाठी www.chaprak.com ला भेट द्या. ‘चपराक प्रकाशन’चे फेसबुक पेजही जरूर लाईक करा. उत्तमोत्तम व्हिडीओ पाहण्यासाठी ‘चपराक’च्या युट्यूबला भेट द्या आणि सबस्क्राइबही नक्की करा.
Copyright @ www.chaprak.com / All Rights Reserved.

Share this post on:

Author: चपराक

पुणे शहरातून ‘साहित्य चपराक’ हे मासिक आणि ‘चपराक प्रकाशन’ ही उत्तमोत्तम पुस्तके प्रकाशित करणारी ग्रंथ प्रकाशन संस्था चालविण्यात येते. ‘साहित्य चपराक’ मासिकाचा अंक दरमहा 10 तारखेला प्रकाशित होतो. आपले साहित्य पाठविण्यासाठी, ‘चपराक’मध्ये जाहिराती देण्यासाठी आणि नवनवीन पुस्तकांच्या माहितीसाठी संपर्क - घनश्याम पाटील, संपादक 'चपराक'.
व्हाट्सऍप क्रमांक - ८७६७९४१८५०
Email -

View all posts by चपराक >

6 Comments

  1. धन्यवाद, चपराक समूह!
    माझा हा लेख आपल्या वेबसाईटवर प्रकाशित केल्याबद्दल मनःपूर्वक आभार!

  2. फार वादग्रस्त विषय आहे. याविषयी आधुनिक वैद्यकीय शास्त्र काय म्हणते ?

  3. सर फारच वैचारिक लेख लिहीला आहे. धन्यवाद

  4. निरनिराळे संदर्भ देऊन अतिशय सुंदर लेख लिहलाय सरजी!
    लेखातून बरेच ज्ञान प्राप्त होते. प्रत्येकाने वाचायलाच हवा असा अप्रतिम लेख!

  5. खुपच छान लेख. ब्रम्हचर्य म्हणजे नेमके काय? हे नवीन पीढीला कळेल. उत्तम, वाचनीय.

तुमची प्रतिक्रिया जरूर कळवा

error: Content is protected !!