संवेदनशील माणसांमुळे जगलो !

संवेदनशील माणसांमुळे जगलो !

आजी-आजोबा दूर जाताना दिसतात. स्वत:च्या विचारात गढलेले दिसतात. शरीरस्वास्थ्य नसते. भावना गेलेल्या असतात, आशा जिवंत असते. उघडय़ा डोळ्यांनी सारं पाहायचं असतं. नजरेतला धाक आता संपलेला असतो. सहनशक्तीसुद्धा थुंकीसारखी गिळावी लागते कारण इथे यांची बडबड ऐकायला कुणालाच वेळ नाही. “तुम्ही गप्प बसा, मिळेल ते जेवा आणि पडून राहा” असं ऐकायची वेळ येते आणि आपण मुलांचे आश्रित असल्याची जाणीव होते.

एवढं सारं बदललंय तर, जातो तो दिवस चांगला म्हणायचा. एकमेकांनी एकमेकांचा आधार बनायचं आणि केव्हातरी एकमेकांना मध्येच सोडून, एकटय़ानं स्मशानात जायचं हा निसर्गाचा नियम आहे. एकूण काय तर लॉकडाऊनच्या काळात सर्वात दुर्लक्षित कोण असेल तर आजी व आजोबा वय झाले असल्याने वैयक्तिक आधारची गरज असते परंतु मुल आणि मुली शिकून परदेशात गेली तर काहीना मुलं बाळ नसलेल्यांना फक्त एकमेकांचा तेव्हढा आधार असतो.

कुटुंब म्हटलं की, डोळ्यांसमोर येते ती घरात वावरणारी ज्येष्ठ मंडळी. गाव घर म्हटलं की, ज्येष्ठांशिवाय घर असूच शकत नाही. ज्येष्ठ म्हटलं की, दिसतात ते आजी-आजोबा. प्रत्येक घरात कुणाचा तरी धाक, दरारा असावा लागतो. कुटुंब एकत्र ठेवायचं तर किंवा कुटुंबातली शिस्त ढासळू नये याची खबरदारी घेणारी ही दोन व्यक्तिमत्त्व म्हणजे आजी-आजोबा. प्रत्येक माणसाला ही आठवतात. जुन्या आठवणीत रममाण करतात. वेळप्रसंगी डोळ्यांत अश्रू आणणारी ही व्यक्तिमत्त्व. सगळ्यात जास्त आरोग्याची काळजी कोणाची असेल तर लहान मुले व आजी आणि आजोबा ज्यांचे कोणी नाही त्यांचा समाज असतो हे स्वतः लॉकडाऊन मध्ये अनुभवले. सरकार याबाबतीत पूर्ण अपयशी ठरते असे मला वाटते. असे का तर ज्या गोष्टी सर्वसामान्य व्यक्ती आपल्या कुटुंबातील मुल आणि आजी व आजोबा यांना सुविधा वेळेवर देतात तीच सुविधा वेळेवर ज्यांना कोणी नाही त्यांना मिळते का ?

ज्यांच्या कुटुंबात आजी व आजोबा आहे त्यांचे घरातल्या प्रत्येक गोष्टींवर अगदी बारीक नजर ठेवून प्रत्येकाच्या हालचाली नजरेत टिपणारे हे जणू सीसीटीव्ही कॅमेरे. त्या माणसांचा दरारा जेवढा जास्त, तेवढी भीतीसुद्धा असते. आदरयुक्त भीती आयुष्यभर काबाडकष्ट करून घरसंसार, शेतीवाडी यांची जपणूक केली. स्वत:च्या पोटाला चिमटा काढून कुटुंबासाठी जीव ओतला. त्या म्हातारा, म्हातारीला प्रत्येक गोष्टीची काळजी असते. हे सारं जपता जपता कुटुंबातली एकी कायम राहावी यासाठी, जीव तळमळत राहतो. वेळप्रसंगी कठोर निर्णय घ्यावे लागतात. कधी मुलाला वाईट बोलावे लागते, तर कधी सुनेला, तर कधी नातवंडांवरून झालेली भांडणं मिटविण्यासाठी नवरा-बायकोत एकोपा निर्माण करावा लागतो. या सा-या भूमिका पार पाडता पाडता ही माणसं म्हातारी होतात. ब-याचदा दु:ख पचवून घेण्यासाठी स्वत:ला खोटं ठरवतात. स्वत:चा आत्मविश्वास पणाला लावतात.

दुधापेक्षा साय गोड । नातवंडांच्या प्रेमाला जगात नाही तोड
आजी – आजोबा का हवे असतात सांगू? आमच्यावर संस्कार करायला, संध्याकाळी श्लोक शिकवायला, झोपताना गोष्टी सांगायला, माया करायला, घरात आजी आजोबा हवेच.

बाबा कामावर जातात. आई वर्क फॉर्म होम असल्याने काम करते. त्यांना वेळ नसतो पण आजीआजोबा मात्र घरी असतात, आम्हाला सांभाळतात. आई रागावल्यावर आजीच्या पदराखाली आजी घेते आणि काय चुकले ते गोडीने सांगते. बाबांचा धपाटा चुकतो आजोबांच्यामुळे.शाळेतून आल्यावर घर उघडे असते. हसत मुखाने आजी समोर येते. दप्तर जागेवर ठेऊन, हातपाय धुवून जेवायला ये असा हुकूम देते आपोआपच ती सवय लागते. गरमगरम जेवण आजी वाढते, सगळ्या भाज्या खाण्यास बजावते आणि खायला पण लावते, मुरंबा, सुधारस शिकरण काहीतरी गोड पण देते. जेवण होईपर्यंत जवळ बसते. जेवायला बसताना वदनी कवळ घेता म्हणायला लावते, जेवण झाल्यावर पान स्वच्छ करून उचलायला लावते.मला आजीमुळे शिस्त लागली आहे. माझी प्रकृती चांगली आहे कारण आजी मला सगळ्या भाज्या, कोशिंबिरी खायला लावते. सगळ्या वर्गात माझे वाचन छान आहे, जेवणानंतर आजोबाना पेपर वाचून दाखवण्याचे काम माझे आहे. कारण स्वच्छ, अर्थ समजून आवाजाचे चढ उतार घेऊन कसे वाचायचे ह्याची शिकवणी असते ती.स्वातंत्र्याचा सगळा इतिहास मला आजोबांनी सांगितला आहे. सणाच्या दिवशी उकडीचे मोदक, धिरडी, वाटलीडाळ, पुरणपोळी, गुळाची पोळी आजी आवर्जून करते. आजीच्या हाताला छान चव आहे कारण ते पदार्थ ती प्रेमाने करते. हे सर्व कोविड १९ मुळे बऱ्याच कुटुंबात नातवंडांनी अनुभवले असेल.

आईवडिलांनी रागावून चार फटके दिलेल्या नातवंडांना आधार वाटतो तो आजी-आजोबांचा. धावत जाऊन त्यांच्या कुशीत शिरावं आणि आपण पूर्ण सुरक्षित असल्याचं आईवडिलांना कळावं एवढी शक्ती या प्रेमामध्ये आहे. कारण आजी-आजोबांकडे असलेल्याला हात लावण्याची हिंमत कुणाचीच नाही. कुटुंबात जमीन, हक्क यावरून जर वाद झाले तर याच माणसांचा पुढाकार असतो. घरात कुठलेही शुभकार्य असले तरी हीच माणसे अग्रभागी असतील. कुणी आजारी असेल, वाईट प्रसंग ओढवला असेल तर देवाला गाऱ्हाणं करणारे हेच आजी-आजोबा पाहिजेत कारण यांचं मन शुद्ध, निर्मळ, कुणाचं वाईट व्हावं ही शंकाही यांच्या मनात कधी नसते. वयाप्रमाणे शरीर साथ देत नसले तरीही मुलांना आजी-आजोबांची फार ओढ असते आणि आजी-आजोबांनाही त्यांच्या प्रत्येक गोष्टीचं कौतुक असतं, अप्रुप असतं. स्वार्थी भावना, भेदभाव हे कधीही त्यांच्यात नसतात. पण आता दुर्दैवाने आपण एवढे पुढारलेले आहोत की, आजी-आजोबांच्या कथा मोठय़ा चवीने वाचतो, पण प्रत्यक्षात आज ब-याच प्रमाणात आजीआजोबा वृद्धाश्रमात जाताना दिसतात.

त्यावेळचे संस्कार वेगळे होते. आमचे विचार, त्या संस्कारांचे विचार सुसंस्कृत पिढीकडे काहीतरी दडवल्यासारखे दिसतात. प्रायव्हसीची अडचण निर्माण झाल्यावर आपल्या घरातला नटसम्राट आणि कावेरी वृद्धाश्रमात अथवा गावी कुणाच्या तरी देखभालीखाली जाते. आपण एवढे सुशिक्षित झालोय की गावाची ओढ प्रत्येकाला आहे, मुलांना आहे पण वास्तवात वागताना नव्याची नवलाई संपली की आपण फारमॅलिटीज कंप्लीट करत असतो. वास्तव कमी आणि दिखावा जास्त, अशी काहीशी विचित्र जीवनपद्धती आज या संगणक युगात दिसतेय. लांब असलेले आपणाला पाहिजे असते, ओढ लावते, मात्र जवळ आल्यावर काही दिवसांत काही महिन्यांनी आपल्याला त्या गोष्टी अडचणीच्या वाटतात. नवरा-बायको मुलांना घेऊन हॉटेलमध्ये जेवायचा प्लान करतात, तेव्हा आजी-आजोबांची व्यवस्था वेगळी करावी लागते, पण अनेक कुटुंबं अशी आहेत ज्यांच्या घरात हे दोन जीव आयुष्यभर सुखाने जगले त्याचे पुण्य त्या कुटुंबातल्या प्रत्येकाला मिळाले. ती सेवा केलेल्या मुलांना आयुष्यभर आशीर्वाद लाभला, हेही महत्त्वाचे आणि अशा आईबाबांची मुलं आजी-आजोबांची सेवा करतात, हेही संस्कार घराण्यात असतात. ते पिढय़ानपिढ्या चालत असतात. आज कोविड १९ मुळे वयोवृद्ध यांच्या समस्या आणि त्यांच्या सुविधा कडे किती लक्ष दिले गेले हे आपण बघितले तर लक्षात येईल सगळ्यात दुर्लक्षित झाले. संपूर्ण देशात बंद असतांना त्यांना लागणारी औषध, किराणा याची सोय ही सरकारने नाही तर या समाजातील संवेदनशील नागरिकांनी केली. सरकार कल्याणाच्या नावा खाली करायचे थोडे आणि दाखवयाचे एवढे की खुप काही केले. आज तीन महिने बंद असतांना फार कमी लोकानी ज्या आजी व आजोबांना मदत केली असे बघायला मिळाले.

आजी-आजोबा दूर जाताना दिसतात. स्वत:च्या विचारात गढलेले दिसतात. शरीर स्वास्थ्य नसते. भावना गेलेल्या असतात, आशा जिवंत असते. उघडय़ा डोळ्यांनी सारं पाहायचं असतं. नजरेतला धाक आता संपलेला असतो. सहनशक्तीसुद्धा थुंकीसारखी गिळावी लागते कारण इथे यांची बडबड ऐकायला कुणालाच वेळ नाही. तुम्ही गप्प बसा, मिळेल ते जेवा आणि पडून राहा असं ऐकायची वेळ येते आणि आपण मुलांचे आश्रित असल्याची जाणीव होते. एवढं सारं बदललंय तर, जातो तो दिवस चांगला म्हणायचा. एकमेकांनी एकमेकांचा आधार बनायचं आणि केव्हातरी एकमेकांना मध्येच सोडून, एकटय़ानं स्मशानात जायचं. हा निसर्गाचा नियम आहे, पण या आजी-आजोबांची आठवण सारखी येते, तेव्हा आई-वडिलांपेक्षा जवळचे नाते असलेले हे दोन जीव आठवल्यावर प्रत्येकजण आपल्या आजी-आजोबांना नक्कीच मिस करेल. कोविड १९ मध्ये ज्यांच्या घरात आजी व आजोबा होते तिथे लहान मुलांना खेळवण त्यांचा अभ्यास घेणे व त्यांना गोष्टी सांगणे असे अनेक कार्य घरात आजी व आजोबांनी केले. याकाळात मात्र घरकोंडीमुळे ज्यांना कोणी नाही त्यांची काळजी मात्र ह्या समाजातील नागरिकांनी घेतली व त्यांच्यासाठी ते परमेश्वर बनून सेवा करू लागले.

मयुर बाळकृष्ण बागुल, पुणे
चलभाषा – ९०९६२१०६६९

आमचे इतरही लेख वाचण्यासाठी, दर्जेदार पुस्तके विकत घेण्यासाठी www.chaprak.com ला भेट द्या. ‘चपराक प्रकाशन’चे फेसबुक पेजही जरूर लाईक करा. उत्तमोत्तम व्हिडीओ पाहण्यासाठी ‘चपराक’च्या युट्यूबला भेट द्या आणि सबस्क्राइबही नक्की करा.
Copyright @ www.chaprak.com / All Rights Reserved.

चपराक

पुणे शहरातून ‘साहित्य चपराक’ हे मासिक आणि ‘चपराक प्रकाशन’ ही उत्तमोत्तम पुस्तके प्रकाशित करणारी ग्रंथ प्रकाशन संस्था चालविण्यात येते. ‘साहित्य चपराक’ मासिकाचा अंक दरमहा 10 तारखेला प्रकाशित होतो. आपले साहित्य पाठविण्यासाठी, ‘चपराक’मध्ये जाहिराती देण्यासाठी आणि नवनवीन पुस्तकांच्या माहितीसाठी संपर्क - घनश्याम पाटील, संपादक 'चपराक'.
व्हाट्सऍप क्रमांक - ८७६७९४१८५०
Email - Chaprak Email ID

4 Thoughts to “संवेदनशील माणसांमुळे जगलो !”

  1. कवयित्री कस्तुरी देवरुखकर

    खूप छान लेख आहे.

  2. मनःपूर्वक अभिनंदन
    वास्तव चिंतन मांडलेत

  3. Vinod s. Panchbhai

    छान लिहलंय!
    मर्मस्पर्शी लेख!!

  4. Jayant Kulkarni

    लेख आवडला. कोविड परिस्थिती चे यथार्थ वर्णन! आजी आजोबा यांची गरज घरा घरात आहे. कोणी मानतात कोणी मानत नाहीत!

तुमची प्रतिक्रिया जरूर कळवा

हे ही अवश्य वाचा