माझ्या मराठवाड्यातल्या नरसीचे श्रेष्ठ संत नामदेव महाराज यांचा एक अभंग कालपरवा वाचनात आला. ‘अहंकाराचा वारा | न लागो राजसा | माझिया विष्णूदासा | भाविकांसी |’ असा त्या अभंगातला एक चरण. या ओळी नकळतच कानातून मनात शिरल्या अन् विचारांची एक शृंखला अगदी माझ्या नकळतच मनातल्या मनात जोडली जाऊ लागली.
अहंकार. शुगर हा रक्ताचा जितका अविभाज्य घटक असतो तितकाच अहंकार हाही माणसाचा एक अविभक्त भाग. माणसाच्या शरीराला एका मर्यादेपर्यंत साखरेची गरज असतेच पण तिचं प्रमाण वाढले की प्रॉब्लेम निर्माण होतात. अहंकारही तसाच. मर्यादेत असतो तोपर्यंत तो स्वाभिमान असतो. जगण्यासाठी अत्यावश्यक. तो कमी झाला की लाचारी अन् प्रमाणापेक्षा जास्त झाला की अहंकाराचं रूप घेतो. त्यामुळे तो योग्य प्रमाणात असणं आवश्यक आहे. या गर्वाची स्वाभिमान – अभिमान – अहंकार अशी तीन रूपं असली तरी त्यांच्यातल्या सीमारेषा खूपच पुसट असतात. त्यामुळे तुमचा स्वाभिमान कित्येकांना अहंकारही वाटू शकतो अन् तुमचा अहंकार तुम्हाला स्वतःला स्वाभिमान वाटत असतो.
अहंकार कशाचा असू शकतो? तर तो कशाचाही असतो. सत्ता, संपत्ती, सौंदर्य आणि सामर्थ्य ही अहंकार निर्मितीची चार प्रमुख कारणे म्हणता येतील. काहींच्या मते ‘बुद्धी’चाही अहंकार असू शकतो पण मला वाटतं मग तिथे बुद्धी आहे असे म्हणता येणार नाही. तुम्ही जर बुद्धिमान असाल तर या विश्वात ज्यावर गर्व करावा असे काहीच चिरंतन नसते याचे ज्ञान तुम्हाला झालेले असणे अपेक्षित आहे. तसे नसेल तर आपली बुद्धिमत्ता फसवी आहे हे ज्याचे त्याने समजून घ्यावे. अहो विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांसारखे प्रज्ञासूर्य देखील “मी ज्ञानसागराच्या गुडघाभर पाण्यात उभा आहे” असं अतिशय विनम्रपणे सांगतात. ही विनयशीलताच त्यांच्या श्रेष्ठत्वाचे प्रमाण आहे. याउपरही कुणाला बुद्धीमत्तेचा गर्व होत असेल तर त्यासारखा बुद्धीहीन दुसरा कोण?
याखेरीज आपल्याकडे असणाऱ्या कलागुणांचा देखील कित्येकांना अहंकार असतो. लेखकाला आपल्या लेखणीचा, गायकाला गायकीचा, क्रीडापटूला आपल्या खेळ कौशल्यांचा. पण गर्वाभिमान बाळगणारे कलावंत – गुणवंत आपोआप यथावकाश प्रवाहाच्या बाहेर फेकले जातात. याची कित्येक उदाहरणे सभोवताली बघायला मिळतात. स्वतःला साधूसंत म्हणवून घेणाऱ्या विष्णूदासांनाही या ‘ग’ च्या बाधेतून स्वतःला वाचवता येणार नाही. त्याला त्याच्या भक्तीचा अहंकार होऊ शकतो याची जाणीव संतांना झाली म्हणूनच ते “अहंकाराचा वारा न लागो राजसा ” असे म्हणाले असावेत याची खात्री पटते.
बरं.. हा अहंकार टाळता येऊ शकतो का हो ? हो नक्कीच.’ मी माणूस आहे. माझ्यात उणीवा असू शकतात. मी चुकतो. ‘ हे एकदा डोळसपणे, अगदी मनापासून मान्य केलं,जगण्या – वागण्यात उतरवलं की अहंकाराचा वारा लागण्याची शक्यता कमी होते. आणि मला वाटतं आपण ‘सॉरी ‘ हा शब्द पाठ केला पाहिजे. जाणीवपूर्वक वापरला पाहिजे. आपल्या चुका मान्य करायला खूप मोठं मन लागतं. आणि एकदा मन मोठं झालं की अहंकार लहान होवून जातो. संत साहित्यात ‘जगत् मिथ्या ‘ किंवा ‘नश्वरतेच्या’ बाबतीत खूप काही सांगितलंय. अहो बघा ना, तुम्ही कुणीही असा, कितीही मोठे असा तरी एक दिवस तुमचे रूपांतर राखेत किंवा मातीतच होणार आहे. हे सर्व सजिवांना समान पातळीवर आणून सोडणारे स्वच्छ वास्तव आहे. हे मान्य केलंच पाहिजे. ही नश्वरता समजून घेतली पाहिजे.
गर्व, अहंकार.. शब्द खूप छोटे.. अन् ज्याच्याकडे ते असतात त्यालाही खूप छोटे करून टाकतात. त्यामुळे प्रयत्नपूर्वक अहंकारापासून स्वतःला वाचवायला हवं. जाता जाता एक गंमत सांगतो… “मला अहंकार नाही..” याचाही कित्येकांना अहंकार असतो..!!
शिरीष पद्माकर देशमुख
मो. 7588703716
मु. मंगरूळ ता.मंठा जि जालना
आमचे इतरही लेख वाचण्यासाठी, दर्जेदार पुस्तके विकत घेण्यासाठी www.chaprak.com ला भेट द्या. ‘चपराक प्रकाशन’चे फेसबुक पेजही जरूर लाईक करा. उत्तमोत्तम व्हिडीओ पाहण्यासाठी ‘चपराक’च्या युट्यूबला भेट द्या आणि सबस्क्राइबही नक्की करा.
Copyright @ www.chaprak.com / All Rights Reserved.
खूप छान विचार व्यक्त केले आहेत.
धन्यवाद सर
अतिशय प्रगल्भ विचार मांडलेत सर.
अगदी सत्य.. प्रखरतेने मांडले आहे..
छानच! सुंदर लिहलंय !😊
खूप खूप छान सर जी….
SK
खूप छान व अर्थपूर्ण लेख
खूपच छान लेख